देवा तुझ्या दयेची आम्हास आस आहे,
भटकी ही जिंदगी रे बघ उदास आहे!
काळोख दाटले रे, पहाट पाहतो,
पालात आम्ही तुझी, देवा वाट पाहतो...
जीवन गरजा पूर्ण करून,
किमान संधी देशील कधी?
अस्तित्वाच्या लढाईत,
विजयी आम्हा करशील कधी?
विजयी पताका डोलवायला,
गुलाल हवेत उधळायला
आम्ही सारेच व्याकूळतो...
देवा तू कृपावंत, कोमल तु अंतरी!
कृपा तुझी दगडांचीही, फुले करणारी!
तरी का रे काटे रुतलेल्या
पायांनाही शाळा दुरी!
मुलाबाळांना आमच्या, शाळा दाखव हरी
अरे पाटीवरती खडूने, नशीब त्यांना लिहू दे तरी!
'अ' रे आईचा ऐकण्यासाठी,
आम्ही सारे आतुरतो....
तू नाहीस भाजीपाला, तुला लागतो खरा भाव!
पण आम्हाला मिळेना आणि तुलाही कळेना!
आता तूच डोके लाव!
विखुरलेले संसार आमचे, सावरण्यास तूच धाव...
पालापाचोळा आम्ही भटके, वावटळीत उडतो!
स्वला व स्वजनांना, शोधण्या सैरावैरा धावतो......
मंदिरे तुझी सोन्याची! हिऱ्यांची तुझी मूर्ती!
तुझ्याच साक्षीने इतिहासामध्ये,
आम्हीही गाजवली किर्ती!
दानपात्र तुझे ओसंडून वाहतेय!
आमचेही दैन्य, दुःख तसेच काहीसे ओसंडतेय!
खरतर संपूर्ण आयुष्यच दारिद्यात न्हातेय!!
परंतु तु गैरसमज करून घेऊ नकोस हं!
हेवा वगैरे आम्हा अजिबातच नाही...
उलट 'गर्व' आहे ! कारण यातच 'सर्व' आहे!
स्वत्वाचा अर्थ, सर्वशक्तीनीशी शोधतो...
खोदल्या विहिरी बांधली धरणे, तृप्त केली धरणी
आता पिण्याच्या पाण्यासाठी, वणवण अनवाणी!
तेव्हा बांधले किल्ले अन शोभा आणली महाली
राजे गेले अन राजकारण्यांनी, केली बघ गद्दारी!
आताही देवा जीवनाला, कळस चढवू आम्हीच
लाथ मारू तिथे पाणी काढू, मेहनतीने आम्हीच
पण लाथ मारण्या हक्काची, जागा तरी दे
श्रद्धा आहे तुझ्यावर म्हणून तर
तुला पाण्यात ठेवतो..
अन्न मिळत होतं, भिक्षा मागून तुझ्या नावानं
आता विरोधी कायदे, केलेत बघ सरकारनं!
भीक मागू देईना बाप आणि जेऊ घालीना माय
एकप्रकारे दोघांनीही मिळून, पोटावर दिलाय पाय!
आशा आहे आम्हा, कृपा नक्की करशील?
आम्हालाही जगण्याचा, रास्त हक्क देशील?
आमचे हक्क व अधिकार आम्ही मागतो...
देवा इथं वाळलंच काय? ओलं बी जळतंय!
शेपुट घोड्याचं नाही पिळता आलं,
तर गाढव बळी पडतंय!
बनून कधी 'बळी' देवा, कान माजो-यांचे पिळशील?
सोसलेले कांड आणि माजलेले सांड
पाताळी एकदाचे गाडशील?
कधी देवा पाय तुझे,
आमच्या पालाकडे वळवशील?
म्हणून तुझ्या दाराकडे डोळे आम्ही लावतो...
देवा जनावर बी आडोशाला आणि पक्षी पाना फांद्यांत
लपवित्यात त्यांची इज्जत!
इथे आम्ही रस्त्यावरती, न्हातोय बेइज्जत!
अरे तुझ्या डोळ्यासमोर, लुटली जातेय अब्रू!
रस्त्यांकाठी पुलांखाली, जन्मास येतेय लेकरू!
सर्वांनाच जन्माला तूच घालतोस,
नको रे बाबा विसरू!
कधी आमच्या द्रौपदीच्या, रक्षणाला धावतो?
भीमरूपी देवा हात तुझे
कधी नराधमांच्या छाताडावर पाडतो...
देवा तू दाता आहेस, दे एवढेच दान..
दे पोटाला अन्न पाणी अन थोडासा मानसन्मान!
अंगभर कापड दे, हक्काचा निवारा,
शिकून पुढे जायला देवा, दे तुझा सहारा.
पावशील ना रे आम्हालाही, एवढं पदरात टाकशील?
या जन्मातले नसले तरी पाप उदरात घेशील?
कायमचा निवारा देण्यासाठी,
हाती गोवर्धन कधी उचलतो??
चोर नाही आम्ही देवा, ना कुणा लुटतोय
तरी तुरुंगात आम्ही, जवतवा सडतोय!
लुच्चा निजे गढीमंधी अन इमानदार दारी
कलियुगाची देवा त-हारच आहे न्यारी!
चोर सोडून संन्याशीच फासावर चढतोय!
उघड डोळे न्याय कर, पट्टी कसली बांधतोय?
कधी तुझा आसुड, दुर्जनांवर ओढतो???
देव-धर्म देशासाठी उदार होऊन लढलो
गनिमांच्या अन गोर्यांच्याही, फौजांना आम्ही नडलो
पण आमच्याच देशात! आमच्या भोवती,
फास कायद्यांचा आवळलाय!!
जणू अजस्र अजगराच्या, तावडीत पाडस गवसलाय
सुदर्शन तुझे सोडून, हे फास सारे तोडशील कधी?
राज्यघटनेच्या कलमांमध्ये
आमचीही कलमे जोडशील कधी?
कधी येशील होऊन नव भीम तू??
नवस तुला करतो......
डाग पूस, हाक ऐक, धाऊन ये मदतीला
आजवर जिंकलो आताही जिंकूच!
फक्त सारथी रहा सोबतीला
दैव, दैन्य, दारिद्र्याशी जिंकू आम्ही लढाई
वीटेवरती वीट ठेवून घडवू यशाची पंढरी
आशिष दे, जोम दे, रग दे गं विठाई
वाट तुझी चालतोय, तुझे वारकरी
खांदेकरी पालखीचे, पालखी तुझी वाहतो..
छोटंसच पण सुखी, आयुष्य देना देवा
शतायुषी सौष्ठवांचा नाही आम्हा हेवा.
आकाशाची सफर नको, चंदेरी चादर नको
पण म्हणून केवळ देवा...
अंथरायला जमीन आणि पांघरायला आकाश नको!
बस्स! आता... बस्स आता...
माणूस आहोत आम्ही
माणसासारखे वागव माधवा.
हाताला काम दे, घामाला दाम दे रे
डोक्यात बुद्धी दे, विचारात शुद्धी दे रे.
मग बघ आम्ही कशी दाखवतो,
बनुन तुझी लाडके लेकरे..
हात ठेवशील मस्तकावर आशा अशी करतो....
सुकर बनविले कुणी?
वस्तू, कला, खेळ, करमणूक दिल्या त्यांना कुणी?
धर्मा, शास्त्रा, तुला जपले,
हेरी केली, रेकी केली, शस्त्र धरिले करी,
युद्धे केली, परतून लाविली, वार झेलेली उरी!
देश धर्माचे सच्चे रक्षक!
दुर्लक्षित का रे तरी?
दुःख नाही रे दैन्याचे देवा
परी दुर्लक्षाने झुरतो?
देवा तुला डोक्यावरती, गळ्यामधी मिरवलं!
छन्नी हातोड्याने तुला, दगडा धोंड्यात घडवलं!
पशूंमध्ये खेळवलं, कपाळावरती मळवलं!
गोपाला तुझ्या खेळांना, रस्त्यांवरती दाखवलं!
कोवळ्या बोटांनी रे, नावे तुझी खुणावली!
आयुष्यभर तुझी गाडी, दारोदारी फिरवली!
पण आता तर गड्या तुझ्या भक्तांनीही
तोंड त्यांचं फिरवलय!
आम्हालाच काय! चक्क तुला देखील उडवलय!!
तुझाच खेळ आहे सारा, सारी तुझीच माया!
नाव आहे हरीचे, अन आहे कलीची काया!!
जाऊदे देवा आता...
भीक आम्हालाबी नकोच आहे
न्याय तेवढा हवा आहे..
तेव्हा तुझ्या नैवेद्याच्या ताटावाणी
ताट आमचे बी भरतो!
'अ' अज्ञानाचा ते 'ज्ञ' ज्ञानाचा
मार्ग नवा हा धरतो!
श्रद्धा परंपरा संस्कृती, जतन करून ठेवली.
मोरपीस रोवून मुकूटी, हरी नामे बोलली.
रूपे घेऊन बहु देवा, गुपीते सारी खोलली.
चित्रांच्या मालिकेतून, मांडली तुझी लीला.
देवा तुझी सेवा आम्ही, मनोभावे केली.
रागावू नकोस बाबा पण फळास नाही आली!
इतरांचे सांगण्यात गेले सारे आयुष्य,
आता धोक्यात आलेय, आमचेच भविष्य.
ठेक्यात वाजवला संबंळ
पण डोक्यात झालाय गोंधळ!
अरे नंदीदेव गोमाता, वा पोपटराजा
सर्व होते खुष आमच्यावर!
तरीही सरकारला दिसला अत्याचार?
नाराज आम्ही तुझ्यावर नाही रे,
दाद तुझ्याकडे मागतो.
पाहतो आमच्या झोळीत, तु माप कधी टाकतो.
कळेनासी झाली देवा, आमची काय चुक?
मूकपणे देवा, कौल तुझा मागतो....
गतिमान आहे विश्व, बदल आम्हीही समजतो.
म्हणूनच पर्यायी, व्यवस्था आम्ही मागतो.
स्वतःसाठीच नाही जगणार, तुझेही काम करू.
तुझ्या दयेच्या बदल्यात देवा, जनसेवाबी करू.
विश्वास ठेव आमच्यावर आणि संधी दे आम्हा
दाखला देतोस ना भक्तांना जसा?
आम्हा जातीचाही दे तसा!
एळकोट एळकोट होऊ दे एकदाचा,
या लाजीरवाण्या जगण्याचा!
न्याय, स्वातंत्र्य, समतेसह, मानवता दे आम्हा
हक्क मागणे न्याय मागणे हा कसला गुन्हा?
माणसासारखे सन्मानाचे, जीवन आम्ही मागतो....
काळोख दाटले रे, पहाट पाहतो,
पालात आम्ही तुझी, देवा वाट पाहतो...
बाळासाहेब धुमाळ
Mob. 9421863725
No comments:
Post a Comment