Saturday 4 July 2020

तुकयाचा गोंधळ

*#तुकयाचा_गोंधळ*

*भारत एक वैविध्यपूर्ण ऐतिहासिक व आध्यात्मिक संस्कृती लाभलेला प्राचीन देश आहे. भारताला देवभूमी म्हटले जाते. त्यातही महाराष्ट्र अग्रस्थानी आहे कारण महाराष्ट्राला संतभूमी व शूरवीर भूमी म्हणूनही ओळखले जाते. भव्यदिव्य स्थापत्य अविष्कार, सण उत्सव, विधी व लोककलांनी आपले अध्यात्म व आपली भारतीय संस्कृती संपन्न आहे.*

*आपल्याकडे अनेक विधी प्रकार होतात जसे की बारसे, गृहप्रवेश, मुंज, विवाह, सत्यनारायण पूजा, डोहाळे, शांती, यज्ञ, अंत्यविधी, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध इत्यादी. तसेच अनेक व लोककला देखील आहेत जसे की, किर्तन, प्रवचन, व्याख्यान, रामलीला, लोकनाट्य, नाटक, कलगीतुरा, कवाली, गझल, पोवाडा, भीमगीते, भारुडे, डोंबाऱ्याचा खेळ, वासुदेवाची गाणी, बहुरूप्यांचे नाट्य, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, चित्र कथांचे प्रयोग इत्यादी.*

*सुरुवातीला सांगितलेले काही विधी व त्यानंतर सांगितलेले काही लोककला प्रकार दोन्हीही आध्यात्माशी निगडित आहेत हे विशेष! लोककलेद्वारे देखील धर्माचे, अध्यात्माचे व नैतिकतेचे धडे आजवरच्या लोककलावंतांनी दिलेले आहेत व आजही देत आहेत ही बाब या ठिकाणी लक्षणीय आहे.*

*आपण जर बारकाईने पाहिले तर हे सर्व व इतर अनेक विधी प्रत्येक ठिकाणी कोणीतरी पुरोहित करत असतो. पुरोहित हे एका ठराविक जातीचे किंवा धर्माचेच असतील असे नाही तर त्या त्या विधीचे ज्ञान ज्यांना आहे किंवा ज्यांचा तो पारंपारिक व्यवसाय आहे असे लोक या विधींचे पौरोहित्य करत असतात. दुस-या बाजूला ज्या लोककला आहेत त्या लोककला सादर करणारे देखील ठराविक एका जातीचेच आहेत. कारण अर्थार्जनाच्या दृष्टीने प्रत्येक जातीची परंपरागत आपली आपली ठरलेली एक लोककला असते. असे असले तरी काही लोककलांना जातीचे बंधन नसते उदाहरणार्थ किर्तन ! किर्तनासाठी जातीचे बंधन नाही. किर्तन कोणीही सादर करू शकते परंतु वासुदेवाची गाणी असोत किंवा बहुरुप्याचे नाट्यप्रयोग असोत किंवा गोंधळ विधी असो किंवा पोतराजाची गाणी असोत हे व असे इतर अनेक कलाप्रकार त्या त्या ठराविक जातीचे लोकच करतात. गोंधळ सोडता इतर कोणताही विधी घ्या किंवा मनोरंजनात्मक कलाप्रकार घ्या, कोणताच विधी किंवा कला प्रकार एक दोन ते तीन तासांपेक्षा अधिक चालत नाही परंतु गोंधळ मात्र जो केवळ महाराष्ट्राचाच  नव्हे तर संपूर्ण भारताचा कुलाचार विधी आहे तो मात्र रात्रभर चालतो!*

            *मला कळत नाही, काय आवश्यकता आहे रात्रभर गोंधळ विधी चालवण्याची ? गोंधळ हा एक विधी आहे व विधी तास दीड तास, दोन तास मनोभावे चालला पाहिजे. जेव्हा त्याला आपण खूप जास्त वेळ देऊ तेव्हा त्यातला विधी बाजूला जातो व तिथे मनोरंजन येते आणि मनोरंजन आले की त्यामध्ये मग आवडी निवडी नुसार फर्माईशी व सादरीकरण येते आणि त्यामुळे त्याचे पावित्र्य लोप पावते.*

*घरातील सर्व शुभकार्य प्रसंगी कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच अपेक्षापुर्तीसाठी देवीला आळवण्यासाठी गोंधळ घातला जातो. ही एक पूजा आहे, जी अत्यंत मनोभावे तज्ञ, शास्त्रज्ञानी गोंधळी पुरोहिताकडून घातली जाते. यात पूजन, वंदन, स्मरण, प्रार्थना, कृतज्ञता व मार्गदर्शन आणि प्रबोधन यांचा समावेश होतो. यात विधीला व अध्यात्मिक प्रबोधनाला प्राधान्य आहे. मनोरंजनला दुय्यम महत्त्व आहे. अध्यात्म व संस्कृती हा आधार असलेले सांगितीक मनोरंजन याचा समावेश गोंधळ कला या प्रकारात होतो. मार्गदर्शन व प्रबोधन हा केंद्रीभूत भाग असतोच परंतु हा विधी नसतो. हा रंगमंचावर स्टेजवर किंवा मेजवान्यांंमध्ये सादर केला जाऊ शकतो. मेजवानी म्हणजे बर्थडे पार्टी असेल किंवा कुणाचाही कुठल्याही प्रकारचा आनंददायी विशेष प्रसंग असेल त्याठिकाणी आपण ही कला ऐकू पाहू शकतो, सादर करू शकतो परंतु तो तेव्हा विधी नसतो हे लक्षात घेतले पाहिजे.*

*गोंधळात संस्कृतीचे म्हणजे इतिहास, अध्यात्म, धर्मशास्त्र, महात्म्य, धर्म ग्रंथातील ओव्या श्लोक, विशेष घटना व व्यक्ती यांच्या भोवती सांगितिक पद्धतीने गद्यपद्यात्मकतेने कथन, गायन, व अभिनय याद्वारे विषयातील आशायाचे निरुपन कथेद्वारे करायचे असते. मध्ये मध्ये दृष्टांतांचा किंवा दाखल्यांचा वापर केला जातो. निरुपन रंजक व्हावे यासाठी एखादे आशय संबंधित गीत सादर केले जाते. प्रेक्षकांना कंटाळवाने होवू नये, प्रेक्षक खिळून राहावेत यासाठी मधुन मधुन विनोदही सादर केले जातात.  किर्तन व गोंधळ यात प्रचंड साम्य आहे परंतु दुर्दैवाने आज गोंधळी पुरोहित व गोंधळी कलावंत तसेच लोक म्हणजे कार्यक्रम मालक, श्रोते व प्रेक्षक ही बाब विसरले आहेत. विधी, पूजन, श्रद्धा, अध्यात्म, प्रार्थना, कृतज्ञता बाजूलाच राहते आणि केवळ मनोरंजन एवढाच गोंधळाचा हेतू आहे असे समजले जाते व त्या पद्धतीने तो हेतू साध्य केला जातो. गोंधळामधून  होत आलेले वैचारिक, नैतिक, भावनिक, कौटुंबिक, नातेविषयक उद्बोधन आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक, ऐहिक मार्गदर्शन व प्रबोधन आजच्या गोंधळ विधी व कलेतून होताना दिसत नाही. ही जेवढी दुःखद बाब आहे तेवढीच चिंतेची बाब देखील आहे. आजवर गोंधळाने व गोंधळी कलावंतांनी जगाला जीवनाचे तत्वज्ञान शिकविले आहे याचा विसर पडता कामा नये.*

*आजच्या चंगळवादी व प्रायोगिक जगामध्ये स्वार्थ, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर व अहंकार प्रचंड फोफावला आहे. अपयश, खच्चीकरण, स्वप्नविलास, विभक्त कुटुंब पद्धती, जोडप्यांचे वाढलेले उत्पन्न, त्यांना आपापल्या कार्यालयांमध्ये मिळणारा मानपान, असलेले पद आणि प्रतिष्ठा, वाढलेली धावपळ, व्यसनाधीनता आणि पर्यावरणीय समस्यांमुळे माणसाचे मानसिक व वैचारिक आरोग्य ढासळत चालले आहे. शारीरिक आरोग्य तर ढासळतच आहे परंतु वैचारिक अधःपतनही होत चालले आहे. काल्पनिक जीवन जगण्याची सवय माणसाला जडत आहे. अशात केवळ धार्मिक व आध्यात्मिक वैचारिक प्रबोधनच आपल्याला तारू शकते. मनःशांतीसाठी सत्संग, कीर्तन, गोंधळ, प्रवचन असे बुद्धीला व मनाला सशक्त करणारे धार्मिक व अध्यात्मिक वैचारिक डोस मिळणे काळाची गरज आहे.*

*एक गोंधळी म्हणून माझी, माझ्या सर्व गोंधळी कलावंतांना अगदी नम्र विनंती आहे की, गोंधळ विधी व गोंधळ लोककला यांचे पावित्र्य, प्रतिष्ठा व महत्त्व जपा. गोंधळ हे एक सांगितिक विधीनाट्य आहे. ही आपली अस्मिता आहे. सर्व शक्ती उपासकांचे हे श्रद्धा स्थळ आहे. शक्तीची उपासना करत आलेले आजवरचे सर्व भक्तजन गोंधळ अत्यंत मनोभावे व श्रद्धेने घालत आलेले आहेत. शक्तीची पूजा संपूर्ण देशभर केली जाते नव्हे जगभर केली जाते. आदिमाया शक्तीची उपासना जर ब्रह्म, विष्णू, महेश, भगवान परशुराम, नारदमुनी ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज देखिल गोंधळ घालून करीत होते तर मग आज या उपासनेचे, या विधीचे रूपांतर केवळ मनोरंजनात का झाले आहे ? याचा आपण शोध घेतला पाहिजे.  हे मनोरंजन कधीकधी येवढे ओंगाळवाणे व अश्लाघ्य असते की, ते पहावत ऐकतही नाही.*

*"देवी पूजन, प्रार्थना, आराधना व कृतज्ञता या नंतर दर्जेदार विषय, आशय, वेशभूषा, संवाद असणारे गांभीर्यपुर्वक शुचिर्भूततेसह नियोजनबद्ध केलेले सांगितिक सादरीकरण म्हणजे गोंधळ" ही बाब आपण व कार्यक्रम मालकांनी तसेच प्रेक्षकांनी समजून घेणे आवश्यक आहे. हे कार्यक्रम मालकांना समजत नसेल तर आपण त्यांना ते समजून सांगितले पाहिजे. गोंधळातुन आजवर दोन ते तीन तासांचा शास्त्रशुद्ध विधी, ज्यामध्ये देवी पूजनानंतर एखादे देवी महात्म्य, पुराण धर्मग्रंथ,धर्मकाव्य यामधील ओव्या, ओळी, श्लोक किंवा एखादी ऐतिहासिक किंवा दैवी घटना वा व्यक्ती अथवा देवावतार याविषयी निरूपणाधारे किर्तना प्रमाणे सादरीकरण करून आपण संस्कृती, धर्म, देश, मानवता यांचे रक्षण व सदविचारांचे प्रसारण करीत आलेलो आहोत. हीच आपली परंपरा व ओळख आहे. म्हणून गोंधळ ही आपली अस्मिता आहे व आपल्या अस्मितेचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आपण स्वत:ला भाग्यवान समजले पाहिजे की, एवढा संपन्न दैवी तथा प्रतिष्ठीत वारसा आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी ठेवला आहे. परंतु वारशाच्या बाबतीत सर्वकालिन सत्य असेही आहे की, आपण देखील वारशाचे वारसच असतो, मालक नसतो. आपणही हा वारसा पुढे, पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करायचा असतो. शक्य असेल तर त्यात भर घालून तो समृध्द करायचा असतो. परंतु दुर्दैवाने आपल्याकडुन चुक होत आहे व वैयक्तीक स्वार्थापायी आणि आजच्या पुरता विचार करुन आपण एक महान धार्मिक लोककला परंपरा भरकटवत आहोत.*

            *भरकटवत आहोत म्हणजे गोंधळामधून विधी, श्रद्धा, मार्गदर्शन व प्रबोधन संपवत चाललो आहोत. हे एक कटू सत्य आहे, जे लिहिण्याची माझी अजिबात इच्छा नाही परंतु नाही लिहिले म्हणून वास्तव बदलत नाही. कदाचित लिहिल्यामुळे तरी बदलेल असा आशावाद मी बाळगून आहे. अर्थात काही ठिकाणी अपवाद पाहायलाही भेटतो म्हणा. आजही अनेक ठिकाणी खरा गोंधळ पहायला ऐकायला मिळतो. खास करून ग्रामीण भागांमध्ये, बालाघाटच्या डोंगरी भागामध्ये अनेक श्रोते प्रेक्षक आहेत जे अजुनही जुन्या पद्धतीच्या गोंधळाचीच मागणी करतात. कथेची मागणी करतात आणि त्या भागात अनेक आपले गोंधळी कलावंतही आहेत ज्यांचेकडे खुप छान जुने ज्ञान आहे. त्यांचे सादरीकरण खूप दर्जेदार आहे. परंतु व्यापक अर्थाने आजच्या गोंधळाकडे पाहिला गेले तर अलीकडे कार्यक्रमाचे मालक, त्यांचे गणगोत्र, मित्र परीवार, सगे सोयरे, जे गोंधळाचे श्रोते व प्रेक्षक असतात, त्यांच्या अपेक्षा बदलत आहेत. त्यांना काहीतरी मसालेदार, आंबट आणि उडत्या चालीवरील मनोरंजन हवे असते, जे शास्त्रात बसत नाही आणि याचीच जाणीव आपण म्हणजे गोंधळी बांधवांनी त्यांना करून द्यायची आहे.*

        *बदल ही काळाची ओळख आहे, तो काळाचा स्वभाव आहे, त्यामुळे आपणही बदलावे लागेल यात शंका नाही परंतु बदल हा सकारात्मक असला पाहिजे. बदल हा चौकटीमध्ये बसूनच केला गेला पाहिजे. चौकटीच्या बाहेर जाऊन, पथभ्रष्ट होऊन म्हणजे रस्ता सोडून केलेला बदल हा #बिघाड समजला जातो. बदल हा तंत्रज्ञानाचा वापर, सादरीकरणातील प्रयोग, संच रचना, नैपत्य वेशभूषा, संगित संयोजन यामध्ये करायला निश्चित हरकत नाही. नव्हे नव्हे तो करावाच परंतु त्यामुळे मूळ ढाच्यात बदल होणार नाही याची काळजी घ्यावी. उदाहरणादाखल पाहिचे ठरले तर किर्तनामध्ये अनेक बदल झाले, सादरीकरणात झाले, किर्तनाचे व्यावसायिकीकरण झाले परंतु म्हणून किर्तन किंवा ब्राह्मण्य किंवा लोकनाट्य यांच्या मूळ ढाचामध्ये बदल झालेला नाही. यांची मूळ चौकट अजूनतरी शाबूत आहे. त्यामुळे गोंधळ देखील प्राचीन गोंधळाप्रमाणेच, पूजन, आराधना, प्रार्थना, याचना, कथाभाग निरूपण, सांगितिक दृष्टांत व मनोरंजन या चौकटीतच असावा, या वाटेवरच चालावा असे मला वाटते. तुम्हाला ऐकून वाचून नवल वाटेल, मी असेही काही गोंधळ पाहीले आहेत की ज्यात संबळच नव्हता!! नुसताच धांगडधिंगा!!!*

*बदलाच्या अनुषंगाने अजून एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कुठलाच विधी रात्रभर चालत नाही म्हणून रात्रभर गोंधळ सादरीकरण करण्याची प्रथा मोडीत काढणे आवश्यक आहे. कारण यामुळे झोप होत नाही परिणामी कलावंत, कार्यक्रमाचे मालक, प्रेक्षक यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. आपल्या कुटुंबावर, आपल्या शरीरचर्येवर व दिनचर्येवर त्याचा विपरीत परिणाम होतो. वैयक्तीक जीवनामध्ये विस्कळीतपणा येतो. कुटुंबाची घडी विस्कटून जाते. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर व बायका बहिणींच्या वैयक्तिक जीवनावर अनिष्ट परिणाम होतो. कार्यक्रम मालकांसाठी व श्रोत्यांसाठी जागरणाचा हा अनुभव कधीतरी येतो परंतु कलावंताच्या बाबतीमध्ये जर झोपच नसेल तर? याचा परिणाम त्यांच्या शरीर मन बुध्दी यावर होतो. परिणामी व्यसन, अवेळी जेवण व अवेळी झोप आणि कौटुंबिक ताणतणाव यांसारखी संकटे वाटयाला येतात. त्यामुळे रात्री अकराच्या आत विधी संपवणे व झोपेसाठी कुटूंबात येणे आवश्यक आहे.*

*मनोरंजनासाठी लोकांकडे अनेक पर्याय आहेत. त्या पर्यायांचा त्यांना खुशाल वापर करू द्या, जसा करायचा आहे तसा करू द्या परंतु चार पैशांसाठी आपण आपली वैभवशाली संस्कृती जी आपल्या लाखो-करोडो पूर्वजांनी हजारो वर्षांपासून इमाने इतबारे मनोभावे जपली आहे व आपल्या स्वाधिन केली आहे. ज्यांनी आपले कलाविश्व संपन्न करून ठेवले आहे. आपल्याला आपले अढळ सामाजिक स्थान तयार करून ठेवले आहे, त्यांच्या पुण्यात्म्यांना दुःख पोहोचेल असे वर्तन आपल्याकडून घडायला नको. या कामी तरुणांनी पुढाकार घेऊन कथाभाग सादरीकरण आत्मसात केले तर खूप फायद्याचे होईल. जुनी मंडळी ज्यांना कथा भागाचे ज्ञान आहे, त्यांना हा चालू असलेला धांगडधिंगा पटत नाही परंतु लोकांना ते सवयीमुळे नकार देऊ शकत नाहीत कारण प्रश्न पोटाचा असतो. त्यामुळे जर तरुणांनी पुढाकार घेतला व ठोस भूमिका घेतली तर एक नवा पायंडा पडू शकतो. स्वर, रचना, नव निर्मिती, आधुनिक वाद्ये व नेपथ्य वेशभूषा यातील बदलांसह दमदार अभिनय व प्रभावी सादरीकरण यांच्या जोरावर सुरेल व विविध रसपूर्ण गोंधळ विधिनाट्य लोकांनादेखील बदलायला भाग पाडू शकते आणि आजची युवा गोंधळी पिढी हे करू शकते याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.*

*यामध्ये हवे तर दोन भाग पाडले जाऊ शकतात. किर्तनाचा व गोंधळाचा सारखाच बाज असतो. गोंधळाचा बाज किर्तना प्रमाणे ठेवा. देवी पूजन व्हावे व पुजनानंतर दोन तीन तासाचे निरूपण कथाभागद्वारे व्हायला हवे. किर्तनामध्ये जसे अभंग असतात तसे गोंधळामध्येही गोंधळ गीते असावेत परंतु विषयाला आशयाला धरून द्रुष्टांतपर. हा झाला गोंधळ विधी आणि गोंधळगीतांचा कार्यक्रम म्हणाल तर त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम तयार करा. त्याची रचना व त्याचे स्वरूप स्वतंत्र ठेवा. त्यात पुजा विधी करू नका. बोलीच अशी करा की गोंधळ विधी घालायचाय का गोंधळगीतांचा देवीगीतांचा कार्यक्रम घ्यायचाय?*

*वारकरी संप्रदायातील किर्तनात अभंग असतातच परंतु केवळ अभंगच नसतात! त्यासाठी भजनाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करतात. तसेच गोंधळामध्ये देखील दृष्टांता पुरते काही देवी गीते घेऊन संबंधित कथाभाग किंवा संबंधित विषयाचे निरूपण दोन ते तीन तासांमध्ये संपून त्यामध्ये प्रबोधन, अध्यात्म नैतिक शिक्षण अशी सगळी गुंफण करून दोन तासाचा किंवा जास्तीत जास्त तीन तासांचा गोंधळ विधी असावा असे मला वाटते. साधारणपणे रात्री बाराच्या अगोदर सर्व कार्यक्रम संपवून कलावंत आपापल्या घरी जाऊ शकतील किंवा किमान त्याच घरी आराम करू शकतील अशी व्यवस्था असायलाच हवी. संपूर्ण रात्रभर कलावंतांनी जागून दुसऱ्या दिवशी घरी जाऊन झोपणे यामुळे त्यांच्या शरीरावर मनावर आणि वर सांगितल्याप्रमाणे कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.*

*गोंधळ कला आणि गोंधळ गीते ही महाराष्ट्राची लावणी नंतरची दोन नंबरची आवड आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण साधरणपणे सर्वेक्षण केले तर लावणी ही महाराष्ट्राची जीव की प्राण आहे परंतु दोन नंबरला गोंधळ गीते मराठी माणसांना खूप आवडतात. त्यामुळे गोंधळ गीतांचा एक स्वतंत्र कार्यक्रम चाहते ठेऊ शकतात. गोंधळी कलावंत तो स्वीकारू शकतात परंतु एका गोंधळ विधीमध्ये आपण जर सर्वच देऊ लागलो तर त्यांची संपूर्ण रात्र तर जाईलच वरून विधी आणि मनोरंजन यात फरक उरणार नाही. जेणेकरून कार्यक्रम मालकांना विधीची किंमत कळेल, त्याचे महत्त्व कळेल व कलेचेही महत्त्व कळेल यासाठी असा बदल केला जावा.*

*अन्यथा मग विधी, पौरोहित्य, श्रद्धा, आराधना, उपासना बाजुलाच जाईल आणि कला व मनोरंजन मध्ये येईल आणि मनोरंजन म्हटले की सर्वच आले आणि नेमके तेच होत आहे आता. त्यामुळे गोंधळगीत संध्या, किंवा गोंधळगीत रजनी किंवा गोंधळगीत मैफिल किंवा गोंधळगीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट ही संकल्पना पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. ती देखील दर्जेदार, ती सादर करत असताना कुठल्याही प्रकारच्या हिनतेच्या पातळीवर ती जाणार नाही, अपमानास्पद किंवा टिकात्मक प्रतिक्रिया येणार नाहीत याची काळजी आपण गोंधळी कलावंतांनी घेणे गरजेचे आहे. यासाठी गीतांची निवड, हावभाव, नृत्य, भाषा, अंगविक्षेप, महिला कलाकारांचा मर्यादित आणि परिणामकारक वापर लक्षपूर्वक करणं गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याकडे कोणी तुच्छतेने पाहणार नाही. तुम्ही म्हणाल लोक फर्माईश करतात... करू द्या, तुम्ही पुर्ण करू नका, तुम्ही पूर्ण करता म्हणून फर्माईश केली जाते. काही लोक तर अगदी छोट्याशा बक्षिसापाई नको ते सादर करतात! अगदी शांताबाई, शालु, शिला, झिंगाट, आमदार, वाड्यावर, बाबुराव.....*

*गोंधळामधील महिलांचा चुकीचा वापर, गैरलागू नृत्य, दिवट्यावरील अश्लील विनोद हे थांबले पाहिजेत. अशांवर सामाजिक व संघटनात्मक दबाव आणण्याची आवश्यकता आहे. कारण गोंधळ विधीला व गोंधळी कलेला जे महत्त्व व प्रतिष्ठा यात आपले काही योगदान नाही. आज आपल्या पदरी असलेले गोंधळ विधीचे पौरोहित्य व गोंधळी कला ही आपल्याला देणगी स्वरूपात मिळालेली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला ती देवी उपासनेसाठी व उपजीविकेसाठी दिलेली आहे. आपण तिचे केवळ वाहक आहोत, मालक नाहीत. आपण तिच्यामध्ये भर टाकली पाहिजे. ना की ती ओरबाडून नष्ट केली पाहिजे. तिचे महत्त्व व तिची प्रतिष्ठा संपणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. धर्माश्रय, राजाश्रय व सोबतच लोकाश्रय लाभलेली आपली ही विरासत आपल्या स्वतःच्या चुकांमुळे नष्ट होणार नाही याची आपण मनोमन चिंता केली पाहिजे. अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही*

*पारंपरिक जागरण जे खंडोबाचे असते, त्यामध्ये वाघ्या मुरळी असतात. तिथेही मुरळी अत्यंत शालीन सभ्य सोज्वळ  असायची. ती श्रद्धेने मनोभावे खंडोबाची भक्त्ती करायची. भाविक भक्तांचे मनोरंजन करायची. आजवरचा असाच इतिहास आहे. परंतु आता त्यामध्येही बदल होतोय हे कटू सत्य नाकारता येणार नाही. गोंधळामध्ये तरी माझ्या माहितीप्रमाणे आजवर महिला कलाकारांना स्थान नव्हते परंतु म्हणून आता त्यांना स्थान असू नये या मताचा मी नाही. गोंधळामध्ये महिलांना स्थान असायलाच हवे. नव्हे नव्हे ते अधिकाधिक महत्त्वपूर्ण कसे असेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. महिला सरदार कशा तयार होतील, महिला संबळवादक कशा तयार होतील यासाठी ज्येष्ठ कलावंतांनी आणि संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेव्हा कुठल्याच क्षेत्रांमध्ये महिला मागे नाहीत तेव्हा गोंधळ विधी व गोंधळ कला या सारख्या लोकप्रिय व प्राचीन विधी तथा कलेपासून आपल्या पन्ननास टक्के लोकसंख्येने अलिप्त राहावे ही बाब माझ्या विचारांना पटत नाही. जर किर्तन महिला करू शकते, सांगू शकते, व्याख्यान प्रवचन देऊ शकते, एव्हाना जर फाइटर प्लेन चालू शकते तर गोंधळ का घालू शकत नाही किंवा गोंधळ कला का सादर करू शकत नाही? आपण आपल्या बुद्धीच्या कक्षा विस्तारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. इतिहास निर्णयांची, पावलांची, घटनांची आणि त्यांच्या परिणामांची नोंद घेत असतो. मग ती पाऊले उलट असो किंवा सुलट असोत!*

*पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन दिशा असतात आपण कोणत्या दिशेने चालायचे हा आपला विषय आहे. परंतु माझे वैयक्तिक मत आहे की, आपण पुढच्या दिशेने चालले पाहिजे. ज्या अनिष्ट, चुकीच्या, संकुचित व कालबाह्य बाबी आहेत त्या काढून टाकुन, चांगल्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी ज्यांना आज चांगले म्हटले जातेय, जे नावारूपास आले आहेत, मग ते समाजवर्ग असोत किंवा व्यक्तिविशेष असोत, त्यांच्यापासून आपण काहीतरी शिकून 
स्वतः मध्ये बदल करून, आपण देखील पुढे चालत राहिले पाहिजे. हाच निसर्गाचा नियम आहे. हेच प्रगतीचं सूत्र आहे.*

*गोंधळ व गोंधळी या शब्दाला आज जरी उपहासाने उच्चारले जात असले तरी दुःखी होण्याची गरज नाही कारण सत्याला सत्वाची परीक्षा द्यावीच लागते. किर्तन देखील यातून सुटलेले नाही परंतु आता हे आपल्या हातात आहे की गोंधळाचे हरवलेले वैभव आपण कशा पद्धतीने परत मिळवायचे. गोंधळात प्राणी बळी दिले जाणार नाहीत, मद्यप्राशन केले जाणार नाही, धुडगुस घातला जाणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. तशी स्पष्ट बोली किंवा तशी रोखठोक बोलणी किंवा तसा लेखी करारच आपण कार्यक्रम घेण्यापूर्वी करायला. आवश्यक पूजेचे साहित्य जसे आपण कार्यक्रम मालकांना अगोदरच लिहून देतो तशाच आपल्या अटीशर्ती देखील त्यांना लिहून द्या. दोघांच्या स्वाक्षरीने दोन प्रति परस्परांकडे ठेवा. त्यात स्पष्ट लिहा की अशा पद्धतीने जर तिथे कुठलाही प्रकारचे चुकीचे वर्तन झाले, चुकीची फर्माईश झाली, किंवा धुडगूस वगैरे घालण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कार्यक्रम अर्ध्यावर सोडून येऊ. आम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर आम्ही पोलिसात जाऊ असे ठणकावून सांगा. या कामी संघटनांनी कलावंतांना आणि कलावंतांनी परस्परांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शक्यतो मानधनाची पंचाहत्तर टक्के रक्कम कार्यक्रमापुर्वीच घ्या.*

*गोंधळ सादर करत असताना प्रभावी भाषेत प्रबोधन करा व गोंधळ ही विधी पूजा आहे हे त्यांच्या गळी उतरवा. त्यांना समजून सांगा. अगोदर तर आपण समजून घ्या व नंतर त्यांना समजून सांगा. एकदा का त्यांना समजले म्हणजे, एकदा का समाजाला अर्थात लोकांना समजले की गोंधळ हा मनोरंजनाचा प्रकार नसून हा एक पवित्र विधी आहे, हे एक विधिनाट्य आहे, यामध्ये थोडेफार मनोरंजन असते परंतु इथे धुडगूस घालता येत नाही की मग ते नको ती फर्माइश करणार नाहीत व आपल्याला होणारा त्रासही कमी होईल व त्या विधीचे पावित्र्य देखील राखले जाईल. गोंधळाला गतवैभव व प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर उच्च कला व ज्ञान आत्मसात करावे लागेल. पोट भरण्यासाठी उठसूट तेच ते पाच दहा धांगडधिंगा गाणे वेढ्यावाकड्या आवाजात म्हणायचे आणि आडवातिडवा संबळ बदडायचा याला गोंधळ म्हणत नाहीत. मुळात तर लोकांना या अशा अज्ञानी व अकुशल कलावंतांनीच चुकीची सवय लावलेली आहे. जुणे काही येत नाही म्हणून कसले तरी भलतेच अंगविक्षेप केले आणि दुर्दैवाने लोकांनाही ते आवडले आणि आता लोक तेच मागतात. पोरी किती आहेत? कशा आहेत? असे थेट विचारतात! याला जबाबदार कोण?*

*बंधु-भगिनींनो म्हण असली तरी, 'घडी लोटली की पिढी लोटत नाही'. पिढी लोटण्यासाठी कठोर परिश्रमच घ्यावे लागते. एक काळ होता जेव्हा गोंधळ केवळ गोंधळीच घालायचे! कारण त्यासाठी तपश्चर्या करावी लागायची, शिकावे लागायचे, ज्ञान, गुणवत्ता, सामर्थ्य, कलेचा दर्जा व पौरोहित्याची माहीती असायला लागायची. गुरू शिष्य परंपरा होती तेव्हा! आता? आता यातले काहीच लागत नाही म्हणून गोंधळाला, गोंधळ्याची गरज लागत नाही. उठसुठ कुणीही गोंधळ घालतेय! का असे झाले? कारण विधीची जागा मनोरंजनाने घेतली. जुण्याची शुद्धतेची व शास्वततेची जागा आंबट, मसालेदार धिंगाण्याने घेतली म्हणून!! आणि यासाठी जातीवंत गोंधळीच असावा असे काही नाही!म्हणून असे झाले.*

*आपले गुरूतुल्य अस्तित्व जिवंत ठेवायचे असेल, संस्कृती जतन करायची असेल तर "गोंधळ हा विधीच राहिला पाहिजे" तो शुद्ध, सात्विक, पवित्र व शास्त्रोक्ततच राहिला पाहिजे. अन्यथा तमाशा, जलसा, ऑर्केस्ट्रा अशा मनोरंजक कार्यक्रमांची कमी नाही, त्याच रांगेत गोंधळ विधी जाऊन बसेल. हायवेवर प्रवास करताना मी दोन तीन ठिकाणी "हॉटेल गोंधळ पार्टी" असे धाब्यांवर बोर्ड वाचले आहेत. ते पाहून मला खूप वाईट वाटले. आतमध्ये काय असते हे मी पाहिले नाही पण एक कल्पना केली. कदाचित तिथे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जसे म्युझिकल बँड किंवा ऑर्केस्ट्रा असतात, ग्राहकांच्या मनोरंजनासाठी तसे तिथे कदाचित गोंधळ गीते, वाघ्या मुरळीचे गीते सादर होत असतील आणि त्या हॉटेलचे ग्राहक त्याचा आनंद घेत असतील अशी एक साधारणपणे ती संकल्पना असावी असा माझा अंदाज आहे. मी आत जाऊन काय ते पाहिलेले नाही परंतु तो फलकच म्हणजे हॉटेल गोंधळ पार्टी फलकच मला खूप खटकला.*

आपण सर्व गोंधळी स्वाभिमानी हिंदू तर आहोतच परंतु संस्कृतीचे वाहक आहोत. धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा यांचा आपण प्रसार व प्रचार केलेला आहे व करतही आहोत परंतु आता थोडी वाट चुकत चाललो आहोत. मला खात्री आहे, आपण देवीची उपासना मनोभावे केली, करून घेतली, तर देवी प्रसन्न होईल की नाही मला माहीत नाही परंतु आपले व समाजाचे म्हणजे लोकांचे मन प्रसन्न होईल आणि प्रसन्न 
आत्मविश्वास संपन्न मन सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करू शकते व वाटेल ते स्वप्न पाहून ते स्वप्न पूर्ण करू शकते. यासाठी आपण आपल्या गोंधळ नामक संगीत विधी नाट्यात एक उपासक म्हणून जी उपासना करू, जी स्तुतीगीते, पुरानातील संदर्भ, दैवी अवतार कथा, शौर्य कथा, धर्मग्रंथातील ओव्या श्लोक, हिंदवी स्वराज्य इतिहास, आख्याने यांचे निरूपण दर्जेदार निवेदन, बतावणी, संगीत, दृष्टांत व दाखले यांच्या आधारे केले तर नक्कीच गोंधळाची हरवलेली प्रतिष्ठा परत येईल व गोंधळी हा वंदनीय पुरोहित म्हणून समोर येईल यात तिळमात्र शंका नाही.*

*यासाठी आपणही स्वतःसाठी एक आदर्श संहिता निर्माण केली पाहिजे व तिचे पालन केले पाहिजे. आपल्यासाठी आराध्य व वंदनीय असलेली कवड्याची माळ, संबळ, तुणतुने, दिवटी यांचे पावित्र्य जपले पाहिजे. मनोहारी व प्रसन्न पूजेची आरास असलेला पट आपल्याला भरता आला पाहिजे. रांगोळी, फळे पुष्पे, हळदी कुंकाची रास, कलश पूजा यांची सुरेख व आकर्षक पद्धतीने मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. मंचावरील आपली भाषा, प्रसन्न व आत्मविश्वासपुर्ण मुद्रा, संवाद, हावभाव, हालचाल, संगीत संयोजन, नैपथ्य समर्पक आणि निसंदिग्ध व शुद्ध असावे. कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला अजिबात थारा असू नये. बिडी सिगारेट ओढून, खाऊन-पिऊन, धूम्रपान करून कोणत्याही प्रकारची आराधना उपासना किंवा प्रबोधन होऊ शकत नाही. आपण आपले शिक्षण, शास्त्रीय ज्ञान व व्यावसायिक सामर्थ्य वाढवले पाहिजे.  सराव वाढवला पाहिजे. अज्ञानी किंवा अर्धज्ञानी प्रबोधकाचे प्रबोधन कुणीही ऐकुन घेत नाही. शुद्ध चारित्र्य व कौटूंबिक व सामाजिक आदर्श घालून द्यावे लागतील. अंगीकारावे लागतील. लोकांसांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असे चालत नाही. उक्ती आणि कृतीमध्ये समानता असायला हवी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात ते यामुळेच.*

*सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एकजूट असले पाहिजे. आपणच आपला आदर केला पाहिजे. परस्परांच्या कलेचा,  सादरीकरणाचा, ज्ञानाचा व नवनिर्मितीसह नवप्रयोगांचा आदर केला पाहिजे. त्याचे कौतुक केले पाहिजे. आपण जर आपल्यांना बाब्या म्हटले तर इतरही बाब्याच म्हणतील त्यामुळे आपण बाबु म्हटले पाहिजे तेव्हा इतर लोकही बाबूच म्हणतील. व्यावसायिक स्पर्धा समजून घेतली जाऊ शकते नव्हे ती असायलाच हवी कारण अशा सकारात्मक स्पर्धांमुळे कला समृद्ध होते. कलेची उंची वाढते परंतु म्हणून परस्परांविषयी मनामध्ये आकस किंवा अंतर नसले पाहिजे. जशी विद्या विनयाने शोभते तशी कलाही निरहंकाराने शोभते. अहंकार कलेचा व कलाकाराचा नाश करतो. चकाकते ते सर्व सोने नसते तर जुने तेच सोने असते हे ध्यानात घेऊन तात्पुरत्या फायद्यासाठी कायमचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊ.*

*गोंधळी ही एक प्राचीन जमात आहे. गोंधळ देवावतारातील विधी आहे. गोंधळी जातीत जन्म घेऊन, गोंधळ विधी करण्याची आणि गोंधळ कला सादर करण्याची दैवी संधी आपल्याला लाभली यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. गोंधळाचे महात्मे, गोंधळाची शुद्धता, गोंधळाचे पावित्र्य जतन करून ठेवले पाहिजे व गोंधळाचे एखाद्या धुडगूसात धिंगाण्यात रूपांतर होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण सर्व गोंधळी समाज बांधवांनी व कलाकारांनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या खालील ओळींचा कधीही विसर पडणार नाही याची काळजी घेऊया आणि तुकोबांना अपेक्षित असलेला तुकयाचा गोंधळ घालुया......*

*_आम्ही गोंधळी गोंधळी। गोविंद गोपाळांच्या मेळी।।_*
*_आमुचा घालावा गोंधळ। वाजवूंं हरिनामी संबळ।।_*
*_दहा पांंचा घाला जेवूं। आम्ही गोंधळाला येऊंं।।_*
*_काम क्रोध बकरे मारा। पुजा रखुमादेवीवरा।।_*
*_जेथेंं विठोबाचे देऊळ। तेथे #तुकयाचा_गोंधळ ।।_*


(बाळासाहेब धुमाळ)

दि. 04.07.2020