Tuesday 12 April 2016

चौथरा

चौथरा

बरं झालं बायांनो
तुम्ही  चौथरा चढलात.
वर्षानुवर्षाचा अनिष्ट
पायंडा तुम्ही मोडलात.

तुम्ही कितीही योग्यता
सिध्द जरी केलीत.
पुरुषी अहंकाराने     
मने आमची मेलीत.

विरोध तरी पुरुष 
करत आहेत कुणांना ?
हाडामासाने बनलेल्या
आपल्याच आया बहीणींना.

स्त्रीला इथे शक्तीचे 
नाव तेवढे देतात.
पण मंदिरात जाणारीला
आडवायला ही येतात.

कायदा परंपरा मानत नाही
घटनेचे येथे राज्य आहे.
देव काही बोलत नाही पण
म्हणे त्याला स्त्री त्याज्य आहे.

देव तो देवच
तो चराचरात आहे.
सांगितले फक्त एवढेच जाते
तो पती नावाच्या नरात आहे.

लेकरे सारी त्याचीच आहेत 
तो कसा काय भेद करेल?
चुकतेय कुठेतरी आपले 
पुरूष कधी खेद करेल? 

हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी
हे म्हणायला कोणीच मागे हटत नाही.
अन वास्तवात मात्र अनेकींना
पाळणाच भेटत नाही.
 
कर्तव्याला देव मानुन 
कर्म जो करतो.
खरा भक्त तोच त्याच्या
घरी देव पाणी भरतो.

मी तर तुम्हाला सांगेल
दगडात कुठे देव असतो का ?
असताच जर का तो तिथे
तर मी सर्वसुखी झालो नसतो का ?

मदतीला एखादया अबलेच्या 
धावून तुम्ही जाताल.
तर आनंदी तिच्या चेह-यावर 
देव तुम्ही पाहताल.

 शब्दांकन : 
     बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ 
     मो. 9421863725

No comments: