Saturday 5 August 2023

आदिशक्तीचा उदे उदे


















मीपणाचे ओझे सारे
डोळ्यात धुळ अन नाकात वारे.
घे अंतिमचा श्वास एकदा 
जातील सोडून तुजला प्यारे!

एकट्याचे हे आयुष्य 
जीवन ही एकटेच संपते.
माझे माझे करण्यातच मात्र 
हयात अवघी लयास जाते!

परी राखेतलाही पक्षी झेपावतो 
अंतरे उंच गगना गवसणीचे 
हेच त्याचे ध्येय ठरलेले 
तुही पाखरू त्याच वृत्तीचे
नको शंका नको पीछेहाट
समस्या असतील मग रे लाख!

जग दुषणणांसाठीच असतेय
जगाचा विचार तू करतोस का?
त्यांची टोमणे ऐकत बसत 
तुझा वेळ तू दवडतोस का?
विचार तर त्यांना करावाच लागेल 
रडत बसतील पश्चातापाने 
आणि तू मिरवत असशील 
ढाल व पुष्पचक्र तो-याने!

रठाळ पावलांच्या चामडीस 
भीती नसते तप्त रेतीची 
डोळ्यासमोर असते प्रतिमा
ओलांडावयाच्या रेषेची
ऊनाचीही छाया होते 
घामाचे तर अत्तर ते
 केवळ असदू बहाद्दरा 
मनावरती पथर ते!

सत्याची ना कास सुटू दे
विजयाची ना आस तुटू दे 
सर्व शक्तीनिशी लढण्याचा 
संकल्प ऊरात ठासूदे
बाकी सारे पाहिल आई...
आदिशक्तीचा उदे उदे🙏🙏

बाळासाहेब (बालाजी धुमाळ)
मो.  9421863725.