Monday 25 October 2021

पालकांनो नका करू लटका खटाटोप....

 लटका खटाटोप....

(दि. 25.10.2021 लेखकः बाळासाहेब धुमाळ, मो. 9421863725)

पालकांनो नका करू लटका खटाटोप....

मराठवाड्यातील औरंगाबाद मधील पंधरा दिवसांपूर्वी सलग दोन खुनांच्या घटनांनी केवळ औरंगाबाद किंवा मराठवाडाच नव्हे अवघा महाराष्ट्रच हादरून गेला. पहिला खून सोडून देऊयात कारण तो बहुतेक खाण्यापिण्यावरून झाला होता परंतु जो दुसरा खुन होता तो एका प्राध्यापकाचा होता! संबंधित मयत सिडको स्थित प्राध्यापकाचे नाव प्रा. राजन शिंदे असे होते. विशेष म्हणजे प्रा. शिंदे हे सामाजिक भान असलेले, स्वतंत्र विचारधारेचे, पुरोगामी विचारसरणीचे बुद्धिवादी प्राध्यापक होते असे कळतेय परंतु त्यांचा गळा चिरून खून झाला! सहाजिकच सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्या कारण प्रकरण मिडीया आणि सोशल मिडीयाने चांगलेच डोक्यावर घेतले होते. सर्वांच्या जिव्हारी देखील लागले होते परिणामी याचा उलगडा करणे अत्यंत आवश्यक व तेवढेच जिकीरीचे होते. ते तपास यंत्रणेसमोरील खूप मोठे आव्हान होते. परंतु जेव्हा उलगडा झाला तेव्हा जे समोर आले ते अत्यंत धक्कादायक होते! समोर असे आले की, प्रा. शिंदे आणि त्यांच्या पत्नीमध्ये वैचारिक मतभिन्नता होती यातून त्यांच्यामध्ये सतत शाब्दिक चकमक देखील होत होती. शिवाय प्रा. शिंदे आपल्या मुलाला अभ्यासावरून  त्याच्या करीअरवरून नेहमी प्रश्न विचारत होते, रागावत होते, खडसावत होते, धारेवर धरत होते. अर्थात वडील म्हणून ते स्वाभाविकही होते. परंतु मुलगा चुकीच्या संगतीत, चुकीच्या सवयींमध्ये अडकला होता. लॉकडाउनच्या काळामध्ये एकलकोंडा बनला होता. मोबाईल, कम्प्युटर यांचे एक प्रकारेचे व्यसनच त्याला लागले होते. त्याला अभ्यास नको होता. कदाचित तो भलत्याच बाबींमध्ये अडकला होता. त्याची साधारणपणे त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती आणि त्यातूनच त्याने आपल्या वडिलांचा अगदी मध्यरात्री डंबेल डोक्यात घालून, दोन्ही हातांच्या नसा कापुन व गळा चिरून खून केला होता व खुनामध्ये वापरलेली हत्यारे विहिरीत फेकून दिली होती!! कुठून आली असेल एवढी क्रूरता? एवढी निर्घुनता?? विशेष म्हणजे त्याने या खुनाची तयारी वेगवेगळ्या क्राईम सिरीज आणि वेब सिरीज तसेच ॲनिमेटेड मूव्हीज आणि गेम्स पाहून गेली होती! एवढेच नव्हे तर त्याने खुनापूर्वी बाल संरक्षक कायद्यांची पुस्तके देखील वाचली होती !! बघा, ज्या वयात त्याने अभ्यासाची पुस्तके वाचायला हवी होती त्या वयात तो सिरीयल किलींगची पुस्तके वाचत होता!

अगदी अशीच नव्हे परंतु साधारणपणे याच पठडीतील आणखी एक घटना महाराष्ट्रामध्ये मुंबईत घडली. ती म्हणजे सिने क्षेत्रातील किंग खान म्हणजे शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा क्रूज वरील ड्रग्ज पार्टीमध्ये एन. सी. बी. चा जाळ्यात सापडला व सध्या त्याची चौकशी सुरू आहे आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. माझ्या दृष्टीने आर्यन खानच्या घटनेला विशेष महत्त्व नाही कारण श्रीमंत आईबापांची अशी बिघडेल आणि नशेडी मुले-मुली असतातच. आर्यन काही पहिलाच नाही. अर्थात त्याची देखील मानसिक मिमांसा होणे गरजेचे आहे परंतु आताच्या माझ्या लेखनाचा तो विषय नाही किंवा तो केंद्रबिंदू नाही. केंद्रबिंदू आहे औरंगाबादचा खून. एका प्राध्यापकाचा खुन! व खास करून एका समाजसेवी प्राध्यापकाचा खुन! आणि खुनी कोण तर त्याचा पोटचा पोरगा! ज्याच्यावर संस्काराची कुठलीही कमी नव्हती! तरीही त्या एका सुसंस्कारित उच्चशिक्षित घरातील मुलाने आपल्या स्वतःच्याच बापाचा अशा निर्घुण पद्धतीने खून करावा? ही बाब एकूणच मानवतेला काळीमा फासणारी तर आहेच आहे परंतु संपूर्ण मानव जातीला विचार करायला भाग पाडणारी, मन सुन्न करणारी आहे.

याची कारणमीमांसा विशद करताना काही बुद्धिजीवी असेही म्हणतील की, आता अलीकडे कुटुंब व्यवस्था विभक्त झाली आहे. पती-पत्नी कमावते झाले आहेत. किमान बारा तास घराबाहेर राहत असल्याने व परिणामी आपल्या संततीवर त्यांच्याकडून योग्य संस्कार होत नसल्याने अशी वेळ येते. आई-वडील पोटाच्या पाठीमागे धावतात. आपल्या लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी अहोरात्र काम करतात, पैसे मिळवितात आणि पुढे जाऊन तीच मुले आई वडिलांना जाब विचारतात की आपण माझ्यासाठी काय केले? आणि आई वडिलांनी अधिक कठोर भूमिका घेतली की हीच मुले आई-वडिलांचा जीव घ्यायला देखील मागेपुढे पाहत नाहीत! परंतु मला कळत नाही, ही काय पद्धत झाली का??

यावर मला काहीतरी बोलावेसे वाटतेय. सर्वप्रथम तर मी प्रा. राजन शिंदे यांच्या मयत पुण्यात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु हे असे का घडते या विषयाचा उहापोह होणे अत्यंत गरजेचे आहे. मला असे वाटते की, मुळात तर जगातील कोणतेच आई-वडील मग ते शिक्षित असोत वा अशिक्षित असोत, कमावते असोत वा बेरोजगार असोत, गरीब असोत वा श्रीमंत असोत,  ग्रामीण असोत वा शहरी असोत, उच्चवर्गीय असोत किंवा मागासवर्गीय असोत, आपल्या बाळावर कोणीही वाईट किंवा चुकीचे संस्कार कधीही करीत नाहीत! मुळात आज काळ असा आला आहे की संस्कार केवळ परिवाराकडून होत नाहीत! केवळ पारिवारिक संस्कारातून बालके घडत नाहीत. आता काळ बदलला आहे. बालमनावर विपरीत परिणाम करणारे अनेक घटक उत्पन्न झाले आहेत! जग बदलले आहे!

आणि दुसरी बाब म्हणजे पालक जे मरमर करतात,  चांगल्या-वाईट मार्गाचा विचार न करता बेभान होऊन केवळ धन संचय करण्याच्या नादात जीवन खर्च करतात ते आपल्या संततीसाठी मुळात विशेष काही करीत नाहीत. हा सर्व खटाटोप ते स्वप्रतिष्ठेसाठी, स्वप्नपूर्तीसाठी, स्वार्थासाठी व स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी करतात! हे कटू वास्तव आहे! साम-दाम- दंड भेद वापरून स्वतःचे घर भरणे म्हणजे सचेत व जागरूक पालक असणे असे अजिबात नाही. वालह्या कोळी व वाल्मिकी ऋषी यांची कथा आपल्याला चांगली ठाऊक आहे. आपल्या अपत्यांना जन्म देणे, प्रारंभिक व प्राथमिक गरजा पूर्ण करणे, त्यांचे संगोपन करणे, त्यांचे आरोग्य सांभाळणे, त्यांना शिक्षण देणे, त्यांच्यावर संस्कार करणे ही त्यांची नैतिक जिम्मेदारीच आहे. हे त्यांचे कर्तव्यच आहे. जी त्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत ती त्यांच्या संततीची तरी अपूर्ण राहु नयेत हा विचार व प्रयत्न रास्त आहे. अर्थात राहणे खाणे मौजमजा इथपर्यंतच हं. यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. आज पासून हजारो वर्षांपूर्वीपासून पालक त्यांना न मिळालेल्या सोयीसुविधा आपल्या पाल्यांना पुरवून त्यांना आनंद देत आलेले आहेत परंतु आता काळ बदलत चालला आहे. 

परंतु चुकतेय कुठे तर जे मला करणे किंवा मिळविणे शक्य झाले नाही ते तू कर किंवा मिळव ही पाशवी महत्त्वाकांक्षा कुटुंब उध्वस्त करते आहे. जीवने देखील उध्वस्त करीत आहे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असतेय. स्वतःच्या माना-सन्मानासाठी, स्वप्नपूर्तीसाठी ईर्षेपोटी,  श्रेष्ठत्वासाठी, प्रतिष्ठेसाठी, ब्रँडला महत्त्व देणे म्हणजे जबाबदार पालक असणे असे अजिबात नाही. हा केवळ एक देखणा मुखवटा आहे. दिखावा आहे. मुलाबाळांना हाय-फाय दवाखाने, शाळा कॉलेजेस, एज्युकेशन फॅसिलिटीज, बाईक्स, कार्स, दागदागिने कपडालत्ता पालक आपले स्टेटस जपण्यासाठी स्वतः उपलब्ध करून देतात! तेही अवेळी! हे वास्तव आहे आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे संपत्ती नाही तेही हा खटाटोप करतात व एकेदिवशी हाच खटाटोप अंगलट येतो, कर्दनकाळ ठरतो! ज्यांना संतती नाही तेही संपत्ती मिळविण्यात मागे नाहीत हे विशेष! इतरांना मागे टाकून मिळेल त्या मार्गाने संपत्ती कमविण्याच्या शर्यतीमध्ये सहभागी होतात व यशस्वी देखील होतात! केवळ स्वत्वासाठी! हे वास्तव नाही काय? जीवन जगताना आपण जे केवळ भौतिक सोयीसुविधांना झगमगाटाला आणि चैनविलासाला महत्त्व देतो. हे अत्यंत चुकीचे आहे. वास्तविक पाहता सुखी व यशस्वी जीवनासाठी वैचारिक प्रगल्भता, कौटुंबिक जिव्हाळा फार आवश्यक असतो. यामध्ये अध्यात्म देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आध्यात्मामुळे विचारांना आणि विचारांमुळे आचारांना सुयोग्य दिशा प्राप्त होते. प्रत्येकाच्या मते यशस्वी जीवनाचे निकष वेगवेगळे असू शकतात परंतु अंतिमतः जीवनाचे सार्थक हे सुख समाधान यातच आहे आणि तेही सुख समाधान केवळ दिखाऊ नसावे तर ते अंतःकरणापासून आणि समाजमान्य असावे.

म्हणजे आपल्या समाधानासाठी, सामाजिक प्रतिष्ठेसाठी, राजकीय स्वार्थासाठी, आपल्याच पोटच्या लेकरांचा साखरपुडा, त्यांचे विवाह, वाढदिवस व इतर विधींचे जाहिरातीकरण व ब्रॅण्डिंग केले जाते आणि कारण मुलांची स्वप्नपूर्ती, मुलांचे लाड, मुलांवरील प्रेम असे दिले जाते! हा निव्वळ ढोंगीपणा आहे. वास्तविक पाहता आमचे विवाह थाटामाटात करा असे त्यांची अपत्ये कधीही म्हणत नाहीत! (अपवादात्मक परिस्थिती सोडून देऊ) परंतु हा सर्व खटाटोप पालकांच्या प्रतिष्ठेसाठी असतोय हे सर्वसाधारण सत्य दिसुन येते. मुळात लेकरांच्या सुखात पालकांचे सुख असतेच कुठे? जर असे असते अर्थात हे सुख केवळ लटके ढोंगीपणाचे आणि सांगण्यापुरतेच असते की मी/आम्ही जे काही केले ते तुझ्यासाठीच केले. वास्तविक पाहता खरोखरच असे असते म्हणजे पालकांना त्यांचे सुख हवे असते तर ऑनर किलिंग झाले असते काय? यावरुन हे सिद्ध होते की, पालक आपल्या मुलाबाळांसाठी जे करतात त्यातील बहुतांश कृत्ये किंवा खटपट ही मुलाबाळांच्या सुखा समाधानासाठी किंवा त्यांच्या भवितव्यासाठी नसतेय तर ती स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी असतेय. यालाच आपण इंग्रजीमध्ये वाईल्ड डिझायर, हाय एक्सपेक्टेशन्स आणि इगो असे म्हणतो.

त्यामुळे "मी जे केले ते तुझ्यासाठी केले" हा युक्तिवाद किंवा "मी जे करतोय ते तुझ्यासाठीच करतोय हा युक्तिवाद ना केवळ खोटारडा आहे तर तो शुद्ध फसवणूक देखील आहे" आपण जे करतो ते आपल्या अहम भावामुळे, अहंगंडामुळे करतो. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी व इतरांना कमी किंवा स्वतःला श्रीमंतांच्या बरोबरीचे दाखविण्यासाठी, आपली इज्जत वाचविण्यासाठी, वाढविण्यासाठी आपण हा सर्व खटाटोप आपण करीत असतो. मुळात तर आपण आपल्या अपत्यांना जन्म "त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय देत असतो!" आणि मग आपल्या अपत्यासाठी काहीतरी करणे, खास करून त्यांचे संगोपन करणे, संवर्धन करणे, त्यांचे संरक्षण करणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना शिक्षणासह अन्न वस्त्र निवारा या मूलभूत जीवनावश्यक गरजा मिळवून देणे हे जन्मदाते म्हणून आपले कर्तव्यच असतेय! हे तर किंबहुना पशुपक्षी देखील आपल्या संततीसाठी करतातच ना?

परंतु मी तुला जन्म दिला, मी तुझ्यावर उपकार केला, मी तुझ्यासाठी काय नाही केले? आणि तू माझ्यासाठी काय केले? तू माझं काय नाव मोठे केले? तु मला काय मानसंमान मिळवून दिला? तुला जन्म दिल्याचा मला पश्चाताप होतोय! असे अतार्किक व अनैसर्गिक बोलुन आपण त्याच्यावर उपकाराचे व परकेपणाचे ओझे लादतो. मी जे केले ते तुझ्यासाठीच केले असे बोलून आपण त्याच्यावर आपल्या चुकांचे किंवा पापाचे गाठोडे लादतो व आपल्या अपयशाचा बदला आपल्या अपत्याने घ्यावा अशी एक प्रकारची दुष्ट अपेक्षा करून त्याच्यावर आपली स्वप्ने लादत असतो. निश्चितच हे पालकत्व नाही असे मला वाटते. हा व्यवहार आहे, हा स्वार्थ आहे असे मला वाटते. आपले अपत्य हे आपली संपत्ती नाही. आपण त्याचा हवा कसा वापर करू शकत नाही. आपण त्याच्यावर काहीही लादून त्याच्याकडून मनमानीपणे आपल्या अतृप्त इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेऊ शकत नाही पूर्ण करून घेऊ शकत नाहीत. आपल्या अपयशाचे खापर आपण त्याच्यावर फोडू शकत नाही व आपल्या प्रतिष्ठेचे शिखर गाठण्यासाठी आपण त्याचा सीडी म्हणून वापर करू शकत नाही! कारण या जगात प्रत्येक जीव हा एकमात्र व अद्वितीय आहे. प्रत्येकाची आपली आवड व क्षमता तसेच योग्यता भिन्न आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी खूप काही केले आहे, जे केले आहे व जे करीत आहे ते माझ्या क्षमते पलीकडचे होते परंतु मी ते तुझ्यासाठी केले असे बोलून एक प्रकारची सहानुभुती मिळवीणे किंवा आपल्याच लेकराला कायम आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दडपून ठेवणे याला आदर्श पालकत्व म्हणता येत नाही, याला जिम्मेदारी निभावणे किंवा काळजी करणे म्हणता येत नाही. तोच त्याच्या क्षमतेप्रमाणे आवडीप्रमाणे घडणारच आहे प्रत्येकजण काही ना काही घडतच असतो. आपण कधीही त्याची इतरांसोबत तुलना नाही केली पाहिजे.

आपण हा विचार केला पाहिजे की मुळात तर (काही अपवाद असतीलही) परंतु बहुतांश अपत्ये आपल्या पालकांना कधीही धनसंपत्ती, आराम मागत नाहीत. जे मागतात त्यांना सवय देखील पालकच लावतात! वास्तविक पाहता पाल्यांच्या गरजा छोट्या छोट्या असतात. चॉकलेट्स केक्स खाने, ज्युस पिणे, फिरणे हॉटेल्समध्ये खाणे, शूज गॉगल्स जीन्स वगैरे वगैरे फार तर फार घरात असलेल्या बाईकची एखादी चक्कर किंवा महाविद्यालयीन जीवनात गेल्यानंतर एखादी बाईक मागणे वगैरे वगैरे आणि तेही ते यामुळे मागतात की तुमच्याकडे ती क्षमता असते म्हणून मागतात. गरीब घरची लेकरे कधीही आपल्या आई-वडिलांना बाईक किंवा कार मागू शकत नाहीत. लेकरे कुठलीही असोत त्यांना आपल्या पालकांकडून हवे असतेय ते प्रेम! आपलेपणा! आपुलकी! विश्वास! संस्कार व सहवास आणि असे नाही घडले तर हिच लेकरे पुढे जाऊन एकलकोंडी बनतात, मनोरुग्ण बनतात व व्यसनाच्या किंवा चुकीच्या संगतीत जातात. चुकीच्या गोष्टीच्या आहारी जातात आणि दबाव सहन नाही झाला तर मग आत्महत्ये सारखे किंवा मग हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात! 

विश्वातील जवळ-जवळ प्रत्येकच मनुष्यप्राण्याला संपत्ती कमवायला आवडतेच. नव्हे ती त्याने कमविलीच पाहिजे परंतु ती कमवत असताना कोणत्या मार्गाने कमवावी? त्यासाठी किती वेळ द्यावा? किती कमवावी आणि ती कुठे खर्च करावी याचे गणित जमले पाहिजे. यामध्ये कुठेही अतिरेक किंवा असमतोल होता कामा नये. व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय व कुटुंबाच्या ठिकाणी कुटुंब ठेवता आले पाहिजे आणि जसे आपण यशस्वी आहोत किंवा जशा प्रकारचा संघर्ष आपण केला आहे तशाच प्रकारची अपेक्षा आपल्या मुलांकडून अजिबात नाही केली पाहिजे कारण इतिहास साक्षी आहे, जगातील अनेक यशस्वी लोकांची संतती सपशेल यशस्वी ठरलेली आहे! त्यामुळे आपल्या पाल्यांना आपल्यासारखे समजू नका कदाचित ते तुमच्यापेक्षा कंपवत असतील किंवा कदाचित ते तुमच्यापेक्षा अधिक वरचढ देखील असतील. सोबतच जर आपण गरीब असाल तर सांगा आपण गरीब आहोत. प्रामाणिकपणे सांगा. त्यांना नसलेल्या श्रीमंतीचे भ्रामक स्वप्न दाखवू नका. खोटे दर्शन घडवू नका, आव आणू नका आणि असलेली श्रीमंतीही थोडावेळ झाकून ठेवा. त्याला गरिबीची, साधेपणाची जाणीव करून द्या. त्याला आईबाप हवे आहेत. जेलर्स किंवा जज किंवा रिंग मास्टर नको आहेत हे तुम्हीही समजून घ्या. लेकरांना त्यांचे मन ओळखणारे, त्यांना वेळ देणारे व ते आहेत तसेच स्विकारणारे प्रेमळ मित्र हवे असतात. आई वडीलांनी आपल्या लेकरांचे मित्र बनायला हवे. असे जेव्हा घडेल किंवा घडते तेव्हा कदाचित ते त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्यक्षमता सिद्ध करून तुमची स्वप्ने पूर्ण करतील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे "मी जे करतो ते माझ्या लेकरा बाळांसाठी करतो हा दावा खोटा आहे" आपण जे करतो ते आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या ही स्वार्थासाठी, मोठेपणासाठी, स्वाभिमानासाठी, इभ्रतीसाठी आणि गर्वापोटी करतो असे माझे वैयक्तिक मत आहे.

पालकांचे काम लेकरांना ध्येय सांगायचे किंवा दाखवायचे नसले पाहिजे तर ते पाल्यांना ठरवून देण्याचे असले पाहिजे. त्यांचे ध्येय त्यांना ठरवू दिले पाहिजे व त्या ध्येयापर्यंत जाण्याचा रास्त मार्ग दाखवला पाहिजे. त्याला संघर्ष करू दिला पाहिजे. त्याचे विश्व त्याला निर्माण करू दिले पाहीजे. आयते यश, तयार संपन्नता माणसाला ना केवळ आळशी व निष्क्रिय बनविते तर बिघडविते देखील! पाल्यांची अतिव काळजी त्यांना घमेंडी, विद्रोही व गर्विष्ठ बनविते. भावनाशून्य बनपविते! त्यामुळे त्याचा मार्ग त्याला निवडू द्या व त्यावर चालु द्या आणि समजा त्याच्या असक्षमतेमुळे तो अयशस्वी ठरला तर वास्तव समजून घेऊन ते पचवा परंतु अपयशी, नालायक आहेस, तु माझ्यासाठी काय केलेस? तू माझे कोणते स्वप्न पूर्ण केलेस? अशा प्रकारचे उपरेपणाचे किंवा एक प्रकारे उपकार वजा प्रश्न आपल्याच मुला-बाळांना विचारणे टाळा. त्यापेक्षा आपण काय दिवे लावले? आपण किती आपल्या आई वडिलांची स्वप्ने पूर्ण केली याचे आत्म परिक्षण करा. आपल्यापेक्षा अधिक यशस्वी लोकांशी आपली तुलना करा म्हणजे आपल्यातील उणीवांची तुम्हाला जाणीव होईल. आणि समजा कदाचित स्वप्न पूर्ण केलीही असतील तुम्ही तर हेही तपासा की तुम्ही तुमच्या आई-वडिलांची किती सेवा केली आहे? त्यांना आपण किती सुख दिले हे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजेत. जसे मोठा अंत्यविधी करून किंवा मोठा दशक्रिया विधी किंवा वर्षश्राद्ध करून त्यांच्यावरचे प्रेम सिद्ध होत नाही तसेच मुलाबाळांचे आगाऊ लाड करून किंवा त्यांना मोठ्या शाळांमध्ये शिकून त्यांच्यावरील प्रेम किंवा आपलेपणा सिद्ध होत नाही तर सिद्ध होतो आपला अहंभाव अहम गंड गर्व अभिमान आणि आणि प्रतिष्ठेसाठीचा धूर्त स्वार्थ! त्यापेक्षा घरातील कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे, प्रेमपूर्ण व शांततामय ठेवा, मैत्रीपूर्ण ठेवा. आपल्या अपत्याला समजून घ्या. त्याची क्षमता, त्याची आवड समजून घ्या. दोन पिढ्यांमधील वैचारिक अंतर समजून घ्या. बदललेले पर्यावरण समजून घ्या. आपल्या पाल्यावर परिणाम करणारे विविध घटक समजून घ्या. नकारात्मक घटकांपासून त्यांना दूर ठेवा. आमची परिस्थिती वेगळी होती आता तुम्हाला काय कमी आहे? असा मुर्खपणाचा प्रश्न विचारू नका. आता स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे शिवाय भरकटवणारी साधणे वाढली आहेत. काही जैविक व पर्यावरणीय बदल निरंतर होत असतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय चाललेय ते ओळखण्याचा प्रयत्न करा. ते कोणाच्या संगतीमध्ये, सहवासामध्ये आहेत त्यावर लक्ष ठेवा. त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. त्यांच्यासमोर स्व-वर्तनातून एक आदर्श निर्माण करा जेणेकरून ज्याचे ते अनुकरण करतील. दुषणे देऊन, टोमणे मारून किंवा इतरांशी तुलना करून जीवन सुखी समाधानी व यशस्वी कधीही बनत नाही. उलट टोमणे मारून दूषणे देऊन इतरांशी तुलना करून त्यांचा आत्मविश्वास ते गमावतात तणावग्रस्त होतात स्वतःला कमी समजतात हताश निराश आणि वैफल्यग्रस्त होतात आपण आपल्या कुटुंबासाठी आणि या जगासाठी लायक नाही आहोत अशी नकारात्मक वृत्ती त्यांच्यात निर्माण होते आणि कधीकधी या सर्व परिस्थिती विरुद्ध ते विद्रोह देखील करतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मनात कुटुंबाविषयी समाजाविषयी एक प्रकारची घृणा असंतोष द्वेष भावना सूड भावना निर्माण होते. त्यापेक्षा ते जसे आहेत तसे स्वीकारा ते म्हणजे प्रत्येक जीव जो जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे आणि खास करून जन्मदात्यांनी तरी कारण त्यांनी जन्म घेतला नाही आपण त्यांना जन्म दिला आहे त्यामुळे त्यांना जाब विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही आपल्याला मात्र ते जाब विचारू शकतात हे कटू वास्तव किंवा एक नैतिक वास्तव आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे.  हे जीवन पुन्हा पुन्हा नाही त्यांचेही नाही म्हणजे पाल्यांचे ही नाही आणि पालकांचे ही नाही ही सरळ साधी बाब जर आपल्या लक्षात येत नसेल तर आपण माणूस म्हणून घेण्यास पात्र लायक नाही आहोत असे माझे स्पष्ट मत आहे. सकारात्मक सप्रेम सामूहिक यशप्राप्तीसाठी चा संघर्ष होणे अपेक्षित आहे. त्यायासाठी बालकांना एखादी मशीन समजून आदेश देण्यापेक्षा किंवा आपले हत्यार समजून वापरून घेण्यापेक्षा त्यांना समजून घ्या. त्यांना कोंडून ठेवण्यापेक्षा, बंदिस्त ठेवण्यापेक्षा, त्यांच्या मनाचे, भाव भावनांचे दमन करण्यापेक्षा त्यांना मुक्त श्वास घेऊ द्या. त्यांचे जीवन त्यांना जगू द्या कारण तो त्यांचा जन्मसिद्धच नव्हे तर नैसर्गिक अधिकार आहे. त्यांचे सामाजीकरण होऊ द्या. मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी फार जास्त औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. सत्य सांगायचे तर मी केवळ साडे चौदा वर्ष औपचारिक शिक्षण घेतले आहे! आणि या साडे चौदा वर्षांमध्ये मला आलेला अनुभव असा आहे की, जे जास्त उनाड आणि थोडीशी टपोरी मुलं-मुली होती, तीच अभ्यासात देखील पुढे होती! आणि जीवनाच्या स्पर्धेत तिच यशस्वी झाली! त्यामुळे आपल्या पाल्यांना दाबून दडपून ठेवू नका.

जर खरोखरच तुम्हाला त्यांची काळजी असेल तर त्यांना तुम्ही हौसेने किंवा गरज म्हणून प्राप्त करून दिलेली आधुनिक संपर्क साधने तो कशा पद्धतीने वापर वापरतोय त्या साधनांचा वापर तो कशासाठी करतोय याच्यावर लक्ष असू द्या तु कोणा सोबत मैत्री करतोय पुना मध्ये उठतोय बसतोय कुठे जातोय याच्यावर बारीक लक्ष ठेवा. जर तो समस्याग्रस्त वाटत असेल तर आधुनिक वैद्यकीय व मनोवैज्ञानिक सोयी-सुविधांची, पर्यायांची मदत घ्या. माझ्याकडून लेखनामध्ये बऱ्याचदा "तो" म्हणजे पुल्लिंगी शब्द आला आहे. वास्तविक पाहता मला तो व ती असे लिहायचे आहे परंतु लेखन ओघाने "तो" शब्द येतोय. या सर्व प्रकारांमध्ये मुली देखील मागे नाहीत हे प्रकर्षाने आपण समजून घेतले पाहिजे. मुलांच्या आणि मुलींच्या समस्या समान आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या चुकांवर पांघरूण घालू नका कारण वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो.

बाळासाहेब धुमाळ

मो. 9421863725.

No comments: