Wednesday 15 September 2021

शब्द स्वरूपी गणा......

 शब्द स्वरूपी गणा......


मंडळी, विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाचा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील एक पवित्र, मंगलमय, आनंददायी आणि प्रत्येकाच्या मनामनात प्रेम, मैत्री, आपलेपणा निर्माण करणारा, सर्वांना एकत्र आणून एकजीव करणारा  लोकोत्सव! परंतु वर्तमान कोरोना संकटामुळे हा आनंदोत्सव यंदाही काहीसा झाकोळला आहे! असे असले तरी बाप्पांच्या चाहत्यांच्या आनंदामध्ये व उत्साहामध्ये कुठेही कमी जाणवत नाहीये. जो तो आपापल्या परीने त्याची व्यक्तिशः आराधना करीत आहे. बाप्पा हा खास करून बालभक्तांच्या आणि तरुण-तरुणींच्या प्रेमाचा विषय असतो. ही मंडळी आपापल्या स्टाईलने त्याच्यावर प्रेम करत असते! मी काही गणेशभक्त तर असेही पाहिले आहेत जे त्याला अक्षरशः आपल्या अंगावर गोंदवून घेतात!

गणेशोत्सव म्हटले की संगिताचा थरार आलाच. केवळ थरारच नव्हे तर सर्व प्रकारचे संगीत त्यात आले. हा एक प्रकारचा भक्तीनादच असतोय म्हटले तर वावगे ठरणार नाही! कारण मुळातच गणपती म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्ठ कलेचे अधिपती! परंतु कोरोना निर्बंधांमुळे गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर दुर्दैवाने बंधने आली आहेत. स्वाभाविकच कलावंत व कलाप्रेमी गणेशभक्त दोघेही हिरमुसलेले आहेत. त्यांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे.

खरेतर संगीत हे रसिकांसाठी केवळ एक मनोरंजनाचे साधन असते परंतु कलावंतांसाठी ते त्यांचा ' जीव की प्राण ' असते! ते त्यांचा श्वास असते! त्याच्याशिवाय हे लोक जगूच शकत नाहीत! कलाकारांसाठी कला हिच आराधना असते! त्यातही गणेश म्हणजे कलेची देवता. ही देवता कलावंतांना ऊर्जा, उत्साह, सृजनशीलता आणि समृद्धीसह प्रतिष्ठा प्रदान करीत असते! आणि म्हणूनच कलाकार आपल्या सादरीकरणा प्रारंभी आपल्या लाडक्या गणेशाचे स्तवन करीत असतात. विना संकट त्यांचा कार्यक्रम सिद्धीस जावो, एक चांगले सादरीकरण त्यांच्या हातून होवो, यासाठी ते एक प्रकारे गणेशाचा आशीर्वाद घेत असतात. "शाहीरी, तमाशा, नाटक, गोंधळकला या व इतरही कला प्रकारांमध्ये प्रारंभी जे सांगीतिक गणेश वंदन केले जाते त्याला ' गण ' असे संबोधतात" एक प्रकारे गण म्हणजे ताल-सूर रुपी पुष्पांद्वारे गणेशाला वाहिलेली पुष्पांजलीच जणू! जणुकाही ती एक प्रकारची शब्दरूपी आळवणच असतेय!

कोरोना महामारीच्या काळात, कलावंत आपल्या लाडक्या बाप्पाला ही सांगीतिक मानवंदना रंगमंचावरून देऊ शकत नाहीयेत! याची त्यांनाही खंत आहे व रसिकांनाही खंत आहे! असे असले तरी अलीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, सोशल माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे काही युवा कलावंत, थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु कला विश्वाला आपले योगदान देतच आहेत. विषय बाप्पांचा आहे! त्याला मानवंदना देण्याचा आहे! आणि आपण शांत कसे काय बसु शकतो? म्हणून काही युवा शाहिर एकत्र आले व त्यांनी गटाने एक सांगीतिक मानवंदना देणारा एक अत्यंत सुमधूर व सुश्राव्य ' सामूहिक शाहिरी गण ' निर्माण केला जो सध्या युट्युबवर प्रचंड गाजतोय! रसिक श्रोत्यांना या गणाने अक्षरशः भुरळ घातली आहे. या गणाचे बोल आहेत...

शब्द स्वरूपी गणा नमितो, ऐक रसिका जरा |

 ताल सुरांनी आळवितो मी, रिद्धी-सिद्धीच्या वरा ||

या गणाचे गायक आहेत शाहीर रामानंद उगले, शाहीर प्रसाद, शाहीर होनराज, शाहीर पृथ्वीराज, शाहीर माधवी, शाहीर यशवंत, शाहीर अजिंक्य, शाहीर संतोष, शाहीर कांचन, शाहीर मनोज थोरे, शाहीर विजय, शाहीर विक्रांत शिवानी कुलकर्णी इत्यादी. गणाचे संगीतकार आहेत रामानंद-कल्याण ही बंधू जोडी! त्यांच्या संगीताला समृद्ध बनवलेय त्यांनी, ज्यांना मी या गणाचे खास आकर्षण संबोधिल असे, ढोलकी सम्राट आदरणीय पांडुरंग भाऊ घोटकर व सुप्रसिद्ध ढोलकी वादक श्री. कृष्णा मुसळे यांनी! त्यांना साथ दिली आहे, सागर उदावंत आणि अर्थातच कल्याण उगले यांनी! या गणाचे कोरस म्हणजे सह गायक देखील सर्वच छान आहेत. सर्वांनी छान साथ दिली आहे. खरेतर गण कर्णमधुर व सुश्राव्य व्हावा यासाठी सर्वांनीच आपापले संपुर्ण योगदान दिले आहे. सर्वांचेच सादरीकरण अप्रतिम झाले आहे. तांत्रिक टिमने देखील आपली जिम्मेदारी अतिशय व्यवस्थित पार पाडली आहे. सर्वांचेच करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


परंतु असे असले तरी, माझ्या मनाला अधिक स्पर्श करून गेले आहेत, ते या गणाचे बोल! अर्थात या गणाचे गीत! गणातील अगदी शब्दंशब्द अत्यंत वजनदार, रुबाबदार, अर्थपूर्ण, शोभिवंत आणि हृदयाचा ठाव घेणारा आहे. एखाद्या कवीचे काव्यविश्व कसे समृद्ध असावे? त्याचा शब्दसागर कसा अथांग आणि विशाल असावा? आणि त्यातील शब्दरूपी मोत्यांची गुंफण त्यातील लाटांप्रमाणे कशी लयबद्ध असावी? त्याचे कवित्व कसे कलेसाठी कल्याणकारी असावे? याचा प्रत्यय हा गण ऐकल्यावर येतो!

गाणे, मग ते कोणतेही असो, ते जर पडद्यावरील असेल किंवा मंचावरील असेल तर ते ओळखले जाते, ते कुणावर चित्रीत झाले आहे त्याच्या नावावरून किंवा मग ते कोणी सादर केले आहे त्याच्या नावावरून किंवा पडद्यावर किंवा मंचावरील नसेल तर मग ते ओळखले जाते ते कोणी गायले आहे? त्या गायकाच्या नावावरून! परंतु मला असे वाटते, " गाणे बनते ते गीत व संगीत यांच्या पवित्र मिलाफातून " यातही गीत महत्त्वाचे ? की संगीत महत्त्वाचे? हा नेहमीचाच कोड्यात टाकणारा प्रश्न! कारण आपण अनेकदा पाहतो, कसलीही गीत प्रतिभा नसलेले साधे गाणे देखील केवळ त्याच्या उडत्या संगीतामुळे प्रचंड लोकप्रिय बनते! परंतु त्याची ही लोकप्रियता चिरकाल टिकून राहात नाही! श्रोत्यांना ते ठेका धरायला लावते खरे परंतु मंत्रमुग्ध करीत नाही! जोवर गाण्यात गायकाचा प्राण उतरत नाही तोवर ते गाणे श्रोत्यांच्या अंतकरणात उतरत नाही आणि त्यासाठी लागते चांगले गीत!!! गीत चांगले असलेले गाणे, म्हणजे शब्द चांगले असलेले गाणे वर्षांनुवर्षे रसिकांना आपलेसे करून ठेवते!

या गणाचा गीतकार आहे युवा लोककलावंत कल्याण उगले. त्याने गणामध्ये शब्दांची वर्णिलेली महती, थेट काळजाला जाऊन भिडते! मानवी भावनांचा ईश्वराशी थेट भेट घडवते! मला वाटते कल्याण उगले हा एक असा हिरा आहे, ज्याला अनेक पैलू आहेत! तो एक गीतकार तर आहेच. त्याने आजवर अनेक गीते लिहिलेली आहेत, जी लोकप्रिय देखील झाली आहेत. सोबतच हे एक चतुरस्त्र व हरहुन्नरी कलामिश्रण आहे! वडील शाहीर आप्पासाहेब उगले यांच्याकडून त्याला काव्यप्रतिभा तर ढोलकी सम्राट गुरुवर्य पांडुरंग भाऊ घोटकर यांच्याकडून त्याला वाद्यप्रतिभा लाभली आहे! कल्याण हा एक अति उत्कृष्ट ढोलकी वादक आहे! एवढेच नव्हे तर तो एक निष्णात बहुवाद्य वादकही आहे हे विशेष! आपण संगीत क्षेत्रामध्ये नेहमी पडद्यावरील चेहराच लक्षात ठेवतो, त्याचेच चाहते होतो परंतु पडद्यामागच्या व्यक्तीला मात्र लक्षात ठेवत नाही. परंतु वास्तव तसे नसतेय! " प्रेक्षक वा श्रोते हे घुंगरांचे वेडे असतात परंतु घुंगरू मात्र ढोलकी आणि लेखणीचे वेडे असतात!" ही जादू असतेय बोटांची! आणि हा कल्याण तर असा अवलिया आहे...  ज्याची बोटे ढोलकीवर व कागदावर, दोन्हीवरही कमालीची जादू दाखवतात!!

मी त्याला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. तो एक तंत्रस्नेही लोककलावंत आहे. आपल्या कामामध्ये तो हमेशा तंत्रज्ञानाचा वापर करीत असतो. तो सतत नाविन्यपूर्ण सांगितिक प्रयोग करत असतो आणि माझ्या दृष्टीने हेच त्याला अधिक श्रेष्ठ बनविते! असे सांगितिक प्रयोग केवळ कलावंतालाच नव्हे सकळ कलेला श्रीमंत बनवित असतात! त्याचा आजवरचा प्रत्येक सांगीतिक प्रयोग, श्रोत्यांना संगीत नभात पोहोचविण्यात यशस्वी झालेला आहे. प्रत्येक वेळी रसिक श्रोता त्याच्या निर्मितीमध्ये रममाण झालेला आहे. सदरचा, "शब्द स्वरूपी गणा" हा गण साधारणपणे सहा मिनिटांचा आहे. असे असले तरी ऐकत असताना तो कधी संपतो हे कळतही नाही! आणि आपण पुन्हा तो रिप्ले करण्यास मजबुर होतो! आणि यालाच सांगीतिक यश म्हणायचे!

तेव्हा शेवटी मी असेच म्हणेल की, या बहुदा पहिल्याच सामूहिक शाहिरी प्रयोगातून सर्व लोककलावंतांनी केलेली  ही आर्त सांगीतिक आळवण, बाप्पाला प्रसन्न करो आणि लवकरात लवकर या कोरोनारुपी राक्षसाचा नाश होऊन पुन्हा एकदा कलामंदिरे, रंगमंदिरे रसिकांनी ओसंडून वाहोत, कलामंच, व्यासपीठे पुन्हा कलावंतांनी सजोत आणि कलावंतांचा कोंडलेला श्वास एकदाचा मोकळा होऊन पुन्हा त्यांचे जीवन गणेशाच्या जास्वंदाप्रमाणे फुलो, पुन्हा पहील्यासारखीच लोककला बहरास येवो, शब्द ताल सुर लय यांचा हा झरा पुन्हा अखंड वाहत राहो आणि लोककलेचे 'कल्याण' होवो हिच गणरायाचे चरणी नम्र प्रार्थना.

बाळासाहेब (बालाजी) धुमाळ

मो. 9421863725.