Wednesday 11 April 2018

महाराणी सईबाई

मित्रांनो......
रविवारी मी मित्रांसोबत स्वराज्याची पहीली राजधानी किल्ले राजगड पहायला गेलो होतो. चढण्यास अतिशय कठीण व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा किल्ला पाहून समाधान वाटले, अभिमान वाटला. पण इतर किल्ल्यांप्रमाणेच राजगडही संवर्धनाच्या बाबतीत दुर्लक्षितच दिसला. नेहमीप्रमाणेच दुःख ही झाले. मात्र सर्वाधिक दुःख झाले ते राणी सईबाईंची समाधी पाहुन!!!
भलेही त्यांनी स्वराज्याभिषेक पाहीला नव्हता पण राजेंनी स्वराज्याची शपथ बालपणीच घेतली होती. विवाहापासुनच त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी राजेंना सर्वोतोपरी सहकार्य केले होते. स्वराज्याच्या निर्मिती कार्यात त्यांनी आपल्या पतीला पावलापावलावर साथ दिली होती.
आपल्या १९ वर्षांच्या संसारात त्यांनी संभाजी राजेंसह चार अपत्यांना जन्म दिला होता. पुरंदरवर संभाजी राजे जन्मले तेव्हा भोसले परिवारात प्रचंड आनंद झाला होता. त्या अर्थाने त्या स्वराज्याच्या पहील्या महाराणी होत्या.
छत्रपती शिवाजी राजेंच्या लाडक्या पत्नी व स्वराज्याचे दुसरे राजे छत्रपती संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाई! मातोश्री जिजाऊंच्या लाडक्या सुनबाई होत्या त्या. त्यांचा व राजेंचा विवाह जिजाऊंनीच लावून दिला होता. त्या राजमाता जिजाऊंची निवड होत्या. त्यांनी घर संसार व्यवस्थित हाताळला होता.
त्या फलटनचे १५ वे राजे मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या कन्या व फलटनचे १६ वे राजे बजाजीराव नाईक निंबाळकर यांच्या भगिनी होत्या. निंबाळकर घराणे शुर व घरंदाज राजघराणे होते. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांची सासरवाडीदेखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातीलच होती.
सईबाई एक सुंदर, सुशिल, चारित्र्यसंपन्न, बुद्धिमान व निस्वार्थी पत्नी होत्या. संभाजी राजे दोन वर्षाचे असतानाच त्या गेल्या. संभाजी राजेंचा सांभाळ आजी जिजाऊंनी व सावत्र आई सोयराबाईंनी केला. संभाजी राजेंच्या जन्मापासूनच त्या आजारी होत्या. त्या दि.५ सप्टेंबर १६५९ रोजी गेल्या. त्यांच्या निधनाने राजेंना अतिशय दुःख झाले होते. त्यांना जिजाऊंनी सावरले. मी असेही वाचून आहे की शिवरायांच्या म्रुत्यु प्रसंगी त्यांनी "सई" हेच शेवटचे शब्द उच्चारले होते.
मात्र आज स्वराज्याच्या पहील्या महाराणीच्या समाधीवर साधे छतही नसावे हे पाहून मन उदास झाले. उन्हा पाऊसापासुन रक्षण व्हावे म्हणून साधी निवा-याखाली समाधी नसावी हे खेदजनक आहे. हे दुर्लक्ष व ही भग्नावस्था संतापजनक आहे.
शुल्लक व लबाड राजकारण्यांच्या समाधी संगमरवरी आहेत. भव्य स्मारकांच्या गप्पा व श्रेयाची भांडणे आपण रोजच ऐकतो पहातोय. मात्र आपल्या प्रेरणास्थानांची, वारसा स्थळांची, ऐतिहासिक अस्मितांची असलेली दुरावस्था पाहून एरवी गर्वाने शिवाजी महाराजांचा, मराठा साम्राज्याचा व स्वराज्याचा जयघोष करणारे शिवप्रेमी व शासन एवढे उदासीन कसे काय असु शकतात???
कळत नाही.......

... बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

No comments: