Tuesday 25 April 2017

भटक्यांचा सूर्य: बाळकृष्ण रेणके

भटक्यांचा सूर्य ...... 

मित्रांनो नमस्कार , आजचा दिवस माझ्यासाठी विशेष ठरला. कारणही तितकेच विशेष होते, ते म्हणजे केंद्रिय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळकृष्ण रेणके आण्णा यांच्या सोबत आख्खा दिवस राहण्याचा योग आला . काल पर्यंत रेणके आण्णा म्हणजे केंद्रिय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष एवढीच माझ्या दृष्टी अण्णांची ओळख होती. शिवाय त्यांच्या विरोधकांनी त्यांची, स्वार्थी, पदलोभी, जातिभ्रष्ट वगैरे अशी करून दिलेली ओळखही मनात होतीच . मात्र वाचनाची आणि गप्पा करण्याची आवड असल्याने, आण्णांविषयी मनात एक प्रकारचा आदर निर्माण झाला होता . सोशियल मिडीयाच्या माध्यमातून आण्णांची ओळख झाली . मधून मधून फोनवर बोलणेही होवू लागले . मध्यंतरी दोन वेळा भेटही झाली होती व गप्पाही झाल्या होत्या मात्र ठराविक विषयाला अनुसरून .. आज एकांत होता , दिवसभरातील दोन-चार तास सोडले तर वेळही होता .

या दिवसभरातील अनुभव आणि चर्चा यातून जो प्रत्यय आला तो खूपच प्रेरणादायी आणि आश्चर्य चकित करणारा होता . अत्यंत गरीब, घरहीन व भूमिहीन भटक्या गोंधळी जमातीमध्ये जन्मलेल्या अण्णांचे दरिद्री बालपण, त्यांचे स्वातंत्र्यापुर्वीचे दरवर्षी दर नव्या बोर्डींगमधील शिक्षण , त्यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा रेल्वे स्टेशन हेच आपले घर समजून केलेला संघर्ष , त्यांचा आंतर जमातीय विवाह , त्याला उभय जमातींकडून झालेला विरोध त्यातून दोन्ही परिवाराला जात पंचायतींकडून वाळीत टाकले जाणे, १९६२ मध्येच बी. एस . सी. केमिष्ट्री पूर्ण करणे , त्या काळी वर्ग २ च्या नोकरीचा १९७३ मध्येच त्याग करून भटके विमुक्तांच्या चळवळीत स्वतःला झोकून देणे, स्व. इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाला सहकार्य करणे, लोकनायक जयप्रकाश नारायणांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणे , त्यांचा अर्थशास्त्र , शेतीशास्त्र , समाजकारण , राजकारण , भटक्या विमुक्तांचे प्रश्न , त्यांची कारणे व उपाय या बाबतचा अभ्यास , राज्यघटना , कायदे , कलमे , शासन निर्णय , शासकीय परिपत्रके यांचे ज्ञान , कौटुंबिक जबाबदारी निभावण्यातील यश , जातीमुक्त समाजरचना निर्माण होण्यासाठीची धडपड, किमान दर्जाचे तरी मानवी जीवन भटक्या विमुक्तांना जगता यावे यासाठीची तळमळ , भटक्या विमुक्तांच्या छोट्याछोट्या पण मोठ्या अडचणींची जाण, भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या हालचाली व त्यांचे संभाव्य परिणाम यांचा आभ्यास, शेती क्षेत्रातील संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्ञान, प्रवाहाच्या विरुद्ध जावून प्रश्नांना वाचा फोडणे, सनदशीर मार्गांचा अवलंब करणे, सामाजिक एकोपा बिघडणार नाही अशाप्रकारे अडचणीतून मार्ग काढत आपले प्रश्न नेटाने, नम्रपणे व तितकेच परखडपणे मांडणे , तळमळीचे कार्यकर्ते ओळखणे , कार्यकर्त्यांना कामाला तयार करणे, कार्यकर्त्यांशी व मान्यवरांशी व्यक्तीशः संपर्क ठेवणे , त्यांच्याजवळ पोटतिडकीने विषय मांडणे व हाताळणे , कोणतीही राजकीय पार्श्वभूमी वा राजकीय वरदहस्त नसताना केवळ अभ्यास, कार्य, तळमळ व संपर्क यांच्या जोरावर आयोगाचे अध्यक्ष पद मिळवणे , त्या पदावरून एक ऐतिहासिक व पुढील पिढीला दिशादर्शक ठरेल असे कार्य करणे केवळ चमत्कारिक आहे. आजच्या अनेक मान्यवर नेत्यांना त्यांनी उभे केले असले तरी त्यांच्या बोलण्यात गर्व मात्र कणभरही दिसला नाही.
मित्रांनो, वयाच्या ऐंशीव्या वर्षी विचार करण्याची , बोलण्याची, चालण्याची जी क्षमता मला आण्णांमध्ये आढळली ती माझ्यातही नाही . खरोखरच आण्णा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे. जो त्यांच्या सानिध्यात जाईल तो खूप काही शिकल्या वाचून राहणार नाही . फक्त जाणारा निस्वार्थी असावा . त्याने सेवाभाव व समाज हित एवढेच ध्येय उराशी बांधावे . कारण अण्णांनी ठरवले असते तर ते स्वतः काहीही कमावू शकले असते . केवळ चळवळीचे यश अपेक्षीणारे आण्णा अनेकांना मदत व मार्गदर्शन करतात पण अनेकजण त्यांच्यावर टिकाही करतात. मात्र आण्णा आपल्यावरील टिकेणे डळमळून वा डगमगून जात नाहीत, चिडत नाहीत वा रागावत नाहीत आणि दुःखी होऊन रस्ता तर अजिबात सोडत नाहीत, तर टिकाकारांना क्रूतीतून उत्तर देतात. काही नेते आण्णांबद्दल अफवा पसरवताना आण्णांवर श्रद्धा असणा-या सामान्य लोकांना प्रश्न विचारतात, "एवढ्या मोठ्या आयोगाचे अध्यक्ष असुनही व आपले पाहुणे असुनही त्यांनी आपल्यासाठी काय केले?" मी त्यांना एवढेच सांगु इच्छितो की, आयोगाचे काम कोणाला वैयक्तिक लाभ मिळवून देण्याचे नाही. जसे वीज, पाणी, रस्ते, कार्डे, प्रमाणपत्रे, घरे, गुरे, शेती, नोकरी मिळवुन देणे वगेरे. तो आयोगाचा आधिकारीही. ते सरकारचे काम आहे. आयोगाचे काम दिलेल्या विषयाचा विशिष्ट कालावधीत आभ्यास करून तसा अहवाल सरकारला सादर करणे एवढेच असते. आण्णा व त्यांच्या सहका-यांनी देशातील सर्व भुभागावरील सर्व भटक्या विमुक्तांच्या प्राचीण व सद्यस्थितीतील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा सखोल आभ्यास करून तसा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. भटक्या विमुक्तांवरील प्रेमाचा, त्यांच्या परिस्थीती बदलाच्या तळमळीच्या प्रयत्नांचा व त्यांच्या प्रगल्भतेचा परिचय त्यांचा अहवाल वाचल्यानंतरच येईल. मात्र टिका करणारांनी तो वाचलाही नसेल याची खात्री आहे. आयोग लागु करणे ही शासनाची नैतिक व प्रशासकीय जिम्मेदारी आहे व जर सरकार यात चालढकल करत आहे तर सरकार वर घटनात्मक व संख्यात्मक दबाव आणुन, सरकारला आयोगाच्या शिफारशी लागु करण्यास भाग पाडणे हे आपले कर्तव्य आहे. खास करून संघटनांचे.. किती संघटनांच्या नेत्यांनी अहवाल वाचला आहे ? लोकांपर्यंत पोहचवला आहे? त्यातील शिफारशींनुसार जनतेला संघर्शासाठी तयार केले आहे ? असे प्रश्न न विचारलेलेच ठिक राहील, अर्थात कोणीच नाही असे अजिबात नाही. पण केवळ हार तुरे, मानपान व सोय करून घेण्यासाठी समाजकारणात येणारे स्वयंघोषित नेते असे अपवादानेच करतात. असे नेते जर काही काळ आण्णांच्या सहवासात आले तर वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाहीत. कसलीही वैयक्तिक आर्थिक कमाई नसलेले आण्णा मात्र काम कारण्याची संधी व विना शिफारस मिळालेले अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पुरस्कार हीच आपली खरी कमाई मानतात. आण्णा साधेपणाने जीवन कसे जगावे हे ही शिकवतात . वास्तविक पाहता या वयात एवढ्या अनुभवानंतर आण्णा रिमोट कंट्रोल बनू शकतात. मात्र केवळ उंटावरून गुरे राखण्याऐवजी ते प्रत्यक्ष जमिन स्तरावर काम करतात. त्या कामात स्वतः सहभागी होतात. प्रत्येक काम चांगल्यात चांगले कसे होईल यासाठी धडपड करतात.
त्या काळी १९६२ मध्येच बी. एस . सी. केमिष्ट्री पूर्ण करणारे आण्णा बहुदा महाराष्ट्रातील भटक्या जमातींमधील पहिले विज्ञान शाखेचे पदवीधर असावेत . फॉरेन्सिक सायन्स विभागातील वर्ग २ च्या पदावर नेमणूक मिळालेले आण्णा नोकरीमध्ये रमले नाहीत . केवळ आठ वर्षे नोकरी केल्यावर शाहू , फुले , आंबेडकरांच्या विचारांनी व कार्यांनी प्रेरित होऊन अण्णांनी पदाचा त्याग करून १९७३ पासून स्वतःला पूर्ण वेळ समाज कार्यात झोकून दिले . भटक्या जमातीमध्ये जन्माला येऊनही कागद पत्रांअभावी अण्णांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही .भटक्या विमुक्तांची तत्कालीन जीवन पद्धती आरक्षणाचा लाभ मिळवून शिक्षण घेऊन जीवनमान उंचावू शकेल अशी नव्हती . या परिस्तिथीमध्ये आजही विशेष बदल झालेला नाही असे आण्णा म्हणतात . आजही अनेक भटक्या विमुक्तांना जातीची प्रमाणपत्रे सहजासहजी मिळत नाहीत . सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक समानता अपेक्षीणाऱ्या आजचा आधुनिक काळातही भटका समाज किमानतेची लढाई लढत आहे . भटक्या विमुक्तांना किमान मानवी जीवन तरी जगात यावे यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे, भटक्यांच्या बाबतीत समानतेची लढाई तर आजून खूप दूर आहे असे अण्णांना वाटते.
ज्या जात पंचायतींनी आण्णांना व त्यांच्या पत्नींना जातीबाहेर टाकले , त्याच जात पंचायतींचे अस्तित्व टिकावे मात्र त्यांना कायद्याचे प्रशिक्षण देवून, त्यांची पद्धतशिर फेररचना करून, तीत एनजीओ, शासकीय व कायद्याचे प्रतिनीधी, प्रशिक्षित समुपदेशक समाविष्ट करुन जातपंचायत म्हणजे पारदर्शी समुपदेशन करणारी संस्था असावी, तीला शिक्षा करण्याचा नव्हे तर समुपदेशन करण्याचा अधिकार असावा असा आग्रह आण्णा धरतात . कारण भटक्या विमुक्तांना कायद्याचे शिक्षण नाही, तेवढा वेळ व पैसा नाही, शिवाय हमेशा पाठीवर बि-हाड असलेला हा समाज ज्युरिडीक्शन, तारिख, वकील ,पुरावे, युक्तिवाद व निकाल या सर्वांशी अनभिज्ञ आहे . त्यामुळे स्थानिक स्तरांवरच लहानलहान तंटे मिटवणा-या प्रशिक्षित जातपंचायतींचा आग्रह धरणारे आण्णा... भटक्या विमुक्तांचे त्यातही विशेषत्वाने भिक्षुक व कलावंत जमातींचे प्रश्न शासन दरबारी आत्मीयतेने मांडणारे आण्णा मला कळाले तसे इतरांनाही कळावेत. आण्णा कळाले नाहीत कारण ते ज्यांच्यासाठी काम करतात ते निरक्षर, अज्ञानी, भटके लोक पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेत परेशान, त्यांना आण्णा कसे समजतील ? पण जे जन्मजात भटके, सुक्षित आहेत, पोटाला पोटभर खावू शकतात अस्यांची ही सामाजिक जिम्मेदारी आहे की त्यांनी तरी आण्णा समजून घ्यावेत व समजून सांगावेत.
मित्रांनो, मानवी स्वभाव असतो, एखादे असामान्य व्यक्तीमत्व जेव्हा आपल्या समोर घडत असते तेव्हा आपण हातभार लावणे, कौतुक करून प्रेरणा देण्याऐवजी, टिका करतो, जळतो, उलटप्रश्न विचारतो, ऐकीव बाबींवर विश्वास ठेवुन अफवा पसरवतो. आणि जेव्हा असे असामान्य व्यक्तिमत्व जगाचा निरोप घेते तेव्हा पश्चाताप करतो, जो निर्थक असतो, किमान चळवळीत तरी. निसंकोच भटक्या विमुक्तांच्या चळवळीला लाभलेला हा एक प्रकाशमान सुर्य आहे जो समाजसेवेच्या अवकाशात ४० वर्षांपासून तळपत आहे व जो आजही अनेक कार्यकर्त्यांच्या व वंचित उपेक्षितांच्या डोक्यात प्रकाश पाडत आहे.
अण्णांविषयी सांगावे तेवढे कमीच आहे , असो एवढे मात्र नक्की की जर आण्णा भटके नसते तर आता आहेत त्याच्या खूप वर असते. कारण त्यांची ती क्षमता आहे मात्र ज्यांना जन्मजात ते व्यासपिठ व प्रसिद्धीचे वलय आहे, आण्णांना ते नाही. त्यांच्या क्षमतेचा, अनुभवाचा, अभ्यासाचा, ओळखीचा उपयोग आजचे तरुण कार्यकर्ते चळवळीसाठी जितका अधिक करून घेतील तितकी चळवळ मजबूत व गतिमान व्हायला मदत होईल यात शंका नाही . शिवाय अशी स्वयंप्रकाशीत व्यक्तीमत्वे चळवळीत पुन्हा पुन्हा घडत नाहीत व घडली तरी यात वेळ खुप खर्ची जातो, एवढे नक्की......
आपलाः
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. ९४२१८६३७२५
मो. ९६७३९४५०९२ (WhatsApp only)

No comments: