Sunday 17 June 2018

जातीय उन्माद

मित्रांनो, महात्मा गांधींपासुन डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, लेखक एम. एम. कलबुर्गी आणि जेष्ठ महिला पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्या हत्या आठवल्या की मन हताश उदास अन सुन्न होते.
धर्मरक्षणासाठीच म्हणे गौरी लंकेश यांची हत्या कोणाच्या तरी सांगण्यावरून केली होती अशी कबुली हल्लेखोर हत्यारा परशुराम वाघमारेने दिली आहे. मग मला प्रश्न पडतो की हे हिंदू नव्हते का?
काल परवाची वाकडी तालुका जामनेर जि. जळगाव येथील घटना देखील अशीच उदास करते. येथे दोन्ही बाजुला, अर्थात अपराधी व निर्पराधी दोघेही हिंदुच होते ना? ते ही मागासवर्गीय!!
म्हणजेच जर हिंदु धर्मप्रेम याच मुद्द्यावरून असे प्रकार होत असते तर मग अन्याय अत्याचारग्रस्त हिंदु नसते. (अर्थात इतर धर्मियांवर अन्याय करा असे नाही) साधी सरळ आणि स्पष्ट बाब आहे की यामागे जातीयता अथवा जातीवाद आहे. श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-निच अशी जातींची विभागणी धर्मासाठी हानिकारक आहे. माणुसकी व मानवतेला काळीमा फासणारी विषमतापुर्ण जातींची विभागणी हिंदु धर्माला विषमतेचा पुंजका बनवत आहे. विभागणी व विषमता म्हटले की अन्याय अत्याचार आलेच. म्हणुन ही जातींची विभागणी नष्ट झाली पाहिजे. यालाच कंटाळून महामानव डॉ. भिमराव आंबेडकर स्वतः आपल्या लाखो समर्थक अनुयायांसह जातीविहीन समतामुलक बौद्ध धर्मात प्रविष्ट झाले. त्यांच्यानंतरही हिंदु धर्मातील अनेक बुद्धीवाद्यांनी धर्मांतर केले.
नव धर्म प्रवेशासाठी बहुतांशांनी बौद्ध धर्म निवडला आहे. कारण एकच हा धर्म जातीरहीत धर्म आहे. मग हिंदु धर्म जातीरहीत का होऊ शकत नाही? धर्म धरून ठेवतो ना? मग हिंदु धर्म रक्षकांनी, धर्माच्या स्वयंघोषित मार्तंडांनी आजवर किती हिंदु धर्मीयांना धरून ठेवले? उद्या एकजुटीने मातंग जमात हिंदु धर्म सोडुन गेली तर त्याला जिम्मेदार कोण असेल? आणि अशीच हिनतेची वागणुक मिळत गेली तर मातंग व इतर अशीच वागणुक मिळणाऱ्या इतर जातीयांनी धर्मांतर का करु नये?
धार्मिक व जातीय अभिमान स्वाभिमान समजला जाऊ शकतो मात्र जातीय व धार्मिक कट्टरता अनावश्यक आहे. यातुन उन्माद निर्माण होतो व हा उन्माद मग अनिष्ट घटना घडवुन आणतो. शेवटी ज्याचा हात मोडतो त्याच्याच गळ्यात पडतो म्हणा मात्र काही नालायकांमुळे संपुर्ण जात वा जमात बदनाम होते. समाज त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहतो. अल्पसंख्याक असणाऱ्या भटक्या विमुक्त जमातींनी या अशा कट्टरतेपासुन व उन्मादापासुन दुर राहीले पाहीजे.
यासाठी सर्वांनी आपल्या डोक्याचा, त्यातील मेंदुचा वापर करावा. कोणीतरी सांगतेय म्हणून नाही वागले पाहिजे. आदर्श कोणाला मानावे अनुकरण कोणाचे करावे याचा विचार सामान्य हिंदु धर्मीयांनी करायची वेळ आली आहे. चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांपासुन अलिप्त राहीले पाहिजे. अशांच्या चुकांवर पांघरून नाही घातले पाहिजे.
आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. वर्णधर्म हे ध्येय असावे की कर्मधर्म? शैक्षणिक आर्थिक व सामाजिक प्रगती साधणे हे प्रत्येकाचे ध्येय असायला हवे, या बाबींना जास्तीचे महत्त्व दिले पाहिजे. मात्र दुर्दैवाने धर्माला, जातीला अतिव महत्त्व दिले जाते.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्माभिमान अथवा जातीभिमान म्हणजे केवळ स्वजातीभिमान वा स्वधर्माभिमान नव्हे तर इतरांच्या जाती धर्माचाही अभिमान बाळगला पाहीजे. ज्यांना खरोखरच हिंदु धर्म प्रिय आहे, ज्यांना हिंदु धर्माचा अभिमान आहे, त्यांनी हिंदु धर्म समजुन घेतला पाहिजे. धर्मासाठी काय योग्य आहे? काय अयोग्य आहे? ते समजून घेतले पाहिजे. मी हिंदु असल्याचा मला निसंकोच अभिमान आहे मात्र मी धिक्कार करतो जातीय व धार्मिक उन्मादाचा!!!

बाळासाहेब धुमाळ🙏