Friday, 18 January 2019

महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा प्रथम वर्धापन दिन

महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा,  समाजाची उत्फूर्त उपस्थिती....
 नवे भदाणे, ता. साक्री जि. धुळे
दि. 17.01.2019.

भटके-विमुक्त मित्रांनो नमस्कार....
मित्रांनो आपल्या सामाजिक एकजुटीचा, समाज जागृतीचा आणि समाजाला न्याय मिळवून देणे हेच अंतिम ध्येय असलेल्या भटके विमुक्त हक्क परिषदेचा या ध्येयाच्या वाटेवरील सहप्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक जोमात होत आहे. ऊर्जेने मार्गक्रमण करीत असताना आनंदाने सांगावेसे वाटते की हक्क परिषदेसोबत भटक्या विमुक्तांच्या विविध संघटना खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत.

काल दिनांक 17 जानेवारी 2019 गुरुवार रोजी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा प्रथम वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने भटाई देवी मंदिर, नवे भदाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथे महासंघाचा प्रथम वर्धापन उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन साक्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे मा. श्री. डी. एस. आहिरे यांनी दिप प्रज्वलन करून तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे घोंगडी देऊन स्वागत करण्यात आले.


{वर्धापनदिनाची क्षणचित्रे पहाण्यासाठी येथे क्लिक करा}👇
https://youtu.be/EKJNZPy_d6c

{हक्क परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष मा. श्री. पुरूषोत्तम काळे सरांचे भाषण ऐकण्या-पाहण्यासाठी येथे क्लिक करा}👇
https://youtu.be/HtQhZCjfwBE

कार्यक्रमास उद्घाटक आमदार मा. डी. एस. अहिरे यांचे सोबतच शिवसेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष मा. हिलाल अण्णा माळी, धुळे मनपा चे माजी स्थायी समिती सभापती मा. श्री. सतीश तात्या महाले भटके विमुक्त हक्क परिषदेचे विभागीय अध्यक्ष श्री पुरुषोत्तम काळे  प्रदेश संघटक श्री साहेबराव गोसावी विभागीय संघटक श्री अशोक गिरी महाराज जिल्हा संघटक प्रकाश रामोळे  यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवय राज्याचे रोजगार हमी योजना तथा पर्यटन मंत्री आणि नंदुरबारचे  पालकमंत्री मा. ना. जयकुमार भाऊ रावल यांनीही कार्यक्रमास  पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलताना व्यासपिठावरील सर्वच मान्यवर वक्त्यांनी भटक्या विमुक्त जमातींची परिस्थिती खरोखरच बिकट असल्याचे, त्यासाठी विशेष उपाय योजना केली जाण्याची आवश्यकता असल्याचे बोलून दाखविले. तसेच भटके-विमुक्तांच्या या न्याय्य लढ्यामध्ये त्यांचे संपूर्ण सहकार्य राहील अशीही त्यांनी ग्वाही दिली.

आमदार मा. श्री. डी. एस. अहिरे यांनी इदाते आयोगाच्या अंमलबजावणीमध्ये आपण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आपली चोख भूमिका बजावू व सरकारवर आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दबाव आणू असेही ठणकावून सांगितले.

कार्यक्रमात सर्वाधिक प्रभावी व उपस्थितांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळविणारे भाषण झाले ते म्हणजे  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक, भटके विमुक्त हक्क परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष मा. श्री. पुरुषोत्तम काळे सरांचे! मा. श्री. काळे सरांनी एकजुटीतून स्वास्तित्व निर्माण करण्याच्या महाराष्ट्र ठेलारी संघाच्या प्रयत्नांचे, त्यांच्या कार्यपद्धतीचे तोंड भरून कौतुक केले.  त्याबद्दल महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच हक्क परिषदेचे नाशिक विभागीय संघटक मा. श्री. शिवदास वाघमोडे यांचे तसेच त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. त्यांनी उपस्थित विराट जनसमुदायाचेही विशेष अभिनंदन केले व त्यांना एकजुटीचे महत्त्व समजून घेतल्याबद्दल धन्यवाद दिले.

आपल्या सविस्तर व अभ्यासपूर्ण भाषणात श्री. काळे यांनी भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, ठेलारी समाजाच्या समस्या, मा. इदाते आयोग,  महाराष्ट्रातील राजकारणात व सत्ताकारणात भटक्या-विमुक्तांचा अभाव,  मिशन लेटर टु पीएम #Mission_Letter_To_PM इत्यादी विविध विषयांवर आपले विचार मांडले. त्यांनी महाराष्ट्र शासनाने नुकतेच वसंतराव नाईक भटके विमुक्त विकास महामंडळाला 300 कोटी रुपये देण्याच्या केलेल्या घोषणेचे स्वागत केले व त्याबद्दल सरकारला धन्यवाद दिले. व्यासपीठावरील शासकीय व राजकीय प्रतिनिधींना भटक्या-विमुक्तांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांच्या विशेष सहकार्याची नम्र मागणी केली तसेच मोदी सरकार, नक्की इदाते आयोग लागु करून आम्हा समस्त विमुक्त भटक्यांचे आशिर्वाद घेईल असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमास सुरुवात होण्यापूर्वी श्री. पुरुषोत्तम काळे यांनी भटके विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश संघटक मा. श्री साहेबराव गोसावी, नाशिक विभागीय संघटक श्री अशोक गिरी महाराज धुळे जिल्हा संघटक श्री. प्रकाश रामोळे, साक्री तालुका संघटक श्री. सखाराम गोंधळी यांच्यासोबत साक्री तालुकाध्यक्ष श्री गोटू जगताप  नितीन कांगणे नाना पेटकर या सह तालुका कार्यकारिणीने  साक्री येथील शासकीय विश्रामगृहात आमदार मा. श्री. डी. एस. अहिरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भटक्या विमुक्तांचे विविध प्रश्न, इदाते आयोगाची अंमलबजावणी, भटक्या-विमुक्तांचे राष्ट्रीय मिशन 'लेटर टु पीएम'  या विषयांवर मा. आमदारांसोबत सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमास उपस्थित प्रचंड जनसमुदायाने हक्क परिषदेच्या लेटर टु पीएम या लोकचळवळीत उस्फुर्त सहभाग घेतला. लागलीच जागचे जागी उपस्थितांमधून तब्बल दोन हजार तीनशे (2300) पत्रे, मिशन अंतर्गत माननीय पंतप्रधानांना पाठविण्यासाठी लिहून व लिफाफा बंद करून तसेच त्यावर पत्ता लिहून तयार करण्यात आली. नंतर कार्यक्रम संपल्यावर ती पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी हक्क परिषदेच्या व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. याप्रसंगी आमदार मा. श्री. डी. एस. अहीरे यांनी आपणही आपल्या लेटरहेडवर माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून आयोगाच्या अमलबजावणीची मागणी करणार असल्याचे सांगितले.

 महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधुन महासंघाची 21 सदस्यांची प्रदेश कार्यकारीणी घोषित करण्यात आली शिवाय धुळे व नंदुरबार जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अशी तब्बल 90 प्रतिनिधींची जंबो कार्यकारीणीदेखील यानिमित्ताने जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले ते समाजाचा समंजसपणा! प्रसिद्धी व श्रेयासाठी लोक आज काय नाही ते करतात परंतु या कार्यक्रमात मात्र तसे काहीही दिसले नाही. व्यासपीठावर निमंत्रित मान्यवरांशिवाय इतर कोणीही आले नाही. तसेच एवढेच काय तर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बॅनर यावरही संघटनेचे नाव व मान्यवर निमंत्रित केवळ  यांचीच नावे होती. ना स्वागत हार तु-यासाठी नाराजी दिसली, ना भाषणबाजी दिसली, ना फोटोबाजी दिसली!! या बद्दल भटके विमुक्त हक्क परिषद समस्त ठेलारी समाजाचे मनापासून कौतुक करते व महासंघास पुढील काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देते.

एका सुंदर अशा यशस्वी आयोजनाबद्दल आमचे नाशिक विभागीय संघटक व महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. शिवदास वाघमोडे यांचे,  महासंघाचे उपाध्यक्ष श्री. रामदास कारंडे, सचिव श्री. दिनेश सरक, सरचिटणीस श्री. सुरेश सरक, खजिनदार श्री.  ज्योतीराम कर्नर, संपर्क प्रमुख श्री. गोरक सरक, कार्याध्यक्ष श्री. अभिजीत मारनर, प्रसिद्धीप्रमुख श्री. मोतीराम गरदरे, सरचिटणीस श्री. गोकुळ सरक, सल्लागार  श्री. अश्विन मारनर, सहसचिव श्री.  प्रवीण खामगळ, संघटक श्री. विलास गरदरे, सरसेनापती श्री. पंकज मारनर, कार्यवाहक श्री. काशिनाथ सोनकर, विस्तारक श्री. मनोहर रूपनर, सल्लागार श्री. लखन कुरूंगले महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या कार्यकरणीचे व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आणि समस्त ठेलारी समाज बांधवांचे अभिनंदन करते आणि महासंघाच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते.

बाळासाहेब धुमाळ
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य
मो. 9421863725.

No comments: