Friday 15 May 2020

अवडंबर.. बाळासाहेब धुमाळ

#अवडंबर

जरी अद्याप तरी वड, उंबर, पिंपळ या व्रुक्षांचे कुठलेही विशेष वैद्यकीय महत्त्व प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नसले तरीही काही विशिष्ट लोक यांना दैवी वगेरे म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतात.बरं, मांडतात ते मांडतात, ते वरून इतरांवरही दबाव आणतात, मानाच म्हणून!! विशेष म्हणजे या मांडणारांच्या दारात वा बांधावर हे व्रुक्ष नाहीत हं!!! 

आता जर यांचे असेलच वैद्यकीय महत्त्व तर दाखवा ना पेटंट एखादे. म्हणजे गरज पडली, जीव वाचवायचा असेल तेव्हा विज्ञान व आधुनिक वैद्यकशास्त्र व वेळ गेळी, जीव वाचला की मग जेव्हा मते मिळवायची वेळ येते तेव्हा धर्मशास्त्र व असिद्धध आयुर्वेदिक व योगशास्त्रीय मोठेपणांचा उपदेश!!! मानायलाही हरकत नाही परंतु सिद्धता महत्वाची नाही का? पुरानातले कपोलकल्पित ऐकीव दाखले देऊन चालत नाही. ते त्रिकालाबाधित व कधीही कुठेही सिद्धतेच्या अग्निदिव्यातुन पिर झाले पाहिजे.

या क्षेत्रातील लोकांनी, ज्यांनी हा असा उपदेश केलाय आजवर ते आपल्या ज्ञानाधिष्ठित तर्काप्रमाणे स्वतःला सिद्ध करू शकलेले नाहीत. ते फक्त भावनिक धमक्या देतात म्हणजे इमोशनली ब्लॅक मेल करत राहातात. विशेष म्हणजे याचा आधार ते धर्माला बनवतात. आहार, व्यायाम, वैद्यकशास्त्र हे जाती धर्म प्रांत भाषा देश निरपेक्ष असतेय.

वड, पिंपळ, उंबर हे व्रक्ष विशाल व कमी पावसाच्या प्रदेशातही जगु शकतील अशी आहेत कारण यांची मुळे खोलवर जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे विशाल व डेरेदार आकारामुळे हे सावली छान देशात. लाखो करोडो पक्षी व सुक्ष्मप्राण्यांना अन्न निवारा पुरवतात, त्यांचे संरक्षण करतात, माती धरुन ठेवतात, वादळांना अडवतात, पुनरूत्पादन साखळीत महत्वाची भुमिका पार पाडतात हे विशेष आहे. सोबतच निसर्गातील सर्वच वनस्पतींमध्ये असल्याप्रमाणे यांतही काही औषधी गुणधर्म देखील आहेत परंतु हे चोवीस तास औक्सिजन वगेरे देत नाहीत. कुठलीही हरित म्हणजे हिरवी वनस्पती केवळ दिवसाच औक्सिजन देते.

  परंतु सावली व प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्याची क्षमता हा या व्रुक्षांचा गुण #विशेष आहे. तसा तो अनेक डोंगराळ झुडपांमध्येही आहे. परंतु ते यांच्याएवढे विशाल व डेरेदार नाहीत. त्यांना यांच्याएवढे आयुर्मान नाही. मी अधार्मिक वा नास्तिक अजिबात नाही परंतु याबाबतीत जे विवेचन केले जातेय तेही धर्माधिष्ठित ते मला अजिबात पटत नाही.

वड, लिंब, उंबर यांचे शास्त्रीय, वैद्यकीय महत्त्व जे सिद्ध करू शकत नाहीत ते याला धर्माशी जोडतात. जगात काय हिंदू हाच एक धर्म आहे काय? की जगात केवळ भारतातच हे व्रुक्ष आहेत? यांचे शास्त्रीय व वैद्यकीय महत्त्व तुम्ही सिद्ध करू शकता काय?? जर खरोखरच फारच वैद्यकीय महत्त्व असेल यांचे तर सिद्ध करा ना मग, खुप चांगली संधी चालुन आलीये, कोरोनाच्या रूपाने...

असे काही प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अहंकारी वगैरे संबोधले जाते. काही तर अशांना धर्मद्रोही, नास्तिक ते अगदी राक्षसी संबोधतात!! मला वाटते, हा प्रश्न अहंकाराचा वा इतर फाफट पसा-याचा नाही. बुद्धीचाही नाही कारण प्रत्येकजण बौद्धिक असतोच असे नाही परंतु, प्रश्न अनुभवाधारित निष्कर्षाचा, अंधत्वाचा, मूर्खपणाचा व नको त्यांना श्रेय देण्याचा नक्कीच आहे...

आपापल्या जातीने, धर्माने केलेल्या शिकवणुकीप्रमाणे कोण वागत नाही? त्यांचा अभिमान कुणाला नाही? मी स्वतः जातीभिमानी व धर्माभिमानी आहे परंतु त्याने प्रश्न सुटत नाही ना! मग श्रेय कुणाला देणार? धर्माला,अध्यात्माला की ज्ञानाधारित विज्ञानाधारित वास्तवाला? हे जग बुद्धीवाद्यांनी इथपर्यंत आणलेले आहे. मग ते संशोधक असोत, वैद्यक असोत, अभियंते, विचारवंत वा मग समाजसेवी असोत. हे सर्वच लोक बुद्धीवादी व कष्टाळू होते. यांना या प्रुथ्वीवर जीवसृष्टी खासकरून मानवस्रुष्टी जीवंत ठेवायची होती. तेच त्यांचे ध्येय होते.  म्हणून मी याचे श्रेय त्या बुद्धीवाद्यांनाच देईल..

परंतु जात व धर्माचा वापर करून आपली सामाजिक आर्थिक व राजकीय पोळी भाजून घेणारांना हे कुठे कळतेय त्यांना यामागील वैयक्तिक व राजकीय संधी जास्त कळते, दिसुन येते आणि म्हणून याचा वापर ते आपापल्या पद्धतीने, आपापल्या सोयीसाठी करून घेतात! परंतु यांना विरोध केलाच पाहीजे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल वा मग जयद्रथही दाखव व सुर्यही दाखव असे ठणकावले पाहीजे. हा सिद्धांत आहे मग हा सिद्ध का करू नये त्यांनी? याचा विचार व्हायला नको??

वैचारिक द्रुष्टीने विचार केलात तर केवळ या तीन झाडांचेच नव्हे तर पर्यावरणातील संपुर्ण मानवेतर सजीव तसेच निर्जीव घटकांचे पर्यावरणीय व वैद्यकीय महत्त्व अकल्पनिय व अमाप आहे. परंतु ते महत्त्व समजून घेण्यापेक्षा आपण त्यांना धर्माशी, श्रद्धेशी व अध्यात्माशी जोडलेले आहे. पुर्वजांचा हेतु उदात्त होता कारण जगात जेव्हा कुठलाही धर्म अथवा देव अस्तीत्वात नव्हता तेव्हाही आदिमानव निसर्गाची जोपासना करत होते. ती यामुळे की त्यांच्या दैनंदिन जीवनात यांचे अनन्यसाधारण महत्त्व होते म्हणून. आजच्या मानवाने #जोपासना सोडून #उपासना करायला सुरूवात केली. गाईला माता म्हटलेय आणि टेंपोत कोंडून ठेवलेय, दैवी म्हणवणारी पुरातन व विशाल झाडे स्वतःला वाचवू शकले नाहीत! तिथे आपले काय? नद्यांचेही असेच झाले. गंगा मैय्येचे गटार झालेय!!  म्हणजे याला धार्मिक अध्यात्मिक जोड आपण का दिली होती हे आपण विसरलोय!! अहो ती त्यांच्या रक्षणासाठी दिली होती, त्यांची गरज ओळखून परंतु हे सिद्ध केले आपण की आपण अशा कुठल्याही देवीदेवतांना घाबरत नाही. कारण त्यांच्यातली दैवी शक्ती कुठेही दिसली नाही. दिसली असती तर लोकं सुतासारखे सरळ वागले असते..

आज बाजारात कुठेही वड उंबर पिंपळाचे तेल, काढा, चूर्ण नाही. यावर कुठेही कारखाने चालत नाहीत. कुणालाही यापासून उत्पन्न मिळत नाही. कुणाही शेतकऱ्याच्या बांधावर औषधनिर्मिती करणाऱ्या कंपण्यांचे अधिकारी या व्रुक्षांची मागणी कधीही करीत नाहीत! उत्पन्न फक्त लाकडापासून मिळतेय! म्हणून सपासप कु-हाडी चालवल्या गेल्या, विशेष म्हणजे तथाकथित विकासाच्या नावावर!! घरासमोरील, शेतातील झाड तोडले की पाप लागते! वेगवेगळ्या पुजा घालाव्या वागतात! आणि रस्त्यांच्या दुतर्फा जी लाखो करोडो झाडे होती त्यांना का कुठली दैवी अथवा कायदेशीर शिक्षा झाली नाही?? 

प्रत्येक धर्माच्या धारणा वेगवेगळ्या असतात. या झाडांमध्ये आपण इथे अध्यात्म पाहतो म्हणजे जगात सर्वत्र असेच असेल असे नाही. विशेष म्हणजे सजीव व निर्जीव घटकांना आपल्याकडे अध्यात्माशी जोडूनही आपल्याएवढा या घटकांचा -हास जगात कुठेही झाला नाही. है दुर्दैवी आहे की नाही मी त्यात जात नाही कारण पुन्हा विषय दैवापाशी येतो जे असतच नाही परंतु नक्की की या पाशवी पर्यावरण -हासाची किंमत मात्र संपूर्ण मानवजात व सजीवस्रुष्टी भोगत आहे, भोगणार आहे. कारण यामागे विज्ञान आहे. हा कुठलाही दैवी प्रकोप वगेरे नाही. विज्ञानाचे पर्यावरणाचे महत्त्वही आधुनिक प्रगत शास्त्राने सिद्ध केलेय. त्याच्या विनाशाचे परिणामही दाखवून दिले आहेत. 

म्हणून मला वाटतं पर्यावरण म्हणजे निसर्ग हाच खरा देव आहे परंतु याची #उपासना नव्हे तर #जोपासना करण्याची आवश्यकता आहे. बघा पटतंय का? शेवटी प्रत्येकाची आपली विचार करण्याची पद्धती असते व त्यानुसार तो अभिव्यक्ती करत असो. प्रत्येक अभिव्यक्तीचा मी आदरच करतो. मित्रांनो, उंबराच्या झाडाच्या भोवती जर वटा बांधला तर त्याचा #औदुंबर होतो! वर्षातुन एखादे दिवशी देव वा देवी माणुन मानवजातीचे प्रश्न सुटणार नाहीत. माझा #औदुंबराला नाही, #अवडंबराला विरोध आहे.👆

बाळासाहेब धुमाळ.
9421863725