Friday 18 September 2020

कोरोना आणि बंदिस्त लोककलावंत

 कोरोना आणि बंदिस्त लोककलावंत

(लेखनः बाळासाहेब धुमाळ)



कोरोना नावाच्या विषाणूमुळे आलेली कोवीड 19 जागतिक महामारी लोकांना जशी आजाराने मारत आहे तशीच ती उपासमारीने व वैफल्यग्रस्ततेनेही मारत आहे. आजाराने मरणारांची संख्या समोर येतेय परंतु उपासमारीने, दारिद्र्याने मरणारांची व वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणारांची किंवा व्यसनाधीन होणारांची संख्या समोर येत नाहीये. आजची विचित्र व सुन्न करणारी परिस्थिती आपण यापूर्वी कधीही पाहिलेली, अनुभवलेली नाही किंबहुना कल्पिलेलीही नाही. या कोरोनामुळे लावाव्या लागलेल्या टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊन मुळे व त्यामुळे उध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वांच्याच जीवनाची राखरांगोळी झाली आहे. परंतु असे असले तरी काही वर्गांवर या कोरोनाचा आधिकच भीषण असा परिणाम झालेला दिसतो. खासकरून  लोक कलावंत, ज्यांचे हातावरचे पोट आहे. ज्यांच्याकडे कुठलीच स्थावर मालमत्ता नाही. शेती पोती किंवा उद्योग व्यवसाय नाही. आधुनिक शिक्षण, कौशल्य किंवा तंत्र नाही अशा लोकांच्या वाट्याला तर प्रचंड दैन्य व नैराश्य आले आहे. टाळेबंदीने आर्थिक आणिबाणी तर कोरोनाने आधुनिक अस्पृश्यता जन्माला घातली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. माणुस माणसाजवळ जात नाहीये. माणसाला जवळ येऊ देत नाहीये. प्रत्येकजण कोरोनाने भयभीत आहे. अशात लोककलावंतांचे  घरोघरी जाऊन, दुकानांसमोर उभे राहुन, रस्त्यांवर फिरुन किंवा धार्मिक, कौटुंबिक, सांस्कृतीक कार्यक्रमांमधून, सणौत्सवांमधून त्यांचे दोन पैसे कमावणे बंद झाले आहे. परिणामी या लोकांवर अक्षरशः रडण्याची वेळ आलेली आहे.


भारत ही साधुसंतांची महापुरुषांची भूमी आहे, देवभूमी आहे. केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची लोककला व लोकपरंपरा टिकवून ठेवणाऱ्या लोककलावंतांना आज साधे उदरनिर्वाह करणे देखील हालाखीचे झाले आहे. अत्युच्च कलाक्षमता असूनही हे लोक आज अत्यंत हीन दर्जाचे काम करण्यास लाचार झाले आहेत. एरवी संस्कृतिरक्षक म्हणून गौरवले जाणे, आपल्या मोठेपणासाठी व्यासपीठांवर सादरीकरणास यांना आमंत्रित करणे, टाळ्या वाजवणे, त्यांचा निवडणूक प्रचार सभांमध्ये, मोर्चांमध्ये वापर करून घेणे, धर्माचे व देशप्रेमाचे अतिरिक्त डोस पाजून त्यांना मोहित करणे सोपे आहे, योग्यही आहे परंतु संकटसमयी त्यांना निराधार करणे योग्य नाही. आज जेव्हा त्यांच्यावर बिकट वेळ आलेली आहे तेव्हा त्यांना वार्‍यावर सोडून देणे अत्यंत दुर्दैवी आहे.

पारंपारिक लोक कलावंतांमध्ये  भटक्या विमुक्त जमातींमधील लोक कलावंतांची संख्या अधिक आहे. कारण भटक्या-विमुक्तांचा हा जन्मजात  व्यवसाय आहे. लोककला कला ही त्यांच्यामध्ये उपजतच आहे. आजही भटके-विमुक्त जमातींमधील पारंपारिक धार्मिक लोक कलावंतांचे आपण आशीर्वाद घेतो. त्यांच्या पायांवर आपले मस्तक टेकवतो. परंतु आज हेच लोककलावंत पोटच्या खळगीसाठी कुणासमोरतरी हात पसरत असताना पाहायला मिळत आहेत. कारण एक कटु वास्तव, "प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी त्यांचे व त्यांच्या लेकरा बाळांचे पोट भरू शकत नाहीये". अस्मिता त्यांनाही आहे परंतु अस्मितेपेक्षा पोट व पोटापेक्षा जीव महत्वाचा आहे. ही मंडळी कठीण कष्टाची कामे, मोल मजुरीची कामे करू शकत नाहीत किंवा करत नाहीत असे अजिबात नाही परंतु या लोकांचा जन्मच कलेसाठी झालेला आहे. कला हेच या लोकांचे जीवन आहे. कला जी समाजाची गरज आहे, तिचे  व्यावसायीकरण होतेय आणि या व्यवसायिक कलाकारांमुळे भटक्या विमुक्त जमातींमधील पारंपरिक लोक कलावंत, त्यांच्या समस्या दुर्लक्षित राहतात. कारण ते संघटित नाहीत. हे पारंपारिक जमातीय लोककलावंत मोलमजूरीच करीत आहेत परंतु त्यांना मोलमजुरी किंवा इतर कुठलातरी हीन दर्जाचा व्यवसाय करायला लावणे हा त्यांचा तर अपमान आहेच, सोबतच हा संस्कृतीचा देखील अपमान आहे. एखाद्या मंत्र्याचे खाते बदलणे जितके सोपे आहे (मग त्या क्षेत्रातील त्यांना शिक्षण, अनुभव असो वा नसो) तितके एखाद्या इंजिनीअरला डॉक्टरचे काम करायला भाग पाडणे किंवा डॉक्टरला इंजिनिअरचे काम करायला भाग पाडणे सोपे नाही! किंबहुना ते शक्यही नाही आणि असेच हे आहे. माशाचे पिल्लू उडू शकत नाही, पक्षाचे पिल्लू पोहू शकत नाही, ससा मांसाहारी बनू शकत नाही आणि वाघ शाकाहारी बनू शकत नाही.. कारण हा निसर्ग आहे.

तसे तर बहुतांश लोककलावंतांना त्यांचे हक्काचे ना घर आहे, ना जमीन ना नोकरी आहे. परंतु जो त्यांचा हक्काचा पारंपारिक व्यवसाय आहे तो करणे देखील या कोरनामुळे त्यांना अशक्य झाले आहे. कोरोनाने या लोककलावंतांचे जीवन एका अर्थाने "लॉक" केले आहे. मागील सहा महिन्यांपासून हे लोककलावंत अक्षरशः बंदिस्त जीवन जगत आहेत. आषाढ कार्य, लगीन सराई, यात्रा, उत्सव, उरुस, गौरी गणपती असा कमाईचा हंगाम हातातून गेला आहे. आता नवरात्रोत्सव, दिवाळी, दसरा देखील कोरडाच जातो की काय? अशी भीती यांच्या मनात आहे. ग्रामीण लोकसंस्कृतीवर आयुष्य आधारीत असलेले हे लोककलावंत वर्षातील तीन-चार महिने कमावून, वर्षभर आपल्या कुटुंबाचे पालन पोषण साधेपणाने करत असतात परंतु जर आज ते उपाशी असतील तर सरकार व आपण पोटभर खाऊन ढेकर कसे काय देऊ शकतो?

विशेष म्हणजे जरी कोरोना व टाळेबंदी या लोककलावंतांसाठी गैरसोयीची होती. त्यांच्यावरील एक फार मोठे संकट होते तरीदेखील नेहमीच चांगल्याची बाजू घेणारा व लोकप्रबोधन करणारा हा वर्ग, उपलब्ध समाज माध्यमांचा वापर करून आपापल्या घरांमधून टाळेबंदीचे पालन करा असा संदेश आपापल्या पारंपारिक लोककलांमधुन देताना सर्वांनी पाहीला! लोककलावंत मग ते व्यावसायिक असोत किंवा पारंपारिक भटक्या विमुक्त जमातींमधील असोत, परिस्थिती सर्वांचीच विदारक आहे. परंतु त्यातही व्यासपीठांवर व्यावसायिक कला सादर करणारांपेक्षा घरोघरी जाऊन, रस्त्यांवर फिरुन पारंपारिक लोककला सादर करणाऱ्या व आपली उपजीविका चालणाऱ्या भटक्या विमुक्त जमातींमधील लोककलावंतांची परिस्थिती प्रचंड हलाखीची बनली आहे. कारण यांच्याकडे संकटकाळी वापरता येईल असा राखीव पैसा नाही. मागील सहा महीण्यांपासुन ऐन धंद्याच्या हंगामात त्यांच्या पोटावर पाय पडत आहे. यातून त्यांना सावरायचे असेल तर सरकारने त्यांना भरीव आर्थिक मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच एनजीओज, सेवाभावी समाजसेवी संस्था व संघटना, जमातीय संघटना, राजकीय पक्ष यांनी या लोकांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अर्थात कोणीच गांभीर्याने घेतले नाही असे अजिबात नाही. ब-याच समाजसेवी संघटनांनी व संवेदनशील व्यक्तींनी यांना मदतीचा हात दिला आहे, देत आहेत परंतु एवढेच पुरेसे नाही.

लोककलांमधील बहुतांश लोक कलावंत हे भटके-विमुक्त जमातींमधील आहेत. गोंधळी, डवरी गोसावी, चित्रकथी, कुडमुडे जोशी, वासुदेव, कडकलक्ष्मीवाले, कोल्हाटी, भराडी, भोपी, बहुरुपी, पिंगळे, नंदीबैलवाले यांचे आर्थिक गणित पार कोलमडले आहे. वाघ्या-मुरळी, तमाशा, शाहिरी, आराधी, सुंबरान यांसारख्या लोककला करणाऱ्यांमध्येही भटके-विमुक्त जमातींमधील लोकच अधिक आहेत.  पिंगळा जोशी, नाथजोगी, सरोदे, डोंबारी, गोपाळ, मदारी, गारुडी या व अशा सर्वांवरच उपासमारीची वेळ आलेली आहे. आता जिथे चुल पेटणेच मुश्किल झाले आहे तिथे मुलाबाळांचे ऑनलाइन शिक्षण! कोरोनावरील औषधोपचार! याबाबत तर न बोललेलेच बरे.

निवडणूक प्रचार, राजकीय सभा मोर्चे, आंदोलने, नेत्यांचे स्वागत समारंभ यांमध्ये या लोककलावंतांना वापरून घेणाऱ्या राजकीय पक्षांनी व सरकारांनी थोडे मोठे मन दाखवायला हवे. या लोककलावंतांना तातडीने आर्थिक मदत करायला हवी. जर खरोखरच या जमाती व यांची लोककला जगावी असे वाटत असेल, जर खरोखरच हे मनोरंजनकार, प्रबोधनकार, अध्यात्मिक, धर्मप्रसारक, राष्ट्रप्रेमी भटके-विमुक्त लोककलावंत कठीण काळात हतबल होऊ नयेत, यांना हालाकीचे व अपमानास्पद जीवन जगावे लागु नये असे वाटत असेल तर सरकारने यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे. ज्यांनी सर्वांचे जीवन हरित केले त्यांचे जीवन जर आज रुक्ष होत असेल तर हा त्यांच्यावरील खुप मोठा अन्याय ठरेल. यासाठी भटक्या विमुक्तांमधील संघटनांनी अधिक पुढाकार घेऊन यांच्या व्यथा रस्त्यावर उतरून मांडल्या पाहिजेत, कागदोपत्री सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. प्रसारमाध्यमांनी यांच्या समस्यांची दखल घ्यावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

लेखनः बाळासाहेब धुमाळ

दि. 18.09.2020

मो. 9421863725