Saturday 16 October 2021

सामाजिक चळवळीच्या अपयशाची कारणे....

 सामाजिक चळवळीच्या अपयशाची कारणे....



सामाजिक चळवळीमध्ये जास्त नाही परंतु सात आठ वर्ष काम करत असताना येत असलेला अनुभव सांगतो. चळवळीची अडचण जी मला समजली ती ही आहे की, ज्यांचे प्रश्न असतात ते चळवळीपासून दूर असतात! उदाहरणार्थ प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांचे असतात परंतु सरकारी कर्मचारी चळवळीपासून दूर असतात! प्रश्न विद्यार्थ्यांचे असतात परंतु विद्यार्थी सामाजिक चळवळी पासून अलिप्त राहतात! प्रश्न महिलांचे असतात परंतु महिला सामाजिक चळवळीमध्ये औषधालाच असतात! प्रश्न लोककलावंतांच्या असतात परंतु लोक कलावंत आपल्या विश्वात मग्न असतात! प्रश्न गोरगरिबांचे, वंचित-उपेक्षितांचे, बेरोजगार-बेघरांचे असतात परंतु हेही लोक चळवळीपासून दूर राहतात! अर्थात यांच्या बाबतीमध्ये समजून घेतले जाऊ शकते कारण यांच्या दृष्टीने पोटाचे भांडण, भुकेसाठीचा संघर्ष प्राधान्याचा असतो आणि म्हणून हे बिचारे अशा संघर्षापासून लांब राहातात! बरेचदा हे लोक अल्पशिक्षित किंवा अशिक्षितही असतात...

 परंतु निदान कर्मचारी लोक, सबळ लोक, विद्यार्थी हेही जर सामाजिक चळवळी सोबत स्वतःला जोडून नाहीत घेणार तर यांचे प्रश्न कसे सुटणार? आणि मग जेव्हा गळ्यावर तलवार येते तेव्हा वाचण्याची धडपड करतात! किंवा जेव्हा तहान लागते तेव्हा विहीर खोदण्याचा प्रयत्न करतात!! हे चुकीच आहे. अशाने न्याय मिळणार नाही. फळे सर्वांना खायची आहेत परंतु झाडे कुणालाच  लावायची नाहीत किंवा लावलेल्या झाडाचे संवर्धन संगोपन कुणालाच करायचे नाही! अशाने फळे मिळत नसतात!! फळे मिळवण्यासाठी झाडे लावावी लागतात! ती वाढवावी लागतात!

सामाजिक चळवळ मागे राहाण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाला सामाजिक मागासलेपणाचे लाभ, आरक्षण, सवलती हव्या असतात परंतु स्वतःला मागास म्हणून घ्यायला मात्र ते तयार नसतात! तेव्हा आपल्यातला सनातनभाव, उच्च वंश, उच्च वर्ग जातीतील उच्चता, धार्मिक श्रेष्ठता, प्रतिष्ठा, उग्रता आड येते!

 सरळ साधी गोष्ट आहे बांधवांनो, एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत! एकतर आपण मागास आहोत हे मान्य केले पाहिजे किंवा मागासलेपणाचे लाभ सोडले पाहिजेत, घेतले नाही पाहीजेत किंवा मग आपण मागास आहोत हे मान्य करून आपले हक्क अधिकार वाचवण्यासाठी, आपल्या समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी भाया मागे सारून पुढे सरसावले पाहिजे, मैदानात उतरले पाहिजे परंतु दुर्दैवाने जे स्वतःला प्रतिष्ठित व श्रेष्ठ समजतात तेच सामाजिक मागासलेपणाचे लाभ अधिक घेतात परंतु स्वतःला सामाजिक मागासलेले समजत नाहीत!! ते लाभ टिकविण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत, योगदान देत नाहीत! आणि परिणामी जे सर्वसामान्य गोरगरीब आणि खऱ्या अर्थाने मागास उपेक्षित वंचित गरजु घटक आहेत ते या लाभांपासून वंचित राहतात. त्यांच्यावर अन्याय होतो.

 लाभ कोणी घ्यावा आणि कोणी नाही घ्यावा या विषयावर मी नाही बोलणार कारण त्यामुळे मने दुखावतील परंतु किमान जे बळ बुद्धी पैशाने सबळ आहेत त्यांनी तरी चळवळीमध्ये यावे, चळवळ तरी मजबूत करावी. जेणेकरून अन्याय अत्याचार होणार नाहीत. अन्यथा अब पछताये होत क्या जब चिडीया चुग गई खेत!

बाळासाहेब धुमाळ

9421863725.

No comments: