माझ्यात होते ज्योती...
कळतय मला ढोंग तुमचं
प्रेमही कळतय काहींचं.
दोन दिवस जय माझा
दोन दिवस मान मला.
चंद्रपेक्षाही अधिक
दाखवता तुम्ही कला.
पूजा नका करू माझी
नको मज दिपप्रज्वलन.
जगू द्या त्यांनाही जरा
लेकींचं माझ्या करा रक्षण..
केलत तेव्हा बदनाम मला
आता भलेही करा अपमानित.
पण का आजही समतेपासून
लेकी माझ्या वंचित??
माझा काळ वेगळा होता
आजच्या स्त्रिया वेगळ्या
स्थळी जळी नभी
प्रगती पथावर सगळ्या...
भलेही सोयीनुसार सोडा
उद्याही मला वा-यावर.
पण मी प्रेम केलेलं
लेकरांसारखं सा-यांवर.
आज माझी जयंती
उद्या माझ्या लेकी वाड्यांवर!
परवा ऐटीत खादी घालून
पुन्हा स्वारी गाड्यांवर!!
एक वाडा आमचाही होता
जिथे फुल्यांचा गंध वाहायचा.
प्रवाहाविरुद्ध पोहणा-या
जोडप्यांचा गर्वाने ग्रंथ लिहायचा!
भीड ठेवा जरा भिड्यांच्या
ऐतिहासिक त्या वाड्याची!
जिथुन झाली सुरवात
शिक्षणाच्या पाढ्याची!
भलेही कमीच पण
साथीदार सच्चे होते.
म्हणूनच गवसणी घातली आम्ही
समाजसेवेच्या कड्यांना.
कारण बांगड्या ना चढल्या तेव्हा
लहुजींसारख्या गड्यांना....
तो काळ गर्द होता
काळोख दाट होते.
पण ज्योतीही मर्द होता
जाणे पहाट होते.
निर्धार पक्का होता
तिरस्कारास पुरस्कार मानायचे!
त्यांच्या अंडी चिखलाला
आपण फुले मानायचे!!
पण नव्हते झेलले शेण मी
माझ्या नऊवारी साडीवर.
की नटावे ठुमकावे तुम्ही
ऐटीत तुमच्या माडीवर!
ज्ञान रोपटे मी लावलेले
सेंद्रिय खताच्या मातीत.
की व्हावी पैदास सावित्रींची
अज्ञानी अबला जातीत...
थुकले ते माझ्यावर
माझ्या मोरपंखी शालुवर.
अगं सोडा साज अन शृंगार तो
उतरा आता रस्त्यांवर.
करा पकड मजबूत तुम्ही
क्रांतीच्या त्या मशालींवर...
केवळ साक्षरच नाही
तर गुणवंतही व्हा.
इंजिनिअर डॉक्टरच नाही
तर माझा 'यशवंत' ही व्हा.
धरती व्यापा सारी
सारे आकाश व्यापा
लज्जित जाहलेले मी
माझी लाज राखा....
एक ध्यानात ठेवा..
मीही सावित्री होते.
सावित्री तीही होती
तुमचे कुणाशी नाते?
ती खास स्वर्गद्वारी
मज खास गर्भधारी!
रक्ताचे ना मज कुणी
तरी असंख्य मज नाती!
ज्योतीत मी होते
माझ्यात होते ज्योती!!....
बाळासाहेब धुमाळ
3 जाने 2021
मो. 9421863725.
No comments:
Post a Comment