Wednesday, 12 September 2018

पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?

पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?

सुप्रसिद्ध संगीत संशोधक व हार्मोनियम वादक डॉ. विद्याधर ओक यांनी "पुनर्जन्म मिथ्य की तथ्य ?" हे पुस्तक लिहून एकप्रकारे खळबळच माजवली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे मोहंजोदाडो संस्कृतीतील एका राजगुरुचा पुनर्जन्म आहेत! उद्योगपती मुकेश अंबानी हे सम्राट अकबराचा पुनर्जन्म आहेत! उद्योगपती रतन टाटा हे औरंगजेबाचा पुनर्जन्म आहेत! तर जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या कवयित्री बहिणाबाई चौधरींचा पुनर्जन्म आहेत! डॉ. ओकांनी या पुस्तकात इतरही अनेक पुनर्जन्माची उदाहरणे दिली आहेत.

 त्यांनी हे अंदाज चेहरा व गुणात्मकता यांच्या आधारे बांधले आहेत. अंदाज कोणीही बांधु शकतो, कल्पना कोणीही करू शकतो मात्र डॉ. ओक हे कोणीही व्यक्ती नाहीत. ते इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर व संशोधक आहेत. ते एम.बी.बी.एस.डी. आहेत! त्यांनी एक विशिष्ट प्रकारची हार्मोनियम तयार केली आहे जिचे पेटंट त्यांच्याकडे आहेत!

पुनर्जन्म या संकल्पनेचे समर्थन वा पुनरुच्चार आजवर त्यांनीच केला आहे असेही नाही. आजवर जगभरातील अनेक विदवान शास्त्रज्ञांनी आपले आयुष्य या, आत्मा, भुत, पुनर्जन्म यांच्या शोधार्थ खर्च केले आहे. त्यांनी मोठमोठे दर्जेदार प्रबंध सादर केले आहेत. मोठमोठी पुस्तके लिहिली आहेत. केवळ हिंदु धर्मातच नव्हे तर जगातील सर्वच धर्मात व संप्रदायात पुनर्जन्म ही संकल्पना सत्य समजली जाते. डॉ. ओक आपल्या पुस्तकाच्या अर्थात "पुनर्जन्म" या संकल्पनेच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतात. ते म्हणतात की, दोन सख्ख्या भावांतही गुणात्मक दृष्ट्या खूप जास्त अंतर कसे काय असते? कमी वयातील बालकही अत्यंत प्रज्ञावंत असल्याचे अनेकदा कसे काय आढळून येते? कोणी शिकविलेले असते त्याला? हे असे सर्व प्रकार, पूर्वजन्माचे गुण एखाद्या व्यक्तीमध्ये आल्यानेच होतात असे त्यांना वाटते. 

तसे पाहता पुनर्जन्म ही संकल्पना फायदेशीरही खुप आहे. ती मानवी वर्तनावर नियंत्रक म्हणून भूमिका बजावते. माणसाला पुढील जन्मी चांगला जन्म मिळावा यासाठी चालू जन्मात चांगले कार्य करण्यास एक प्रकारे प्रव्रुत्तच करते. माणसातील मृत्यूची भीती नाहीशी करते व प्राप्त परिस्थितीमध्ये, जन्माने प्राप्त झालेले जीवन, त्यातील आव्हाने, संकटे स्वीकारून जगण्यास सक्षम बनवते. आजवर सर्वच धर्मात पाप-पुण्य, स्वर्ग-नर्क, जन्म-पुनर्जन्म या संकल्पना मान्य केलेल्या आहेत. मृत्यूनंतरचे सर्व विधि जसे की, दहन, रक्षाविसर्जन, दशक्रियाविधी, गंगापूजन, वर्षश्राद्ध व दानधर्म यापाठीमागचा उद्देशही हाच असतो की म्रुत आत्म्यास शांती लाभावी व पुढील जन्मी चांगला जन्म मिळावा; म्हणजेच पुनर्जन्म मिळावा. आपण बऱ्याचदा जन्मखूण आहे, पोटी आला आहे, नावकरी आहे अशी वाक्ये ऐकत असतो. ही सर्व उदाहरणे काहीशी पुनर्जन्माशीच मिळती जुळती आहेत.

आजवर अनेक साहित्यिकांनी या विषयावर कथा, कविता, कादंब-या लिहील्या आहेत. अनेक नाटककारांनी नाटके लिहीली आहेत तर अनेक चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी या विषयावर चित्रपट बनविले आहेत. या सर्व मंडळींना आपण चुकीचे ठरवू शकत नाही. या विषयाची उत्सुकता सर्वांनाच आहे, जगभर आहे.

मात्र असे असले तरी एक विज्ञानाचा विद्यार्थी व शिक्षक असल्याने माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. अर्थात असे म्हणत असताना मी डॉ. ओक व आजवरच्या सर्व साधुसंतांच्या, साहित्यिकांच्या व संशोधकांच्या बुद्धीचा आणि कार्याचा विनम्र आदर करतो. मात्र मी स्वतःला कितीही समजावायचा प्रयत्न केला तरी काही प्रश्न मला सतावताच. जसे की, आजवर अनेक देवी-देवतांनी पृथ्वीतलावर जन्म घेतले आहेत म्हणे! त्यांचे ते पुनर्जन्मच होते ना? मग हे पुनर्जन्म आता का होत नाहीत? स्वर्ग नावाची संकल्पना धर्मशास्त्रात सांगितली आहे. स्वर्ग हा आकाशात असतो म्हणे! मग तो आजवरच्या एवढ्या सगळ्या अवकाश संशोधन मोहिमांमध्ये का आढळला नाही? जन्माला आलेल्या सर्वांनाच पुनर्जन्म मिळतो का? हा पुनर्जन्म केवळ माणसाचाच होतो की इतर प्राण्यांचाही होतो? सर्वांनाच माणुस म्हणुनच पुनर्जन्म मिळतो कि इतर प्राणी म्हणुनही मिळतो? सर्वांनाच मिळतो व माणूस म्हणूनच मिळतो असे म्हटले तर मग पृथ्वीवरील लोकसंख्या वाढत का आहे? कायम राहिली पाहिजे ना?

जर आत्मा हा निर्गुण-निराकार आहे असे शास्त्र सांगत असेल तर डॉ. ओक असे कसे काय म्हणतात की आत्मा स्वतः सोबत काही गुण हे पुढच्या जन्मी घेऊन जातो? बरं, जर आत्मा केवळ एक देह सोडून दुसरा देह धारण करतो तर मग त्याची स्मृती कशी काय नष्ट होते? बरं जर स्मृती नष्ट होते तर मग त्यातील गुण कसे काय जीवंत राहतात? डॉ. ओकांनी सांगितलेल्या सर्व भारतीयांचे पुनर्जन्म केवळ भारतातच कसे काय झाले? केवळ भारतातच मानव आहेत असे नाही शिवाय असेही नाही की केवळ भारतातच भारतीय आहे.  शिवाय जैवरासायनिक बदल, जन्मजात बुद्यांक हे घटक कसे काय दुर्लक्षिले जाऊ शकतात? पुनर्जन्म ही संकल्पना जर शास्त्रात सांगितली आहे असे म्हटले तर "शास्त्र" हे निरंतर प्रगती करत असते हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे ना? परंतु "या" शास्त्राची कुठलीही प्रगती झाल्याचे दिसत नाही. एखादी बाब सत्य व टिकाऊ असली पाहिजे तरच ती सत्य समजली जाऊ शकते. शिवाय ती सिद्धही केली जायला हवी. ती वैश्विकही असायला हवी. ती काल व स्थलसापेक्षही असायला हवी. काय या सत्यता पुनर्जन्माच्या बाबतीत सत्यात उतरतात?

डॉ. ओक कल्पना काहीही करू शकतात. त्यावर लेखनही करू शकतात. मात्र किमान आजचे जग तरी विज्ञान मानते आणि विज्ञान हे तत्वावर आधारलेले आहे. तत्व जे सिद्ध होतात. त्यामुळे
जेव्हा एखादी प्रतिष्ठित विद्वान व्यक्ती असे म्हणते तेव्हा त्याला सहाजिकच महत्त्व प्राप्त होत असते. त्यामुळे मला शंका आहे की, या पुस्तकामुळे अंधश्रद्धा वाढीस लागण्यास मदत होणार नाही कशावरून? पूजापाठ, कर्मकांड वाढीस लागणार नाही कशावरून? बुवा, बाबा, साधु, तांत्रिक,  मांत्रिक यांचे फावणार नाही कशावरून? कर्तृत्वास बंधने येणार नाहीत कशावरून? माणूस दैववादी व उदासीन बनणार नाही कशावरून? माणूस परिस्थितीशी संघर्ष करण्यापेक्षा माघार घेऊन ,आहे त्याच्यात समाधान मानणार नाही कशावरून? अयोग्य व अन्यायकारक परिस्थीतीशी समायोजन साधण्याची वृत्ती वाढीस लागणार नाही कशावरून???

मला वाटते ही पुनर्जन्म नावाची संकल्पना काल्पनिक आहे. ती तोवर काल्पनिक मानायला हवी जोवर तीला विज्ञानाने घालुन दिलेले निकष पुर्ण करता येत नाहीत. त्यामुळे किमान तोवर तरी 'पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?' ते तुम्हीच ठरवा.......

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
मो. 9673945092.

No comments: