Thursday, 22 March 2018

काव्य

.........काव्य.........

काव्य ना शब्दांचा खेळ
ना वाक्यांचा सुसंगत मेळ.
काव्य दृश्यरूप मनांचे
सर्वस्व कवी जणांचे.

विश्वची न्यारे याचे
अलंकार अक्षर मोत्याचे.
जरी संपन्न जनु कुबेरं
झोपडीत अपुल्या फकीरं.

सत्य शब्दांत येते जेव्हा
तेव्हा काव्य जन्म घेई.
मन स्वप्नात रमते जेव्हा
काव्य लेखणी मुखी येई.

हतबल हताश उदासीन
मन काव्यासवे जोडी नाते.
जन हिणवीतसे हसुनी
काव्य क्रांतीस जन्म देई.

वसे निर्मळ अंतरी
काव्य सद्गुण संतरी.
कौतुक असो वा टीका
काव्य राही समांतरी.

काव्य सुरेल भावगीत
काव्य पावन रम्य प्रीत.
दुःख वेदनांचा अंत
काव्य दैवी दवा अद्वैत.

काव्य प्रेरणा क्रियेची
संमती मुक प्रियेची.
काव्य संवाद आत्म्याचा
दिव्य प्रसाद परमात्म्याचा.

सर्वठायी काव्य वसे
सर्वव्यापी काव्य असे.
संगीत बेमोल असते
जर गीत अबोल असते.

करुण केविल शोषित
काव्य भगवंताचे प्रेषित.
-हदयदाह जेव्हा होई
 काव्य सौम्य फुंकर घाली.

चिंब आसवे निशब्द
काव्य हास्यही अव्यक्त.
समागम सम मनांचे
बंद रेशीम कवनांचे.

कवीः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

Wednesday, 21 March 2018

विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी

..........विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी..........

मित्रांनो नमस्कार मी नुकताच "आधुनिकीकरणाचा उदय अन लोकजीवनाचा अस्त" नावाचा लेख लिहिला होता. त्यापूर्वी "लोककला" नावाची कविताही लिहिली होती. दोन्हीला ही आपण भरपूर प्रतिसाद दिलात  त्याबद्दल धन्यवाद.

भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षणाबाबतीत मुळातच अज्ञानी आहेत. त्यांना ज्ञान आहे मात्र आपापल्या क्षेत्रातील. जसे की कला कसरत कारागिरी नकला करमणूक खेळ इत्यादींमधील. प्रचलित अर्थाने आपण शिक्षण म्हणतो ते पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण या जमातींमधील खूप कमी लोकांकडे आहे. बहुतांश लोक अज्ञानी व मागास आहेत. आधुनिकीकरण व त्याच्याशी संबंधित इतर बदलांमुळे या जमातींच्या जीवनमानात संकटे निर्माण झाली आहेत. याचा लेखाजोखा आपण यापूर्वीच घेतला आहे.

आधुनिकीकरण यांत्रिकीकरण संगणकीकरण औद्योगीकरण शहरीकरण आवडीनिवडी मधील व कायदे यामुळे समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख असलेले ग्रामीण लोकजीवन व या लोकजीवनाचा मूळ आधार असलेल्या भटक्या विमुक्त जमाती अत्यंत वाईट पणे प्रभावित झाल्या आहेत. बारकाईने पाहिल्यास असे आढळून येईल की सर्वच भटक्या विमुक्त जमाती केवळ हिंदुत्ववादीच नाहीत तर त्याचबरोबर त्या हिंदुत्वाच्या मुख्य प्रचारक व प्रसारक आहेत. या देशाची एक गौरवपूर्ण सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात व वैविध्यपूर्ण देश म्हणून भारताची ख्याती जगभरात निर्माण करण्यात या जमातींचा मोलाचा वाटा आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्यनिर्मित तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या जमातींचा सिंहाचा वाटा आहे. पुढच्या पिढीला आपला जाज्वल्य इतिहास माहीत व्हावा व त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून या जमातींनी विविध कला जसे की लेखन गायन वादन नर्तन चित्र-शिल्प नकला कसरती यांद्वारे आपल्या समृद्ध संस्कृतीची पुढच्या पिढीला ओळख करून दिली आहे. मात्र जगाच्या महासागरात आधुनिकीकरणाचे वादळ आले व त्याचा अनिष्ट परिणाम लोकजीवनावर होऊन या भिक्षुक कलाकार नकलाकार कसरतीकार कारागीर जमाती परिवर्तनाच्या लाटांसरशी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून विलग होऊन किनाऱ्यावर फेकल्या गेल्या, बाजूला फेकले गेल्या.
आज रोजी जवळजवळ सर्वच भटक्या विमुक्त जमातींचे पारंपारिक व्यवसाय संपुष्टात आले आहेत. खरेतर शासनाने व समाजाने या जमातींच्या पारंपरिक व्यवसायाकडे केवळ एक उपजीविकेचे साधन म्हणून पाहण्यापेक्षा एक प्राचीन कलासंस्कृती म्हणून पाहायला हवे. ती संपुष्टात येणार नाही यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. लोककला वाढावी विस्तारावी फैलावी असा दृष्टिकोन सरकारचा असावा व त्यादृष्टीने धोरणे योजना व कार्यक्रम आखले जायला हवेत. ही जशी शासनाची जिम्मेदारी आहे तशीच ती आपली ही जिम्मेदारी असावी. आपणही स्व स्थितीबाबत जागरूक असायला हवे.
जगाच्या प्रवासाची दिशा तर आपण बदलू शकत नाही. परिवर्तन हे होण्यासाठीच असते ते झालेच पाहिजे व बदलत्या काळाप्रमाणे आपणही स्वतःमध्ये परिस्थितीनुरूप बदल घडवून आणले पाहिजेत. आपले अस्तित्व टिकवायचे असेल, जीवन जगायचे असेल तर हाताला काम मिळविले पाहिजे व त्यासाठी मागणीप्रमाणे स्वतःला घडविले पाहिजे. उदर्निवाहाची पर्यायी साधने जी आधुनिक जगाच्या मागणीशी सुसंगत असतील अशी साधने शोधली पाहीजेत. हाच आपल्या स्थिती बदलाचा खरा मार्ग आहे.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आलेले आधुनिकीकरण, त्यातून झालेले विस्थापन व करावयाचे पुनर्वसन या शृंखलेतील पहिली कडी आहे शिक्षण! शिक्षण मग ते दोन्ही प्रकारचे, एक पारंपारिक लोकशिक्षण पण नव्या रूपात नव्या रंगात नव्या ढंगात घेतले पाहिजे. शिक्षण म्हणजे प्रचलित शालेय व महाविद्यालयीन शिक्षण. शिक्षण घेत असताना व्यवसाय व तंत्र शिक्षणाकडेच ओढ असली पाहिजे. जे शिक्षण हाताला काम देऊ शकत नाही असे टाकाऊ व रद्दी शिक्षण घेण्यात काही अर्थ नाही. यासाठी सरकारकडे संघटितपणे मदत मागायला हवी. समाजानेही आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवली पाहिजे. सरकार पिचलेल्या जमातींसाठी विविध योजना राबविते मात्र त्या योजना कोणत्या? त्यांचे पात्रता निकष व प्राप्तीसाठी ची प्रक्रिया काय असते हे या समाजातील गरजू व अज्ञानी लोकांना माहीत नसते. म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहोचून शासन करत असलेल्या उपायांची माहिती थेट जमीन स्तरावर जाऊन द्यायला हवी व समाजातील जागरूक तरुणांनी व संघटनांनी देखील आपल्या समाजाला या योजनांचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल यासाठी पुढाकार घेऊन गरजू लाभार्थ्यांना सहकार्य केले पाहिजे. अगदी निस्वार्थ भावनेने आपले सामाजिक दायित्व समजून!
सहकार हे असे क्षेत्र आहे जे अनेक हातांना काम तर मिळवून देऊ शकते. शिवाय बचत व ऐनवेळी अर्थोत्पत्तीची सोयदेखील करून देऊ शकते. सहकार म्हणजे अगदी मोठमोठे कारखाने गिरण्या पतपेढया किंवा बँकाच नव्हे (असतील तर छानच) पण लहान लहान बचत गट बी.सी.गट किंवा आर.डी.गट हे देखील सहकारच आहे.
बचत गटांनी त्यांच्या प्रदेशातील मागणीप्रमाणे सेवा पुरविणे, उत्पादन पुरविणे अशी कामे केली पाहिजेत. यात महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. छोटी छोटी उत्पादने जी कुटिरोद्योग लघुउद्योग या क्षेत्रात येतात असे व्यवसाय करायला हवेत. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर पापड लोणचे तयार मसाले चटण्या, चटया सजावट नक्षीकाम रांगोळी काम दुध डेअरी चालवणे, दुधाचे पदार्थ बनविणे मेणबत्ती अगरबत्ती गोळ्या चॉकलेट्स बिस्किटे वड्या फुटाणे शेव असे खाद्यपदार्थ बनवणे. बंदिस्त पशुपालन व पक्षीपालन करणे असे व्यवसाय महिला पुरुषांनी एकत्र येवुन करायला हवेत. उत्पादने तयार करणे ती व्यवस्थित साठवून ठेवणे वाहतुकीची साधने उत्पन्न करणे बाजारात घेऊन जाणे इत्यादी कामे व्यवस्थित झाली म्हणजे व्यवसाय यशस्वी होतो. राहता राहिला प्रश्न भांडवलाचा तर त्यासाठी सहकारी धोरणावर अनेकांनी एकत्र येऊन भांडवल उभे करायला हवे. प्रसंगी बँकांकडून कर्ज घ्यायला हवे.
मी हमेशा सहकारी दुकाने ही संकल्पना मांडली आहे. एकापेक्षा अधिक समाजबांधवांनी एकत्र येऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे दुकान व्यापार व्यावसाय ते अगदी अगदी उद्योग सुरू करावेत. गुंतवणूक व निर्मितीप्रक्रियेतील खर्च समान करावा व नफा देखील समान वाटून घ्यावा. आपण जैन मारवाडी सिंधी कोमटी लोकांचा आदर्श घ्यायला हवा. सर्व व्यवहार पारदर्शक व काटेकोरपणे प्रामाणिकपणे एका आईच्या लेकराप्रमाणे केले तर सहकारी व्यवसाय ही संकल्पना अत्यंत यशस्वी होईल व आपला समाज प्रगत व मोठ्या व्यावसायिकांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत अर्थात ज्या ठिकाणी आपण देऊ शकतो तेथे ते दिले पाहिजे. दान केले पाहिजे देताना केवळ पैसाच देणे अभिप्रेत नाही तर पैशाबरोबरच सल्ला संधी मार्ग साधने उपलब्ध करून दिली तरी ते दानच ठरते. विशेष म्हणजे मदत ही एक गरीब सुद्धा दुसऱ्या गरिबाला करू शकतो!! दान करण्यासाठी आपण श्रीमंत असायला हवे अथवा आपण श्रीमंत असायला हवे असे नाही. पैसेच दिले पाहिजेत असे अभिप्रेत नाही. माणसाने एकवेळ खिशाने गरीब असायला हरकत नाही मात्र मनाने नेहमी धनाढ्य असावे. तसेच प्रत्येक वेळी आपल्यालाच काहीतरी कोणीतरी दिले पाहिजे ही स्वार्थी अपेक्षा बाजूला ठेवून कधी-कधी आपणही कर्ण, आपणही धर्म, आपणही राजा हरिश्चंद्र यांच्या भूमिकेत यायला हवे.

आपल्या अपयशाचे खापर इतरांच्या माती फोडण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आपण पुरेशी मेहनत घेत नाही आहोत. आपला मार्ग चुकतो आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. बऱ्याचदा एकाकी राहूनही माणूस विकासाच्या प्रवाहापासून अलिप्त राहतो व मार्ग भरकटतो. परिणामी अपयशी होतो. त्यामुळे समूहात राहा. आपल्यापैकीच सुधारलेले, प्रगत लोक, कसे सुधारले? त्याचा अभ्यास करा, त्यातून बोध घ्या व त्यांचे अनुकरण करा. सुधारितांनीही बिगर सुधारीतांना मोकळ्या मनाने सहकार्य करा. म्हणजे आपला समाज नक्कीच मुख्य प्रवाहात येईल.

मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपापसातील तसेच कुटुंबातील हेवेदावे भांडणे रुसवे-फुगवे छळ मानसन्मान यापासून दूर राहा. हे समजून घ्या की या पृथ्वीतलावर आपले अस्तित्व अत्यंत थोडा काळ आहे. केवळ 60 ते 65 वर्षे या ग्रहावर आपण राहणार आहोत. त्यातील अर्धा काळ हा झोपेत जाणार आहे. राहिलेल्या काळात शिक्षण संघर्ष व संसार सुखदुःखे स्वप्ने कर्तव्ये स्वतःची ओळख निर्माण करणे इत्यादी भरपूर कामे करावयाची आहेत. त्यामुळे नको त्या गोष्टीत स्वतःचा वेळ वाया घालवू नका. बराच वेळ म्हातारपणातील आजारपण व मृत्युशय्येवरील झोपण्यात देखील जाणार आहे. जिवनाकडे डोळसपणे पहा. त्यामुळे उगाच कोणाला त्रास देऊ नका. नको त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका. स्वतःही आनंदी राहा व इतरांनाही आनंद द्या.

विधात्याने दिलेल्या मन बुद्धी व शरीराचा दिलेल्या मर्यादित कालावधीत म्हणजे ज्याला आपण जीवन असे म्हणतो त्यात योग्य असा वापर करून भाग्याने मिळालेल्या मानवी जन्माचे सोने करून दाखवा. जीवन स्वर्गासारखे बनवावे कि नर्कासारखे हे आपल्याच हाती आहे. फक्त ते आपण ठरवायला हवे. स्वर्गात जाण्यासाठी फार श्रद्धावान असण्याची गरज नाही. उपास-तापास करणे गरजेचे नाही. कामधंदा सोडून देवदेव करणे, मोठे मोठे धार्मिक खर्च करणे आवश्यक नाही. आणि स्वर्गात जाण्यासाठी मद्यासारख्या (दारू) साधनांची तर अजिबात आवश्यकता नाही. कृपया व्यसनापासून खूप दूर राहा मग व्यसन ते कोणतेही असो, नशा जुगार अथवा इतर कोणतेही व्यसण हे विनाशाचे प्रवेशद्वार असते. हे लक्षात घेऊ. क्षमा करा मात्र मी पाहतो आपला भटका-विमुक्त समाज अंधश्रद्धा व व्यसन यांचा बराच गुलाम झाला आहे. समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सुज्ञ लोकांनी खासकरून तरुणांनी संघटनांनी पुढाकार घेऊन शिक्षण व प्रबोधनातून समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे.

हे वरील काही उपाय आपण स्वतः करावयाचे आहेत कारण जोवर आपण जागे होणार नाही तोवर आपली प्रगती होणार नाही. समाज म्हणून जी सामाजिक जिम्मेदारी किंवा सामाजिक दायित्व आपण पूर्ण करावयाचे असते ते पुर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाज संघटित असला पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. समाजामध्ये वैचारिक देवाणघेवाण चर्चा चिंतन-मनन बैठका आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. भेटून बोलून समान योजना कार्यक्रम बनविले पाहिजेत. उपाययोजना व त्यांची अमलबजावणी यावर अभ्यासपूर्ण असे विचार मंथन व्हायला हवे. थोरांचा आदर करणे, कौटुंबिक जिम्मेदारी पूर्ण करणे, मदत घेणे देणे, कौतुक करणे, आदर्श निर्माण करणे, आदर्श घेणे, हेवेदावे विसरून संघटित होऊन संघर्ष करणे काळाची गरज आहे.

जेव्हा धरणच फुटते तेव्हा टोपल्याने माती टाकून ते बुजत नसते अथवा जेव्हा जंगलाला वणवाच लागतो तेव्हा चिमणीच्या पंख झटकल्याने तो विझत नसतो. आदर्शवाद व प्रत्यक्षवाद यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. मात्र तरीही छोट्या छोट्या प्रयत्नांनी देखील परिणामांची तीव्रता व दाहकता सौम्य होते. हे छोटे छोटे प्रयत्न आपण नक्की करायला हवेत. मात्र यात मुख्य भूमिका आहे ती सरकारची! ती सरकारी मदत मिळवून देण्याची मुख्य जबाबदारी असते संघटनांची. समाजाने देखील संघटनांच्या पाठीशी कायम व ठामपणे उभे राहणे गरजेचे असते व संघटनांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने नियोजनपूर्वक विविध आपापसात ताळमेळ ठेवून मुख्य उद्दिष्टांपर्यंत घेवून जाणाऱ्या मुख्य प्रवाहात राहून एकजुटीने संघर्ष करत शासनाला आपल्या समस्या सांगून त्या सोडविण्यासाठी कामाला लावले पाहिजे. यासाठी स्वतः काही उपाय सुचवून ते मागणी स्वरूपात लावून धरले पाहिजेत.

मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की ज्या भटक्या विमुक्त जमातींच्या अंगभूत कौशल्यांचा वापर शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीमध्ये करून घेतला त्याच कौशल्यांचा वापर हे लोकशाहीतील आपले शासन आपल्या कार्यात करून का घेऊ शकत नाही? या जातींना बेरोजगार करण्यापेक्षा त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी, या विविध पारंपारिक लोककला, जीवन संस्कृती जोपासण्यासाठी शासन पुढे का येत नाही? त्यासाठी विविध अभ्यासक्रम शाळा व महाविद्यालयात का निर्माण करत नाही? खरेतर या सर्व पारंपरिक कलागुणांना चालना दिली पाहिजे. काही पारंपरिक व्यवसाय काळाच्या ओघात आधुनिकतेच्या प्रभावामुळे बंद होऊ शकतात मात्र त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने अशा व्यावसायिकांना अथवा जमातींना पर्याय दिले पाहिजेत. मुख्य प्रवाहात जिथे तो नवा असतो तिथे आणण्यासाठी अशा जमातींना प्राधान्ये प्रशिक्षणे व आरक्षणे दिली पाहिजेत. आजही विविध कला प्रयोग सादर होतात मात्र त्यांचे कंत्राट भांडवलदार घेतात. देवस्थाने मोठमोठे कलाप्रयोग यात या पारंपारिक कलाकारांना निव्वळ मजुरांप्रमाणे वापरून राबवून घेऊन त्यांच्याकडून अल्प मोबदल्यावर कामे करून घेतली जातात. त्यात सरकारने हस्तक्षेप करून ही कंत्राटे त्या-त्या जातीच्या लोकांनाच कसे मिळतील हे पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ नद्या धरणांचे कंत्राट भोई मल्लाव कोळी बेस्तर गाबील यांनाच मिळाले पाहिजे. देवस्थानांचे कंत्राट गोंधळी जोशी गोसावी अशा जमातींनाच मिळाले पाहिजे. प्रत्येक स्मशानभूमीमध्ये मसनजोगी सरकारी कर्मचारी असला पाहिजे व त्याची नेमणूक संबंधित स्थानिक संस्थांनी केली पाहिजे. अस्वच्छ कामांची टेंडर्स भंग्यांना मेहतरांनाच मिळाली पाहिजेत. नाहीतर होते काय की ती कामे करतात हीच मंडळी मात्र नफा घेतात उच्चवर्णीय भांडवलदार लोक.

जंगल संवर्धनासाठी कायदे आले म्हणून वृक्षतोड बंद झालेली नाही. वनांची लुट थांबलेली नाही. आजही वृक्ष तोडले जातात. आजही वनांमधील पाने मध डिंक औषधी वनस्पती इ. जमा केल्या जातात. फरक एवढाच की ही सर्व कामे कायदेशीर पद्धतीने केली जातात. मग तिथे लागणारा कर्मचारीवर्ग कामगार वर्ग हा ज्यांचा या क्षेत्रातील रोजगार बुडाला आहे अशा पारंपारिक जमाती जसे कंजारभाट, कटाबु, वैदु अशा जमातींमधुनच का घेतला जात नाही? घेतला पाहिजे.

विविध कारखान्यांना कंपन्यांना कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यासाठी अधिकृत सुरक्षा एजन्सी तसेच चोरी दरोडेखोरी लूटमार अशा विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस दलात प्राधान्याने कैकाडी बेरड रामोशी पारधी कंजारभाट बंजारा वाघरी अशा जमातीच्या लोकांना संधी दिली पाहिजे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटे व त्यांचे परवाने गवंडी वडार बेलदार बेस्तर अशा पारंपारिक बांधकाम व्यवसाय करणाऱ्या जमातींनाच मिळाली पाहिजेत. शासनाच्या विविध योजना कार्यक्रम सूचना अहवाने प्रबोधने इत्यादींची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी शासन लाखो हजारो रुपये जाहिरातींवर व प्रसार माध्यमांवर खर्च करते. त्याऐवजी शासनाने संपूर्णपणे प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आज रोजी बेरोजगार झालेल्या भिक्षुक व कलावंत जसे की गोंधळी गोसावी भराडी चित्रकथी हेळवे जोशी भुते मरीआईवाले कडकलक्ष्मीवाले यांनाच अशी कामे व त्यांची कायदेशीर कंत्राटे दिली पाहिजेत.

पुनर्वसनाच्या या प्रक्रियेमध्ये शासनासह समाजानेही आपला वाटा उचलला पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक सार्वजनिक सण-उत्सव साजरे केले जातात. यामध्ये मंडळांची महत्त्वाची भूमिका असते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले तर त्यांच्याकडून कला व संस्कृती जोपासण्याचे व रिकाम्या हातांना काम देण्याचे महत्त्वाचे काम होऊ शकते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती उत्सव, विवाह सोहळे अशा अनेक प्रसंगी मंडळांनी डिजिटल देखावे, डीजे यांवर पैसा खर्च करण्यापेक्षा या पारंपारिक लोककलावंतांना संधी दिली पाहिजे. यामुळे केवळ यांच्‍या उदरनिर्वाहाचाच प्रश्न सुटेल असे नाही तर आपण नष्ट होत चाललेली लोककला व आपली वैभवशाली परंपरा टिकवून ठेवण्यात देखील यशस्वी होऊ असे मला वाटते.

गोपाळ, कोल्हाटी, डोंबारी या खेळकरी कसरतीकार जमाती जन्मानेच शारीरिकदृष्ट्या चपळ काटक व लवचिक असतात. यांच्या या उपजत क्षमतांचा व कौशल्यांचा उपयोग अग्निशमन दल, मदत व पुनर्वसन विभाग व वनविभाग इत्यादी क्षेत्रात प्राधान्याने करून घ्यायला हवा. यांच्यावर शिक्षण व प्रशिक्षणावर थोडासा खर्च केला तर ही मंडळी जिम्नॅस्टिक्स व ॲथलेटिक्स मधे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसह ऑलिम्पिकमध्येही देशासाठी पदके जिंकतील याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही.

आयुध निर्मिती व यंत्राद्वारे भांडी अवजारे व इतर उत्पादने निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये शिकलगार घिसाडी लोहार ओतारी ठुकारी छप्परबंद अशा कारागीर जमातींना प्राधान्याने संधी दिली गेली पाहिजे. तर वस्त्रोद्योग क्षेत्रात काशीकापडी धोबी परीट कोष्टी अशा लोकांना वाव असला पाहिजे.
गुप्‍तहेर खात्यामध्ये बहुरुपी तिरमल अशा जमातींच्या लोकांचा चतुराईने वापर करून घेतला गेला तर सरकारचे काम अधिक सोपे होईल. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी खरा पोलीस माझ्या वयाच्या साधारणपणे तेराव्या-चौदाव्या वर्षी पाहिला. तोपर्यंत मी पोलिसाच्या वेशात येणाऱ्या बहुरुपयालाच पोलीस समजायचो! सांगायचे तात्पर्य म्हणजे या लोकांकडे अंगभूत कौशल्ये आहेत. त्यांना कुठल्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. अनुभवाने ही मंडळी वागण्या-बोलण्यात परिपक्व झाली आहेत. म्हणून अशांना हेरगिरीचा परवाना द्यायला हवा. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज ही संकल्पना सरकारला चालते तर मग प्रायव्हेट हेर असायला काय हरकत आहे. बहुरूप्यांना पोलीस मित्र म्हणून तर गारुड्यांना सर्पमित्र म्हणून प्रमाणित करून परवाने द्यायला हवेत.
विविध प्राणी संग्रहालये, अभयारण्ये वनविभाग यामध्ये गारुडी मदारी दरवेशी माहुत यांना अग्रक्रमाने कामे दिली पाहिजेत. तटरक्षक दलात पाणबुडे म्हणून व मदत व पुनर्वसन विभागात, अग्निशमन विभागात बेस्तर, भोई, मल्लाव, कोळी, गाबील अशा जमातींना काहीसे प्रशिक्षण देऊन सामावून घेतले पाहिजे. खरेतर यांना प्रशिक्षणाचीही आवश्यकता नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी लाटांवर व धोक्यात घातले अशांच्या कौशल्यांचा वापर करून घेणे हे शासनाच्या दृष्टीनेही फायद्याचे व नैतिकतेच्या दृष्टीने ही न्यायाचे ठरेल.

आज आपण पाहतो नैसर्गिक साधनसंपत्तीची अगदी बेहिशोब व बेलगाम पद्धतीने लुट सुरू आहे. सरकारी व खाजगी कंपन्यांचे व्यवसाय उद्योग या क्षेत्रात जोरात सुरू आहेत. मात्र अनादी काळापासून नैसर्गिक साधन संपत्तीच्या जिवावर, तीचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत, ज्या पारंपारिक जमातींनी त्यावर उदरनिर्वाह केला, संस्कृती टिकवून ठेवली, त्या जमातींना आज कुठेच स्थान नाही! ही शोकांतिका म्हणावी लागेल.
पशुपालनावर उपजीविका असलेल्या गवळी गोपाळ धनगर आदी जमातींना पशुपालनासाठी अनुदान दिले पाहिजे. तसेच आरक्षित क्षेत्र म्हणजे गायरान वा वनराई उपलब्ध करून दिले पाहिजे. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या ताब्यातील वनक्षेत्रे माळराने पशूंना चरण्यासाठी खुली करून दिली पाहिजेत. अशा क्षेत्रात शेळ्यामेंढ्या, गाढवे, घोडे इतर जनावरे यांचे खाद्यान्न असलेला चा-याची लागवड केली पाहिजे. त्या चा-याचे जतन केले पाहिजे. पशुपालकांना निवाऱ्यासाठी राखीव क्षेत्र असले पाहिजे.  त्यांना ओळखपत्रे व परवाने दिली पाहिजेत.

मला नेहमी प्रश्न पडतो की तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादन करणारे कारखाने, मद्य निर्मिती करणारे कारखाने बंद करण्याची मागणी करणाऱ्या जनहितयाचिका न्यायालय अमान्य करते. कारण न्यायालय या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांवर याचा विपरीत परिणाम होईल याचा विचार करते. मग भीक मागण्या-या, कसरती करून वर्षानुवर्षांपासून पोट भरणार्‍या जमातींना सरकार मज्जाव कसा काय करू शकते? एकीकडे घोड्यांच्या शर्यती मान्य आहेत. शर्यतींवर होणारा घोडेबाजार शासनाला मान्य आहे तर दुसरीकडे गारुडी मदारी नंदीबैलवाले दत्ताच्या गाडीवाले पोपटाच्या साह्याने भविष्यवाणी करणारे, वाघवाले, आस्वलवाले यांवर बंधने का लादली जातात? म्हणजे सरकार या जाती-जमातींच्या दुःखांपेक्षा प्राण्यांच्या दुःखाबाबत अधिक संवेदनशील आहे! सरकारला या जमातींच्या गुलामगिरीपेक्षा प्राण्यांच्या गुलामगिरीची जाणीव जास्त आहे. यावरून सरकार मग ते कोणतेही असो भटक्यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे याची पुरती कल्पना येते. माझा हेतू सरकारवर किंवा कायद्यावर टीका करण्याचा नसून सरकारचे धोरण व सरकारने निर्माण केलेले हे कायदे भटक्या-विमुक्तांच्या कसे मुळावर आले आहेत याची जाणीव करुन देणे हा आहे. बरे कायदे केलेतच तर मग या कायद्यांनी भटक्या-विमुक्तांच्या  जीवनमानावर काय विपरीत परिणाम केलेत ते ही अभ्यासा आणि मग भटक्या विमुक्तांचे पुनर्वसन करणारे कायदेही कायदेमंडळात संमत करा.

 मला वाटते की या भटक्या विमुक्तांनाकडे संपूर्ण देशभर (महाराष्ट्रातील 14 अधिक 28 जमातींसह) सर्व जमातींकडे निर्वासित, भूमिहीन, अशिक्षित, असुरक्षित, असंघटित, पारंपारिक कलांत कुशल पण आधुनिक जगात अकुशल म्हणून बेरोजगार, अस्थिर, भयभीत, वंचित व दुर्लक्षित लोकांचा वर्ग म्हणून पाहायला हवे. पारंपरिक रोजगार आधुनिकतेने हिसकाऊन घेतलेल्या निराश्रित लोकांचा वर्ग म्हणून पाहायला हवे.

शासनाची ध्येय धोरणे ठरविणार्‍यांनी या बाबींचा गांभीर्याने विचार करायला नको का? आज रोजी या जमाती अगदी वेठबिगारांचे जीवन जगत आहेत. त्यासाठी शासनाने या जमातींना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात, त्यांच्यातील अंगभूत क्षमता व कौशल्ये ओळखून त्यांना सामावून घेतले पाहिजे. त्या त्या क्षेत्रातील कामांची कंत्राटे ही या जमातींनाच मिळाली पाहिजेत. कामगार अथवा कर्मचारी म्हणूनही याच जमातींना प्राधान्याने नेमले गेले पाहिजे. या जमातींना तसे प्रमाणित करून प्रमाणपत्रे, ओळखपत्रे व अधिकृत परवाने दिली पाहिजेत. तरच ख-या अर्थाने यांचे पुनर्वसन होईल. तरच आधुनिकीकरण झाले असे म्हणता येईल.

पुनर्वसनाच्या या उपायांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना, या जमातींचे शिक्षण नसणे अथवा कमी शिक्षण असणे ही तांत्रिक अडचण येईल. पण त्यांच्यात कौशल्यांची कमतरता नाही, शिक्षण महत्त्वाचे की कौशल्य महत्त्वाचे? नियम महत्त्वाचे की जीवन महत्त्वाचे? यावर सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. शिक्षण हवेच आहे तर शासनामार्फत नोकरीपूर्व रोजगारपूर्व मोफत शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्या त्या क्षेत्रात त्यांना सामावून घेतले जाऊ शकते. आजच्या बदललेल्या काळात या लोकांचे रोजगार हिरावून घेण्यात आले आहेत. त्यांचे समायोजन होईल, त्यांच्या हाताला काम मिळेल, पोटाला अन्न अन अंगाला कपडा मिळेल. शिवाय त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा उपयोग होऊन शासनाचे कार्य देखील अधिक प्रभावी व परिणामकारक होईल. ज्यांचे नुकसान झाले आहे लाभही त्यांनाच मिळाला पाहिजे! तो मिळवून देणे म्हणजे खरे पुनर्वसन!

मी तर म्हणतो केवळ त्यांच्या त्यांच्या पारंपारिक क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात तेथील आवश्यक ज्ञान व कौशल्ये विविध प्रशिक्षणे अभ्यासक्रम पाठ्यक्रम यातून देऊन, तेही मोफत देऊन त्यांना कामे दिली पाहिजेत. आजही कामाची वानवा नाही. उद्योगधंद्यांसाठी तंत्रज्ञ मजूर कारागीर, रक्षक भरपूर लागतात मात्र आजची कामे यांच्यासाठी नवीन आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये वेगळी आहेत. हे अज्ञानी निरक्षर गरीब लोक या आधुनिक जगाशी अगदी अनभिज्ञ आहेत. म्हणुन ख-या अर्थाने यांचे पुनर्वसन करायचे असेल तर, पिढ्यानपिढ्यांचा शैक्षणिक व आर्थिक अनुशेष भरून काढायचा असेल तर खऱ्या अर्थाने या लोकांना मोफत तांत्रिक शिक्षण कौशल्य शिक्षण व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायला हवे आम्हाला अधिकारी बनवा अशी मागणी नाही. तशी अपेक्षा नाही. ती त्यांची योग्यता ही नाही मात्र जीवन जगणे, जीवन जगता येणे हा त्यांचा अधिकार आहे व शासनाने या जमातींना जीवन जगण्यास सक्षम व सबळ बनविले पाहिजे. हे शासनाचे कर्तव्य आहे.  एकदा का या जमाती शिक्षणाच्या व रोजगाराच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या की त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीची अथवा प्राधान्याची आवश्यकता राहणार नाही.

मित्रांनो माझ्या मनामध्ये सतत एक विचार येतो. आजही समाजामध्ये संगीताची आवड प्रचंड प्रमाणामध्ये आहे. लोकांच्या या संगीत प्रेमाचा उपयोग मोठमोठे व्यावसायिक खूप मोठ्या प्रमाणात करून घेत आहेत. मात्र श्रोते व प्रेक्षकांच्या मनामध्ये असणाऱ्या या कलाप्रेमाचा उपयोग आपण या प्रवाहापासून दूर गेलेल्या लोककलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी करून देण्यात अयशस्वी ठरत आहोत. मला वाटते शासनाने एक देश पातळीवर व्यावसायिक कला मंडळ स्थापन करायला हवे. जसे की भारतीय राष्ट्रीय कला नियामक मंडळ. हे मंडळ बीसीसीआय प्रमाणे स्वायत्त पण शासनास उत्तरदायी असावे. या मंडळामार्फत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, लाईव्ह कॉन्सर्टस, स्पर्धा, पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम यांचे आयोजन करावे. त्यांच्या प्रसारणाचे सर्वाधिकार  व हक्क या मंडळास असावेत. तो पैसा सरकारी तिजोरीत जमा करायला हवा. लोककलेवर आधारित विविध कार्यक्रम जसे गायन वादन नर्तन अभिनय यांच्या व्यावसायिक मैफिली भरवुन त्यातून या कार्यक्रमांचे हक्क शासनाकडे असावेत व वाहिन्यांवरून हे कार्यक्रम दाखवले जावेत त्यातून मिळणारा पैसा वृद्ध लोककलावंतांच्या लोककलावंतांसाठी वापरला जावा. लोककलावंतांना एक सन्मानजनक आयुष्य जगता यावे यासाठी निवृत्तीवेतन सुरु करावे. या क्षेत्रातही लिगचा प्रयोग व्हावा. क्रिकेटमध्ये जसा आयपीएलचा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला व त्यातून तयार झालेला पैसा माझी क्रिकेटपटूंच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणला गेला त्याच धर्तीवर कला क्षेत्रातही प्रयोग व्हावा. कलेला व्यावसायिक व्यासपिठावर आणावे. सिंगिंग लिग, डान्सींग लिग, म्युझिकल शोज व काँपिटीशन्स भरवून त्यातुन कलाकारांना बोली लावुन खरेदी करावे व मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग वयोवृद्ध जेष्ठ लोककलाकारांना पेन्शन स्वरुपात द्यावा. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल मात्र त्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ततीची आवश्यकता आहे. यासाठी भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच संघटना, सेवाभावी व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे सरकारवर दबाव आणला पाहिजे. आपल्या मागण्या लावून धरून त्या मान्य करून घ्यायला पाहीजेत. तरच या देशातील विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी बसविण्यात यश येईल.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

लोककला

*लोककलाः*

*दिसतय आम्हाला बी*
*मजेत आहात सवताशी*
*आजान दिसताय बहुदा*
 *कलाकारांच्या समस्यांशी.*
*पण बघू नका मजा केवळ*
*काळजी घ्या थोडीशी*
*कारण नातं आहे आमचं*
*पूर्वापार आहे इथल्या मातीशी*

*चाळ बांधली पायात पण*
*पाय नाही ढळू दिलं.*
*पिढ्या घातल्या कलेत पण*
*नख नाही कळू दिलं...*

*टाळ्या शिट्ट्यांचा जमाना गेला*
*टाळकरी हाती आता रिमोट आला*
*मग काय सारं लागिरं झालं*
*अन पारंपारीक सारं बेकारं झालं...*

*पडद्यावरची मयत कला*
*तमाशाच्या मुळावर आली.*
*ढोलकी सोबत फेट्यांची*
*काहीशी फारकत झाली..*

*गण, गौळण, रंगबाजी हुरूप आणायचे मस्त*
*वगातून प्रबोधन व्हायचे कितीतरी रास्त.*
*पण डब्बे आले घरोघरी आणि*
*कलावंतांच्या पदरी बेकारी..*

*ही फुसफुस हे दमन समजुन घ्या मायबाप*
*श्वास कोंडतोय आमचा अन कसला* *दाखवताय विकास?*
*शुद्ध, शालीन, संस्कारिक ते सारं गेलं*
*हे कसलं दाखवताय विभत्स्य अन* *अश्लील चाळं?*

*जुन्या अंगी सोनं होतं*
*आजवर ठेवलं समदं जितं.*
*संस्कृतीची खिचडी केलीत*
*अन श्रोत्यांची मारलीत मतं...*

*नागड्या पायांनी डांबरीवर नाचतय*
*बेंबीच्या देठापासून ढोलकं वाजवतय.*
*उपाशीपोटी लेकरू मारतय उड्या*
*अन साहेब गाडीतुन वाजवतोय टाळ्या...*

*टी.व्ही. सिनेमा, डी.जे. ऑर्केस्ट्राँ*
*आमचा कशालाच विरोध नाही.*
*पण आमचा पिढ्यांचा धंदा बसलाय*
*आमचा दाखवाना ना अपराध काही...*

*पुर्वी भजना किर्तनात गावातले उठायचे*
*नाही म्हणलं तरी चार पैसे यायचे.*
*आता किर्तनकरूही हायटेक झालेत*
*आयतीच सी.डी.अन कोरस* *आणायलेत...*

*खोटी प्रगती तुम्हीच गाजवा*
*तुपात खिचडी तुम्हीच शिजवा*
*पण आम्हालाबी पोटापुरता शिदा मिळू द्या*
*आमची बी थोडीशी बोटं भिजु द्या...*

*जातीचे कलावंत चाललेत बराशीवर*
 *बिनबुडाचे झिलकरी बसल्यात राशीवर.*
*कधीकाळी कलेचे दर्दी कला बघायचे*
 *त्यांच्या जीवावर लाखो कलावंत जगायचे..*

*विचित्र जगात चरित्राचा मेळ नाही*
*सचित्र पुराणकथा पहायला वेळ नाही.*
*चित्रकथी रंगतदार सादर करी कला*
*ॲनिमेशनने त्याच्यावर घातला घाला...*

*अहो भारुडे अभंग श्रवणीय किती*
*प्राचीन भारताची ही श्रीमंती होती.*
*पण बाहुला-बाहुलीचा खेळ झाला सारा*
*बाहुली नृत्यांना राहिला नाही थारा...*

*काल्पनिक दुनियेत नाथ कधी कळतील*
*डवऱ्या गोसाव्यांचे गावाकडे पाय कधी वळतील?*
*सकाळी सकाळी गावभर  छान फिरायचे*
*पेटीवरच्या गाण्याचे स्वर कानात भरायचे..*

*रंगीबेरंगी वेश अर्धा असायचा उघडा*
*मोल नाही लक्ष्मीला अन मरी आली संस्कृतीला.*
*पोतराज बी कवाचा गायब झाला*
*कळत नाही काय म्हणावे या विकृतीला...*

*गोंधळ विधीची पत ढासळली*
*जातीवंताची गळचेपी वाढली.*
*उठसुठ कोणीही होतोय गोंधळी*
*शास्त्रोक्त गोंधळ पटत नाही*
*धांगडधिंग्याला मागणी लई...*

*सकाळच्या पारी असे वासुदेव दारी*
*हरिनाम मुखी ओठावर बासरी.*
*कृष्णलीलेत कोणाला रस नाही राहिला*
 *रात्रीच टीव्हीला रासलीला पाहिला...*

*लग्नाची शोभा मोरवाला वाढवायचा*
*पिसारा फुलवून गिरकी मारायचा.*
*त्याची गिरकी आता त्या लांडोरी घेतात*
*अन हौसेने बाहुल्यावर डीजे वाजवतात...*

*रानामाळात निसर्ग गाणे*
*कसं अंतकरणात रुतायचे*
*भलरीच्या सुरांनी शेतकरी*
*कसे जोमाजोमाने राबायचे...*

 *मद्यानेच झुलायलेत सारे*
 *यांना भोलानाथची झूल काय कळणार?*
 *कार्टून्सच्या अन गेम्सच्यापुढं आता*
 *नंदीबैलाला कोण काय विचारणार...*

*जिथं ख-याचीच राहीली नाही भिती*
*तिथं खोट्यानं आव आणावा किती?*
*कामच नाही राहीलं हाताला तर*
*बहुरूप्यानं जगावं किती मरावं किती???*

*तोलच कुठ राहिलाय वागण्यात*
*सर्वकाही बेताल दिसतय.*
*डोंबारीन करतेय कसरती तरी*
*कोण तिच्या कडं बघतय....*

*पापं वाढली म्हणून सूर्यदेवही कोपतोय*
 *सारथी अरूण पांगळा म्हणून*
*आम्ही खापर माती त्याच्या फोडतोय.*
*सकाळची पवित्र वाटायची आंघुळ*
*जवा भिक्षा मागायला यायचा पांगुळ....*

*माणसंच माकडं झाल्याने बहुदा*
*कायद्याने माकडं दिसत नाहीत.*
*पण मदारीच्या पातेल्यात आता*
*तांदुळही शिजत नाहीत....*

*भूमिहीन कलाकार बँडवाले असायचे*
 *कलेच्या आशिर्वादे पोटाला खायचे.*
*ऐकावेत असे सूर कानी तेव्हा पडायचे*
*पण लुप्त झाली पिपानी अन बेसूर डीजे आले..*

 *लेकरासमान संभाळणारे गारूडी*
 *लेकरांना हिंदीत साप दाखवायचे.*
 *लुंगी घालून खेळ करायचे गमतीदार*
 *अन सुरेल पुंगी वाजवायचे...*

*मसनात तेवढे सगळे जातात*
*त्यागी असोत वा भोगी.*
*जवळचे लांबचे सगळेच भेटतात*
*पण भेटत नाहीत जोगी....*

*म्हणून एका कलाकाराची
 सुगी येणार नक्की*
*शब्दांवर विश्वास ठेवा
 खात्री देतो पक्की.*

*जर खोट्याच्या या जगात
 खरं नाही चालणार*
*तर रुदाली बिगर कुणीच
 कसं खोटं रडणार?*

*केवळ टाळ्यांनी पोट
भरत असतं सरकार
*तर आम्ही काहीच
 केली नसती तक्रार

*पण घरी गेलंकी बायकां लेकरं
 कापडांभवती फिरत्यात
घामामळा शिवाय नसतय काहीच
 म्हणून मनातच रडत्यात

*लुप्त होतोय लोकावाज
*अन रुक्ष होतेय लोकसंगीत.
*विसरू नका लोककला
*खोट्या प्रतिष्ठेच्या धुंदीत.....

*कवीः बाळासाहेब सिताराम धुमाळ
*मोबाईलः 9673945092.

Thursday, 15 March 2018

आधुनिकीकरणाच्या उदयाने लोकजीवनाचा अस्त

.....…...... आधुनिकीकरणाच्या उदयाने लोकजीवनाचा अस्त.....

मित्रांनो नमस्कार...
अशातच मी माझी "लोककला" नावाची एक कविता पोष्ट केली होती. या कवितेमध्ये मी आपली समृद्ध पारंपारिक लोककला कशी लुप्त होत चालली असुन याचा लोकजीवनावर कसा विपरीत परिणाम होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यात यशस्वी झालो की नाही अथवा मला काय सांगायचे होते हे आपण ओळखले की नाही? माहीत नाही.
असो प्रत्येकालाच काव्याची भाषा समजतेच असे नाही आणि प्रत्येक विषय कवितेतून तितक्याच प्रभावीपणे व विस्ताराने मांडला जाऊ शकतो असेही नाही. कवितेमध्ये शब्दांची, जागेची मर्यादा असते. मात्र अनेकांना ती आवडली. तशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. म्हणूनच व माझा ही हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने या गंभीर विषयावर मी गद्य स्वरुपात काही प्रश्न, मुद्दे, समस्या व अपेक्षा व्यक्त करून काहीतरी अजून जास्त व सविस्तर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आजच्या आधुनिक जगाचा पाया प्रबोधनकारी तथा वास्तववादी विचारवंतांनी घातला तर कळस विज्ञानवादी अभ्यासकांनी व संशोधकांनी चढवला यात शंका नाही. अर्थात हा प्रवास अद्याप सुरूच आहे. उद्या काय होणार आहे याचे भाकितही आता करता येणार नाही मात्र काय झाले आहे याचे विवेचन मात्र नक्कीच करता येईल. आधुनिकीकरणाचा खुपच ठळक परिणाम मानवी जीवनावर झाला. हा परिणाम जितका चांगला झाला तितकाच तो वाईटही झाला. आधुनिकीकरणाचा ग्रामीण लोकजीवनावर किती भयानक परिणाम झाला आहे हे त्या जमातींना पाहुन समजते ज्या आज हतबल आणि मरणासन्न जीवन जगत आहेत. यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण, शहरीकरण, सर्व स्तरातील परिवर्तन हे आधुनिकीकरणाचेच भाग आहेत.
यांत्रिकीकरणामुळे उत्पादन प्रक्रियेपासून ते अगदी दैनंदिन जीवनापर्यंत यंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर वाढला. परिणामी उत्पादन वाढले, उत्पादनाचा दर्जा सुधारला. कमी वेळेत व कमी मनुष्यबळात अधिकाधिक उत्पादन बाहेर पडू लागले. यामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण झाल्या. रोजगाराच्या व्याख्या बदलल्या. अपेक्षित कौशल्ये बदली. रोजगारांचे स्वरूप व त्यांची नावे बदलली हे सर्वांना माहीत आहे. मात्र भारतासारख्या जाती आधारित व्यावसाय वर्गीकरण असलेल्या देशातील ग्रामीण पारंपारिक लोक जीवनावर याचा अत्यंत दुरगामी परिणाम झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा शेती असल्याने शेतीवर आधारीत व शेतीपूरक छोटी-मोठी कामे करून उदरनिर्वाह करणे हाच ज्या वर्गाचा पारंपारिक व्यवसाय होता तो बलुतेदार व कारागीर वर्ग बेचिराख झाला आहे. बलुतेदार व कारागीर वर्गाप्रमाणेच किंबहुना त्यांच्याहुनही अधिक उपासमारीची वेळ आलेला वर्ग म्हणजे भिक्षुक, कलाकार, कसरतीकार, नकलाकार भटक्या विमुक्त जमातींचा वर्ग!!
आज रोजी ज्यांना अविकसित म्हणून गणले जात आहे अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील बांधवांच्या प्रगतीसाठी घटनेमध्ये तरतुद करून ठेवली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था व राज्यव्यवस्था दोहोंचाही यांच्याकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन किमान सहानुभूतीपुर्ण तरी आहे. हा वर्ग संघटीत आहे. अर्थसंकल्पात यांच्यासाठी आर्थिक तरतुदी कराव्याच लागतात कारण राज्य घटनेने त्यांचे अनुसूचित्व मान्य करून त्यांना एक प्रकारे न्याय दिला आहे.
शिवाय अलिकडे ज्यांना संकटग्रस्त म्हणून गणले जात आहे असा वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग. निसर्गाची अनिश्चितता, सिंचनसोयींचा अभाव, हमीभावाची तरतुद नसणे, शासनाच्या धोरणांचा दुष्परिणाम, जास्त गुंतवणूक तुलनेने कमी उत्पादन, कर्जबाजारीपण यामुळे शेतकरी वर्ग निश्चितच संकटात सापडलेला आहे. मात्र हा ही वर्ग संघटीत आहे. यांच्यासाठी देखील शासन विविध तरतुदी करीत आहे. कर्जे मिळत आहेत, ती माफही होत आहेत. अर्थसंकल्पात शेतीविषयक तरतुदी केल्या जात आहेत. त्यांचा आपला हक्काचा व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध आहे. संकटसमयी शेती गहाण ठेवणे, शेती विकणे असे पर्याय तरी यांच्याकडे उपलब्ध आहेत.
वरील दोन्ही वर्गावर अनिच्छेने का होईना शासनाला लक्ष द्यावेच लागते. मोठे व संघटीत वर्ग असल्याने राजकीय प्रतिनिधित्व मिळते. प्रश्न लावून धरले जातात व प्रसार माध्यमेही बाजू उचलून धरतात.
मात्र या देशातील किमान एक त्रुत्यांश लोकसंख्या असलेला भटका विमुक्त, बलुतेदार, आलुतेदार, कलाकार, नकलाकार, कसरतीकार समाज भूमिहीन आहे. यांना काही विकताही येत नाही, यांना कोणी कर्जही देत नाही, आणि जरी यांनी आत्महत्या केली तरी काही शासकीय मदत तर मिळतच आहे वरून ती आत्महत्या म्हणजे संकटग्रस्त वर्गाची आत्महत्या म्हणून मोजलीही जात नाही. यांना राज्यघटनेनेच ख-यार्थाने अविकसित व मागास असे मोजलेले नाही. अर्थसंकल्पात तर यांना अजिबातच थारा नाही. जरी यातील सर्वच जाती जमाती या इतर मागास प्रवर्गात मोडत असल्या तरी हा इतर मागास प्रवर्ग जवळजवळ खुल्यातच जमा आहे. बरे शासनाने यांच्यासाठी जरी काही योजना राबविल्या, काही तरतुदी केल्या तरी शिक्षणा अभावी ह्या जमाती त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणजे एकीकडे शिक्षणाचा अभाव दुसरीकडे घटनात्मक गैरसोय, तिसरीकडे रोजगाराची अनुपलब्धता व चौथीकडे असंघटित असल्याने हा वर्ग चहुबाजूंनी समस्यांनी जखडला गेला आहे. अज्ञानी असल्याने व असंख्य जमातींमध्ये विभागला गेला असल्याने असंघटीत आहे. त्यांमुळे अन्यायाची जाणीवही नाही आणि न्यायाची मागणीही करता येत नाही.
 उदरनिर्वाहाबाबतीत पिढ्यानपिढ्यांपासुन आपापल्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक जमाती रोजगाराच्या बाबतीत गावातच शतप्रतिशत निर्धास्त होत्या. पण यांचा हक्काने व खात्रीपूर्वक मिळत आलेला रोजगार ओरबाडला गेला. साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, गवंडी, धोबी, परिट, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार या अशाच काही जातींची उदहारणे आहेत. ज्या गावे सोडून शहरांकडे वळत आहेत. उपजत कौशल्ये व बालपासुनच घरच्याघरीच प्रशिक्षण मिळत असलेल्या या कुशल जाती बेरोजगार झाल्या आहेत. कंपन्या व कारखान्यांमध्ये जरी रोजगार असले तरी ते पारंपरिक कौशल्ये पाहुन दिले जात नाहीत तर व्यावसायिक शिक्षण, उच्च शैक्षणिक पात्रता व बुद्धिमत्ता तपासून दिले जात आहेत. हे शिक्षण घेण्यासाठी जातीला काहीच अर्थ नाही तर केवळ अर्थाला (पैशाला) अर्थ आहे!! भारतासारख्या पारंपारिक व्यवसायावरून जातीची निर्मिती झालेल्या देशात पिढ्यान् पिढ्यांपासून यशस्वीपणे अस्तित्वात असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईस आली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात समाजसेवा करणारी मंडळी, सेवाभावी संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनात्मक संस्था, विविध समित्या व आयोग यांच्या शिफारशी व अहवाल यामुळे शासनाने काही पर्यावरण पूरक, समतामूलक, प्रथा परंपरा व अंधश्रद्धा विरोधी कायदे केले. हे तात्विक द्रुष्टीने योग्यही आहे. हे असे कायदे व नियम करावे लागतात एव्हाना केलेच पाहिजेत. त्यांचा आदर करणे, त्यांचे पालन करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्यही असावे. मात्र कायदे करताना अहित कोणाचे होणार आहे आणि अहीत कसे होणार याची गोळाबेरीज होणे ही गरजेचे आहे. म्हणजे प्राणिमात्रांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर परंपरेपासून अवलंबून असणाऱ्या गारुडी, मदारी, दरवेशी, जोशी, नंदीवाले, दत्ताच्या गाडीवाले, सर्कसवाले, माहूत अक्षरशः  रस्त्यावर आले आहेत.
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. या बाबतीत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही मात्र अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या प्रयत्नात जोशी, गोंधळी, डवरी, गोसावी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, आराधी, जोगती, मुरळी, देवदासी, देवळी या जमाती मात्र अक्षरशः भरडल्या जात आहेत.  त्यांची रोजीरोटी गेली आहे. दुर्दैवाची व काहीशी मजेशीर बाब म्हणजे या जमाती आता कायद्याने भिकही मागु शकत नाहीत! आई खाऊ देईना अन बाप भीक मागू देईना या म्हणीचा प्रत्येय भिक्षा मागून पोट भरणार्‍या गोसावी, भराडी, गोंधळी, गोपाळ, चित्रकथी, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, भुते, पांगुळ, बहुरूपी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, दरवेशी, वाघ अस्वलवाले, भाविन, जोगती,  देवदासी, मुरळी यांना येत आहे.
ज्यांच्यावर जन्मानेच गुन्हेगार असा ठसा ब्रिटिशांनी लावला व त्यांना पुढे आपल्या सरकारनेही दुजोराच दिला त्या जमातींच्या मुळावर हे कायदे आले आहेत. बेरड, रामोशी, भामटे, पारधी, पावटा, बंजारा वडारी अशा जमातींमधील लोकांकडे इतर लोक आजही संशयाच्या नजरेने व गुन्हेगार म्हणुनच पाहत आहेत. हाती असलेली पारंपरिक कामेही गेली आणि गुन्हेगार अशी ओळख आहे म्हणून कोणी रोजगारही देईना मग आता ज्यांना सरकारनेच कायद्याने अप्रामाणिक ठरवले त्यांना प्रामाणिक असल्याचे शासन प्रमाणित करून प्रमाणपत्र देणार काय?
देवी-देवतांची पुजापाठ करणारे ठराविक लोक होते. मंदिराची साफसफाई करणे, भक्तांना अंगारा धुपारा करणे, देवी-देवतांचे गुणगान कलेतून करणे, असा पारंपारिक व्यवसाय असणारे लोक जसे की गोंधळी, गोसावी, भराडी, चित्रकथी, हेळवे, जोशी, तिरमले, कडकलक्ष्मीवाले, मरीआईवाले यांच्या तोंडचा घास कायद्याने व आधुनिकतेने हिरावून घेतला आहे हे वास्तव मात्र नाकारता येणार नाही.
डोंगर द-या, जंगल वाचवण्यात शासनाला यश आले की नाही हे तुम्हीच तपासून पहा पण ज्यांनी जंगलाचे, वन्यजीवांचे संरक्षण केले, अगदी पिढ्यांपिढ्यांपासून ज्यांनी निसर्गाला देव मानले. त्याला पोटच्या लेकरासारखे सांभाळले व त्याच्या जीवावर स्वतःच्या लेकराबाळाचे पोट भरले ते गारुडी, नंदीवाले, मदारी, दरवेशी, गौरी, गोवाडी, धनगर, जोशी, सापवाले, वाघवले, अस्वलवाले, तिरमल, वैदु यांचे जीवन अगदी नरकासमान झाले आहे.
मी कायद्यांना दोष आजिबात देत नाही अथवा कायदे मानत नाही असेही नाही. मात्र यामुळे वर्षानुवर्षांची व्यावसायिक साखळी जी व्यवस्थित व यशस्वीपणे गुंफली गेली होती, कार्यरत होती ती छिन्नविछिन्न झाली आहे. ग्रामस्तरावर पारंपारिक उद्योग धंदा करणाऱ्या जाती जमाती नेस्तनाबूत होवून कामासाठी बड्या उद्योजकांच्या दारात उभ्या राहिल्या म्हणजे विकास झाला हा विकासाचा दृष्टिकोन अथवा विकासाची व्याख्या मला हास्यास्पद वाटते.
 पुर्वापार नद्या, धरणे, तलाव, खाड्या, समुद्र यातील पाण्यावर अवलंबून राहून पोटाची खळगी भरणाऱ्या भोई, मल्लाव, कोळी गाबीत अशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या लोकांच्या वंशपरंपरागत चालत आलेल्या व्यवसायाला पर्यावरणाचे कारण समोर ठेवून शासनाने त्यांच्यावर आपले पारंपरिक व्यवसाय बंद करण्याची वेळ आणली आहे. जलसाठ्यांचे कंत्राटीकरण आणि यांत्रिक मासेमारी यांच्या समोर या बिचार्‍यांचा निभाव लागेनासा झाला आहे. थोडक्यात काय तर मोठ्या माशांनीच या छोट्या मास्यांना गिळंकृत केले आहे. यांत्रिकीकरणाने ग्रामस्तरावर कलाकुसर व कारागिरी करणाऱ्यांचा पार सुपडा साफ केला आहे. या आधुनिकतेचा आणि यांत्रिकीकरणाचा दुष्परीणाम अनेक जाती-जमातींवर झाल्याचे भयानक वास्तव शासन अधोरेखित करीत नाही.
पारंपारिक समाजरचनेत ग्रामस्तरावर कलाकुसर व कारागिरी करून सेवा पुरवणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची अवस्था ओकले तर सुपारी नसावी अशी झाली आहे. काशीकापडी, ठेलारी, ओतारी, लोहार, गवंडी, कुंभार, बेलदार, वडार, बागडी, कोष्टी, कैकाडी, होलार, कुंभार, तांबोळी, तेली, कासार यांसारख्या शेकडो जाती-जमातींवर उपासमारीची कुराड कोसळली आहे. यंत्रासारखा उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची सजावट व व्यवस्थापन हे या ग्रामीण अल्पशिक्षित कारागीर कामगार वर्गाला करणे शक्य नाही. आवश्यक तेवढे भांडवल उपलब्ध नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने धंदा बंद करण्याशिवाय मार्ग राहीला नाही.
ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे लोककला व लोकसंगीत. हा सर्व लोककलाकार वर्ग ढोबळपणे भूमिहीन आहे. यांना निवारा नाही. पारंपारिक लोककलावंतांच्या व्यवसायामध्ये कंत्राटदार व बड्या भांडवलदारांच्या अतिक्रमणामुळे आलेले व्यावसायिकीकरण हे या सामान्य कलाकार व कारागीर वर्गाच्या मुळावर उठले आहे. हे कंत्राटदार आपल्या पदरी या पारंपरिक कलावंतांना राबवून त्यांना अगदी अल्प मानधन देऊन राहिलेला मलिदा स्वतःच फस्त करतात. हे चित्र सर्व प्रमुख देवस्थाने व व्यासपीठावर सादर होणारे व्यावसायिक संगीताचे कार्यक्रम यांमध्ये दिसुन येते. म्हणजे पिढ्यानपिढ्या कला सादर करणाऱ्या कलावंत जमाती उदरनिर्वाहासाठी ठेकेदारांच्या दावणीला पडल्या आहेत. हे या जमातींचे शोषण आहे.
आज लोककलेच्या क्षेत्रात अनेक जाती जमातींनी पाऊल टाकले आहे. कलेची कुठहीली जात नसते हे मी मान्य करतो मात्र आपल्या देशामध्ये प्रत्येक जातीची म्हणून एक कला आहे. तोच त्यांचा व्यवसाय आहे व प्राचीन आहे,  पारंपारिक आहे . त्यांच्यावर त्याचे कुटुंब चालत आले आहे अशा लोकांवर हे अतिक्रमण अन्यायकारक आहे. त्यामुळे जातिवंत कलाकार व कामगार बेरोजगार होवून कामाधंद्या अभावी गावे सोडून स्थलांतर करत आहेत. या विस्थापितांचे प्रश्न सोडवता सोडवता सरकारच्या नाकी नऊ येत आहेत. सरकार नावाची यंत्रणा हे सर्व हे सर्व प्रश्न सोडवू शकत नाही. पिढ्यान् पिढ्यांपासून बसलेली ही घडी अशी जर विस्कळीत होत असेल तर यामुळे निर्माण होणारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष सरकारी इच्छाशक्तीची गरज आहे.
 जवळजवळ प्रत्येक कलावंत व भिक्षुक जमातीची आपली स्वतःची भाषा, कला, वेशभूषा व उपासना पद्धती आहे. ती जिवंत राहणे टिकून राहणे सांस्कृतिक द्रुष्टीने गरजेचे आहे. मात्र आज आपण पाहतो ह्या लोकांवर अक्षरशः उपासमारीची  वेळ आलेली आहे आणि शासनाला मात्र याच्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यामुळे या वर्गातून आलेल्या बुद्धिवाद्यांनी आपापल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारले पाहीजेत. समस्यांचे गांभीर्य शासनाच्या ध्यानात आणून दिले पाहिजे.
आधुनिकतेतुन होणारा बदल हा अटळ असतो. आधुनिकता म्हणजे परिवर्तन व परिवर्तन हे कधीही भूषणावहच असते. आधुनिकीकरणामुळे होणारे परिवर्तन हे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांसाठी लाभदायक ठरत असते असा दृष्टिकोन मनात ठेवूनच आणि मनाची तशी धारणा करूनच नव्या बदलाचे स्वागत करायचे असते. मात्र या जमातींचा मात्र  भ्रमनिरास होताना दिसत आहे. पारंपारिक समाज रचनेतील हे स्थित्यंतर माझ्यासारख्या सामान्य पण काहीशा सुशिक्षित व्यक्तीला तारक नव्हे तर मारकच ठरताना दिसत आहे आणि म्हणून माझी दम कोंडी होत आहे. दया पवारांनी बलुतं लिहून, लक्ष्मण मानेंनी उपरा लिहून आणि शांता शेळकेंनी कोल्हाट्याचं पोर लिहून या जमातींच्या स्थितीची ओळख सर्वांना करून दिली आहे.
तमाशा सारखी कला ही मनोरंजनाचे व प्रबोधनाचे अत्यंत प्राचीन व प्रभावी साधन सिद्ध झाली आहे. तमाशाकला शेकडो हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे.  हा तमाशा आज रोजी अखेरच्या घटका मोजत आहे आणि दुर्दैवाने आपण व शासन डोळे मिटून शांत बसुन त्यांच्या अंताचा तमाशा पहात आहोत. ही कला व व्यवसाय जगले पाहिजेत. तमाशा कलावंतांच्या आर्थिक अडचणी, त्यांचे सुरक्षिततेचे प्रश्न ऐरणीवर आणणे व ते तत्परतेने सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आधारलेला आहे. अशाप्रकारे पोट भरण्याचे साधन जर लुप्त होत चालले तर त्याचा परिणाम काय होईल व होत आहे हे ही आपण पाहत आहोत.
 रस्त्याच्या कडेला झोपणारे, सिग्नलवर छोट्या-मोठ्या वस्तू विकणारे, भिक मागणारे हे ही एकेकाळी छोटे मोठे कलाकार, नकलाकार, कारागीर अथवा भिक्षुक होते. मात्र आजवरच्या झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून त्यांच्यावर ही पशूसम जीवन जगण्याची वेळ आलेली आहे.
आधुनिकीकरणातून आलेला चंगळवाद आणि मध्यमवर्गीय लोकांच्या मनोरंजनाच्या बदलत चाललेल्या संकल्पना अथवा त्यांनी मनोरंजनासाठी निवडलेली नवी निर्जीव साधने हे ही या पारंपारिक कलावंत कलाकार लोकांच्या उपासमारीस कारणीभूत ठरत आहेत. आधुनिकतेच्या या अनिष्ट परिणामांची नोंद सरकारने घेणे अत्यंत आवश्यक आहे .
मित्रांनो केवळ सरकारवर अवलंबून राहून हे प्रश्‍न सुटतील असे मला अजिबात वाटत नाही. संघटित पुढाकाराने प्रबोधन, उद्बोधन व लोकसहभाग आणि प्रसंगी श्रमदानातून बरेच मार्ग निघू शकतात. लोककला आजही सामान्य श्रोते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र जातिवंत पारंपारिक त्या त्या जातीचे लोककलाकार उपेक्षितच आहेत. याचे कारण शिक्षण व भांडवलाचा अभाव असे आहे. आपण सर्वजन सर्वेक्षण करून पहा, किती सोन्याची, भांड्यांची, बांगड्यांची, बुटा चपलांची, दाढी-कटिंगची ते अगदी भाजीपाल्याची, लाकडाची, हळदीकुंकवाची, पानाफुलांची, कपड्यांची दुकाने परंपरेने ही कामे किंवा व्यवसाय करणाऱ्या जाती जमातीच्या लोकांची आहेत? उत्तर तुम्हाला निश्चितच हादरवून सोडेल. आता इतरांनी आपल्या जातीबाहेरचे व्यवसाय करू नये का? तर हरकत नाही पण याने मूळ जातीच्या लोकांवर उपासमारीची वेळ येते. असे भयावह चित्र पाहून मला प्रश्न पडतो की लोकजीवन उध्वस्त झाले म्हणजे विकास झाला का? आधुनिकतेच्या नावाखाली पारंपारिक समाजरचनेवर जीवनमान आधारलेले लोककलाकार देशोधडीला लागले आणि त्यांच्या छपरा पालावर तुळशीपत्रे ठेवली म्हणजे आधुनिकता का?  काय सरकारला यांचे काहीच सोयर सुतक नसावे? स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सर्व सरकारे आपण विकास केल्याची अफवा पसरवतात. जनतेच्या पैशाने जनतेचा विकास करणारी शासन नावाची यंत्रणा जमीन स्तरावर जाते काय? खरोखरच आपण प्रगती साधली आहे की अधोगती ओढवून घेतली आहे याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.
कारण शेवटी प्रत्येक मानवाला जीवन जगता यावे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध व घटनात्मक अधिकार आहे. मुळात समानता व समता यातील फरकच आपल्या लक्षात येत नाही. समानतेवर जास्तीचे लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नात आपण समाजामध्ये समता प्रस्थापित करू शकलो नाहीत हे अपयश लपविण्यात काही अर्थ नाही. खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असेल तर या कारागीर, लोककलावंत, कलाकार, नकलाकार, कसरतीकार, भिक्षुक जमातींकडे लक्ष देऊन ते जे आज खऱ्या अर्थाने विस्थापित दुर्भिक्षीत व दुर्लक्षित आहेत त्यांचे पुनर्वसन करणे शासनाची जबाबदारी आहे. आणि जर शासन दुर्लक्ष करत असेल तर आपण स्वतः संघटितपणे पुढे येऊन सरकारचे लक्ष वेधणे काळाची गरज आहे.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

Friday, 2 March 2018

होळी खेळावी ती न्यारी


रंगी रंग खेळे हरी

दुःख चिंता दुर करी.
पाहाता गोपिकांना धरी
राधा कावरी बावरी....



खुळी राधा ती बिचारी

भोळी जराशी अविचारी.
कान्हा शिकवितसे जगा
होळी खेळावी ती न्यारी....



रंग भरावा जीवनात

अवघे बेरंग संपावेत.
माखोत मने प्रियजनांची
परी मर्यादाही राखाव्यात....



रंग म्हणजे रे आनंद

रंग ऐका जसा अभंग.
जरा त्यांसवेही गावा
ज्यांना म्हणे जग अपंग....



रंगवा दीनदुबळ्यांना

गोरगरीब अन सगळ्यांना.
करा आपलेसे त्यांना
मित्र-शत्रू सकलांना....



रंग उमंग नव्हे डाग

रंग तरंग नव्हे आग.
यारो होळी आहे आज
चढवा प्रेमाचा रे साज....



लांघा सीमा असमतेच्या

फाडा पडदे विषमाचे.
रंग घेऊ त्या ढगांचे
माळू गाल आकाशाचे....



हेवेदावे हे फुकाचे

आज वाहून चला लावु.
रंगी रंगून जावु सारे
वैषवजण रे चला होवु....



जसा रंगीन मी कान्हा

तसे आपणही व्हाना.
ऐकता गोड वाणी तुमची
धेनुनेही सोडावा पान्हा.....



सकळ जण रंगुनी जावे

सारे रंग एक व्हावे.
खाक अनिष्ट ते व्हावे
अवघे विश्वची नेक व्हावे



जरी जीवन कृष्णधवल

उपायही सांगे मीचं.
भरा रंग आपुलकीचे
हेवा वाटेलं नक्कीचं



मी कृष्ण पिचकारीने

डाग मनावरचे काढी.
होळी करा वाईटाची
सारे लावा चला काडी....



होळीच्या नावाखाली

नका फाडु कुणाची चोळी.
दावाल द्रुष्टी जर का वक्र
याद राखा सुदर्शन चक्र...



नाही मस्ती ना हा धुडगूसं

होळी नाही रे टवाळकी
स्वच्छ पवित्र ही रीत
शिकविते मवाळकी...



माथी काजळी काळजीची

हाती रंग वैविध्याचे.
असे मिसळु एकत्र
रेखाटु हिंदमाता पवित्र...



नाती घट्ट करू सारे

समतेचे रंग घ्यारे.
होऊ थोडे अवखळं
या देश बनवू गोकुळं....



कवीः बाळासाहेब सिताराम धुमाळ

 मो: 9673945092

Thursday, 1 March 2018

अम्रुतमहोत्सवी आधारवड शारदाताई बाळकृष्ण रेणके

......अम्रुतमहोत्सवी आधारवड......

मित्रांनो नमस्कार, कोणत्याही कर्तृत्वान पुरुषाच्या यशापाठीमागे एका कर्तव्यशील महिलेचा मोलाचा हातभार असतो हे आपण आजवर अनेक उदाहरणांमधुन ऐकलेले, पाहिलेले व वाचलेले आहेच. त्या कर्तृत्वान पुरुषाचे नाव तर आपण घेतो मात्र त्याच्या यशामध्ये उल्लेखनीय नैतिक वाटा असलेल्या महीलेचा मात्र विसर पडतो. अनेकदा तर अशी नावे समोरही येत नाहीत. बरे असेही नाही की हे असे मुद्दाम केले जाते कारण ही महीला दुसरी तिसरी असतेच कोण?आई,पत्नी,प्रेयसी, बहीण, मुलगी, मैत्रिण,आत्या, मावशी मामी,आजी म्हणजे आपलंच कुणीतरी अगदी जवळचं.पण काळाच्या ओघात,धावपळीत व नैसर्गिकता म्हणुन असे दुर्लक्ष होत असते. परिणामी हे महत्वपुर्ण पात्र पडद्याआडच राहतं.
तीने केलेला त्याग, घेतलेले परिश्रम, सोसलेल्या यातना आणि केलेली हुरहुर निरूल्लेखीत राहाते. असे होऊ नये म्हणून मी आपणास आज अशाच एका अत्यंत कर्तव्यशील महिलेची ओळख करुन देणार आहे.
लोक त्यांना आदराने 'ताई' म्हणून संबोधतात मात्र मी त्यांना प्रेमाने 'आई' म्हणून बोलावतो. या छोट्याशा लेखास शिर्षक मी जे "अमृतमहोत्सवी आधारवड" असे दिले आहे ते ब-याच विचारांती. आज विस्तारलेल्या आधारवडाची रुजवण झाली 75 वर्षांपुर्वी ब्रिटीश भारतात,  दि. 01 मार्च 1943 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी! या आधारवडाचे नाव आहे सौ. शारदाताई रेणके (जोशी). पारतंत्र्यातील शिक्षणाची दुरावस्था, त्यातही स्त्री शिक्षणाची दयनीयता आणि भटक्या विमुक्तांची शिक्षणाविषयीची अनास्था तर विचारायलाच नको. जोशी या भटक्या जमातीमध्ये कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्हयात जोशी जमातीच्या बावन्नवाडीपैकी हलकटा या गावी शारदाताईंचा जन्म झाला. या बावन्नवाडीलाच जातगाव असेही म्हणत. वास्तविक शारदाताई जन्मत:च कुशाग्र बुध्दीच्या होत्या. 1961 ला त्या चांगल्या गुणांनी एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्या! मात्र त्यांना पुढे शिकविले गेले नाही. बुध्दीमान असूनही पुढे का शिकविले गेले नाही? याचे स्पष्टीकरण फार गंमतीशीर आहे मित्रांनो. ज्या काळी ज्या जमातीमध्ये एस. एस. सी. झालेला मुलगा देखील मिळणे दुरापास्त होते त्या काळी व त्या समाजात एस. एस. सी. झालेल्या शारदाताई बावन्नवाडीतील परिसरातील एकमेव मुलगी होत्या! मग त्यांच्यासाठी त्यांच्या योग्य नवरा कोठे शोधायचा? म्हणून पुढचे शिक्षण नको ही त्यांच्या घराच्यांची व्यावहारिक दुरदृष्टी!!!  कुटूंबाचे सततचे स्थलांतर, कुटूंबियांचा शिक्षणाला प्रखर विरोध, समाजाचा मुलींकडे पाहण्याचा संकुचित द्रुष्टीकोन व इतर शंका कुशंका यामुळे शारदाताईंच्या शिक्षणाचे राम नाम सत्य झाले.
त्यांच्या सुदैवाने व योग्यतेने पुढे त्यांना मुंबईत बाँबे पोर्ट ट्रस्टमध्ये क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. याच काळात त्यांची ओळख झाली एका उमद्या, देखण्या, उच्चशिक्षित व परिपक्व विचारांच्या आणि परखड वाणीच्या तरुणाशी! हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत अन मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. त्या तरुणाचे नाव होते बाळकृष्ण रेणके! ज्यांना आज आपण सर्वजण आदराने रेणके आण्णा असे संबोधतो. मात्र त्याकाळी आण्णांमध्ये असे आदराने संबोधन्यासारखे काहीच दिसत नव्हते. ना घरदार, ना शेतीबाडी, ना नोकरी!
मात्र म्हणतात ना की, असामान्य द्रुष्टी असणा-यांना अगदी सामान्य माणसात सुद्धा असणारे असामान्यत्व स्पष्टपणे दिसते! त्याचप्रमाणे आण्णांमध्ये असणारे असामान्यत्व शारदाताईंना अगदी स्पष्ट दिसून आले. एकीकडे शारदाताई शासकीय नोकरदार, सुंदर तरुणी! शिवाय मध्यम वर्गीय कुटूंबातुन आलेल्या! तर दुसरीकडे आण्णा म्हणजे गरिब कुटूंबातील सुशिक्षित बेरोजगार युवक! मात्र त्यांच्याकडे होती कुशाग्र बुद्धिमत्ता, देखणेपण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्याकाळातील बी.एस.सी.केमिस्ट्री होते! म्हणून शारदाताईंनी आण्णांमधील हे असामान्यत्व चटकन हेरले आणि दोघांनी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. धाडसी यासाठी की तो प्रत्यक्षात उतरवणे तेवढे सोपे नव्हते. भटक्या जमातींची विवाहविषयक कठोर बंधने, जातपंचायतींची दहशत असा चाकोरी बाहेरील विचार करायची हिंमतही करु देत नसायची. कारण वर सांगितल्याप्रमाणे शारदाताई जोशी समाजाच्या तर आण्णा गोंधळी समाजाचे!! दोन्हीही हिंदू भिक्षुक जमातीच मात्र स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणा-या या जमाती! दोन्हीकडच्या केवळ कुटूंबियांचाच नव्हे तर समाजाचाही यांच्या लग्नाला कठोर विरोध होता. मात्र असला हा विरोध जुमानतील ते ताई व आण्णा कसले? शिक्षणाने अनिष्ट रूढी परंपरांना झुगारण्याचे बळ प्राप्त होत असते हे दाखवून देण्याची ती वेळ होती. पण त्यासाठी घरच्यांच्याविरोधात अगदी रणशिंगच फुंकण्याची गरज असते असे नाही हा आदर्श त्यांनी त्या काळी घालुन दिला. जर आपण बरोबर असु तर घरच्यांना ते मान्य करावेच लागेल हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे दोघांनीही या विरोधाकडे, घरच्यांच्या अज्ञानातुन निर्माण झालेला, सामाजिक जडणघडणीचा प्रभाव पडलेला एक कौटुंबिक प्रश्न या द्रुष्टिनेच पाहीले. हे एक संकट न मानता एक आव्हान समजले व कोणताही टोकाचा व अनैतिक निर्णय न घेता घरच्यांना आपला निर्णय कसा बरोबर आहे व त्यांचे विचार करणे कसे चुकीचे आहे हे पटवून दिले. शेवटी घरच्यांनाही त्यांनी तयार केले! दोन्ही परिवाराच्या संमतीने गिरगावच्या दत्त मंदिरात पारंपरिक हिंदु धर्म विवाह पद्धतीने साधेपणानेच त्यांनी लग्न केले. शारदाताई जोशी या सौ. शारदाताई बाळकृष्ण रेणके झाल्या. ते दोघे परस्परांचे साता जन्माचे सोबती झाले!!
शारदाताई म्हणजे चाकोरीबद्ध जीवन जगणारी महीला. आपली नोकरी, आपला नवरा अन आपला घर संसार एवढेच त्यांचे विश्व. या बरोबरच उभय परिवाराकडून अर्थात सासर व माहेर यांच्याकडून येणाऱ्या जबाबदा-या निभावण्यात त्या व्यस्त असत. तर आण्णांच्या डोक्यात समाजसेवेचे भुत संचारलेले!! संघटन, आंदोलने, निदर्शने, मोर्चे, प्रेरक व स्फोटक भाषणे यात त्यांना रूची!! म्हणजे दोघांचे विचार व आचार निव्वळ परस्पर विरोधीच!! तरीही शारदाताई आण्णांसोबत जिथे भाड्याने घर मिळेल तिथे प्रेमाने व आनंदाने राहील्या. या सुरूवातीच्या काळात संसाराचा सारा भार ताईंवरच होता तरीही त्या डगमगल्या नाहीत, चिडचिडेपणा त्यांच्यात आला नाही की त्यांच्या मनाला अरूंदपणा वा उथळपणा स्पर्शूनही गेला नाही.
पुढे शारदाताईंच्या इच्छेप्रमाणे व आण्णांच्या योग्यतेप्रमाणे आण्णांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत फाँरेंसिक खात्यात सिनियर सायंटिफिक आँफिसर ही नोकरी मिळाली. नोकरी मिळाली खरी पण आण्णा नोकरीत रमले नाहीत.डोक्यात काहीतरी वेगळे, कटु वास्तवात बदल घडवू शकेल असे काहीतरी करावे हा विचार त्यांना स्वस्थ बसु देत नव्हता. त्यांनी लवकरच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. या निर्णयाला आजच्याच काय तेव्हाच्याही पत्नीने विरोधच केला असता. मात्र अण्णांचे विचार,त्यांची धडपड,आवड, कल पाहून शारदाताईंनी देखील आण्णांच्या निर्णयाचे स्वागत केले. अण्णांच्या भाषेतच सांगायचे तर लोक देवाला माणसे अथवा प्राणी सोडतात! त्याप्रमाणे मला शारदेने देवाला सोडले! फरक एवढाच की माझा देव माझा समाज होता व माझी देवपूजा समाज कार्य होती. शारदा नसती तर माझ्याच्याने काहीही झाले नसते. माझे राहणे खाणे, कपडेलत्ते, प्रवास खर्च, कार्यक्रमांचा खर्च सर्वकाही शारदा भागवत आली आहे. आजही मी तिच्या पेन्शनवरच उड्या मारतो आहे हे ते काहीसे भाऊक होऊन बोलतात आणि लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात..
मित्रांनो शारदा ताईंचे महानपण एवढ्यातच नाही. घरसंसार, नवरा, मुलेबाळे तर सर्वच करतात मात्र म्हणतात ना,  संगतीने वान नाही लागला तरी गुण मात्र हमखास लागतो. याच म्हणीचा प्रत्येय ताईंनाही आला. आण्णांच्या सहवासात राहुन त्यांच्यात देखील समाजकार्याची आवड निर्माण झाली. समाजातील गरजूंसाठी, दुर्लक्षितांसाठी, पीडितांसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतून शारदाताईंनी अण्णांसोबत शनिवारी रविवारी अर्थात सुट्टीच्या दिवशी मुंबईतील रस्त्यांवर, चाळींतून आणि झोपडपट्यांमधुन सर्वेक्षण केले. यात फुटपाथवरील अनाथ महिला , कचरा गोळा करणाऱ्या महिलांपासून ते अगदी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला या सर्वांचे ताईंनी सर्वेक्षण केले 3000 देवदासींचा मुंबईत महाराष्ट्रातील पहिला महिला मेळावा त्यांनी घेतला.  याची दखल शासनाला व प्रसार माध्यमांनाही घ्यावी लागली व त्याचा परिणाम म्हणून पुढे देवदासींना पेन्शन सुरू झाली.  त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये अनुदान शासनाने सुरू केले. याच काळात एका अनाथ चिमुरडीचे पालकत्व ताईंनी स्वीकारले व तिला सात वर्षे आपली पोटची मुलगी म्हणून स्वतःच्या मुलींसोबत सांभाळले. पुढे त्या मुलीची हुबळी येथील मावशी आली व त्या मुलीला घेऊन गेली. मात्र तोवर ताईंनी त्या मुलीला सातवीपर्यंतचे शिक्षण दिले होते. 1993 मध्ये ताईंनी आपल्या पतीला पूर्णवेळ साथ देण्यासाठी व आपलेही कार्य पूर्णवेळ करता यावे यासाठी नोकरीतुन स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली! याला म्हणतात त्याग मित्रांनो,  शारदाताई म्हणजे सदैव प्रसन्न हसतमुख आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणारं व्यक्तिमत्व. भाषणबाजी, पेपरबाजी त्यांना अजिबात आवडत नाही. मात्र चार चौघात बोलताना आपला विषय प्रतिपादन करताना त्या कसलेल्या वक्ता वाटतात. 1993 पासून सोलापूर व परिसरातील ग्रामीण महिलांचे संघटन करून त्यांना ताईंनी महिला शोषण , महीला अन्याय अत्याचार यांच्या विरुद्ध उभे ठाकण्याची शक्ती दिली. शाळाबाह्य मुलांसाठी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिकवणी घेतली.  स्त्रियांसाठी रात्रीचे प्रोढशिक्षणाचे वर्ग चालवले. तसे पाहता रेणके आण्णांचे कार्यक्षेत्र भटक्या-विमुक्तांची संबंधित राहिले आहे तर शारदा ताईंना महिलांचे शोषण महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविणे व महिला सशक्तिकरण करणे या कार्याची प्रचंड आवड आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना "सावित्रीबाई फुले पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव केला आहे.  त्यांच्या 1993 ते 2003 या दशकातील केलेल्या ग्रामीण गोरगरीब महिलांबद्दलच्या कार्याचा हा गौरव होता मित्रांनो. त्यांनी पतीच्या निसर्ग शेतीच्या कार्याला पूर्ण ताकदीने सहकार्य केले. अण्णांच्या त्यांनी शेतीपासून काढलेल्या विश्वविक्रमी उत्पादनाच्या प्रयोगाला महाराष्ट्र शासनाने "कृषी रत्न पुरस्कार " व सेंद्रिय पद्धतीच्या शेती प्रयोगाला "सेंद्रिय शेतीचा शिल्पकार" असे दोन पुरस्कार दिले. मात्र आण्णा या दोन्ही पुरस्कारांचे श्रेय स्वतः अजिबात घेत नाहीत. उलट ते हे नम्रपणे कबूल करतात की निसर्ग शेती व सेंद्रिय शेतीमधील माझे प्रयोग हे केवळ शारदेमुळेच शक्य झाले आहेत. माणसे, खासकरून बायका जोडण्याचे ताईंचे कसब या प्रयोगात प्रचंड कामी आले.
मित्रांनो, शारदाताई व आण्णा या दाम्पत्यांना पाच मुली आहेत. पैकी चार विवाहित आहेत तर एक अविवाहीत आहे. आण्णा म्हणजे सतत समाज कार्यात व्यस्त प्राणी. आज इथे तर उद्या तिथे. आयुष्यभर चळवळ व तत्संबंधीचे कार्यक्रम आणि पुढे राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून पडलेली महत्वपुर्ण जबाबदारी यामुळे अण्णा कधीकधी तर महिना-महिना घरी येत नसत. तेव्हाही लेकींना प्रेमाने सांभाळणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे ही सर्व कामे स्वतः शारदाताई व्यवस्थित करत असत. केवळ पतीलाच नव्हे तर मुलींनाही त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. निर्णय जरी चर्चेअंती घेतले जात असले तरीही आपले निर्णय त्यांनी कोणावरही लादले नाहीत. स्वतः वंशपरंपरागत व्यवसाय म्हणजे भिक्षुकी व घरोघरी फेरी मारण्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातून येणाऱ्या शारदाताईंनी आपल्या पाचही मुलींना उच्चशिक्षित बनवले. त्या कधीही बोलत नाहीत मात्र त्यांनी करून दाखवले. आज त्यांच्या पाचही मुली स्वावलंबी आहेत. सर्वजणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि स्वतःच्या पायावर केवळ उभ्याच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च उच्च पदांवर आहेत! त्यामुळे शारदाताई व आण्णा अगदी निर्धास्त आहेत. शारदाताईंनी आण्णांवर आणि उभयतांनी मुलींवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला. त्यांच्या चारही मुलींचे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले आहेत! आण्णा कधी कधी माझ्याशी गमतीने बोलतात की बाळासाहेब माझ्या घरात अख्खा भारत नांदतो आहे!! कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब अशा अनेक राज्यांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. मित्रांनो,भाषा व प्रदेशावरून रणकंदन करणाऱ्या आजच्या तकलादू लोकांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन नाही का? सर्वजाती समभाव व सर्वधर्मसमभाव यांच्या वल्गना करणाऱ्यांनी समभाव म्हणजे काय हे शिकावे या रेणके कुटुंबाकडून!! ते शिकावे या शारदाताईंकडून!!
त्यांनी मुलींसाठी संपत्ती कमावून ठेवली नाही मात्र त्या स्वतः संपत्ती कमावू शकतील एवढे त्यांना सक्षम बनविले. आज त्यांच्या सर्व मुली कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत हे विशेष आणि हे पाहिल्यानंतर मातापित्यांचे यश म्हणजे काय किंवा यश कशाला म्हणावे हे पटते, याचा साक्षात्कार येतो. स्वतःचे घर नसलेल्या शारदाताई, स्वतःच्या घरात रहायला गेल्या 1971 साली!!! मात्र आता त्यांच्या मुलींची मुंबईत स्वतःची घरे व स्वतःच्या गाड्या आहेत हे त्यांना गौरवास्पद व स्वप्नवत वाटते. खरे तर हे परमेश्वराने दिलेले फळ आहे असे मी समजतो. हे फळ आहे ताई आणि अण्णांच्या नीतिमत्तेला दिलेले, त्यांच्या संस्कारांना दिलेले आणि त्यांनी समाजासाठी निस्वार्थपणे केलेल्या कष्टाला दिलेले.
ताईंचे मोठेपण इथेच संपत नाही. ताईंनी दोन्हीही घरी दिवा लावला. सासरीही आणि माहेरीही! दोन्हीकडच्या जिम्मेदा-या त्यांनी लीलया पार पाडल्या. दोन्हीकडची वर्दळ, एकत्र कुटुंबपद्धती यांचा त्यांनी कधीही ताण घेतला नाही, कांगावा केला नाही, पतीला व नातेवाईकांना ऐकावणे केले नाही. त्या कधी रागावल्या नाहीत, त्यांनी कधीही कपाळावर आठ्या पडल्या नाहीत अथवा आदळ-आपट केली नाही. कधी साडीचोळीसाठी, दागदागिन्यांसाठी, गाडीघोडीसाठी हट्ट आग्रह धरला नाही. विशेष म्हणजे स्वतः कमावत्या असुनही!!!एवढेच काय तर त्यांनी ते कधी चेहऱ्यावरही दिसू दिले नाही. शारदाताई नेहमी अण्णांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.शिवाय त्यांनी एका सुंदर संयुक्तकुटुंबाची बांधणी केली. स्वतःच्या मुली, पुतने, नातवंडे या सर्वांना एका धाग्यात गुंफुण ठेवले. अण्णांनी देखील ताईंच्या कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप केला नाही अथवा त्यावर हरकत घेतली नाही.
विचार करा मित्रांनो सामान्य घरातून जाऊन, असामान्य बनुन सामान्यपणे जीवन जगणे सोपे आहे काय? पंख फुटणारे जोडपे अन शिंगे फुटणारे कारटे यांचा आदर्श घेतील काय? वेल सेटेल्डंच जोडीदार पाहीजे असा पराकोटीचा आग्रह धरणा-या आजच्या युवती शारदाताईंनी घालुन दिलेला आदर्श अंगिकारतील? शारदाताईंमध्ये सामंजस्य, मनाचे मोठेपण, आदर, त्याग, समर्पण, उदारता नसती तर बाळकृष्ण रेणके आण्णा घडले असते?
शारदाताई मराठी- कन्नड-हिंदी-गुजराती अस्खलितपणे बोलतात. त्यांचे लाघवी बोलणे, निरागस स्मित हसणे आणि निरामयी तेजस्वी दिसणे मला तर त्यांच्या प्रेमातच पाडते! मी अण्णांना गमतीने म्हणत असतो, अण्णा तुम्हाला सुंदर बायको मिळाली हं. यावर तेही प्रामाणिकपणे म्हणतात, हो बाळासाहेब, नक्कीच, त्यासाठी परमेश्वराचा मी ऋणी आहे रे. शारदा  तनाने जितकी सुंदर आहे त्याहुन कितीतरी अधिक ती मनाने सुंदर आहे. सौंदर्याची सम्राज्ञी म्हण हवं तर. मोठमोठ्या सामाजिक कार्याबरोबरच घराचं घरपण हे लहान लहान गोष्टीत असतं हे ताईंना चांगलेच ठाऊक आहे. मुलींमध्ये त्या त्यांची मोठी बहीण म्हणून राहतात. सिनेमा पाहणे, गाण्याच्या भेंड्या खेळणे, कुटुंबासह पत्ते खेळणे यात आनंद शोधणा-या शारदाताई पर्यटनाच्या खुप छंदी आहेत. त्यांना खूप आनंद मिळतो भ्रमणातुन. समुद्र पाहणे हा त्यांचा खास छंद.
मित्रांनो अखिल भारतभर भटक्या-विमुक्तांच्या चळवळीचे आधारवड आदरणीय बाळकृष्ण रेणके आण्णा आहेत याबाबत जसे कोणाचेच दुमत नाही तसेच "अण्णांचा आधारवड शारदाताई आहेत" यात स्वतः आण्णांचेही दुमत नाही हे विशेष! असा हा आधारवड अमृतमहोत्सवी झाला आहे. अर्थात शारदाताई दिनांक आज 01 मार्च 2018 रोजी वयाची 75 वर्षे पुर्ण करीत आहेत!!! म्हणजे हा त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस!! मात्र हा अमृतमहोत्सवी आधारवड अजूनही सळसळता आहे!गर्द आहे!टवटवीत आहे! आणि आजही आधार देतच आहे! आणि संदेश देत आहेत त्या नुसतेच डेज साजरे करण्यात धन्यता मानणाऱ्या आजच्या प्रेमी युगलांना आणि अग्नी भोवती सात फेरे घेऊन साताजन्माची साथ निभावण्याच्या आणाभाका खाऊनही सात दिवसही सुखाने संसार न करू शकणा-या सोकाँल्ड माँडर्न विवाहित जोडप्यांना की "आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची स्वप्ने आपली असतात आणि ती पुर्ण करण्यासाठी आपण आपले योगदान कसे द्यायचे असते.
आई जगदंबा करो शारदाताईंचे सौंदर्य, औदार्य, हास्य आणि स्वास्थ्य असेच व्रुदींगत होत राहो हीच सदिच्छा. मला आज जसा आदरणीय शारदाताईंना पाहून हा त्यांचा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस आहे यावर विश्वास बसत नाही तसाच विश्वास त्यांच्या शतकोत्सवी वाढदिवशीही त्यांना शुभेच्छा देताना न बसो हीच प्रार्थना व हीच शुभेच्छा.

 शुभेच्छुकः बाळासाहेब सिताराम धुमाळ
 मो. 9673945092j