Tuesday 15 March 2016

गोंधळी समाज व शिक्षण

अलिकडच्या काळात गोंधळी समाजाच्या सध्यस्थीतीचे अवलोकन करणाऱ्या माझ्यासारख्याला समाजामध्ये स्थितीबदलाचे वारे वाहत असल्याने अतिशय आनंद होत आहे.  तरूण बांधवांनी घेतलेला पुढाकार अनुभवी नेते मंडळींनाही मागे टाकत आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संघटन कौशल्याचा जोरावर युवापिढीने ब-यापैकी गती पकडली आहे.
पण नेत्यांची संख्या ज्या समाजात जास्त असते त्या समाजाच्या प्रगतीची शक्यता तशी कमीच असते. संघटनात्मक कार्यात साखळी फार महत्वाची असते. या साखळीत तरूण, अनुभवी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बुद्धीवादी लोकांची फार आवश्यकता असते आणि मग अशा सुसज्ज समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही.
गोंधळी समाजाच्या समस्या व त्यावरील उपाय हा अनेक वर्षांपासून न  सुटलेला प्रश्न आहे. मात्र राजकीय व सामाजिक स्थिती जैसेथेच आहे.  आर्थिक स्थिती सुधारली पण तीचे सार्वत्रिकीकरण झाले नाही.  पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या लक्षात एक गोष्ट सहज येते की ज्यांची स्थिती सुधारली आहे ती बहुधा त्यांनी  शिक्षणाचा मार्ग धरल्याने.
मित्रांनो गोंधळी समाजाच्या अनेक समस्या आहेत . पण सर्व समस्यांचे मुळ शिक्षणाच्या अभावात आहे.मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची गरज ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी असते. आपल्या जातीत शिक्षणाचा अभाव आहे, अनेकांनी तर शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. मुलींपेक्षा मुलांची स्थिती फारच  चिंताजनक आहे. याचे कारण लहान वयातच अर्थार्जनाची येऊन पडलेली जिम्मेदारी! बरे जे काही कमी लोक शिकतात त्यातील फार कमी उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडतात.  नोकरीमध्ये सर्वांना यावे वाटते, पण अभ्यास करण्याची आवड, पद्धत,  नियोजन माहीत नसते.
संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सर्व  शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती, दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये आणि क्षमता शिक्षण पुर्ण करते.
मग कलेतील प्रयोग करता येतात,  प्रसिद्धी मिळवता येते,  लेखन करता येते, न्याय मागता येतो.  शिक्षित संघटीत होतात व संघर्ष करतात.
मग आपोआप कौटूंबिक, आर्थिक,  सामाजिक, राजकीय प्रश्न मार्गी लागतात.  त्यासाठी सर्व गोंधळी भावाबहीनींनी शिक्षणाची कास धरायला हवी.  यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्थिती सुधारून दाखवलेल्या मंडळींचे कौतूक केले जावे व त्यांनी समाजातील विध्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन करून दिशादर्शन करावे.  जगदंबेच्या कृपेने आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर थोडा वाटा संघर्ष करणाऱ्या युवक युवतींना मदत करून खर्च करावा .
विविध दृष्टीनेते प्रगत लोक त्यांच्या प्रगतीचा मुलमंत्र देतीलच असे नाही. पण तो मुलमंत्र म्हणजे  "शिक्षण" हे समजल्यावरही जे समस्यांमधुन वाट काढत काही करू शकत नाहीत ते  इतरांना व शासनाला दोष देण्यात वेळ दवडतात. विविध मेळावे,  मोर्चे,  अधिवेशने जरी आवश्यक असले तरी कधी कधी हाही विचार व्हावा की  आजवर या सर्वाचा काय परिणाम झाला?  मागण्या करून करून मागायचीच सवय लागते. मागीतल्याशिवाय काही मिळत नाही हे जरी सत्य असले तरी शासन कोणालाही देत नाही.  जे संख्येने मोठे व एकसंघ असतात त्यांचाच  विचार केला जातो.
मागण्या अनेक आहेत, पण पुर्ण होत नाहीत,  होणारही नाहीत कदाचित .  जिथे भटक्या विमुक्त जाती जमाती या मोठ्या वर्गाच्या होत नाहीत तिथे फक्त गोंधळी जातीच्या काय होणार? ???
महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती जमातींना स्वतंत्र आरक्षण कोठा असला तरी अ, ब, क आणि ड आरक्षण  टक्केवारी पाहील्यावर अन्याय स्पष्ट दिसतो.
पण होते काय की, अशाच  प्रश्नांवर ब-याचदा लोकांना भुलथापा दिल्या जातात आणि लोक बळी पडतात.  त्यामुळे आपणच शहाणे व्हावे,  शिक्षणाची कास धरावी व संघटीत संघर्ष करून स्थिती बदलून दाखवावी.  संघटीत होण्याला पर्याय नाही. सध्या समन्वयाचे वारे जोराने वाहत आहे. समन्वय व्हायलाच हवा.  माणुस संघटीत असेल तर स्वतःला सुरक्षित समजतो.  एकमेकांच्या कल्पनांचे आदान प्रदान होते. माणुस हा समाजशिल प्राणी आहे. सुख दुखाःचे व्यवस्थापन समाजाशिवाय होत नाही.  पण काही तरी फायदा होणार आहे,  आम्ही तो करवून देऊ असे म्हणुन लोकांना आशेला लावण्याचा प्रकार घडतो. जी काही सुधारणा होते ती वैयक्तिक पातळीवर संघर्ष करणारांचीच होते.
मग आपण म्हणाल संघटना असुच नयेत का?  संघटनात्मक उपक्रमांची आवश्यकताच नाही का?? ? तर निशंकपणे 'आहे'. पण संघटनात्मक कार्याची दिशा थोडी बदलली जाणे आवश्यक आहे.  काय करता येईल ते माझ्या बुद्धीप्रमाणे क्रमशः व्यक्त करील.



शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ 🙏

No comments: