Thursday, 31 December 2015

धन्यवाद 2015 सुस्वागतम 2016

नमस्कार मित्रांनो 🙏
मी आपला मित्र बी. एस. धुमाळ सरत्या वर्षाला सीऑफ व नव्या वर्षाला हाय हॅलो वेलकम करताना नेहमी प्रमाणे अकारण अशांत आहे. नित्यनेमाने नवा दिवस उजाडत असताना दिवसामागून दिवस ढळतही आहेत. नव्या सकाळचे स्वागत करत असताना  आयुष्याच्या कोठ्यातील किती दिवस संपले? ? याचे अनामिक दुःख प्रत्येकालाच वाटत असते. मी म्हणेन दुःख करू नये पण याची जाणीव असावी की किती संपले व साधारणपणे किती शिल्लक आहेत. हा हिशेब असला म्हणजे स्वप्नांची गोळाबेरीज करता येईल. शेवटी स्वप्ने ती स्वप्नेच! ती सर्वच पुर्ण कधीच होत नाहीत पण त्यांच्या शिवाय जीवनात मजा नाही.  जीवनातून स्वप्ने वजा केली की उरते ती केवळ झोप!
शुभेच्छा दिल्याने चांगला व न दिल्याने वाईट दिवस उगवत नाही. प्रत्येकाला आपल्या कामाचे फळ मिळत असते.
पण आपल्या चांगल्या दिवसांची अपेक्षा करणारे व त्यासाठी शुभेच्छा देणारे कोणी असेल तर बळ वाढते व जोमाने प्रयत्न वाढतात.  त्यासाठी हा शुभेच्छा प्रपंच असतो. पण हे ही लक्षात घ्यायला हवे की मागील वर्षीही शुभेच्छा दिल्याच होत्या ना कोणीतरी? ?? मग सर्व चांगलेच झाले का? ? तर नक्कीच नाही!  पण उदास व्हायचे नाही , मानले तर सुख असते.  शेवटी दुःखासोबत माणसाचे निरंतर नाते असते. सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे.  अर्थात ते असावे देखील कारण अंधारच नसेल तर प्रकाश किरणांचे मोल तरी कसे उमजेल?  पण सुफळ पदरी पडावे यासाठी सुमार्ग, सुसंगती व सदाचरणासह अखंड कष्ट आवश्यक असते.
नवीन वर्षाचे स्वागत करत असताना सरत्या वर्षांतील चांगले व वाईट दोन्हीही अनुभव कामी येणार आहेत.  चांगल्यातून आत्मविश्वास आणि प्रेरणा व वाईटातून धडा घेतला तर नवीन वर्ष नक्की आनंदाचे व  सुखासमाधानाचे जाईल. अनेक प्रियजन आपल्यातून गेले. कोणाच्या जाण्याने जरी जीवन थांबत वा संपत नसले तरी त्यांची कमतरता मात्र प्रकर्षाने जाणवत असते. हे मन असल्याचे लक्षण  सर्वात दिसायला हवे. गेलेल्यांच्या पवित्र स्मृती स्मरणात ठेवून त्यांना आदर्श मानून  जीवन प्रवास करत राहणे हेच शहाण्याचे लक्षण. .
शेवटी माझ्या सर्व भावकियांना, पाहूण्यांना, सहका-यांना, शेजा-यांना,  मित्रांना, शत्रूंना, सर्व परिचितांना व अपरिचितांना हे नवे वर्ष चांगले जावो. चांगले म्हणजे,  जेथे आरोग्य, स्वच्छता, शांतता, आपलेपणा, प्रेम, माया, दया, करूणा, मोठेपणा, क्षमा , नैतिकता, प्रमाणिकता आहे असे. प्रगती, प्रतिष्ठा,  समाधान, आनंद आहे असे वर्ष आपणास जावो ही प्रार्थना. पण....
समजा नसेलच जाणार तर?? तर येणाऱ्या सर्व संकटांशी दोन हात करण्याचे सामर्थ्य आपणात येवो हीच आदिशक्तीकडे प्रार्थना. खरेतर प्रत्येक क्षण हा नवा अनुभव देत असतो व अनुभवातून माणुस तावून सुलाखून एखाद्या धारदार व टोकदार शस्त्राप्रमाणे तयार होत असतो. हेच अनुभव पुढे जीवन समृद्ध संपन्न व यशस्वी बनविण्यात मदतगार सिद्ध होत असतात.
नव्या वर्षात आपला समाज, धर्म, देश प्रगत व संपन्न बनो. त्यासाठी माझे तुमचे योगदान लाभो. शेवटी "देह मंदिर चित्त मंदिर,  एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना,  सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.
नुतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

No comments: