Thursday 27 October 2016

दुरितांचे तिमिर जावो...

दुरितांचे तिमिर जावो…

मित्रांनो नमस्कार,
“मी अविवेकाची काजळी , फेडूनी विवेकदीप उजळी l
तैं योगियां पाहे दिवाळी, निरंतर ll”
ज्ञानियांचे राजे,  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात चोपन्नाव्या ओवी मध्ये दिवाळीचे असे वर्णन केले आहे. ज्याचा अर्थ, अविवेकाचा अंधार दूर करुन विवेकाचा दिवा पाहण्यासाठी योगी व्हावे लागेल असा, ढोबळपणे सांगता येईल.  
 सुरुवातीलाच मी हे ही स्पष्ट करु ईच्छितो की, मी लेखक वा विचारवंत नाही. मात्र अभ्यासक नक्कीच आहे. शिवाय "व्यक्त होण्याचे जे मुक्त स्वातंत्रय" सामाजिक प्रसार माध्यमामुळे प्राप्त झाले आहे त्याचा वापर करुन मी माझे दिवाळीविषयक विचार आपणापर्यंत पोहचवत आहे एवढेच. एरवी माझी शैक्षणिक व बौध्दिक पातळी फार उच्च नाही हे ही नम्रपणे सांगु इच्छितो.  कारण माझा जन्म आर्थिक बौध्दिक व सामाजिकदृष्टया अत्यंत दीन कुटूंबात झाला आहे.दिवाळी हा तसा दिवाळे काढणारा सण ! मात्र माझा सर्वात आवडता सण. अगदी लहानपणापासून ! ग्रामिण शेतकरी कुटूंबातील माझे बालपण मला चांगले आठवते. वसुबारसेला गोठयात आई आण्णा व मी, गुरांची पुजा करायचो, अत्यंत साधेपणे पण मनोभावे ! आरती करताना आम्ही म्हणायचो, “ दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाईचा चारा, बैल मारा, बैलाचे बाशींग, किकरे ताशींग … वगैरे वगैरे पुढचे आठवत नाही. माहित याचा अर्थ काय ? किंवा हे शब्द अर्थपुर्ण ही आहेत की, नाहीत ! पण ही प्रथा होती, जी आम्ही अत्यंत मनोभावे व पवित्र अंतकरणाने पुर्ण करायचो. दिवाळी आली की, माझे आई-वडील “जुन्या बाजारातील नवे कपडे” आणायचे, मेंहदी, हळद, बेसन, दूध व तेल मिश्रीत उटणे लावून अभ्यंगस्नान, खोबरेल तेलात अत्तर मिसळून तयार केलेले सुगंधी तेल केसात माळून, सकाळच्या थंडीत कुडकुडत्या हाताने तोटयाला (फटाक्याला) अगरबत्तीने पेटवताना वाटणारी भिती व होणारा आनंद खरंच मला शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यानंतर वर्षभर कधी नव्हे तो सकाळी सकाळी गोडधोड नाष्टा करुन घराबाहेर पडायचो. नदीतील खडक, डोंगरावरील दगड यावर खाकी तोटयातील दारु काढून ती यांवर ठेवायचो व त्यावर छोटा दगड ठेवून त्यावर मोठया दगडाने मारायचो. हेतू एकच एका तोटयाचे पाच-सहा तोटे व्हावेत. अगदी दिवसभर हेच चालायचे दुपारनंतर संध्याकाळची प्रतिक्षा तीव्र व्हायची. दिवस मावळता घरांवर व दारात दिवे लावयाचे, फटाके वाजवायचे, आपले संपले की, लोकांचे पाहत राहायचे !! त्या त्या दिवशीची धार्मिक व पारंपारिक पूजा करायची व उद्याच्या प्रतिक्षेत झोपी जायचे, हा दिवाळीतील दिनक्रम. ही आमची बालपणीची दिवाळी!! दिवाळीपुर्वी एक महिन्यापासूनची प्रतिक्षा व दिवाळीनंतरची एक महिन्याची हूरहूर आजही स्पष्ट आठवते.
 पण मित्रांनो आज काय पाहतो आपण ? दिवाळी या सणाचे सांस्कृतिक महत्व व श्रध्दा लोप पावत चालली आहे. पैश्याची राख रांगोळी होत आहे व विदेशी कंपन्या आणि व्यवसायिकांची चांदी होत आहे. वास्तविक दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्व सणांचा राजा, हा दिव्यांचा सण, इष्टाच्या अनिष्टावरील विजयाचे प्रतिक, गुरे ढोरे तुळसीसह पर्यावरणाप्रति कृतज्ञतेचे प्रतिक, धनाला धन्यवाद देण्याचा व त्याला नमन करण्याचा सण तसेच कौटूंबिक जिव्हाळा प्रेम,आपुलकी, व आपलेपणा जपण्याचा सण. पण आज ती सात्वीकता श्रध्दा उपासणा व आपलेपणा सहसा दिसत नाही. आज दिवाळी ध्वनी व वायू प्रदूषणाचे कारण व स्वसंपत्तीचे प्रदर्शन करण्याचे माध्यम जेव्हा होत आहे तेव्हा वाईट वाटते. हा वास्तविक पाहता दिपोत्सव आहे. सडा सारवण त्यावर रांगोळींची सजावट व पानेफुले यांची हारे व तोरणे करुन दिव्यांची आरास मांडून श्रध्दापुर्वक पूजा आर्च्या करुन कौटूंबिक व सामाजिक सौहार्द जपण्याचा सण जेव्हा प्रदर्षणाचे व प्रदुषणाचे माध्यम बनतो तेव्हा दु:ख होते.
 मात्र हे वर्णन सार्वत्रिक, सार्वभौम व सामान्य नाही. आजही अनेक ग्रामीण व शहरी कुटूंबात हा सण अत्यंत मनोभावे व श्रध्दापुर्वक साजरा करत असताना आपण पाहतो. तेव्हा दिवाळी साजरी करत असताना ऐवढेच वाटते की, दिवाळीच्या नावाखाली मोठमोठे कर्णकर्कश फटाके, धूर सोडणारी शोभेची दारु व सजावटीवरील अवास्तव खर्च टाळून साधेपणाने आपलेपणाने व श्रध्देने साजरी केलेली दिवाळी वर्षभर स्मरणात राहील.
 मित्रांनो “दिवाळी हा श्रीमंतांचा सण” ही दिवाळीची ओळख मिटून जे उपेक्षित दीन, दुबळे, गरीब,व अपंग लोक या सणाचा आनंद घेऊ शकत नाहीत तसेच देश संरक्षणार्थ सीमेवर लढणारे जवान इतर जिवनावश्यक सेवा देणारे बांधव आपापल्या कर्तव्यावर असल्यामुळे या सणाचा आनंद घेवू शकत नाहीत त्यांना धन्यवाद व शुभेच्छा.
 ही दिवाळी सर्वांची नवी स्वप्ने, नव्या आशाआकांक्षा पुर्ण करणारी, सर्वांत नवा जोश नवा उत्साह भरुन सर्वांच्या  व्यक्तीमत्वाला  नवे वलय प्राप्त करुन देणारी व यशाची क्षितीजे गाठणारी ठरो हीच आई जगदंबेस प्रार्थना. वर उल्लेख केल्याप्रमाणे दिवाळी हा दिव्यांचा अर्थात प्रकाशाचा सण, सर्वांच्या जिवणातील दु:ख द्रारिद्रय , चिंता, भय, काळजी, अनारोग्य, अपयश, गर्व, अहंकार इत्यांदीचा अंधार दूर होवून सर्वांच्या जीवणात यश व आनंदाचा प्रकाश घेवुन येवो हीच अपेक्षा व प्रार्थना, जी ज्ञानेशांनी आपल्या पसायदानात व्यक्त केली आहे…

"दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुर्यें पाहो l
जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात ll"
दिवाळीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा…

आपला,
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. - 9096877345

Wednesday 12 October 2016

दसरा...

----------------------------- दसरा-----------------------
धनसंपदा आराम नेई, काम वासना आजार देई
कष्ट मेहनतीत शांती लई, निजल्या सरशी निद्रा येई.
मौज मजा अन उधळण सारी, आनंद देती क्षणाचा
सवय बनती नकळत, अन चैन हिरावी मनाचा.

गर्व अहंकार करतोस कसला, काय हाई तुझं?
सोबतीला जन्मापासुन, आणलं व्हतंस का हे ओझं?
माझं माझं कबाड ओझं, फिकुन दी रं सारं
पैस्याआडक्यातलं सुख म्हणजी, गाठोड्यातलं वारं.

समाधान धनात नाही, नाही ते मानात
फुलं पक्षी गवत वेली, सुखात डोलत्यात रानात.
धरता यायना बांधता यायना, मागं फिराय लावतय
सुख तर गड्या मनात असतय, अन मनातच ते मावतय.

मानलं तर गड्या पानही, असतय बरका सोनं
शीरीमंती म्हणजी जवळचं, जवळच्यांना देणं ...
मोठी धनानं बरीच असत्यात,  मनाने मातर छोटी
पैश्यामागं धावुन मिळते, ती पत आसतीय खोटी....

राजंही रंक झाली, अन रंकही झाली राजं
संपत्ती तर मध्यान छाया, नको मी अन माझं.
उगला दिस मावळणारंच, अमर काहीच नाही
चांगुलपण अन विचार थोर, तेवढ मागं राही..

फास त्याचा आवळणारंच, नकु करू तु अति
ख-याचा तर विजय पक्का, खोटं खातं माती.
सांगं दसरा वैर विसरा, सांगती नऊराती
जपुन ठेवरं नाती यड्या, जपुन ठेव नाती..

मोह माया अन उसनी काया, करवुन घेती पापं
सोनं वाटुन सोनं व्हणं, किती रं गड्या सोपं.
घडा भरता पापाचा, फेडावं इथच लागतंय
शरीर पैकं गाडी सारं, सोडावं इथच लागतंय.

फुकाचे तुप अन हरामची पोळी, पोटी कुटकुट करते
श्रमाची चटणी अन घामाची भाकर, आयुष्भर ना सरते.
जमा करता करता, वाल्ह्या व्हवुन जाशील
देता देता कर्णाचा, अंश सवतात पाहशील.

सोनं नाणं यायना कामी, सोडवीत नाही कुणी
चार माणसं पिरमाची, धावत येतील रणी.
सिमा वलंड पैश्याची, अन वलंड सिमा जातीची
कानावरची झापडं सारून, आईक हाक नऊरातीची.

दानधरम कर, कर तु सेवा दिन दुभळ्यांची
नाव कमव अन जिकुन दाखीव, मनं इथल्या सगळ्यांची.
वाया नाही जाणार पुण्य, नग पडु नरकात
देवालाबी आवडशील मग, अन जागा मिळल सरगात.

--- बालासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९०९६८७७३४५