समाज-मन
समाज भारी विचित्र
सत्याला सुखाने जगू देत नाही.
असत्याला घेतो डोक्यावर
मागे वळून बघू देत नाही!
विद्या येता हाता
देतो गुरुलाही लाथा.
लाख पापे करूनही
टेकवी प्रभूचरणी माथा !
सरडाही कमी पडावा
एवढे रंग बदलतो.
काल खरे बोलला हे
आज खोटे बोलताना विसरतो!
सर्वकाही इथेच सोडून जायचेय
सोबत काहीच येणार नाही.
जग, तुझे मन वचन
तुझ्या मागे विसरणार नाही!
कसला गर्वांहंकार
नको करूस अति.
बंगला काय आणि गाडी काय
शेवटी नशिबी माती.
चार शब्द प्रेमाचे
बोलता आले तर बोल.
अंतर्मनातील प्रेम गाठोडे
खोलता आले तर खोल!
त्याला वागू दे जसे
वाटते त्याला योग्य.
तू मात्र लक्षात घे
तुझा जन्म अन भाग्य.
नको पळू स्वप्नांमागे
अगदी आज विसरून.
गेला क्षण पुन्हा नाही
रडशील हात पसरून.
केवळ नामस्मरण प्रभूचे
तेवढेच एक समाधान देते.
आसुरी सुखाचा मोह
सर्व काही लुटून नेहते.
उद्याच्या पोटात काय दडलेय
हे ना त्याला ही ठाऊक आहे.
वर्तमानात जगण्याचे सोडून.
प्रत्येकजण का भाऊक आहे?
रात्रीचे पाप वाटते तुला
कुणाला दिसत नाही
परमात्म्याला अंधार
अडचण असत नाही.
विसरू नकोस माणसा
मांजर नाहीस माणूस आहेस.
मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा
तपश्चर्यनेही लाभत नाही.
कोमल असावी मनपाकळी
पाषाण असतो सख्त.
पापी असतो कठोर
मृदू असतो भक्त.
बघ जमले तर
वाग माणसासारखा
पैसा निव्वळ अशक्त आहे.
माणुसकीने मिळवलेले पुण्य
यमाहुनही सशक्त आहे.
कवी: बाळासाहेब धुमाळ.
दि. ५/११/२०२३
No comments:
Post a Comment