Saturday 11 November 2023

विद्रोह



कधीचा शोधतोय नितीशास्ञ

जे कधी भेटलेच नाही.

करावे सार्वजनिक सर्वांशी

असे कधी वाटलेच नाही.


म्हणजे आता असे नाही की

नीतिमत्ता मिटली आहे.

माञ धुर्तासोबत स्वार्थाची 

नवी युवती जुटली आहे.


महालातले उपदेशच करतात 

भाट फौज कधी शांत असतेय.

कष्टकरी झोपडीत अंधाऱ्या

चूल पेटण्याचीही भ्रांत असतेय.


जशास तसे उत्तर देण्याची

माझी जन्मजात आवड आहे.

शेळी बनून जगणे निरर्थक

वाघ बनण्याची निकड आहे.


अन्यायी अत्याचारी शोषक

ताठ मानेने फिरतात.

दुःख पचवूनही शोषित मात्र

निपचित मनात झुरतात.


विद्रोह करावा विषमतेविरुद्ध

लाचार जीवन अपमान जो.

थोपटतो दंड जो जपत अस्मिता

स्वाभिमानी क्षण सन्मान तो.


उदरनिर्वाह तर किडेही करतात

पहायला तेवढा गराडा होतो. 

पायदळी तुडवले जातात निर्दयीपणे

क्षणात निर्बलांचा चुराडा होतो


वाघा सिंहाच्या हद्दीत जायचीही

हिंमत कुणाची होत नाही.

शांत संयम आदर्श पुस्तकात

प्रत्यक्षात किंमत होत नाही.



कवी: बाळासाहेब धुमाळ 

दि. ११.११.२०२३

No comments: