Wednesday 9 June 2021

जात पंचायतींना वाळीत टाका...

 जात पंचायतींना वाळीत टाका...

गोंधळी समाज बांधवांनो, चंद्रपूरच्या भंगाराम वॉर्डमध्ये जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या स्व. प्रकाश ओगले यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासही समाजाला मज्जाव केला! रडून पडूनही, आर्त विनवण्या याचना करूनही जेव्हा समाजाच्या हृदयाला पाझर फुटत नव्हता तेव्हा पर्यायहीनतेतुन त्यांच्या मुलींनी प्रकाशजींच्या पार्थिवाला खांदा दिला! मुखाग्नी दिला! अंत्यसंस्कार पार पाडला! हा सर्व प्रकार पाहून ऐकून, अर्थात मी प्रत्यक्ष जाऊन ऐकला वा पाहिला नाही परंतु सहाजिकच हा सोशल मिडीयाचा आणि मिडीयाचा काळ आहे, त्यामुळे दोन्ही मिडियावर किंबहुना तीनही मिडीयावर हे ऐकायला वाचायला आणि पाहायला मिळाले आणि मला फार वाईट वाटले! माझा फार अपमान झाला! तुम्ही म्हणाल की आता तुमचा कसा मध्येच अपमान झाला? तुम्ही तर तुमच्या घरात होतात, घटनास्थळी नव्हतात, तुम्ही कुठे तेथे अनुभवायला किंवा सहन करायला हजर होते किंवा त्या परिवाराचा आणि तुमचा काय संबंध?? तर संबंध असा आहे की मीही गोंधळी आहे, मीही हिंदु आहे, मीही माणूस आहे! आणि मी जातीने गोंधळी म्हणून, मी हिंदू म्हणून आणि मी एक माणूस म्हणून अतिशय ताठ मानेने बोलतो, वावरतो आणि जगतो, माझ्या जातीचा, धर्माचा मोठेपणा सांगतो आणि म्हणून माझा या घटनेशी जवळचा संबंध आहे.

 घडलेला प्रकार जेवढा दुर्दैवी आहे तेवढाच बेकायदेशीर व गुन्हेगारी स्वरूपाचा देखील आहे. आपले महाराष्ट्र हे सामाजिक बहिष्कारा पासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम - २०१६ या पद्धतीचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे. या कायद्यांतर्गत सामाजिक बहिष्काराचे आदेश देणाऱ्या जात पंचायतीच्या सदस्यांना सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किवा पाच लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. महाराष्ट्र हे शिवछत्रपती, फुले, शाहू, तुकोबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉ. आंबेडकर यांचा वारसा जपणारे पुरोगामी व देशासाठी दिशादर्शक राज्य आहे. म्हणून चंद्रपूरचा हा प्रकार आपल्या संपूर्ण गोंधळी समाजासाठी, हिंदू धर्मासाठी आणि राज्यासाठी क्लेशदायक आणि शरमेने मान खाली घालायला लावणारा प्रकार आहे.

 अर्थात आता आपल्यामध्ये शरम नावाची बाब शिल्लक राहिली आहे की नाही? ठाऊक नाही! कारण असे प्रकार नेहमीच घडतात! आपण नेहमीच वाचतो ऐकतो पाहतो आणि सोडून देतो! अहो माणुस रानटी होता तेव्हा, शिक्षण नव्हते, विज्ञान नव्हते, कायदा नव्हता त्या कालखंडात माणूस असाच होता, समाजही असाच होता परंतु आता जेव्हा आपण औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरण करून आपली बुद्धीमत्ता सिद्ध केली आहे! आज जेव्हा आपण ब्लॅक होल, युनिव्हर्स, मायक्रोबायोलॉजी, ॲनाटोमी, फिजिओलौजी, व्हायरोलौजी, रॉकेट सायन्स, बिग बँग, जेनेटिक्स अशा प्रगत शास्त्रांमध्ये निष्णात झालो आहोत! आज जेव्हा आपण आधुनिक झालो आहोत, तेव्हाही जर असे प्रकार घडत असतील आणि आपण ते तरीही सहन करत असू तर? तर मग अवकाशात उपग्रह सोडण्याला, परग्रहांचा शोध लावण्याला, चंद्रा मंगळावर जाण्याला, अंतराळात स्पेस स्टेशन उभारण्याला, काय अर्थ आहे? जर आपण आपलेच भाऊबंद, नातेवाईक स्विकारू शकत नसु तर एलिएंसना आपण का शोधतोय? जर एका बाजूला आपण एवढे आधुनिक असू आणि दुसऱ्या बाजूला जर एवढे मागास असू, प्रतिगामी असू तर असेच म्हणावे लागेल की आपण एक तर माणूस नाही आहोत अथवा आपल्याला मन बुद्धी नाहीये. गोंधळी जमात, मन बुद्धी हीन जमात आहे असेच म्हणावे लागेल ना? किंवा मग असे म्हणावे लागेल की, गोंधळी जमात ही विद्यमान व्यापक आणि आधुनिक मानव जातीच्या समूहापासून अलिप्त आहे! परंतु वास्तव हे नाही.

आपल्या जातीचा अभिमान प्रत्येकालाच आहे, मलाही आहे अर्थात तो असावा की नसावा यावर चर्चा, विचारमंथन होऊ शकते, व्हायलाच हवे कारण आधुनिकतेबरोबरच विषमतेला पुरक बाबींचा अंत देखील व्हायलाच हवा. जात ही जतन करून ठेवायचा दागिना नाहीये तर तोडून फेकून द्यायचे जोखड आहे. असे समजतेय की या स्व. प्रकाश उगले यांना सात मुली आणि दोन मुले आहेत. सात मुलींपैकी सहा मुलींची लग्ने झाली आहेत, तर दोन्ही मुलांची लग्ने झाले आहेत, पैकी मोठ्या मुलानेही आंतरजातीय विवाह केलेला असल्याने त्यालाही समाज बहिष्कृत केले गेले आहे! मुळात स्व. प्रकाश ओगले यांना समाजाबाहेर टाकण्याचे कारणही त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता हेच होते! हा सगळा प्रकार पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला जातेय! मला फार वाईट वाटतेय! फार राग येतोय! हा असला कसला समाज? समाज म्हणजे काय? समानतेवर आधारलेला, समानतेचे तत्व जोपासणारा एक लोकगट! मग तो जातीवरून पडलेला असो किंवा धर्मावरून किंवा अनुवंशावरून, कामाच्या स्वरूपावरून, ठिकाणावरून अथवा कशावरूनही असो. जर समाज आपल्याच घटकाला बहिष्कृत करत असेल! त्याच्या सुखात तर सोडा, दुःखातही म्हणजे अगदी त्याच्या अंत्यविधी मध्येसुद्धा सहभागी होत नसेल व कुणाला सहभागी होऊ देत नसेल तर याला काय समाज म्हणावे? मृतदेहाशी कसले वैर? यात त्याच्या मुलींचा, त्याच्या मुलांचा, जावयांचा, नातवंडांचा काय दोष? व्यक्तीच्या मृत्यूनंतरही जर नियम संपत नसतील तर ते आपण संपवले पाहिजेत आणि ते नियम करणारे देखील संपवले पाहिजेत. 

जात पंचायतींना कुठलाही कायदेशीर व घटनात्मक आधार नाही. मग या खाणाऱ्या पिणाऱ्यांना, हरामखोरांना आपण पंच किंवा न्यायाधीश म्हणावे काय? हे जितके दुर्दैवी आहे, तितकेच घृणास्पद व निंदनीय आहे. या जात पंचायतींमधील स्वयंघोषित काही बिन्डोक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हा अधिकार दिलाच कोणी? हे कोण लोकांना बहिष्कृत करणारे? आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत. आपण चंद्रावरच नव्हे तर आता मंगळावरही गेलो आहोत. आपण अनेक अज्ञात आकाशगंगा शोधून काढल्या आपण! अंतराळात स्पेस स्टेशन तयार केले आहे आणि तरी अजूनही रूढी परंपरा अंधश्रद्धा किंवा मनमानी दादागिरी यांना आपल्या आधुनिक समाजामध्ये स्थान का असावे काय? आपण फक्त ऐकतोय आणि न ऐकल्यासारखे करतोय! पाहतोय आणि न पाहील्यासारखे करतोय! का? का आपण जात पंचायतींवर बहिष्कार टाकू शकत नाही? का आपण त्यांना समाजातून बेदखल करू शकत नाही? का आपण त्यांच्यावर जिथे आहोत तिथून गुन्हे दाखल करू शकत नाही?

 चंद्रपूरची ही घडलेली घटना जितकी दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी आहे, राग आणणारी आहे तितकीच एका अर्थाने ऐतिहासिक देखील आहे! अर्थात हे पहिल्यांदाच होत नाही की, मुलींनी आईच्या किंवा वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आहे परंतु चला पुन्हा एकदा दिसून आले की मुली देखील मुलांपेक्षा कमी नाहीत. या घटनेने पुन्हा एका नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. ही घटना अनेक अशा शोषित आणि अन्याय अत्याचार ग्रस्त मुलींसाठी प्रेरणा ठरणार आहे. मी तर आवाहन करतो सर्व मुलींना की, यापुढे जर असा प्रकार कधी घडलाच दुर्दैवाने तर मुलींनी समाजाला विनवणी करू नये, सरळ स्वतः पदर कमरेला खोचावा जसा जयश्री ताईंनी व त्यांच्या बहीणींनी खोचला! स्वतः मुलगा व्हावे व कर्तव्य पार पाडावे. भंगार लोकांच्या नादाला लागू नये. त्या जयश्री ओगले ताई आणि त्यांच्या बहिणींना मी खरच मानाचा मुजरा करतो. त्या झुकल्या नाहीत म्हणून. किंबहुना जर माझी पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहचलीच तर विनंती करतो या पोस्ट मधून की, या नराधमांना अजिबात सोडू नका. हे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान द्या. यांना तुरूंगात, जिथे यांची खरी जागा आहे तिथे पोहचवा. समाज नक्कीच तुमच्या पाठीशी उभा ठाकेल जसे युवा योद्धे संजय कदम व इतर उभे ठाकले! कारण ही चार टाळकी (जातपंचायती मधली) म्हणजे समाज नाहीत. समाज व्यापक आहे, विस्तीर्ण आहे, समंजस व विचारी आहे.

जे आपल्या सोबत नसतील त्यांनी विचार करावा की, कसल्या गप्पा मारतोय आपण देवीचे भक्त असल्याच्या? पापा-पुण्याच्या? श्रद्धेच्या? देवा-धर्माच्या? देव धर्म हे शिकवतो काय? धर्म धरून ठेवायला शिकवतो. धर्माची एक धारणा असते. धर्म, एकता आणि एकात्मता, समता आणि समानता शिकवतो. अशा पद्धतीने बहिष्कृत करणे शिकवत नाही. ही कसली मानसिकता? तुम्ही म्हणाल की विषय जातीचा आहे तर धर्मापर्यंत कशाला घेऊन चालले आपण? तर मी तुम्हाला अत्यंत जिम्मेदारीने सांगतो की मुळात जातींची निर्मिती हेच धर्माचे अपयश आहे. जातीच्या किंवा जात पंचायतींच्या निर्मिती पाठीमागे धर्माच्या चुकीच्या संकल्पना आहेत. त्यामुळे सर्व विचारी समाजाने, समाज संघटनांनी, समाजसेवकांनी त्या ओगले परिवाराच्या पाठीशी उभे राहण्याची नितांत गरज आहे आणि ते जे कोणी चार बिनडोक टाळके असतील या मानसिकतेची, त्यांना अद्दल घडावी यासाठी प्रयत्न करण्याची नव्हे त्यांना त्यांच्या खर्‍या जागेपर्यंत पोहोचविण्याची खूप गरज आहे. मी पुन्हा सांगतो, त्यांची जागा तुरुंगात असली पाहिजे म्हणजे यापुढे असे अन्यायकारक फर्मान काढणाऱ्या त्यांच्या मानसिकतेच्या गटांवर अंकुश येईल.

आपण सर्व गर्विष्ठ गोंधळी आहोत. आपली जात स्त्री शक्तीचा आदर करायला शिकवणारी जात आहे. आदर करणारी जात आहे. "सम बळ म्हणजे संबळ" हे आपण विसरलो आहोत की काय? मला कळत नाही, या जातपंचायतींना कोणाला दंड ठोठावण्याचा, कुणाची योग्याअयोग्यता जस्टीफाय करण्याचा अधिकारच कुणी दिला? हे कोण ठरवणार योग्य काय आणि अयोग्य काय? यांच्या गाडीखाली किती अंधार आहे तो शोधला म्हणजे लक्षात येईल की तो लपविण्यासाठी ही मंडळी असा दबावगट निर्माण करते. थेट पोलीसांत किंवा न्यायालयात जाणे कधीही अयोग्यच. आपल्या माणसांसमोर आपली समस्या मांडलीच पाहीजे. सामाजिक मध्यास्थता समजून घेतली जाऊ शकते परंतु अशा अविवेकी हुकूमशाही फरमाणांना सामाजिक मध्यस्थता म्हणता येत नाही. याला अरेरावी, गुंडगिरी म्हणतात. योग्य-अयोग्य ठरविण्याचा, अपराधी ठरविण्याचा अधिकार शासन, प्रशासन, पोलिस यंत्रणा यांना आहे. दंड किंवा शिक्षा ठोठावण्याचा अधिकार मा. न्यायालयांना आहे. या यंत्रणा कशासाठी आहेत मग?

मोठ्यांनी आंतरजातीय विवाहाचे पाऊल उचलले तर ते पुरोगामी व कौतुकास्पद पाऊल आणि सर्वसामान्यांनी उचलले तर ते पाप! गुन्हा! लज्जास्पद व लांच्छनास्पद पाऊल! हे ठरवणारे ही जात पंचायत कोण? श्रीमंत असो वा गरीब, जीवनसाथी निवडण्याचा अधिकार वैयक्तिक नाही का? की तो केवळ मोठ्या लोकांनाच आहे? गंमत म्हणजे जर मोठ्या जातीतील मुला सोबत अथवा मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला तर त्यावर बोट ठेवले जात नाही, विवाह समारंभ थाटामाटात संपन्न झाले तर त्यावर बोट ठेवले जात नाही परंतु सर्वसामान्य लोकांनी जर आंतरजातीय विवाह केला तर आभाळ फाटते!! अशी दुटप्पी भूमिका न्यायोचित आहे काय? तसे तर भारतामध्ये होणारे आज वरचे जवळजवळ सर्व विवाह हे जातीमध्ये आणि मोठमोठ्या बैठकीमध्ये जमलेले, थाटामाटात संपन्न झालेले आहेत तरीही घटस्पोट का झाले? तरीही हुंडा आणि इतर कारणांमुळे कौटुंबिक अन्याय अत्याचार का झाले? अगदी बहिणी भावांमध्ये झालेले विवाहसंबंध म्हणजे आत्या मामांच्या लेकरांसोबतचे विवाह संबंध देखील तडीस गेले नाहीत. हे वास्तव आहे की अशा विवाह संबंधांमध्ये देखील प्रचंड टॉर्चर केले गेले, मानसिक त्रास दिला गेला. अशिक्षित आणि ग्रामीण कुटूंबातच नाही तर उच्चशिक्षित, प्रगत आणि प्रतिष्ठित शहरी कुटूंबांमध्ये देखील!

जेष्ठांनी, धुरीनांनी सामंजस्याने विषय नक्कीच हाताळायला हवेत, न्याय करायलाच हवा कारण अजुनही आपला समाज प्रचलित न्याय व्यवस्थेसमोर न्याय मागण्यासाठी सक्षम नाही परंतु वा-याच्या दिशेने वाहणे, फुटाण्यावर (दारू मटण बाई पैशावर साक्ष देणे) याला न्याय नव्हे तर अन्याय म्हणतात. याचा सर्वमान्य स्वीकार कसा काय होऊ शकतो? या स्वयंघोषित नियंत्रकांचा आणि नितीमुल्ये तत्वे जात शिक्षण बुद्धी कायद्याचे ज्ञान यांचा अजिबात संबंध नाही. जे आपली काळी संपत्ती टिकविण्यासाठी स्वयंघोषित न्यायाधीश बनतात, आपले क्रुत्रिम वलय निर्माण करतात, त्यांनाच आता वाळीत टाकण्याची वेळ आलेली आहे. विशेष म्हणजे जुन्या जात पंचायतींची जागा आता काही समाज संघटना घेत आहेत. आपले साम्राज्य, संस्थान, संपत्ती राजकारण टिकविण्यासाठी किंवा ते निर्माण करण्यासाठी जे लोक खासकरून प्रशासनतुन सेवानिवृत्त झालेले लोक, समाजाला दिशा दाखवण्याचा, संघटीत करण्याचा आव आणतात ते आयुष्यभर सरकारी पदाच्या माध्यमातून मिळवलेली व सेवानिवृत्ती नंतर गमावलेली प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप करतात! आपल्या सेवाकाळात हेच लोक समाजाला जवळही करीत नाहीत. जात लपवतात! हे कटू वास्तव कसे काय विसरता येईल? आपल्या मर्जीतील चांडाळ चौकट आपल्या भोवती निर्माण करून सर्वसामान्य समाजावर दबावतंत्र अवलंबू पहातात. जेव्हा समाज खरोखरच संकटात असतो, जेव्हा समाजाला यांच्या मदतीची गरज असते तेव्हा ही मंडळी नॉट रिचेबल असते. अर्थात सर्वच नाही. सेवाकाळातही व सेवानिवृत्ती नंतरही यांचे कार्य खरोखरच खूप चांगले आहे. मी त्यांचा प्रचंड आदर करतो परंतु खऱ्या अर्थाने असे लोक खूप कमी आहेत. आपण जाऊ तिथे आपली सोय झाली पाहिजे हे यांचे ध्येय असतेय. राजकारण्यांच्या बैठकीमध्ये आपल्याला महत्त्व असले पाहिजे आणि ते महत्त्व मिळविण्यासाठी समाज आपल्या पाठीशी आहे हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यातून समाजाचे भले करणे बाजूला राहते स्वतःचेच भले करून घेतले जाते! समाजाला वापरून फेकून दिले जाते! मुळात यांना जाती संपवायच्याच नाहीत. समाज यांच्याच भोवती यांना फिरत ठेवायचाय!!

असो, काही समाज संघटना किंवा समाजसेवक जे चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांनी याची जाणीव करुन घ्यावी की समाज मूर्ख नाही, समाजाला सर्व काही कळते, फरक एवढाच आहे की ते व्यक्त होत नाहीत आणि हे केवळ गोंधळी समाजासाठीच लागू होतेय असे अजिबात नाही. सर्व भटक्या विमुक्त जमातींसाठी लागू होतेय किंबहुना भटक्या-विमुक्तांच्या बाहेरच्या मागास जाती जमाती सर्वांमध्ये हा प्रकार आहे. पात्र पाहून वाढले जातेय! असो मूळ विषयावर येतो, जात पंचायत! दंड भरला, दारू बोकड बाई यांचा नैवेद्य दाखवला की पंच व त्यांची पंचायत प्रसन्न होते! पाचामुखीचा परमेश्वर एवढा लालसी, भ्रष्ट आणि अमानुष कसा काय होतो? त्यामुळे मित्रांनो आता या जात पंचायतींची पंचाईत करण्याची वेळ आलेली आहे. हे मारत आहेत आणि आपण मारून घेतोय!! आता पार्थिवाला मूठमाती मिळो अथवा न मिळो परंतु जातपंचायतींना मूठमाती देण्याची वेळ आलेली आहे. नैसर्गिकरित्या जातीबाहेर लग्न केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असमाधानी व क्रोधापुर्ण भावना निर्माण होतेच. प्रत्येकाला वाटते की जातीतली मुले किंवा मुली मेल्या होत्या काय? याने किंवा हिने का बाहेर लग्न केले? असंतोष समजून घेतला जाऊ शकतो परंतु त्याहीपेक्षा अधिक हे समजून घेण्याची गरज आहे की जीवनसाथी ठरविण्याचा अधिकार वैयक्तिक आहे व तो वैयक्तिकच राहिला पाहिजे. आपले वैर पार्थवाशी किंवा पार्थिवाच्या लेकरा बाळांशी नसले पाहिजे. ज्याला हे दंड असे नाव देत आहेत ती एक प्रकारची खंडणी आहे, लाच आहे, भ्रष्टाचार आहे आणि आशा खंडणीखोर लाचखोर भ्रष्टाचारी लोकांनी समाजाचे नियंत्रण करावे, नेतृत्व करावे, न्यायनिवाडा करावा आणि तोही अशाप्रकारे? ही बाब आपण कसे काय सहन करू शकतो? मुळात जात पंचायत बेकायदेशीर आहे. आज जात पंचायती अस्तित्वात नाहीत परंतु तरीही समाज बैठका बसतात, त्यांत निर्णय होतात, जे असंतुलित एकांगी व नियम कायद्यांना धरून नसतात. ठराव किंवा निर्णय हे पक्षपाती व अन्यायकारक असतात मग जात पंचायत नसल्याचे म्हणता येणार नाही. या बैठका, संघटनांची मध्यस्थता ही एक प्रकारची जात पंचायतच असते. अशा किती बैठकांमध्ये पोलीस, कायदे यांचे ज्ञान असणारे समाजातील का असेनात परंतु प्रतिनिधी असतात? कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाते? हम करे सो कायदा हे तत्व कसे काय चालेल? आपण कितीही ओरडलो की आमच्यात जात पंचायती नाहीत तरी जे समोर येतेय ते खोटे नाही. कुणी मुली प्रसिद्धीसाठी असे पाऊल उचलू शकत नाहीत. आपण न्यायप्रिय जमात आहोत. धर्मराजाचा न्याय आपण व्यासपिठावरून सांगतो मग आपण अन्यायाची बाजू कशी काय घेऊ शकतो? चुक ही सदासर्वकाळ चुकच. नितीमान समाज चुकीचे समर्थन करू शकत नाही, आपणही ते करणार नाही. समाज बदनाम या अशा जात पंचायतींमुळे होतोय, त्यांची काळी करतुद समोर आणून त्यांचा फांडाफोड करणारांमुळे किंवा विरोध करणारांमुळे किंवा अन्यायाला वाचा फोडणारांमुळे नाही. समाजाचे खरे गुन्हेगार कोण हे समजून घेणे गरजेचे आहे.

मग आता माझा शेवटी असा प्रश्न आहे सर्व समाज बांधवांना की, आपले शोषण करणाऱ्या, आपल्याला यातना देणा-या आणि आपल्या पवित्र जातीची बदनामी करणाऱ्या अशा स्वयंघोषित न्यायाधीशांना आपण लाथ का नाही मारली पाहिजे? मुळात ही जातीव्यवस्था हाच विषमतेचे मूळ आहे. हिने धर्म बाधित होतोय. धर्माच्या मूळ संकल्पनेचा खून होतोय. धर्म धरून ठेवतो परंतु या जातिव्यवस्थेमुळे माणसे धरून ठेवली जात नाहीत. म्हणून जातीव्यवस्थेचा अंत केला गेला पाहिजे. जातिनिर्मुलन हे घटनाकारांचे अंतिम ध्येय होते. मला तर कधी कधी वाटते की, आरक्षणामुळे जातीव्यवस्था अधिक मजबूत व दृढ होत चालली आहे! एवढेच नव्हे तर दररोज नवनव्या मागास जातींचा जन्म होत आहे! आणि विशेष म्हणजे या जाती सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत! याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ब्राह्मण स्वतहाला जातीय आरक्षण मागत आहेत! आता यापेक्षा मोठे उदाहरण असू शकत नाही. जातपंचायतींच्या अशा क्रूर आणि अमानवी फरमाणांमागे बहुतांश वेळा "आंतरजातीय विवाह" हेच कारण दिसुन आलेले आहे. त्यामुळे आता जातीच्या रूढीवादी चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि अशा विक्रुत "जातपंचायतींना वाळीत टाकण्याची वेळ आलेली आहे" बघा पटतेय का ते! आणि जर पटलेच तर इतरांशीही शेअर करा.

बालासाहेब (बालाजी) सिताराम धुमाळ

मो. 9421863725.

No comments: