Sunday, 22 April 2018

बलात्कारः एक अमानवी कृत्य

बलात्कारः एक अमानवी कृत्य

मित्रांनो अलिकडच्या काळात मुली महीलांवरील वाढते बलात्कार व हत्या यामुळे अवघा देश ढवळून निघाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाची नाचक्की होत आहे. आदर्श संस्कृती व संम्रुद्ध परंपरा लाभलेल्या या देशात स्त्रीयांना अत्यंत पवित्र नजरेने पाहीले जात आले आहे. मात्र आता कठुआ, उन्नाव, इंदोर येथील बलात्कार प्रकरणानंतर असे वाटायला लागले आहे की देशातील मानवता संपुष्टात आली आहे की काय? कारण बलात्कार अगदी कोवळ्या जिवांवरही होत आहेत व वृद्धांवरही!! तसेच ते अगदी किशोरवयीन शाळकरी मुलांकडुनही होत आहेत, तरुणांकडूनही होत आहेत व वृद्धांकडुनही!! आडाणी असोत अथवा सुशिक्षित कोणीच अपवाद नाहीत. तसेच ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात हा घानेरडा व चिड निर्माण करणारा प्रकार घडताना दिसत आहे. असे प्रकार अलिकडे जवळजवळ दररोज घडत आहेत. काही उघड होतात तर काही उघड होत नाहीत. तपास यंत्रणांनी यांच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा करायला हवी व यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सर्व स्तरातून आवाज उठत आहेत.
आपल्या देशात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. शिक्षेची भीती वाटेनाशी झाली आहे. कारण शिक्षा कठोर नाहीत. गुन्हेगाराला एखाद्या न्यायालयाने एकदा शिक्षा सुनावली की तिची अमलबजावणी होत नाही. त्याला वरच्या न्यायालयात बाजू मांडण्याची संधी उपलब्ध आहे. यामुळे यातच बराच वेळ जातो. मला वाटते जो काही कसुन तपास व सत्यता पडताळणी करायची आहे ती खालच्या स्तरावरच व्हावी. यामुळे कायदा एक खेळणे बनुन जातो. मुळात तर आपल्याकडे न्याय प्रविष्ट प्रकरणे सुनावणीसाठीच लवकर येत नाहीत. त्याची कारणे अनेक आहेत. मी त्यात जात नाही. पण आपल्याकडे गुन्हा सिद्ध व्हायला व प्रत्यक्ष शिक्षा द्यायला प्रचंड उशीर होतो हे सत्य आहे. तपास काळात तो पारदर्शक होत नाही. शिक्षा झाली तरी ती कठोर होत नाही. परिणामी गुन्हेगारांवर वचक राहत नाही. त्यामुळेच अगदी कालच केंद्रीय कॅबिनेटने अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने 'पोक्सो' कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स' कायद्यात बदल झाल्यानंतर आता १२ वर्षाखालील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. सध्या पॉक्सो कायद्यात दोषीला कमीत कमी ७ वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होते. मात्र आता १२ वर्षांखालील मुलीवरील बलात्का-याला  फाशीच दिले जाईल असा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कायदा करून सरकारने बरे केले.
मित्रांनो स्वराज्यात रांझ्याच्या बाबाजी पाटलाने एका स्त्री सोबत गैरवर्तन केल्यावर महाराजांनी त्याचा चौरंग केला होता! (दोन्ही हात व दोन्ही पाय छाटणे) त्याला तर शिक्षा झालीच सोबतच इतरांनाही जरब बसली. आता स्वराज्यातील कायदे व शिक्षापद्धतीचा आदर्श घेऊन सरकारनेही कायद्यात बदल करून बलात्का-यांना अशीच जबर शिक्षा करायला हवी जेणे करून पुन्हा कोणी असे दुष्कृत्य करायला धजावणार नाही. तुम्ही म्हणाल फाशीपेक्षा कोणती मोठी शिक्षा आहे? तर मला वाटत नाही फाशी कठोर शिक्षा आहे. शिक्षा अशी असावी की गुन्हेगार मरुही नये व जगु शकुही नये. आयुष्यभर त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप वाटावा व त्याने स्वतः लोकांना असा गुन्हा तुम्ही करू नका असा उपदेश करावा. इतर लोक जेव्हा त्याच्याकडे पाहतील तेव्हा त्याला पाहाताक्षणीच त्याने काय गुन्हा केला आहे हे त्यांच्या लक्षात यावे व त्यांच्या मनात अशा गुन्ह्यांबाबत भिती निर्माण व्हावी. दुसरे असे की गुन्हा केला आहे की नाही हे शोधायला वर्षोंवर्षे कशाला लागतात? थातुरमातुर कैद व विलंब अशाने गुन्हे कमी होणार नाहीत आणि असेच होत राहीले तर लोक आरोपींना पोलीसात देण्याऐवजी स्वतःच शिक्षा देतील. फैसला on the spot!! परिणामी अराजकता माजेल.
आज समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रत्येकजण अशा घटनांमुळे अस्वस्थ पण हतबल आहे. जेव्हा घटना घडते तेव्हा प्रसार माध्यमातून टिका होते. चर्चा होते. आपण सामाजिक माध्यमातून निषेध नोंदवतो आणि शांत बसतो. मी तर या सर्व प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ आहे. मीच काय आपण सर्वच अस्वस्थ आहोत कारण सर्वांनाच आई, बहीण, बायको, मुलगी, भाची, पुतनी, नात आहे. आपल्या देशात स्त्री चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य देशात बलात्काराकडे एक अपघात म्हणून पाहीले जाते मात्र आपल्याकडे तसे नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे बलात्काराला स्त्रीला जिम्मेदार समजले जाते! तिचे राहणीमान, तिचे स्वातंत्र्य, तिचा स्वाभिमान यामुळेच असे घडले असावे असा तुघलकी तर्क काढला जातो. बलात्कारात महीलेची चुक असण्याचा प्रश्नच कसा काय येऊ शकतो हेच मला कळत नाही? पुरूष आपल्या पाशवी शक्तीचा वापर करून आपली अतिरेकी कामवासना शमविण्यासाठी अत्याचार करतो. हा एक कठोर गुन्हा आहे. यात महीलेचा कसलाही दोष नसतो मात्र तरीही बलात्कारानंतर पिढीतेचे अवघे जिवनच नष्ट होते. जर पिढीता विवाहित असेल तर तिचा संसार उद्ध्वस्त होतो. पतिकडून सासरकडून तिला वाळीत टाकले जाते. तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते. परिणामी बिचारी वाममार्गाला लागते अथवा आत्महत्या करते. हेच अविवाहित मुलीच्या बाबतीत घडले तर तिच्यावर याचा एवढा प्रचंड मानसिक व शारिरीक परिणाम होतो की त्यातून ती सावरतच नाही. तिचा मित्रपरिवार कुटुंबातील सदस्य तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहातात. तिचे लग्न जमत नाही. जरी जमले व झाले तरी कोणीतरी तिला ब्लॅक मेल करुन तिचे पुन्हा पुन्हा शोषण करते. जेव्हा भुतकाळ समोर येतो तेव्हा तिचा सासर कडून छळ होतो व तिला मारुन टाकले जाते अथवा घटस्फोट दिला जातो. बदनामीच्या भितीने व पुढच्या त्रासाच्या भितीने बहुतांश वेळा बलात्कार उजेडातच आणले जात नाहीत. परिणामी गुन्हेगार सोकावतात. बलात्कारामुळे मुली महीलांचे अवघे आयुष्य नष्ट होते. आत्महत्या, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी याकडे वळलेल्या मुली महीला या सर्वसाधारणपणे बलात्काराने पिढीत असतात. याचे कारण म्हणजे समाज! समाज बलात्कारानंतर महिलेकडेच आरोपीच्या नजरेने पाहतो. हे चुकीचे आहे ज्यात स्त्रीचा कसलाही दोष नसतो. ज्यात तिच्यावरच अन्याय होतो. त्यात तिला दोषी कसे काय समजले जाऊ शकते?

मित्रांनो मी जेंव्हा एकांतात विचार करत बसतो तेव्हा मला असे वाटते की ही अशी कृत्ये केवळ वासनांधतेमुळे होत नसावीत. कारण अनेक प्रकरणात अगदी बालके, व्रुद्ध, विकलांग ते त्रुतियपंथी देखील असे कृत्य करताना समोर आले आहेत. हे सगळे पाहुन माझे मन सुन्न होते व यावर कायमस्वरूपी पर्याय काय असु शकतो? या द्रुष्टीने मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला काही उपाय सुचतात जे मी आपल्या समोर मांडतो. पहीले म्हणजे बलात्काराकडे पहाण्याची द्रुष्टी. यात पिढीतेकडे पहाताना निर्दोष द्रुष्टीने पाहीले पाहीजे. तिला समजून घेऊन तिला पुन्हा जिवन जगण्यासाठी उभे केले पाहिजे. तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळवून दिला पाहिजे व तिच्याकडे सन्मानजनक नजरेने पाहीले पाहीजे. ना तिरस्कार ना सहानुभूती दाखवता काही घडलेच नाही या अविर्भावामध्ये की हे कोणाशीही घडू शकते हे समजून घेऊन वागले पाहीजे. दुसरे म्हणजे बलात्कार दडवून नाही ठेवले पाहीजेत आणि बलात्कार झाला म्हणजे स्त्रीच्या द्रुष्टीने आभाळ फाटल्यासारख्या द्रुष्टीने नाही पाहीले पाहिजे. हा एक अपघात होता असे समजुन गुन्हेगाराला सर्वांसमक्ष आणणे व त्याला कायद्याच्या कचाट्यात आणणे याला महत्त्व दिले पाहिजे. यात कुटुंबाने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मुली स्त्रियांना शारिरीक व मानसिक द्रुष्ट्या सशक्त व मजबूत बनविले पाहीजे. संकटसमयी ती स्वतःचा बचाव कसा करु शकेल याचे कुटूंबातुन व शासनाकडून प्रशिक्षण तीला मिळाले पाहिजे. अत्याचार होत असताना अथवा झाल्यावर स्त्रीनेच आरोपीला स्वसंरक्षणार्थ अद्दल घडवावी यासाठी तिला कायद्याने शस्त्र बाळगण्याची परवानगी असावी व चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात यावे. स्वसंरक्षणार्थ तिच्याकडून झालेल्या कृतीला अपराध समजले जाऊ नये. (अर्थात तपासा अंती)

हे झाले महीलांच्या बाबतीत, पुरूषांच्या बाबतीत अशा गुन्ह्याला माफी नसावी. जलद व पारदर्शक तपासणी व तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी.(फाशी कठोर शिक्षा नाही) जेणेकरून असा गुन्हा करायला कोणी धजावणार नाही. शिक्षेची भिती निश्चितपणे गुन्ह्याचे प्रमाण कमी करू शकते मात्र मला वाटते हा प्रकार केवळ शिक्षेने समुळ नष्ट होईल असे अजिबात वाटत नाही. कारण ज्या देशांमध्ये कठोर शिक्षा आहेत उदाहरणार्थ अरब देश, तेथेही गुन्हे घडतातच. त्यामुळे केवळ शिक्षा हा बलात्कार संपविण्यामागील पर्याय ठरू शकत नाही. शालेय शिक्षणात मुल्य शिक्षण व लैंगिक शिक्षण दोन्ही प्रकारचे शिक्षण प्रभावीपणे दिले गेले पाहिजे. कुटुंबात संस्कार केले गेले पाहीजेत. विभक्त कुटुंब पद्धती, पालकांचे व्यस्त जीवनमान, टीव्ही मोबाईलचा अतिरेक व घरातील एकंदरीत उदासीन व असंतुलित वातावरण यामुळे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. मुलाचे कुटूंबात व शाळेत फाजील लाड होता कामा नयेत. घरात धार्मिक व अध्यात्मिक वातावरण ठेवले तर मन प्रसन्न राहुन घाणेरडे विचार मनात येत नाहीत. मित्रांनो अगदी साधु संत व पुरोहीतही चुकीचे वागताना सापडले आहेत. मात्र आपण हे समजुन घ्या की ते खरे साधु संत अथवा पुरोहित नव्हतेच. ते एक व्यावसायिक होते. खरे अध्यात्म विचारांवर व वर्तनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते मग धर्म कोणताही असो. अध्यात्मिक व नैतिक शिक्षण व्यक्तीच्या मनावर निश्चित चांगला परिणाम करते.
अश्लील चित्रे व मजकूर, टिव्ही, मोबाईल व इंटरनेटवरील द्रुष्ये यामुळे पाशवी लैगिक इच्छा प्रबळ होतात. पाँर्नमुळे उत्तेजित होण्याचा प्रकार होतो. त्यावर कायद्याने बंदी घातली गेली पाहीजे. पण दुसरीकडे अगदी ग्रामिण आडाणी लोक, ज्यांचा आणि या बाबींचा कधीही संबंध येत नाही तेही बलात्कारासारखी कृत्ये करताना पकडले जात आहेत. ते ही वयाचा विचार न करता!! असे का होत असावे? तर अशा कृत्यांमागे मनोरुग्नता, अंधश्रद्धा, नशा, धार्मिक द्वेष, वैयक्तिक दुश्मनी अशीही कारणे असु शकतात. याचे कारण मला वाटते पर्यावर्णीय ( ecological), रासायनिक (chemical) व जैविक (genetical) बदल हे असावे. त्यामुळे बलात्का-याला कठोर शासन करणे व बलात्कार होऊ नयेत यासाठी उपाय योजना करणे या दोन्ही पातळ्यांवर कार्य व्हायला हवे. शिक्षेबरोबरच प्रबोधन, उद्बोधन व्हायला हवे.
संशयितांवर  वैद्यकीय (मानसिक व रासायनिक) उपचार व्हायला हवेत. खासकरून ज्यांनी यापुर्वी असे छोटे मोठे गुन्हे (विनयभंग, बळजबरी) केले आहेत त्यांच्यावर. औषधौपचाराने अशांच्या पाशवी इच्छेचे शमन वा दमन करायला हवे. अतिरेकी कामवासना वैद्यकिय इलाजाने नष्ट करायला हवी. यात संशयितांच्या कुटुंबियांनी मागे राहाता कामा नये. लक्षण दिसताच डॉक्टरांना भेटुन उपाय करायला हवेत. जर मनामध्ये असे विक्षिप्त विचार येत असतील तर स्वतःवर नियंत्रण ठेवून तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. औषधोपचार व समुपदेशन (medicenal treatment and counseling) घ्यायला हवे. तरच हे प्रकार बंद होतील. शिक्षा तर कठोर असावीच मात्र कठोर शिक्षेसोबतच समुपदेशन, औषधोपचार, उद्बोधन, प्रबोधन असेही मार्ग योजायला हवेत. तरच हा प्रश्न सुटेल. अशी मानसिकता बालपणी कुटुंबात कुटुंबियानी, शाळेत शिक्षकांनी ओळखुन त्यावर वैद्यकीय उपचार करायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेने, मित्रांनी कुटुंबियांकडे शिफारस करताना थोडाही विलंब करु नये व संबंधित कुटूंबाने अथवा समस्या ग्रस्त पुरुषाने देखील उपचार घेण्यात कमीपणा अथवा अपमान समजू नये. कारण वेळीच घेतलेली खबरदारी पुढचा अनर्थ टाळु शकते. A stitch at time saves nine.
ब-याचदा असले रोग आपली लक्षणे दाखवत असतात मात्र तो पुरूष स्वतःकडे तसेच त्याचे कुटुंब, मित्र परिवार व समाज त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी काळ सोकावतो व पुन्हा पुन्हा असे प्रकार घडतात हे आजवरच्या पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
आज जर विज्ञान (medical science) एवढे प्रगत अवस्थेत आहे तर अशीही एखादी लस शोधली जावी जी बालपणीच मुलांना टोचली की पुढे पुरुष किशोर वयात, तरुणपणात अथवा आजीवन लैंगिक द्रुष्ट्या पाशवी व अतिरेकी होणार नाहीत. त्यामुळे बलात्काराकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलला, गुन्हेगाराला कठोर व जलद शिक्षा केली व बलात्कार होणार नाहीत यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या तरच हा लांच्छनास्पद व मानवतेला काळीमा फासणारा अमानवीय प्रकार समुळ नष्ट होईल. आणि मला नाही वाटत हे अशक्य आहे. जर आपण माझ्या मताशी सहमत असाल तर समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोचवा ही नम्र विनंती.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

Thursday, 19 April 2018

नारी

अखिल नारी शक्तीच्या दया, दात्रुत्व, माया, ममता, मात्रूत्व, संयम, सहनशीलता, इच्छाशक्ती, निस्वार्थता,त्याग, समर्पण,  सेवाभाव, उर्जा, बुद्धिमत्ता, यशस्वीता, नम्रता, सौदर्य, प्रसन्नता, समायोजन व तडजोडीला माझा मानाचा मुजरा.... 🙏

या प्रुथ्वीतलावर मानवरुपी सुंदर प्राण्यास जन्माला घालुन त्यास मायेने वाढविल्याबद्दल.......
विश्वरूपी गाड्याचे दुसरे चाक बनून हा गाडा यशस्वीपणे इथपर्यंत घेचत आणल्याबद्दल....
सर्व मानवी तत्वे, मुल्ये, संस्कार, आदर्श, संस्कृती व विविध भावनांचे संस्करण, संगोपन व संरक्षण केल्याबद्दल...
ज्यांनी जीवनाला खरा अर्थ व आनंद प्राप्त झाला ती विविध नाती निर्माण करून ती जतन करून ठेवल्याबद्दल...
प्रत्येक यशस्वी पुरूषाचा दुसरा हात बनुन, अर्धे अंग बनुन यशश्री खेचुन आणल्याबद्दल....
अनेक भरकटलेल्या संसाररुपी रथाची दोन्ही चाके स्वतःच बनुन उत्तम सारथ्यासह  तो संसार रथ एकटीने मार्गावर आणल्याबद्दल...
आणि एकुणच हे मानवी आयुष्य सुंदर तथा परिपुर्ण बनविल्याबद्दल  मी आपणास मनापासून मनभरून धन्यवाद देतो🙏

असेल त्या परिस्थितीत, सर्व संकटे झेलत, सर्व आव्हाणे पेलत, सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक दैदिप्यमान गौरवास्पद कामगिरी करून  दाखविल्याबद्दल मी आपले -हदयपुर्वंक अभिनंदन करतो🌷🌷

माझी आई सौ. चंद्रकला,  पत्नी सौ. सोनाली, मुलगी कु. व्रुष्टी, पाचही बहीणी सौ. सारिका, सौ. संगिता, सौ. कविता, सौ. अश्विनी व कु. उषा, भावजय सौ. रजनी, आजवरच्या माझ्या सर्व महीला शिक्षिका, सर्व सासवा, सख्या तर हयात नाहीत राहील्या मात्र सर्व प्रकारच्या नात्याने लागणा-या आज्या,  सर्वच चुलत, मावस, सावत्र बहीणी, चुलत्या, मावश्या, आत्या, माम्या, भाऊजया, नाती, भाच्या, पुतन्या, मेहुण्या, सहकारी भगीनी, विद्यार्थीनी, सर्व मानलेल्या बहीणी, मानलेल्या नात्यातील सर्व प्रिय मुली-महीला, मैत्रिणी व आत्या-मामाच्या मुली☺️तुम्हा सर्वांना माझ्याकडून "जागतिक महिला दिनाच्या" मनःपूर्वक शुभेच्छा🌷🌷🌷

माझ्यासह सर्वच पुरूष जातीच्या चुका पोटात घेऊन यापुढेही सर्व पुरुष व स्त्रिया मिळुन यशाची, जीवनाची आणि एकंदरीतच निसर्गाची टाळी आनंदाने वाजवू👏👏👏👏👏👏
धन्यवाद🙏

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

Tuesday, 17 April 2018

All are the same

नावात काय ठेवलय???
बालासाहेब असो वा बाळासाहेब..
बालाजी असो वा बाळाजी...
बालु असो वा बाळु..

सर म्हणा वा नका म्हणा...
रस असला म्हणजे झाले.
गुरु म्हणा वा नका
गुरूर नसला म्हणजे झाले😊

काहीही निवडले तरी
साहेब वा जी येतेच की😊.
नाही तर मग प्रेमाने
बाला वा बाळा😊

म्हणा ना म्हणा दादा
होईल भाऊ हा वादा.😊
What is in the Name?
All are the Same🙏

B.S. ही yes B.D.ही yes
Only Names r different
Same is the Face.
What is in the Name?
All are the Same😊🙏

पोखरी काय, पाथरी काय
बीड काय, पुणे काय😊
Only Places r different
Same is the Aim😊
What is in the Name
All are the Same 🙏

मो. 9673945092

दान

मित्रांनो नमस्कार🙏सुप्रभात🌷
आज अक्षय तृतीया साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्म शास्त्रानुसार देखील एक शुभ दिवस...
आज केलेले दान अक्षय राहते असा उपदेश श्रीकृष्णाने युधिष्टीराला म्हणजे धर्माला केला होता. मात्र संस्कृती जपत असताना व आत्म समाधान मिळवत असताना आपला विवेक देखील जागा असावा लागतो. धर्म व विज्ञान यांचा जसा यथार्थ मेळ विवेकानंदांनी अब्दुल कलामांनी घातला होता व तशीच शिकवण दिली होती, तिचा विसर पडला नाही पाहिजे. चांगले काम करणारे शुभमुहूर्ताची वाट पहात बसत नाहीत. नवनिर्माणासाठी प्रगतिपथावर अग्रेसर होण्याची कुठल्याही शुभ मुहूर्ताची अथवा पुजेची आवश्यकता नसते. दान नक्की करावे मात्र ते करताना स्वतःची ऐपत व ज्याला दान करावयाचे आहे त्याची सर्वांगाने योग्यता तपासली पाहीजे. त्याची निकड अथवा गरज पाहीली पाहिजे. विं. दा. करंदीकर म्हणतात,.....
"देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे."
म्हणजे सदैव मिळण्याचीच अपेक्षा न करत राहता कधीतरी स्वतःही दान करावे. इतरांना धार्मिक व श्रद्धाळू बनविणारे व दानाचे महत्व समजावून दान स्विकारणारे स्वतः कधी दान करताना दिसतात का हे ही पाहीले पाहीजे. दात्रूत्व माणसाला निस्वार्थ वा परार्थ शिकविते. त्यातच खरा परमार्थ दडलाय हे आपण समजून घ्यायला हवे.
मित्रांनो पात्र पाहुन दान करावे असे म्हणतात. म्हणजे योग्यता तपासून, आवश्यकता पाहून दान करावे. दानाने निष्क्रियता तर वाढणार नाही ना? क्रियाशीलता संपुष्टात येवून परावलंबित्व तर वाढीस लागणार नाही   ना? याचीही आपण काळजी घ्यायला हवी.
अक्षय दानाची व्याख्या समजून घ्यायला हवी. जे हयात नाहीत त्यांच्या नावाने दान करण्याची काहीही आवश्यकता नसते आणि मानसिक समाधान, आठवण, श्रद्धा, धर्माची शिकवण म्हणुन जर दान करावयाचेच असेल तर अनाथालये, वृद्धाश्रमे, विकलांगांच्या शाळा व वस्तीगृहे यांना दान करा. अवयव दान करा, रक्तदान करा. अनेक लोक या देशात आजही निवाराहीन आहेत, भूमिहीन आहेत. त्यांच्या निवा-यासाठी शासनाला अथवा समाजसेवेचे कार्य करणाऱ्या एनजीओंना भुदान अथवा इतर पुरक दान करा.अनाथ बालकांना दत्तक घ्या, बुद्धीमान गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करून राजर्षी शाहु महाराज व सयाजीराव गायकवाड यांचा आदर्श घ्या, गोरगरिबांच्या लेकीबाळींचे विवाह लावून द्या.
मित्रांनो हयात असलेल्या आईवडीलांना आपल्याला जन्म दिल्याचा पश्चात होणार नाही. तर आपल्याला जन्मास घातल्याचे समाधान व अभिमान वाटेल असे काहीतरी करा. आवश्यक नाही प्रत्येक वेळी मंदिरात जाऊन पुजा अर्चना करणे. कधीतरी सरकारी शाळेत, सरकारी दवाखान्यातही जा. तिथल्या अडचणी समजून घ्या. तिथे काही करता येईल का पहा. आजही अनेक गावांत, वाड्यावस्त्यांवर, तांडेपाड्यांवर रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, शाळा-आंगणेवाडी, वैद्यकीय सुविधा, स्मशानभूमी नाही. तेथे केलेले दान फलदायी व अक्षय ठरेल. मला खात्री आहे की असे दान आपल्या पितरांना देखील. समाधान व शांतता प्रदान करेल. हयात असलेल्या मातापित्यांनाही व पितरांनाही...
मित्रांनो, गंगास्नान केल्याने पापमुक्ती मिळत नाही तर जलप्रदूषण होते, संसर्गजन्य आजार जडतात. अक्षय तृतीयेचे शुभमुहूर्त साधुन नदी सफाई, पात्रातील गाळ काढुन पात्र रुंदीकरण, असे उपक्रम राबविले तर नक्कीच समाधान मिळेल.
बघा पटलं तर घ्या. सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शुभ कार्यासाठी, प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

आपलाः बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

Monday, 16 April 2018

चिखे

चिखे.....

या मेरे खुदा मेरे मौला
यह क्या बोला जा रहा है?
वहेशीयों को मजहब से
तोला जा रहा है।

दरिंदगी अपने चरम पर है
और चर्चे सारे धरम पर है।
इन्सानियत का रेप हो रहा है
तु है की खर्राटे मार सो रहा है।

सरे आम लडकीयाँ
लुटी जा रही है।
तुज पर से मेरी आस्था
टुटी जा रही है।

हैवानों का कैसे धरम
कैसे मजहब हो सकता है?
बचाता रहेगा इनको तो
गजहब हो सकता है।

आप बीती पर खाली चर्चे है
हातों में चुनावी पर्चे है।
गर है तू तो इनका खात्मा कर।
शांत मेरा अशांत आत्मा कर।

इज्जत यहाँ तार तार है
आलम यह बार बार है।
सुर्खीयाँ सुन रोता है मन।
मुर्तीयाँ तोड कहेता है मन।

ये कैसी दुनिया बनाई
ये कैसा इन्सान??
शिकारी है चारो ओर
इन्सानियत परेशान।

शोरों में पिडीताओं की चिखे
लुप्त हो रही है।
पता तो तेरा है नही
पर आवाम तेरी भक्त हो रही है।

बालासाहेब धुमाळ।
मो. 9673945092

Wednesday, 11 April 2018

परिपाठ

....................... परिपाठ ...........................

मित्रांनो नमस्कार🙏🏼 आज ११ एप्रिल म्हणजे शिक्षणाची गंगा दिन दुभळ्या , गोरगरीब, वंचित दुर्लक्षित बहुजनांच्या दारापर्यंत घेऊन जाणाऱ्या महामानव क्रांतिसूर्य महात्म्या जोतिबा फुले यांची 191 वी जयंती. त्यांच्या महान कार्याला व स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी तुम्हाला माझा आत्ताचा एक अनुभव सांगतो.
 मित्रांनो उन्हाळ्यामुळे सकाळ सत्रातच शाळा असल्याने मी सकाळी 6:30 लाच शाळेत येतो. नित्याप्रमाणे आजही आलो.सकाळची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी 7:00 वाजता बेल दिली. राष्ट्रगीत झाले, प्रतिज्ञा झाली आणि नंबर आला तो भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा!!! 
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हे म्हणण्याचा!!!!
नित्याप्रमाणे परिपाठ सुरु झाला मात्र माझे व माझ्या विद्यार्थ्यांचे लक्ष मात्र परिपाठात काही लागत नव्हते. त्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेच्या मैदानात रात्रीच्या वेळी निवाऱ्यासाठी काही फिरस्ती किंवा भटके कुटुंब आले होते. परिपाठा दरम्यान माझी मुलं त्यांच्याकडे पाहत होती, त्यांची मुलं कुतूहलाने माझ्या मुलांकडे पाहत होती माकडांप्रमाणे. माझी मुलं परिपाठामध्ये एकेक सदर सादर करत होती तर ती मुलं व त्यांचे पालक त्यांच्या आम्हाला न समजणाऱ्या भाषेमध्ये बडबडत होती. मला काही केल्या राहावले नाही. मी परिपाठामधुन त्या कुटुंबांकडे गेलो. त्यांची विचारपूस केली. ते कोण आहेत? कोठून आले आहेत? व काय करतात असे विचारले असता, त्यांच्या त्या 3 कुटुंबांपैकी एक कुटुंब डोंबारी जमातीचे निघाले तर दोन कुटुंबे नंदीवाले जमातीचे आढळले. पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन कला कसरती दाखवून पोट भरणारे हे कुटुंब पाहून वाईट वाटले. त्यांची अवस्था पाहून कासावीस झालो. त्याचे कारण असे, दरवर्षी आम्ही शाळाबाह्य मुलांची संख्या निरंक देतो. मात्र या तीन कुटुंबातच जवळजवळ सहा मुले शाळाबाह्य दिसली!!!  म्हणजे यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षणाची गंगा तर सोडाच पण साधी ओल पण पोहचलेली दिसली नाही.
माझी मुलं व्यवस्थित ब्रश करून आंघोळ करून दुध चहा-नाष्टा घेऊन युनिफॉर्ममध्ये निटनेटके परिपाठात बसली होती. तर त्या पालांमधील निम्मी मुलं अद्यापही गोदड्यातच होती. निम्मी कसलीतरी पाकीट फोडून काहीतरी खात होती. ना ब्रश केलेला, ना आंघोळ झालेली ! त्यांच्या पालकांनाही याचं काही वाईट वाटत नव्हतं. दोन मोठ्या पुरुष मंडळींनी अंघोळ केलेली आढळली. ते आरशात चेहरा पहाताना दिसली.  बायका अंथरुणाच्या घड्या घालत होत्या.  बहुधा ते दुसऱ्या गावी जाण्याची तयारी करत असावीत असं मला वाटलं. मी त्यांच्याकडे चौकशी केली. विचारले आता काय करणार? त्यावर ते म्हणाले साहेब आता आम्ही खेळ लावणार. डोंबारी नंदिवाल्यांचा खेळ दाखवणार आम्ही. चार पैसे जमा करणार व मीठ मिरची आणणार पोटाला. मी म्हटलं पाहातात का लोक आता पहिल्यासारखा खेळ तुमचा? तर कोणी पहातं कोणी नाही असं उत्तर आलं?  पाहिला तरी आता लोकांचे हात खिश्याकडे जात नाहीत साहेब. पोट भरणं लई अवघड झालं आहे साहेब पण काय करू? आईबापांनी शिकवलं नाही आता पुढं आम्ही शिकवतोय तर लेकरं शिकत नाहीत. बोरडींगीत नकु म्हणत्यात अन सोबत ठेवावं तर शाळा बुडतीया. म्हणून काय करावं कळत नाही. अन नाही तरी शिकुन बी काय उपेग न्हाई वो, त्यांचा पोरगा चवदावी शिकला पण काही उपेग झाला नाही. काहीशा वैतागलेल्या सुरात तो उत्तरला.
मी विचारले तुमचं नाव काय? तर ते म्हणाले मी शिवराम लिंबाजी जाधव गाव जातेगाव तालुका शिरूर जिल्हा अहमदनगर. मी मनात म्हटलं शिरुर तालुका नगरमध्ये!! डोंबारी जातीचा आहे. मला चार मुले व एक मुलगी आहे. मी शाळेत जातात का विचारले तर ते म्हणाले नाही. शाळेत जात नाही. त्यांच्याच बाजूला साहेबा बाबु गायकवाड नावाचे नंदिवाले जमातीचे व्यक्ती त्यांच्या समवयस्क भावासोबत बसले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव गावचे.  त्यांनाही 4 अपत्ये होती दोन मुले व दोन मुली.  ह्यांची दोन अपत्ये शिकत होती. 
त्यांची ती अवस्था पाहून मी बेचैन झालो म्हणजे एकीकडे आपण ग्लोबलायझेशनच्या, आधुनिकीकरणाच्या, प्रगतिच्या गप्पा मारतो!! स्मार्ट सिटीज मोनो मेट्रो रेलच्या गप्पा मारतो. भारत महासत्ता बनत असल्याचे म्हणतो. तर दुसरीकडे या भटक्या विमुक्त जमाती अद्याप पारतंत्रातच जीवन जगताहेत. यांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य कधी उगवेल? यांच्या आयुष्याची रेल कधी पटरीवर येईल?

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या तीन कुटुंबांपैकी कोणाकडेही स्वतःचे घर नव्हते. जमीन नव्हती. कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. त्यांच्याकडे बँक पासबुक नव्हते. मतदार ओळखपत्र नव्हते. आधार कार्ड नव्हते. पॅन कार्ड नव्हते. आधुनिक जगातील एकच वस्तू त्यांच्या जवळ होती ती म्हणजे गाडवे घोडे यांची जागा घेतलेला छोटा हत्ती (मिनी टेंपो)!!
मला प्रश्न पडला जर यांच्याकडे काहीच नाही तर या लोकांना या देशाचे नागरिक अस कसे काय म्हटले जाऊ शकते? यांनी का म्हणावे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून? यांच्या मदतीला कोणीतरी धावून जायला हवे. शासन, एनजीओ यांना हे पालातील, छपराखालील, पुला-नळ्याखालील, फुटपाथवरील, सिग्नलवरील दारिद्रय दिसत नसावं का? यांना कधी भारताचे ख-याअर्थाने नागरिकत्व मिळणार?? (मुळनिवासी असुनही!!!)
 चर्चा करत असताना शिवराम लिंबाजी गायकवाड अगदी बेंबीच्या देठापासून दुःखावस्था सांगत होते. साहेब ज्या गावात खेळ दाखवायला जातो त्या ठिकाणी जागा मिळत नाही. गावातील टगे बायकापोरांना लेकराबाळांना त्रास देतात. मी म्हटलं पोलिसात वगैरे जात नाही का? तर ते म्हणाले पोलीस काय आणि कोर्ट काय हे मला माहीतच नाही. आम्ही आजवर पोलिस स्टेशनची किंवा कोर्टाची पायरी कधीही चढलो नाही. इकडंच हातापाया पडून मिटवले तंटे. या जातीत जन्म झाला हे कदाचित पहील्या जन्माचं पाप असावं. त्यांची दयनियता व  हतबलता मला असह्य वेदना देत होती पण औषध काहीच नव्हते.
आता मी साहेबा बाबु गायकवाड नावाच्या व्यक्तीशी गप्पा मारण्याचे ठरवले. ते बोलण्याच्या मानसिकतेत नव्हते. ते काहीसे चिडलेल्या अवस्थेत दिसले.
काय करायचे साहेब सांगुन?? सांगुन काय फरक पडणार आहे. अशी लईजण लईदा चौकशी करतात माहिती घेऊन, फोटो काढून जातात. फरक काहीच पडत नाही. आमच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. त्यामुळे मला काही विचारू नका. मी म्हणालो तुमच्या जातीचे नेते तुमची काही मदत करत नाहीत का? त्यावर ते म्हणाले कोणीही नाही. ना जातीचे ना बिगर जातीचे. कोणीही आमच्या मदतीला येत नाही.
मित्रांनो मी त्यांचा मूड ओळखला. तेवढ्यात परिपाठही संपला. मग मी माझ्या वर्गामध्ये  जाऊन विचार करत बसलो. खरच या जमाती अजुनही स्वतंत्र आहेत का? यांना खरोखरीच स्वातंत्र्य मिळाले आहे का? हा भारत देश खरच यांचा देश आहे का? देशात मुठभर हक्काची माती नाही का वितभर नावावर जमीन नाही, डोक्यावर हक्काचे छप्पर नाही तो देश यांचा देश कसा काय असू शकतो????? 
आमचा शालेय परिपाठ रोजच सुरू होतो आणि रोजच संपतो पण या विमुक्त भटक्या जमातींचा दुःख, दैन्य, दारिद्रय, हतबलता व दुर्लक्ष या सदरांनी युक्त परिपाठ कधी संपेल देव जाणो....

....बाळासाहेब सिताराम धुमाळ
...मो. 9673945092.

DNT म्हणजे काय रे भाऊ?

DNT म्हणजे काय रे भाऊ?

मित्रांनो नमस्कार, चळवळीमध्ये काम करत असताना अथवा वैयक्तिक कामासाठी फिरत असताना असा अनेकदा अनुभव आला की लोकांना DNT म्हणजे काय? NT म्हणजे काय? यात कोणत्या जमाती समाविष्ट आहेत? आपली जमात कशात येते? ते अगदी आपली जमात कोणती? हेच अनेकांना माहीत नाही. काही भंगार लोक असेही आढळले की ते स्वतः DNT आहेत, आरक्षणाचा लाभ घेवून शिक्षण नोकरी मिळवून मजेत जीवन जगत आहेत. मात्र आता स्वतःची जात लपवत आहेत. स्वतःला DNT म्हणवून घ्यायला कमीपणाचे समजत आहेत.
एकीकडे चळवळ शासनाला आमच्याकडे लक्ष द्या, आमच्यावर अन्याय होतोय हे सांगण्याठी मरमर करतेय तर दुसरीकडे आपले लोक DNT विषयाबाबतीत अज्ञानी आहेत आणि काही झोपेचे सोंग घेवून आहेत. काही लोक जातीय संघटना तयार करून जातीसाठी कागद काळे करतात. लोकांना भुलथापा मारतात,
जातीचे संघटन असणे चांगले असले तरी हे लक्षात घ्या, कोण्याही एका जातीला काहीही मिळू शकत नाही. या संघटनाचा उपयोग DNT चळवळीला होताना दिसत नाही. त्यासाठी सर्वांनी DNT म्हणुन लढा. मी हे ही स्पष्ट करु इच्छितो की महाराष्ट्रातील अनेक DNT जमाती, केंद्रात SC/ST मध्ये आहेत!! केंद्रात स्वतंत्र DNT आयोग आहे. राज्यात स्वतंत्र VJNT OBC SBC मंत्रालय आहे. स्वतंत्र संचालनालय आहे मात्र पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात येत नाही.
म्हणूनच सर्वच DNTएकतर  सरसकट SC/ST मध्ये वर्ग करा अथवा आता DNT असलेल्या व sc, st, obc मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व DNT चा वेगळा केंद्रात स्वतंत्र आरक्षण प्रवर्ग तयार करून लोकसंखेच्या प्रमाणात आम्हाला केंद्रात स्वतंत्र आरक्षण द्या. ना sc, ना st ना obc!!फक्त DNT 👍👍या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
शिवाय सध्या राज्य सरकार आपल्या साठी काय करीत आहे? काय करायला हवे? काय मागणी करावी हे अनेकांना कळत नाही. त्यासाठी DNT म्हणजे काय/कोण हे समजणे गरजेचे आहे. म्हणून.. ...
DNT म्हणजे Denotified Nomedic Tribes म्हणजे विमुक्त भटक्या जमाती.

विमुक्त जमातींना विमुक्त जाती VJ म्हणूनही संबोधले जात आहे पण ते चुकीचे आहे. या जमाती आहेत, जाती नाही. या एकुण १४ आहेत.

१)अ) बेरड ब) नाईकवाडी, क) तलवार
ड) वाल्मिकी
२)बेस्तर वडार
३)भामटा अ) भामटी, ब) गिरणी वडडार, क) कामाटी, ड) पाथरुट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह), फ) उचले, ग) घंटीचोर
४)कैकडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुका यात)अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
५)कंजारभाटअ) छारा, ब) कंजार,
 क) नात
६)कटाबू
७)बंजाराअ) गोर बंजारा, ब) लंबाडा/ लंबारा, क) लंभाणी
ड) चरण बंजारा, इ) लभाण, फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा, ह) लमान बंजारा इ) लमाण/ लमाणी, ज) लबान, क) *** ल) धाली/ धालीया, ग) धाडी/ धारी, न) सिंगारी व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा, क्यु) **, र) ** स) बंजारी
८)पाल पारधी
९)राज पारधीअ) *** , ब) गाव पारधी, क) हरण शिकारी, ड)*
१०)राजपूत भामटाअ) परदेशी भामटा, ब) परदेशी भामटी
११)रामोशी-
१२)वडारअ) गाडी वड्डर, ब) जाती वड्डर, क) माती वड्डर ड) पाथरवट, इ) संगतराश / दगडफोडू, ई) वड्डर
१३)वाघरीअ)सलात, ब) सलात वाघरी
१४)छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह)

NT म्हणजे Nomedic Tribes म्हणजे भटक्या जमाती. यांचे ३ विभागात वर्गीकरण केले आहे.

NTB म्हणजे भजब
 मुळ २८ + नव्याने समाविष्ट ९=३७

१) गोसावी1) बावा 2) बैरागी 3) भारती 4) गिरी गोसावी 5) भारती गोसावी 6) सरस्वती पर्वत 7) सागर 8) बान किंवा वान 9) तीर्थ आश्रम 10) अरण्य घरभारी 11) संन्यासी 12) नाथपंथी गोसावी 13) पुरी
२)बेलदार ओड, मुस्लीम बेलदार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापु, तेलंगा, तेलगी, पेंटरेडडी, बुकेकरी, मुस्लीम राज, मुसलमान राज, मुस्लीम मेमार, मेमार, मुस्लीम गवंडी (शा. नि. दि .30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट )
३)भराडीअ) बाळ संतोशी ब) किंगरीवाले क) नाथबावा ड) नाथ जोगी, गारपगारी इ) नाथपंथी डवरी गोसावी ई) नाथ, जोगी, नाथपंथी उ) डवरी
४)भुते भोपे
५)कंजारभाट
६)चित्रकथी
७)गारुडी, सापगारुडी (मुस्लीम धर्मियांसह)
८)लोहारघिसाडी, घिसाडी लोहार किंवा गाडी लोहार किंवा चितोडी लोहार, रजपूत लोहार, पांचाळ लोहार, खाती, खातवाढी, जिनगर, चितोडीया-लोहार, चितारी / जिनगर (शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
९)गोल्लागोल्लेवार, गोलेर, गोलकर
१०)गोंधळी
११)गोपाल अ) गोपाल भोरपी ब) खेळकरी गोपाळ ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)
१२)हेळवे12) हिलव
१३)जोशीअ) बुडबुडकी, ब) डमरुवाले, क) कुडमुडे, ड) मेंढगी, इ) सरोदे, सरोदी, फ) सहदेव जोशी, म) सरवदे, ह) सरोदा
१४)काशी कापडी
१५)कोल्हाटी डोंबारी
१६) मैराळअ) दांगट, ब) वीर
१७)मसनजोगी1)सुदगडसिध्द, 2) मपनजोशी, 3) शारदाकार / शार्दाकार / शारदाकाळ / बालासंतु
१८)नंदीवाले तिरमल
१९)पांगूळ
२०)रावळ, राऊळ किंवा रावळयोगी
२१)सिक्कलगरकटारी, सेक्क्लगर (मुस्लिम धर्मिय), शिख-शिकलीगार, शिख-शिकलीकर, कातारी शिकलगार, मुस्लिम शिकलगार, शिकलीगार, शिकलीगर, शिकलगार, शिकीलगर, श्किलकर, शिकलीकर, शिकलकरी, सिकलकर, सिकलीकर, सिकीलगर, सिकीलकर, सिकलीघर, सिक्कलकर, सिकलीगर, सिकलगर, सिक्कलीगर, सायकलगर, सैकलकर,सैकलगर, कातारी-शिकलकर (शिकलीकरी) हिंदू धर्मीयांसह (शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
२२)वगळले (ठाकर –रत्नागिरी जिल्हा)
२३)वैदू
२४)वासुदेव
२५) भोई 1) झिंगा भोई 2) परदेशी भोई 3) राजभोई 4) भोई 5) कहार 6) गोडिया कहार 7) धुरिया कहार 8) किरात 9) मछुआ 10) मांझी 11) जातिया 12) केवट 13) ढीवर 14) धीवर 15) धीमर 16) पालेवार 17) मछेंद्र 18) नावाडी, भोई नावाडी, तारु-नावाडी 19) मल्हार 20) मल्हाव 21) बोई 22) गाढव भोई 23) खाडी भोई 24) खारे भोई 25) ढेवरा 26) भनारा, भनारी, भनारे 27) निषाद 28) मल्ला 29) मल्लाह 30) नावीक 31) ओडा 32) ओडेवार 33) ओडेलू 34) बेस्तार 35) बेस्ता 36) बेस्ती 37) बेस्तालू 38) भनार (शा. नि. दि 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट )
२६) बहुरुपीअ) बोहरशी, ब) बहुरुपिया, क) भोरपी, ड) रायरंध्र, इ) अय्यार व अय्यारी
२७)ठेलारी (धुळे, नाशिक, जळगाव, व औरंगाबाद जिल्हयात)
२८)ओतारीअ) ओतनकर, ब) ओतकर, क) वतारी, ड) ओझारी इ) वतकर, वतकरी, वतनकर, वतोकर, ओतकरी, ओतोकार वतोकार
२९)मरीआईवाले
३०)कडकलक्ष्मीवाले, ३१)मरगम्मावाले
३२)गिहरा / गहरा
३३)गुसाई / गोसाई
३४)मुस्लीम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर
३५)भारतीय इराणी
३६)गवळी, मुस्लीम गवळी, गवलान, ग्वालवंश गोपाल-गवळी गवळी- गोपाल ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)
३७)दरवेशी, वाघवाले- शाह (मुस्लीम धर्मीय), अस्वलवाले
३८)बागडी (भज-ब) ( शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे.

NTC भजक
म्हणजे धनगर

१) अहिर, धनगर अहिर २) डांगे ३) गटरी ४) हंडे ५) तेलवर ६) हटकर ७) हाटकर ८) शेगर, सगर, सेगर ९) खुटेकर १०) तेलंगी ११) तेल्लारी १२) कोकणी-धनगर १३) कानडे १४) वऱ्हाडे धनगर १५) झाडे १६) झेंडे १७) कुरमार १८) माहुरे १९) लाडसे २०) सनगर २१) धनवर २२) गडारिया २३) गड्री २४) गढरी २५) डंगेधनगर व डोंगरी धनगर २६) गडरिया/ गडारिया (शा.नि. दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समा‍विष्ट)

NTD भजड
म्हणजे वंजारी (वंजार, वंजारा)

आपल्याला आरक्षण किती आहे?
DT/VJ --- 3%
NTB----- 2.5%
NTC------- 3%
NTD------- 2%

संकलनः बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

गोंधळी वधु-वर सुचक ग्रुप

गोंधळी भावाबहीणींनो नमस्कार....

मी समाजामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा अनेक लोक मला एखादा चांगला मुलगा किंवा मुलगी (वर किंवा वधु) आहे का? म्हणुन विचारतात. ऐनवेळी आठवत नाही. माझ्या ते लक्षातही राहात नाही. शिवाय जबाबदारी, वेळेची कमतरता यामुळेही दुर्लक्ष होते/करतो. अलीकडे शैक्षणिक व आर्थिक प्रगतीमुळे (काहींच्या) अपेक्षा वाढल्या आहेत. समाज एकसंघ नसल्यामुळे ब-याच अडचणी येतात. आज अनेक पालक व स्वतः वधु-वर स्थळाच्या शोधात आहेत पण मनोवांचीत स्थळाचा शोध लागत नाही...

Whatsapp किंवा Hike वर आज अनेक matrimonial म्हणजे विवाहजुळणीविषयक groups आहेत. आदरणीय डॉ. विजय रेणके सरांनी त्यांच्या शुभमंगल गोंधळी या ग्रुपच्या माध्यमातून अनेक लग्ने जमण्यास मोलाचे सहकार्य केले, आजही करत आहेत.

मला वाटते WhatsApp किंवा Hike पेक्षा Facebook वरील ग्रुप अधिक फायद्याचा ठरेल. कारण इथे कोणाला मेंबर करायचे, काय शेअर करू द्यायचे, काय करू द्यायचे नाही हे नियंत्रकाच्या Admin च्या हाती असते. सदस्य संख्येलाही मर्यादा नसते? बायोडाटा पुन्हा पुन्हा सेंड करून रिमाईंड करून द्यावे लागत नाही. एकदा बायोडाटा दिला की संपले. आपण ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यापुर्वीच शेअर झालेल्या पोष्ट्सदेखील पाहु शकतो!!शिवाय एखाद्या बायोडाट्याबाबत कमेंट्सही करू शकतो. म्हणून मी.....

Gondhali Vadhu var suchak group (गोंधळी वधु-वर सुचक ग्रुप) तयार करत आहे. हा एक closed ग्रुप असेल अर्थात ज्याची joining request accept करेल त्यांनाच या ग्रुपचे सभासद होता येईल.

Join / सभासद  होण्यासाठी Gondhali Vadhu var suchak group ला request पाठवावी लागेल. पण request पाठविण्यापुर्वी मला माझ्या whatsapp नंबर 9673945092 वर संपुर्ण biodata हा request पाठवणाराचे नाव टाकुन पाठवावा लागेल. आपण तो Facebook messenger वरही पाठवु शकता. त्या नंतरच request accept केली जाईल."

Biodata किंवा profile नसेल तर सदस्यत्व नसेल. परिणामी बघ्यांची गर्दीही नसेल. ग्रुपचे सर्वच सभासद केवळ ज्यांच्याकडे मुलगा किंवा मुलगी आहे असेच असतील. एकदा सदस्य झाले की मग आपण ग्रुपवर तो बायोडाटा टाकु शकाल. एखादा समाजबांधव facebook वर नाही किंवा आहे पण वापरातले विशेष समजत काही, अशावेळी तसा बायोडाटा मी टाकेल व फोनवरून त्यांना माहीती कळवेल.

बायोडाटा परिपुर्ण असावा. फोटो, संपूर्ण नाव व पत्ता, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, शारिरीक वर्णन, अपेक्षा, संपर्क क्रमांक इत्यादी.

मला पाठवलेले बायोडाटाज अत्यंत गोपनीय असतील. काही शंका कुशंका मनात असेल तर मला संपर्क करा. बायोडाट्याशिवाय सभासदत्वाची साधी अपेक्षाही करू नका. लग्न जमले, लग्न झाले की काही दिवसात क्रुपया स्वतःच ग्रुप सोडायचा अथवा मी काढुन टाकील.

आणि सर्वात शेवटचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही एक समाज सेवा असेल. सभासदांना मी ओळखतच असेल असे नाही. मी केवळ एक माध्यम असेल, दुवा असेल. हा ग्रुप म्हणजे एक व्यासपिठ असेल. एक प्रकारचा मोफत वधु-वर परिचय मेळावा. आपली ओळख आपणच करून द्या, ओळखही आपणच करून घ्या. काही मदत लागली तर मला मागा. कोणीतरी नियंत्रक व मध्यस्थ असावा म्हणून मी. मला धन्यवादाशिवाय कसलीही अपेक्षा नसेल....

तेव्हा facebook messenger अथवा Whatsapp, Hike वर 9673945092 या क्रमांकावर बायोडाटा पाठवा व नंतर खालील लिंकवर क्लिक करून ग्रुपचे सभासद बना.

मित्रांनो मला messenger, whatsapp, Hike वर अनेक पोष्टस येतात. अनेकदा पहाणेही शक्य होत नाही. जर यदाकदाचित आपण बायोडाटा पाठवूनही आपली request accept केली गेली नाही तर कृपया एक फोन करून आठवण करून द्या. आपला वधु-वर शोध नक्की सोपा होईल अगदी घरी बसल्या!!! 🙏

 माझा यात काही स्वार्थ नाही. स्थळ शोधताना किती त्रास होतो. किती माणुस हतबल होतो. लोक आपलेच जवळचे कशी गंमत पाहतात. माहीत असुनही स्थळ सांगत नाहीत. हे मी अनुभवलेले आहे. 
समाजात ओळख नसल्याने, कामाधंद्यात व्यस्त असल्याने, घरात कोणी पुढाकार घेऊन करणारे नसल्याने इतरांवर विश्वास ठेवूनही, खर्च करूनही, आपली योग्यता असुनही मनासारखे स्थळ मिळत नाही. म्हणुनच तंत्रज्ञानाचा वापर करून मी अगदी विश्वसनीय व सुरक्षित पद्धतीने समाजाची छोटीशी मदत करत आहे. 
आपले काम सोपे व्हावे, आपल्याला विनाखर्च, विना दगदग, घर बसल्या, कुणाच्याही पुढेपुढे न करावे लागता आपल्या मनासारखे स्थळ मिळावे या निर्मळ इच्छेसह.....

आपलाः बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

लिंक👇👇
https://www.facebook.com/groups/184093738877883/

आपलाः बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

बारसं

😓😰😷😥
............बारसं.........
विकास प्रक्रियेनं विखारी
कलावंतांना केलं मजुर.
मजुरांना केलं मजुबुर
अन मजबुरांना भिकारी.
छापुन मातर न्यारंच येतय
केवढा! केला विकास म्हणुन...

कुणी करतय सहन गुमान
कुणी राखतय इमान.
कुणी मागतय भिक आळीपाळीनं
कधी अन्नाची कधी कामाची.
कधी प्राणाची तर कधी अब्रुची
जगतेत कसेबसे गुलाम बनुन....

पण बघुन गड्यांनो सारं
दाटतोय कंठ निशब्द.
रडतय मन निराश्रु
गरगरतय डोकं विलक्षण.
घिरट्या घालणारे विचार
उठतेत भयंकर वादळ बनुन....

वाटतय घ्यावी हाती मशाल
ओतावं घासतेल सर्वत्र अन.
पेटवावं सगळच स्वतःसह..
पण घाबरतो की येईल छापून.
भटक्याविमुक्ताने विकास
बेचिराख केला म्हणुन...

हिणवतील माझ्या लेकरांना
गुन्हेगाराची औलाद म्हणून
अन करतील बारसं त्यांचंबी
गुन्हेगार म्हणून!!!
बसवतील एखाद्या सिग्नलवर
भिकारी म्हणुन.....

😓😓😓😓
...बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

महाराणी सईबाई

मित्रांनो......
रविवारी मी मित्रांसोबत स्वराज्याची पहीली राजधानी किल्ले राजगड पहायला गेलो होतो. चढण्यास अतिशय कठीण व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा किल्ला पाहून समाधान वाटले, अभिमान वाटला. पण इतर किल्ल्यांप्रमाणेच राजगडही संवर्धनाच्या बाबतीत दुर्लक्षितच दिसला. नेहमीप्रमाणेच दुःख ही झाले. मात्र सर्वाधिक दुःख झाले ते राणी सईबाईंची समाधी पाहुन!!!
भलेही त्यांनी स्वराज्याभिषेक पाहीला नव्हता पण राजेंनी स्वराज्याची शपथ बालपणीच घेतली होती. विवाहापासुनच त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी राजेंना सर्वोतोपरी सहकार्य केले होते. स्वराज्याच्या निर्मिती कार्यात त्यांनी आपल्या पतीला पावलापावलावर साथ दिली होती.
आपल्या १९ वर्षांच्या संसारात त्यांनी संभाजी राजेंसह चार अपत्यांना जन्म दिला होता. पुरंदरवर संभाजी राजे जन्मले तेव्हा भोसले परिवारात प्रचंड आनंद झाला होता. त्या अर्थाने त्या स्वराज्याच्या पहील्या महाराणी होत्या.
छत्रपती शिवाजी राजेंच्या लाडक्या पत्नी व स्वराज्याचे दुसरे राजे छत्रपती संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाई! मातोश्री जिजाऊंच्या लाडक्या सुनबाई होत्या त्या. त्यांचा व राजेंचा विवाह जिजाऊंनीच लावून दिला होता. त्या राजमाता जिजाऊंची निवड होत्या. त्यांनी घर संसार व्यवस्थित हाताळला होता.
त्या फलटनचे १५ वे राजे मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या कन्या व फलटनचे १६ वे राजे बजाजीराव नाईक निंबाळकर यांच्या भगिनी होत्या. निंबाळकर घराणे शुर व घरंदाज राजघराणे होते. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांची सासरवाडीदेखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातीलच होती.
सईबाई एक सुंदर, सुशिल, चारित्र्यसंपन्न, बुद्धिमान व निस्वार्थी पत्नी होत्या. संभाजी राजे दोन वर्षाचे असतानाच त्या गेल्या. संभाजी राजेंचा सांभाळ आजी जिजाऊंनी व सावत्र आई सोयराबाईंनी केला. संभाजी राजेंच्या जन्मापासूनच त्या आजारी होत्या. त्या दि.५ सप्टेंबर १६५९ रोजी गेल्या. त्यांच्या निधनाने राजेंना अतिशय दुःख झाले होते. त्यांना जिजाऊंनी सावरले. मी असेही वाचून आहे की शिवरायांच्या म्रुत्यु प्रसंगी त्यांनी "सई" हेच शेवटचे शब्द उच्चारले होते.
मात्र आज स्वराज्याच्या पहील्या महाराणीच्या समाधीवर साधे छतही नसावे हे पाहून मन उदास झाले. उन्हा पाऊसापासुन रक्षण व्हावे म्हणून साधी निवा-याखाली समाधी नसावी हे खेदजनक आहे. हे दुर्लक्ष व ही भग्नावस्था संतापजनक आहे.
शुल्लक व लबाड राजकारण्यांच्या समाधी संगमरवरी आहेत. भव्य स्मारकांच्या गप्पा व श्रेयाची भांडणे आपण रोजच ऐकतो पहातोय. मात्र आपल्या प्रेरणास्थानांची, वारसा स्थळांची, ऐतिहासिक अस्मितांची असलेली दुरावस्था पाहून एरवी गर्वाने शिवाजी महाराजांचा, मराठा साम्राज्याचा व स्वराज्याचा जयघोष करणारे शिवप्रेमी व शासन एवढे उदासीन कसे काय असु शकतात???
कळत नाही.......

... बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

विजाभज संघटन

सर्व भटक्या विमुक्त भावाबहीणींनो नमस्कार🙏
आपल्या जातीय संघटना खुप आहेत. म्हणजे मी हमेशा मस्करीत म्हणत असतो," मुठभर लोकांच्या ओंजळभर संघटना"!!!!  माणसं कमी अन पदाधिकारीच जास्त झालेत. संघटना असणे, संघटीत असणे चांगलेच मात्र जास्त संघटना असणे हे असंघटित असल्याचे लक्षणच नव्हे तर पुरावा समजा....
बरे या संघटनांचा भटक्या विमुक्तांच्या चळवळीला काही उपयोगही होत नाही. अनेकांना तर भटके विमुक्तांची चळवळ काय आहे हेच माहीत नाही!!!
तेंव्हा मला वाटते, जातीय संघटनांनी आपापले अस्तित्व व अस्मिता कायम ठेवून शासकिय व राजकीय स्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. जातीय संघटना शासनदरबारी प्रश्न सोडवू शकत नाहीत. शासन कोण्याही एका जातीचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांची जशी आघाडी वा युती असते त्यापध्दतीने अगोदर जातीय संघटनांची व नंतर भटक्या विमुक्तांची एकच शिखर संघटना असायला हवी.
भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आज रोजी अनेक नोंदणीकृत संघटना आहेत. आपल्या आवडीनुसार व त्यांच्या योग्यतेनुसार आपली शक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी करा. आपापल्या रिती परंपरा, भाषा, वेष, कला जोपासा पण सोबतच परस्परांतील नकारात्मक स्पर्धा, असुया, मत्सर हेवेदावे मात्र बाजूला ठेवा. श्रेयाचा विचार सोडून द्या आणि सर्वांनी सर्वांच्या भल्यासाठी एकत्र या...
आपण म्हणजे भटके विमुक्त लोकशाहीमध्ये राजकीय पर्याय बनू शकतो काय? यावरही विचार मंथन करायला हवे असे वाटते. कारण लोकशाहीचा मतदार सर्वात प्रभावी घटक आहे. लोकशाहीत प्रश्न सदनाशिवाय व शासकिय प्रशासकीय टेबलांशिवाय सुटू शकत नाहीत. आणि प्रश्न सुटू शकतात कोणाचे तर जे एकजूट असतात त्यांचे!!! त्यामुळे एकतर पक्ष स्थापन करा अथवा मजबूत व सर्वव्यापी संघटना बनवा. राजकिय पक्षांना देखील आपले महत्त्व समजावून सांगा. सर्वजण (राजकीय पक्ष व मागासवर्गीय संघटना) आपला केवळ वापर करून घेत आहेत मात्र आपल्याला देत काहीच नाहीत. लोकसंख्येत आपण २५% आहोत मात्र असंघटीत आहोत आणि त्यामुळे दुर्लक्षित आहोत म्हणून आता संघटीत व्हा व मागायचे सोडून द्यायला भाग पाडा......✊✊✊✊✊

........बाळासाहेब धुमाळ.
........मो. 9673945092

Thursday, 22 March 2018

काव्य

.........काव्य.........

काव्य ना शब्दांचा खेळ
ना वाक्यांचा सुसंगत मेळ.
काव्य दृश्यरूप मनांचे
सर्वस्व कवी जणांचे.

विश्वची न्यारे याचे
अलंकार अक्षर मोत्याचे.
जरी संपन्न जनु कुबेरं
झोपडीत अपुल्या फकीरं.

सत्य शब्दांत येते जेव्हा
तेव्हा काव्य जन्म घेई.
मन स्वप्नात रमते जेव्हा
काव्य लेखणी मुखी येई.

हतबल हताश उदासीन
मन काव्यासवे जोडी नाते.
जन हिणवीतसे हसुनी
काव्य क्रांतीस जन्म देई.

वसे निर्मळ अंतरी
काव्य सद्गुण संतरी.
कौतुक असो वा टीका
काव्य राही समांतरी.

काव्य सुरेल भावगीत
काव्य पावन रम्य प्रीत.
दुःख वेदनांचा अंत
काव्य दैवी दवा अद्वैत.

काव्य प्रेरणा क्रियेची
संमती मुक प्रियेची.
काव्य संवाद आत्म्याचा
दिव्य प्रसाद परमात्म्याचा.

सर्वठायी काव्य वसे
सर्वव्यापी काव्य असे.
संगीत बेमोल असते
जर गीत अबोल असते.

करुण केविल शोषित
काव्य भगवंताचे प्रेषित.
-हदयदाह जेव्हा होई
 काव्य सौम्य फुंकर घाली.

चिंब आसवे निशब्द
काव्य हास्यही अव्यक्त.
समागम सम मनांचे
बंद रेशीम कवनांचे.

कवीः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

Wednesday, 21 March 2018

विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी

..........विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी..........

मित्रांनो नमस्कार मी नुकताच "आधुनिकीकरणाचा उदय अन लोकजीवनाचा अस्त" नावाचा लेख लिहिला होता. त्यापूर्वी "लोककला" नावाची कविताही लिहिली होती. दोन्हीला ही आपण भरपूर प्रतिसाद दिलात  त्याबद्दल धन्यवाद.

भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षणाबाबतीत मुळातच अज्ञानी आहेत. त्यांना ज्ञान आहे मात्र आपापल्या क्षेत्रातील. जसे की कला कसरत कारागिरी नकला करमणूक खेळ इत्यादींमधील. प्रचलित अर्थाने आपण शिक्षण म्हणतो ते पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण या जमातींमधील खूप कमी लोकांकडे आहे. बहुतांश लोक अज्ञानी व मागास आहेत. आधुनिकीकरण व त्याच्याशी संबंधित इतर बदलांमुळे या जमातींच्या जीवनमानात संकटे निर्माण झाली आहेत. याचा लेखाजोखा आपण यापूर्वीच घेतला आहे.

आधुनिकीकरण यांत्रिकीकरण संगणकीकरण औद्योगीकरण शहरीकरण आवडीनिवडी मधील व कायदे यामुळे समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख असलेले ग्रामीण लोकजीवन व या लोकजीवनाचा मूळ आधार असलेल्या भटक्या विमुक्त जमाती अत्यंत वाईट पणे प्रभावित झाल्या आहेत. बारकाईने पाहिल्यास असे आढळून येईल की सर्वच भटक्या विमुक्त जमाती केवळ हिंदुत्ववादीच नाहीत तर त्याचबरोबर त्या हिंदुत्वाच्या मुख्य प्रचारक व प्रसारक आहेत. या देशाची एक गौरवपूर्ण सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात व वैविध्यपूर्ण देश म्हणून भारताची ख्याती जगभरात निर्माण करण्यात या जमातींचा मोलाचा वाटा आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्यनिर्मित तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या जमातींचा सिंहाचा वाटा आहे. पुढच्या पिढीला आपला जाज्वल्य इतिहास माहीत व्हावा व त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून या जमातींनी विविध कला जसे की लेखन गायन वादन नर्तन चित्र-शिल्प नकला कसरती यांद्वारे आपल्या समृद्ध संस्कृतीची पुढच्या पिढीला ओळख करून दिली आहे. मात्र जगाच्या महासागरात आधुनिकीकरणाचे वादळ आले व त्याचा अनिष्ट परिणाम लोकजीवनावर होऊन या भिक्षुक कलाकार नकलाकार कसरतीकार कारागीर जमाती परिवर्तनाच्या लाटांसरशी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून विलग होऊन किनाऱ्यावर फेकल्या गेल्या, बाजूला फेकले गेल्या.
आज रोजी जवळजवळ सर्वच भटक्या विमुक्त जमातींचे पारंपारिक व्यवसाय संपुष्टात आले आहेत. खरेतर शासनाने व समाजाने या जमातींच्या पारंपरिक व्यवसायाकडे केवळ एक उपजीविकेचे साधन म्हणून पाहण्यापेक्षा एक प्राचीन कलासंस्कृती म्हणून पाहायला हवे. ती संपुष्टात येणार नाही यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. लोककला वाढावी विस्तारावी फैलावी असा दृष्टिकोन सरकारचा असावा व त्यादृष्टीने धोरणे योजना व कार्यक्रम आखले जायला हवेत. ही जशी शासनाची जिम्मेदारी आहे तशीच ती आपली ही जिम्मेदारी असावी. आपणही स्व स्थितीबाबत जागरूक असायला हवे.
जगाच्या प्रवासाची दिशा तर आपण बदलू शकत नाही. परिवर्तन हे होण्यासाठीच असते ते झालेच पाहिजे व बदलत्या काळाप्रमाणे आपणही स्वतःमध्ये परिस्थितीनुरूप बदल घडवून आणले पाहिजेत. आपले अस्तित्व टिकवायचे असेल, जीवन जगायचे असेल तर हाताला काम मिळविले पाहिजे व त्यासाठी मागणीप्रमाणे स्वतःला घडविले पाहिजे. उदर्निवाहाची पर्यायी साधने जी आधुनिक जगाच्या मागणीशी सुसंगत असतील अशी साधने शोधली पाहीजेत. हाच आपल्या स्थिती बदलाचा खरा मार्ग आहे.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आलेले आधुनिकीकरण, त्यातून झालेले विस्थापन व करावयाचे पुनर्वसन या शृंखलेतील पहिली कडी आहे शिक्षण! शिक्षण मग ते दोन्ही प्रकारचे, एक पारंपारिक लोकशिक्षण पण नव्या रूपात नव्या रंगात नव्या ढंगात घेतले पाहिजे. शिक्षण म्हणजे प्रचलित शालेय व महाविद्यालयीन शिक्षण. शिक्षण घेत असताना व्यवसाय व तंत्र शिक्षणाकडेच ओढ असली पाहिजे. जे शिक्षण हाताला काम देऊ शकत नाही असे टाकाऊ व रद्दी शिक्षण घेण्यात काही अर्थ नाही. यासाठी सरकारकडे संघटितपणे मदत मागायला हवी. समाजानेही आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवली पाहिजे. सरकार पिचलेल्या जमातींसाठी विविध योजना राबविते मात्र त्या योजना कोणत्या? त्यांचे पात्रता निकष व प्राप्तीसाठी ची प्रक्रिया काय असते हे या समाजातील गरजू व अज्ञानी लोकांना माहीत नसते. म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहोचून शासन करत असलेल्या उपायांची माहिती थेट जमीन स्तरावर जाऊन द्यायला हवी व समाजातील जागरूक तरुणांनी व संघटनांनी देखील आपल्या समाजाला या योजनांचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल यासाठी पुढाकार घेऊन गरजू लाभार्थ्यांना सहकार्य केले पाहिजे. अगदी निस्वार्थ भावनेने आपले सामाजिक दायित्व समजून!
सहकार हे असे क्षेत्र आहे जे अनेक हातांना काम तर मिळवून देऊ शकते. शिवाय बचत व ऐनवेळी अर्थोत्पत्तीची सोयदेखील करून देऊ शकते. सहकार म्हणजे अगदी मोठमोठे कारखाने गिरण्या पतपेढया किंवा बँकाच नव्हे (असतील तर छानच) पण लहान लहान बचत गट बी.सी.गट किंवा आर.डी.गट हे देखील सहकारच आहे.
बचत गटांनी त्यांच्या प्रदेशातील मागणीप्रमाणे सेवा पुरविणे, उत्पादन पुरविणे अशी कामे केली पाहिजेत. यात महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. छोटी छोटी उत्पादने जी कुटिरोद्योग लघुउद्योग या क्षेत्रात येतात असे व्यवसाय करायला हवेत. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर पापड लोणचे तयार मसाले चटण्या, चटया सजावट नक्षीकाम रांगोळी काम दुध डेअरी चालवणे, दुधाचे पदार्थ बनविणे मेणबत्ती अगरबत्ती गोळ्या चॉकलेट्स बिस्किटे वड्या फुटाणे शेव असे खाद्यपदार्थ बनवणे. बंदिस्त पशुपालन व पक्षीपालन करणे असे व्यवसाय महिला पुरुषांनी एकत्र येवुन करायला हवेत. उत्पादने तयार करणे ती व्यवस्थित साठवून ठेवणे वाहतुकीची साधने उत्पन्न करणे बाजारात घेऊन जाणे इत्यादी कामे व्यवस्थित झाली म्हणजे व्यवसाय यशस्वी होतो. राहता राहिला प्रश्न भांडवलाचा तर त्यासाठी सहकारी धोरणावर अनेकांनी एकत्र येऊन भांडवल उभे करायला हवे. प्रसंगी बँकांकडून कर्ज घ्यायला हवे.
मी हमेशा सहकारी दुकाने ही संकल्पना मांडली आहे. एकापेक्षा अधिक समाजबांधवांनी एकत्र येऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे दुकान व्यापार व्यावसाय ते अगदी अगदी उद्योग सुरू करावेत. गुंतवणूक व निर्मितीप्रक्रियेतील खर्च समान करावा व नफा देखील समान वाटून घ्यावा. आपण जैन मारवाडी सिंधी कोमटी लोकांचा आदर्श घ्यायला हवा. सर्व व्यवहार पारदर्शक व काटेकोरपणे प्रामाणिकपणे एका आईच्या लेकराप्रमाणे केले तर सहकारी व्यवसाय ही संकल्पना अत्यंत यशस्वी होईल व आपला समाज प्रगत व मोठ्या व्यावसायिकांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत अर्थात ज्या ठिकाणी आपण देऊ शकतो तेथे ते दिले पाहिजे. दान केले पाहिजे देताना केवळ पैसाच देणे अभिप्रेत नाही तर पैशाबरोबरच सल्ला संधी मार्ग साधने उपलब्ध करून दिली तरी ते दानच ठरते. विशेष म्हणजे मदत ही एक गरीब सुद्धा दुसऱ्या गरिबाला करू शकतो!! दान करण्यासाठी आपण श्रीमंत असायला हवे अथवा आपण श्रीमंत असायला हवे असे नाही. पैसेच दिले पाहिजेत असे अभिप्रेत नाही. माणसाने एकवेळ खिशाने गरीब असायला हरकत नाही मात्र मनाने नेहमी धनाढ्य असावे. तसेच प्रत्येक वेळी आपल्यालाच काहीतरी कोणीतरी दिले पाहिजे ही स्वार्थी अपेक्षा बाजूला ठेवून कधी-कधी आपणही कर्ण, आपणही धर्म, आपणही राजा हरिश्चंद्र यांच्या भूमिकेत यायला हवे.

आपल्या अपयशाचे खापर इतरांच्या माती फोडण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आपण पुरेशी मेहनत घेत नाही आहोत. आपला मार्ग चुकतो आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. बऱ्याचदा एकाकी राहूनही माणूस विकासाच्या प्रवाहापासून अलिप्त राहतो व मार्ग भरकटतो. परिणामी अपयशी होतो. त्यामुळे समूहात राहा. आपल्यापैकीच सुधारलेले, प्रगत लोक, कसे सुधारले? त्याचा अभ्यास करा, त्यातून बोध घ्या व त्यांचे अनुकरण करा. सुधारितांनीही बिगर सुधारीतांना मोकळ्या मनाने सहकार्य करा. म्हणजे आपला समाज नक्कीच मुख्य प्रवाहात येईल.

मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपापसातील तसेच कुटुंबातील हेवेदावे भांडणे रुसवे-फुगवे छळ मानसन्मान यापासून दूर राहा. हे समजून घ्या की या पृथ्वीतलावर आपले अस्तित्व अत्यंत थोडा काळ आहे. केवळ 60 ते 65 वर्षे या ग्रहावर आपण राहणार आहोत. त्यातील अर्धा काळ हा झोपेत जाणार आहे. राहिलेल्या काळात शिक्षण संघर्ष व संसार सुखदुःखे स्वप्ने कर्तव्ये स्वतःची ओळख निर्माण करणे इत्यादी भरपूर कामे करावयाची आहेत. त्यामुळे नको त्या गोष्टीत स्वतःचा वेळ वाया घालवू नका. बराच वेळ म्हातारपणातील आजारपण व मृत्युशय्येवरील झोपण्यात देखील जाणार आहे. जिवनाकडे डोळसपणे पहा. त्यामुळे उगाच कोणाला त्रास देऊ नका. नको त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका. स्वतःही आनंदी राहा व इतरांनाही आनंद द्या.

विधात्याने दिलेल्या मन बुद्धी व शरीराचा दिलेल्या मर्यादित कालावधीत म्हणजे ज्याला आपण जीवन असे म्हणतो त्यात योग्य असा वापर करून भाग्याने मिळालेल्या मानवी जन्माचे सोने करून दाखवा. जीवन स्वर्गासारखे बनवावे कि नर्कासारखे हे आपल्याच हाती आहे. फक्त ते आपण ठरवायला हवे. स्वर्गात जाण्यासाठी फार श्रद्धावान असण्याची गरज नाही. उपास-तापास करणे गरजेचे नाही. कामधंदा सोडून देवदेव करणे, मोठे मोठे धार्मिक खर्च करणे आवश्यक नाही. आणि स्वर्गात जाण्यासाठी मद्यासारख्या (दारू) साधनांची तर अजिबात आवश्यकता नाही. कृपया व्यसनापासून खूप दूर राहा मग व्यसन ते कोणतेही असो, नशा जुगार अथवा इतर कोणतेही व्यसण हे विनाशाचे प्रवेशद्वार असते. हे लक्षात घेऊ. क्षमा करा मात्र मी पाहतो आपला भटका-विमुक्त समाज अंधश्रद्धा व व्यसन यांचा बराच गुलाम झाला आहे. समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सुज्ञ लोकांनी खासकरून तरुणांनी संघटनांनी पुढाकार घेऊन शिक्षण व प्रबोधनातून समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे.

हे वरील काही उपाय आपण स्वतः करावयाचे आहेत कारण जोवर आपण जागे होणार नाही तोवर आपली प्रगती होणार नाही. समाज म्हणून जी सामाजिक जिम्मेदारी किंवा सामाजिक दायित्व आपण पूर्ण करावयाचे असते ते पुर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाज संघटित असला पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. समाजामध्ये वैचारिक देवाणघेवाण चर्चा चिंतन-मनन बैठका आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. भेटून बोलून समान योजना कार्यक्रम बनविले पाहिजेत. उपाययोजना व त्यांची अमलबजावणी यावर अभ्यासपूर्ण असे विचार मंथन व्हायला हवे. थोरांचा आदर करणे, कौटुंबिक जिम्मेदारी पूर्ण करणे, मदत घेणे देणे, कौतुक करणे, आदर्श निर्माण करणे, आदर्श घेणे, हेवेदावे विसरून संघटित होऊन संघर्ष करणे काळाची गरज आहे.

जेव्हा धरणच फुटते तेव्हा टोपल्याने माती टाकून ते बुजत नसते अथवा जेव्हा जंगलाला वणवाच लागतो तेव्हा चिमणीच्या पंख झटकल्याने तो विझत नसतो. आदर्शवाद व प्रत्यक्षवाद यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. मात्र तरीही छोट्या छोट्या प्रयत्नांनी देखील परिणामांची तीव्रता व दाहकता सौम्य होते. हे छोटे छोटे प्रयत्न आपण नक्की करायला हवेत. मात्र यात मुख्य भूमिका आहे ती सरकारची! ती सरकारी मदत मिळवून देण्याची मुख्य जबाबदारी असते संघटनांची. समाजाने देखील संघटनांच्या पाठीशी कायम व ठामपणे उभे राहणे गरजेचे असते व संघटनांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने नियोजनपूर्वक विविध आपापसात ताळमेळ ठेवून मुख्य उद्दिष्टांपर्यंत घेवून जाणाऱ्या मुख्य प्रवाहात राहून एकजुटीने संघर्ष करत शासनाला आपल्या समस्या सांगून त्या सोडविण्यासाठी कामाला लावले पाहिजे. यासाठी स्वतः काही उपाय सुचवून ते मागणी स्वरूपात लावून धरले पाहिजेत.

मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की ज्या भटक्या विमुक्त जमातींच्या अंगभूत कौशल्यांचा वापर शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीमध्ये करून घेतला त्याच कौशल्यांचा वापर हे लोकशाहीतील आपले शासन आपल्या कार्यात करून का घेऊ शकत नाही? या जातींना बेरोजगार करण्यापेक्षा त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी, या विविध पारंपारिक लोककला, जीवन संस्कृती जोपासण्यासाठी शासन पुढे का येत नाही? त्यासाठी विविध अभ्यासक्रम शाळा व महाविद्यालयात का निर्माण करत नाही? खरेतर या सर्व पारंपरिक कलागुणांना चालना दिली पाहिजे. काही पारंपरिक व्यवसाय काळाच्या ओघात आधुनिकतेच्या प्रभावामुळे बंद होऊ शकतात मात्र त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने अशा व्यावसायिकांना अथवा जमातींना पर्याय दिले पाहिजेत. मुख्य प्रवाहात जिथे तो नवा असतो तिथे आणण्यासाठी अशा जमातींना प्राधान्ये प्रशिक्षणे व आरक्षणे दिली पाहिजेत. आजही विविध कला प्रयोग सादर होतात मात्र त्यांचे कंत्राट भांडवलदार घेतात. देवस्थाने मोठमोठे कलाप्रयोग यात या पारंपारिक कलाकारांना निव्वळ मजुरांप्रमाणे वापरून राबवून घेऊन त्यांच्याकडून अल्प मोबदल्यावर कामे करून घेतली जातात. त्यात सरकारने हस्तक्षेप करून ही कंत्राटे त्या-त्या जातीच्या लोकांनाच कसे मिळतील हे पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ नद्या धरणांचे कंत्राट भोई मल्लाव कोळी बेस्तर गाबील यांनाच मिळाले पाहिजे. देवस्थानांचे कंत्राट गोंधळी जोशी गोसावी अशा जमातींनाच मिळाले पाहिजे. प्रत्येक स्मशानभूमीमध्ये मसनजोगी सरकारी कर्मचारी असला पाहिजे व त्याची नेमणूक संबंधित स्थानिक संस्थांनी केली पाहिजे. अस्वच्छ कामांची टेंडर्स भंग्यांना मेहतरांनाच मिळाली पाहिजेत. नाहीतर होते काय की ती कामे करतात हीच मंडळी मात्र नफा घेतात उच्चवर्णीय भांडवलदार लोक.

जंगल संवर्धनासाठी कायदे आले म्हणून वृक्षतोड बंद झालेली नाही. वनांची लुट थांबलेली नाही. आजही वृक्ष तोडले जातात. आजही वनांमधील पाने मध डिंक औषधी वनस्पती इ. जमा केल्या जातात. फरक एवढाच की ही सर्व कामे कायदेशीर पद्धतीने केली जातात. मग तिथे लागणारा कर्मचारीवर्ग कामगार वर्ग हा ज्यांचा या क्षेत्रातील रोजगार बुडाला आहे अशा पारंपारिक जमाती जसे कंजारभाट, कटाबु, वैदु अशा जमातींमधुनच का घेतला जात नाही? घेतला पाहिजे.

विविध कारखान्यांना कंपन्यांना कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यासाठी अधिकृत सुरक्षा एजन्सी तसेच चोरी दरोडेखोरी लूटमार अशा विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस दलात प्राधान्याने कैकाडी बेरड रामोशी पारधी कंजारभाट बंजारा वाघरी अशा जमातीच्या लोकांना संधी दिली पाहिजे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटे व त्यांचे परवाने गवंडी वडार बेलदार बेस्तर अशा पारंपारिक बांधकाम व्यवसाय करणाऱ्या जमातींनाच मिळाली पाहिजेत. शासनाच्या विविध योजना कार्यक्रम सूचना अहवाने प्रबोधने इत्यादींची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी शासन लाखो हजारो रुपये जाहिरातींवर व प्रसार माध्यमांवर खर्च करते. त्याऐवजी शासनाने संपूर्णपणे प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आज रोजी बेरोजगार झालेल्या भिक्षुक व कलावंत जसे की गोंधळी गोसावी भराडी चित्रकथी हेळवे जोशी भुते मरीआईवाले कडकलक्ष्मीवाले यांनाच अशी कामे व त्यांची कायदेशीर कंत्राटे दिली पाहिजेत.

पुनर्वसनाच्या या प्रक्रियेमध्ये शासनासह समाजानेही आपला वाटा उचलला पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक सार्वजनिक सण-उत्सव साजरे केले जातात. यामध्ये मंडळांची महत्त्वाची भूमिका असते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले तर त्यांच्याकडून कला व संस्कृती जोपासण्याचे व रिकाम्या हातांना काम देण्याचे महत्त्वाचे काम होऊ शकते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती उत्सव, विवाह सोहळे अशा अनेक प्रसंगी मंडळांनी डिजिटल देखावे, डीजे यांवर पैसा खर्च करण्यापेक्षा या पारंपारिक लोककलावंतांना संधी दिली पाहिजे. यामुळे केवळ यांच्‍या उदरनिर्वाहाचाच प्रश्न सुटेल असे नाही तर आपण नष्ट होत चाललेली लोककला व आपली वैभवशाली परंपरा टिकवून ठेवण्यात देखील यशस्वी होऊ असे मला वाटते.

गोपाळ, कोल्हाटी, डोंबारी या खेळकरी कसरतीकार जमाती जन्मानेच शारीरिकदृष्ट्या चपळ काटक व लवचिक असतात. यांच्या या उपजत क्षमतांचा व कौशल्यांचा उपयोग अग्निशमन दल, मदत व पुनर्वसन विभाग व वनविभाग इत्यादी क्षेत्रात प्राधान्याने करून घ्यायला हवा. यांच्यावर शिक्षण व प्रशिक्षणावर थोडासा खर्च केला तर ही मंडळी जिम्नॅस्टिक्स व ॲथलेटिक्स मधे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसह ऑलिम्पिकमध्येही देशासाठी पदके जिंकतील याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही.

आयुध निर्मिती व यंत्राद्वारे भांडी अवजारे व इतर उत्पादने निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये शिकलगार घिसाडी लोहार ओतारी ठुकारी छप्परबंद अशा कारागीर जमातींना प्राधान्याने संधी दिली गेली पाहिजे. तर वस्त्रोद्योग क्षेत्रात काशीकापडी धोबी परीट कोष्टी अशा लोकांना वाव असला पाहिजे.
गुप्‍तहेर खात्यामध्ये बहुरुपी तिरमल अशा जमातींच्या लोकांचा चतुराईने वापर करून घेतला गेला तर सरकारचे काम अधिक सोपे होईल. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी खरा पोलीस माझ्या वयाच्या साधारणपणे तेराव्या-चौदाव्या वर्षी पाहिला. तोपर्यंत मी पोलिसाच्या वेशात येणाऱ्या बहुरुपयालाच पोलीस समजायचो! सांगायचे तात्पर्य म्हणजे या लोकांकडे अंगभूत कौशल्ये आहेत. त्यांना कुठल्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. अनुभवाने ही मंडळी वागण्या-बोलण्यात परिपक्व झाली आहेत. म्हणून अशांना हेरगिरीचा परवाना द्यायला हवा. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज ही संकल्पना सरकारला चालते तर मग प्रायव्हेट हेर असायला काय हरकत आहे. बहुरूप्यांना पोलीस मित्र म्हणून तर गारुड्यांना सर्पमित्र म्हणून प्रमाणित करून परवाने द्यायला हवेत.
विविध प्राणी संग्रहालये, अभयारण्ये वनविभाग यामध्ये गारुडी मदारी दरवेशी माहुत यांना अग्रक्रमाने कामे दिली पाहिजेत. तटरक्षक दलात पाणबुडे म्हणून व मदत व पुनर्वसन विभागात, अग्निशमन विभागात बेस्तर, भोई, मल्लाव, कोळी, गाबील अशा जमातींना काहीसे प्रशिक्षण देऊन सामावून घेतले पाहिजे. खरेतर यांना प्रशिक्षणाचीही आवश्यकता नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी लाटांवर व धोक्यात घातले अशांच्या कौशल्यांचा वापर करून घेणे हे शासनाच्या दृष्टीनेही फायद्याचे व नैतिकतेच्या दृष्टीने ही न्यायाचे ठरेल.

आज आपण पाहतो नैसर्गिक साधनसंपत्तीची अगदी बेहिशोब व बेलगाम पद्धतीने लुट सुरू आहे. सरकारी व खाजगी कंपन्यांचे व्यवसाय उद्योग या क्षेत्रात जोरात सुरू आहेत. मात्र अनादी काळापासून नैसर्गिक साधन संपत्तीच्या जिवावर, तीचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत, ज्या पारंपारिक जमातींनी त्यावर उदरनिर्वाह केला, संस्कृती टिकवून ठेवली, त्या जमातींना आज कुठेच स्थान नाही! ही शोकांतिका म्हणावी लागेल.
पशुपालनावर उपजीविका असलेल्या गवळी गोपाळ धनगर आदी जमातींना पशुपालनासाठी अनुदान दिले पाहिजे. तसेच आरक्षित क्षेत्र म्हणजे गायरान वा वनराई उपलब्ध करून दिले पाहिजे. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या ताब्यातील वनक्षेत्रे माळराने पशूंना चरण्यासाठी खुली करून दिली पाहिजेत. अशा क्षेत्रात शेळ्यामेंढ्या, गाढवे, घोडे इतर जनावरे यांचे खाद्यान्न असलेला चा-याची लागवड केली पाहिजे. त्या चा-याचे जतन केले पाहिजे. पशुपालकांना निवाऱ्यासाठी राखीव क्षेत्र असले पाहिजे.  त्यांना ओळखपत्रे व परवाने दिली पाहिजेत.

मला नेहमी प्रश्न पडतो की तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादन करणारे कारखाने, मद्य निर्मिती करणारे कारखाने बंद करण्याची मागणी करणाऱ्या जनहितयाचिका न्यायालय अमान्य करते. कारण न्यायालय या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांवर याचा विपरीत परिणाम होईल याचा विचार करते. मग भीक मागण्या-या, कसरती करून वर्षानुवर्षांपासून पोट भरणार्‍या जमातींना सरकार मज्जाव कसा काय करू शकते? एकीकडे घोड्यांच्या शर्यती मान्य आहेत. शर्यतींवर होणारा घोडेबाजार शासनाला मान्य आहे तर दुसरीकडे गारुडी मदारी नंदीबैलवाले दत्ताच्या गाडीवाले पोपटाच्या साह्याने भविष्यवाणी करणारे, वाघवाले, आस्वलवाले यांवर बंधने का लादली जातात? म्हणजे सरकार या जाती-जमातींच्या दुःखांपेक्षा प्राण्यांच्या दुःखाबाबत अधिक संवेदनशील आहे! सरकारला या जमातींच्या गुलामगिरीपेक्षा प्राण्यांच्या गुलामगिरीची जाणीव जास्त आहे. यावरून सरकार मग ते कोणतेही असो भटक्यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे याची पुरती कल्पना येते. माझा हेतू सरकारवर किंवा कायद्यावर टीका करण्याचा नसून सरकारचे धोरण व सरकारने निर्माण केलेले हे कायदे भटक्या-विमुक्तांच्या कसे मुळावर आले आहेत याची जाणीव करुन देणे हा आहे. बरे कायदे केलेतच तर मग या कायद्यांनी भटक्या-विमुक्तांच्या  जीवनमानावर काय विपरीत परिणाम केलेत ते ही अभ्यासा आणि मग भटक्या विमुक्तांचे पुनर्वसन करणारे कायदेही कायदेमंडळात संमत करा.

 मला वाटते की या भटक्या विमुक्तांनाकडे संपूर्ण देशभर (महाराष्ट्रातील 14 अधिक 28 जमातींसह) सर्व जमातींकडे निर्वासित, भूमिहीन, अशिक्षित, असुरक्षित, असंघटित, पारंपारिक कलांत कुशल पण आधुनिक जगात अकुशल म्हणून बेरोजगार, अस्थिर, भयभीत, वंचित व दुर्लक्षित लोकांचा वर्ग म्हणून पाहायला हवे. पारंपरिक रोजगार आधुनिकतेने हिसकाऊन घेतलेल्या निराश्रित लोकांचा वर्ग म्हणून पाहायला हवे.

शासनाची ध्येय धोरणे ठरविणार्‍यांनी या बाबींचा गांभीर्याने विचार करायला नको का? आज रोजी या जमाती अगदी वेठबिगारांचे जीवन जगत आहेत. त्यासाठी शासनाने या जमातींना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात, त्यांच्यातील अंगभूत क्षमता व कौशल्ये ओळखून त्यांना सामावून घेतले पाहिजे. त्या त्या क्षेत्रातील कामांची कंत्राटे ही या जमातींनाच मिळाली पाहिजेत. कामगार अथवा कर्मचारी म्हणूनही याच जमातींना प्राधान्याने नेमले गेले पाहिजे. या जमातींना तसे प्रमाणित करून प्रमाणपत्रे, ओळखपत्रे व अधिकृत परवाने दिली पाहिजेत. तरच ख-या अर्थाने यांचे पुनर्वसन होईल. तरच आधुनिकीकरण झाले असे म्हणता येईल.

पुनर्वसनाच्या या उपायांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना, या जमातींचे शिक्षण नसणे अथवा कमी शिक्षण असणे ही तांत्रिक अडचण येईल. पण त्यांच्यात कौशल्यांची कमतरता नाही, शिक्षण महत्त्वाचे की कौशल्य महत्त्वाचे? नियम महत्त्वाचे की जीवन महत्त्वाचे? यावर सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. शिक्षण हवेच आहे तर शासनामार्फत नोकरीपूर्व रोजगारपूर्व मोफत शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्या त्या क्षेत्रात त्यांना सामावून घेतले जाऊ शकते. आजच्या बदललेल्या काळात या लोकांचे रोजगार हिरावून घेण्यात आले आहेत. त्यांचे समायोजन होईल, त्यांच्या हाताला काम मिळेल, पोटाला अन्न अन अंगाला कपडा मिळेल. शिवाय त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा उपयोग होऊन शासनाचे कार्य देखील अधिक प्रभावी व परिणामकारक होईल. ज्यांचे नुकसान झाले आहे लाभही त्यांनाच मिळाला पाहिजे! तो मिळवून देणे म्हणजे खरे पुनर्वसन!

मी तर म्हणतो केवळ त्यांच्या त्यांच्या पारंपारिक क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात तेथील आवश्यक ज्ञान व कौशल्ये विविध प्रशिक्षणे अभ्यासक्रम पाठ्यक्रम यातून देऊन, तेही मोफत देऊन त्यांना कामे दिली पाहिजेत. आजही कामाची वानवा नाही. उद्योगधंद्यांसाठी तंत्रज्ञ मजूर कारागीर, रक्षक भरपूर लागतात मात्र आजची कामे यांच्यासाठी नवीन आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये वेगळी आहेत. हे अज्ञानी निरक्षर गरीब लोक या आधुनिक जगाशी अगदी अनभिज्ञ आहेत. म्हणुन ख-या अर्थाने यांचे पुनर्वसन करायचे असेल तर, पिढ्यानपिढ्यांचा शैक्षणिक व आर्थिक अनुशेष भरून काढायचा असेल तर खऱ्या अर्थाने या लोकांना मोफत तांत्रिक शिक्षण कौशल्य शिक्षण व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायला हवे आम्हाला अधिकारी बनवा अशी मागणी नाही. तशी अपेक्षा नाही. ती त्यांची योग्यता ही नाही मात्र जीवन जगणे, जीवन जगता येणे हा त्यांचा अधिकार आहे व शासनाने या जमातींना जीवन जगण्यास सक्षम व सबळ बनविले पाहिजे. हे शासनाचे कर्तव्य आहे.  एकदा का या जमाती शिक्षणाच्या व रोजगाराच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या की त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीची अथवा प्राधान्याची आवश्यकता राहणार नाही.

मित्रांनो माझ्या मनामध्ये सतत एक विचार येतो. आजही समाजामध्ये संगीताची आवड प्रचंड प्रमाणामध्ये आहे. लोकांच्या या संगीत प्रेमाचा उपयोग मोठमोठे व्यावसायिक खूप मोठ्या प्रमाणात करून घेत आहेत. मात्र श्रोते व प्रेक्षकांच्या मनामध्ये असणाऱ्या या कलाप्रेमाचा उपयोग आपण या प्रवाहापासून दूर गेलेल्या लोककलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी करून देण्यात अयशस्वी ठरत आहोत. मला वाटते शासनाने एक देश पातळीवर व्यावसायिक कला मंडळ स्थापन करायला हवे. जसे की भारतीय राष्ट्रीय कला नियामक मंडळ. हे मंडळ बीसीसीआय प्रमाणे स्वायत्त पण शासनास उत्तरदायी असावे. या मंडळामार्फत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, लाईव्ह कॉन्सर्टस, स्पर्धा, पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम यांचे आयोजन करावे. त्यांच्या प्रसारणाचे सर्वाधिकार  व हक्क या मंडळास असावेत. तो पैसा सरकारी तिजोरीत जमा करायला हवा. लोककलेवर आधारित विविध कार्यक्रम जसे गायन वादन नर्तन अभिनय यांच्या व्यावसायिक मैफिली भरवुन त्यातून या कार्यक्रमांचे हक्क शासनाकडे असावेत व वाहिन्यांवरून हे कार्यक्रम दाखवले जावेत त्यातून मिळणारा पैसा वृद्ध लोककलावंतांच्या लोककलावंतांसाठी वापरला जावा. लोककलावंतांना एक सन्मानजनक आयुष्य जगता यावे यासाठी निवृत्तीवेतन सुरु करावे. या क्षेत्रातही लिगचा प्रयोग व्हावा. क्रिकेटमध्ये जसा आयपीएलचा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला व त्यातून तयार झालेला पैसा माझी क्रिकेटपटूंच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणला गेला त्याच धर्तीवर कला क्षेत्रातही प्रयोग व्हावा. कलेला व्यावसायिक व्यासपिठावर आणावे. सिंगिंग लिग, डान्सींग लिग, म्युझिकल शोज व काँपिटीशन्स भरवून त्यातुन कलाकारांना बोली लावुन खरेदी करावे व मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग वयोवृद्ध जेष्ठ लोककलाकारांना पेन्शन स्वरुपात द्यावा. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल मात्र त्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ततीची आवश्यकता आहे. यासाठी भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच संघटना, सेवाभावी व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे सरकारवर दबाव आणला पाहिजे. आपल्या मागण्या लावून धरून त्या मान्य करून घ्यायला पाहीजेत. तरच या देशातील विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी बसविण्यात यश येईल.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

लोककला

*लोककलाः*

*दिसतय आम्हाला बी*
*मजेत आहात सवताशी*
*आजान दिसताय बहुदा*
 *कलाकारांच्या समस्यांशी.*
*पण बघू नका मजा केवळ*
*काळजी घ्या थोडीशी*
*कारण नातं आहे आमचं*
*पूर्वापार आहे इथल्या मातीशी*

*चाळ बांधली पायात पण*
*पाय नाही ढळू दिलं.*
*पिढ्या घातल्या कलेत पण*
*नख नाही कळू दिलं...*

*टाळ्या शिट्ट्यांचा जमाना गेला*
*टाळकरी हाती आता रिमोट आला*
*मग काय सारं लागिरं झालं*
*अन पारंपारीक सारं बेकारं झालं...*

*पडद्यावरची मयत कला*
*तमाशाच्या मुळावर आली.*
*ढोलकी सोबत फेट्यांची*
*काहीशी फारकत झाली..*

*गण, गौळण, रंगबाजी हुरूप आणायचे मस्त*
*वगातून प्रबोधन व्हायचे कितीतरी रास्त.*
*पण डब्बे आले घरोघरी आणि*
*कलावंतांच्या पदरी बेकारी..*

*ही फुसफुस हे दमन समजुन घ्या मायबाप*
*श्वास कोंडतोय आमचा अन कसला* *दाखवताय विकास?*
*शुद्ध, शालीन, संस्कारिक ते सारं गेलं*
*हे कसलं दाखवताय विभत्स्य अन* *अश्लील चाळं?*

*जुन्या अंगी सोनं होतं*
*आजवर ठेवलं समदं जितं.*
*संस्कृतीची खिचडी केलीत*
*अन श्रोत्यांची मारलीत मतं...*

*नागड्या पायांनी डांबरीवर नाचतय*
*बेंबीच्या देठापासून ढोलकं वाजवतय.*
*उपाशीपोटी लेकरू मारतय उड्या*
*अन साहेब गाडीतुन वाजवतोय टाळ्या...*

*टी.व्ही. सिनेमा, डी.जे. ऑर्केस्ट्राँ*
*आमचा कशालाच विरोध नाही.*
*पण आमचा पिढ्यांचा धंदा बसलाय*
*आमचा दाखवाना ना अपराध काही...*

*पुर्वी भजना किर्तनात गावातले उठायचे*
*नाही म्हणलं तरी चार पैसे यायचे.*
*आता किर्तनकरूही हायटेक झालेत*
*आयतीच सी.डी.अन कोरस* *आणायलेत...*

*खोटी प्रगती तुम्हीच गाजवा*
*तुपात खिचडी तुम्हीच शिजवा*
*पण आम्हालाबी पोटापुरता शिदा मिळू द्या*
*आमची बी थोडीशी बोटं भिजु द्या...*

*जातीचे कलावंत चाललेत बराशीवर*
 *बिनबुडाचे झिलकरी बसल्यात राशीवर.*
*कधीकाळी कलेचे दर्दी कला बघायचे*
 *त्यांच्या जीवावर लाखो कलावंत जगायचे..*

*विचित्र जगात चरित्राचा मेळ नाही*
*सचित्र पुराणकथा पहायला वेळ नाही.*
*चित्रकथी रंगतदार सादर करी कला*
*ॲनिमेशनने त्याच्यावर घातला घाला...*

*अहो भारुडे अभंग श्रवणीय किती*
*प्राचीन भारताची ही श्रीमंती होती.*
*पण बाहुला-बाहुलीचा खेळ झाला सारा*
*बाहुली नृत्यांना राहिला नाही थारा...*

*काल्पनिक दुनियेत नाथ कधी कळतील*
*डवऱ्या गोसाव्यांचे गावाकडे पाय कधी वळतील?*
*सकाळी सकाळी गावभर  छान फिरायचे*
*पेटीवरच्या गाण्याचे स्वर कानात भरायचे..*

*रंगीबेरंगी वेश अर्धा असायचा उघडा*
*मोल नाही लक्ष्मीला अन मरी आली संस्कृतीला.*
*पोतराज बी कवाचा गायब झाला*
*कळत नाही काय म्हणावे या विकृतीला...*

*गोंधळ विधीची पत ढासळली*
*जातीवंताची गळचेपी वाढली.*
*उठसुठ कोणीही होतोय गोंधळी*
*शास्त्रोक्त गोंधळ पटत नाही*
*धांगडधिंग्याला मागणी लई...*

*सकाळच्या पारी असे वासुदेव दारी*
*हरिनाम मुखी ओठावर बासरी.*
*कृष्णलीलेत कोणाला रस नाही राहिला*
 *रात्रीच टीव्हीला रासलीला पाहिला...*

*लग्नाची शोभा मोरवाला वाढवायचा*
*पिसारा फुलवून गिरकी मारायचा.*
*त्याची गिरकी आता त्या लांडोरी घेतात*
*अन हौसेने बाहुल्यावर डीजे वाजवतात...*

*रानामाळात निसर्ग गाणे*
*कसं अंतकरणात रुतायचे*
*भलरीच्या सुरांनी शेतकरी*
*कसे जोमाजोमाने राबायचे...*

 *मद्यानेच झुलायलेत सारे*
 *यांना भोलानाथची झूल काय कळणार?*
 *कार्टून्सच्या अन गेम्सच्यापुढं आता*
 *नंदीबैलाला कोण काय विचारणार...*

*जिथं ख-याचीच राहीली नाही भिती*
*तिथं खोट्यानं आव आणावा किती?*
*कामच नाही राहीलं हाताला तर*
*बहुरूप्यानं जगावं किती मरावं किती???*

*तोलच कुठ राहिलाय वागण्यात*
*सर्वकाही बेताल दिसतय.*
*डोंबारीन करतेय कसरती तरी*
*कोण तिच्या कडं बघतय....*

*पापं वाढली म्हणून सूर्यदेवही कोपतोय*
 *सारथी अरूण पांगळा म्हणून*
*आम्ही खापर माती त्याच्या फोडतोय.*
*सकाळची पवित्र वाटायची आंघुळ*
*जवा भिक्षा मागायला यायचा पांगुळ....*

*माणसंच माकडं झाल्याने बहुदा*
*कायद्याने माकडं दिसत नाहीत.*
*पण मदारीच्या पातेल्यात आता*
*तांदुळही शिजत नाहीत....*

*भूमिहीन कलाकार बँडवाले असायचे*
 *कलेच्या आशिर्वादे पोटाला खायचे.*
*ऐकावेत असे सूर कानी तेव्हा पडायचे*
*पण लुप्त झाली पिपानी अन बेसूर डीजे आले..*

 *लेकरासमान संभाळणारे गारूडी*
 *लेकरांना हिंदीत साप दाखवायचे.*
 *लुंगी घालून खेळ करायचे गमतीदार*
 *अन सुरेल पुंगी वाजवायचे...*

*मसनात तेवढे सगळे जातात*
*त्यागी असोत वा भोगी.*
*जवळचे लांबचे सगळेच भेटतात*
*पण भेटत नाहीत जोगी....*

*म्हणून एका कलाकाराची
 सुगी येणार नक्की*
*शब्दांवर विश्वास ठेवा
 खात्री देतो पक्की.*

*जर खोट्याच्या या जगात
 खरं नाही चालणार*
*तर रुदाली बिगर कुणीच
 कसं खोटं रडणार?*

*केवळ टाळ्यांनी पोट
भरत असतं सरकार
*तर आम्ही काहीच
 केली नसती तक्रार

*पण घरी गेलंकी बायकां लेकरं
 कापडांभवती फिरत्यात
घामामळा शिवाय नसतय काहीच
 म्हणून मनातच रडत्यात

*लुप्त होतोय लोकावाज
*अन रुक्ष होतेय लोकसंगीत.
*विसरू नका लोककला
*खोट्या प्रतिष्ठेच्या धुंदीत.....

*कवीः बाळासाहेब सिताराम धुमाळ
*मोबाईलः 9673945092.

Thursday, 15 March 2018

आधुनिकीकरणाच्या उदयाने लोकजीवनाचा अस्त

.....…...... आधुनिकीकरणाच्या उदयाने लोकजीवनाचा अस्त.....

मित्रांनो नमस्कार...
अशातच मी माझी "लोककला" नावाची एक कविता पोष्ट केली होती. या कवितेमध्ये मी आपली समृद्ध पारंपारिक लोककला कशी लुप्त होत चालली असुन याचा लोकजीवनावर कसा विपरीत परिणाम होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यात यशस्वी झालो की नाही अथवा मला काय सांगायचे होते हे आपण ओळखले की नाही? माहीत नाही.
असो प्रत्येकालाच काव्याची भाषा समजतेच असे नाही आणि प्रत्येक विषय कवितेतून तितक्याच प्रभावीपणे व विस्ताराने मांडला जाऊ शकतो असेही नाही. कवितेमध्ये शब्दांची, जागेची मर्यादा असते. मात्र अनेकांना ती आवडली. तशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. म्हणूनच व माझा ही हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने या गंभीर विषयावर मी गद्य स्वरुपात काही प्रश्न, मुद्दे, समस्या व अपेक्षा व्यक्त करून काहीतरी अजून जास्त व सविस्तर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आजच्या आधुनिक जगाचा पाया प्रबोधनकारी तथा वास्तववादी विचारवंतांनी घातला तर कळस विज्ञानवादी अभ्यासकांनी व संशोधकांनी चढवला यात शंका नाही. अर्थात हा प्रवास अद्याप सुरूच आहे. उद्या काय होणार आहे याचे भाकितही आता करता येणार नाही मात्र काय झाले आहे याचे विवेचन मात्र नक्कीच करता येईल. आधुनिकीकरणाचा खुपच ठळक परिणाम मानवी जीवनावर झाला. हा परिणाम जितका चांगला झाला तितकाच तो वाईटही झाला. आधुनिकीकरणाचा ग्रामीण लोकजीवनावर किती भयानक परिणाम झाला आहे हे त्या जमातींना पाहुन समजते ज्या आज हतबल आणि मरणासन्न जीवन जगत आहेत. यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण, शहरीकरण, सर्व स्तरातील परिवर्तन हे आधुनिकीकरणाचेच भाग आहेत.
यांत्रिकीकरणामुळे उत्पादन प्रक्रियेपासून ते अगदी दैनंदिन जीवनापर्यंत यंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर वाढला. परिणामी उत्पादन वाढले, उत्पादनाचा दर्जा सुधारला. कमी वेळेत व कमी मनुष्यबळात अधिकाधिक उत्पादन बाहेर पडू लागले. यामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण झाल्या. रोजगाराच्या व्याख्या बदलल्या. अपेक्षित कौशल्ये बदली. रोजगारांचे स्वरूप व त्यांची नावे बदलली हे सर्वांना माहीत आहे. मात्र भारतासारख्या जाती आधारित व्यावसाय वर्गीकरण असलेल्या देशातील ग्रामीण पारंपारिक लोक जीवनावर याचा अत्यंत दुरगामी परिणाम झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा शेती असल्याने शेतीवर आधारीत व शेतीपूरक छोटी-मोठी कामे करून उदरनिर्वाह करणे हाच ज्या वर्गाचा पारंपारिक व्यवसाय होता तो बलुतेदार व कारागीर वर्ग बेचिराख झाला आहे. बलुतेदार व कारागीर वर्गाप्रमाणेच किंबहुना त्यांच्याहुनही अधिक उपासमारीची वेळ आलेला वर्ग म्हणजे भिक्षुक, कलाकार, कसरतीकार, नकलाकार भटक्या विमुक्त जमातींचा वर्ग!!
आज रोजी ज्यांना अविकसित म्हणून गणले जात आहे अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील बांधवांच्या प्रगतीसाठी घटनेमध्ये तरतुद करून ठेवली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था व राज्यव्यवस्था दोहोंचाही यांच्याकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन किमान सहानुभूतीपुर्ण तरी आहे. हा वर्ग संघटीत आहे. अर्थसंकल्पात यांच्यासाठी आर्थिक तरतुदी कराव्याच लागतात कारण राज्य घटनेने त्यांचे अनुसूचित्व मान्य करून त्यांना एक प्रकारे न्याय दिला आहे.
शिवाय अलिकडे ज्यांना संकटग्रस्त म्हणून गणले जात आहे असा वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग. निसर्गाची अनिश्चितता, सिंचनसोयींचा अभाव, हमीभावाची तरतुद नसणे, शासनाच्या धोरणांचा दुष्परिणाम, जास्त गुंतवणूक तुलनेने कमी उत्पादन, कर्जबाजारीपण यामुळे शेतकरी वर्ग निश्चितच संकटात सापडलेला आहे. मात्र हा ही वर्ग संघटीत आहे. यांच्यासाठी देखील शासन विविध तरतुदी करीत आहे. कर्जे मिळत आहेत, ती माफही होत आहेत. अर्थसंकल्पात शेतीविषयक तरतुदी केल्या जात आहेत. त्यांचा आपला हक्काचा व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध आहे. संकटसमयी शेती गहाण ठेवणे, शेती विकणे असे पर्याय तरी यांच्याकडे उपलब्ध आहेत.
वरील दोन्ही वर्गावर अनिच्छेने का होईना शासनाला लक्ष द्यावेच लागते. मोठे व संघटीत वर्ग असल्याने राजकीय प्रतिनिधित्व मिळते. प्रश्न लावून धरले जातात व प्रसार माध्यमेही बाजू उचलून धरतात.
मात्र या देशातील किमान एक त्रुत्यांश लोकसंख्या असलेला भटका विमुक्त, बलुतेदार, आलुतेदार, कलाकार, नकलाकार, कसरतीकार समाज भूमिहीन आहे. यांना काही विकताही येत नाही, यांना कोणी कर्जही देत नाही, आणि जरी यांनी आत्महत्या केली तरी काही शासकीय मदत तर मिळतच आहे वरून ती आत्महत्या म्हणजे संकटग्रस्त वर्गाची आत्महत्या म्हणून मोजलीही जात नाही. यांना राज्यघटनेनेच ख-यार्थाने अविकसित व मागास असे मोजलेले नाही. अर्थसंकल्पात तर यांना अजिबातच थारा नाही. जरी यातील सर्वच जाती जमाती या इतर मागास प्रवर्गात मोडत असल्या तरी हा इतर मागास प्रवर्ग जवळजवळ खुल्यातच जमा आहे. बरे शासनाने यांच्यासाठी जरी काही योजना राबविल्या, काही तरतुदी केल्या तरी शिक्षणा अभावी ह्या जमाती त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणजे एकीकडे शिक्षणाचा अभाव दुसरीकडे घटनात्मक गैरसोय, तिसरीकडे रोजगाराची अनुपलब्धता व चौथीकडे असंघटित असल्याने हा वर्ग चहुबाजूंनी समस्यांनी जखडला गेला आहे. अज्ञानी असल्याने व असंख्य जमातींमध्ये विभागला गेला असल्याने असंघटीत आहे. त्यांमुळे अन्यायाची जाणीवही नाही आणि न्यायाची मागणीही करता येत नाही.
 उदरनिर्वाहाबाबतीत पिढ्यानपिढ्यांपासुन आपापल्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक जमाती रोजगाराच्या बाबतीत गावातच शतप्रतिशत निर्धास्त होत्या. पण यांचा हक्काने व खात्रीपूर्वक मिळत आलेला रोजगार ओरबाडला गेला. साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, गवंडी, धोबी, परिट, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार या अशाच काही जातींची उदहारणे आहेत. ज्या गावे सोडून शहरांकडे वळत आहेत. उपजत कौशल्ये व बालपासुनच घरच्याघरीच प्रशिक्षण मिळत असलेल्या या कुशल जाती बेरोजगार झाल्या आहेत. कंपन्या व कारखान्यांमध्ये जरी रोजगार असले तरी ते पारंपरिक कौशल्ये पाहुन दिले जात नाहीत तर व्यावसायिक शिक्षण, उच्च शैक्षणिक पात्रता व बुद्धिमत्ता तपासून दिले जात आहेत. हे शिक्षण घेण्यासाठी जातीला काहीच अर्थ नाही तर केवळ अर्थाला (पैशाला) अर्थ आहे!! भारतासारख्या पारंपारिक व्यवसायावरून जातीची निर्मिती झालेल्या देशात पिढ्यान् पिढ्यांपासून यशस्वीपणे अस्तित्वात असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईस आली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात समाजसेवा करणारी मंडळी, सेवाभावी संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनात्मक संस्था, विविध समित्या व आयोग यांच्या शिफारशी व अहवाल यामुळे शासनाने काही पर्यावरण पूरक, समतामूलक, प्रथा परंपरा व अंधश्रद्धा विरोधी कायदे केले. हे तात्विक द्रुष्टीने योग्यही आहे. हे असे कायदे व नियम करावे लागतात एव्हाना केलेच पाहिजेत. त्यांचा आदर करणे, त्यांचे पालन करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्यही असावे. मात्र कायदे करताना अहित कोणाचे होणार आहे आणि अहीत कसे होणार याची गोळाबेरीज होणे ही गरजेचे आहे. म्हणजे प्राणिमात्रांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर परंपरेपासून अवलंबून असणाऱ्या गारुडी, मदारी, दरवेशी, जोशी, नंदीवाले, दत्ताच्या गाडीवाले, सर्कसवाले, माहूत अक्षरशः  रस्त्यावर आले आहेत.
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. या बाबतीत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही मात्र अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या प्रयत्नात जोशी, गोंधळी, डवरी, गोसावी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, आराधी, जोगती, मुरळी, देवदासी, देवळी या जमाती मात्र अक्षरशः भरडल्या जात आहेत.  त्यांची रोजीरोटी गेली आहे. दुर्दैवाची व काहीशी मजेशीर बाब म्हणजे या जमाती आता कायद्याने भिकही मागु शकत नाहीत! आई खाऊ देईना अन बाप भीक मागू देईना या म्हणीचा प्रत्येय भिक्षा मागून पोट भरणार्‍या गोसावी, भराडी, गोंधळी, गोपाळ, चित्रकथी, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, भुते, पांगुळ, बहुरूपी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, दरवेशी, वाघ अस्वलवाले, भाविन, जोगती,  देवदासी, मुरळी यांना येत आहे.
ज्यांच्यावर जन्मानेच गुन्हेगार असा ठसा ब्रिटिशांनी लावला व त्यांना पुढे आपल्या सरकारनेही दुजोराच दिला त्या जमातींच्या मुळावर हे कायदे आले आहेत. बेरड, रामोशी, भामटे, पारधी, पावटा, बंजारा वडारी अशा जमातींमधील लोकांकडे इतर लोक आजही संशयाच्या नजरेने व गुन्हेगार म्हणुनच पाहत आहेत. हाती असलेली पारंपरिक कामेही गेली आणि गुन्हेगार अशी ओळख आहे म्हणून कोणी रोजगारही देईना मग आता ज्यांना सरकारनेच कायद्याने अप्रामाणिक ठरवले त्यांना प्रामाणिक असल्याचे शासन प्रमाणित करून प्रमाणपत्र देणार काय?
देवी-देवतांची पुजापाठ करणारे ठराविक लोक होते. मंदिराची साफसफाई करणे, भक्तांना अंगारा धुपारा करणे, देवी-देवतांचे गुणगान कलेतून करणे, असा पारंपारिक व्यवसाय असणारे लोक जसे की गोंधळी, गोसावी, भराडी, चित्रकथी, हेळवे, जोशी, तिरमले, कडकलक्ष्मीवाले, मरीआईवाले यांच्या तोंडचा घास कायद्याने व आधुनिकतेने हिरावून घेतला आहे हे वास्तव मात्र नाकारता येणार नाही.
डोंगर द-या, जंगल वाचवण्यात शासनाला यश आले की नाही हे तुम्हीच तपासून पहा पण ज्यांनी जंगलाचे, वन्यजीवांचे संरक्षण केले, अगदी पिढ्यांपिढ्यांपासून ज्यांनी निसर्गाला देव मानले. त्याला पोटच्या लेकरासारखे सांभाळले व त्याच्या जीवावर स्वतःच्या लेकराबाळाचे पोट भरले ते गारुडी, नंदीवाले, मदारी, दरवेशी, गौरी, गोवाडी, धनगर, जोशी, सापवाले, वाघवले, अस्वलवाले, तिरमल, वैदु यांचे जीवन अगदी नरकासमान झाले आहे.
मी कायद्यांना दोष आजिबात देत नाही अथवा कायदे मानत नाही असेही नाही. मात्र यामुळे वर्षानुवर्षांची व्यावसायिक साखळी जी व्यवस्थित व यशस्वीपणे गुंफली गेली होती, कार्यरत होती ती छिन्नविछिन्न झाली आहे. ग्रामस्तरावर पारंपारिक उद्योग धंदा करणाऱ्या जाती जमाती नेस्तनाबूत होवून कामासाठी बड्या उद्योजकांच्या दारात उभ्या राहिल्या म्हणजे विकास झाला हा विकासाचा दृष्टिकोन अथवा विकासाची व्याख्या मला हास्यास्पद वाटते.
 पुर्वापार नद्या, धरणे, तलाव, खाड्या, समुद्र यातील पाण्यावर अवलंबून राहून पोटाची खळगी भरणाऱ्या भोई, मल्लाव, कोळी गाबीत अशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या लोकांच्या वंशपरंपरागत चालत आलेल्या व्यवसायाला पर्यावरणाचे कारण समोर ठेवून शासनाने त्यांच्यावर आपले पारंपरिक व्यवसाय बंद करण्याची वेळ आणली आहे. जलसाठ्यांचे कंत्राटीकरण आणि यांत्रिक मासेमारी यांच्या समोर या बिचार्‍यांचा निभाव लागेनासा झाला आहे. थोडक्यात काय तर मोठ्या माशांनीच या छोट्या मास्यांना गिळंकृत केले आहे. यांत्रिकीकरणाने ग्रामस्तरावर कलाकुसर व कारागिरी करणाऱ्यांचा पार सुपडा साफ केला आहे. या आधुनिकतेचा आणि यांत्रिकीकरणाचा दुष्परीणाम अनेक जाती-जमातींवर झाल्याचे भयानक वास्तव शासन अधोरेखित करीत नाही.
पारंपारिक समाजरचनेत ग्रामस्तरावर कलाकुसर व कारागिरी करून सेवा पुरवणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची अवस्था ओकले तर सुपारी नसावी अशी झाली आहे. काशीकापडी, ठेलारी, ओतारी, लोहार, गवंडी, कुंभार, बेलदार, वडार, बागडी, कोष्टी, कैकाडी, होलार, कुंभार, तांबोळी, तेली, कासार यांसारख्या शेकडो जाती-जमातींवर उपासमारीची कुराड कोसळली आहे. यंत्रासारखा उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची सजावट व व्यवस्थापन हे या ग्रामीण अल्पशिक्षित कारागीर कामगार वर्गाला करणे शक्य नाही. आवश्यक तेवढे भांडवल उपलब्ध नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने धंदा बंद करण्याशिवाय मार्ग राहीला नाही.
ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे लोककला व लोकसंगीत. हा सर्व लोककलाकार वर्ग ढोबळपणे भूमिहीन आहे. यांना निवारा नाही. पारंपारिक लोककलावंतांच्या व्यवसायामध्ये कंत्राटदार व बड्या भांडवलदारांच्या अतिक्रमणामुळे आलेले व्यावसायिकीकरण हे या सामान्य कलाकार व कारागीर वर्गाच्या मुळावर उठले आहे. हे कंत्राटदार आपल्या पदरी या पारंपरिक कलावंतांना राबवून त्यांना अगदी अल्प मानधन देऊन राहिलेला मलिदा स्वतःच फस्त करतात. हे चित्र सर्व प्रमुख देवस्थाने व व्यासपीठावर सादर होणारे व्यावसायिक संगीताचे कार्यक्रम यांमध्ये दिसुन येते. म्हणजे पिढ्यानपिढ्या कला सादर करणाऱ्या कलावंत जमाती उदरनिर्वाहासाठी ठेकेदारांच्या दावणीला पडल्या आहेत. हे या जमातींचे शोषण आहे.
आज लोककलेच्या क्षेत्रात अनेक जाती जमातींनी पाऊल टाकले आहे. कलेची कुठहीली जात नसते हे मी मान्य करतो मात्र आपल्या देशामध्ये प्रत्येक जातीची म्हणून एक कला आहे. तोच त्यांचा व्यवसाय आहे व प्राचीन आहे,  पारंपारिक आहे . त्यांच्यावर त्याचे कुटुंब चालत आले आहे अशा लोकांवर हे अतिक्रमण अन्यायकारक आहे. त्यामुळे जातिवंत कलाकार व कामगार बेरोजगार होवून कामाधंद्या अभावी गावे सोडून स्थलांतर करत आहेत. या विस्थापितांचे प्रश्न सोडवता सोडवता सरकारच्या नाकी नऊ येत आहेत. सरकार नावाची यंत्रणा हे सर्व हे सर्व प्रश्न सोडवू शकत नाही. पिढ्यान् पिढ्यांपासून बसलेली ही घडी अशी जर विस्कळीत होत असेल तर यामुळे निर्माण होणारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष सरकारी इच्छाशक्तीची गरज आहे.
 जवळजवळ प्रत्येक कलावंत व भिक्षुक जमातीची आपली स्वतःची भाषा, कला, वेशभूषा व उपासना पद्धती आहे. ती जिवंत राहणे टिकून राहणे सांस्कृतिक द्रुष्टीने गरजेचे आहे. मात्र आज आपण पाहतो ह्या लोकांवर अक्षरशः उपासमारीची  वेळ आलेली आहे आणि शासनाला मात्र याच्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यामुळे या वर्गातून आलेल्या बुद्धिवाद्यांनी आपापल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारले पाहीजेत. समस्यांचे गांभीर्य शासनाच्या ध्यानात आणून दिले पाहिजे.
आधुनिकतेतुन होणारा बदल हा अटळ असतो. आधुनिकता म्हणजे परिवर्तन व परिवर्तन हे कधीही भूषणावहच असते. आधुनिकीकरणामुळे होणारे परिवर्तन हे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांसाठी लाभदायक ठरत असते असा दृष्टिकोन मनात ठेवूनच आणि मनाची तशी धारणा करूनच नव्या बदलाचे स्वागत करायचे असते. मात्र या जमातींचा मात्र  भ्रमनिरास होताना दिसत आहे. पारंपारिक समाज रचनेतील हे स्थित्यंतर माझ्यासारख्या सामान्य पण काहीशा सुशिक्षित व्यक्तीला तारक नव्हे तर मारकच ठरताना दिसत आहे आणि म्हणून माझी दम कोंडी होत आहे. दया पवारांनी बलुतं लिहून, लक्ष्मण मानेंनी उपरा लिहून आणि शांता शेळकेंनी कोल्हाट्याचं पोर लिहून या जमातींच्या स्थितीची ओळख सर्वांना करून दिली आहे.
तमाशा सारखी कला ही मनोरंजनाचे व प्रबोधनाचे अत्यंत प्राचीन व प्रभावी साधन सिद्ध झाली आहे. तमाशाकला शेकडो हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे.  हा तमाशा आज रोजी अखेरच्या घटका मोजत आहे आणि दुर्दैवाने आपण व शासन डोळे मिटून शांत बसुन त्यांच्या अंताचा तमाशा पहात आहोत. ही कला व व्यवसाय जगले पाहिजेत. तमाशा कलावंतांच्या आर्थिक अडचणी, त्यांचे सुरक्षिततेचे प्रश्न ऐरणीवर आणणे व ते तत्परतेने सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आधारलेला आहे. अशाप्रकारे पोट भरण्याचे साधन जर लुप्त होत चालले तर त्याचा परिणाम काय होईल व होत आहे हे ही आपण पाहत आहोत.
 रस्त्याच्या कडेला झोपणारे, सिग्नलवर छोट्या-मोठ्या वस्तू विकणारे, भिक मागणारे हे ही एकेकाळी छोटे मोठे कलाकार, नकलाकार, कारागीर अथवा भिक्षुक होते. मात्र आजवरच्या झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून त्यांच्यावर ही पशूसम जीवन जगण्याची वेळ आलेली आहे.
आधुनिकीकरणातून आलेला चंगळवाद आणि मध्यमवर्गीय लोकांच्या मनोरंजनाच्या बदलत चाललेल्या संकल्पना अथवा त्यांनी मनोरंजनासाठी निवडलेली नवी निर्जीव साधने हे ही या पारंपारिक कलावंत कलाकार लोकांच्या उपासमारीस कारणीभूत ठरत आहेत. आधुनिकतेच्या या अनिष्ट परिणामांची नोंद सरकारने घेणे अत्यंत आवश्यक आहे .
मित्रांनो केवळ सरकारवर अवलंबून राहून हे प्रश्‍न सुटतील असे मला अजिबात वाटत नाही. संघटित पुढाकाराने प्रबोधन, उद्बोधन व लोकसहभाग आणि प्रसंगी श्रमदानातून बरेच मार्ग निघू शकतात. लोककला आजही सामान्य श्रोते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र जातिवंत पारंपारिक त्या त्या जातीचे लोककलाकार उपेक्षितच आहेत. याचे कारण शिक्षण व भांडवलाचा अभाव असे आहे. आपण सर्वजन सर्वेक्षण करून पहा, किती सोन्याची, भांड्यांची, बांगड्यांची, बुटा चपलांची, दाढी-कटिंगची ते अगदी भाजीपाल्याची, लाकडाची, हळदीकुंकवाची, पानाफुलांची, कपड्यांची दुकाने परंपरेने ही कामे किंवा व्यवसाय करणाऱ्या जाती जमातीच्या लोकांची आहेत? उत्तर तुम्हाला निश्चितच हादरवून सोडेल. आता इतरांनी आपल्या जातीबाहेरचे व्यवसाय करू नये का? तर हरकत नाही पण याने मूळ जातीच्या लोकांवर उपासमारीची वेळ येते. असे भयावह चित्र पाहून मला प्रश्न पडतो की लोकजीवन उध्वस्त झाले म्हणजे विकास झाला का? आधुनिकतेच्या नावाखाली पारंपारिक समाजरचनेवर जीवनमान आधारलेले लोककलाकार देशोधडीला लागले आणि त्यांच्या छपरा पालावर तुळशीपत्रे ठेवली म्हणजे आधुनिकता का?  काय सरकारला यांचे काहीच सोयर सुतक नसावे? स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सर्व सरकारे आपण विकास केल्याची अफवा पसरवतात. जनतेच्या पैशाने जनतेचा विकास करणारी शासन नावाची यंत्रणा जमीन स्तरावर जाते काय? खरोखरच आपण प्रगती साधली आहे की अधोगती ओढवून घेतली आहे याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.
कारण शेवटी प्रत्येक मानवाला जीवन जगता यावे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध व घटनात्मक अधिकार आहे. मुळात समानता व समता यातील फरकच आपल्या लक्षात येत नाही. समानतेवर जास्तीचे लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नात आपण समाजामध्ये समता प्रस्थापित करू शकलो नाहीत हे अपयश लपविण्यात काही अर्थ नाही. खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असेल तर या कारागीर, लोककलावंत, कलाकार, नकलाकार, कसरतीकार, भिक्षुक जमातींकडे लक्ष देऊन ते जे आज खऱ्या अर्थाने विस्थापित दुर्भिक्षीत व दुर्लक्षित आहेत त्यांचे पुनर्वसन करणे शासनाची जबाबदारी आहे. आणि जर शासन दुर्लक्ष करत असेल तर आपण स्वतः संघटितपणे पुढे येऊन सरकारचे लक्ष वेधणे काळाची गरज आहे.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

Friday, 2 March 2018

होळी खेळावी ती न्यारी


रंगी रंग खेळे हरी

दुःख चिंता दुर करी.
पाहाता गोपिकांना धरी
राधा कावरी बावरी....



खुळी राधा ती बिचारी

भोळी जराशी अविचारी.
कान्हा शिकवितसे जगा
होळी खेळावी ती न्यारी....



रंग भरावा जीवनात

अवघे बेरंग संपावेत.
माखोत मने प्रियजनांची
परी मर्यादाही राखाव्यात....



रंग म्हणजे रे आनंद

रंग ऐका जसा अभंग.
जरा त्यांसवेही गावा
ज्यांना म्हणे जग अपंग....



रंगवा दीनदुबळ्यांना

गोरगरीब अन सगळ्यांना.
करा आपलेसे त्यांना
मित्र-शत्रू सकलांना....



रंग उमंग नव्हे डाग

रंग तरंग नव्हे आग.
यारो होळी आहे आज
चढवा प्रेमाचा रे साज....



लांघा सीमा असमतेच्या

फाडा पडदे विषमाचे.
रंग घेऊ त्या ढगांचे
माळू गाल आकाशाचे....



हेवेदावे हे फुकाचे

आज वाहून चला लावु.
रंगी रंगून जावु सारे
वैषवजण रे चला होवु....



जसा रंगीन मी कान्हा

तसे आपणही व्हाना.
ऐकता गोड वाणी तुमची
धेनुनेही सोडावा पान्हा.....



सकळ जण रंगुनी जावे

सारे रंग एक व्हावे.
खाक अनिष्ट ते व्हावे
अवघे विश्वची नेक व्हावे



जरी जीवन कृष्णधवल

उपायही सांगे मीचं.
भरा रंग आपुलकीचे
हेवा वाटेलं नक्कीचं



मी कृष्ण पिचकारीने

डाग मनावरचे काढी.
होळी करा वाईटाची
सारे लावा चला काडी....



होळीच्या नावाखाली

नका फाडु कुणाची चोळी.
दावाल द्रुष्टी जर का वक्र
याद राखा सुदर्शन चक्र...



नाही मस्ती ना हा धुडगूसं

होळी नाही रे टवाळकी
स्वच्छ पवित्र ही रीत
शिकविते मवाळकी...



माथी काजळी काळजीची

हाती रंग वैविध्याचे.
असे मिसळु एकत्र
रेखाटु हिंदमाता पवित्र...



नाती घट्ट करू सारे

समतेचे रंग घ्यारे.
होऊ थोडे अवखळं
या देश बनवू गोकुळं....



कवीः बाळासाहेब सिताराम धुमाळ

 मो: 9673945092