Monday 7 January 2019

जुळता जुळता जुळतंय की....

जुळता जुळता जुळतंय की....
                  मित्रांनो, आपल्या विमुक्त भटक्या समाजाच्या संघटनांनी, कार्यकर्त्यांनी एखाद्या विधायक कार्यक्रमासाठी तात्काळ तयार होणे, त्यात त्यांनी स्वतःला झोकून देणे हे अलीकडच्या काळामध्ये तसे सहसा पाहायला न मिळणारे चित्र!! परंतु कालचा रविवार भटक्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.....

             काल दिनांक 06 जानेवारी 2019 रोजी अकोला येथे सकल नाथपंथी समाज संघटना अकोला व विमुक्त भटक्या जाती जमाती संघटना अकोला यांची एक संयुक्त सहविचार सभा संपन्न झाली. सभेमध्ये संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेचा विषय होता "मिशन लेटर टू पीएम" मध्ये सहभाग नोंदवणे. त्या अनुषंगाने विविध संघटनांच्या लेटर हेडवरून तसेच वैयक्तिक अधिकाधिक पत्रे माननीय पंतप्रधानांना कसे पाठवायचे ? यावर सखोल चर्चा व विचार विनिमय झाला. त्यानुसार नियोजन करण्यात आले . जबाबदारी वाटून देण्यात आली. अनेकांनी ती स्वतःहून स्वीकारली. झेरॉक्स देणे, पाकिटे देणे, पत्ता लिहायला मदत करणे अशी कामे अनेकांनी स्वतःहून स्वीकारली. या आठवड्यात अधिकाधिक प्रत्यक्ष भेटी घेऊन, घरोघरी जाऊन समाजाला तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटून मिशन लेटर टू पीएम ची आवश्यकता पटवून देऊन त्यामध्ये सहभागी होण्याची विनंती करण्याचे ठरले.

                  बैठकीस सकल नाथपंथी समाज संघटनेचे राज्य सचिव श्री. मनोहर इंगळे, अकोला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्री. राजिवनाथ कासार, सचिव श्री. रविंद्र सुुरंंसे, विमुक्त भटक्या जाती जमाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश पेंढारी, शहराध्यक्ष व बीजेपी विमुक्त भटक्या जाती जमाती सेलचे शहर उपाध्यक्ष श्री. गजानन वाडेकर, सरचिटणीस श्री.पंढरी दोरकर, सचिव श्री. गणेश पाचपोर, श्री. देवानंद राठोड, प्रसिद्धी प्रमुख श्री. चंद्रकांत महाजन तसेच श्री. नरेश गहलोत, श्री. किशोर पवार, श्री. दिनेशनाथ पाठक इत्यादी अनेक कार्यकर्ते हजर होते.

                   कालच एका दुसऱ्या कार्यक्रमानेही सर्वांचे लक्ष आकर्षित केले. तो कार्यक्रम म्हणजे गोपाळ समाजहित महासंघ चाकण, राजगुरूनगर (खेड) पुणे जिल्हा आयोजित "समाज महामेळावा व पुरस्कार वितरण सोहळा". या महामेळाव्याचे अध्यक्ष होते, प्रगतशील व्यापारी श्री.दत्तात्रय चौगुले तर या महामेळाव्याचे उदघाटन झाले खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवसेनेचे मा.श्री. सुरेश भाऊ गोरे यांच्या हस्ते. कार्यक्रमास गोपाळ समाजहित महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली ज्यात राज्याध्यक्ष श्री.प्रभाकर तपासे, राज्य कार्याध्यक्ष श्री. संजय गव्हाणे, राज्य उपाध्यक्ष श्री.सुभाष गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष श्री.गोविंद गव्हाणे इत्यादींचा समावेश होता.
  

                   राज्यातील सर्व 52 विमुक्त भटक्या जमातींचे एक प्रभावी संघटन बनत चाललेल्या भटके विमुक्त हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. श्री. धनंजय ओंबासे, सचिव प्रा. श्री. सखाराम धुमाळ, युवा आघाडीचे सचिव श्री. प्रतिक गोसावी, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. भिमराव इंगोले, श्री. सुरेश शिंदे, अल्पसंख्यांक आघाडीचे श्री. येलान बरमावला, श्री. नयिम शेख, गोपाळ समाजाचे पदाधिकारी श्री. संजय गव्हाणे ही मंडळी मेळाव्यास खास मुंबईहुन आली होती.


                    मेळाव्यामध्ये समाजातील कर्तबगार समाज बांधवांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर समाजाचा इतिहास, वर्तमान व भविष्य, समाजासमोरील समस्या व आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना व कारवाई, त्यासाठीचे पुर्वनियोजन यावरही भाषणे करण्यात आली परंतु प्रामुख्याने इदाते आयोगाच्या अमलबजावणीच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय मिशन लेटर टु पीएम यावर विशेषत्वाने चर्चा झाली. उपस्थितांना भटके विमुक्त हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. श्री. धनंजय ओंबासे यांनी मिशन लेटर टु पीएम बद्दल मार्गदर्शन केले. आपल्या सर्व विमुक्त भटक्या जमातींनी हेवे- दावे, गट-तट, श्रेयवाद बाजूला ठेवून आपापल्या संघटनांच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून तसेच व्यक्तिशः या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले.

                        महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद सभागृहात गोपाळ समाजाचा एक तरी आमदार असावा अशी जोरदार मागणी झाली. त्यासाठी गोपाळ समाजाचा उमेदवार म्हणून वाशिम मधुन विधानसभेसाठी श्री. संजय गव्हाणे यांना निश्चित करण्यात आले.



 या महामेळाव्याला महीला व पुरूषांची अक्षरशः हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिसुन आली. या यशस्वी आयोजनासाठी गोपाळ समाजहित महासंघाच्या चाकण, राजगुरूनगर (खेड) पुणे जिल्हा यांचे व प्रदेशाध्यक्ष श्री. नंदकुमार पवार यांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो. एक आदर्श मेळावा घेऊन दाखविला या बद्दल मी व्यक्तिशः या सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो व आभारही व्यक्त करतो. इच्छा असुनही व पुण्यापासून जवळ असुनही बाहेरगावी गेल्यामुळे मी मेळाव्याला उपस्थित राहु शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 

               मला वाटते, हाच आदर्श इतर सर्व समाज संघटनांनी घेऊन आपापल्या स्तरावर बैठका घेऊन ,भेटीगाठी वाढवून मिशन लेटर टू पीएम मध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे. त्याचबरोबर सर्व संघटना, सर्व जमाती व सर्वपक्षीय नेत्यांचे अभ्यासकांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन माननीय राष्ट्रपती महोदयांची, माननीय पंतप्रधानांची, माननीय सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांची, माननीय रोहीणी आयोगाची, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या मंत्र्यांची, माननीय बीजेपी अध्यक्षांची, आपापल्या खासदारांची भेट घ्यावी. त्यासाठीचे नियोजन अशा बैठकांमधुन व मेळाव्यांमधुन करावे. ज्यांना-ज्यांना, जेथे-जेथे,  जे-जे शक्य असेल, त्यांनी-त्यांनी, तेथे-तेथे, ते-ते करावे. 

                  अलीकडच्या काळामध्ये मी काही जातीय संघटनांचे, काही कार्यक्रम पाहीले. जिथे तेच तेच जुने विषय घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. खरे तर हे नेहमीच होत आले आहे आजवर, परंतु अजून तरी याचा काहीही उपयोग झालेला नाही. भाषणे, स्वागत, सत्कार, कार्यकारिणी गठन, पुरस्कार, फोटो शेशन, खानपान आणि बातम्या... झाले!! परंतु खऱ्या अर्थाने समाजाचे प्रश्न सोडवू शकतील अशा मुद्द्यांवर किंवा अशा उपायांच्या नियोजनावर चर्चा होत नाही. नियोजन झाले तरी त्यावर कार्यवाही होत नाही. सर्वांकडून समर्थन दिले जात नाही. सहकार्य केले जात नाही. त्यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला जात नाही. केवळ समाजाच्या बैठका बोलून मेळावे घेऊन समाजाचे काही भले होणार नाही.  त्यामुळे मला वाटते, पुढच्या काळामध्ये होणाऱ्या बैठका, मेळावे यांमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती ठरविली जावी परंतु मागणी एकच असावी, ती म्हणजे इदाते आयोगाची अंमलबजावणी किंवा रोहिणी कमिशनची अमलबजावणी. हेच विषय समोर ठेवून त्या दृष्टीने रणनीती ठरवली गेली पाहिजे.थोड्या वेळासाठी प्रसिद्धी ,श्रेय, संघटना, समाज बाजूला ठेवून सर्व 52 जमातींनी जर एकजुटीने प्रयत्न केले तर इदाते आयोगाची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल. किमान त्यावर अधिकृत भाष्य तरी करावे लागेल. आजवर ज्या ज्या संघटनांनी व वैयक्तिक समाज बांधवांनी मिशन लेटर टू पीएम मध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आपण हे दाखवून दिले की ठरवले म्हणजे होते. इच्छा असेल तर काहीही केले जाऊ शकते. जुळता जुळता जुळू शकते......!  धन्यवाद. #Letter_To_PM.

आपलाः
बाळासाहेब धुमाळ
मो. 9421863725.

No comments: