Sunday, 8 May 2016

मातृभक्त परशुराम by Balasaheb Dhumal

=======मातृभक्त परशुराम======

            आज भगवान परशुराम महाराजांची जयंती आहे. भगवान परशुराम जे विष्णुचे सहावे अवतार होते ते आपल्या आईवर अत्यंत प्रेम करत असत. पिता जमदग्नी  ऋषी व माता रेणूका यांचे ते पाचवे पुत्र होते, अशी आख्यायिका आहे की, त्यांच्या आश्रमातुन ते आश्रमाबाहेर असताना तेथील राजा सहस्त्रार्जुन याने आश्रमातील कामधेनू नावाची गाय आश्रमावर हल्ला करुन व जमदग्नी ऋषींचा वध करुन पळवून नेली. पतीच्या निधनाने माता रेणूका सती गेली. आईच्या विरहाने व्याकुळ भगवान परशुराम  शोक करु लागले . तेव्हा त्यांचे मातृप्रेम पाहून आकाशवाणी झाली की "तुला तुझी आई भुमीतून वर येवून दर्शन देईल मात्र तु मागे वळून पाहू नकोस". मात्र काही वेळाने परशुरामांनी मागे वळून पाहीले तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोके वर आले होते. म्हणून आजही आपण रेणुका मातेचे फक्त शिर अर्थात 'तांदळा' एवढेच रुप पाहतो.
अशी ही आख्यायिका आहे की, पुजेला नदीवर पाणी आणायला गेलेल्या रेणुका मातेला यायला उशिर झाला म्हणून संशयाने क्रोधीत होऊन जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलांना मातेचे शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. मात्र पाचही पुत्रांनी नकार दिला, त्यांचा जमदग्नीने वध केला. सहावा पुत्र परशुराम हा अत्यंत बुध्दीमान, शुर व आज्ञाधारक होता. वडीलांचा राग ओळखून त्याने मातेचा शिरच्छेद केला. त्या नंतर पित्याकडून वर मागून भावंडासह मातेस जीवंत केले. येथे जमग्दनी ऋषींच्या क्रोधाचे कारण रेणुका मातेने तुलसी बागेकडे दुर्लक्ष केल्याने बाग करपली. म्हणून जमग्दनी क्रोधीत झाले असे ही सांगितले जाते.
तिसरी एक आख्यायिका अशी आहे की, पुत्र परशुरामाकडून आपल्या पत्नीचे शिर उडविल्या नंतर जमग्दनी ऋषी पत्नी विरहाने व्याकूळ झाले व पश्चातापाच्या आगीत होरपळून पुत्र परशुरामाला रेणुका मातेला जीवंत कर म्हणून विणवणी करु लागले. तेव्हा परशुराम महाराज, मातेचे शिर जे उडून स्वर्गात गेले होते त्याच्या शोधात स्वर्गात जातात व देवांशी चर्चा करुन यावर उपाय शोधतात. देव गणांनी त्यांना मातेच्या शिराचा जागर करण्यासाठी गोंधळ घालण्याचे सुचविले. मग ब्रम्हा विष्णु महेशासह भगवान परशुरामांनी विश्वातील पहिला 'गोंधळ' स्वर्गात घातला.  अशाप्रकारे देवीचा गोंधळ अस्तिवात आला व तो घालणारी गोंधळी जात जन्मास आली. म्हणजे 'भगवान परशुराम हे आद्य गोंधळी होते' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र माता रेणुका आपल्या मागे खरोखरच येतेय का ? या कुतूहलातून परशुरामाने मागे वळून पाहिले आणि माता रेणुका तेथेच लुप्त झाली. ते ठिकाण म्हणजे आजचे माहूर जे पूर्वी मातापूर म्हणून ही ओळखले जात होते.
अशा अनेक आख्यायिका आहेत. मात्र आख्यायिका अनेक असल्या तरी भगवान परशुराम हे अत्यंत विदवान, शुर, आज्ञाधारक व मातृप्रेमी पुत्र होते हे स्पष्ट होते. आज त्यांची जयंती भारतभर व भारताबाहेरही अत्यंत हर्षोल्हासाने साजरी केली जात आहे. "गोंधळी" जात ही मातेची भक्त असल्याने गोंधळी समाज बांधवांत तर आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे.
आजच्या दिवसाचे आणखी एक विशेषत्व म्हणजे आज 'आंतरराष्ट्रीय मातृदिन' आहे. रेणुका मातेला जगदंबा, जगदमाता व आदिशक्ती या नावांनी ओळखले जाते. म्हणजेच जगदंबा ही सर्व विश्वाची आई आहे. आईचे आपल्या सर्वांच्या जिवणात अत्यंत मानाचे स्थान आहे. आई म्हणजे हे सांगताना कितीही मोठा विदवान असला तरी तो शब्दहीन होतो.
आईचे वर्णन करताना तिला अनेक शब्दकारांनी अनेक उपमा दिल्याचे आपण वाचतो. आईला सर्व गुन्हे माफ करणारे न्यायालय, स्वत:च्या मनाचा आरसा, दुधावरची साय, लंगडयाचा पाय, चालते बोलते विश्वविद्यालय असे  संबोधले  जाते. काहींनी तर आईला ब्रम्हा विष्णु महेश्वराची उपमा दिली आहे तर काहीजणांनी आईला कधीही न सरनारी व कधीही उरणारी शिदोरी असेही संबोधले आहे. साने गुरुजींनी आपली आई अत्यंत भावस्पर्शी सांगितली आहे. आईचे आपल्यावर एवढे उपकार असतात की, तिच्या एका जन्माचे उपकार आपण हजार जन्म घेतले तरी फिटत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या परीने तिची वर्णन करतो व तिची थोरवी गातो. म्हणजे बघाना जर आपल्याला कुठे इजा झाली वा वेदना होवू लागल्या की आपल्या मुखातून अलगद ध्वनी बाहेर येतो तो “आई”! अशा या आईला विनम्र नमन. ....
शेवटी सर्वाना भगवान परशुराम महाराज जयंतीच्या व मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. या लेखाचा शेवट मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात असताना केलेल्या कवितेने करतो.

 ..............आई...............

जिने निर्मियले शब्दां, ती ब्रम्हरुप आई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

पोसण्या चिमुकल्या तान्हया
जी रात्रीचा दिस करी
कोमेजता बाळ जराही
जी रात्रभर जागी राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

न असे स्वत:चे भान
केवळ चिमुकल्यावरीच असे ध्यान
जी नयनात तान्हुल्याच्या
उषत्काल उद्याचा पाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

जी जगे तान्हयाकरीता
नसे ध्येय आगळे जीवणाचे
वाढविण्या पोटचा गोळा
अवघे आयुष्य आपले वाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

उन्हात स्वत: राही
छाया चिमुकल्या देई
न होवोत त्रास इवल्या
करीता स्वयं कष्ट घेई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

वस्त्र मिळोत तीच्या बाळा
करिता स्वत: चिंधी लेई
निजविण्या पाडसा तिचिया
जी अखंड अंगाई गाई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

सुखात कधी तर कधी दु:खात त्याच्या
वर्षावात यशाच्या तर पुरात आसवांच्या
बाळा देई स्थान आई आपुल्या -हदयी
वेडी जगावेगळी त्याच्याच वृष्टीत न्हाई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही

मांगल्यमुर्ती आई,
कैवल्य किर्ती आई
अमृत बिंदू आई,
निस्वार्थ सिंधू आई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

हकी जीवण नौका सकलांची
करुनी त्याग अण समर्पण
जी भ्र् ही न काडीता मुखातून
डोंगर दु:खाचा साही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

सरता गरज घरटयाची,
पाखुरे सोडूनी जाती
स्वार्थ पाहती आपुला
तोडूनी सर्व नाती
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

इतरांस्तव मोठे
पण आईस तरीही छोटे
सहन करी सर्व
जरी जिवाची होतसे लाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

मी पामर सान एैसा
महती तिची काय वर्णू?
परी सांगतो एतुके, सर्वस्व माझे आई
हर क्षण आईविरहाचा करीतसे मजला त्राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

मागणे हे ईश्वरा, असू देत तुजा आसरा
परी माफ कर मजसी, स्थान तिला तुज आदी
करीतो नमन देवा, माऊलीस कोटी कोटी
उपकार जिचे फडने, सहस्त्रजन्म शक्य नाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

प्रार्थना तुजला देवा, दे जन्म सदैव तिच्या पोटी
न सुचोत शब्द मजला, वर्णया तिजसाठी
वाहती नयनी अश्रु अन बुध्दीच जड होई
विरहात तिच्या हे कोकरु कदापि न राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

शब्दांकन - बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ
    मो.न.  - 9421863725

No comments: