....................... परिपाठ ...........................
मित्रांनो नमस्कार🙏🏼 आज ११ एप्रिल म्हणजे शिक्षणाची गंगा दिन दुभळ्या , गोरगरीब, वंचित दुर्लक्षित बहुजनांच्या दारापर्यंत घेऊन जाणाऱ्या महामानव क्रांतिसूर्य महात्म्या जोतिबा फुले यांची 191 वी जयंती. त्यांच्या महान कार्याला व स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी तुम्हाला माझा आत्ताचा एक अनुभव सांगतो.
मित्रांनो उन्हाळ्यामुळे सकाळ सत्रातच शाळा असल्याने मी सकाळी 6:30 लाच शाळेत येतो. नित्याप्रमाणे आजही आलो.सकाळची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी 7:00 वाजता बेल दिली. राष्ट्रगीत झाले, प्रतिज्ञा झाली आणि नंबर आला तो भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा!!!
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हे म्हणण्याचा!!!!
नित्याप्रमाणे परिपाठ सुरु झाला मात्र माझे व माझ्या विद्यार्थ्यांचे लक्ष मात्र परिपाठात काही लागत नव्हते. त्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेच्या मैदानात रात्रीच्या वेळी निवाऱ्यासाठी काही फिरस्ती किंवा भटके कुटुंब आले होते. परिपाठा दरम्यान माझी मुलं त्यांच्याकडे पाहत होती, त्यांची मुलं कुतूहलाने माझ्या मुलांकडे पाहत होती माकडांप्रमाणे. माझी मुलं परिपाठामध्ये एकेक सदर सादर करत होती तर ती मुलं व त्यांचे पालक त्यांच्या आम्हाला न समजणाऱ्या भाषेमध्ये बडबडत होती. मला काही केल्या राहावले नाही. मी परिपाठामधुन त्या कुटुंबांकडे गेलो. त्यांची विचारपूस केली. ते कोण आहेत? कोठून आले आहेत? व काय करतात असे विचारले असता, त्यांच्या त्या 3 कुटुंबांपैकी एक कुटुंब डोंबारी जमातीचे निघाले तर दोन कुटुंबे नंदीवाले जमातीचे आढळले. पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन कला कसरती दाखवून पोट भरणारे हे कुटुंब पाहून वाईट वाटले. त्यांची अवस्था पाहून कासावीस झालो. त्याचे कारण असे, दरवर्षी आम्ही शाळाबाह्य मुलांची संख्या निरंक देतो. मात्र या तीन कुटुंबातच जवळजवळ सहा मुले शाळाबाह्य दिसली!!! म्हणजे यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षणाची गंगा तर सोडाच पण साधी ओल पण पोहचलेली दिसली नाही.
माझी मुलं व्यवस्थित ब्रश करून आंघोळ करून दुध चहा-नाष्टा घेऊन युनिफॉर्ममध्ये निटनेटके परिपाठात बसली होती. तर त्या पालांमधील निम्मी मुलं अद्यापही गोदड्यातच होती. निम्मी कसलीतरी पाकीट फोडून काहीतरी खात होती. ना ब्रश केलेला, ना आंघोळ झालेली ! त्यांच्या पालकांनाही याचं काही वाईट वाटत नव्हतं. दोन मोठ्या पुरुष मंडळींनी अंघोळ केलेली आढळली. ते आरशात चेहरा पहाताना दिसली. बायका अंथरुणाच्या घड्या घालत होत्या. बहुधा ते दुसऱ्या गावी जाण्याची तयारी करत असावीत असं मला वाटलं. मी त्यांच्याकडे चौकशी केली. विचारले आता काय करणार? त्यावर ते म्हणाले साहेब आता आम्ही खेळ लावणार. डोंबारी नंदिवाल्यांचा खेळ दाखवणार आम्ही. चार पैसे जमा करणार व मीठ मिरची आणणार पोटाला. मी म्हटलं पाहातात का लोक आता पहिल्यासारखा खेळ तुमचा? तर कोणी पहातं कोणी नाही असं उत्तर आलं? पाहिला तरी आता लोकांचे हात खिश्याकडे जात नाहीत साहेब. पोट भरणं लई अवघड झालं आहे साहेब पण काय करू? आईबापांनी शिकवलं नाही आता पुढं आम्ही शिकवतोय तर लेकरं शिकत नाहीत. बोरडींगीत नकु म्हणत्यात अन सोबत ठेवावं तर शाळा बुडतीया. म्हणून काय करावं कळत नाही. अन नाही तरी शिकुन बी काय उपेग न्हाई वो, त्यांचा पोरगा चवदावी शिकला पण काही उपेग झाला नाही. काहीशा वैतागलेल्या सुरात तो उत्तरला.
मी विचारले तुमचं नाव काय? तर ते म्हणाले मी शिवराम लिंबाजी जाधव गाव जातेगाव तालुका शिरूर जिल्हा अहमदनगर. मी मनात म्हटलं शिरुर तालुका नगरमध्ये!! डोंबारी जातीचा आहे. मला चार मुले व एक मुलगी आहे. मी शाळेत जातात का विचारले तर ते म्हणाले नाही. शाळेत जात नाही. त्यांच्याच बाजूला साहेबा बाबु गायकवाड नावाचे नंदिवाले जमातीचे व्यक्ती त्यांच्या समवयस्क भावासोबत बसले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव गावचे. त्यांनाही 4 अपत्ये होती दोन मुले व दोन मुली. ह्यांची दोन अपत्ये शिकत होती.
त्यांची ती अवस्था पाहून मी बेचैन झालो म्हणजे एकीकडे आपण ग्लोबलायझेशनच्या, आधुनिकीकरणाच्या, प्रगतिच्या गप्पा मारतो!! स्मार्ट सिटीज मोनो मेट्रो रेलच्या गप्पा मारतो. भारत महासत्ता बनत असल्याचे म्हणतो. तर दुसरीकडे या भटक्या विमुक्त जमाती अद्याप पारतंत्रातच जीवन जगताहेत. यांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य कधी उगवेल? यांच्या आयुष्याची रेल कधी पटरीवर येईल?
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या तीन कुटुंबांपैकी कोणाकडेही स्वतःचे घर नव्हते. जमीन नव्हती. कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. त्यांच्याकडे बँक पासबुक नव्हते. मतदार ओळखपत्र नव्हते. आधार कार्ड नव्हते. पॅन कार्ड नव्हते. आधुनिक जगातील एकच वस्तू त्यांच्या जवळ होती ती म्हणजे गाडवे घोडे यांची जागा घेतलेला छोटा हत्ती (मिनी टेंपो)!!
मला प्रश्न पडला जर यांच्याकडे काहीच नाही तर या लोकांना या देशाचे नागरिक अस कसे काय म्हटले जाऊ शकते? यांनी का म्हणावे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून? यांच्या मदतीला कोणीतरी धावून जायला हवे. शासन, एनजीओ यांना हे पालातील, छपराखालील, पुला-नळ्याखालील, फुटपाथवरील, सिग्नलवरील दारिद्रय दिसत नसावं का? यांना कधी भारताचे ख-याअर्थाने नागरिकत्व मिळणार?? (मुळनिवासी असुनही!!!)
चर्चा करत असताना शिवराम लिंबाजी गायकवाड अगदी बेंबीच्या देठापासून दुःखावस्था सांगत होते. साहेब ज्या गावात खेळ दाखवायला जातो त्या ठिकाणी जागा मिळत नाही. गावातील टगे बायकापोरांना लेकराबाळांना त्रास देतात. मी म्हटलं पोलिसात वगैरे जात नाही का? तर ते म्हणाले पोलीस काय आणि कोर्ट काय हे मला माहीतच नाही. आम्ही आजवर पोलिस स्टेशनची किंवा कोर्टाची पायरी कधीही चढलो नाही. इकडंच हातापाया पडून मिटवले तंटे. या जातीत जन्म झाला हे कदाचित पहील्या जन्माचं पाप असावं. त्यांची दयनियता व हतबलता मला असह्य वेदना देत होती पण औषध काहीच नव्हते.
आता मी साहेबा बाबु गायकवाड नावाच्या व्यक्तीशी गप्पा मारण्याचे ठरवले. ते बोलण्याच्या मानसिकतेत नव्हते. ते काहीसे चिडलेल्या अवस्थेत दिसले.
काय करायचे साहेब सांगुन?? सांगुन काय फरक पडणार आहे. अशी लईजण लईदा चौकशी करतात माहिती घेऊन, फोटो काढून जातात. फरक काहीच पडत नाही. आमच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. त्यामुळे मला काही विचारू नका. मी म्हणालो तुमच्या जातीचे नेते तुमची काही मदत करत नाहीत का? त्यावर ते म्हणाले कोणीही नाही. ना जातीचे ना बिगर जातीचे. कोणीही आमच्या मदतीला येत नाही.
मित्रांनो मी त्यांचा मूड ओळखला. तेवढ्यात परिपाठही संपला. मग मी माझ्या वर्गामध्ये जाऊन विचार करत बसलो. खरच या जमाती अजुनही स्वतंत्र आहेत का? यांना खरोखरीच स्वातंत्र्य मिळाले आहे का? हा भारत देश खरच यांचा देश आहे का? देशात मुठभर हक्काची माती नाही का वितभर नावावर जमीन नाही, डोक्यावर हक्काचे छप्पर नाही तो देश यांचा देश कसा काय असू शकतो?????
आमचा शालेय परिपाठ रोजच सुरू होतो आणि रोजच संपतो पण या विमुक्त भटक्या जमातींचा दुःख, दैन्य, दारिद्रय, हतबलता व दुर्लक्ष या सदरांनी युक्त परिपाठ कधी संपेल देव जाणो....
....बाळासाहेब सिताराम धुमाळ
...मो. 9673945092.
No comments:
Post a Comment