Tuesday, 15 March 2016

बाळासाहेब जालिंदर जाधव

"बाळासाहेब जालिंदर जाधव" अत्यंत गरिब,  ग्रामीण, भटक्या जामातीमधील गोंधळी जामातीमध्ये पारगाव मोटे ता. भूम जि. उस्मानाबाद येथे जन्मलेले.
वडील, सरदार जालिंदर रामा जाधव सुप्रसिद्ध गोंधळी कलावंत होते पण आपल्या सहा अपत्यांचे पोट कसेबसे भरेल एवढेच उतपन्न कलेतून मिळे. रात्री पारंपारिक गोंधळाबरोबरच दिवसा भिक्षा मागावी लागे.  त्यासाठी मुलांना सोबत नेत.  शाळेत हजेरी पटावर नाव होते एवढाच मुले  'शिकत आहेत'  याचा अर्थ !!!  वास्तविक पाहता वर्षांतील किमान तीन चार महीणेही त्यांना शिक्षण घेता यायचे नाही. अथवा सलग आठवडाभर  शाळेत जाता यायचे नाही.  रात्रभर जागरण करून सकाळी अनेक मैल पायी चालून परिक्षा गाठायची व कसबसे पास होऊन वर्ग बदलायचा. जरी शिक्षणाची आवड होती व बुद्धीही होती,  तरी शैक्षणिक वातावरणाचा आणि वेळेचा अभाव यामुळे दहावीला अनुत्तीर्ण व्हावे लागले.  मात्र खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करून पुरवणी परीक्षा देऊन उतीर्ण झाले.  ताबडतोब कमाई सुरू व्हावी व कुटूंबाला आपला आधार मिळावा म्हणून, आय. टी. आय.  चा वेल्डरचा कोर्स केला व औरंगाबाद येथे बजाज कंपनीत रूजू झाले. मात्र तुटपुंजा पगार व काहीतरी करून दाखविण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हते. 1990 च्या दरम्यान औरंगाबाद कारागृह विभागात तुरूंग रक्षक भरती निघाली. काम करत करत भरतीत उतरून प्रचंड मेहनत घेऊन भरती झाले. कसून सराव करून प्रशिक्षण पुर्ण केले व सेवेत रूजू झाले.
कारागृह रक्षक म्हणून कारागृह सेवेत रुजू झाल्यानंतर पुढे सेवांतर्गत शिक्षण घेत पदवीधर झाले! !!
अभ्यास करून खात्यांतर्गत परिक्षा देऊन तुरूंगाधिकारी झाले! !! अनेक वेळा कबड्डी,  व्हाॅलीबाॅल संघाचे कर्णधार म्हणून आपल्या विभागाच्या संघाचे नेतृत्व केले व संघाला एकतर्फी विजय मिळवून दिले. 2002 मध्ये चेन्नई तामिळनाडू येथे,  2007 मध्ये अहमदाबाद गुजरात येथे, 2010 मध्ये ओरीसा मध्ये, 2012 हैद्राबाद आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी स्पर्धा व कर्तव्य मेळावा या  राष्ट्रीय स्पर्धेत खेळल्यानंतर आता आज पुन्हा 2016 च्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी क्रिडा स्पर्धा व कर्तव्य मेळाव्यासाठी  तब्बल पाचव्यांदा हैद्राबाद,  तेलंगणा या ठिकाणी वयाच्या  पंन्नासाव्या वर्षी महाराष्ट्र व्हाॅलीबाॅल संघाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या संघासोबत रवाना होत आहेत. 2007 सालच्या अहमदाबाद गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे सध्याचे  पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी गौरव केला! !!
बाळासाहेब जाधव केवळ तुरूंगाधिकारी नाहीत तर एक उत्कृष्ट खेळाडू व एक उत्कृष्ट संबळवादकही आहेत.  पारंपारिक गोंधळी कलेबरोबरच भजनातही त्यांना विशेष रूची आहे.अत्यंत गोड स्वभावाचे बाळासाहेब जाधव तितकेच चारित्र्यसंपन्नही आहेत. शासकीय अथवा कलेच्या  व्यासपिठावरून ते नहमी निर्व्यसनी राहण्यासाठी तरूणांना प्रेरित करतात. एक निर्व्यसनी, तंदुरूस्त, कला क्रिडागूण संपन्न व नम्र पण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महाराष्ट्र कारागृह प्रशासनामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अजमल कसाब सारखा कुप्रसिद्ध दहशतवादी हाताळण्यासाठी प्रशासनाने त्यांची विशेष निवड केली होती.  तुरूंगाधिकारी असले तरी प्रसंगी कारागृह अधिक्षकाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. वेळ प्रसंगी कारागृहातील औषधोपचार विभाग असा सांभाळतात की पाहणा-याला वाटावे हे डाॅक्टरच आहेत!  सेवापुर्व शिक्षण कमी होते तरी सेवांतर्गत शिक्षण घेऊन इंग्रजी,  संगणक,  सोशल मिडिया अशांसारख्या आवश्यक बाबींचे त्यांनी ज्ञान संपादन केले. जे येत नाही ते शिकण्याची त्यांची धडपड तरूणांनाही अचंबित करते.  शिक्षणाचे महत्व जाणणा-या बाळासाहेब जाधवांनी आपल्या तिन्ही मुलांना इंजिनिअर बनवले. मित्रांमध्ये बाळासाहेब म्हणुन ओळखले जाणारे साहेब समाजात आदराने "आण्णा" या टोपण नावानेही ओळखले जातात. आपल्या यशाचे श्रेय ते आपले वडील दिवंगत जालिंदर रामा जाधव व आपले वडीलबंधू  संभाजी जाधव यांना देतात. अशा या  हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचे कौतुक करायला मला गर्व वाटतो.  अशांचा आदर्श तरूण पिढीने घेतला तर आपला गोंधळी समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचल्या शिवाय राहणार नाही. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 💐💐

शब्दांकन: बालासाहेब सिताराम (बी. एस.) धुमाळ 🙏

No comments: