Sunday 1 May 2016

दुसरी पारी

सुर्योदय दररोज होतो, सुर्यास्तही दररोज होतो. पण जेव्हा एखादा सुर्योदय मनात विचित्र हुरहुर घेवून येतो. दररोजच्या कामाची गती मदांवतो, लगबग कमी करतो, जेव्हा कार्यालयात आपल्या टेबलवर कतृज्ञतेच्या भावनेने सेवानिवृत्तीबददल शुभेच्छांचे गुच्छ यायला लागतात तेव्हा आजचा दिवस आपला कार्यालयातील शेवटचा दिवस आहे हे वास्तव पटत नाही. आजवर येथील प्रत्येक टेबल, फाईल, कपाट  हेच आपले विश्व होते, त्यावर आपला अधिकार होता जो उद्यापासून नसेल यावर विश्वास बसत नाही. वास्तविक पाहता कुण्याही कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक व्यक्तीस सेवानिवृत्ती दिवशी आनंद कमी व दु:ख अधिक होते. ज्याच्या डोळयाच्या कडा ओल्या होणार नाहीत असा एकही व्यक्ती आढळत नाही.
 आजवर आपण आपल्या आयुष्याचे हिरो असतो कुटूंबाच्या समस्या, अडचणी, वाटचाल, आरोग्य, इच्छा-आकांक्षा यांची आपण काळजी घेतो. मर्यादित वेतनात आपल्या कुटूंबाचा गाडा चालवून स्वपनांच्या पूर्ततेसाठी थेंब थेंब बचत करतो. मुलांचे शिक्षण, त्यांचे करिअर व दोनाचे चार हात करण्यासाठी राबराब राबतो. पण यापुढील भूमिका आपल्याला  सहकलाकार म्हणून पार पाडायची आहे यावर आपला लवकर विश्वास बसत नाही.सुखरुप सेवानिवृत्त झालो याचा आनंद जरी असला तरी उद्यापासून काय ? माझा वेळ कसा जाईल? स्वत:सह कुटूंबाला घडयाळयाच्या काटयांबरोबर धावण्याची लागलेली सवय कशी मोडेल ? हे प्रश्न डोक्यात थैमान घालतात.
वस्तु: सेवानिवृत्ती ही अविश्वसनिय जरी असली तरी ती निश्चित असते. जसा जन्मासोबत मृत्यु निश्चित असतो, तशीच नेमणूकीसोबत सेवानिवृत्तीही निश्चित असते. ते एक कटू वास्तव असते ज्याचा स्विकार हा प्रत्येकाला करावाच लागतो. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात जाण्यासाठी त्या व्यक्तीची अपत्ये, सुन, नातवंडे चांगली असावी लागतात.आजवर घरातील प्रत्येक लहान मोठे निर्णय परवानगी घेवून अथवा कल्पना देवून घेतलेले असतात. मात्र जर कुटूंबाकडून सेवानिवृत्तीनंतर वेगळी, दुय्यम वागणूक दिली गेली तर अशा वेळी मन दुखावते, मनस्ताप होतो, चिडचिड होते. कमी झालेली कमाई, आर्थिक चणचण आणि काही गोष्टी तरुणपणीच का केल्या नाहीत याचा पश्याताप, गेलेली वेळ, काही चुकलेले निर्णय, आरोग्याच्या सुरु झालेल्या कटकटी व्यक्तीला हतबल करतात. कुटूंबाची घडी निट असेल तर ठिक नाही तर अनिच्छेने अनेकजण वृदधाश्रमाचा  रस्ता धरतात.
पण असे म्हटले जाते की, कर्तृत्तववान माणसाच्या सेवापुस्तकेत निवृत्ती हा शब्द कधीच येत नाही. सेवानिवृत्ती ही एका अर्थाने जिवणाची एक नवी सुरुवात असते. नव्याने जीवन जगण्याची एक नवी संधी असते.  सेवा काळातही समस्या होत्याच ना ? त्या आपण यशस्वीपणे सोडवितो, मग सेवानिवृत्तीनंतर च्या समस्या आपण सोडवू शकत नाही का? जुण्याची नव्याशी सांगड घालता आली, अतिव स्वाभिमान टाळला तर जनरेशन गॅप नावाची समस्याही येत नाही.
पर्यटन, अध्यात्मिक व सामाजिक कार्य, स्वभावातील थोडीशी लवचिकता, प्रदिर्घ अनुभव व परिपक्व बुध्दीमत्तेच्या जोरावर जीवणाच्या कसोटी क्रिकेटच्या दुस-या पारीची सुरूवात जर आत्मविश्वासाने केली तर जीवनात कधीही दुःख, उदासी व हताशा वाट्याला नाही.

शब्दांकन -  बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ
मो.न. 9421863725

No comments: