Thursday 23 June 2016

संगीत

संगीत ….
            ईश्वराने निर्मिलेले हे विश्व संगीताने सजलेले व धजलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मानवी जीवणात जन्मापासून मुत्यूपर्यंत संगीत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बारकाईने पाहिले तर निसर्गातील सर्व घटक  मग ते सजिव असोत वा निर्जीव असोत, सर्वात संगीत व्याप्त आहे. खळखळणारे झरे, मंद वा सोसाटयाचा वारा, सळसळणारी पाने, गडगडणारे ढग, कडाडणारी वीज, पक्ष्यांचा चिवचिवाट, भुग्यांची भुणभुण, रातकिडयांची किरकिर, डोलणारे पीक, प्राण्यांचे आवाज व पावसाचे पडणारे टपटप थेंब या सर्वांमध्ये संगीत व्याप्त आहे. नवजात बालकाचे रडणे व मृत्युशय्येवरील व्यक्तीचे कन्हणने, स्त्रीचे इश्श्य व पुरूषाच्या ओठातील शीळ यामध्येही संगीत व्याप्त आहे.
            मानवी जीवणामध्ये संगीताला अनन्य साधारण असे महत्व आहे. जादूई कंठ व जादूई बोटे लाभलेल्या माणसांनी  इतर माणसांच्या जीवणात भरलेला रंग म्हणजे संगीत अशी मी संगीताची व्याख्या करतो. थकून भागुन आलेल्या शरीराला व मनाला उल्हासीत करण्याचे काम संगीत करते. कहते है, संगीत है शक्ती ईश्वर की, हर सुर में बसे है राम | रागी जो गाये रागिणी, रोगी को मिले आराम | Music is the tone picture of Sociaty म्हणजे संगीत हे समाजाचे ध्वनीरुप चित्रण आहे. असे म्हटले जाते की,जर एखाद्या व्यक्तीच्या मनाचा व विचारांचा ठाव घ्यायचा असेल तर त्याच्या आवडत्या गीतांचा व संगीताचा अभ्यास करावा. असेही म्हणतात की, संगीत हे सुर व ताल या अमुर्त घटकांचा मुर्त अविष्कार असते. संगीताला भाषा नसते. As Human emotions are universal so the Music is also universal. संगीताला समजून घ्यायला डोके अथवा भाषेची गरज नसते. –हदयाने संगीताचा प्रत्येक नाद समजतो. मानवी जीवणात संगीत दु:खाची तीव्रता कमी करुन दु:खी मनाला आनंदाची झालर घालते म्हणून कलेचा आदर केला पाहिजे नव्हे केला जातो. स्वाभाविकच ही कला सादर करणा-या कलावंताचे स्थानही तितकेच महत्वपूर्ण असते. कलाकाराला स्वनिर्मिती व प्रयोग यांना महत्व दयावे लागते. तो आजन्म शिकत असतो. त्याला आजन्म सरावाची गरज असते.
            कलावंताने हे ध्यानात घ्यायला हवे कला ही अमर असते व अर्थातच तिच्यामुळे कलावंतही अमर होत असतो.  कोण मोठा व कोण छोटा यात न जाता आपल्या कलेवर लक्ष केंद्रित केले तर कलेची व कलावंताची प्रगती होत असते.
            संगीतामुळे जर पशुमधील पशुत्व नष्ट होत असेल तर मग मनुष्यातील अल्पस्वल्प पशुत्व तर निश्चितच नष्ट होईल. संगीत, गाणे किंवा ऐकणे आणि त्याचा आनंद घेणे या वेगळया गोष्टी आहेत. मनोरंजन हा जरी संगीताचा प्रधान हेतू असेल तरी सामाजिक जाणिवांचा उत्कर्ष करुन मानवी भावबंध निर्माण व्हायला देखील संगीतामुळे मदत होत असते. संगीतामध्ये सर्व जीवसृष्टीला चैतन्यमय करण्याचे सामर्थ्य आहे. जीवण संगीताची मैफल आहे व भैरवी गातागाता जीवणाची थोरवी समजते असे जे म्हणतात ते उगीच नाही. त्यामुळे संगीताचा आनंद घेवून जीवन संगीतमय होते यात शंका नाही.
लेखन :- बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ

मो.नं.- 9096877345

No comments: