Saturday, 8 September 2018

वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दुर्लक्षित वारसदार


वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दुर्लक्षित वारसदार
भारतीय संस्कृती सर्वार्थाने समृद्ध व संपन्न संस्कृती आहे. तिचा गौरवशाली भूतकाळ व उज्ज्वल भविष्यकाळ आहे. शौर्य, साहित्य, कला, संगीत, स्थापत्य, अध्यात्म, शिक्षण व एकंदरीतच इतिहास वैभवशाली आहे. भारताची ही वैभवसंपन्न सांस्कृतिक ओळख संपूर्ण जगात आहे. मात्र ही ओळख आजची नाही.

आर्यांच्या आक्रमणापूर्वी अस्तित्वात असलेली सिंधू संस्कृतीच मुळात संपन्न होती. ही सभ्यता तिच्यातील हडप्पा, मोहेंजोदडो ही शहरे, त्यांच्यातील टुमदार गृहरचना, प्रशस्त रस्ते, सांडपाण्याची बंदिस्त व्यवस्था यांसाठी प्रसिद्ध होती. विपुल पशुधन, समृद्ध संगीत व कला हे सर्वच अगदी वाखाणण्याजोगे होते. या संस्कृतीचे निर्माते असलेले, एतद्देशीय द्रविड लोक कलागुण संपन्न व शांतता प्रिय होते तर परकिय आर्य हे, आक्रमक व साम्राज्यवादी होते. अर्थात मानवी प्रवासाच्या त्या काळात हा असा सत्तासंघर्ष व व्यापारसंघर्ष सामान्य होता, नैसर्गिक होता. मात्र सहाजिकच आर्यांच्या अतिक्रमणाचा या लोकांवर अनिष्ट परिणाम झाला. मुळात भटकेच असलेले आर्य व येथील मूळ निवासी द्रविड कारागीर, कलाकार, वाहतूकदार व पशुपालक यांच्यात नेहमी तक्रारी होऊ लागल्या. लढाया होऊ लागल्या ज्यात त्यांचा आर्यांपुढे निभाव लागला नाही. सततच्या युद्धाला कंटाळून, भयभीत होऊन, शांतता हवी म्हणुन अशा नानाविध कारणांनी परंतु मजबुरीने बहुतांश मुळनिवासी स्थलांतरित व विस्थापित झाले. त्यांच्यावर रानोमाळी, वनीजंगली लपून राहण्याची तसेच भटकत जीवन जगण्याची वेळ आली. एका ठिकाणी न राहाता संरक्षण, सोयीसुविधा व रोजगार अनुकूलतेच्या शोधार्थ हे लोक भटकंती करू लागले म्हणून त्यांना भटके असे म्हटले जाऊ लागले. टोळ्या टोळ्यांनी राहणे, प्रत्येक टोळीची व्यवसाय भिन्नता, प्रत्येक टोळीच्या वेगवेगळ्या रितीभाती, परंपरा, भाषा व विवाहपद्धती यांमुळे यांना जमातींचे स्वरूप आले. सतत भटकणाऱ्या जमाती म्हणून भटक्या जमाती अशा प्रकारचा भटक्यांचा अस्थिर व फिरस्ती जीवनाचा पूर्व इतिहास आहे जो अत्यंत प्राचीन आहे.

टोळ्याटोळ्यांनी वास्तव्य करणे, टोळ्यांच्या वैयक्तिक परंपरा जोपासणे, आपल्या टोळीला इतर टोळीपेक्षा श्रेष्ठ व वरचड सिद्ध करणे, कधी आर्यांच्या टोळ्यांशी तर कधी मुळ द्रविडीयन टोळ्यांशी संघर्ष होणे, रानावनातील लपुन छपून राहणे, हल्ले प्रतिहल्ले करणे या कारणांमुळे या टोळ्यांची कायिक, शौर्यात्मक, कलात्मक व कौशल्यात्मक क्षमता वृद्धींगत होत गेली. याचा परिणाम असा झाला की या शक्तीशाली हल्ल्यानंतरही आणि प्रदिर्घ संघर्षानंतरही या भटक्या जमाती हजारो वर्षांनंतरदेखील येथील समाजव्यवस्थेत व अर्थव्यवस्थेत आपले प्रबळ स्थान टिकवून होत्या हे विशेष!

कालपरत्वे परिस्थितीनुरूप समायोजन साधुन, सामाजिक एकोपा निर्माण करून, प्रसंगी माघार घेऊन या जमाती येथील मध्यवर्ती हिंदु संस्कृतीशी संलग्न राहील्या व संस्कृतीच्या अविभाज्य घटक बनल्या. या काळात व्यवसायाधारित जाती व्यवस्था अस्तित्वात होती पुढच्या काळात जाती आधारित व्यवसाय व्यवस्था प्रस्थापित झाली. असे असले तरी रोजगाराच्या दृष्टीने सर्व जाती जमाती स्वायत्त व स्वयंपूर्ण होत्या कारण शहरे संपन्न व खेडे समृद्ध होती. या समृद्धतेत व संपन्नतेत उभय वर्गांचा हिस्सावाटा होता. नव्हे नव्हे या कालखंडापर्यंत दोन्ही संस्कृती एकात्म झाल्या होत्या. मात्र इसवी सन सोळाशे मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची देशात स्थापना झाली आणि प्लासीच्या लढाईने देशात प्रत्यक्ष इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू झाला तेथपासून एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या जमातींंना पराकोटीचा संघर्ष करावा लागला. गुन्हेगारी जमाती कायद्याने तर यांना ब्रिटीश सरकारने अगदी गुन्हेगार जमातींचे लेबलच लावून टाकले! त्यांनी मारलेला गुन्हेगार जमाती हा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही!

पूर्वाश्रमीच्या लढवय्या, शूर, आक्रमक, काटक, रानटी व व्यापारी जमाती ज्यात महाराष्ट्रातील बेरड, बेस्तर, भामटा, कैकाडी, कंजारभाट, कटाबु, वंजारी, बंजारा अथवा लमाण, पारधी, रामोशी, पथारी यांसह भारतातील सर्वच जमाती पुरातन काळापासून आक्रामक व काटक जमाती आहेत. यांचे प्राचीन राजेशाही, स्वराज्य निर्मिती, ब्रिटीश विरोधी उठाव व स्वातंत्र्य लढा यात अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. काटकता, निर्भीडता, चपळाई, स्वामिनिष्ठा रक्तातच असल्याने या जमाती राजसत्तेच्या लाडक्या, विश्वासू तसेच आधारस्तंभ जमाती होत्या. तत्कालीन राजेशाहीने या जमातींची कौशल्ये व क्षमता पाहून त्यांना महत्त्वाची कामे नेमुन दिली होती, जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या. उपजत योग्यता अपेक्षेप्रमाणे आढळल्याने या जमातींना आपल्या घोडदळ, पायदळ, आरमारदल, गुप्तहेर खाते अथवा गुप्तचर यंत्रणा यात महत्वाच्या जागांवर प्रभावीरीत्या वापरण्यात आले होते. ज्यांना या जमातींची क्षमता व योग्यता समजली त्यांचे राज्य सुरक्षित व अबाधित राहिले. दोघांनीही परस्परांना बळकटी प्रदान केली.

शिवकाळात स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या जमातींना छत्रपती शिवराय, शंभूराजे, राजारामराजे यांच्या काळात योग्य तो मानसन्मान मिळाला. शिवछत्रपतींच्या जीवाला जीव देऊन त्यांच्या व जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य उभे करण्यात भटक्या विमुक्तांनी  ते ज्या ज्या क्षेत्रात निष्णात आहेत त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम योगदान दिले. शिवरायांच्या गनिमी कावा युद्धनीतीमध्ये या जमातीमधील अनेकांनी हिरीरीने सहभाग घेतला नव्हे नव्हे महाराजांनी याच जमातींचा कौशल्याने वापर करून घेतला. आपल्या आपल्या पारंपारिक भाषा व सांकेतिक भाषा असल्याने तसेच वेषांतर करण्याची अंगभूत कला असल्याने शत्रू गोटातील, शत्रू राज्यातील माहिती सफाईदारपणे जमा करून ती राजदरबारी पोहोचविण्याचे काम गुप्तपणे या जमातींनी केले. एकुणच काय तर सर्वांनी आपापल्या परीने स्वराज्यास हातभार लावला हे सर्वज्ञात आहे. किमान सर्वश्रुत तरी नक्कीच आहे. महाराष्ट्रात मराठेशाहीच्या अस्तानंतर मात्र या जमातींचा राजाश्रय नाहीसा झाला कारण इंग्रजांनी येथील राजेशाही संपुष्टात आणली होती. संस्थाने खालसा केली होती. अस्तित्वात असलेली इंग्रजी सत्तेच्या अंकित होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही मात्र त्यातही ज्या संस्थानिकांची अस्मिता जिवंत होती त्यांना या जमातींनी ताकद दिलेली आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासह संपुर्ण देशभर सारखीच होती.

आज वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे असलेले तसेच काळाच्या ओघामध्ये नाहीसे झालेले अनेक गडकिल्ले, दुर्ग, लेणी, मनोरे, भुयारे, मंदिरे, राजवाडे, गुहा, दिपमाळा, सभामंडप, तळघरे, कारंजे, धरणे, घाट, खिंडी, मकबरे इत्यादी नयनरम्य आणि डोळ्याचे पारणे फेडणा-या निर्मीती, वडार, बेलदार, पाथरवट या जमातींनी निर्माण केल्या आहेत. स्थापत्यकलेचे हे अनुपम नमुने तत्कालीन सम्रुद्धतेचे पुरावे आहेत. म्हणजे आजच्या या जमाती त्या काळच्या वास्तुशास्त्रातील वास्तुरचनाकार व अभियंते होत्या असे म्हटले तर अजिबात चुकीचे होणार नाही. या वास्तू त्यांनी ना केवळ आपल्या घामाच्या धारा गाळून बनविलेल्या आहेत तर रक्ताच्या धारा वाहवून, अवयव गमावून, कायमचे अपंगत्व पत्कारून व प्रसंगी जीव गमावून निर्माण केल्या आहेत. तेव्हा आज सर्वांना अभिमानास्पद अशा या दीर्घायुषी व विलोभनीय वास्तू उभ्या आहेत. यासाठी यांनी कुठलाही विशेष मोबदला कधी मागीतला नाही.

युद्धकाळात व एरवीही लागणारी शस्त्रास्त्रे, तोफा व तोफखाने गड-किल्ल्यांचे दरवाजे, मुर्त्या व पुतळे, नाणी व शिक्के तयार करणारे व इतरही धातुकाम व मूर्तिकाम करणाऱ्या लोहार, घिसाडी, ओतारी, ठुकारी, शिकलगार या जमातींनी सोसलेल्या झळा, मारलेले हातोडे व सहन केलेले चटके विसरता येणार नाहीत. सागरी सरहद्दीवर गस्त घालण्याचे, लढाऊ जहाजे व होड्या चालविण्याचे, कित्येक महीने समुद्रातच राहणून शत्रुला रोखण्याचे, परतवून लावण्याचे काम करणारे भोई, मल्लाव, कोळी यांचा त्याग व यांचे परिश्रम यामुळे युद्धे जिंकणे, मुलूख सहीसलामत ठेवणे, परमुलूख हस्तगत करणे शक्य झालेले आहे. याचा यांनी कधीही मावेजा मागीतला नाही.

देवी-देवतांची भक्ती, उपासना करणारे तसेच इतिहासातील प्रेरक, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे, घटना इत्यादी कथा व गीते लोककलेद्वारे सादर करून संस्कृतीचे मौखिक तसेच आपापल्या इतर कलाप्रकारांनी वहन करणा-या वासुदेव, बहुरूपी, आईंवाले, गोसाई, भोपी, गोंधळी, गोसावी, भराडी, चित्रकथी, हेळवे, जोशी, पांगुळ इत्यादी जमातींनी धार्मिक, अध्यात्मिक पात्रांची व घटनांची माहीती सांगितिक व कलात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडली. साधुसंतांचा, राजेमहाराजेंचा इतिहास जिवंत ठेवला. इतिहासातील शुरविरांच्या गाथा, चरित्रे, प्रसंग आदींचे गुणात्मक व मुल्यात्मक महत्त्व जनतेसमोर कलेद्वारे सादर केले. एवढेच नव्हे तर युद्धकाळात सैनिकांसमोर प्रेरक व जोशवर्धक कथा व गीते सादर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवीला, ऊर्जा दिली. मनोरंजनाबरोबरच नैतिकता, मुल्ये, शौर्य व आदर्शाचे धडे कलेतुन दिले. समाजातील वातावरण धार्मिक, सांप्रदायिक, प्रसन्न व शांततेचे ठेवले. याची दखल घेवून सर्वच नाही तरी किमान शिवरायांसारख्या पारखी राजांनी काही प्रमाणात का असेना पण यांना जहागि-या, वतने, इनाम, बक्षिसे बहाल केली.

 प्राण्यांच्या सहाय्याने खेळ दाखविणा-या गारुडी, नंदीवाले, मदारी, वाघवाले, दरवेशी, अस्वलवाले, जादूगार रक्षक आहेत येथील जैवविविधतेचे. पर्यावरणीय व पशुपक्षीय जैवविविधता मनोरंजनातून समजावून देण्याच्या पद्धतीच्या त्या जनक आहेत. तसेच रस्त्यावर मर्दानी कौशल्याधारित कसरती करणारे कोल्हाटी, गोपाळ, डोंबारी या जमाती शुद्ध व सात्विक मनोरंजन, बलोपासना यांचे महत्व समजावतात. जंगलांवर आधारित जीवन असणारे व गोल्ला, धनगर, ठेलारी तसेच मसनजोगी, काशिकापडी या सर्व भटक्या विमुक्त जमाती या देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे भूषण आहेत. येथील लोकजीवनाच्या या नाड्या होत्या. यांच्या भाषा, यांचे राहणीमान, यांची कलाकौशल्ये यांनी या देशाची संस्कृती लोकजीवन समृद्ध केलेले आहे. या जमाती ख-या अर्थाने वाहक आहेत धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक भिन्नतेच्या. देशाचा व संस्कृतीचा इतिहास या जमातींनी पद्धतशीरपणे जिवंत ठेवला आहे. त्याचे पिढी दरपिढी संक्रमण व संवहन केले आहे. यासाठी त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

आज रोजी मात्र या जमातींची जाणीवपूर्वक उपेक्षा केली जात आहे. यांच्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे. या उपेक्षेची व दुर्लक्षाची समीक्षा व चिकित्सा होणे अत्यंत आवश्यक आहे. भारतभर विखुरलेला हा भटका समाज, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून जाणीवपूर्वक दूर ठेवला जात आहे. ही उपेक्षा आता असह्य होत आहे. सहनशीलतेचा अंत होत आहे. मुख्यत्वे ब्रिटिशांनी शोषण केल्यामुळे देशोधडीला लागलेल्या या जमातींचे आपल्या तेथील बलुतेदार व आलुतेदार पद्धतीनेही शोषणच केलेले आहे. या पद्धतीने हक्काचा रोजगार जरी उपलब्ध करून दिला होता तरी या पद्धतीत क्षमतांची योग्य किंमत होत नव्हती. केवळ अन्नधान्याच्या मोबदल्यात इतर बलुतेदारांच्या व आलुतेदारांच्या सोबत लोहार, घिसाडी, भोई, गुरव, गवळी, धनगर, गोंधळी, डवरी, गोसावी, जोशी या भटक्या जमातींनी वस्तू व सेवा पुरवून प्राचीन भारतीय कृषीजीवन व दैनंदिन लोकजीवन स्वयंपूर्ण केले. या जमातींनी या देशाला यशोशिखरावर आरूढ केलेले आहे. आज जो भारत विश्वात आपल्या वैभवशाली संस्कृतीसाठी आदराने उच्चारला जात आहे त्यात भटक्या-विमुक्तांचे योगदान लक्षणीय आहे. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी पक्क्या उपजीविकेच्या साधनाची उपलब्धता करण्यात आली नाही. आज रोजी हा समाज विकासाच्या कुठल्याही पातळीवर आढळत नाही. वर्षानुवर्षांचा कोंडमारा, जीवनमानावर नकारात्मक परिणाम करणारे कायदे, यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण यामुळे  बंद पडलेले पारंपरिक रोजगार, संपुष्टात आलेली पारंपारिक बलुतेदारी व आलुतेदारी पद्धती, त्यामुळे निर्माण झालेली बरोजगारी, भुमिहीनता व साधनविहीनता यांचा विपरीत परिणाम भटक्यांच्या जीवनमानावर पडलेला आहे.

पुर्वीच्या काळी जरी या जमाती धनवान नव्हत्या तरी मानवान मात्र नक्कीच होत्या. हे महत्त्वपूर्ण स्थान त्यांनी आपल्या कला कौशल्यातून व कर्तबगारीतुन मिळविले होते. हा समाज वैशिष्ट्यपूर्ण भारतीय संस्कृतीचा मूळाधार होत्या. भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृतीची मुख्य ओळख होत्या! मात्र दुर्दैवाने आज रोजी तेच गौरवपूर्ण इतिहास असलेले भटके विमुक्त अगदी उदरनिर्वाहासाठी लाचार आहेत. पायाला चाक बांधून भटकंती करणारे, भटके लोक मरणासन्न जिवन जगत आहेत. एवढ्या वैभवशाली संस्कृतीचे निर्माते असुनही यांना कुठल्याही प्रकारचा मावेजा अथवा मोबदला मिळत नाही. वास्तविक पाहता हा गौरवास्पद इतिहास निर्माण करण्यासाठी यांनी तेव्हा कुठलीही विशेष अपेक्षा व्यक्त केली नव्हती.केवळ पोटापुरत्या अन्नपाण्यावर ध्यैयाने बेभान होवून आपल्या सर्वशक्तिनीशी यांनी कार्ये केली.

 ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्य प्रस्थापित करण्यातील, त्यात वृद्धी होण्यातील त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठ्या अडसर असणाऱ्या या जमातींना पद्धतशीरपणे बाजूला केले. या जमातींचे उपद्रवमूल्य ओळखून त्यांना गुन्हेगार जमाती घोषित केले. त्यांच्यावर कायद्याने बंधने लादली मात्र स्वतंत्र भारतातील नागरिकांनी या जमातींचा नेमका गुन्हा समजून घेतला पाहिजे. यांनी नेमका कोणत्या प्रकारचा गुन्हा केला होता हेच अद्याप कित्येकांना माहीत नाही मात्र तेच लोक या जमातींना गुन्हेगार जमाती असे संबोधतात! वास्तविक पाहता या जमातींनी गोऱ्या सरकारला सळो की पळो करून सोडले होते मात्र दुर्दैव असे की आज रोजी याच लढवय्या व गुणवान जमातींवर भीक मागण्याची वेळ आलेली आहे! कायद्याने तर भिकही मागता येत नाही. ज्याप्रमाणे 'गुन्हेगार जमाती' हा डाग आहे त्याचप्रमाणे 'भिकारी जमाती' हा देखील एक प्रकारचा डागच आहे जो या जमातींवर पडला आहे.

वैभवशाली भारतीय संस्कृतीचे हे खऱ्या अर्थाने निर्माते असूनही यांना कुठलाही वारसा हक्क प्राप्त झाला नाही. खऱ्या अर्थाने या संस्कृतीचे वारसदार असुनही या जमातींची आज अवहेलना होत आहे. एका गौरवपूर्ण इतिहासाच्या निर्मात्या असूनही या जमातींवर प्रथम आर्यांच्या अतिक्रमणामुळे, पुढे ईस्ट इंडिया कंपनीमुळे, त्यानंतर इंग्रजांच्या जुलमी कायद्यामुळे, तदनंतर स्वतंत्र भारतातील अन्यायकारक कायद्यांमुळे आणि आता आधुनिकीकरण व औद्योगिकरणामुळे आज बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

 समाजाच्या संशयास्पद व घृणास्पद दृष्टिकोनामुळे यांना कोणतेही सन्मानजनक काम मिळत नाही. यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही परिणामी यांना प्रतिबंधित व्यवसाय जसे की, दारू तयार करणे, अवैध वाहतूक करणे, गुन्हेगारी जगताला पूरक व्यवसाय करणे, महिलांवर देहविक्रय करणे, भीक मागणे असे व्यवसाय करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. अर्थात असे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जरी थोडीच आहे तरी शिक्षण, प्रतिष्ठा, संपत्ती, रोजगार नसल्याने तसेच निरक्षरता, व्यसनाधीनता, दैववादीपण व अंधश्रद्धा असल्याने समाजात नकारात्मकता, द्वेषभावना व विद्रोहवृत्ती वाढीस लागत आहे. ही भावना भविष्यात अधिक गतीने वाढूही शकते जर अशाच प्रकारे प्रस्थापितांकडून हिनतेची, अविश्वासाची तसेच संशयाची वागणूक मिळू लागली आणि शासनाकडूनही उदासीनतेची व दुर्लक्षीततेची वागणूक मिळत राहिली तर!

 हे दुर्लक्ष असेच होत राहीले तर हा समाज अधिकच वाममार्गाला लागू शकतो. असेही या देशात डोके भडकवणारांची संख्या कमी नाही. एखाद्या चुकीच्या व्यक्तीकडून अथवा गटाकडून या जमातींचा आपराधिक कामांसाठी वापर करून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे वेळीच या जमातींकडे शासनाने विशेष लक्ष देऊन यांना मुख्य प्रवाहात आणण्याची नितांत निकड आहे. असे नाही झाले तर पुन्हा एकदा उठाव करण्याची वेळ या जमातींवर लादल्यासारखे होईल याची जाणीव प्रस्थापितांना व शासनाला होणे अत्यंत आवश्यक आहे कारण या जमाती या देशाच्या वैभवशाली संस्कृतीच्या सर्वार्थाने वारस आहेत परंतु दुर्लक्षित आहेत!!!!

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
मो. 9673945092.

No comments: