Thursday 29 July 2021

जागृत मतदार...



जागृत मतदार...
वाचक भावा-बहीणींनो, आपली माणुस म्हणून अडचण काय आहे माहितीये का? मला वाटतं, आपल्याला जे दाखवलं जातं, त्यावर आपण अंधपणे विश्वास ठेवतो, खासकरून आपण भारतीय तर जास्त विश्वास ठेवतो! अर्थात ही मानवी वृत्ती आहे, वैश्वक आहे परंतु त्यातही आपल्या भारतात अधिक आहे. तसं पाहीलं तर यात चुकीचं पण काहीही नाही कारण याच्या पाठीमागे शास्त्र आहे परंतु जेव्हा आधुनिक काळात, आधुनिक शासन व्यवस्थेत, स्वायत्त संस्थाच पुरावा व निकाल देतात तेव्हा? खासकरून न्यायव्यवस्था! तेव्हा तर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो ना? कारण आपली बुद्धी इथपर्यंतच चालते. आपल्याला आजवर इथपर्यंतचंच ज्ञान होतं.

परंतु आता राजकारणातल्या महत्त्वाकांक्षा इतक्‍या विस्तारल्या आहेत आणि राजकारण एवढ्या खालच्या आणि गलिच्छ पातळीला गेलेलं आहे की आता राजकारणात सत्तेसाठी काहीही केलं जाऊ शकतं! अगदी काहीही केलं जाऊ शकतं! काहीही व कुणालाही खरेदी केलं जाऊ शकतं, ब्लॅक मेल केलं जाऊ शकतं, अमिष दाखवलं जाऊ शकतं, धमकावलं जाऊ शकतं किंवा मग संपवलं जाऊ शकतं! यामुळेच आपल्या देशातल्या बुद्धीवाद्यांचं मतदानाचं प्रमाण फार कमी झालं आहे. बुद्धिवादी लोक, सुशिक्षित लोक, नोकरदार लोक, उच्च वर्गातले लोक मतदान फार कमी करतात कारण त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास संपलेला आहे, त्यांना ही सर्व शाळा कळलेली आहे. परिणामी राजकीय उमेदवार लोक हे सर्वसामान्य, गोरगरीब, व्यसनी लोकांना निवडणूकी दिवशी उचलून आणतात, एक दिवस मानसन्मान देतात, त्यांच्यावर खर्च करतात, "देशीप्रेम" दाखवतात!

दुर्दैवाची दुसरी गोष्ट म्हणजे, बुद्धीवादी जे सांगतात ते इतर लोक ऐकत नाहीत, काल परवा पर्यंत शिकलेल्या, अभ्यासू, बुद्धीवादी, तत्वज्ञानी, चिंतनशील, साहित्यिक लोकांना समाजामध्ये महत्व होतं. त्यांची नाही तरी त्यांच्या बुद्धीची, त्यांच्या मतांची, त्यांच्या मांडणीची आणि त्यांच्या दूरदृष्टीची किंमत केली जायची. परंतु आता चतुर, स्वार्थी राजकारणी लोक, बुद्धीवाद्यांनाच मुर्खात काढत आहेत! त्यांना अगदी देशद्रोही सुद्धा सिद्ध केलं जातंय! असो, विषय तो नाही,  काल-परवापर्यंत मिडीया स्टिंग ऑपरेशन्स करायचा,  सत्य लोकांपर्यंत आणून पोचवायचा. मात्र आता मिडीयाचे रूपांतर हाऊसेस मध्ये झाले आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ व्यवसायिकांनी काबीज केला आहे, परिणामी संपादक व पत्रकार गुलाम बनलेले आहेत.

 त्यामुळे राफाईल असो, नोटबंदी असो, एखादे हायप्रोफाईल हत्याकांड असो, शेतकरी विरोधी कायदे असोत किंवा पेगासीस मालवेअर असो.. यांना जनसमर्थन मिळताना दिसत नाही. आपल्याकडे जनसमर्थन कोणत्या मुद्द्यांना मिळतं? जात-धर्म, आरक्षण या मुद्द्यांना! काही लोकांचं मत असतं की आमच्यासाठी पहिले मुद्देही महत्त्वाचे नाहीत आणि दुसरे मुद्देही महत्त्वाचे नाहीत! आम्हाला पाहिजेत आमच्या नागरी सोयीसुविधा. यामध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, लाईट, पाणी, सुरक्षितता, रोजगार इत्यादी! हे अगदी बरोबर आहे परंतु जेव्हा यंत्रणाच पोखरलेली असते, जेव्हा व्यवस्थाच चुकीच्या पद्धतीने काम करत असतात, जेव्हा लोकशाहीचे सर्व स्तंभ ढासळलेले असतात तेव्हा आपण ही अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला व्यक्तीशः वाटतं! म्हणजे हे असं आहे की थेंबाथेंबाने कमवायचं आणि ओंजळीने गमवायचं! जर या देशांमधली लोकशाहीच पारदर्शक नाही राहिली, स्वायत्त संस्थाच पारदर्शक नाही राहील्या, न्यायव्यवस्थाच पारदर्शक नाही राहिली, प्रसारमाध्यमेच पारदर्शक नाही राहिली, सभागृहे व कार्यकारी मंडळेच पारदर्शक नाही राहिली तरी या आपल्या अपेक्षा पूर्ण होणार कशा?

 आपण हे विसरता कामा नये की गांधीजी आणि नेहरू हे सुद्धा परस्पर विरोधी विचारांचे होते परंतु समान उद्देशासाठी ते एकत्र आले! गांधीजी आणि आंबेडकर हे सुद्धा परस्पर विरोधी विचारधारेचे होते परंतु देशासाठी ते एकत्र येऊन काम करत होते आणि जर मला विचाराल की आजवरचं देशातलं सर्वात चांगलं मंत्रिमंडळ कुठलं होतं? तर ते होतं पहीलं, अगदी पहिल मंत्रीमंडळ! कारण त्यात सर्वच विचारधारेचे व वर्गाचे लोक होते. सर्वांच्या कल्पना विचारात घेतल्या गेल्या होत्या. अगदी काल-परवापर्यंत त्या घेतल्या जात होत्या परंतु आता तसे होत नाहीये! तेव्हा राजकारणात समाजकारण जास्त होते आणि समाजकारणात आणि राजकारणात दोन्हीतही नैतिकता पायाभूत होती, जी आता नाही. मनमानी, दडपशाही, दादागिरी तर आहेच परंतु आता हाताशी बाळगलेल्या बड्या उद्योजकांच्या  परस्पर सहकार्यामुळे राजकीय पक्षांकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे जाहिरातबाजी, शोबाजी, देखावे, सादरीकरण, तंत्रज्ञान यापुढे सर्वसामान्य माणूस भांबावून जातो आणि समजा याचीही मतदारांवर जादू नाही चालली तर जात-पात, देव-धर्म, मंदिर-मशीद, भाषा-प्रदेश, नक्षलवाद-आतंकवाद किंवा मग पुलवामा आणि बालाकोट हे मुद्दे असतातच! त्यामुळे आता नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपण अधिक जागृत होण्याची वेळ आलेली आहे.

बाळासाहेब (बालाजी) धुमाळ
मो. 9421863725.

Thursday 22 July 2021

ओबीसींची जनगणना म्हणजे "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला"

 

"ओबीसींची जनगणना म्हणजे "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला".... बाळासाहेब धुमाळ.


 ब्रिटीश सरकारने 1931 मध्ये केलेल्या जातनिहाय जनगणनेनंतर झालेल्या पहील्या वहील्या 2011 ते 2015 या कालावधीत झालेल्या जातनिहाय जनगणनेसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपये खर्च झाले!! तिची आकडेवारी तर समोर आलीच नाही परंतु चुका मात्र समोर आल्या! म्हणे त्यात तब्बल नऊ कोटी चुका सापडल्या!! आणि आता तर 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना होणारही नाही!! केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची होणार आहे अशी माहिती समोर येतेय!


काय कमाल आहे? आपल्याकडे भटक्या कुत्र्यांची, मोकाट गाईंची आणि इतर पशु-पक्ष्यांची अधिकृत शासकीय गणना होते परंतु स्वातंत्र्याच्या तब्बल पाऊण शतकानंतरही ओबीसींची गणना होत नाही ! हसावं की रडावं हेच कळत नाही! ओबीसींच्या सर्व प्रश्नांची कारणे आणि सर्व प्रश्नांचे समाधान जातनिहाय जनगणनेत आहे. जातनिहाय जनगणनेमुळे अधिकृत आकडेवारी समोर येईल व ओबीसींचे प्रश्न सोडवणे सोपे होईल. परंतु त्यामुळे राजकारण्यांचे भिंग फुटेल! ओबीसी सर्वच क्षेत्रांमध्ये मागासलेले, पिछाडीवर आहेत, लोकसंख्येच्या प्रमाणात नाहीत हे समोर येईल, सिद्ध होईल आणि म्हणून जाणीवपूर्वक ती केली जात नाही हे समजायला फार बुद्धीमत्तेची गरज नाही. सरकारला ती करायचीच नाही! अगदी जाणिवपूर्वक! कारण एकतर बाप दाखवावा लागेल, नाहीतर श्राद्ध घालावे लागेल!


प्रतिनिधित्वाची आणि परिस्थीतीची वास्तव आकडेवारी समोर आली की ओबीसी जागा होईल. अधिकार,  प्रतिनिधित्व आणि आपला लोकसंख्येप्रमाणे विविध क्षेत्रातील हिस्सा वाटा तो मागेल. आपण त्यांना आजवर फसवले आहे, याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना आहे. विशेष म्हणजे देशातील एकही राजकीय पक्ष ओबीसींच्या हिताचा नाही. ते फक्त ओबीसींना वापरत आहेत! नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एक बातमी वारंवार मिडीया मधून दाखवली जातेय की, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 27 ओबीसी मंत्री आहेत! मला वाटते यात विशेष काहीच नाही. मुळात ते 39 असायला हवेत! 78 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात 39 ओबीसी मंत्री असायला हवेत कारण देशामध्ये ओबीसींची संख्या पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. मुळात लोकसभेच्या विद्यमान 540 खासदारांपैकी किमान 270 व राज्यसभेच्या विद्यमान 245 खासदारांपैकी किमान 123 सदस्य खासदार ओबीसी असायला हवेत. परंतु अल्पसंतुष्ट ओबीसींना हे कोणी समजून सांगावे मिळते हेच नशीब अशी भिकारी वृत्ती जोपासणाऱ्या ओबीसींना 27 मंत्री देखील खूप जास्त वाटतात! अर्थात हे मंत्री किंवा लोकप्रतिनिधी समाजाच्या प्रश्नांवर बोलतात किंवा नाही? समाजाच्या समस्या सोडवतात किंवा नाही? हा पुन्हा संशोधनाचा विषय!


 प्रस्थापित राजकारण्यांना ओबीसी हे केवळ गुलाल उधळण्यासाठी, घोषणा देण्यासाठी, झेंडे मिरविण्यासाठी आणि सतरंज्या उचलण्यासाठीच हवे आहेत! जाती श्रेष्ठत्वाचा आणि धर्म श्रेष्ठत्वाचा अतिरिक्त डोस दिला की,  ओबीसींना त्यांच्या प्रश्नांचा विसर पडतो, त्यांच्या अवस्थेचा विसर पडतो! हे या धुर्त राजकारण्यांना चांगले ठाऊक आहे. यांना ओबीसी नेते नको आहेत केवळ कार्यकर्ते हवे आहेत आणि म्हणून ते तेच करतात! परंतु दुर्दैवाने हे ओबीसींच्या मात्र लक्षात येत नाही.


 मला कळत नाही, सरकारला जर ओबीसींची जातनिहाय जनगणना करायला अडचणच काय आहे? पैसा जनतेचा, जनगणना करणारी यंत्रणा सरकारी अर्थात जनतेची! मग अडचण काय आहे? आणि जर सरकारला ती करायचीच नसेल तर देशभरातील संपुर्ण ओबीसी लोक संपूर्ण जनगणनेवर, निवडणूक व मतदान प्रक्रियेवर ओबीसी बहिष्कार का टाकत नसतील? रस्त्यांवर का उतरत नसतील? *"ओबीसींना राजकारण, शिक्षण, नोक-या, बजेट या सर्व क्षेत्रांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात घटनात्मक आरक्षण मिळणे हा ओबीसींचा अधिकार आहे."* ओबीसींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरू कॅबिनेटमधून आपल्या कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि अजूनही ओबीसींना न्याय मिळत नाही! ओबीसींना साधारणपणे 50 % आरक्षण आणि एससी एसटींना 22.5 % आरक्षण अशा पद्धतीने साधारणपणे 75 % आरक्षण देशात असलेच पाहिजे आणि त्यासाठी घटनादुरुस्ती करून आरक्षण मर्यादा उठविण्याची वेळ आली वेळ आली तरी ती केलीच पाहिजे. सवर्णांच्या 10% आरक्षणासाठी घटना दुरुस्ती होऊ शकते तर मग ओबीसींच्या सेंट पर्सेंट रिझर्वेशनसाठी घटनादुरुस्ती का होऊ शकत नाही? पण मुळात ओबीसीच या विषयावर गंभीर नाहीत, निद्रिस्त आहेत, गटातटात, जाती जातीत, पंथापंथात विभागलेले आहेत! राजकीय पक्ष आणि धार्मिक नेते ओबीसींना सुधरू देत नाहीत. आता निदान ओबीसी समाजाने स्वतःहून तरी सुधारायला हवे, असे मला वाटते.


बाळासाहेब धुमाळ

मो. 9421863725