Wednesday, 30 March 2016

करा निर्धास्त मदत

मित्रांनो नमस्कार,

आपल्या देशात दर चार मिनिटांत एकजण रस्ते अपघातात दगावतो.
बहूतांश अपघाताचे कारण Drink and Drive,  नियमाचे उल्लंघन,  अती गती , स्पर्धा व स्टंटबाजी आणि झोप असते. काही अपघात वाहनातील तांत्रिक बिघाडामुळेही होतात.
पण अपघात कसाही झाला तरी अपघात ग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
काही जण शुटींग करतात, काहीजण पोलीसांना फोन करतात, तर काही जण तर अक्षरशः मजा बघतात व निघून जातात. मदतीला धावून जाणारे कमीच असतात, जवळजवळ नसतातच.
मित्रांनो,  केवळ वेळेवर दवाखाना मिळाला नाही, एवढेच काय, गाडीबाहेर किंवा गाडीखालून काढले नाही,  पाणी पाजले नाही म्हणून अनेक जण मरतात.
याचे कारण सरकारी यंत्रणा,  ज्यात पोलीस, डाॅक्टर्स हे मदत कर्त्यालाच संशयाने पहात.  नको ते उलटसुलट प्रश्न, साक्षी पुरावे, तारखा, आरोप यांना कंटाळून मदतकर्ते मदत करत नसत.
पण आता अशा रस्ते अपघातात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात मदत करणाऱ्या सदिच्छा मदतकर्त्यांचे पोलीस व इतर अधिका-यांकडून केल्या जाणाऱ्या छळवणूकीपासून रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे.
त्यामुळे आता डाॅक्टरांना अगोदर तातडीने उपचार करावे लागतील. तसेच सोबतच्या मदत कर्त्याला थांबवून ठेवता येणार नाही, आगाऊ प्रश्न विचारता येणार नाहीत.
त्यामुळे आता निर्धास्त होऊन मदत करा. माणुसकीचे दर्शन घडवा आणि जिवनदाते होऊन जिवनदानाचे पुण्य मिळवा सोबतच संबंधीताचे, त्याच्या कुटूंबीयांचे आशिर्वाद मिळवा.

"किसीके काम जो आये, उसे इन्सान कहते है |"

शब्दांकन: बी. एस. धुमाळ
मो. 9421863725

Tuesday, 29 March 2016

सामाजिक दायित्व

मित्रांनो नमस्कार 🙏
मराठवाडा हा तसा कायमच दुष्काळी भाग. .. मात्र मागील तीन चार वर्षांपासून दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली आहे. सततची नापिकी, थंडावलेले व्यवहार यामुळे मराठवाडयातील जनता हवालदिल झाली आहे. दुष्काळाच्या तीव्रतेचा परिणाम सामाजिक व आर्थिक व्यवस्थेवरही झाला आहे. यामुळे सहाजिकच हातावर पोट असणारे गोंधळी समाजातील शेतकरी, शेतमजूर व कलावंत बांधव हैराण झाले आहेत.
अशा परिस्थितीत उपवर मुलगी झालेल्या आईवडीलांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चिंतेचे सावट झोप येऊ देत नाही. लग्नाचा खर्च करायचा कसा?  लागणारे पैसे आणायचे कोठून?  अशा विवंचनेत असणारे आई वडील मुलीचे लग्न थांबण्याचाही निर्णय  घेतात. मात्र उपवर मुलगी तीही गरीबाची!! काही घरात ठेवायची वस्तू नाही. अशा गरीब गोंधळी माता - पित्यांच्या डोक्यावरील काळजीचा भार थोडासा वाटून घेण्याच्या प्रामाणिक उद्देशाने भगवान परशुराम गोंधळी समाज सेवा मंडळाने उपवर मुलीच्या माता पित्यांच्या मदतीला धावून जाण्याचे ठरविले आहे.
मित्रांनो, बुडत्याला काडीचा आधार असतो.  हगवणीला बायको आणि नागवणीला सोयरा असतो असे आपले पुर्वज सांगत. एक सामाजिक दायित्व म्हणून अशा गरीब जात बांधवांच्या मुलीच्या लग्नासाठी ' फुल नाही फुलाची पाकळी ' मदत म्हणून भगवान परशुराम गोंधळी समाज सेवा मंडळाने मुलीच्या घरच्यांना एक क्विंटल गहू,  एक क्विंटल तांदूळ आणि अर्धा क्विंटल साखर देण्याचे ठरविले आहे.
असे म्हटले जाते की,  ' एका हाताने केलेली मदत ही दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये ' त्यानुसार ही मदत देखील अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल. आम्ही अमूक व्यक्तीला अशी अशी मदत केली याचा आम्ही कधीही उल्लेख करणार नाही. जेणेकरून करून मुलीच्या घरच्यांचा स्वाभिमान दुखावणार नाही.
याचबरोबर ' भगवान परशुराम गोंधळी समाज सेवा मंडळ ' असेही नम्र आवाहन करते की, अशा बिकट परिस्थितीत किमान ज्यांची आर्थिक परिस्थिती सबळ नाही अशा समाज बांधवांनी लग्न समारंभात झगमगाटावरील खर्च टाळून ,  साधेपणाने लग्न उरकून वाचलेल्या पैशातून नवविवाहित दांपत्याला त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी,  त्यांचा संसार उभा राहण्यासाठी हातभार लावावा.
तरी कृपया गरजू समाज बांधवांनी अर्थात मुलीच्या घरच्यांनी , मंडळाच्या खालील पदाधिका-यांशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.🙏



प्रा. श्री. तुकाराम धुमाळ (सातारा)-   9665597827
श्री. राजेंद्र काटे (बीड) - 9130786333
श्री. बबनराव काळे (लातुर) - 9049372959
श्री. अशोकराव जाधव (उस्मानाबाद) - 8308027612
प्रा. श्री. सखाराम धुमाळ (ठाणे)- 8425890282
श्री. कैलासराव काटे  (बीड)- 9545533659
श्री.  अरविंदराव बेद्रे  (बीड)- (9822578244)


शब्दांकन : बी. एस. धुमाळ (बीड)-
मो. 9421863725

Monday, 28 March 2016

लाज वाटली पाहिजे. .....

लाज वाटली पाहीजे. ...

मित्रांनो,  नमस्कार🙏
गोंधळी जात म्हणजे शिवरायांचा दैदीप्यमान इतिहास शाहीरी गाण्यांद्वारे व कथांद्वारे लोकांसमोर मांडणारी जात. शत्रूच्या गोटात वेषांतर करून जाऊन तेथील खडानखडा माहीती शिवरायांना सांगणारी गनिमी कावा युद्धनितीत महत्वाचा वाटा उचलणारी, शिवरायांचे संदेश जनतेपर्यंत घेऊन जाणारी जात  आणि अशा जातीत माझा जन्म झाल्याचा अत्यंत गर्व. प्रखर हिंदूत्वाचा नुसता पुरस्कारच नव्हे तर प्रचार आणि प्रसार करणारी जात. शिवरायांविषयीचा आभिमान रोमारोमात भिनलेला असल्याने कोणत्याही स्वार्थाविना राजेंना आदर्श मानून जगणा-या जातींपैकी व राजेंना जिव की प्राण मानणाऱ्या त्यांच्या कट्टर चाहत्यांपैकी मी एक.  एक कट्टर पण सहीष्णू हिंदू एवढीच माझी मी ओळख मानतो.
आज रोजी कुठली लढाई करण्याची आवश्यकता नाही . केवळ राजेंना आदर्श मानून जिवन जगलोत तरी जन्माचे कल्याण तर होईलच पण आज रोजी भेडसावत असलेल्या अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत याची खात्री बाळगणारा एक सामान्य शिक्षक सद्यस्थितीचे जेव्हा एकांतात चिंतन मनन करतो तेव्हा अत्यंत खिन्न होतो आणि राजेंना आणि त्यांच्या मावळ्यांना शोधत बसतो, त्यांच्या काळात जाऊन काल्पनिक जिवन जगत बसतो .  त्यासाठी गड किल्ले,  स्मारके व संग्रहालये धुंडाळतो. शक्य होईल तेवढे वाचण करायचा प्रयत्न करतो.  शिवरायांच्या आदर्शावर मार्गक्रमण करणाऱ्यांशी जात धर्म पंथ लिंग भाषा प्रदेश यांचा विचार न करता मैत्री करतो.  पण जेव्हा असे लोक पाहतो  ज्यांना शिवराय समजलेच नाहीत,  तेव्हा त्यांना पाहील्यावर डोके ठिकाणावर राहात नाही.  शिवरायांचा वसा जपणारा असल्याने शांतही बसू शकत नाही व राडाही करू शकत नाही.
नेत्यांचे, नट नट्यांचे,  क्रिकेटपटूंचे वाढदिवस एक दिवसच नव्हे तर सप्ताह, पंधरवडा,  महीणाभर उत्साहाने साजरे करतात आणि राजेंची जयंती एकतर  तारखेप्रमाणे नसता तिथीप्रमाणे पण दोन्हीपैकी एकच साजरी करतात.  जयंतीमध्ये व्याख्याने,  परिसंवाद, चर्चासत्रे,  जिवनपट वाचन,  शाहीरीगीते व शिवगीतांचे गायन, सद्यस्थितीचे विश्लेषण इ. न करता डीजे च्या तालावर मद्यधुंद डोलतात. काहीजण तर त्याही स्थितीत नसतात म्हणून सरळ दांडी मारतात. शिवजयंतीच्या मिरवणूकीत शाहीरी पोवाडे व इतर विर रसातील गाणी विसरून शांताबाय वाजवतात त्यांच्या कानाखाली वाजवावी वाटते.  केवळ गाड्यांना भगवे झेंडे बांधून आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देऊन शिवप्रेमी समजले जाते का? ?
ढाबे रेस्टॉरंट बार यांना राजेंचे, त्यांच्या विर मावळ्यांचे अथवा त्यांच्या गढकिल्ल्याचे नाव दिल्याचे वाचले की पारा चढायला लागतो.
व्याख्याने व भाषणे ठोकून स्वप्रसिद्धी कमावणारे काही बुध्दीजीवी जेव्हा वरून पैसेही घेतात तेंव्हा वाईट वाटते आणि किव येते त्यांची व त्यांच्या बुद्धीची! !
राजेंच्या गढकिल्ल्यावर गर्ल वा बाॅय फ्रेंडला घेऊन फिरायला जाणारे आणि तेथे कचरा करणारे, दगडांवर खडकांवर  नावे लिहीणारे शिवप्रेमी पाहीले की कान गरम होतात.  यांचे कान सडकावले पाहीजेत असे वाटते व विचारावे वाटते की अशा नावे लिहील्याने इतिहासात आपली नोंद होते का? ? इतिहासाने नोंद घेण्यासाठी शिवाजी महाराजांसारखे शुर पराक्रमी व आदर्श असावे लागते.
राजेंच्या पुतळ्याला  "शिवाजीचा पुतळा,  शिवाजी पुतळा" असा उल्लेख  जेव्हा कोणी करतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. राजेंचा पुतळा,  महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा,  शिवरायांचा पुतळा, छत्रपतींचा पुतळा अथवा शिवबांचा पुतळा असे अभिमानाने म्हटले तर जीभ झडेल का? असेही विचारावेसे वाटते.
राजेंनी उभ्या केलेल्या स्वराज्यात आज शेतक-यांच्या होत असलेल्या आत्महत्या,  लेकीबाळींच्या लुटल्या जात असलेल्या इज्जती,  स्री भृणाच्या गर्भातच होत असलेल्या हत्या, उद्योजक व्यापारी व सावकारांकडून सामान्य प्रजेची होत असलेली लुट पाहून निराश अन हताश होतो. जिवन जगण्यासाठी येत असलेल्या अडचणी पाहून पाण्यातील रडणा-या माशाप्रमाणे अवस्था होते आणि राजेंची आठवण येते.
राजेंच्या महाराष्ट्रात जेव्हा चुकीचे पहायला, वाचायला अथवा ऐकायला मिळते तेंव्हा उदास व्हायला होते. एवढया समृद्ध व पवित्र हिंदवी स्वराज्यात जन्म मिळाला याचा अभिमान असण्याऐवजी राजेंच्या वर्तनाला, किर्तीला, विचारांना व संस्कारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न करणा-या अशा  काही लोकांना विचारावे वाटते,,,,
अरे लाज वाटते का लाज? ??

बालासाहेब धुमाळ,  बीड
मो. 9421863725

Wednesday, 23 March 2016

मापदंड जात विकासाचे Measures of Cast Progress

मापदंड जात विकासाचे
Measures of Cast Progress
कोणत्याही जातीच्या विकासाचे काही मापदंड असतात ते तीने पूर्ण केले म्हणजे ती जात विकसीत जात आहे असे समजले जाते. जी जात शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे, जीचे युवक युवती उच्च शिक्षण घेवून बाहेर पडतात. उच्च शिक्षण म्हणजे केवळ बी.ए. एम.ए नव्हे तर CET, AIEEE, JEE, CAT,SET, NET, GATE, MPSC, UPSC अशा परिक्षा उत्तीर्ण होऊन ज्या समाजातील विद्यार्थी आधिकारी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, तंत्रज्ञ, सीए, सी एस, शासकीय कर्मचारी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या (MNS), सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSU), खाजगी क्षेत्रातील नामांकीत कंपन्या, विमा क्षेत्र, सरंक्षण व संशोधन क्षेत्र, रचना व व्यवस्थापन क्षेत्र तसेच कला, साहित्य क्रिडा, पत्रकारिता, व्यापार, व्यवसाय, उद्योग इ. क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळवून आपल्या कार्याचा ठसा उमटवतात त्या जातीला शैक्षणिक दृष्टया प्रगत जात असे संबोधले जाते. अशी बुध्दिवादी व उच्च शिक्षीत जात सहसा चिडत नाही, हिंसक बनत नाही व प्रश्नाचे उत्तर कृतीतून देतो.
      आर्थिक दृष्टया प्रगत जात कशी असते हे सांगण्याची आवश्यकता आहे काय? ज्या जातीतील लोकांकडे पैश्याची चंगळ असते, पैसा नियमित येत असतो, ज्यांची बाजारात पत असते, ज्यांच्या जगण्याचा स्तर उंच असतो (High Living Standard) ज्यांच्याकडे भव्य घरे, गाडया, दागदागिने, कपडेलत्ते, प्रवास, पर्यटन आदिंवर खर्च करण्यासाठी मुबलक पैसा असतो शिवाय ज्यांची मोठया प्रमाणात स्थावर मालमत्ता असते, ज्या जातीतील लोक बेरोजगार नाहीत व ज्या जातीचे दरडोई उत्पन्न अधिक असते, त्या जातीस आर्थिक दृष्टया प्रगत जात असे म्हटले जाते.
      आता जीवणाचे व जगाचे वास्तव विचारात घ्यायला हवे की, वरीलप्रमाणे जी जात आर्थिक व शैक्षणिक दृष्टया प्रगत असते त्या जातीचा सामाजिक विकास आपोआप होतो. सामाजिक विकासाचे विश्लेषण करताना असे म्हटले जाते की, ज्यांना समाजात प्रतिष्ठा असते, ज्यांच्यावर अन्याय होत नाही, ज्यांना प्रत्येक उपक्रमात सन्मानपूर्वक सहभागी करुन घेतले जाते, ज्यांच्या शब्दाची किंमत केली जाते अश्या जातीला सामाजिक दृष्टया प्रगत जात म्हटले जाते.
      असा विकास मोजताना जातीतील लोकांचे वर्तन हा सर्वात महत्वाचा विषय ठरतो. जर आपले वर्तन सभ्य, सौम्य, नम्र, विवेकवादी व विचारशिल असेल (Rational) तर समाज त्यांना आपोआप प्रतिष्ठा देतो. ज्या जातीत कौटुंबिक भांडणे कमी असतात, घरात वृध्दांची व्यवस्थीत काळजी घेवून मान दिला जातो, आदर केला जातो, त्या जातीचा समाज अथवा जग आदर्श घेते.  ज्या जातीत स्त्रियांना बरोबरीचा दर्जा दिला जातो, आपल्या अपत्यांच्या भवितव्यासाठी संघर्ष केला जातो व अपत्ये देखील आपल्या माता पित्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतात, चारित्रय संभाळतात अश्या जातीचा जग आपोआप आदर करते नव्हे तो करावाच लागतो.
      ज्या जातीतील स्त्री-पुरुष चारित्रयहीन असतात, ज्या जातीतील लोकात कर्जबुडवेपणा, फसवेगिरी, चो-या, दरोडे, मारामा-या, खुन, अपहरण, बलात्कार इत्यांदी सारखे गुन्हेगारी वर्तन असते. जी जात व्यसनी असते अशी जात उर्वरित जगाकडून मानापानाची हकदार असत नाही व परिणामी अशा जातीचा सामाजिक विकासाचा विकास होताना आढळत नाही.
आता राहिला प्रश्न राजकीय विकासाचा, तर वरीलप्रमाणे विकासाचे मापदंड पूर्ण करणा-या जातीचा राजकीय विकास आपोआपच होतो. राजकीय पक्षांना व पुढा-यांना अशाच वर्गाची गरज असते. मग निवडूकांमध्ये संधी मिळवून व विजयी होवून विविध स्तरांवरील सभागृहांमध्ये त्या जातीचा आवाज पोहोचतो. मग आपल्या जातीने अथवा आपल्या समाजाने वरील मापदंड पूर्ण केले आहेत का? तर उत्तर आहे “पूर्णपणे नाही.” ज्यांनी पूर्ण केले ते प्रगत आहेत व ज्यांनी पूर्ण नाही केले ते अप्रगत आहेत.
      आपण कलाकार मंडळी आहोत आणि कलेचा विकास हा गोंधळी जातीच्या विकासाचा महत्वाचा मापदंड आहे मात्र तो विषय विसस्तृत व महत्वाचा असल्याने त्यावर सखोल चर्चा व्हावी असे वाटते. आता आपण असे म्हणाल हे काय आम्हाला माहित नाही काय? विकसीत समाज कशाला म्हणतात याची आम्हाला कल्पना नाही का? मित्रांनो इथेच खरी ग्यानबाची मेख आहे. कळतंय पण वळतं नाही अशी अवस्था आहे. मग माझ्यासारख्या एखादया समाजाविषयी तळमळ असणा-या व्यक्तीने एवढा काथ्याकुट करुन वा शब्दांचे गुराळ करुन काय फायदा? हे सर्व होणार कसे?
      मित्रांनो कोणत्याही देशातील अथवा राज्यातील देशाचा विकास करणे अथवा विकासास चालना देणे हे त्या त्या देशाच्या केंद्र व राज्यशासनाचे काम असते. आपल्या देशाच्या स्वातंत्रयांपासूनच आपल्या सारख्या अप्रगत जातींचा विकास व्हावा यासाठी सरकारे प्रयत्न करत आहेत. पण मला वाटते सरकारचा मुख्य हेतू अश्या अप्रगत जातींना मुख्य प्रवाहात आणणे ऐवढाच असतो. शासनाचा हा हेतु तत्वता पूर्ण झाला आहे असे मान्य केले तरी शंकेलाही वाव आहे. सरकार आपला विकास करु ईच्छित नसेल अथवा करु शकत नसेल तर अशा वेळी जातीने पुढाकार घ्यायला हवा. आता हेच पाहाणा दुष्काळ निवारणासाठी सरकार प्रयत्ना करुन थकले पण समस्या जैसे थेच आहेत. म्हणून “नाम” सारख्या सेवाभावी विविध संघटनांना पुढाकार घ्यावा लागला. अनेक लोक व लोकांचे गट पुढे आले. आपले ही तसेच आहे. विकासाच्या किमान पातळीपर्यंत आज आपण आहोत. काही आजार आहेतही पण अशा रुग्णांना डॉक्टरांकडे घेवून जाणे अथवा त्यांच्याकडे डॉक्टरांना घेवून येणे हे काम समाजविकासाची तळमळ असणा-या कार्यकत्यांनी करावे लागेल.
      तर आता आव्हान हे आहे की, गोंधळी जातीचा किमान विकास झाला आहे. विकसनशील जात म्हणायला हरकत नाही पण विकसित जात नाही आणि विकसित बनण्यासाठी काय करायला हवे? आपण विकसित जातीचे मापदंडही पाहिले आहेत. आता वस्तुस्थिती व अपेक्षितस्थितीची कल्पना आल्यानंतर स्वत:ला विकसित जात म्हणवून घेण्यासाठी वरील निकष पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी मला वाटते शैक्षणिक व आर्थिक सुधारांसाठीचे प्रयत्न एकाचवेळी (Simultaneously) करण्याची आवश्यकता आहे. कारण शैक्षणिक व आर्थिक विकास हे परस्परपुरक असतात. शैक्षणिक प्रगती असेल तर आर्थिक प्रगती होते आणि बरेचदा असेही पाहण्यास मिळते की, शिक्षण घेण्यातील महत्वाची अडचण आर्थिक स्थिती सबळ नसणे हीही असते. गरीबीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे  दोन्ही प्रश्नांची उत्तरे सोबतच शोधावी लागतील. आणि आता सुरु होतो तो महत्वाचा विषय की, कसे? हे कसे करता येईल? कारण कल्पना अनेक आहेत व अनेकांकडे आहेत पण जोवर कल्पनांना प्रत्यक्षात उतरवले जाणार नाही तोपर्यंत हा प्रपंच अनाठायीच !  (क्रमश:)
शब्दांकन: बालासाहेब सिताराम (बी. एस.) धुमाळ
मो. 9421863725  


         s

Wednesday, 16 March 2016

पर्यटन स्थळे संवर्धन

मित्रांनो नमस्कार ......
आपला देश एक समृद्ध वारसा व प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला देश आहे.  तितकाच वैभवशाली इतिहास या मराठी मातीचाही आहे. साधुसंतांची व शुरविरांची ही पवित्र भुमी आहे.  याची साक्ष आजही विविध मंदीरे, मशिदी, विहारे,  मनोरे, स्तंभ,  गड- किल्ले , भुयारे, लेण्या, बोगदे देत आहेत. अप्रतिम कलाकुसरीचे नमुने पहात असताना त्यांची निर्मिती एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत व प्रतिकुल ठिकाणी एवढ्या प्राचीन काळी कशी केली असेल? ? या विचाराने खरा कलाप्रेमी चकरावून गेल्याशिवाय रहात नाही.
कोणत्याही प्रगत आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय अशी निर्मिती केलीच कशी असेल? ?? हा विचार जितका वेड लावणारा आहे त्याहुनही अधिक, अभिमानाने छाती रूंद करणारा आहे.
अशा ठिकाणांचे सौंदर्य टिकवणे व पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे.  पण आपण अनावधानाणे, अज्ञानातुन तर काहीजण मुद्दाम अशा ठिकाणी बेजबाबदार व चुकीचे वर्तन करतात.
कृपया असे करू नका आणि होताना पाहूही नका.
"ऐतिहासिक वास्तूंवर नाव कोरल्याने, आपली नोंद इतिहासात होत नाही."

काल बंड गार्डन,  येरवडा, पुणे येथे माझ्या लेकरांना फिरायला घेऊन गेलो होतो. तेथे  मुळा-मुठा नदीवर कॅप्टन राॅबर्ट लेलेन ने  सन 1867 मध्ये बांधलेल्या पुलाचे पादचा-यांसाठी महानगरपालिका सुशोभिकरण करत आहे.  त्या ठिकाणी एका पाथरवटाशी चर्चा केली व  मेहनत कशी असते???  हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. एका दगडाचे दोन तुकडे  करण्यासाठी छन्नी हातोड्याने भर उन्हात एक तास लागतो! !!  व असे असंख्य दगड लागतात! !! बाकी नक्षीकाम तर वेगळेच!! रणरणते ऊन व वाहणा-या घामाच्या धारा यावरून अशा वास्तुंची निर्मिती करणे किती कठीण असते याचा अनुभव आला. पण आपण मात्र हे तितकेसे गांभिर्याने घेतो का? ?
विचार करा कृपया.

Balasaheb Sitaram  (B.S.) Dhumal.

Tuesday, 15 March 2016

नारी स्वर्ग का द्वार है

नारी स्वर्गका द्वार है ......

नारी स्वर्ग का द्वार है
हर पुरूष का हथियार है|
कोमलता में फुल है
ठाने तो अंगार है |

सभी क्षेत्र में प्रगती पथपर
आदिमकालसे आदिशक्ती है |
नम्रता और प्यारकी मुरत
सगुण भाव से भक्ती है |

सुंदर है तु चांदसी शितल
क्रोध तेरा तपता सुरज है |
 सुख-दूख में दृढ रहे तु
पहचान तेरी धिरज है |


माता, बहना, सखी, अर्धांगिनी
सभी रूपोंमें नैश्वर है|
धरतीपर स्वर्ग बनाये
सच्चे अर्थसे ईश्वर है |


दया क्षमा का सागर है तू
माया ममता का दर्या है |
ममता वात्सल्य की घनी छांव तू
पतीकी पथदर्शक भार्या है |


चपलता में हिरनी है तू
शुरता में शेरनी है |
परिवारको प्यारसे बांधे
संकटमें यम हारिनी है|


गुंगेकी जूबान अंधेकी रोशनी है तू
बहरे के कान निर्बल की ताकत है |
मेरा तुझसे ना है कोई मुकाबला
तुझसे ही मेरी आज औकात है |



सलाम नारी शक्तीला.....
बालासाहेब (बी. एस.) धुमाळ.

गोंधळी समाज व शिक्षण

अलिकडच्या काळात गोंधळी समाजाच्या सध्यस्थीतीचे अवलोकन करणाऱ्या माझ्यासारख्याला समाजामध्ये स्थितीबदलाचे वारे वाहत असल्याने अतिशय आनंद होत आहे.  तरूण बांधवांनी घेतलेला पुढाकार अनुभवी नेते मंडळींनाही मागे टाकत आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संघटन कौशल्याचा जोरावर युवापिढीने ब-यापैकी गती पकडली आहे.
पण नेत्यांची संख्या ज्या समाजात जास्त असते त्या समाजाच्या प्रगतीची शक्यता तशी कमीच असते. संघटनात्मक कार्यात साखळी फार महत्वाची असते. या साखळीत तरूण, अनुभवी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बुद्धीवादी लोकांची फार आवश्यकता असते आणि मग अशा सुसज्ज समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही.
गोंधळी समाजाच्या समस्या व त्यावरील उपाय हा अनेक वर्षांपासून न  सुटलेला प्रश्न आहे. मात्र राजकीय व सामाजिक स्थिती जैसेथेच आहे.  आर्थिक स्थिती सुधारली पण तीचे सार्वत्रिकीकरण झाले नाही.  पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या लक्षात एक गोष्ट सहज येते की ज्यांची स्थिती सुधारली आहे ती बहुधा त्यांनी  शिक्षणाचा मार्ग धरल्याने.
मित्रांनो गोंधळी समाजाच्या अनेक समस्या आहेत . पण सर्व समस्यांचे मुळ शिक्षणाच्या अभावात आहे.मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची गरज ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी असते. आपल्या जातीत शिक्षणाचा अभाव आहे, अनेकांनी तर शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. मुलींपेक्षा मुलांची स्थिती फारच  चिंताजनक आहे. याचे कारण लहान वयातच अर्थार्जनाची येऊन पडलेली जिम्मेदारी! बरे जे काही कमी लोक शिकतात त्यातील फार कमी उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडतात.  नोकरीमध्ये सर्वांना यावे वाटते, पण अभ्यास करण्याची आवड, पद्धत,  नियोजन माहीत नसते.
संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सर्व  शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती, दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये आणि क्षमता शिक्षण पुर्ण करते.
मग कलेतील प्रयोग करता येतात,  प्रसिद्धी मिळवता येते,  लेखन करता येते, न्याय मागता येतो.  शिक्षित संघटीत होतात व संघर्ष करतात.
मग आपोआप कौटूंबिक, आर्थिक,  सामाजिक, राजकीय प्रश्न मार्गी लागतात.  त्यासाठी सर्व गोंधळी भावाबहीनींनी शिक्षणाची कास धरायला हवी.  यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्थिती सुधारून दाखवलेल्या मंडळींचे कौतूक केले जावे व त्यांनी समाजातील विध्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन करून दिशादर्शन करावे.  जगदंबेच्या कृपेने आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर थोडा वाटा संघर्ष करणाऱ्या युवक युवतींना मदत करून खर्च करावा .
विविध दृष्टीनेते प्रगत लोक त्यांच्या प्रगतीचा मुलमंत्र देतीलच असे नाही. पण तो मुलमंत्र म्हणजे  "शिक्षण" हे समजल्यावरही जे समस्यांमधुन वाट काढत काही करू शकत नाहीत ते  इतरांना व शासनाला दोष देण्यात वेळ दवडतात. विविध मेळावे,  मोर्चे,  अधिवेशने जरी आवश्यक असले तरी कधी कधी हाही विचार व्हावा की  आजवर या सर्वाचा काय परिणाम झाला?  मागण्या करून करून मागायचीच सवय लागते. मागीतल्याशिवाय काही मिळत नाही हे जरी सत्य असले तरी शासन कोणालाही देत नाही.  जे संख्येने मोठे व एकसंघ असतात त्यांचाच  विचार केला जातो.
मागण्या अनेक आहेत, पण पुर्ण होत नाहीत,  होणारही नाहीत कदाचित .  जिथे भटक्या विमुक्त जाती जमाती या मोठ्या वर्गाच्या होत नाहीत तिथे फक्त गोंधळी जातीच्या काय होणार? ???
महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती जमातींना स्वतंत्र आरक्षण कोठा असला तरी अ, ब, क आणि ड आरक्षण  टक्केवारी पाहील्यावर अन्याय स्पष्ट दिसतो.
पण होते काय की, अशाच  प्रश्नांवर ब-याचदा लोकांना भुलथापा दिल्या जातात आणि लोक बळी पडतात.  त्यामुळे आपणच शहाणे व्हावे,  शिक्षणाची कास धरावी व संघटीत संघर्ष करून स्थिती बदलून दाखवावी.  संघटीत होण्याला पर्याय नाही. सध्या समन्वयाचे वारे जोराने वाहत आहे. समन्वय व्हायलाच हवा.  माणुस संघटीत असेल तर स्वतःला सुरक्षित समजतो.  एकमेकांच्या कल्पनांचे आदान प्रदान होते. माणुस हा समाजशिल प्राणी आहे. सुख दुखाःचे व्यवस्थापन समाजाशिवाय होत नाही.  पण काही तरी फायदा होणार आहे,  आम्ही तो करवून देऊ असे म्हणुन लोकांना आशेला लावण्याचा प्रकार घडतो. जी काही सुधारणा होते ती वैयक्तिक पातळीवर संघर्ष करणारांचीच होते.
मग आपण म्हणाल संघटना असुच नयेत का?  संघटनात्मक उपक्रमांची आवश्यकताच नाही का?? ? तर निशंकपणे 'आहे'. पण संघटनात्मक कार्याची दिशा थोडी बदलली जाणे आवश्यक आहे.  काय करता येईल ते माझ्या बुद्धीप्रमाणे क्रमशः व्यक्त करील.



शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ 🙏

बाळासाहेब जालिंदर जाधव

"बाळासाहेब जालिंदर जाधव" अत्यंत गरिब,  ग्रामीण, भटक्या जामातीमधील गोंधळी जामातीमध्ये पारगाव मोटे ता. भूम जि. उस्मानाबाद येथे जन्मलेले.
वडील, सरदार जालिंदर रामा जाधव सुप्रसिद्ध गोंधळी कलावंत होते पण आपल्या सहा अपत्यांचे पोट कसेबसे भरेल एवढेच उतपन्न कलेतून मिळे. रात्री पारंपारिक गोंधळाबरोबरच दिवसा भिक्षा मागावी लागे.  त्यासाठी मुलांना सोबत नेत.  शाळेत हजेरी पटावर नाव होते एवढाच मुले  'शिकत आहेत'  याचा अर्थ !!!  वास्तविक पाहता वर्षांतील किमान तीन चार महीणेही त्यांना शिक्षण घेता यायचे नाही. अथवा सलग आठवडाभर  शाळेत जाता यायचे नाही.  रात्रभर जागरण करून सकाळी अनेक मैल पायी चालून परिक्षा गाठायची व कसबसे पास होऊन वर्ग बदलायचा. जरी शिक्षणाची आवड होती व बुद्धीही होती,  तरी शैक्षणिक वातावरणाचा आणि वेळेचा अभाव यामुळे दहावीला अनुत्तीर्ण व्हावे लागले.  मात्र खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करून पुरवणी परीक्षा देऊन उतीर्ण झाले.  ताबडतोब कमाई सुरू व्हावी व कुटूंबाला आपला आधार मिळावा म्हणून, आय. टी. आय.  चा वेल्डरचा कोर्स केला व औरंगाबाद येथे बजाज कंपनीत रूजू झाले. मात्र तुटपुंजा पगार व काहीतरी करून दाखविण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हते. 1990 च्या दरम्यान औरंगाबाद कारागृह विभागात तुरूंग रक्षक भरती निघाली. काम करत करत भरतीत उतरून प्रचंड मेहनत घेऊन भरती झाले. कसून सराव करून प्रशिक्षण पुर्ण केले व सेवेत रूजू झाले.
कारागृह रक्षक म्हणून कारागृह सेवेत रुजू झाल्यानंतर पुढे सेवांतर्गत शिक्षण घेत पदवीधर झाले! !!
अभ्यास करून खात्यांतर्गत परिक्षा देऊन तुरूंगाधिकारी झाले! !! अनेक वेळा कबड्डी,  व्हाॅलीबाॅल संघाचे कर्णधार म्हणून आपल्या विभागाच्या संघाचे नेतृत्व केले व संघाला एकतर्फी विजय मिळवून दिले. 2002 मध्ये चेन्नई तामिळनाडू येथे,  2007 मध्ये अहमदाबाद गुजरात येथे, 2010 मध्ये ओरीसा मध्ये, 2012 हैद्राबाद आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी स्पर्धा व कर्तव्य मेळावा या  राष्ट्रीय स्पर्धेत खेळल्यानंतर आता आज पुन्हा 2016 च्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी क्रिडा स्पर्धा व कर्तव्य मेळाव्यासाठी  तब्बल पाचव्यांदा हैद्राबाद,  तेलंगणा या ठिकाणी वयाच्या  पंन्नासाव्या वर्षी महाराष्ट्र व्हाॅलीबाॅल संघाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या संघासोबत रवाना होत आहेत. 2007 सालच्या अहमदाबाद गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे सध्याचे  पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी गौरव केला! !!
बाळासाहेब जाधव केवळ तुरूंगाधिकारी नाहीत तर एक उत्कृष्ट खेळाडू व एक उत्कृष्ट संबळवादकही आहेत.  पारंपारिक गोंधळी कलेबरोबरच भजनातही त्यांना विशेष रूची आहे.अत्यंत गोड स्वभावाचे बाळासाहेब जाधव तितकेच चारित्र्यसंपन्नही आहेत. शासकीय अथवा कलेच्या  व्यासपिठावरून ते नहमी निर्व्यसनी राहण्यासाठी तरूणांना प्रेरित करतात. एक निर्व्यसनी, तंदुरूस्त, कला क्रिडागूण संपन्न व नम्र पण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महाराष्ट्र कारागृह प्रशासनामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अजमल कसाब सारखा कुप्रसिद्ध दहशतवादी हाताळण्यासाठी प्रशासनाने त्यांची विशेष निवड केली होती.  तुरूंगाधिकारी असले तरी प्रसंगी कारागृह अधिक्षकाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. वेळ प्रसंगी कारागृहातील औषधोपचार विभाग असा सांभाळतात की पाहणा-याला वाटावे हे डाॅक्टरच आहेत!  सेवापुर्व शिक्षण कमी होते तरी सेवांतर्गत शिक्षण घेऊन इंग्रजी,  संगणक,  सोशल मिडिया अशांसारख्या आवश्यक बाबींचे त्यांनी ज्ञान संपादन केले. जे येत नाही ते शिकण्याची त्यांची धडपड तरूणांनाही अचंबित करते.  शिक्षणाचे महत्व जाणणा-या बाळासाहेब जाधवांनी आपल्या तिन्ही मुलांना इंजिनिअर बनवले. मित्रांमध्ये बाळासाहेब म्हणुन ओळखले जाणारे साहेब समाजात आदराने "आण्णा" या टोपण नावानेही ओळखले जातात. आपल्या यशाचे श्रेय ते आपले वडील दिवंगत जालिंदर रामा जाधव व आपले वडीलबंधू  संभाजी जाधव यांना देतात. अशा या  हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचे कौतुक करायला मला गर्व वाटतो.  अशांचा आदर्श तरूण पिढीने घेतला तर आपला गोंधळी समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचल्या शिवाय राहणार नाही. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 💐💐

शब्दांकन: बालासाहेब सिताराम (बी. एस.) धुमाळ 🙏

Thursday, 31 December 2015

धन्यवाद 2015 सुस्वागतम 2016

नमस्कार मित्रांनो 🙏
मी आपला मित्र बी. एस. धुमाळ सरत्या वर्षाला सीऑफ व नव्या वर्षाला हाय हॅलो वेलकम करताना नेहमी प्रमाणे अकारण अशांत आहे. नित्यनेमाने नवा दिवस उजाडत असताना दिवसामागून दिवस ढळतही आहेत. नव्या सकाळचे स्वागत करत असताना  आयुष्याच्या कोठ्यातील किती दिवस संपले? ? याचे अनामिक दुःख प्रत्येकालाच वाटत असते. मी म्हणेन दुःख करू नये पण याची जाणीव असावी की किती संपले व साधारणपणे किती शिल्लक आहेत. हा हिशेब असला म्हणजे स्वप्नांची गोळाबेरीज करता येईल. शेवटी स्वप्ने ती स्वप्नेच! ती सर्वच पुर्ण कधीच होत नाहीत पण त्यांच्या शिवाय जीवनात मजा नाही.  जीवनातून स्वप्ने वजा केली की उरते ती केवळ झोप!
शुभेच्छा दिल्याने चांगला व न दिल्याने वाईट दिवस उगवत नाही. प्रत्येकाला आपल्या कामाचे फळ मिळत असते.
पण आपल्या चांगल्या दिवसांची अपेक्षा करणारे व त्यासाठी शुभेच्छा देणारे कोणी असेल तर बळ वाढते व जोमाने प्रयत्न वाढतात.  त्यासाठी हा शुभेच्छा प्रपंच असतो. पण हे ही लक्षात घ्यायला हवे की मागील वर्षीही शुभेच्छा दिल्याच होत्या ना कोणीतरी? ?? मग सर्व चांगलेच झाले का? ? तर नक्कीच नाही!  पण उदास व्हायचे नाही , मानले तर सुख असते.  शेवटी दुःखासोबत माणसाचे निरंतर नाते असते. सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे.  अर्थात ते असावे देखील कारण अंधारच नसेल तर प्रकाश किरणांचे मोल तरी कसे उमजेल?  पण सुफळ पदरी पडावे यासाठी सुमार्ग, सुसंगती व सदाचरणासह अखंड कष्ट आवश्यक असते.
नवीन वर्षाचे स्वागत करत असताना सरत्या वर्षांतील चांगले व वाईट दोन्हीही अनुभव कामी येणार आहेत.  चांगल्यातून आत्मविश्वास आणि प्रेरणा व वाईटातून धडा घेतला तर नवीन वर्ष नक्की आनंदाचे व  सुखासमाधानाचे जाईल. अनेक प्रियजन आपल्यातून गेले. कोणाच्या जाण्याने जरी जीवन थांबत वा संपत नसले तरी त्यांची कमतरता मात्र प्रकर्षाने जाणवत असते. हे मन असल्याचे लक्षण  सर्वात दिसायला हवे. गेलेल्यांच्या पवित्र स्मृती स्मरणात ठेवून त्यांना आदर्श मानून  जीवन प्रवास करत राहणे हेच शहाण्याचे लक्षण. .
शेवटी माझ्या सर्व भावकियांना, पाहूण्यांना, सहका-यांना, शेजा-यांना,  मित्रांना, शत्रूंना, सर्व परिचितांना व अपरिचितांना हे नवे वर्ष चांगले जावो. चांगले म्हणजे,  जेथे आरोग्य, स्वच्छता, शांतता, आपलेपणा, प्रेम, माया, दया, करूणा, मोठेपणा, क्षमा , नैतिकता, प्रमाणिकता आहे असे. प्रगती, प्रतिष्ठा,  समाधान, आनंद आहे असे वर्ष आपणास जावो ही प्रार्थना. पण....
समजा नसेलच जाणार तर?? तर येणाऱ्या सर्व संकटांशी दोन हात करण्याचे सामर्थ्य आपणात येवो हीच आदिशक्तीकडे प्रार्थना. खरेतर प्रत्येक क्षण हा नवा अनुभव देत असतो व अनुभवातून माणुस तावून सुलाखून एखाद्या धारदार व टोकदार शस्त्राप्रमाणे तयार होत असतो. हेच अनुभव पुढे जीवन समृद्ध संपन्न व यशस्वी बनविण्यात मदतगार सिद्ध होत असतात.
नव्या वर्षात आपला समाज, धर्म, देश प्रगत व संपन्न बनो. त्यासाठी माझे तुमचे योगदान लाभो. शेवटी "देह मंदिर चित्त मंदिर,  एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना,  सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.
नुतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Monday, 21 December 2015

बाजीराव मस्तानी

"मशहुर मेरे इश्क की कहानी हो गई ।
कहते है मै दिवानी मस्तानी हो गई ।"

वा काय गीत आहे 👌
बाजीराव पेशवे व त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांची न्याय न मिळालेली प्रेम कथा .
 सातारच्या शाहु महाराजांच्या ऋणात राहून मराठेशाहीला अर्ध्या हिंदुस्तानात पोचवणारा, मस्तानीच्या कृष्णाचं नामकरण नाकारणा-या ब्राह्मणांच्या विरोधात बंड पुकारून पेशव्यांच्या वंशजाचं नाव समशेर बहाद्दुर ठेवणारा, जाती धर्माच्या, कर्मकांडाच्या प्रथांना लाथ मारणारा, 40 लढाया लढून अपराजीत राहिलेला बाजीराव शेवटी आप्तस्वकियांकडून मात्र हरला..
मस्तानी... स्त्री कशी असावी तर मस्तानी सारखी... बापावर संकट आलं म्हणून रणांगणात उतरणारी, आई मुस्लिम म्हणून नमाज पढणारी, बाप राजपूत म्हणून कृष्णभक्तीत लीन राहणारी, प्रेम मिळवण्यासाठी बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीत राहून बाजीरावाची वाट पाहणारी, रखेल म्हणून समाजानं हिनवलं तरी प्रेमापोटी तो अपमान गिळून प्रेम देणारी, ज्या पेशव्यांनी हाल हाल करून प्राण घेतले, त्यांच्याच रक्षणासाठी आपला मुलगा समशेर बहाद्दुरला लढायला सांगणारी, विरांगणा, नृत्यांगणा, स्वर्गसुंदरी आणि एक आदर्श पत्नी, पतीच्या विरहात प्राण त्यागणारी.. "मस्तानी" इतिहासात उपेक्षीतच राहिली...
काशी....... नव-याचं दुस-या स्त्रीवर प्रेम आहे. हे माहित असतानाही कर्तव्यं निभावणारी, सवतीची मंगळागौरीला ओटी भरणारी.. बाजीरावांसाठी मस्तानीची बंदिवासातून सुटका करावी यासाठी प्रयत्न करणारी... एक आदर्श पत्नी काशीबाई...
      भंसाळींनी  मांडलेला इतिहास रंगवलेला आहे  पण, घटना सत्य आहे...
शेवटी तो सिनेमा आहे,  तो पहावा वाटला पाहिजे ना ? सवत असली तरी काशीबाई मस्तानीची खणा नारळानं ओटी भरते, कुंकु लावते..  ही आदर्शवत मराठी संस्कृती भंसाळीनं जगाच्या कानाकोप-यात पोचवली...कट्टर ब्रम्वृदांनी व सत्तालालसी कुटूंबियांनी बाजीरावांना संपवले.. आणि मस्तानीचे हाल हाल केले. बाजीरावांनी पेशव्यांना वैभव प्राप्त करून दिलं.. मस्तानीला हाल हाल करून मारलं तिच्याच मुलानं समशेर बहाद्दुरनं शेवटच्या श्वासापर्यंत मराठा साम्राज्याचं रक्षण केलं.. वयाच्या  27 व्या वर्षीच वीरमरण आले त्याला.
सिनेमात रणवीरचं कौतुक करावसं वाटतं अन दिपिकाबद्दल बोलायला शब्दच नाहीत. .. मस्तानी हिच्यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.. शेवटी काशीबाईला न्याय मिळवून देणा-या प्रियंकाचे विशेष कौतुक.... भव्य सेट, मराठी थाटबाट, उत्तम दिग्दर्शन करून.. सुश्राव्य संगीताची धुरा सांभाळणा-या संजय लिला भंसाली यांचे विशेष अभिनंदन,..
नक्की पाहा🙏 खरंच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने आवर्जून पहायला हवा असा सिनेमा आहे. संजय लीला भंसाळी हे का ग्रेट आहेत त्याचा पुन्हा प्रत्यय येतो. दीपिका पादुकोण,  प्रियंका चोपड़ा अन रणवीर यांनी खरच सुरेख अभिनय केला आहे. गीत, संगीत, नृत्य, दृश्ये अप्रतिम आहेत.


बालासाहेब धुमाळ,  बीड /पुणे.

हे बंध रेशमाचे

हे बंध रेशमाचे 🌹🌹🌹🌹

हे बंध रेशमाचे
जन्मोजन्मी जुळो.
सोनियाच्या चांदण्यांनी
जीवन अवघे उजळो.

दुःख-दारिद्र्य प्रेमाच्या
ज्योतीसवे जळो.
सहजीवनाचा अर्थ सकला
तुमच्यामुळे कळो.

प्रित राघु-मैनेची
अवघे विश्व पाहो.
पुष्पवृष्टी स्वर्गामधुनी
सदैव बरसत राहो.

पावित्र्य या नात्याचे
जपले तुम्ही आहो.
दिव्यजल मांगल्याचे
अंगणी आपल्या वाहो.

साथ दिवा-वाती सम
अशीच देत रहा.
नौका पैलतीरी संसाराची
अशीच नेत रहा.

लाभो अखंड सहचर्य
अवकाशापरी अनंत.
आयुष्य उभयतांना
उदंड देवो भगवंत.

भाऊ-वहीणी लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏
ब-याच दिवसांनंतर प्रयत्न केलाय भावना शब्दबद्ध करण्याचा तेव्हा 😃🙏
आपला बालाजी 🙏

तळीभंडार

तळीभंडार
हा कुलाचारातील
प्रमुख भाग आहे.....
ज्या घरात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले
जातात त्या प्रत्येक घरामध्ये तळी भंडार हमखास
होतोच....
प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला घरातील देवासमोर
तळीभंडार करण्याची प्रथा असते तर काही घरांमध्ये
विजयादशमी ( दसरा ) व
चंपाषष्ठी यादिवशी हा विधी होत असतो.
तळी भंडारा विषयी सांगितले जाते मणीसूर व
मल्लासूर दैत्यांचा संहार केल्यानंतर
ऋषीमुनींना जो आनंद झाला त्या आनंदात
मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच
तळी भंडार हे प्रतिक आहे.जेजुरी मंदिरामध्ये
भंडारगृह,बारद्वारीमध्ये किंवा पितळी कासवावर
तळी भंडाराचा विधी केला जातो घरातील देवासमोर
केला जाणारा विधी व मंदिरामध्ये
केला जाणारा विधी यामध्ये थोडा फरक आहे
देवापाशी आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देवून
देवापाशी आनंद मागितला जातो.
खोब-याचे तुकडे व भंडार उधळला जातो.खोब-याचे तुकडे
उधळण्यामागे अनेक कारणे आहेत जसे आपला वंश खोब-
याच्या कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार
असा वाढत जावा तर दुसरे असे
की पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारा बरोबर
उधळल्या जात असत परंतु कालौघात मोहरा शक्य
नाही म्हणून खोबरे उधळले जाते
सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने
केलेला विधी महत्वाचा अंतःकरणापासून दिलेली हाक
देवाला पोहोचते
घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी
ताम्हणामध्ये विड्याची ( नागिणीची ) पाने,
सुपारी , खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन
तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष
मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात
ताम्हण उचलले जाते तदनंतर पानाचा विडा ठेवून
(काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी,रुमाल
अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले
जाते.एक विडा देवासमोर
मांडला जातो तळी उचलणा-या प्रत्येकापुढे एक एक
विडा ठेवला जातो देवाला भंडार वाहून
प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्यानंतर
पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण
उचलले जाते.सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले
जाते.

------- तळीभंडार ---------
हरहर महादेव........ चिंतामणी मोरया ............
आनंदीचा उदे उदे ......भैरोबाचा चांगभले .....
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ........
येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......
अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका .........भांडाराचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
येळकोट येळकोट जयमल्हार........

संकलन : बी. एस. धुमाळ 🙏

खंडोबा

🌷खंडोबा🌷

खंडोबा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा,बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते.“

🌰नावे🌰
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसर्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी
), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.”

🌰दैवत🌰
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले  असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरिल सर्वाधिक महत्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात असल्याचा दावा करतो पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मुळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते.

🌰लोककथा 🌰
या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रूद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तीपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटिय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बीदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापा-यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले.[ संदर्भ हवा ] खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रीविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.

  🌸 महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तण्ड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.

🌰कुळाचार🌰
हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.

🌰जागरण गोंधळ🌰
देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
तळी भरण
तळी भरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरूषांद्वारे बेल भंडारा सुपारीने देवतेची ओवाळणी केली जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.

🌰उपासना🌰
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा भरित आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात खंडोबाचे उपासक ब्राह्मणांसारख्या जातीव्यवस्थेतील वरच्या जातीपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातंमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने अनेक नवस केले जातात.

🌰मल्हारी माहात्म्य🌰
संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत.

🌼खंडोबाच्या लग्नकथा🌼
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामु
ळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिस-या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानन्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापा-याच्या घरात जन्मली. खंडोबाच्या स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणा-यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छूक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

🌰दंतकथा🌰

* सावकारी भुंगा: औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने यवतजवळील दौलतमंगल किल्ला काबिज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ल चढविला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले यामुळे असे घडले असे सांगितले आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रूपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात. जेजुरी मंदिराच्या उजव्या दरवाज्याजवळील भुंगे सावकारी भुंगे म्हणून दाखवले जातात.

🌼 भाया भक्ताची साक्ष:
एकदा कडेपठारावर (हे पठार जेजुरी मुख्य मंदिरानजिक आहे) धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंड्ग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंड्गाची प्रार्थना सुरू केली. वडिलधा-यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंड्ग फेकून दिले तेव्हा लिंड्गाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडिलधारे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कु-हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कु-हाड रूतली आणि त्यातून रक्तदूधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरिल कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती. (सन १७५०)

🌰उत्सव/यात्रा🌰

🌼जेजुरी:
वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधीपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्राउत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो.डफ, मर्फा,सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.
सोमवती अमावस्येस (सोमवारी येणा-या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. नंतर त्यांच्या प्रतिमांना कर्हा नदीवर स्नान घातले जाते.

🌼नळदुर्ग
नळदुर्ग येथिल मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नावः पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो.

🌼पाली (सातारा जिल्हा):
पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अतित गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो
खंडोबाची खालील स्थाने आहेत.

*जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)

* पाली (सातारा जिल्हा)

* काळज ((ता. फलटण)(सातारा जिल्हा)

* पिंपळगाव निपाणी ता. निफाड जि. नाशिक

* मंगसुळी (बेळगाव जिल्हा)

* देवरगुड्डा (राणीबेन्नूर)

* मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)

* मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)

* आदी मैलार (बीदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)

* अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)

* माळेगाव (नांदेड जिल्हा)

* सातारे (औरंगाबाद जिल्हा)

* शेगुड (अहमदनगर जिल्हा)

* निमगाव दावडी (पुणे जिल्हा).

Monday, 26 October 2015

मित्रांनो नमस्कार 🙏
मी बी. एस. धुमाळ शिक्षक जि . प. पुणे
मी खालील बाबी whatsapp वर वाचल्या आणि खुप प्रभावित झालो.  जर आपण असे वागलो तर आपण एक यशस्वी व्यक्ती म्हणून नक्कीच ओळखले जावू. मी या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, करत आहे व करत राहीन.  या संदेशाचे पालन करण्यात मी  किमान  75% यशस्वी झालो आहे असे मला वाटते.  आपण ही टक्केवारी वाढवाल अशी आशा करतो.

१) तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचयं, काय व्हायचयं, कुठे पोहचायचय, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी..ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे !!
4) विज्ञानाची कास धरा,  श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही
6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.
7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.
9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
१. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
२. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
३. हे असच का ?
या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
*वैयक्तिक जीवनात कसे वागावे ??
१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. महामानव, आईवडील इत्यादी
५) नाष्टा, जेवण घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .
१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.
११) फायद्या पुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत
१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर ,अभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१५) टी.व्ही. व चिञपटात चांगले ते पहावे.
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.
अपयश टाळा. यश स्विकारा. विचार करा...
"ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा ञास वाटत नाही "- ध्येयसिध्दी
पटले तर कृती करा. ..
आणि दररोज स्वतःला सांगा की
"मी माझे ध्येय साध्य करणारचं!"
🙏🙏🙏