Wednesday 23 March 2016

मापदंड जात विकासाचे Measures of Cast Progress

मापदंड जात विकासाचे
Measures of Cast Progress
कोणत्याही जातीच्या विकासाचे काही मापदंड असतात ते तीने पूर्ण केले म्हणजे ती जात विकसीत जात आहे असे समजले जाते. जी जात शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे, जीचे युवक युवती उच्च शिक्षण घेवून बाहेर पडतात. उच्च शिक्षण म्हणजे केवळ बी.ए. एम.ए नव्हे तर CET, AIEEE, JEE, CAT,SET, NET, GATE, MPSC, UPSC अशा परिक्षा उत्तीर्ण होऊन ज्या समाजातील विद्यार्थी आधिकारी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, तंत्रज्ञ, सीए, सी एस, शासकीय कर्मचारी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या (MNS), सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSU), खाजगी क्षेत्रातील नामांकीत कंपन्या, विमा क्षेत्र, सरंक्षण व संशोधन क्षेत्र, रचना व व्यवस्थापन क्षेत्र तसेच कला, साहित्य क्रिडा, पत्रकारिता, व्यापार, व्यवसाय, उद्योग इ. क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळवून आपल्या कार्याचा ठसा उमटवतात त्या जातीला शैक्षणिक दृष्टया प्रगत जात असे संबोधले जाते. अशी बुध्दिवादी व उच्च शिक्षीत जात सहसा चिडत नाही, हिंसक बनत नाही व प्रश्नाचे उत्तर कृतीतून देतो.
      आर्थिक दृष्टया प्रगत जात कशी असते हे सांगण्याची आवश्यकता आहे काय? ज्या जातीतील लोकांकडे पैश्याची चंगळ असते, पैसा नियमित येत असतो, ज्यांची बाजारात पत असते, ज्यांच्या जगण्याचा स्तर उंच असतो (High Living Standard) ज्यांच्याकडे भव्य घरे, गाडया, दागदागिने, कपडेलत्ते, प्रवास, पर्यटन आदिंवर खर्च करण्यासाठी मुबलक पैसा असतो शिवाय ज्यांची मोठया प्रमाणात स्थावर मालमत्ता असते, ज्या जातीतील लोक बेरोजगार नाहीत व ज्या जातीचे दरडोई उत्पन्न अधिक असते, त्या जातीस आर्थिक दृष्टया प्रगत जात असे म्हटले जाते.
      आता जीवणाचे व जगाचे वास्तव विचारात घ्यायला हवे की, वरीलप्रमाणे जी जात आर्थिक व शैक्षणिक दृष्टया प्रगत असते त्या जातीचा सामाजिक विकास आपोआप होतो. सामाजिक विकासाचे विश्लेषण करताना असे म्हटले जाते की, ज्यांना समाजात प्रतिष्ठा असते, ज्यांच्यावर अन्याय होत नाही, ज्यांना प्रत्येक उपक्रमात सन्मानपूर्वक सहभागी करुन घेतले जाते, ज्यांच्या शब्दाची किंमत केली जाते अश्या जातीला सामाजिक दृष्टया प्रगत जात म्हटले जाते.
      असा विकास मोजताना जातीतील लोकांचे वर्तन हा सर्वात महत्वाचा विषय ठरतो. जर आपले वर्तन सभ्य, सौम्य, नम्र, विवेकवादी व विचारशिल असेल (Rational) तर समाज त्यांना आपोआप प्रतिष्ठा देतो. ज्या जातीत कौटुंबिक भांडणे कमी असतात, घरात वृध्दांची व्यवस्थीत काळजी घेवून मान दिला जातो, आदर केला जातो, त्या जातीचा समाज अथवा जग आदर्श घेते.  ज्या जातीत स्त्रियांना बरोबरीचा दर्जा दिला जातो, आपल्या अपत्यांच्या भवितव्यासाठी संघर्ष केला जातो व अपत्ये देखील आपल्या माता पित्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतात, चारित्रय संभाळतात अश्या जातीचा जग आपोआप आदर करते नव्हे तो करावाच लागतो.
      ज्या जातीतील स्त्री-पुरुष चारित्रयहीन असतात, ज्या जातीतील लोकात कर्जबुडवेपणा, फसवेगिरी, चो-या, दरोडे, मारामा-या, खुन, अपहरण, बलात्कार इत्यांदी सारखे गुन्हेगारी वर्तन असते. जी जात व्यसनी असते अशी जात उर्वरित जगाकडून मानापानाची हकदार असत नाही व परिणामी अशा जातीचा सामाजिक विकासाचा विकास होताना आढळत नाही.
आता राहिला प्रश्न राजकीय विकासाचा, तर वरीलप्रमाणे विकासाचे मापदंड पूर्ण करणा-या जातीचा राजकीय विकास आपोआपच होतो. राजकीय पक्षांना व पुढा-यांना अशाच वर्गाची गरज असते. मग निवडूकांमध्ये संधी मिळवून व विजयी होवून विविध स्तरांवरील सभागृहांमध्ये त्या जातीचा आवाज पोहोचतो. मग आपल्या जातीने अथवा आपल्या समाजाने वरील मापदंड पूर्ण केले आहेत का? तर उत्तर आहे “पूर्णपणे नाही.” ज्यांनी पूर्ण केले ते प्रगत आहेत व ज्यांनी पूर्ण नाही केले ते अप्रगत आहेत.
      आपण कलाकार मंडळी आहोत आणि कलेचा विकास हा गोंधळी जातीच्या विकासाचा महत्वाचा मापदंड आहे मात्र तो विषय विसस्तृत व महत्वाचा असल्याने त्यावर सखोल चर्चा व्हावी असे वाटते. आता आपण असे म्हणाल हे काय आम्हाला माहित नाही काय? विकसीत समाज कशाला म्हणतात याची आम्हाला कल्पना नाही का? मित्रांनो इथेच खरी ग्यानबाची मेख आहे. कळतंय पण वळतं नाही अशी अवस्था आहे. मग माझ्यासारख्या एखादया समाजाविषयी तळमळ असणा-या व्यक्तीने एवढा काथ्याकुट करुन वा शब्दांचे गुराळ करुन काय फायदा? हे सर्व होणार कसे?
      मित्रांनो कोणत्याही देशातील अथवा राज्यातील देशाचा विकास करणे अथवा विकासास चालना देणे हे त्या त्या देशाच्या केंद्र व राज्यशासनाचे काम असते. आपल्या देशाच्या स्वातंत्रयांपासूनच आपल्या सारख्या अप्रगत जातींचा विकास व्हावा यासाठी सरकारे प्रयत्न करत आहेत. पण मला वाटते सरकारचा मुख्य हेतू अश्या अप्रगत जातींना मुख्य प्रवाहात आणणे ऐवढाच असतो. शासनाचा हा हेतु तत्वता पूर्ण झाला आहे असे मान्य केले तरी शंकेलाही वाव आहे. सरकार आपला विकास करु ईच्छित नसेल अथवा करु शकत नसेल तर अशा वेळी जातीने पुढाकार घ्यायला हवा. आता हेच पाहाणा दुष्काळ निवारणासाठी सरकार प्रयत्ना करुन थकले पण समस्या जैसे थेच आहेत. म्हणून “नाम” सारख्या सेवाभावी विविध संघटनांना पुढाकार घ्यावा लागला. अनेक लोक व लोकांचे गट पुढे आले. आपले ही तसेच आहे. विकासाच्या किमान पातळीपर्यंत आज आपण आहोत. काही आजार आहेतही पण अशा रुग्णांना डॉक्टरांकडे घेवून जाणे अथवा त्यांच्याकडे डॉक्टरांना घेवून येणे हे काम समाजविकासाची तळमळ असणा-या कार्यकत्यांनी करावे लागेल.
      तर आता आव्हान हे आहे की, गोंधळी जातीचा किमान विकास झाला आहे. विकसनशील जात म्हणायला हरकत नाही पण विकसित जात नाही आणि विकसित बनण्यासाठी काय करायला हवे? आपण विकसित जातीचे मापदंडही पाहिले आहेत. आता वस्तुस्थिती व अपेक्षितस्थितीची कल्पना आल्यानंतर स्वत:ला विकसित जात म्हणवून घेण्यासाठी वरील निकष पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी मला वाटते शैक्षणिक व आर्थिक सुधारांसाठीचे प्रयत्न एकाचवेळी (Simultaneously) करण्याची आवश्यकता आहे. कारण शैक्षणिक व आर्थिक विकास हे परस्परपुरक असतात. शैक्षणिक प्रगती असेल तर आर्थिक प्रगती होते आणि बरेचदा असेही पाहण्यास मिळते की, शिक्षण घेण्यातील महत्वाची अडचण आर्थिक स्थिती सबळ नसणे हीही असते. गरीबीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे  दोन्ही प्रश्नांची उत्तरे सोबतच शोधावी लागतील. आणि आता सुरु होतो तो महत्वाचा विषय की, कसे? हे कसे करता येईल? कारण कल्पना अनेक आहेत व अनेकांकडे आहेत पण जोवर कल्पनांना प्रत्यक्षात उतरवले जाणार नाही तोपर्यंत हा प्रपंच अनाठायीच !  (क्रमश:)
शब्दांकन: बालासाहेब सिताराम (बी. एस.) धुमाळ
मो. 9421863725  


         s

No comments: