----------------------------- दसरा-----------------------
धनसंपदा आराम नेई, काम वासना आजार देई
कष्ट मेहनतीत शांती लई, निजल्या सरशी निद्रा येई.
मौज मजा अन उधळण सारी, आनंद देती क्षणाचा
सवय बनती नकळत, अन चैन हिरावी मनाचा.
गर्व अहंकार करतोस कसला, काय हाई तुझं?
सोबतीला जन्मापासुन, आणलं व्हतंस का हे ओझं?
माझं माझं कबाड ओझं, फिकुन दी रं सारं
पैस्याआडक्यातलं सुख म्हणजी, गाठोड्यातलं वारं.
समाधान धनात नाही, नाही ते मानात
फुलं पक्षी गवत वेली, सुखात डोलत्यात रानात.
धरता यायना बांधता यायना, मागं फिराय लावतय
सुख तर गड्या मनात असतय, अन मनातच ते मावतय.
मानलं तर गड्या पानही, असतय बरका सोनं
शीरीमंती म्हणजी जवळचं, जवळच्यांना देणं ...
मोठी धनानं बरीच असत्यात, मनाने मातर छोटी
पैश्यामागं धावुन मिळते, ती पत आसतीय खोटी....
राजंही रंक झाली, अन रंकही झाली राजं
संपत्ती तर मध्यान छाया, नको मी अन माझं.
उगला दिस मावळणारंच, अमर काहीच नाही
चांगुलपण अन विचार थोर, तेवढ मागं राही..
फास त्याचा आवळणारंच, नकु करू तु अति
ख-याचा तर विजय पक्का, खोटं खातं माती.
सांगं दसरा वैर विसरा, सांगती नऊराती
जपुन ठेवरं नाती यड्या, जपुन ठेव नाती..
मोह माया अन उसनी काया, करवुन घेती पापं
सोनं वाटुन सोनं व्हणं, किती रं गड्या सोपं.
घडा भरता पापाचा, फेडावं इथच लागतंय
शरीर पैकं गाडी सारं, सोडावं इथच लागतंय.
फुकाचे तुप अन हरामची पोळी, पोटी कुटकुट करते
श्रमाची चटणी अन घामाची भाकर, आयुष्भर ना सरते.
जमा करता करता, वाल्ह्या व्हवुन जाशील
देता देता कर्णाचा, अंश सवतात पाहशील.
सोनं नाणं यायना कामी, सोडवीत नाही कुणी
चार माणसं पिरमाची, धावत येतील रणी.
सिमा वलंड पैश्याची, अन वलंड सिमा जातीची
कानावरची झापडं सारून, आईक हाक नऊरातीची.
दानधरम कर, कर तु सेवा दिन दुभळ्यांची
नाव कमव अन जिकुन दाखीव, मनं इथल्या सगळ्यांची.
वाया नाही जाणार पुण्य, नग पडु नरकात
देवालाबी आवडशील मग, अन जागा मिळल सरगात.
--- बालासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९०९६८७७३४५
No comments:
Post a Comment