Tuesday 29 December 2020

लोकशाहीचा लिलाव

 #लोकशाहीचा_लिलाव

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावच्या सरपंचपदासाठी झालेला लिलाव हा एकार्थाने लोकशाहीचाच लिलाव आहे. २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाचा लिलाव करून उमराणे गावच्या पुढाऱ्यांनी हे दाखवून दिलेय की सत्ता ही पैशाने खरेदी केली जाऊ शकते. जनमताला संपत्तीच्या जोरावर थोपवले जाऊ शकते. सत्तेचे विकेंद्रीकरण, सत्तेत समान वाटा, कायदा, राज्यघटना यातील काहीच पैशांपेक्षा मोठे नाही हे यांनी दाखवून दिलेय. संपुर्ण पॅनल बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांनीही अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला!!

एवढेच नाही तर लिलावाचा हा पैसा ग्रामदैवत रामेश्वर महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे हे विशेष!! म्हणजे जणुकाही गावात सर्वच एकाच धर्माचे आहेत, सर्वचजण आस्तिक आहेत!! जणुकाही गावात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी, रस्ते, नाल्या, पथदिवे, सोलर प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, खत निर्मिती प्रकल्प, सार्वजनिक शौचालये हे सर्व काही मुबलक प्रमाणात आहे!!! गावात कुणीही गरिब नाही, बेघर नाही!! शाळा, आंगणवाडी, वाचनालय, क्रिडांगण, व्यायामशाळा, दवाखाना, बाग-बगिचा, सर्व काही पुरेसे आहे!!! जलसंधारण, बचतगट, सामुहिक रोजगार निर्मिती, व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे, स्वरक्षण शिबिरे यांची गरजच नाही!!!

काय मुर्खपणा आहे हा!!

मुळात तर कुठलीही निवडणूक ही बिनविरोध होऊ नये..कारण यामुळे सामान्य माणसाच्या निवडणूक लढण्याच्या व निवडून देण्याच्या अधिकाराचीच हत्या होते. ताकदवान, धनदांडग्या, बहुसंख्य व गुंडप्रव्रुत्तीच्या लोकांकडून सामदामदंडभेद वापरून येनकेनप्रकारेण सत्ता हस्तगत केली जाते व गोरगरिबांना, दुर्बलांना, सामाजिक द्रुष्ट्या मागासांना, अल्पसंख्यांकांना सत्तेपासून दुर ठेवले जाते. त्यामुळे अशा लोकशाही व घटनाविरोधी क्रुत्यांचा निषेध करायला हवा व अशा लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अन्यथा सर्व लोकप्रतिनिधी बोली लावुन खुर्चीत बसतील!!

असे आताच घडलेय असे नाही. यापुर्वीही असा लोकशाहीचा बाजार भरलेला आहे. यापुर्वीही सत्तेची विक्री झालेली आहे. आणि हे असेच चालत राहीले तर तो दिवस दुर नसेल जेव्हा अंबानी अदानी सारखे धनाढ्य उद्योगपती आपले पॅनल तयार करतील व लागेल तेवढा पैसा ओतुन आपल्या मुठीतील माणसे सरकारमध्ये पाठवतील!!  एका दारूच्या बाटलीवर मत विकणाऱ्या आपल्या देशात अगदी श्रीमंत, सुशिक्षित व बुद्वीजीवी देखील आपले मत विकताना मी पाहीलेय!! त्यामुळे प्रती मतदार हजार रुपये जरी दिले तरी, साधारणपणे 92000 कोटींंमध्ये सरकार तयार होऊ शकते!! आणि त्यांच्या सारख्यांसाठी ही मोठी रक्कम नाही!! शिवाय ती वसुल कशी करायची हे ही त्यांना ठाऊक आहे!ग्रामीण भागातील एक जुणी म्हण आहे, "दराची माती दरालाच लावायची!" किंवा "देवाचे घ्यायचे व देवालाच लावायचे"! अर्थात आपला हिस्सावाटा काढून हं!!! त्यामुळे लिलाव किंवा बोली तर सोडाच, बिनविरोध निवडणूक देखील लोकशाहीसाठी घातक व ताकदवान बहुसंख्यांक धनदांडग्यांसाठी पोषक आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.


#बाळासाहेब_धुमाळ

No comments: