Saturday 17 December 2016

गोंधळ व गोंधळी

..........................................“गोंधळ” व “गोंधळी”......................
भावांनो नमस्कार,
महाराष्ट्रातील बहुतांश कुळांचा कुळधर्म व कुळाचार म्हणजे “गोंधळ” होय. “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा अर्थ मराठी विश्वकोशामध्ये असा सांगितला आहे की, घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याबददल, देवीची स्तुती व पूजा करुन, कृतज्ञतापुर्वक केलेला स्तवन विधी म्हणजे “गोंधळ” होय आणि हा विधी पार पाडण्याचे काम करणारी धार्मिक जात म्हणजे “गोंधळी” होय. शिवाय हे सांगण्याची आवश्यता नाही की, प्रखर हिंदुस्तवाचा केवळ अभिमान बाळगणारीच नव्हे तर हिंदुत्वाचा ख-या अर्थाने प्रचार व प्रसार करणारी जात म्हणजे “गोंधळी” होय.
हिंदु धर्मामध्ये ज्याप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, यज्ञ, अंत्यविधी, व तत्संबंधीत इतर विधी इत्यांदीची पूजा ब्राम्हण पार पाडतात त्याचप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, इत्यादी प्रसंगी गोंधळाचा व देवीच्या इतर पूजनाचा विधी “गोंधळी” पार पाडतात. गोंधळाचा विधी केवळ महाराष्ट्रातच होत नाही तर महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, हरियाणा व दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये भक्तीभावे होतो. म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द बहुश्रुत व व्यापक आहेत. गोंधळाच्या पावित्र्याची जपणुक व गोंधळी यांना दिला जाणारा मान सन्मान तसेच केला जाणारा आदर हा पुर्वापार चालत आला आहे. जमदग्नी ऋषी व रेणूकामाता यांच्यापासून गोंधळाची उत्पत्ती झाली असे आपली वयस्क मंडळी सांगतात. रेणुकापुराण व रेणुकामहात्म्य यांतही याचा संदर्भ आढळतो. इ.स.पुर्व २५५० ते इ.स.पुर्व २३५० हा “भगवान परशुराम काळ” मानला जातो.त्रेता युगात श्री विष्णुंचे सहावे अवतार म्हणून भगवान परशुराम होवून गेले. हा काळ म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” उगमाचा काळ. आज रोजी महाराष्ट्रारात “गोंधळी” ही जात भटक्या जमाती(ब) या प्रवर्गात अ.क्र.१० वर आहे. हे सर्व लिहिण्याचा हेतू एवढाच की, “गोंधळ” व “गोंधळी” संपूर्णपणे प्राचीन, धार्मिक, भावनिक व जातीवाचक शब्द आहेत.
मात्र अलिकडच्या काळात “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द श्रध्दा व आदरपुर्वक कमी आणि तुच्छतात्मक व उपहासात्मक दृष्टीनेच अधिक वापरले जात आहेत. साहित्यीक अगदी सर्रासपणे आपल्या साहित्यामध्ये तर प्रसार माध्यमे आपल्या बात्म्या व निवेदनांमध्ये “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द नकारात्मक अर्थाने वापरत आहेत. ज्यामुळे गोंधळी समाजाची मने दुखावत आहेत. वास्तविक पहाता शिवछत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीच्या पवित्र कार्यात हिरीरीने सहभागी होवून हेरगिरी करुन स्वराज निर्माणास हातभार लावणारी गोंधळी जात राजेंची लाडकी होती. याचमुळे राजेंनी त्या काळात गोंधळी समाजाला वतने व जहागी-या दिल्या होत्या. आजही गोंधळी बांधव शिवछत्रपतींचा इतिहास शाहिरीबाण्यात गर्वाने प्रतिपादीत करतात. लोककला व लोकवाड.मयाद्वारे लोकजीवणाचे यथार्थ चित्रण मांडून लोकशिक्षण, लोकजागृती व लोकरंजन करणारी “गोंधळी” जात, उपहासाने उच्चारली जाते तेव्हा वेदना होतात. आज साधारणपणे “धिंगाणा” या अर्थाने “गोंधळ” हा शब्द तर “धिंगाणा घालणारे” या अर्थाने “गोंधळी” शब्द वापरला जात आहे. “प्रेक्षकांनी घातला गोंधळ….”, “कार्यालयात गोंधळ घालणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात…”, “गोंधळी मद्यपी सी.सी.टिव्ही कँमे-यात कैद…”, “गोंधळी आमदारांचे निलंबन…”, अशा बातम्या पेपरात सतत छापून येतात.
“गोंधळ” व “गोंधळी” शब्दांचा वरील संदर्भांमध्ये लावला जात असलेला अर्थ आणि अगदी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे मराठी शब्दकोश व विश्वकोशातील “गोंधळ” व “गोंधळी” शब्दांचा अर्थ यांचा काडीचाही सहसंबंध नसूनही असे घडत आहे हे क्लेशदायक आहे. तसे पहाता ज्या संदर्भाने “गोंधळ” हा शब्द वापरला जात आहे त्याला अनेक पर्यायी व अगदी प्रमाण शब्द आहेत. जसे की, धिंगाणा, गडबड, घोटाळा, हुल्लडबाजी, हुज्जत, चकमक, धुमाकूळ ते अगदी राडा पर्यंत… आणि अशाच प्रकारे ज्या संदर्भाने “गोंधळी” हा शब्द वापरला जात आहे त्याला देखील अनेक पर्यायी व अगदी प्रमाण शब्द आहेत. जसे की, धिंगाणाखोर, धिंगाणेबाज, हुल्लडबाज, हुज्जतखोर, राडेबाज इत्यादी. मग प्रश्न असा पडतो की, एवढे सगळे प्रमाणित व अधिकृत शब्द जे वापरायला हवेत ते न वापरता या सर्वांच्या ऐवजी “गोंधळ” व “गोंधळी” हेच शब्द जे वरील अर्थाने केवळ चुकीचे, अप्रमाणित व अनाधिकृत शब्द आहेत तेच वापरून “गोंधळी” जातीच्या धार्मिक व जातीय भावना का दुखावल्या जात आहेत ?
भारत हा लोकशाही प्रधान व घटनात्मक देश आहे. येथे कोणत्याही समाजाच्या जातीय व धार्मिक भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे असून ही अगदी बिनदिक्कतपणे अशाप्रकारे “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा चुकीचा वापर मानसिक त्रास देणारा आहे. अशा प्रकाचा मानसिक त्रास केवळ गोंधळी समाजालाच होतोय असे नाही तर सर्व बारा बलुतेदार व अठारा अलुतेदार वर्गातील बांधवांनाही होतोय. “गोंधळी” ही जात अठरा अलुतेदारांपैकी एक जात. शिवाय “गोंधळ” हा विधी पार पाडणारे व गोंधळकला सादर करुन उपजिविका भागविणारे इतर जातीचे "व्यावसायिक गोंधळी" देखील दुखावतात. कारण बाहेर समाजात त्यांना ही गोंधळी म्हणूनच ओळखले जात आहे.
विशेष म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा उपहासात्मक उच्चार व वापर महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा वगळता अन्यत्र कोठेही वापरताना आढळत नाही. हे आक्षेपार्ह आहे आणि आक्षेप नाही घेतला म्हणून प्रमाणित शब्द असल्याप्रमाणे राजरोसपणे या शब्दांचा वापर केला जात आहे हे आपण पहातो. ग्रामीण भागातील बोली भाषेचा भाग म्हणून, निव्व्ळ निरक्षर व्यक्तींकडून विरळपणे अशाप्रकारे चुकीचा वापर झाला तर एकवेळ दुर्लक्ष केले जावू शकते. मात्र अगदी साहित्य व प्रसार माध्यमांमधील वापर अशोभनिय आहे. हा वापर जसा अशोभनीय आहे तसाच तो धोकादायकही आहे. कारण साहित्यांतील व प्रसारमाध्यमांतील वापराने, शब्द प्रमाणित होत असतात आणि शब्दकोशात येत असतात. आणि मग पुढे त्याच शब्दांना हळुहळू लोकसंमती मिळत असते. त्यामुळे वेळीच आक्षेप नोंदविले जाणे गरजेचे असते. आजवर आक्षेप न घेण्याचे कारण असेही आहे की, एक तर आपण अल्पसंख्य व त्यातही विखूरलेले आहोत आणि दुसरे म्हणजे सध्या “गोंधळी” शब्द ज्या अर्थाने वापरला जात आहे आपण त्याच्या अगदी विरुध्दार्थी स्वभावाचे आहोत. म्हणजे, “कशाला विरोध करायचा ? कशाला नसल्याला धिंगाणा” ? असा बचावात्मक व काहीसा समंजसपणाचा विचार करणारी आपली जात.
अनुसूचित जाती व जमातीमधील बांधवांणा कोणी जातीवाचक बोलले तर त्यांना कायद्याने जाब विचारता येतो. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती या देशव्यापी प्रवर्गातील बलुतेदार व अलुतेदार जातींना, बोली भाषेमध्ये उपहासाने व तुच्छतेनेच उच्चारले जात आहे हे नाकारता येणार नाही. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने “दलित” या शब्दाला आक्षेप घेणा-या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्याण “दलित” हा शब्द घटनाबाहय असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
शब्द हे शस्त्र असतात, ते जपूण वापरावेत असे म्हणतात. तसेच वाक्यप्रचार व म्हणी हे भाषेचे अलंकार असतात त्यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर केला म्हणजे भाषा सुशोभित होते. तर मग आज मराठी भाषेत “गोंधळ” व गोंधळी” हे शब्द नकारात्मक व उपहासात्मक अर्थाने का वापरले जात आहेत. भावांनो आज “गोंधळी” ही जात जरी पूर्णपणे विकसित व प्रगत नसली तरी अशा अशोभनिय वापराला विरोध करण्याइतपत नक्कीच सक्षम आहे. आज “गोंधळ” हे जरी आपले एकमेव उदरनिर्वाहाचे साधण नसले तरी ते आपल्या अस्मीतेचे व अस्तित्वाचे प्रतिक आहे. विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा परिषद, मराठी भाषा संचालनालय, पत्रकार संघ व महासंघ तसेच मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्यमंत्री, मा.मंत्रीमंडळ तसेच इतर लोकप्रतिनिधी यांना सविनय निवेदने देवून आपण सामूहिकपणे व शांततामय मार्गाने “गोंधळ” व गोंधळी” या शब्दांच्या चुकीच्या अर्थाने होत असलेल्या वापराला विरोध करावयास हवा. अलीकडेच मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओवरील, “मन की बात” या कार्यक्रमातून “अपंग” शब्दाऐवजी “दिव्यांग” हा शब्द वापरण्याचे देशवासियांना आवाहन केलेले आहे.
यावर ही फरक नाही पडला तर आपल्या घटनात्मक हक्कासाठी आपण मा. उच्च न्यायालयाचे दारही ठोठावू शकतो. यासाठी मुंबई शहर व उपनगर, नागपूर व औरंगाबाद या भागातील कार्यकर्त्यानी जरा मनावर घ्यावयास हवे. न्यायालयीन लढाईने नक्कीच “गोंधळ” व गोंधळी” या शब्दांच्या उपहासात्मक व थट्टात्मक वापरावर निर्बंध येतील याबाबत माझ्या मनात किंचित ही संदेह नाही. त्यासाठी आवश्यक पुरावे ही उपलब्ध आहेत.
भावांनो मागितल्याशिवाय तर आई देखील दुध पाजत नाही. एका पवित्र "विधी" चा होत असलेला अवमान व एका प्राचीण "जाती" ची होत असलेली अवहेलना अन्यायकारक आहे. अन्यायाविरूद्ध विद्रोह केल्याशिवाय तो दूरही होणार नाही आणि अन्यायाविरोधात विद्रोह करणे ही तर महाराष्ट्राची परंपरांच आहे.
…….. बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९६७३९४५०९२ (WhatsApp Only)
ई-मेल. bsayush7@gmail.com