Friday 24 April 2020

कोरोनायुद्धाची तयारी

#कोरोनायुद्धाची तयारी...

मित्रांनो लॉक डाऊनचा अंधकार संपून मुक्त स्वातंत्र्याच्या शितल चंद्रप्रकाशाचे ग्रहण करण्यासाठी आसुसलेल्या चकोर पक्षासारखी आपल्या सर्वांची अवस्था झाली आहे. परंतु हा काळ ना कल्पनाविलास करण्याचा आहे ना काव्य प्रतिभा दर्शविण्याचा आहे. अगोदरच नैराश्य, हतबलता आणि भयभीत करणाऱ्या घटना तथा बातम्यांमुळे आपण सर्वजण मरणासन्नतेच्या फेजमध्ये गेलेलो आहोत. आशा-निराशा, जीवन- म्रुत्यू आणि आहे-नाहीच्या फे-यात आपले मन दोलायमान अवस्थेत आहे आणि अशा या विदारक युद्धजन्य परिस्थितीत कुठलेही अवजड व क्लिष्ट विचारांचे बाण सोडायला ना ते माझ्या स्म्रुतीच्या भात्यात आहेत आणि ना ही तुम्हाला ते पेलवणार आहेत! त्यामुळे साहित्यिक अभिव्यक्तीच्या जंजाळात न पडता कोरोनाच्या दुष्टचक्रातून मुक्त होण्याच्या वास्तववादी विचारांच्या अनुषंगाने माझ्या मनात जे विचार आले, ज्यांनी मला रात्री झोपु दिले नाही ते सरळसोट तुमच्यासमोर मांडतो.

बाकी जरी सोडून दिले सर्व तरी एक वास्तव न स्विकारता ते सोडून चालणार नाही की हे युद्ध आहे! शिवाय हे युद्ध इतक्यात संपणार नाहीये! कोरोना लवकर जाणार नाहीये! तो ब-याच लोकांचे जीवही घेणार आहे! परंतु असे असले तरी ते बरेच लोक ते असतील जे कोरोनाला गांभिर्याने घेणार नाहीत. 'कुछ नही यार, चलता है' हा अविर्भाव त्यांना नडणार आहे. काही सतर्क व निरपराध देखील दुर्दैवाने बळी पडतील परंतु तरीही सरकारने व आपण जनतेने जर जागरूक होऊन पाऊले उचलली तर कोरोना विरूद्ध आपल्याला विजय प्राप्त होऊ शकतो. 

तसे पाहता हे युद्ध प्रचंड घनघोर असणार आहे. कारण आपली लोकसंख्या, प्रादेशिक विस्तार, सामाजिक विविधता, शैक्षणिक व आर्थिक विषमता, आपली अर्थव्यवस्था, मर्यादित संसाधने व वैद्यकीय सोयीसुविधा यामुळे हे आव्हान जास्त कडवे असणार आहे. असे असले तरी द्रुढसंकल्प, एकजूट, पुर्वनियोजन व रणनीती यांच्या जोरावर, आपण जरी काहीसे दुभळे असलो तरी या वैश्विक महामारीवर मात करू शकु. अर्थात आपण घाबरूनही जायचे नाहीये. कारण याचा म्रुत्यु दर कमी आहे परंतु गाफीलही राहायचे नाहीये कारण याचा संसर्ग दर प्रचंड आहे. हा गुणाकार करतो परंतु मा. मुख्यमंत्री म्हटल्याप्रमाणे आपण याला गुणाकार तर सोडा बेरीजही करू द्यायची नाहीये उलट आपणच याची वजाबाकी करायची आहे.

यासाठी सर्वप्रथम तर सरकारांना आपली सक्षमता वाढवावी लागणार आहे. किमान कोरोनाविरूद्धच्या लढाईतील फोरफ्रंट सोल्जर्स म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडीकल स्टाफ, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार हे लोक तरी कोरोना प्रादुर्भावापासुन दुर राहीले पाहीजेत. कारण एकतर हे लोक संख्येने मर्यादित असतात. जर हेच आजारी पडले तर यांची कामे कोण करील? व दुसरे म्हणजे जर यांनाच बाधा झाली तर यांच्यापासून इतरांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते आणि म्हणूनच या सैनिकांना बाधा होणार नाही यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय संरक्षक साहीत्य यांना उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

जनतेला द्यावयाच्या मुलभूत सेवा आधुनिक पद्धतीने, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून व वैद्यकीय नियमांनुसार द्याव्या लागणार आहेत. अधिकाधिक चाचण्या कराव्या लागतील. लोकांचे सर्वेक्षण करावे लागेल. सर्वांची सर्व माहीती जवळ ठेवावी लागेल. प्रत्येकाच्या प्रत्येक हालचालींवर, वर्तनावर शक्य तेवढे बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. उपलब्ध संसाधनांचा खुबीने वापर करून अर्थचक्र गतीमान ठेवावे लागेल.या युद्धातील आवश्यक सामुग्री म्हणजे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर व उपकरणे, औषधे व इतर साधने निर्माण करण्यावर तसेच ती इतरांकडून उपलब्ध करून घेण्यावर देखील भर द्यावा लागणार आहे. काही तात्कालिक बदल करावे लागणार आहेत उदाहरणार्थ केवळ खाजगीच नव्हे तर सरकारी कंपन्या व कार्यालये देखील चार शिफ्ट्समध्ये चालवावी लागतील जेणेकरून कामावरही परिणाम होणार नाही व गर्दीही होणार नाही. सार्वजनिक वाहतुकीच्या सांधनांपेक्षा वैयक्तिक दुचाकी, सायकल अशी साधने वापराला शक्य तेवढी चालना द्यावी लागणार आहे जेणेकरून सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधील गर्दी कमी होईल आणि शारिरीक अंतर वाढेल. मुख्य म्हणजे सर्व प्रकारच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिवहनावर बंधन घालावे लागेल.

कुठलेच उत्पादन, व्यवसाय, व्यापार बंद तर होणार नाही परंतु त्यामुळे कोरोना प्रसारही होणार नाही अशी रणनीती सरकारने आखावी लागणार आहे. सृजनशीलता व ज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन महत्वाचे ठरणार आहे. शक्य तेवढे मोबाईल, औनलाईन, संगणकीय व डीजीटल व्यवहार वाढवावे लागणार आहेत. खरेदी विक्रीमध्ये घरपोच डिलिव्हरी हा पर्याय महत्वपूर्ण असला पाहिजे. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा पाण्याअगोदरच वळण तयार करावे लागणार आहे. कुठल्याच प्रकारचे राजकीय, धार्मिक व इतर सामुहिक सभांना कटाक्षाने मज्जाव केला पाहीजे. आंदोलने, मोर्चे यांना परवानगी नाकारली पाहीजे.

आपले म्हणजे जनतेचे कोरोनामुळे जीवन थांबले नाही पाहिजे, ते थांबणारही नाही परंतु हा कोरोना काय आहे? हे आपण समजून घेऊन त्याचा मुकाबला करायला पाहीजे. त्यासाठी आपल्या जीवनपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता पडणार आहे. आपल्या वर्तनात आपल्याला बदल करावा लागणार आहे. दैनंदिन कामेच परंतु वेगळ्या पद्धतीने करावी लागणार आहेत. पावलोपावली सतर्कता बाळगावी लागणार आहे. काटकसरीने व साधेपणाने जगावे लागणार आहे. आपल्या सवयी, आवडीनिवडी रिती बदलायला लागणार आहेत.

आपण रोजचे रोज बाजारात जाण्यापेक्षा आठवडा, पंधरवडा, महीनाभर पुरेल एवढे साहीत्य एकदाच खरेदी करायला लागणार आहे. टाळेबंदी, विलगीकरण, शारिरीक अंतर पाळावे लागेल. पाहुणे, पर्यटन, सणोत्सव, धार्मिक प्रार्थना व कार्यक्रम, लग्नसमारंभ यांना मुरड घालावी लागणार आहे. समुह, गर्दी हे आपल्यासाठी घातक आहे हे समजून घ्यायला लागणार आहे. स्वच्छतेच्या सवयी, निर्जंतुकीकरण, सुरक्षितता, आहार, व्यायाम यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. संयम, सहकार्य, मानवता जपावी लागणार आहे. शेतात उन्हातान्हात घाम गाळणारे शेतकरी व जीवनावश्यक वस्तुंचे व्यापारी दोघांप्रतीही आपण कृतज्ञता बाळगली पाहीजे.

कोरोना विरूद्धचे हे युद्ध किमान दीडदोन वर्षे चालेल असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे उतावळेपणा कामाचा नाही. या युद्धात विजयी व्हायचे असेल तर नव्या, आधुनिक व वैज्ञानिक म्हणजे वैद्यकीय शस्त्रांचा वापर करावा लागणार आहे. कोरोनाचा पराभव ठोस चाणाक्ष युद्धनीती शिवाय होणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या प्राणापेक्षा आपल्या कुटुंबातील व्यक्तिंच्या, मित्रमंडळी, सहकारी, शेजारीपाजारी यांच्या प्राणांची काळजी घ्यावी लागणार आहे. उघड्यावर शौच करणे, थुंकणे, खोकणे, शिंकणे कटाक्षाने बंद करायचेच आहे. मास्कला आपल्या पोषाखाचा अविभाज्य भाग बनवायचे आहे आणि आपल्यामध्ये अथवा आपल्या कुटूंबियांमध्ये थोडी जरी लक्षणे आढळली (ताप व श्वसनत्रास) तर दवाखाना गाठायचा आहे.

शेवटी एवढेच...
बांधवांनो, आपण जास्त नाही, काही महिनेच आपल्या हक्काधिकारांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. छोट्या छोट्याच परंतु कोवीड 19 या संसर्गजन्य वैश्विक महामारी विरोधात मोठ्या ठरणाऱ्या बाबी समजून घेऊन, प्रभावी लस येईपर्यंत जर का आपण संयमाने एकजुटीने आपलेपणाने किल्ला लढवला, सरकारला आवश्यक ते सहकार्य केले व सामाजिक सौजन्य जपले तर निश्चितच आपण सर्वजण हे युद्ध जिंकु आणि हे युद्ध आपल्याला काहीही झाले तरी जिंकायचेच आहे.👍 विजयध्वज फडकवायचाच आहे.🇮🇳

#जयहिंद

(बाळासाहेब धुमाळ)