Friday 1 April 2016

बाप by Balasaheb Sitar am Dhumal

...................................... बाप ......................................

मित्रांनो आपण पहातो की, लहान असल्यापासून आई मुलांना 
सांगत असते. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, झाडावर चढू नको, नदीकडे जाऊ नको, शाळेत जा,  अभ्यास कर नाहीतर बाप मारील. 
मग मुलं सुद्धा बापाला घाबरून बापाच्या भयाने शाळेत जातात,  अभ्यास करतात, बापाच्या दहशतीखाली शिकत राहतात, मोठी होतात. हळू हळू मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करुन आई वरच प्रेम करु लागतात. बापापासून दुरावतात आणि
आणि आईकडे आकर्षित होतात.आईचं गाणं गातात, तिच्यावर कविता लिहितात. कोणतंच मुल बापाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही. बापासाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात. पायाला ठेच लागली की "आई गं" म्हणतात  पण "बापरे" म्हणत नाहीत.स्वामी तिन्ही जगाचा "बापाविना" भिकारी होत नाही. साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही. आई घरात असली कि, घर कसं भरल्यासारखं वाटतं. पण बाप घरात असला की, मात्र स्मशान शांतता.मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.बाप शप्पथेच्याही लायकीचा नसतो.बाप असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्येच.
मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात.बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात.धरणीला 'माय' म्हणतात आणि देशाला 'माता' म्हणतात.  मात्र धरणीत, देशात मुलांना बाप कधीच दिसत नाही.  कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा व्यक्ती म्हणजे बाप . केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र! तेच त्याचे काम, ते त्याने केलं की, त्याचं महत्व संपलं.
पण मग एवढं सगळं असूनही तोच बाप मेल्यावर छातीत धडकी का भरते ?का ओघळतो डोळ्यातून पाऊस! का पायाखालची जमीन सरकते. का वाटतं बेवारस झाल्या सारखं.
का हंबरतात अन घाबरतात बाप मेल्यावर?कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाप खरचं पत्थरदिल असतो का हो? मग का हा अन्याय त्याच्यावर? 
मित्रांनो, डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई" म्हणतात. पण...  डोळ्यात प्रेम न दाखवता जो स्वतः संपेपर्यंत लेकरांवर प्रेम करतो, त्याला  "बाप" म्हणतात मित्रांनो.
मुलाचं करियर तो करतो,  त्याला राणी तोच शोधतो. मुलीला चांगल्यात चांगले सासर तोच शोधतो. आहे नाही तेवढं लेकरांवर उडवून, वेळ आलीच मुलांकडून घराबाहेर हाकलले जाण्याची तर बायको अगोदर तोच घराबाहेर पडतो.
मित्रांनो एवढा अन्याय अत्याचार सहन करूनही, दुर्लक्षित राहूनही बाप मात्र आपली सर्व कर्तव्ये पुर्ण करतो. व्यक्तीची ओळखंच मुळात बापापासून होते. धर्म, जात, नाव, वारसा, हक्क-अधिकार , नाती व प्रतिष्ठा बापापासूनच मिळतात. पुर्वी काही पदे देखील बापापासूनच मिळत.
त्याचे प्रेम दिसत नाही पण वर म्हटल्याप्रमाणे तो आजिवन आपल्या लेकरांच्या भवित्यासाठीच झगडत असतो. कारण तो लेकरात, त्यांच्या भवितव्यात स्वतःहाला पहात असतो. मृत्यू नंतरही लेकरांत जिवंत रहात असतो.


शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ 
मो. 9421863725.

No comments: