Thursday, 23 June 2016

संगीत

संगीत ….
            ईश्वराने निर्मिलेले हे विश्व संगीताने सजलेले व धजलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मानवी जीवणात जन्मापासून मुत्यूपर्यंत संगीत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बारकाईने पाहिले तर निसर्गातील सर्व घटक  मग ते सजिव असोत वा निर्जीव असोत, सर्वात संगीत व्याप्त आहे. खळखळणारे झरे, मंद वा सोसाटयाचा वारा, सळसळणारी पाने, गडगडणारे ढग, कडाडणारी वीज, पक्ष्यांचा चिवचिवाट, भुग्यांची भुणभुण, रातकिडयांची किरकिर, डोलणारे पीक, प्राण्यांचे आवाज व पावसाचे पडणारे टपटप थेंब या सर्वांमध्ये संगीत व्याप्त आहे. नवजात बालकाचे रडणे व मृत्युशय्येवरील व्यक्तीचे कन्हणने, स्त्रीचे इश्श्य व पुरूषाच्या ओठातील शीळ यामध्येही संगीत व्याप्त आहे.
            मानवी जीवणामध्ये संगीताला अनन्य साधारण असे महत्व आहे. जादूई कंठ व जादूई बोटे लाभलेल्या माणसांनी  इतर माणसांच्या जीवणात भरलेला रंग म्हणजे संगीत अशी मी संगीताची व्याख्या करतो. थकून भागुन आलेल्या शरीराला व मनाला उल्हासीत करण्याचे काम संगीत करते. कहते है, संगीत है शक्ती ईश्वर की, हर सुर में बसे है राम | रागी जो गाये रागिणी, रोगी को मिले आराम | Music is the tone picture of Sociaty म्हणजे संगीत हे समाजाचे ध्वनीरुप चित्रण आहे. असे म्हटले जाते की,जर एखाद्या व्यक्तीच्या मनाचा व विचारांचा ठाव घ्यायचा असेल तर त्याच्या आवडत्या गीतांचा व संगीताचा अभ्यास करावा. असेही म्हणतात की, संगीत हे सुर व ताल या अमुर्त घटकांचा मुर्त अविष्कार असते. संगीताला भाषा नसते. As Human emotions are universal so the Music is also universal. संगीताला समजून घ्यायला डोके अथवा भाषेची गरज नसते. –हदयाने संगीताचा प्रत्येक नाद समजतो. मानवी जीवणात संगीत दु:खाची तीव्रता कमी करुन दु:खी मनाला आनंदाची झालर घालते म्हणून कलेचा आदर केला पाहिजे नव्हे केला जातो. स्वाभाविकच ही कला सादर करणा-या कलावंताचे स्थानही तितकेच महत्वपूर्ण असते. कलाकाराला स्वनिर्मिती व प्रयोग यांना महत्व दयावे लागते. तो आजन्म शिकत असतो. त्याला आजन्म सरावाची गरज असते.
            कलावंताने हे ध्यानात घ्यायला हवे कला ही अमर असते व अर्थातच तिच्यामुळे कलावंतही अमर होत असतो.  कोण मोठा व कोण छोटा यात न जाता आपल्या कलेवर लक्ष केंद्रित केले तर कलेची व कलावंताची प्रगती होत असते.
            संगीतामुळे जर पशुमधील पशुत्व नष्ट होत असेल तर मग मनुष्यातील अल्पस्वल्प पशुत्व तर निश्चितच नष्ट होईल. संगीत, गाणे किंवा ऐकणे आणि त्याचा आनंद घेणे या वेगळया गोष्टी आहेत. मनोरंजन हा जरी संगीताचा प्रधान हेतू असेल तरी सामाजिक जाणिवांचा उत्कर्ष करुन मानवी भावबंध निर्माण व्हायला देखील संगीतामुळे मदत होत असते. संगीतामध्ये सर्व जीवसृष्टीला चैतन्यमय करण्याचे सामर्थ्य आहे. जीवण संगीताची मैफल आहे व भैरवी गातागाता जीवणाची थोरवी समजते असे जे म्हणतात ते उगीच नाही. त्यामुळे संगीताचा आनंद घेवून जीवन संगीतमय होते यात शंका नाही.
लेखन :- बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ

मो.नं.- 9096877345

Tuesday, 21 June 2016

गोंधळी जणगणना by Balasaheb Dhumal

गोंधळी जणगणना!!!!!!

नमस्कार मित्रांनो......
कोणत्याही जातीचा अभ्यास करण्यासाठी त्या जातीची लोकसंख्या किती आहे? हे माहीत पाहीजे. मात्र दुर्दैवाने आपल्या जातीची नेमकी लोकसंख्या किती आहे हे आपल्याला आतापर्यंत शोधता आलेले नाही. त्यासाठी गरज असते लोकसंख्या जनगणनेची अर्थात सर्वेक्षणाची. आपला समाज देशाच्या काणाकोप-यात महानगरांत, शहरांत आणि खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यात विखुरलेला आहे. त्यांच्यापर्यंत कोणतीच यंत्रणा पोहचणे अगदी अशक्य आहे. तेवढे मनुष्यबळ आणायचे कोठून? तेवढा वेळ कोणाकडे आहे व त्यासाठी लागणारा खर्च कोठून आणायचा? शासन कोण्या एका जातीची लोकसंख्या का मोजेल? या विचारातुनच एक सोपा मार्ग हाती आला. . .
मोबाईल जवळजवळ सर्वांकडे आहे. निदान कुटूंबात एकाकडे तरी आहे. नसेलच तर निदान गावात एकाकडे तरी नक्कीच आहे. याचा व तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपण आता आपली संख्या मोजुया.
ठरविले तर एका आठवड्यात आपल्याला आपली लोकसंख्या मोजता येईल! !
त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि समोर येणारा फार्म भरा अगदी घरी बसल्या बसल्या! ! हा फार्म सर्वांना वाचता यावा म्हणून मराठीत दिला आहे, तो तुम्ही कोणत्याही भाषेत भरू शकता. तर मग आता उशीर करू नका. आपला व आपल्या घरच्या तसेच संपर्कातील सर्वांचा फाॅर्म भरा व गोंधळी ताकद दाखवून द्या.
मित्रांनो, आपल्या लक्षात येऊ द्या की "गोंधळी जणगणना" हे काम जर व्यवस्थित झाले तर गोंधळी जातीची लोकसंख्या तर कळेलच पण सोबतच देशाच्या कोणत्या वार्डात/गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात व कोणत्या राज्यात किती लोक आहेत आपले? त्यांची नावे काय आहेत? त्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती कशी आहे? अविवाहित, विवाहीत, घटस्फोटित, परित्यक्त लोक किती आहेत? ते कोणकोणते व्यवसाय करतात? स्त्रिया किती? पुरूष किती? तरूण किती?  अहो एवढेच काय समान नावाचे, आडनावाचे लोक किती हे ही आपणास कळणार आहे! !! शिवाय या आकडेवारीचा उपयोग शासनाकडे मागण्या करणे व त्यांचा पाठपुरावा करणे यासाठी होत असतो. लोकसंख्येच्या आकड्याशिवाय शासन मागण्या पुर्ण करत नाही. अर्थात हे सर्व मी करणार आहे असा आपला गैर समज होऊ देऊ नका. मी केवळ एक विद्यार्थी आहे जो जातीचा अभ्यास करतो आहे असे समजा. पण इष्ट कारणासाठी मागतील त्यांना वैयक्तिक नाही पण संख्यातरी किमान, उपल्बध होईल.
तेव्हा उठा खडबडून जागे व्हा, कोणालाच सोडू नका. अगदी त्याच्याशी तुमचे पटत नसेल तरी!! आपण प्रतिसाद चांगला देत आहात अवघ्या चार तासात 200 लोकांनी नोंदणी केली आहे! ! पण हा आकडा अगदी नगण्य, माझ्या अभ्यासाप्रमाणे आपण देशभर अनेक लाखात आहोत!! पण विभक्त व दुरवर असल्याने माहीती नाही. मात्र आता जग बदलले आहे. माहीती तंत्रज्ञानाच्या मदतीने ते जवळ आले आहे. आपली नोंद हा फार्म भरून आपला समाज बांधव अगदी विदेशातुनही करू शकणार आहे.
त्यामुळे माझी आपणास हात जोडून विनंती आहे, कृपया हा अर्ज भरा व आपल्या अस्तित्वाचा पुरावा द्या.
कसे असते मित्रांनो, मानवी स्वभाव असा आहे की, तो स्वतःच्या अधोगतीपेक्षा दुस-याच्या प्रगतीने दुखावतो!!! अनेकांना असे वाटत असेल की नक्की याचा यात काहीतरी स्वार्थ असेल! ! पण भावांनो आणि बहीणींनो मी आपणास शपथेवर सांगतो की मी सामान्य माणूस आहे. राजकारण किंवा बाकी काही माझ्या कल्पनेतही नसते. उपाशीपोटी दिवस काढत होतोत एकेकाळी, आज आई जगदंबेच्या कृपेने पोटाला पोटभर तेही सन्मानाने भेटत असताना कृघ्न आचरणाची काय आवश्यकता?
हे माझ्या मनालाही शिवत नाही, अगदी बालपणापासुन. हं स्वार्थ एवढाच की कुठतरी कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं बस. जातीच्या अभ्यासात आपला काहीतरी हातभार लागावा. . .
पण केवळ माला जिज्ञासा शमन किंवा अभ्यासच नाही तर आपल्या विविध संघटनांना, समाजसेवकांना, सेवाभावी संस्थांना, अभ्यासकांना, साहित्यिकांना, वक्त्यांना, विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
शासन दरबारी ही आकडेवारी सादर करता येईल. त्यामुळे मी विनंती करतो खासकरून तरूणांना व विविध संघटनांच्या पदाधिका-यांना की अगदी  पोलीओ लस पाजतात तशी किंवा पिग्मी एजंट वसुली करतात तशी  (कृपया शब्दावर जाऊ नका, भावना समजून घ्या ) प्रत्यकाची जातीने जात  नोंदणी करा. यासाठी खर्च काहीच नाही. आहेत थोडेसे कष्ट पण जातीसाठी माती तर खावीच लागते ना? ?
सर्वचजण संगणक किंवा मोबाईल साक्षर नसतात त्यामुळे कृपया त्यांना मदत करा.
जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा. माझी विनंती देखील आधिकाधिक लोकांपर्यत पोहचवा.

आपला:
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9096877345 9673945092 (WhatsApp)

Link 👇👇👇

https://docs.google.com/forms/d/10bKHkVs_USD34fZfPRTFfOBE8GobZaCVw86Ket_LONk/viewform

Tuesday, 14 June 2016

नाक नाही नथीला... गंधज्ञान sense of smell

नाक नाही नथीला.....


माणसाला पंचज्ञानेंद्रिये आहेत अर्थात पाच सेंस आॅर्गंस. पाच सेंस - दृष्टी, गंध, चव, श्रवण आणि स्पर्श.  सहावा काॅमन सेंस! आणि ज्याला तो नसेल तो????? हं , नाॅनसेंस...
त्यापैकी एक नाक. ..
ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जूनी म्हण आहे, 'नाक नाही नथीला अन भोक पाड भितीला'. म्हणीचा अर्थ सर्वांनाच माहीत आहे. या शिवायही अनेक म्हणी व वाक्यप्रचारात नाकाने आपला ठसा उमटविला आहे! नाक हे केवळ नथीसाठीच असत नाही. असे असते तर पुरूषांना नाकच नसते! ! आता नाक नसण्याचा अर्थ काढत बसु नका...
नाक, एक ठसठशित अवयव, त्याला कधी अत्यंत सन्मानाने तर कधी अत्यंत उपहासाने पाहीले जाते. नाक,  ज्याच्यावरून व्यक्तीचे सौंदर्य, चारित्र्य  व प्रतिष्ठा ठरवली जाते तो मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मानवी शरीराचे नाक आहे नाक!! या नाकाचा उपयोग मुलतः श्वासाद्वारे आॅक्सीजन घेण्यासाठी व उच्छवासाद्वारे कार्बन डाय आॅक्साईड  सोडून देण्यासाठी होतो. याशिवाय त्याचा उपयोग होतो तो गंध ज्ञानासाठी. Human being can detect atleast one trillion distinct scents. म्हणजे मनुष्य प्राणी किमान एक ट्रिलियन प्रकारचे गंध ओळखु शकतो. आता ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शुन्ये!!! म्हणजे किती ते तुम्हीच तपासा...
आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत आपल्या या गंधज्ञान क्षमतेची व नाकाची!! मानवी गंधपेशींचे दर 30 ते 60 दिवसांनी नुतनीकरण होते. आपण भिती व निराशा देखील गंध करू शकतो! गंधज्ञान हे सर्वात पहीले ज्ञान आपण घेतो. माणसाचे नाक शरिराच्या तापमानाचे संतुलन राखते. थंडीत व उष्णतेत नाक ओले होते. गंधक्षमता पुरूषांपेक्षा स्त्रीयांची अधिक तिक्ष्ण असते!! वासावरून नवरोबाने लावलेले दिवे बायको क्षणात ओळखते. मग ते मद्यपान असो वा केवळ पान असो! एवढेच नाही तर तुम्ही कोठे गेला होता हे ही ती ओळखते!!! (कृपया चांगल्या अर्थानेच वाचा)
मात्र गंधक्षमता वा गंधज्ञान केवळ माणसालाच असते असे म्हटले तर तुम्ही मला वेढ्यात काढून माझ्या बुद्धीची लांबी, रुंदी व खोली ओळखून पुढे हा लेख वाचणारही नाहीत एवढा माझा तुमच्यावर विश्वास आहे. . . . !!
याला म्हणतात विश्वास! !
मित्रांनो गंधज्ञानाची व एकंदरीत ज्ञानेंद्रियांची ही दुनिया फारच निराळी आहे. . . .
मानव व इतर प्राणी ज्ञानेंद्रियांद्वारे जगाचे ज्ञान अनुभवतात. एखादे ठराविक ज्ञानेंद्रिय एखाद्या ठराविक प्राण्यात अधिकच तिक्ष्ण असते. उदाहरणार्थ घार किंवा गिधाडासारख्या पक्षाची दृष्टी अत्यंत तिक्ष्ण असते. हे पक्षी जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील उंदीर अथवा सस्यासारखे प्राणी टिपू शकतात! म्हणजे हे असे आहे की आपण इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मुंगी पाहू शकतो!!!
वटवाघळे श्रवणात अत्यंत तिक्ष्ण असतात. लहानात लहान आवाज जो आपल्याला ऐकूही येत नाही तो ते ऐकतात व अति तिवृतेचा आवाज जो आपल्या कानांना सहनही होत नाही तोही ते ऐकू शकतात! सापासारखे प्राणी आपल्या जिभेचा वापर केवळ चविसाठी नाही करत तर ते जिभेने गंध घेऊन अन्न व शिकारी सोबतच शत्रुचेही स्थानही समजून घेतात! ते आपल्या प्रियकराला वा प्रेयसीला मिलनेच्छा गंधाने कळवतात व समजतात! ! हत्ती आपली सोंड हात म्हणून तर वापरतोच मात्र वास्तविक पाहता ते त्याचे नाक असते जे अत्यंत तिक्ष्ण असते. पृथ्वीवरील सर्वात लांब नाकाचा प्राणी असे त्याला म्हटले तर त्यात काही गैर नाही!!
मुंगीसारखा छोटा जीव गंध ज्ञानाद्वारे अन्नासोबतच आपले सहकारी मित्र शोधते व अगदी सैनिकी शिस्तीत चालणे, अन्न गोळा करणे व बांधकाम करणे अशी कामे करते. निरंतर उद्योगी मुंगी मिलेटरी शिस्तीत एकसंघपणे व कौशल्याने आपले काम करते!!
आपल्याला टाळ्या वाजवायला लावणारा किटक? ?? हं, डास. . त्याचे गंधज्ञान अत्यंत अप्रतिम आहे. कितीही अत्तर, डिओड्रंट व परफ्युमचा वापर केला तरी त्याला चकवा देता येत नाही उलट तोच आपल्याला चकवा देतो! !
या सर्व स्पर्धेत या सर्वांना मागे टाकतो तो कुत्रा.. कुत्र्याची गंध क्षमता माणसाच्या 44 पट अधिक आहे! ! तो त्याच्या हद्दीत आलेला कुत्रा त्याच्या मुत्राच्या गंधाने ओळखतो!! त्याच्या याच विलक्षण क्षमतेचा उपयोग आपण माणसे आपल्या फायद्यासाठी प्राचीन काळापासून घेत आलेले आहोत. निसर्गाची रचना आपल्या कल्पनेपलीकडील आहे. वरवर पाहता सारखेच वाटणारे झेब्रे, सारखे नसतात! ! प्रत्येक झेब्र्याच्या शरिरावरील पट्टे भिन्न भिन्न असतात! जसे आपल्या अंगठ्याचे ठसे भिन्न भिन्न असतात! आपले जसे ठसे भिन्न असतात तसेच शरिराचे वासही भिन्न असतात! कोणत्याच एका माणसाच्या शरिराचा गंध हा दुस-या माणसाच्या शरिराच्या गंधासारखा नसतो! कुत्रा एवढा अवलिया प्राणी आहे की तो गंधावरून भावना ओळखतो!! अर्थात आपला मुड कसा आहे? हेतू काय आहे? घाबरलेला माणुस, धिट माणुस, जिवंत माणुस व मृत माणुस तो गंधावरून ओळखतो! म्हणूनच गुन्हे अन्वेषणात संबंधीत यंत्रणा त्याचा खुबीने वापर करून घेतात. अपघातात मदत व बचाव पथके, जखमी व मृत अपघात गस्तांना शोधून काढण्यात कुत्र्याची अर्थात श्वानपथकाची मदत घेतात. आता तर संशोधक कुत्र्याला प्रशिक्षण देवून मानवी शरिरातील कर्करोगाच्या पेशी शोधण्यात त्याची मदत घेणार आहेत म्हणे! ! बर्फाळ प्रदेशात बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह शोधण्यात कुत्र्याची मदत होते ती त्याच्या गंध क्षमतेमुळेच!!
बरे हे झाले मानवासह इतर प्राणीमात्रांचे गंधज्ञान. . मात्र निसर्गाची अदभूत किमया एवढ्यावरच संपत नाही, वनस्पतींना देखील गंधज्ञान आहे! ! नाक नाही तरी! !! पिकणारी फळे गंधाद्वारे इतर फळांना पिकण्याचा संदेश देतात!  पाने जर आपल्यावर आळ्यांनी हल्ला केला तर इतर पानांना गंधाद्वारे धोक्याची सुचना देतात!  मग इतर पाने आपल्यातील ठरावीक रसायने स्त्राव स्वरूपात बाहेर सोडतात!! अमरवेल नावाची परजीवी वनस्पती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. मृतदेहाचे अथवा इतर जिवंत वनस्पतीचे देहाचे शोषण करून जगणे हे तीचे वैशिष्ट्ये. कारण ती परजीवी अर्थात स्वतःचे अन्न स्वतः तयार न करू शकणारी वनस्पती आहे. तिच्या पानांमध्ये हरितद्रव्य (क्लोरोफिल) नसते. ही वनस्पती आपल्या आसपास पिकलेल्या टमाट्यांचा गंध ओळखून त्यांच्याकडे आकर्षित होते! !
आहे की नाही निसर्गाची किमया अदभूत आणि अविश्वसनीय? ? शेवटी एवढेच की नाक केवळ आपल्यालाच आहे असे नाही आणि ते केवळ नथीसाठीच आहे असेही नाही. . . . . .


लेखन :
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9096877345 / 9673945092

Thursday, 9 June 2016

विरह

विरह....

पती-पत्नीचे नाते अत्यंत विलक्षण व जगावेगळे. ...
दोन वेगवेगळ्या घरात व कुळात जन्माला आलेले दोन जीव लग्नानंतर मात्र एकात्म होतात! !!
त्यातही स्त्रीचे जीवन म्हणजे एक तपश्‍चर्याच म्हणावी लागेल! ! स्वतंत्र नावाने वेगळ्या घरी वेगळ्या वातावरणात आयुष्याची साधारणपणे 18-25 वर्षे घालवलेली मुलगी लग्नानंतर मात्र स्वतःमध्ये एवढे बदल करून घेते की ती त्या पुरूषाची अर्धांगिनी कधी बनते? त्या कुटूंबरूपी गाडीचे दुसरे चाक कधी होते? हे लक्षातही येत नाही. ती सासरशी व पतीशी एवढी समरस होते, तेही हसतमुखाने मनापासून !! ती त्या कुटूंबामध्ये एवढी गुंतून घेते, की ती स्वतःलाही विसरून जाते. नाव बदलते आवडीनिवडी बदलते व पतीसाठी, कुटूंबासाठी स्वतःला अगदी पुर्णपणे वाहून घेते. जगाच्या पाठीवर हे चित्र केवळ भारतातच पहावयास मिळते. . .
जन्म एका घरात अन मृत्यू दुसर्‍या घरात! !!  विलक्षण आणि अदभुतच आहे ना? ??  तीची घराला अशी काही सवय लागते, की ती म्हणजेच घर व घर म्हणजेच ती!! ती जर घरात नसेल तर घर, घर रहात नाही. . आणि मग पतीची पत्नी विरहाने होणारी अवस्था? ?? भुक लागते पण घास गळ्याखाली उतरत नाही! झोप असते डोळ्यात पण पापण्या परस्परांना खेटत नाहीत!  डोके असते पण चालत नाही! मन असते पण लागत नाही !!! मन भुतकाळातील आठवणीत व डोळे वाटेकडे गुंतलेले असतात. विरहाच्या  वेदना मी व्यक्त करण्याऐवजी संदिप खरेंनी कशा व्यक्त केल्या आहेत पहा ना. ..

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या, मज स्मरती लाघव वेळा
श्वासांविण हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय ,मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो
.......

आई नंतर स्त्रीच्या पत्नी रूपाचे कौतुक करावे तेवढे कमीच. ....

शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

रेणुका....

रेणुका:::::::::

ईक्ष्वाकू वंशात रेणू या नावाचा महापराक्रमी राजा होऊन गेला. भागीरथीच्या काठी कान्यकुब्ज शहरी राहून तो कारभार पाहात असे. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शंकराची भक्ती केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला एक सर्वगुणसंपन्न अशी मुलगी व नंतर एक मुलगा होईल असा वर दिला. मग राजाने अत्री, वसिष्ठ इ. ऋषींना बोलावून यज्ञ आरंभला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून एक सर्वांगसुंदर कन्या निघाली. रेणू राजाने तिचे नाव रेणुका असे ठेवले. ही रेणुका म्हणजे पार्वती व कश्‍यप पत्नी अदिती या दोघींचा अवतार होय. याची कथा अशी
एकदा दैत्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूला पूर्वी त्यांनी हिरण्याक्षाचे वेळी घेतलेला वराहावतार, हिरण्यकश्‍यपूच्या वेळचा नृसिंहावतार व बळीच्या वेळचा वामनावतार यांची आठवण करून देऊन पुन्हा अवतार घेण्यासाठी विनंती केली. प्रसन्न होऊन विष्णू म्हणाले, "या वेळी अदितीचे उदरी मी पूर्णरूपाने अवतार घेणार आहे, तेव्हा तिने ते तेज सहन करण्याची तयारी करावी." हा निरोप घेऊन देव अदितीकडे गेले व त्यांनी आपापले तेज अदितीच्या गर्भासाठी दिले; पण ते पुरेसे नाही असे समजून तिने पार्वतीची तपश्‍चर्या सुरू केली. पार्वती प्रसन्न झाल्यावर अदिती म्हणाली, "विष्णू माझ्या उदरी अवतार घेणार आहेत, त्यांचे तेज सहन करण्यासाठी तू माझ्या शरीरात वास कर." पार्वती याला तयार झाली; पण शंकरांनी तिचे पती कश्‍यप यांच्या शरीरात वास करावा याची तजवीज करण्यास सांगितले. मग अदितीने शंकरांना प्रसन्न करून घेऊन वर मागितला, की आपण व कश्‍यप एकरूप होऊन माझा स्वीकार करावा. अशाप्रकारे शंकर व कश्‍यप तसेच पार्वती व अदिती एकरूप झाले. रेणू राजाच्या यज्ञातून बाहेर आलेली मुलगी म्हणजे अदिती व कश्‍यप यांची मुलगी जी पार्वती व अदिती या दोघींचा अवतार होय.
भागीरथीच्या तीरी कान्यकुब्जनगरीत रेणू राजाच्या यज्ञातून रेणुकेने जन्म घेतला . भृगुऋषींचा मुलगा च्यवन याचा मुलगा ऋचिक ऋषी गोदावरीच्या काठी राहत होता. त्याने सोमवंशी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. पुढे सत्यवतीच्या पोटी शंकर व कश्‍यप एकरूप होऊन जन्माला आले. ऋचिक ऋषीने त्या मुलाचे नाव जमदग्नी ठेवले. एकदा ऋचिक ऋषींच्या आश्रमात अनेक ऋषी आले व त्यांनी काशीयात्रेला जाण्याचा विचार केला. त्याप्रमाणे ते सर्व जण जमदग्नीला घेऊन यात्रेला निघाले. कान्यकुब्जनगरीचा राजा रेणू याने आपल्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे असे कळल्यावर ते ऋषी समारंभ पाहण्यासाठी मंडपात गेले. अनेक देशांचे राजे, राजपुत्र रेणुकेच्या प्राप्तीसाठी आले होते. रेणुकेने त्या सर्वांसमोरूनच जाऊन केवळ समारंभ पाहण्यासाठी आलेल्या जगदग्नीच्या गळ्यात माळ घातली. हे पाहून सर्व राजांना संताप आला व त्यांनी रेणुकेला पळवून नेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी सैन्य एकत्र करून रेणू राजाशी युद्ध पुकारले. त्या मोठ्या सैन्याबरोबर लढून आपल्याला विजय कसा मिळणार, अशी रेणू राजाला चिंता वाटू लागली. तेव्हा जमदग्नीने आपले क्षात्रतेज प्रकट केले. त्याने आपल्या विलक्षण युद्धकौशल्याने सर्व राजांना पळवून लावले.
मग रेणू राजाने जमदग्नी व रेणुकेचा थाटामाटात विवाह करून दिला. त्याने जमदग्नीला घोडे, हत्ती, रथ, शहरे, रत्नभांडार इ. देऊन कन्यादान केले व भागीरथीच्या काठी राहण्याची विनंती केली. या समयी इंद्राने जमदग्नीला कामधेनू व कल्पतरू दिला. जमदग्नी रेणुकेसह भागीरथीच्या काठी राहू लागला.
पुढे रेणुकेच्या पोटी भगवंतांनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला.

टिप : मित्रांनो हे विचार माझे नाहीत व ना ही शब्द माझे आहेत. मी केवळ कागदावरील मॅटर टाईप करून आपल्या सेवेत सादर केले आहे.

संकलन व लेखन:
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 /9673945092

Tuesday, 7 June 2016

सायबर विश्व. .....

सायबर विश्व...

एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीपासुनच प्रसार व प्रचार माध्यमांना (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक) मागे टाकत सोशल मिडिया हा नवा माध्यम प्रकार समोर आला आहे. श्रीमंत युरोपियन देशांमधुन सुरू झालेला याचा वापर पाहता पाहता जगभरातील सर्वच श्रीमंत देशांसह गरीब देशांमधुनही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. आज रोजी जगात असा एकही देश नसेल बहुदा,  जेथे सोशल मिडियाचा प्रभाव पडला नाही. भारतात तर महानगरे, शहरे, खेडे ते अगदी वाड्या, वस्त्या, तांडे व पाड्यांपर्यंत याने मजल मारली आहे. समाजातील सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील स्री-पुरूष, मुलं-मुली व्हाॅट्सअॅप, फेसबुकशिवाय बोलत नाहीत. हे माहीत नसणारे लोक शोधावे लागतील, सापडणार नाहीत असे नाही मात्र फार मोजकेच! !! त्याचे कारणही तसेच आहे, एकाच वेळी हजारो लोकांच्या संपर्कात राहणे यामुळे अगदी सहज शक्य होत आहे. शिवाय डेटा हस्तांतरणासाठीही याचा वापर होतो. कमी वेळात जास्त अंतरावर तात्काळ एखादी फाईल पाठवणे सोयीचे झाले आहे.
बदलत्या काळानुसार काळासोबत राहणे कधीही स्वागतार्हच म्हणावे लागेल. हायटेक व टेक्निकली अपडेटेड असणे प्रगत समाजाचे लक्षण असते. सोशल मिडिया सोबतच सोशल नेटवर्किंगही आपले पाळेमुळे मजबूत करत आहे. सोशल मिडियाचा वापर टेक्स्ट, ऑडिओज, व्हीडीओज, इमेजेस इत्यादी शेअर करण्यासाठी तसेच लाईव्ह चॅटिंग साठीही केला जात आहे. ज्यामुळे आपण जणूकाही खिशात जग टाकून फिरत आहोत असे वाटते. हा वापर म्हणजे या मिडियाचा चांगला वापर म्हणता येईल पण याच मिडियाचा वापर काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे चुकीच्या पद्धतीनेही करत आहेत. ज्यामध्ये फसवेगीरी करणे, अफवा पसरवणे, भावना भडकवणे,खोटा प्रचार करणे लैंगिक छळवणूक करणे (Sexual Harassment ) इत्यादीसाठीही केला जात आहे.
काही मानसिकदृष्ट्या विक्षिप्त लोक, स्वतःचे सुख पाशवी पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतात. देव जाणो पण यांना महीला मुलींना काहीतरी अश्लील ऐकवून वा दाखवून काय राक्षसी आनंद मिळतो किंवा काय मोठेपणा मिळतो कळत नाही. सोशल गृपमध्ये ब-याचदा एकाच कुटुंबातील सर्व सदस्य असतात. बरे,  यातुन संबंधित काहीतरी अश्लील टाकणा-यांची बदनामी होत नाही का?  त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत नाही का? याची त्यांना एक तर कल्पना नसावी अथवा मग फिकीर नसावी.
बहुतेक वेळा हा प्रकार सोशल मीडियाची भाषा इंग्रजीचे कमी ज्ञान असल्याने तसेच तांत्रिक बाबींची तितकीशी माहीती नसल्यामुळे अनावधानानेही होतो. मात्र यावर उपाय देखील शोधायला हवेतच ना? मी अशा प्रकारांत  आतापर्यंत अनेकांशी बोललो तेव्हा त्यांचे असे म्हणणे आले की, यातले मला काही कळत नाही, मी हे केलेच नाही, हे शक्यच नाही, कसे झाले समजत नाही. ब-याचदा खाते हॅकही केले जाते !! हे जरी खरे असले तरी सायबर जगात जेथे व्यवहार युजर आयडी व पासवर्ड शिवाय होत नसतात तेथे हे मी केले नाही असे म्हणता येत नाही. बोटे जरी आपली नसली तरी खाते आपले असल्याने तो व्यवहार देखील आपण केलेला आहे असे समजले जाते. समजत नसेल तर एटीएम व्यवहार लक्षात घ्या. असे असतानाही काही लोक याबाबतीत पराकोटीचे बिनधास्त व गाफील असल्याचेही निदर्शनास आले आहे. आपला कोणताही युजर आयडी व पासवर्ड (फेसबुक, नेटबॅकींग, इमेल व इतर अनेक ) अत्यंत गोपनीय ठेवायला हवा. ती काही पब्लिक करण्याची अथवा शेअर करण्याची गोष्ट नाही. शिवाय आपला मोबाईल तोही इंटरनेट कनेक्टेवीटी असलेला !! एखाद्या मिसाईल प्रमाणे हायली लोडेड असतो  असे म्हटले तर नवल वाटायला नको. कारण त्याचाही तितकाच घातक वापर केला जाऊ शकतो व आपण अडचणीत येऊ शकतो.
फेसबुक बाबतीत गोपनीयता व सुरक्षितता  (Privacy & Setting) वर लक्ष असायला हवे. ते setting वेळोवेळी update करायला हवे. सोशल नेटवर्किंग व मिडिया बाबत आपण संक्रमणावस्थेत आहोत. आणखी आपले ज्ञान अपुरे व अपरिपक्व आहे, तसा तांत्रिक बाबतीत कोणीही कधीही परिपूर्ण असु शकत नाही. कारण या जगात दररोज बदल होत असतात. नवे नवे softwares वापरायचे कसे हे लक्षात येत नाही. साधारणपणे असे दिसते की एखाद्या गृपचा प्रमुख अर्थात Admin  हा Technically हुशार असतो , तेव्हा तो गृप सुरक्षित ठेवणे, त्यासाठी आवश्यक Settings करणे, प्रसंगी कठोर कारवाई करणे हे त्याचे कर्तव्य असते. उदा. Post verification & approval.
यामुळे होते काय की post तो स्वतः तपासुन पहातो व योग्य असेल तरच Display करतो. आणि मग एखादी पोस्ट जी अनुचित आहे, मग ती जाणुनबुजून टाकलेली असो अथवा अनावधानाने आलेली असो, ती पब्लिक होत नाही व नाहक मानसिक त्रास गृपला व सेंडर यांना होत नाही. प्रसंगी अशा मोकार सदस्यांना Remove करायला हवे आणि असे होत नसेल तर मग आपणच तशा गृप्सना leave करायला हवे.
आणि एवढे करूनही पुरेसे नाही झाले तर सायबर सुरक्षा आणि सोशल मिडिया दुरूपयोग संदर्भात भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने कठोर कायदेशीर तरतूदी केल्या आहेत. वरीलप्रमाणे कृत्ये करणारांची तक्रार पोलिसांकडे करायला हवी. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तज्ञांचा समावेश असलेला स्वतंत्र विभाग  (Cyber crime cell ) आहे. यासाठी स्वतंत्र कायदे ठआहेत. आणि आता तर असेही ऐकायला मिळत आहे की लवकरच अशा प्रकारच्या केसेसची सुनावणी स्वतंत्र cyber courts मध्ये होणार आहे. त्यामुळे मित्रांनो सजग रहा, सुरक्षित रहा. . . . . .

शब्दांकन : बालासाहेब सिताराम  (बी.एस.) धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

Saturday, 4 June 2016

पर्यावरण संरक्षण by Balasaheb Dhumal

पर्यावरण संरक्षण......
नमस्कार मित्रांनो, आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. आजच्या मानवाने म्हणजे आपण स्वार्थापायी पर्यावरणाचा नाश करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र आपल्या हे लक्षात येत नाहीये की आपण पर्यावरणाचा नाश म्हणजे पर्यायाने आपलाच विनाश करून घेत आहोत. पर्यावरण रक्षण ही जबाबदारी आता सर्वांवरच येवून ठेपली आहे. त्यातही मला वाटते या बाबतीत तरूणांना अधिक गंभीर होण्याची गरज आहे.
बदलत्या काळात पर्यावरणतील वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड सध्या सर्वांचीच डोकेदुखी बनला आहे. जगभरात जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे. यामागील हेतू हा की बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे वाढते प्रमाण याविषयीची जाणिव आपल्याला व्हावी.
जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जात आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (सी. एफ. सी.)
वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे.
तलाव धरणे सरोवरे व समुद्र यांचे संरक्षण करून तेथील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देणे गरजेचे आहे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.
पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरापासूनच सुरू करायला हवे. जसे की पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू ज्यात पेपर, काचेच्या वस्तू, धातुच्या वस्तु, प्लॅस्टिक व फायबरच्या वस्तु,  मोटर ऑईल अशांची पनुर्निर्मिती करायला हवी. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करायला हवे . शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करणे, प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरणे, अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता सुती कपड्यात ठेवणे, पाण्याचा गैरवापर करणे थांबवणे,  गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवणे, कमी विजेची उपकरणे वापरणे, घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करणे, इत्यादिंसारखे उपाय अवलंबावयास हवेत. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जावून, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन करणे, पाणी अडविणे व जिरविणे , पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पुनर्भरण करणे, कमी पाण्याची पिके घेणे इत्यादी प्रातिनिधिक उपक्रम हाती घेऊन तसे लोकमत तयार करून श्रमदानाचा वापर पर्यावरण रक्षणासाठी करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही.मानव निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू करू शकू.
आपण तात्पुरताउपाय शोधायचा प्रयत्न करतो, त्यामुळे समस्या सुटत नाहीत उलट निर्माण होतात.
वि. स. खांडेकर म्हणतात, 'कुठलीही मानवी समस्या कधीही कायमची सुटू नये हा जीवनाचा अलिखित नियमच आहे. आजच्या समस्या आपल्याला सुटल्यासारख्या वाटतात पण त्या सुटतात उद्याच्या नविन समस्यांना जन्म देऊन. ...
त्यामुळे ही सुंदर वसुंधरा जी आपल्याला आपल्या पुर्वजांनी दिली आहे तीचा उपभोग घेताना तिला ओकसाभोक्षी ओरबाडून चालणार नाही कारण आपल्याला ती आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची आहे. आपण हीचे मालक नसुन केवळ केअर टेकर आहोत. ...


शब्दांकन : बालासाहेब सिताराम  (बी. एस.) धुमाळ.
मो. 9421863725/9673945092

तेंव्हा पैसा खुजा वाटतो....

तेव्हा पैसा खुजा वाटतो….

मित्रांनो नुकतेच माझे चुलत सासरेबुवा श्रीमान गणपतराव पांडूरंग जाधव वय साधारणपणे 65 वर्षे राहणार पारगांव मोटे ता.वाशी जि. उस्मानाबाद हे
–हदय विकाराच्या तीव्र झटक्याने अचानक व तडकाफडकी  या जगाला सोडून गेले. वर चुलत सासरेबुवा   असा जो शब्द वापरला आहे तो केवळ सख्या सासरेबुवांना, त्यांच्या नातेवाईकांना अथवा  त्यांच्या मित्र परिवाराला वाईट वाटू नये म्हणून. एरवी मी कोणतेही नाते चुलत, मावस, आते, मामे किंवा सावत्र वगैरे मानत नाही. माझे चुलत सासरे गणपत मामा हे अत्यंत गरीब, हातावर पोट असणारे, पाच मुलींचे व एका अयशस्वी मुलाचे वडील, अयशस्वी म्हणायला मला ही दु:ख होत आहे पण सत्य हे सत्यच असते ना ? आज गणपतमामा या जगात  नाहीत याचे श्रेय जर त्यांच्या मुलाला दिले तर अतिशोक्ती ठरणार नाही!! अर्थात एवढया एकाच कारणाने त्यांना –हदय विकाराचा झटका आला नाही. पाच पैकी दोन मुली अल्प वयात अकस्मात ईश्वराला प्रिय झाल्या, सख्या भावाला त्याच्या दोन मुलींच्या लग्नाच्या अगोदरच्या दिवशी देवाने बोलावले व प्रामुख्याने गरीबी या संकटांचा सामना करता करता त्यांच्या कोमल -हदयाचा कुठपर्यंत निभाव लागणार होता? वर उल्लेख  केलेप्रमाणे गणपतमामा हे माझे जरी 'चुलत' सासरे होते तरी त्यांनी मला कधी ही चुलत जावाई अशी वागणूक दिली नाही. मी माझ्या 11 वर्षाच्या जावाई कालावधीत कधीही त्यांच्या घरुन टॉवेल टोपी शिवाय, बायको साडी चोळी शिवाय व माझी दोन अपत्य पाप्यांशिवाय आली नाहीत. जशी असेल तशी धशी व चोळी बांगडी ती ही मनपुर्वक व प्रेमपूर्वक ते मला करत. हे सांगण्यामागचे प्रयोजन माझा मोठेपणा सांगणे हा आहे असे वाटत असेल कोणाला तर माझे दुर्दैव पण त्यांचा मोठेपणा सांगणे हे माझे कर्तव्य नव्हे तर माझे सौभाग्य समजतो आणि तो सांगितला नाही तर तो त्यांच्यावर अन्याय व माझी कृतघ्नता होईल. ते केवळ माझ्यासाठीच चांगले निश्चित नव्हते. कारण चांगली माणसे ही सर्वांसाठीच चांगली असतात. ज्यांना त्यांच्या चांगुलपणाचा प्रत्यय आला ते त्यांची प्रतिक्रिया निश्चित देताहेत किंवा देतील. पण केवळ दुधाचा चहा पाहुण्यांना मिळावा म्हणुन भर उन्हात गावभर दुध शोधणारे माझे चुलत सासरेबुवा गणपतमामा मला दिसतात. पण माझ्या डोळयातील पाणी हे लिहित असताना मी आपणास दाखवू शकत नाही व आपण ते पाहू शकत नाहीत.
       दगडा मातीच्या घरात राहणा-या गणपतमामांचे माझ्यावरीलच नव्हे तर सर्वांवरीलच असणारे प्रेम दाखण्यासाठीच हा शब्द प्रपंच नाही तर खटाटोप आहे तो प्रत्यय सांगण्याचा जो मला ते गेल्यानंतर आला…
       ते गेले, सर्वांनाच जायचे आहे. कुणीही या पृथ्वीवर कायम स्वरुपी वास्तव्याचे परमिट घेवून जन्मास आलेला नाही. मृत्यु जे एक अटळ व शाश्वत सत्य आहे. जीवणरुपी प्रवासाचे ते एक शेवटचे स्थानक आहे. ते कोणीही नाकारु शकत नाही. उलटपक्षी मी असे म्हणेण की, गणणतमामांना खुप चांगला मृत्यु आला. धन्यवाद म्हटले पाहिजे त्या देवाला ज्याने –हदयविकारासारखा आजार बनविला. झटपट रामराम, ना शरीराची झिज, ना प्रतिक्षा मृत्युची! मला ही यावा तर असाच मृत्यु यावा, अगदी तडकाफडकी! पण मी पुराण वाड.यातुन असे वाचुन आहे की, असा तडकाफडकी मृत्यु केवळ पुण्यात्मांनाच येतो आणि म्हणूनच या पुण्यात्माच्या अंत्यविधीस अगदी मध्यरात्री देखील शेकडो किलो मीटरचा प्रवास करुन शेकडो मैलांवरून मिळेल ते वाहन मिळवून शेकडो लोक हजर झाले. ही त्यांची कमाई होती. मरणा दारी की तोरणा दारी, म्हणजे माणसाची आपली माणसे अथवा त्याची प्रतिष्ठा तपासायची असेल तर सु:खद वा दु:खद क्षणीच तपासावी, पण मी म्हणेल की, ती केवळ मरणादारीच तपासावी. कारण सुखाचे सोबती तर सगळेच असतात, दु:खात सर्वजण सोडून जातात. पण गणपतमामाला कोणीही सोडले नाहीत. बुध्दीजीवी, श्रीमंत, उच्च शिक्षित, गोरगरीब असे सर्व जाती धर्मातील स्त्री- पुरुष अबाल वृध्द मोठया संख्येने जमा झाले. शेवटचा आधार (खांदा देणे) साठी नंबर लावू लागले. अनेकांना खांदा दयायला प्रतिक्षा करावी लागली. मी काही बोलू शकलो नाही पण माझे डोळे बोलत होते, त्यांना आठवून साश्रू श्रध्दांजली अर्पण करत होते. माझ्या सोबत अनेकजणांची स्थिती हीच होती. मृत देहाच्या दहनाचा अंतिम विधी अटोपून अनेकजण स्वगृही गेले, अनेकजण खेडयातील रस्त्यांवर नाली शेजारी उघडयावर झोपले. झोप होती डोळयात पण ती आली नाही मला. केवळ हाच विचार येत होता मनात की, मी एक शासकीय नोकरदार, चारचाकी मध्ये फिरतो, क्विचीतच ए.सी. शिवाय! लोक म्हणतात मी एक श्रीमंत व्यक्ती आहे अर्थात मी मानत नाही पण मी निश्चितच गरीब नाही पैसाने. पण गणपतमामा, हे अत्यंत गरीब होते ना ? एवढे लोक का आले अंत्यविधीला ? का हळहळत आहेत सर्वजण ? उत्तर एकच की ते आर्थिकदृष्टया दरिद्री होते पण मनाने व विचाराने अत्यंत धनाढय होते आणि गरीब असूनही  श्रीमंता पेक्षाही श्रीमंत होते. त्यांच्यावर प्रेम करणा-यांमध्ये केवळ पाहूणे आणि नातेवाईकच नव्हे तर इतर जाती धर्माचे लोक ही होते. या सर्वांशी त्यांचे अत्यंत प्रेमपूर्ण संबंध होते. ते एक अजात शत्रू होते (त्यांचे कोणीही शत्रु नव्हते.) मग प्रश्न हा पडतो की, मनुष्य प्राणी आजन्म आपल्या नावासमोरील संपत्तीच्या आकडयासमोरील शुन्य वाढविण्यासाठी धडपड करतो त्यासाठी न्याय नितीला पायदळी तुडवतो तरीही श्रीमंत होत नाही. तो स्वत:ला श्रीमंत समजतो हा भाग निराळा पण मग अशी गणपतमामांसारखी आर्थिक दृष्टया दरिद्री माणसे कशी काय श्रीमंत बनतात ? बरे, विशेष न शिकलेल्या लोकांना आपण आडाणी समजतो आणि तेच लोक ज्ञानाचे धडे देवून जातात! मग खरे श्रीमंत कोण? ते का आपण ? खरे ज्ञानी कोण? ते का आपण ?  तर निश्चित तेच कारण श्रीमंती मनाची असो की, धनाची ती एक भौतिक नव्हे तर भावनिक व मानसिक स्थिती आहे. गणपतमामांना अखेरचा निरोप देवून जेव्हा त्यांच्या गत वास्तवाच्या ठिकाणी अर्थात त्यांच्या घरी परत आलो तेव्हा हे कळून चुकलो अशी माणसेच खरी माणसे असतात व माणूस म्हणून जगून आपला ठसा सोडून जातात. आपण मात्र व्यावसायिक म्हणून येतो व शुन्यांची भर पाडण्याच्या प्रयत्नात दरिद्री म्हणून मरतो.
       जेव्हा हातोहात अंत्यविधीची तयारी होते, जेव्हा शेकडो लोक शेकडो मैलावरुन अर्ध्या रात्री ग्रामीण भागात येतात, जेव्हा खांदा देण्यासाठी बारी लागते, जेव्हा डोळयांना रडण्याचा आव आणावा लागत नाही, जेव्हा जवळच्या नातेवायकांना दवाखाण्यात ॲडमिट करावे लागते, जेव्हा लोक पायांना वाहन बनवतात, जेव्हा लोक रात्र जागून काढतात, जेव्हा रडणारी डोळे व थरथरणारे ओठ रडू नका त्यांना त्रास होईल म्हणतात, जेव्हा पदसिध्द, पैशावाली व प्रतिष्ठीत माणसे खाली माना घालतात तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
       ज्याच्या मागे माणूस आयुष्य भर पळतो, ज्याच्यामुळे माणूस माणूस रहात नाही, जेव्हा माणसाला याचा ही विसर पडतो की, क्या तु लेकर आया था, क्या लेकर जायेगा ? खाली हाथ आया था और खाली हाथ जायेगा. हे सर्व यथेच सोडून जायचे असून ही व पैश्यामुळे मिळणारा मोठेपणा जो क्षणिक व भ्रामक आहे. हे माहित असून ही पैश्याला महत्व देतो. तेव्हा मला पैसा खुजा वाटतो. माणूस वेळेला आयुष्यभर पैश्याची ताकद दाखवतो व वेळ माणसाला एकदाच पैश्याची मर्यादा दाखवते. तेव्हा  मला पैसा खुजा वाटतो.
       पैसा निश्चित कमवायला हवा, पद पैसा व प्रतिष्ठा या त्रयींचा जवळचा संबंध आहे. पदाने पैसा व पैशाने प्रतिष्ठा अर्थात मान-सन्मान मिळतो हा समज जेव्हा गणपतमामांसारखी माणसे स्वजिवणातून गैरसमज म्हणून सिध्द करतात व हे दाखवून देतात की, पद व पैश्यांशिवाय ही मान-सन्मान मिळू शकतो तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
       सर्वांनाच एक दिवस मातीत मिसळायचे आहे. हे जग सोडून जायचे आहे. सर्वांच्याच चितेला मुखाग्नी दिला जाणार आहे, मग लाकडे साधी असतील वा चंदनाची असतील जळायचे सर्वांच आहे. मागे रहणार आहेत ते आपले विचार, शब्द व नाते वास्तविक पाहता गणपतमामांकडे काळा तर सोडाच पण पांढरी  ही कवडीही नव्हती तरी ही ते एवढे श्रीमंत कसे  तर त्याचे उत्तर एकच आयुष्यभर सेवाभाव जपून मानवता हिच खरी श्रीमंती या सुत्राचे त्यांनी कायम पालन केले म्हणून.... माणसाने बुध्दीने, शरीराने व मनाने श्रीमंत असावे ( Head, Hand and Heart) पण आपल्या नावासमोरील संपत्ती मध्ये शुन्यांची संख्या वाढविण्यात धन्य मानणा-यांना जिथे वरील प्रकारच्या श्रीमंतीचा अर्थच समजत नाही तिथे अश्या श्रीमंतीचे ते महत्व काय समजणार ? गणपतमामांकडे होते ते प्रेमाचे दोन शब्द आणि त्यामुळे जोडली गेलेली प्रेमाची चार माणसे!! कारण त्यांना हे माहित असावे कदाचित की, पैसा हे जीवण जगण्याचे साधन आहे जीवणाचे साध्य नाही. कदाचित ते हे ही जाणत असतील जे कबीर सांगून गेले की,
जब हम पैदा हुए, जग हसे हम रोये
एैसी करणी कर चलो, हम हसे जग रोये II

शब्दांकन : बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ

मो. – 9421863725 / 9673945092