Tuesday 7 June 2016

सायबर विश्व. .....

सायबर विश्व...

एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीपासुनच प्रसार व प्रचार माध्यमांना (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक) मागे टाकत सोशल मिडिया हा नवा माध्यम प्रकार समोर आला आहे. श्रीमंत युरोपियन देशांमधुन सुरू झालेला याचा वापर पाहता पाहता जगभरातील सर्वच श्रीमंत देशांसह गरीब देशांमधुनही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. आज रोजी जगात असा एकही देश नसेल बहुदा,  जेथे सोशल मिडियाचा प्रभाव पडला नाही. भारतात तर महानगरे, शहरे, खेडे ते अगदी वाड्या, वस्त्या, तांडे व पाड्यांपर्यंत याने मजल मारली आहे. समाजातील सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील स्री-पुरूष, मुलं-मुली व्हाॅट्सअॅप, फेसबुकशिवाय बोलत नाहीत. हे माहीत नसणारे लोक शोधावे लागतील, सापडणार नाहीत असे नाही मात्र फार मोजकेच! !! त्याचे कारणही तसेच आहे, एकाच वेळी हजारो लोकांच्या संपर्कात राहणे यामुळे अगदी सहज शक्य होत आहे. शिवाय डेटा हस्तांतरणासाठीही याचा वापर होतो. कमी वेळात जास्त अंतरावर तात्काळ एखादी फाईल पाठवणे सोयीचे झाले आहे.
बदलत्या काळानुसार काळासोबत राहणे कधीही स्वागतार्हच म्हणावे लागेल. हायटेक व टेक्निकली अपडेटेड असणे प्रगत समाजाचे लक्षण असते. सोशल मिडिया सोबतच सोशल नेटवर्किंगही आपले पाळेमुळे मजबूत करत आहे. सोशल मिडियाचा वापर टेक्स्ट, ऑडिओज, व्हीडीओज, इमेजेस इत्यादी शेअर करण्यासाठी तसेच लाईव्ह चॅटिंग साठीही केला जात आहे. ज्यामुळे आपण जणूकाही खिशात जग टाकून फिरत आहोत असे वाटते. हा वापर म्हणजे या मिडियाचा चांगला वापर म्हणता येईल पण याच मिडियाचा वापर काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे चुकीच्या पद्धतीनेही करत आहेत. ज्यामध्ये फसवेगीरी करणे, अफवा पसरवणे, भावना भडकवणे,खोटा प्रचार करणे लैंगिक छळवणूक करणे (Sexual Harassment ) इत्यादीसाठीही केला जात आहे.
काही मानसिकदृष्ट्या विक्षिप्त लोक, स्वतःचे सुख पाशवी पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतात. देव जाणो पण यांना महीला मुलींना काहीतरी अश्लील ऐकवून वा दाखवून काय राक्षसी आनंद मिळतो किंवा काय मोठेपणा मिळतो कळत नाही. सोशल गृपमध्ये ब-याचदा एकाच कुटुंबातील सर्व सदस्य असतात. बरे,  यातुन संबंधित काहीतरी अश्लील टाकणा-यांची बदनामी होत नाही का?  त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत नाही का? याची त्यांना एक तर कल्पना नसावी अथवा मग फिकीर नसावी.
बहुतेक वेळा हा प्रकार सोशल मीडियाची भाषा इंग्रजीचे कमी ज्ञान असल्याने तसेच तांत्रिक बाबींची तितकीशी माहीती नसल्यामुळे अनावधानानेही होतो. मात्र यावर उपाय देखील शोधायला हवेतच ना? मी अशा प्रकारांत  आतापर्यंत अनेकांशी बोललो तेव्हा त्यांचे असे म्हणणे आले की, यातले मला काही कळत नाही, मी हे केलेच नाही, हे शक्यच नाही, कसे झाले समजत नाही. ब-याचदा खाते हॅकही केले जाते !! हे जरी खरे असले तरी सायबर जगात जेथे व्यवहार युजर आयडी व पासवर्ड शिवाय होत नसतात तेथे हे मी केले नाही असे म्हणता येत नाही. बोटे जरी आपली नसली तरी खाते आपले असल्याने तो व्यवहार देखील आपण केलेला आहे असे समजले जाते. समजत नसेल तर एटीएम व्यवहार लक्षात घ्या. असे असतानाही काही लोक याबाबतीत पराकोटीचे बिनधास्त व गाफील असल्याचेही निदर्शनास आले आहे. आपला कोणताही युजर आयडी व पासवर्ड (फेसबुक, नेटबॅकींग, इमेल व इतर अनेक ) अत्यंत गोपनीय ठेवायला हवा. ती काही पब्लिक करण्याची अथवा शेअर करण्याची गोष्ट नाही. शिवाय आपला मोबाईल तोही इंटरनेट कनेक्टेवीटी असलेला !! एखाद्या मिसाईल प्रमाणे हायली लोडेड असतो  असे म्हटले तर नवल वाटायला नको. कारण त्याचाही तितकाच घातक वापर केला जाऊ शकतो व आपण अडचणीत येऊ शकतो.
फेसबुक बाबतीत गोपनीयता व सुरक्षितता  (Privacy & Setting) वर लक्ष असायला हवे. ते setting वेळोवेळी update करायला हवे. सोशल नेटवर्किंग व मिडिया बाबत आपण संक्रमणावस्थेत आहोत. आणखी आपले ज्ञान अपुरे व अपरिपक्व आहे, तसा तांत्रिक बाबतीत कोणीही कधीही परिपूर्ण असु शकत नाही. कारण या जगात दररोज बदल होत असतात. नवे नवे softwares वापरायचे कसे हे लक्षात येत नाही. साधारणपणे असे दिसते की एखाद्या गृपचा प्रमुख अर्थात Admin  हा Technically हुशार असतो , तेव्हा तो गृप सुरक्षित ठेवणे, त्यासाठी आवश्यक Settings करणे, प्रसंगी कठोर कारवाई करणे हे त्याचे कर्तव्य असते. उदा. Post verification & approval.
यामुळे होते काय की post तो स्वतः तपासुन पहातो व योग्य असेल तरच Display करतो. आणि मग एखादी पोस्ट जी अनुचित आहे, मग ती जाणुनबुजून टाकलेली असो अथवा अनावधानाने आलेली असो, ती पब्लिक होत नाही व नाहक मानसिक त्रास गृपला व सेंडर यांना होत नाही. प्रसंगी अशा मोकार सदस्यांना Remove करायला हवे आणि असे होत नसेल तर मग आपणच तशा गृप्सना leave करायला हवे.
आणि एवढे करूनही पुरेसे नाही झाले तर सायबर सुरक्षा आणि सोशल मिडिया दुरूपयोग संदर्भात भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने कठोर कायदेशीर तरतूदी केल्या आहेत. वरीलप्रमाणे कृत्ये करणारांची तक्रार पोलिसांकडे करायला हवी. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तज्ञांचा समावेश असलेला स्वतंत्र विभाग  (Cyber crime cell ) आहे. यासाठी स्वतंत्र कायदे ठआहेत. आणि आता तर असेही ऐकायला मिळत आहे की लवकरच अशा प्रकारच्या केसेसची सुनावणी स्वतंत्र cyber courts मध्ये होणार आहे. त्यामुळे मित्रांनो सजग रहा, सुरक्षित रहा. . . . . .

शब्दांकन : बालासाहेब सिताराम  (बी.एस.) धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

No comments: