Tuesday 17 April 2018

दान

मित्रांनो नमस्कार🙏सुप्रभात🌷
आज अक्षय तृतीया साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्म शास्त्रानुसार देखील एक शुभ दिवस...
आज केलेले दान अक्षय राहते असा उपदेश श्रीकृष्णाने युधिष्टीराला म्हणजे धर्माला केला होता. मात्र संस्कृती जपत असताना व आत्म समाधान मिळवत असताना आपला विवेक देखील जागा असावा लागतो. धर्म व विज्ञान यांचा जसा यथार्थ मेळ विवेकानंदांनी अब्दुल कलामांनी घातला होता व तशीच शिकवण दिली होती, तिचा विसर पडला नाही पाहिजे. चांगले काम करणारे शुभमुहूर्ताची वाट पहात बसत नाहीत. नवनिर्माणासाठी प्रगतिपथावर अग्रेसर होण्याची कुठल्याही शुभ मुहूर्ताची अथवा पुजेची आवश्यकता नसते. दान नक्की करावे मात्र ते करताना स्वतःची ऐपत व ज्याला दान करावयाचे आहे त्याची सर्वांगाने योग्यता तपासली पाहीजे. त्याची निकड अथवा गरज पाहीली पाहिजे. विं. दा. करंदीकर म्हणतात,.....
"देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे."
म्हणजे सदैव मिळण्याचीच अपेक्षा न करत राहता कधीतरी स्वतःही दान करावे. इतरांना धार्मिक व श्रद्धाळू बनविणारे व दानाचे महत्व समजावून दान स्विकारणारे स्वतः कधी दान करताना दिसतात का हे ही पाहीले पाहीजे. दात्रूत्व माणसाला निस्वार्थ वा परार्थ शिकविते. त्यातच खरा परमार्थ दडलाय हे आपण समजून घ्यायला हवे.
मित्रांनो पात्र पाहुन दान करावे असे म्हणतात. म्हणजे योग्यता तपासून, आवश्यकता पाहून दान करावे. दानाने निष्क्रियता तर वाढणार नाही ना? क्रियाशीलता संपुष्टात येवून परावलंबित्व तर वाढीस लागणार नाही   ना? याचीही आपण काळजी घ्यायला हवी.
अक्षय दानाची व्याख्या समजून घ्यायला हवी. जे हयात नाहीत त्यांच्या नावाने दान करण्याची काहीही आवश्यकता नसते आणि मानसिक समाधान, आठवण, श्रद्धा, धर्माची शिकवण म्हणुन जर दान करावयाचेच असेल तर अनाथालये, वृद्धाश्रमे, विकलांगांच्या शाळा व वस्तीगृहे यांना दान करा. अवयव दान करा, रक्तदान करा. अनेक लोक या देशात आजही निवाराहीन आहेत, भूमिहीन आहेत. त्यांच्या निवा-यासाठी शासनाला अथवा समाजसेवेचे कार्य करणाऱ्या एनजीओंना भुदान अथवा इतर पुरक दान करा.अनाथ बालकांना दत्तक घ्या, बुद्धीमान गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करून राजर्षी शाहु महाराज व सयाजीराव गायकवाड यांचा आदर्श घ्या, गोरगरिबांच्या लेकीबाळींचे विवाह लावून द्या.
मित्रांनो हयात असलेल्या आईवडीलांना आपल्याला जन्म दिल्याचा पश्चात होणार नाही. तर आपल्याला जन्मास घातल्याचे समाधान व अभिमान वाटेल असे काहीतरी करा. आवश्यक नाही प्रत्येक वेळी मंदिरात जाऊन पुजा अर्चना करणे. कधीतरी सरकारी शाळेत, सरकारी दवाखान्यातही जा. तिथल्या अडचणी समजून घ्या. तिथे काही करता येईल का पहा. आजही अनेक गावांत, वाड्यावस्त्यांवर, तांडेपाड्यांवर रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, शाळा-आंगणेवाडी, वैद्यकीय सुविधा, स्मशानभूमी नाही. तेथे केलेले दान फलदायी व अक्षय ठरेल. मला खात्री आहे की असे दान आपल्या पितरांना देखील. समाधान व शांतता प्रदान करेल. हयात असलेल्या मातापित्यांनाही व पितरांनाही...
मित्रांनो, गंगास्नान केल्याने पापमुक्ती मिळत नाही तर जलप्रदूषण होते, संसर्गजन्य आजार जडतात. अक्षय तृतीयेचे शुभमुहूर्त साधुन नदी सफाई, पात्रातील गाळ काढुन पात्र रुंदीकरण, असे उपक्रम राबविले तर नक्कीच समाधान मिळेल.
बघा पटलं तर घ्या. सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शुभ कार्यासाठी, प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

आपलाः बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

No comments: