Friday 6 May 2016

सैराट परश्या-आर्ची by Balasaheb Dhumal

.........सैराट परश्या-आर्ची .....
आज महाराष्ट्र र्सैराटमय झाला आहे. परश्या आर्ची आणि नागराज यांची काहीजण स्तुती करत आहेत तर काहीजण टिका करत आहेत. पण मला वाटते नागराज मंजुळेंनी सैराटद्वारे समाजातील जातीपातीच्या भिंती तोडू पाहणा-या प्रेमींचा  समाजाकडून होत असलेला छळ आणि या प्रेम करणा-या मुला-मुलींना कुटूंबाकडून व समाजाकडून असलेल्या अपेक्षा सैराट मध्ये दाखवल्या आहेत. त्यांचा दाबला जात असलेला आवाज व कोंडला जात असलेला श्वास दाखवला आहे . सामाजिक विषमता हा या देशाला लावलेला कलंक आहे आणि दुर्दैवाने हा कलंकच आपल्याला बहूमान वाटतो आहे. मग जात कोणतीही असो, अगदी मलाही माझी जात ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ वाटते. रोटीबेटी व्यवहारात जातच पाया असते पण जातीचा पाया व्यवसाय आहे हे विसरलं गेलं. हा कलंक धुतला जाऊ शकतो हा विश्वास नागराजला आहे. ख-या अर्थाने नागराज हा केवळ एक दिग्दर्शक नसुन या भेदाभेदाने ग्रासलेल्या समाजाला प्रेमाने एकात्म करू इच्छिणा-या प्रेम पाखरांच्या पंखांना कसे छाटले जात आहे हे दाखवणारा दृष्टा उद्बोधक आहे. सैराट अशा पाखरांच्या पंखांना बळ देणारा प्रेरक ठरणार आहे. मुळात नागराज हाच या समाजाला नकोसा झालेला, या समाज रचनेचा बळी होता. हे त्यानेच सांगितले आहे. ज्याने हे सर्व अनुभवले आहे असा तो एक खंबीर प्रबोधनकारी, क्रांतिकारी, समाज सुधारक आहे. आता तो कुणाला बोचतोय तर कुणाला टोचतोय पण त्यात त्यांचाही दोष नाही. जातीचा पगडाच एवढा घट्ट आहे की त्यामुळे निर्माण होणारी अमाणुषता न जाणवण्या इतपत मने बोथट झाली आहेत आपली.
मुख्य म्हणजे कोणी कोणाला पळवुन नेहले अथवा कोण कोणासोबत पळून गेला हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की का आपल्या इच्छेनुसार जिवनसाथी निवडू दिला जात नाही? का प्रेमाला विरोध केला जातो? सैराट मध्ये कोळी-मराठा दाखवले आहेत परंतू मराठा ऐवजी इतर जातीतील मुलगी असती तरीही स्थिती काही वेगळी नसती. वास्तविक पाहता किमान प्रेम प्रकरणांमध्ये तरी मुलीच्या घरच्यांकडून जातीऐवजी मुलाचा स्वभाव, त्याचे आचरण, विचार, देखणेपण, शरीरयष्टी, कर्तृत्व आणि योग्यता पाहायला हवी. मुलीच्या बाबतीतही असेच काहीसे!  सैराट मधील परश्या देखणा, हुशार, सुस्वभावी, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, मदतगार वृत्तीचा, निर्व्यसनी मुलगा होता. त्याच्या विचारांना आदर्शाचे अधिष्ठान होते हे त्याच्या व त्याच्या शिक्षकामधील संवादातून दिसुन येते. मात्र केवळ त्याच्या जातीमुळे व गरिबीमुळे त्याला डावलले गेले. अशावेळी घरच्यांच्या हे का लक्षात येत नाही की ते दोघे परस्परांवर जिवापाड प्रेम करत आहेत, त्यातच त्यांचे सुख आहे आणि त्यांच्या सुखात आपले सुख असायला हवे. दुसरे म्हणजे आर्ची-परश्याने त्यांचा निर्णय योग्य आहे हे सिद्ध करून दाखविले होते. त्यांना मुलगा झाला होता, आर्थिक प्रगतीही झाली होती शिवाय त्यांनी घरच्यांकडून काही अपेक्षाही केली नव्हती तरीही त्यांना जिव गमवावा लागला!!! काय चुक होती त्यांची? थोडेसे अपरिपक्व वयातील प्रेम एवढीच काय ती टिका करायला जागा !!
सैराटची कथा ही जवळजवळ प्रत्येकानेच आपापल्या जिवनात अनुभवलेली आहे. जात वेगळी असल्याने व आर्थिक विषमता असल्याने असे कित्येक परश्या-आर्ची सोबत जिवन जगू शकले नाहीत व ज्यांनी तसे धाडस केले त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. पण आता हवेने आपली गती व दिशा बदलली आहे , तुम्हाला मला जे जमले नाही ते आजचे तरूण करून दाखवतील आणि पुढील काही वर्षांत या भेदाभेदाच्या भिंती आपोआप ऊळमळून पडतील यात शंका नाही.
नागराजला विरोध करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने चिंतन व आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, मीही. कारण आर्ची-परश्याचे सैराटपण प्रातिनिधीक आहे ते चित्रपटाद्वारे नागराजने मांडले आहे.
साधी गोष्ट आहे मित्रांनो ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांनी स्वतःत बदल केला पण आपण स्वतःला बदलायला तयार नाही आहोत. किमान प्रेम प्रकरणांत तरी हा पुरूषी अहंकार व स्वतःला श्रेष्ठ समजण्याची जुलमी अहंकारी वृत्ती सोडली जावी असे मला वाटते. बाकी ज्याचे त्याने ठरवावे.
समाज चित्रपटाने बिघडत नाही, तसे असते तर समाज खुपच सुधारलेला असता !!! प्रश्न आहे बोधाचा तर  समाजाने आता तरी जातियवाद सोडायला हवा! सैराट हा प्रस्थापित आणि विस्थापित अशा नजरेतून पाहीला तर दाहक वास्तवाचा प्रत्यय यईल.
आर्ची जे या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र आहे ते एक केवळ स्री पात्र नाही तर ते एक मत आहे आजच्या स्त्रीचं! जी विचाराने अत्यंत परिपक्व आहे, धाडसी निर्भीड आणि स्वतःच्या विचाराने वागणारी आहे. जी कोणाला घाबरत नाही, कोणाच्या दबावाखाली रहात नाही. जी समर्थ आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेवून ते योग्य आहेत हे सिद्ध करायला. जीला जाणीव आहे भारतीय संस्कृतीची, जी धैर्याने तोंड देऊ शकते संकटांना! ! जी कष्टाळू आहे, पतीच्या पावलावर पाऊल टाकत त्याला शेवट पर्यंत साथ देण्यास कटिबद्ध आहे. पण युगानुयुगे जे दमन होते आहे तिच्या भावभावनांचे आणि चिरडले जाते आहे तिच्या स्वप्ननांना ! या सर्वांना ती वैतागली आहे आणि बंड करून उठण्यास आतुर आहे. अशा मुलीचा मानस आणि अयशस्वी संघर्ष नागराजने उत्तमरीतीने मांडला आहे. पुरूषी मानसिकतेपुढे हारली ती, पण चणुक दाखवून गेली आपल्या क्षमतेची आणि देऊन गेली एक हिंमत तिच्या सारख्या अनेक आर्चींना!!
शिवाय आपण याचाही विचार करायला हवा की, परश्या-आर्ची चा निरपराध अनाथ मुलगा काय साधु संत विचारवंत किंवा सुधारकच होईल का? ? जर तो नक्षलवादी आतंकवादी वा चोर लुटारू दरोडेखोर अथवा विक्षिप्त मानसिकतेचा मनोरुग्ण गुन्हेगार निघाला तर नवल ते काय? त्यात त्याचा तरी काय दोष असेल? खुप कमी नागराज असतात जे समाजाला ते नको होते तरी आज समाजाचे प्रबोधन करताहेत. बहूतांश नागराज व परश्या-आर्चीचे लेकरं विद्रोहच करतात! ! त्यामुळे हे परश्या-आर्चीचे सैराटपण समजून घ्यायला हवे असे मला वाटते.

शब्दांकन: बालासाहेब सिताराम  (बी.एस.) धुमाळ
मो. 9421863725

No comments: