Sunday 18 November 2018

निश्कलंक कला व स्वाभिमानी कलावंत

निश्कलंक कला व स्वाभिमानी कलावंत...

गावाकडील तमाशामधील डान्स म्हणुन अश्लील डान्सचे व्हिडिओज अलिकडे सोशल माध्यांवरून पसरवले जात आहेत व आवडीने पाहीलेही जात आहेत. सोशल मिडीया त्याची त्याची कमाई करून जातो मात्र स्त्री जातीच्या, लोककलेच्या आणि संस्कृतीच्या अब्रुची लक्तरे मात्र वेशीवर टांगली जातात. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर काही बुद्धीवादी या सर्वाचे लंगडे समर्थन करून फुकटचा भाव खाण्याचा प्रयत्न करतात!! पोटापाण्यासाठी करावं लागतं! त्यात काय वाईट आहे? कला आहे! पारंपरिक आहे असे म्हणुन अकलेचे दिवे पाजळतात.

अरे नालायक तत्वज्ञांनो तुम्हाला यांच्याच पोटाची बरी फिकीर आहे. दयावानांच्या अवलादिंनो कधी ख-याखु-या उपासमारांची मदत केल्याचे आठवतेय का? एखाद्या डोईवरील पदर ढळू न देता डान्स करणाऱ्या मुरळीला नाहीत सोडत असे पैसे? शांत सोज्वळ शुद्ध पुरातन धार्मिक कसे आवडेल?? मुळात कुठलीतरी भंगार कला महाराष्ट्राची म्हणून दाखवून, बाहेरच्या पोरी महाराष्ट्रीय संगीतावर नाचवून इथल्या तमाशाला व एकंदरीतच लोककला संस्कृतीला बदनाम नका करू. आपल्याकडे रस्त्यांवर कला सादर होत नाही असे नाही, मी ही त्याच जमातींमधुन आहे परंतु आपल्याकडील रस्त्यावरची कला एकतर जवळजवळ संपुष्टात आली आहे. शिवाय दुसरे म्हणजे आपली लोककला ही शुद्ध, स्वच्छ व सात्विक आहे. तिला धार्मिक अधिष्ठान आहे. अशा वासनिकतेला कला म्हणता येणार नाही. मग ते खरोखरच महाराष्ट्रात होत असेल तरीही! शिवाय प्रत्येक गोष्टीची जागा, काळ वेळ ठरलेली असतेय. त्याप्रमाणेच त्या त्या गोष्टी गोड वाटतात.

तसे तर आता आपलाही बिहार, झारखंड, हरियाणा होऊ लागलाच आहे म्हणा. आपल्याही काही तमाशा, जागरण गोंधळ, परण्या, वराती यामधील डान्स प्रकार अगदी भोजपुरी व कॅब्रेलाही लाजवेल एवढ्या खालच्या पातळीला पोहचलाय. काही ठिकाणी तर मुली म्हणुन भलतेच कंबर हलवतात!! याला कारण आहे प्रेक्षकांनी सोडलेली लाज! कलाकारांना तेच सादर करावं लागतं जे प्रेक्षकांना आवडतं!! परंतु चार पैसे मिळतात म्हणून काहीही नाही केले पाहिजे. माणसाने मेले तरी चालावे परंतु अस्मिता, स्वाभिमान व मन जीवंत राहायला हवे. कला ही निष्कलंक, सोज्वळ, चारित्र्यसंपन्न, प्रबोधक व निखळ मनोरंजक असायला हवी. पुर्वी ती तशीच होती अगदी बेडाग व सन्माननीय! परंतु आता हवा बदलतेय. हे बंद झाले पाहिजे. बंद केले पाहिजे.

बरे उपदेश तरी त्यांना कसा करावा?? परंतु मला दुःख ही होते व किव येते त्या पोरींची!! जणाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे. वखवखलेल्या नजरांमध्ये विभत्स्य अंगविक्षेप ज्याला नृत्य म्हटले जातेय ते करून भिक मागणे भूषणावह वाटते काय? अशाप्रकारे खुल्लमखुल्ला देहप्रदर्शन करण्याशिवाय इतर कुठलाच मार्ग सापडत नाही का यांना उदरनिर्वाहासाठी?? स्वतः कष्ट करायला नकोत, शिकायला नको, बदलायला नको आणि पुन्हा समाजाला आणि सरकारला दुषने द्यायला बुद्धीवादी व मिडीया तयार. पारंपरिक आहे म्हणून सर्वच जपले पाहीजे का?? माझा याला स्पष्ट विरोध आहे.

मुळात कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळवायची मानसिकताच धोकादायक आहे. मला असे अजिबात नाही म्हणायचे की या मुली स्वेच्छेने आनंदाने हे काम करत आहेत. मला असेही नाही म्हणायचे की त्या अगदी फावड्यानेच पैसे ओढत आहेत म्हणून, त्यांची मजबुरी त्यांचे कमी शिक्षण, त्यांच्यावरील कौटुंबिक संस्कार व त्यांच्या सभोवतालची परिस्थिती असेल कदाचित जी समजून घेतली जाऊ शकते. शिवाय या मुली "त्या मुली" ज्या मुली नसतातच मुळी!! त्या उदर्निवाहाचे नाव पुढे करून जर असे चाळे करत असतील तर मी तरी ते मान्य करू शकत नाही. यांना ना बुद्धी कमी आहे ना यांची शारिरीक क्षमता कमी आहे उलट यांच्यामध्ये अंगभूत कलागुण व सृजनशीलता ठासून भरली आहे. परंतु असे असले तरी हे लोक दिशा भरकटले आहेत, यांचा रस्ताच चुकलेला आहे. चूकीच्या रस्त्यावर चालत असताना ध्येय प्राप्ती होऊ शकत नाही आणि म्हणूनच याचे समर्थन नाही होऊ शकत.

अहो ठरविल्यावर काय अशक्य आहे हो? कोण म्हणतोय अगदी कलेक्टरच बना पण निदान शिपाई, लिपिक तरी बना, राहीले डॉक्टर निदान नर्स तरी बना, राहीले इंजिनिअर निदान यांत्रिक तांत्रिक कामगार तरी बना. ज्यांनी जग बदलून दाखविले आहे आजवर ते काही सोन्याच्या चमचाने अम्रुत पिऊन नव्हते ना आले!! नाहीच जमले तर मजुरी करा परंतु इज्जत घालु नका. म्हणून योग्य आयोग तपासून चुकीचे सोडून देण्यातच खरे शहाणपण आहे. हे असे धंदे आयुष्यभर करता येत नाहीत. समर्थन करणारे आपल्या मुली बहीणींना का नाही स्ट्रीट डान्सर्स बनवत? आवडेल? मला तर नाही आवडणार? इज्जतीने पोट भरणे, नाव कमावणे खुप सोपे नक्कीच नाही परंतु खुप कठीणही नक्कीच नाही. फक्त परिश्रम करण्याची तयारी व सकारात्मक इच्छाशक्ती हवी.

अरे आता तारूण्यावर दोन पैसे उधळणारे कुबेर नंतर वृद्धापकाळात दमडी देणे तर सोडा डुंकूनही बघत नाहीत. असा आजवरचा इतिहास आहे. संस्कृती संवर्धन, संस्कृती रक्षण असे वजनदार शब्द वापरून परिस्थिती बदलत नाही. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. आपण जर आपल्यात बदल नाही घडवून आणला तर आपण राहु येथेच जिथे आहोत तिथे अर्थात रस्त्यावर!! आणि जग जाईल चंद्रावर. आपण पहातच काय अनुभवतही आहोतच की? लोक कलावंतांचे, कलावंत जमातींचे आयुष्य संपले परंतु दारिद्रय, सामाजिक अप्रतिष्ठा नाही संपली. जे शिकले ते संपन्न व सन्मानित झाले परंतु शिक्षण जे या समृद्धतेचे व संपन्नतेचे गमक आहे ते मात्र अगदी गोपनीय ठेवले. त्यामुळे मला वाटते सर्वच नाही पण किमान अप्रतिष्ठीत, कमी मोबदल्याच्या आणि चारित्र्यहनन करणाऱ्या पारंपरिक लोककला रस्त्यावर सादर करू नयेत.

हे शोषण तर आहेच पण ही एकप्रकारची मानसिक गुलामगिरीदेखील आहे. यात पिढ्याच्यापिढ्या बरबाद झाल्या. त्यापेक्षा उदरनिर्वाहाचे, रोजगाराचे इतर पर्याय शोधले पाहीजेत. शोधले म्हणजे सापडतेच. शिकून सवरून एक तर प्रशासनात या, खाजगी कंपन्यात जा किंवा मग आपल्यातील जन्मजात कलागुणांना शिक्षण, तंत्रज्ञान यांची जोड देऊन मानसन्मान, पैसा व प्रतिष्ठा कमवा. आदर्श घ्यायला खुप आहेत. फार लांब जाण्यापेक्षा नागराज मंजुळे, अजय-अतुल यांच्याकडे पहा. तेही जर असेच रस्त्यावर कला सादर करत बसले असते तर??? चुक भुल माफ करा.

बाळासाहेब सिताराम धुमाळ.
9673945092.

Saturday 20 October 2018

माणुस जन्मजात गुन्हेगार असु शकतो काय?

माणूस जन्मजात गुन्हेगार असू शकतो काय?

आठवड्यापूर्वी हिंदुस्तान टाईम्समध्ये एक बातमी छापून आली होती, "How Nomadic Communities bear the brunt of Fictional fear mongering?" अर्थात कशा भटक्या जमाती सहन करतात काल्पनिक भितीच्या विक्रीचा आघात? पत्रकार गायत्री जयरामन यांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावातील गावगुंडांनी पोरचोर टोळी असल्याची अफवा पसरवून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांचे अमानुष हत्याकांड घडवून आणले. हे हत्याकांड त्याचबरोबर केरळ, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू येथील कलाकार, कसरतीकार, नकलाकार व भिक्षुक भटक्या विमुक्त जमातीतील लोकांवरील हल्ले व हत्या करण्याची समाजाची मनोवृत्ती वाढीस लागण्यास तामिळ चित्रपट " थीरन अधिगारम ओंद्रू" या चित्रपटास कारणीभूत  समजले होते. हा व या चित्रपटाचा तेलगू मेक असणारा "खाकी" बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरले होते. वाचल्याबरोबर चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली परंतु तामिळ आणि तेलगू म्हटल्यावर नाईलाज झाला कारण दक्षिणेतल्या भाषा साध्या ऐकल्या तरी डोके गरगरते माझे! अर्थात केवळ भाषा भिन्नतेमुळे हं!

पुढे पुढे वाचत गेलो असता समजले की प्रदर्शनावेळी या चित्रपटाविरोधात भटक्या-विमुक्तांच्या चळवळीतील तामिळनाडूमधील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी निदर्शने केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठात धाव घेतली होती व चित्रपटातील क्रिमिनल ट्राईब्ज, क्रिमिनल ऑफेंडर्स अॅक्ट, क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट 1871, 1830 च्या दशकातील लुटीच्या घटना अशी दृश्ये व असे संदर्भ वगळावेत. बावरिया जमातीचा उच्चार, अनुवंशिक गुन्हेगार असे शब्द तसेच चित्रपटातील साप पकडणे, लुटीपूर्वी देवी पूजा करणे, भटक्या-विमुक्तांची पारंपारिक हत्यारे दाखविणे, अशी आक्षेपार्ह शब्द, विधाने, दृष्ये व संदर्भ वगळावीत यासाठी आंदोलने केली होती. अशी दृश्ये व संदर्भ यासाठी वगळावीत की यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलू शकतो. हा चित्रपट 'बावरिया ऑपरेशन' वर आधारित होता व 'बावरिया' ही एक भटके-विमुक्त जमात आहे.

आंदोलकांनी केवळ दृश्य व संदर्भ वगळण्याचीच मागणी नव्हती केली तर पुढे जाऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी समाजाची माफी मागावी व चित्रपटाच्या उत्पन्नातील 50 टक्के हिस्सा भटक्या विमुक्त जमातींच्या कल्याणासाठी द्यावा अशीही मागणी केली होती. पुढे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तसेच कलाकारांनी आंदोलकांची लेखी माफी मागितली होती.
चित्रपटातील काही दृश्य व संदर्भ वगळले परंतु तोवर अनेकांनी हा चित्रपट पाहिला होता व त्याचे दृश्य अनिष्ट परिणाम दिसू लागले होते. रस्त्यांवर (म्हणजे भटक्यांच्या घरांवर) आणि जिथे जिथे भटके जातील तिथे तिथे भितीचे काळे जमा झाले होते. याचा भटक्यांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम झाला होता.डिनोटिफाईड ट्राईब्ज वेल्फेअर असोसिएशन (DTWA)  आणि दि एम्पावरमेंट सेंटर ऑफ नोमेडीक अँड ट्राईब्ज सोसायटी इन मदुराई अशा संघटनांनी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते कारण या संघटनांना खात्री होती की या चित्रपटाचा अनिष्ट परिणाम समाज मनावर होऊ शकतो आणि हे ओळखूनच त्यांनी चित्रपटास विरोध केला होता.

मदुराईचे तत्कालीन जिल्हाधिकारी के. वीरराघव राव यांनी आंदोलनकर्त्यांना व भटक्या विमुक्त जमातीना पुरेसे सहकार्य केले. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पोरचोर टोळी आल्याच्या अफवा अपेक्षेप्रमाणे पसरू लागल्या व  निष्पाप भटके-विमुक्त लोक अनियंत्रित जमावाकडून मारले जाण्याच्या घटना वाढू लागल्या. यावर आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्याचे डीएसपी के. ईश्वर राव यांना तातडीची पत्रकार परिषद बोलावून "जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये. या घटनांमागे भटके विमुक्त लोक नाहीत" हे जाहीर करावे लागले.

असे असले तरी चित्रपटाचे कथानक व एकंदरीतच निर्मिती  जबरदस्त असल्याने चित्रपट सुपरहिट झाला होता. एवढेच नव्हे तर चहात्यांचे चित्रपटाचे निर्माते एस. आर. प्रभू यांना चित्रपट हिंदीमध्ये सलमान खानला घेऊन बनवावा असेही फोन कॉल्स आले होते म्हणे! एवढे सगळे वाचल्यावर माझी चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. मी गुगलवर चित्रपटाविषयी अधिक माहिती शोधू लागलो. बातम्या वाचल्या, व्हिडिओज व इमेजेस पाहिल्या, लिखित माहितीही वाचली. 'थिरन थिरूमरन' नामक एका प्रामाणिक व धाडसी पोलिस अधिकाऱ्याची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट नोव्हेंबर 2017 मध्ये तामिळ भाषेत बनला होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे नंतर तेलुगूमध्येही खाकी नावाने त्याचा मेक आला आणि हिटही झाला.

'ऑपरेशन बावरिया' या दक्षिणेतील पोलिसांच्या कारवाईवर हा चित्रपट आधारित आहे. महामार्गाजवळील एकांतामधील घरांत लुटमार करणाऱ्या संघटित गुन्हेगारांच्या टोळीवरील हे पोलीस ऑपरेशन होते. बावरिया गँग अथवा लॉरी गँग अशी ओळख असणा-या गुन्हेगारांच्या टोळीने सन 1995 ते 2006 या कालावधीत तामिळनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. या टोळीकडून लुटीबरोबरच अनेक लोकांची हत्या देखील झाली होती. ज्यात एका आमदाराचा व एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचाही समावेश होता. पोलीस नोंदींनुसार 64 जण जखमी झाले होते. यातील मुख्य आरोपी ओमवीर बावरिया आणि लक्ष्मण उर्फ अशोक बावरिया यांना तामिळनाडू विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र तत्पूर्वीच ओमवीर बावरिया हा मुख्य आरोपी तुरुंगातच मृत्युमुखी पडला. सर्व अकरा आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाले. बसुरा बावरिया आणि विजय बावरिया हे दोघे पोलीस एन्काऊंटर मध्ये मारले गेले होते तर बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती ज्यात दोन महिलांचाही समावेश होता.

विशेष म्हणजे " थीरन अधिगारम ओंद्रू" या चित्रपटाचे हिंदी डबिंग देखील मला पाहायला मिळाले जे केवळ युट्युब वरच आहे. चित्रपट अंगावर काटा आणणारा आहे. खासकरून पार्श्वसंगीत!  परंतु त्याहीपेक्षा अधिक विमनस्क करणारा व तशाही अवस्थेत विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे. बावरिया ही राजस्थानच्या अरवली पर्वत रांगेत राहणारी भटकी जमात आहे. इतरही राज्यात ती आढळते जसे की हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यात. पंजाब मध्ये ही जमात अनुसूचित जातींमध्ये मोडते तर इतरत्र ओबीसीमध्ये. यांच्या दहा उप जमाती आहेत. भटक्या जमातींच्या सर्व चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, जात पंचायती सर्व काही हे लोक पाळतात.

पारतंत्र्याच्या काळात इंग्रजी छावण्या, सरकारी खजीने, रेल्वे आणि अधिकारी व त्यांची कुटुंबे यांना या जमाती लुटत असत. इतर भटक्या विमुक्त जमातींप्रमाणेच यांच्यावरही ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट 1871 नुसार अगणित अन्याय-अत्याचार केले. मात्र असे असले तरी आज रोजी हा समाज सामान्य जीवन जगू इच्छित असूनही समाजाच्या दृष्टिकोनामुळे यांच्यावर कोणीही विश्वास करीत नाही. यांना कोणी कामावर ठेवीत नाही. गुन्हा कोणीही करो, कोठेही घडो संशयित गुन्हेगार हेच असतात! जमावाकडून मारहाण, झोपड्यांची जाळपोळ आणि महिलांवरील पाशवी अत्याचार त्यांच्या पाचवीलाच पुजलेले! भय, दारिद्र्य, निरक्षरता आणि अपमान यांचे सावट कायम माथी असते. यातून कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आढळणारी बावरिया जमात या "थीरन अधिगारम ओंद्रू" सारख्या चित्रपटांमुळे संकटात सापडली आहे. केवळ बावरिया जमातीकडेच नव्हे तर संपूर्ण भटक्या-विमुक्त जमातींकडे आज रोजी संशयित गुन्हेगार म्हणून पाहिले जात आहे. भिक्षेकर्‍यांच्या  मनामध्ये प्रचंड भीती बसली आहे. भिक्षेकरी घर सोडायची हिंमत करीत नाही आहेत.

ब्रिटिशांच्या भारतात येण्यापूर्वी या सर्व भटक्या विमुक्त जमाती एक प्रतिष्ठेचे व सन्मानजनक जीवन जगत होत्या. येथील राज्यसत्तेच्या विश्वासु होत्या. मात्र इंग्रजांशी देशप्रेमापोटी केलेला संघर्ष यांना प्रचंड महागात पडला. इंग्रजांनी तर बेसुमार शोषण केलेच, अमाप छळलेच परंतु तिच दृष्टी ते मागेही सोडून गेले! हाकलून देणे, चौकात खांबाला बांधणे, झाडाला बांधून दगड फेकून मारणे, महिलांना नग्न करून अपमानजनक कृत्य करायला लावणे असे अमानवी अन्याय अत्याचार या जमातींना देशभर सहन करावे लागत आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या सैनिक व संस्कृतीच्या संरक्षक जमाती असुनही अगदी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी व पुढारलेल्या राज्यातही या असुरक्षित आहेत. इथे जर भटक्या-विमुक्तांची एवढी दयनीय अवस्था असेल तर इतर राज्यांमध्ये कशी असेल याची कल्पनाही करवत नाही! मात्र बातम्यांमधून ते समोर येतेच आणि अनिच्छेने का असेना पण हे सर्व वाचावे ऐकावे व पहावे लागतेच!

वाहतूक, मनोरंजन, कलाकुसर याद्वारे हक्काचे उदरनिर्वाहाचे पारंपरिक असलेले साधन सरकार कायद्याने काढून घेत असेल तर मला प्रश्न पडतो की ओमवीर बावरिया का निर्माण होणार नाही? सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूनही समाज जर या जमातींकडे गुन्हेगार आणि कमजोर जमाती म्हणून पाहत असेल, नेहमी यांना भयभीत व दबावाखालीच ठेवत असेल तर ओमवीर बावरिया का निर्माण होणार नाही? टिळकांनी स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार सांगितला मात्र येथे या जमातींच्या बाबतीमध्ये स्थानबद्धता, सामाजिक बहिष्कार व गुन्हेगाराचा ठपका हाच जन्मसिद्ध अधिकार होऊन बसला आहे! अर्थात मी ओमवीर बावरियाचे अथवा इतर गुन्हेगारांचे समर्थन करतोय असे अजिबात समजू नका. अशा प्रवृत्तींना ठेचूनच काढले पाहिजे. यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी या अशा मनोवृत्तीचा धिक्कारच करतो परंतु मी याहूनही अधिक तीव्र धिक्कार करतो तो "या जमातींना गुन्हेगार जमाती संबोधण्याच्या मानसिकतेचा!"

कुठलीच जमात जन्मजात "गुन्हेगार जमात" कशी काय समजली जाऊ शकते? गुन्हेगार समजली पाहिजे त्यांची परिस्थिती! जी त्यांना भाग पाडते गुन्हेगार बनायला! खरे तर गुन्हेगार समजला पाहिजे समाज! जो यांच्याकडे सतत गुन्हेगार या दृष्टीनेच पाहतो! गुन्हेगार समजले पाहिजे सरकार जे यांच्या सर्वांगीण पुनरुत्थानासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाही! माणसाच्या लेकरांना म्हणजे माणसासारख्या माणसांना जन्मजात गुन्हेगार समजून तशी वागणूक देणे हे कुठल्या माणुसपणाचे लक्षण आहे? गुन्हेगारी अनुवंशिक कशी काय असु शकते? नवजात बालकांना, किशोर किशोरी, महिला ते वृद्धांना देखील गुन्हेगार, राक्षस ते अगदी भुत पिशाच्च समजून त्यांना ठेचुन मारणे, त्यांना वाटेल तेव्हा अटक करणे, कोठडीत डांबून ठेवणे हे ना स्वातंत्र्याचे लक्षण आहे ना सार्वभौमत्वाचे!

कोणताही माणूस जन्मजात गुन्हेगार कसा काय असू शकतो? जन्मतः बालकाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले वातावरण मिळू शकते. परिणामी त्याच्यावर त्या वातावरणाचे संस्कार होऊन तो गुन्हेगारीकडे झुकुही शकतो. कदाचित तो गुन्हेगार होऊही शकतो! परंतु म्हणुन तो जन्मतःच गुन्हेगार असतो असे म्हणणे म्हणजे त्या नवजात बालकाच्या शरिरातील रक्तच गुन्हेगाराचे असते असे म्हणण्यासारखे होईल. त्याच्या दंडात गुन्हेगारीची लस टोचून त्याच्या दंडावर "गुन्हेगार" असे गोंदल्यासारखे होईल. त्यासाठी अशा परिस्थितीचे निर्मूलन होणे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही सरकार पाहिजे तेवढे परिवर्तन करु शकलेले नाही हे कटू वास्तव आहे. अर्थात म्हणून परिवर्तन झालेच नाही असे नाही परंतु यात सरकारचा तितकासा हिस्सावाटा मला दिसत नाही. यासाठी सरकारी प्रयत्न वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रयत्न वाढविण्याऐवजी काही जमातीतील लोक जन्मतःच गुन्हेगार असतात असे समजणे व इतरांना समजायला लावणे हे "महापाप" म्हणावे लागेल.

प्रसार माध्यमे, मनोरंजनाची साधने व कायदे यांनी जबाबदारीने आपापली भूमिकापार पाडायला पाहीजे. एखादी कलाकृती बनविणे मग ते नाटक असेल, चित्रपट असेल, मालिका असेल अथवा कथा कादंबरी असेल, यात  प्रेक्षकांची वा श्रोत्यांची वाहवा मिळवणे, व्यवसाय करणे, प्रसिद्धी मिळवणे यासाठी एखाद्या जातीचे अथवा जमातीचे नकारात्मक चित्रण करणे योग्य नाही. यामुळे समाजमन बदलते, समाजाची विचार करण्याची दृष्टी बदलते. समाजातील लोकांचा त्या सकल जमातीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्वग्रहदूषित बनतो! "मागचं पाणी गढूळ आलं पुढचं किती जपायचं?" ही अशी वैचारिक अधोगती समाज उपयोगी नाही. एखाद्या जमातीचा असा उद्धार करण्यामुळे त्या जमातीची बदनामी होते. जर एखाद्या जमातीमध्ये एखादी व्यक्ती अथवा गट गुन्हेगारी कृत्यात वारंवार आढळून येत असेल तर त्याचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करायला पाहिजेत. खरंतर चित्रपटांमधून सामाजिक प्रश्न मांडण्याची, त्याकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधून घेण्याची आजवरची परंपरा आहे परंतु अशा प्रकारे एखाद्या जमातीला गुन्हेगार दाखवून तिची तशी ओळख निर्माण करणे हे खऱ्या कलाकाराचे लक्षण असू शकत नाही

आज दुर्दैवाने स्थिती अत्यंत विषाक्त आहे. देशभरातील भटक्या विमुक्तांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. परंतु हे असेच चालत राहीले तर याचा अनिष्ट परिणाम होईल. हे अपराधीपणाचे शल्य त्या जमातीतील नवतरुण तरूणींना बोचेल. अशाने सुधारणावादी, शुद्धीकरणवादी व पुरोगामी दिशेने पडणाऱ्या पावलांवर घातक परिणाम होईल. त्यांचे पाय मागे ओढल्यासारखे होईल. यामुळे वाममार्ग सोडून सन्मार्गावर मार्गस्थ होण्याचा संकल्प करून तसा प्रयत्न करणार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होईल. त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागेल. अशा प्रकारची नकारात्मक ओळख त्या जमातीतील नवनिर्माणाला आणि परिवर्तनाला बाधक ठरेल आणि अशी मानसिकता तयार होईल की "जर गुन्हा न करताही गुन्हेगार समजले जात असेल तर मग गुन्हा केलेले काय वाईट?"

आणि म्हणून जशी गुन्हेगारी कधीच समर्थनीय असू शकत नाही तसेच गुन्हेगारी रक्तात असते ही अविचारी फिलॉसॉफी देखील कधीच समर्थनीय असु शकत नाही. जर एखाद्या जमातीमध्ये अशी विघातकता वारंवार आढळून येत असेल तर त्यामागच्या सामाजिक, मानसिक कारणांचा शोध घेतला पाहिजे. अशांची शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारायला पाहिजे. त्यासाठी सुधारणावादी उपाययोजना करायला पाहिजेत. त्यांची अपरिहार्यता समजून घेऊन तिथे पर्यायव्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे तरच आपण एक चांगला समाज घडवू शकू, एक विकसित भारत देश घडवू शकु!

टोळ्या टोळयाने राहणारा बावरिया समाज आज रोजी दारिद्र्याच्या, निरक्षरतेच्या, अंधश्रद्धेच्या, असुरक्षिततेच्या व  बेरोजगारीच्या गर्तेत सापडला आहे. त्याला तेथून बाहेर काढण्याऐवजी, त्याच्यावरील कलंकांचे परिमार्जन करण्याऐवजी असे चित्रपट काढून त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून जाहीर शिक्कामोर्तब होत असेल तर ते अत्यंत घातक आहे. याचे काय चांगले परिणाम होतील?? अशा प्रकारे जर आपण कूळ, जात, वंश, जमात, सांप्रदाय, पंथ अथवा धर्म जन्माने गुन्हेगार सिद्ध करू लागलो तर काय परिस्थिती निर्माण होईल ते परमेश्वरच जाणो परंतु त्या परिस्थितीस व होणाऱ्या परिणामांस सर्वस्वी आपणच  जिम्मेदार असू एवढे निश्‍चित.........

चित्रपटातील ओम बावरियाचे विधान मला खूप अस्वस्थ करते. तो म्हणतो, "मुझे नेकी के नाम से घीन आवे है। क्योंकी एक इन्सान की नेकी को दुसरा इंसान कमजोर समज लेवे है। उसे अपना गुलाम बना लेवे है। न जाने कितनी बिरादरीयाँ बर्बाद हो गई, मुझे एक बेरहम डकैत बनाने में। ओए नही बनना ओए मुझे नेक और  समझदार........"

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
 मो. 9673945092.

Tuesday 16 October 2018

अंबरनाथ आंदोलनास स्थगिती

(अति महत्वाचे)
प्रेस नोट
भटके विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने आयोजित अंबरनाथ येथील शिधावाटप कार्यालयावरील मोर्चा तूर्तास #स्थगित.
-----------------------------------------------------------------
अंबरनाथ, 16 ऑक्टोबर
अंबरनाथ जि. ठाणे येथील भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी व इतर भटके-विमुक्त तसेच आदिवासी मागासवर्गीय रेशनकार्ड धारक रितसर लाभार्थी आहेत. मात्र तरीही त्यांना शिधावाटप कार्यालयाकडून अन्नधान्याचे वाटप होत नाही. लाभार्थ्यांची कार्ड्स रद्द करण्यात आली आहेत.

या विरोधात उद्या दिनांक 17 ऑक्टोबर रोजी भटके विमुक्त हक्क परिषद व नाथपंथी डवरी गोसावी भटके-विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांचे वतीने अंबरनाथ येथे सर्कस मैदानापासुन पुरवठा कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सदर अन्याया विरोधात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी हक्क परिषदेचे अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे, युवा शाखेचे राज्य सचिव श्री. प्रतिक गोसावी आणि हक्क परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. भिमराव इंगोले यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. गिरीश बापट यांची या पार्श्वभूमीवर मंत्रालयात भेट घेतली. होत असलेला अन्याय मंत्रिमहोदयांना समजून सांगीतला व यात आपण व्यक्तिशः लक्ष घालून होत असलेला अन्याय थांबवावा असे आवाहन करण्यात आले. मंत्री महोदयांना उद्याच्या प्रस्तावित आंदोलनाचीही कल्पना देण्यात आली. तेव्हा माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि उद्याच्या उद्या सदर प्रश्न मार्गी लावण्याच्या कडक सूचना केल्या. उद्याच मला हक्क परिषदेच्या नेतृत्वाकडून सदर प्रश्न सुटल्याचा फोन कॉल आला पाहिजे अशा शब्दात अधिकार्‍यास सुनावले.

उद्याच बंद करण्यात आलेली रेशन कार्ड्स सुरू करून द्यावीत व पूर्ववत अन्नधान्याचा पुरवठा सुरू करावा असेही मंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी उद्याच ठाणे जिल्हा अन्नधान्य पुरवठा कार्यालयाच्या संबंधित अधिका-यांसोबत हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांची सकाळी 11:00 वाजता बैठकही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हक्क परिषदेने पुकारलेले उद्याचे आंदोलन तूर्तास #स्थगित करण्यात येत आहे याची सर्व अंबरनाथ तसेच परिसरातील आंदोलक कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.

पोटापाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लागल्यामुळे अंबरनाथ येथील भटके विमुक्त आदिवासी मागासवर्गीय लाभार्थी समाजबांधवांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मंत्री महोदय माननीय गिरीश बापट व संबंधित विभागाचे ओ. एस. डी. श्री. शेख साहेब यांना भटके विमुक्त हक्क परिषद मनःपूर्वक धन्यवाद देते......

(बाळासाहेब धुमाळ)
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद म. रा.
मो. 9673945092.

Monday 15 October 2018

भटके विमुक्त हक्क परिषद म.रा. दादर चिंतन बैठक

प्रेस नोट
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय विचारमंथन बैठक दादर येथे  संपन्न
-------------------------------------------------------------------------

(दादर, मुंबई)
दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी यादव गवळी ट्रस्टच्या नायगाव, दादर, मुंबई येथील श्रीकृष्ण हॉलमध्ये सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत "भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य" या भटक्या-विमुक्तांच्या संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची व राज्यभरातील विविध संघटनांच्या पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्त्यांची विचारमंथन बैठक संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षपद संघटनेचे अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे यांनी भूषविले तर बैठकीला संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. शंकर माटे, सचिव प्रा.श्री. सखाराम धुमाळ, उपाध्यक्ष श्री. मंगेश सोळुंके, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख श्रीमती प्रियांका राठोड, शिक्षक आघाडीचे राज्य प्रमुख श्री. कृष्णा जाधव, नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष  वसंत गुंजाळ,  साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर , बी टी मोरे  युवा शाखेचे राज्य सचिव श्री. प्रतीक गोसावी आदी पदाधिका-यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीस राज्यभरातुन साधारणपणे शंभर कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीची सुरुवात संघटनेचे सचिव प्रा. श्री. सखाराम धुमाळ यांच्या स्फूर्तीगीताने झाली. प्रास्ताविक प्रा सखाराम धुमाळ यांनी केले व हक्क परिषदेच्या सुरुवातीपासूनचा आजपर्यंतचा प्रवास या बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शिक्षक आघाडी राज्य प्रमुख श्री कृष्णा जाधव यांनी भटके विमुक्त हक्क परिषदेची उद्धिष्ट , ध्येय, धोरण या बाबत माहिती देऊन पुढील वाटचाल या ध्येय धोरणाला धरूनच असणार असल्याचे  सांगण्यात आले. प्रदेश कोषाध्यक्ष तथा  नाशिक विभाग अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे यांनी  संघटनेची कार्यपद्धती कशी राहील या बाबत माहिती दिली व संघटनेची आचारसंहिता या बाबत माहिती देऊन ती प्रत्येकाने पाळावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले.  तसेच नाशिक विभागातील धुळे,नंदुरबार, जळगांव, नगर , नाशिक येथे झालेल्या आंदोलनाचा अनुभव सांगितला व नाशिक विभागातून सुरू झालेले हे लक्षवेधी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्यासाठी सर्वानी प्रयन्तशील राहावे असे श्री काळे म्हणाले व सर्वानुमते आचारसंहिता मान्य करण्यात आली असून आचारसंहितेचा भंग भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे सर्वानुमते मान्य करण्यात आले . संघटनेची प्रदेश , विभाग, जिल्हा , तालुका अशी रचना असून त्यात समाविष्ट पदांची रचना मांडण्यात आली शिवाय हक्क परिषदेत महिला आघाडी, शिक्षक आघाडी, युवा आघाडी , वकील परिषद अश्या विविध आघाड्यांची रचना देखील कार्य करीत असल्याचे सांगण्यात आले. भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राज्यभर करावयाच्या आक्रोश आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक विभाग) यशस्वी आंदोलनाचे श्रेय सर्वांनी विभागीय अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे, श्री. साहेबराव गोसावी श्री. वसंत गुंजाळ, श्री. सुपडू खेडकर , श्री. अशोक महाराज पुरी या सह नाशिक विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांना दिले. सर्वांनी त्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात गौरव केला.

आंदोलनाचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्र ( पुणे विभाग) येथून नवरात्रोत्सवानंतर प्रारंभ करण्याचे ठरले. या टप्प्याची सुरुवात कोल्हापूरपासून करून सांगली, सातारा करीत पुणे येथे भव्य समारोपीय आंदोलन करण्याचे निश्चित झाले. दरम्यान महिला आघाडीच्या वतीने रत्नागिरी येथे  महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा डॉ प्रियंका राठोड  मा बी टी मोरे एक भव्य लक्षवेधी एक दिवसीय आक्रोश आंदोलन  देखील छेडण्याचे  ठरले.

हक्क परिषदेने  घेतलेला उत्तर महाराष्ट्रात दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे  येथे घेतलेला विभागीय मेळावा, आजवर झालेल्या  गोलमेज परिषदा, आक्रोश आंदोलने, मंत्रालयात अधिका-यांशी व मंत्र्यांशी तसेच लोकप्रतिनिधींशी झालेल्या बैठका यांद्वारे काय साधले? यात कितपत यश वा अपयश आले? यावर साधक बाधक चर्चा झाली. आंदोलनातील सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाबींवर विचारविमर्श झाला. आगामी काळात चळवळीत महिलांचा, युवकांचा, नोकरदारांचा, कलावंतांचा तसेच तंत्रज्ञानाचा समावेश वाढविण्यावर एकमत झाले. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना भेटून, निवेदन देऊन, चर्चा करून मा.दादा इदाते आयोग लवकरात लवकर लागू करण्यासाठी विनंती करण्याचे बैठकीत निश्चित झाले.

अलीकडच्या काळातील भटक्या-विमुक्तांवरील अत्याचाराच्या घटना जसे की राईनपाडा हत्याकांड, हिंजवडी बलात्कार प्रकरण, श्रीगोंदा महीलेस विवस्त्र करून मारहाण प्रकरण तसेच वारजे भिक्षुक अटक प्रकरण या विविध प्रकरणांमध्ये हक्क परिषदेने कशाप्रकारे पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचे भूमिका घेतली यावरही थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला.

त्यानंतर राज्यभरातून आलेल्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली थोडक्यात मनोगते व्यक्त केली. यात समाजाचा, इतिहास, सद्यस्थितीतील समस्या, उपाय व चळवळीची दिशा यांवर मतप्रदर्शन झाले. दुपारच्या सत्रात संघटनेत पुढील काळात स्वेच्छेने जबाबदारीपूर्वक सक्रिय राहू इच्छिणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना हक्क परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर, विभागीय कार्यकारणीवर तसेच जिल्हा कार्यकारिणीवर नेमण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात विविध स्तरांवर या कार्यकर्त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. लगेचच नियुक्तीपत्रे त्यांना प्रदान करण्यात आली.

नियुक्त्यांमध्ये श्री. रामचंद्र जाधव (पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष), श्री. वसंत गुंजाळ (प्रदेश संघटक), श्री. साहेबराव गोसावी (प्रदेश संघटक), श्री. सुपडू खेडकर (नाशिक विभागीय संघटक), श्री. अशोक गिरी (नाशिक विभागीय संघटक), श्री. संजय गोसावी (शिक्षक आघाडी नाशिक विभाग प्रमुख), श्री. श्याम शिंदे (प्रदेश संघटक), श्री. अमर करंजे (प्रदेश संघटक), श्री. शिवाजी भिसे (मुंबई उपनगरीय संघटक), श्री. मल्लू पवार (नाशिक विभागीय संघटक), श्री. शिवाजी गिरी (युवा जिल्हाध्यक्ष बीड), श्री. रामकृष्ण मोरे (नंदूरबार जिल्हाध्यक्ष),  श्री. दिपक वनारसे (कार्यालय प्रमुख), श्री. जयराज भाट ( प्रदेश संघटक), श्री. शिवदास वाघमोडे (नाशिक विभाग संघटक), श्री. शंकरराव कोळेकर (प्रदेश संघटक), श्री. बळीराम महाडिक (प्रदेश संघटक), श्री. गोपीचंद इंगळे(नाशिक विभागीय संघटक), श्री. बापू डुकरे (अंबरनाथ शहराध्यक्ष), श्रीमती भाग्यश्री प्रमोद (महिला संघटक),  श्री. दत्तात्रय मोरे (मुंबई कामगार संघटक), श्री. नारायण सीताराम खेडेकर (मुंबई शहर उपाध्यक्ष), श्री. हनुमंत शेगर (अंबरनाथ शहर उपाध्यक्ष), श्री. अशोक गायकर (मुंबई प्रदेश संघटक) श्री. राकेश तमाचेकर (नंदुरबार जिल्हा संघटक), श्री. साहेबराव कुमावत (प्रदेश संघटक)इत्यादी पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या व नियुक्तीपत्रे देण्यात आली.

बैठकीच्या शेवटी अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे यांनी सर्वांना सर्व शक्तीनिशी राग, लोभ, द्वेष, मत्सर, स्वार्थ, मीपणा, मोठेपणा बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. जे जे भटक्या विमुक्तांचे कार्य करतील, जेव्हा जेव्हा आपणास आवाज देतील तेव्हा तेव्हा राज्यातील हक्क परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले. दि. 21ऑक्टोबर 2018 रोजी बोरिवली, मुंबई येथे मा. दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली भटक्या विमुक्तांची राज्यस्तरीय विचार मंथन बैठक होत असून हक्क परिषदेस त्या बाबतच निरोप आला आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे श्री. ओंबासे म्हणाले.

संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. शंकर माटे यांनी आपल्या समारोपीय मार्गदर्शनात सांगीतले की कार्यकर्त्यांनी भाषणबाजीवर जास्त जोर न देता कार्यावर अधिक लक्ष द्यावे. ते म्हणाले की, मा. दादा इधाते आयोग मंजूर करून घेणे हेच आपले उद्धिष्ट असुन त्यासाठी समर्पित भावनेतून काम करण्याचा सर्वांनी निर्धार करावा. तसेच लवकरच मा. मुख्यमंत्र्यांची व मा. पंतप्रधानांची भेट घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. अखेरीस प्रदेश उपाध्यक्ष श्री. मंगेश सोलंकी यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद म.रा.
मो. 9673945092.

Saturday 13 October 2018

आक्रोश

भटके विमुक्तांचे (VJNT) राज्यव्यापी आक्रोश आंदोलन:⚡️🔥
मित्रांनो लोकशाहीमध्ये बहुसंख्यांकांना काहीसे झुकते माप असते. अल्पसंख्यांकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक केले जाते कारण संख्यात्मकता ही लोकशाहीची ओळख बनली आहे. कटु वास्तव हे आहे की आज जो समाजघटक संख्यात्मकदृष्ट्या मोठा असेल, राजकारणी, शासन आणि प्रशासन त्यांचेच प्रश्न प्राधान्याने सोडवतात! वास्तविक पाहता असे व्हायला नको आहे. ज्यांच्या प्रश्नात सत्यता आहे, आर्तता आहे, गंभीरता आहे त्यांचे प्रश्न शासनकर्त्यांनी प्राधान्याने सोडवायला हवेत. हिच मानवतेची शिकवण आहे व नैतिकतेचे सुत्र आहे.

परंतु भटक्या विमुक्त लोकांचे प्रश्न वर्षोनुवर्षे रखडलेलेच आहेत. इंग्रजांच्या राजवटीत तर ते अधिकच तीव्र झाले व स्वतंत्र भारतात राजकारणापलीकडे, राजकीय पक्ष विचारच करताना दिसत नाहीत. भटक्या विमुक्त जमाती संघटित नाहीत. आपली स्थिती जरी बिकट असली, प्रश्न जरी तिव्र व रास्त असले तरी व आजवर आपण वेळोवेळी शासन दरबारी ते मांडलेही असले तरी अद्यापही सुटले नाहीत. तसे ते हवे तेवढ्या प्रभावीपणे मांडलेच गेले नाहीत हे ही वास्तव आहे. मांडणारांनी पुरेपूर प्रयत्न केला परंतु जनसामान्यांचे पाठबळ हवे तेवढे लाभले नाही. भटक्या-विमुक्तांच्या जमातीय संघटना तसेच जमातींच्या मिळून भटके विमुक्त शिर्षकाखाली काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. परिणामी आपली शक्ती विभागली गेली आहे. आपापसात समन्वय नाही, निश्चित ध्येयधोरण नाही. नियोजनबद्धता व रणनीती नाही. एकमेकांना सहकार्य तर सोडाच विरोध कसा करता येईल हेच आपण आजवर पाहिले आहे!! त्यामुळे एकीचे बळ कधी दिसुनच आले नाही ही शोकांतिका आहे.

चळवळीत सूर्य उगवणे गरजेचे असावे, आरवणारा कोंबडा कोणाचा का असेना! शिवाय भटक्या-विमुक्तांच्या समस्या सोडविण्याची चळवळ ही केवळ आणि केवळ प्रश्नांशी बांधिलकी जपणारी असावी, कोणा राजकीय पक्षाशी अथवा विचारधारेशी किंवा गटातटाशी चळवळीचे काहीही देणे-घेणे नसावे हे अद्यापही आपल्या लक्षात आलेले नाही. छोटे मोठे मेळावे भरवणे, स्थानिक नेत्यांवर प्रभाव पाडून लहान सहान वैयक्तिक व सामाजिक कामे करून घेणे यापलीकडे संघटीततेचा काहीही फायदा झाला नाही.  आपले राज्यस्तरीय व देशस्तरीय प्रश्न अनुत्तरितचे अनुत्तरीतच राहिले! दुर्दैवाने आपल्यात अनेक गटतट असल्याने व प्रत्येकामध्ये काहीसा अहंकार, काहीसा मी पणा दाटल्याने प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो, मोठा समजतो व आपल्या शिवाय चळवळीचे हे प्रश्न सुटूच शकत नाहीत अशा काल्पनिक आविर्भावात गुंतून जातो. परिणामी नाही म्हटले तरी चळवळ मंदावते कारण चळवळ म्हणजे विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी केलेला सार्वजनिक लढा! याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त होत नाही!

आज रोजी स्थिती इतकी बिकट आहे की, भटक्या विमुक्तांमध्ये म्हणजे व्हीजेएनटीमध्ये बुद्धिवादी लोकांची कमी नाही परंतु त्या बुद्धीचा उपयोग चळवळीसाठी होताना दिसत नाही. प्रत्यक्ष जमीन पातळीवर तन-मन-धनाने सक्रियरित्या काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची कमी नाही परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रसंगी पाठबळ मिळताना दिसत नाही. काही ध्येयवेडे लोक सर्वांना एकत्रित करून एकसंघपणे लढा उभारत आहेत मात्र त्यात लोक व संघटना सामील होताना दिसत नाहीत. आडपाय घालणे, खाली खेचणे या प्रव्रुत्तीमुळे समाजाचे अगणित नुकसान होत आहे.

आता हेच बघा ना, आपल्याला सामाजिक संरक्षण नाहीये. आपल्या बांधवांवर व माता भगिनींवर होणार्‍या अन्याय अत्याचाराची शृंखला संपता संपत नाहीये. शासन आपला आवाज ऐकत नाहीये कारण आपल्या आवाजात ताकदच नाहीये. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे इतरांना ज्ञान शिकविणारा आपला समाज, पक्षांचा थवा, जनावरांचा कळप, मधमाशांचे पोळे, मुंग्यांचे वारूळ , उसाची मोळी यांचा आणि एकजुटीचा काय संबंध आहे? आणि एकजुटीचा व अन्याय प्रतिकाराचा काय संबंध आहे? हे समजतो, इतरांना सांगतो परंतु स्वतःवर वेळ आली की समूहापासून चळवळीपासून अलिप्त राहतो! अन्याय आहे, अत्याचार आहे, शोषण आहे, निरक्षरता आहे, दारिद्र्य आहे, दुर्लक्ष आहे तरी एकजुट नाही!! गांभीर्य नाही, संरक्षण नाही, घटनात्मक आरक्षण नाही, निश्चित ध्येयधोरण नाही, उपाय योजना नाहीत, तरीही गर्व अहंकार आहे!! अजब आहे ना? अहो अशाने प्रश्न सुटतील कसे?

आपल्यातील काही महाभाग आहेतही असे की त्यांचे काही प्रश्नच नाहीत परंतु त्यांनी एवढे समजून घ्यावे की आपल्या पिढीचे प्रश्न संपले म्हणजे सर्व प्रश्न संपले असे नाही. पुढच्या पिढीचे काय आपण शिकले, सुधारले म्हणजे झाले का? आपली काही सामाजिक बांधिलकी नसावी काय? आपला पैसा नसु द्या परंतु आपली बुद्धी व आपला अनुभव ही समाजाची व चळवळीची संपत्ती आहे! ती अशी वाया घालवू नका. आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रश्न हाताळण्याची हातोटी आहे, समाजाला संघटित करुन सुयोग्य दिशा देण्याची क्षमता आहे, नेतृत्व करण्याची योग्यता आहे त्यामुळे चळवळीपासून अलिप्त राहू नका. आपले दैनंदिन कारभार सांभाळत थोडा वेळ आपल्या समाज बांधवांसाठी द्या. मित्रांनो समाजाला आर्थिक मदत करून प्रश्न सुटत नसतात उलट अशाने माणूस आळशी बनतो परंतु जाणीव जागृती करणे, मार्गदर्शन करणे, उद्बोधन व प्रबोधन करणे, स्वाभिमान जागा करणे, शासनाचे लक्ष वेधून घेणे, शासनाला समाजाच्या समस्यांच्या निराकरणासाठी समाजहीताचे निर्णय घ्यायला भाग पाडणे अशाने एक तर प्रश्न निर्माणच होत नाहीत आणि झालेले सुटल्याशिवाय राहत नाहीत.

भटक्या विमुक्तांना उठावाची अत्यंत प्राचीन पार्श्वभूमी आहे आता पुन्हा एकदा संघटित होऊन उठाव करण्याची वेळ आली आहे. किमान महाराष्ट्रात तरी भटके विमुक्त हक्क परिषद नियोजनबद्धपणे व सर्व जमातींना एकत्रित करून, सोबत घेऊन, संघटितपणे कागदोपत्री व रस्त्यांवर अशा दोन्ही पातळ्यांवर यशस्वीरित्या लढा उभारताना दिसत आहे. भटक्या-विमुक्तांची एक मध्यवर्ती संघटना म्हणून नावारुपास येत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापले वैयक्तिक हित, मतभेद व गर्व अहंकार काही काळासाठी बाजूला ठेवून केवळ भटके विमुक्त म्हणून हक्क परिषदेच्या हाकेला ओ देवून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनात सर्व शक्तीनिशी सामील व्हावे असे मला वाटते.

कोणीतरी दिव्य नेता निर्माण होईल! तो आपले प्रश्न शासनदरबारी मांडील व शासन आपले प्रश्न सोडविल अशा भ्रमात कोणीही राहू नये. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागणार आहेत. त्याकरिता माणसे जागी करावीत, चळवळीशी जोडावीत, ध्येयाने प्रेरित करावीत व उद्दिष्टाशी बांधावीत असे मला वाटते. कारण या जगात विना सायास काहीही मिळत नाही. अगदी आई देखील आपल्या बाळाला रडल्या शिवाय दूध पाजत नाही! एकदा वेळ निघून गेल्यावर आक्रोश करून काही साध्य होत नसते. तेव्हा शहाण्यास अधिक बोलणे न लगे, सर्वांनी जागे व्हावे एकजूट व्हावे व संघर्ष करावा. अशक्त व लाचार लोक अन्यायापुढे मान झुकवितात तर सशक्त व स्वाभिमानी लोक अन्यायाविरुद्ध आंदोलन उभे करतात.

भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा पहिला टप्पा नाशिक विभागात पार पडला आहे. विभागातील धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव व नाशिक या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर वेगवेगळ्या दिवशी एक दिवसीय आक्रोश आंदोलन यशस्वीपणे पार पडले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे येथे आंदोलन होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलनात सर्व 52 जमातींच्या सर्व संघटनांनी, कार्यकर्त्यांनी व विशेष म्हणजे कलावंत व महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काही बिगर भटके विमुक्त संघटनांनी आंदोलनाला बिनशर्त जाहीर पाठींबा दिला. प्रसार माध्यमांनी पुरेपूर सहकार्य केले. त्यामुळे आता पुढील टप्प्यातील आंदोलन करण्यासाठी तयारीला लागा. लोकांना कल्पना द्या वातावरण तयार करा.

आपल्यापैकी अनेक जण आपापल्या जमातीत, जमातीय संघटनांचे पदाधिकारी आहेत. अनेक जण भटक्या-विमुक्तांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा हक्क परिषदेसारख्या एखाद्या संघटनेचे पदाधिकारी आहेत परंतु या संघटना म्हणजे राजकीय पक्ष नाहीत आणि जरी काही संघटना राजकीय पक्षांची प्रेरित व प्रभावित असतील तरी मला वाटते. आपला समाज व आपल्या समस्या आणि राजकीय पक्ष यांचा काहीही परस्पर संबंध नसावा. प्रश्नांच्या अनुषंगाने आपण कोणीही असलो, कुठेही असलो, आंदोलनाचे आयोजक संयोजक कोणीही असले तरी एकत्र यायलाच हवे.

दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला हक्क परिषदेमध्ये राज्य स्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर, शहर स्तरावर अथवा तालुकास्तरावर पद घेऊन खरोखरच जिम्मेदारी सांभाळायची आहे, ज्यांची सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची क्षमता आहे, काम करण्याची तयारी आहे, त्यांनी तशी इच्छा व्यक्त करायला हवी.  हक्क परिषद हे एक बिगरराजकीय, निस्वार्थी व पारदर्शक संघटन आहे. यात प्रत्येक स्त्री-पुरुषाला, प्रत्येकाच्या विचारांना व नेतृत्वगुणांना महत्त्व आहे. त्यांच्या उन्नतीस वाव आहे. आपल्यातील नेतृत्व क्षमता ही भटक्या विमुक्त जमातींची मालमत्ता आहे. तीचा विकास होणे, करणे काळाची गरज आहे.

मित्रांनो, मला जे बोलायचे ते मी बोललो. सदस्य होण्याची सक्ती नाही.पद घ्याच असा अट्टाहास नाही. इच्छुकांची कमी नाही परंतु सक्षम व लायक व्यक्तींची कोणत्याही संघटनेला आवश्यकता असते. त्यामुळे चळवळ भक्कम बनते. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळायला हवी ज्यांच्या अंगी क्षमता असेल. नेतृत्वाची क्षमता असणारी माणसे कधीही मागे राहू नयेत म्हणुन हे नम्र आवाहन. असो सदस्य बनणे, पदाधिकारी बनणे ऐच्छिक आहे. आपण कुठल्या ना कुठल्या संघटनेचे सदस्य अथवा पदाधिकारी आहात म्हणजे आपण चळवळीतच आहात. त्यामुळे काहीही करा आणि हे राज्यव्यापी आक्रोश आंदोलन प्रभावी व परिणामकारक कसे होईल? यासाठी सर्वांनी संपूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा.
धन्यवाद!!🙏

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
 मो. 9673945092.

दुर्दैवी भटकंती

दुर्दैवी भटकंती

"मराठवाड्यात पाऊस नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला गावोगावी हिंडावे लागतेय. एवढे कष्ट करून आमच्या मुली चांगल्या शकतील व सर्व चित्र बदलतील असे वाटत होते पण माझ्या लेकींवर बलात्कार झाल्याने आम्ही पूर्ण उद्ध्वस्त झालोय" हे करुण व आर्त उद्गार आहेत दुर्देवी पीडित मुलींच्या दुःखी भयभीत आणि हताश आईचे!!!😓

पुण्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील हिंजवडी या उच्चभ्रु आयटी परिसरात रविवार दिनांक 16 सप्टेंबर 2018 रोजी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दोन बारा वर्षांच्या अल्पवयीन बहिणींवर चॉकलेटचे आमिष दाखवून पाशवी बलात्कार करण्यात आला. गणेश निकम व त्याच्या 16 वर्षीय साथीदाराने त्यांना मंदिरामागील झाडीत नेऊन त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला शिवाय कोणाला सांगाल तर याद राखा म्हणून धमकावले.

मात्र दोन-तीन दिवसांनंतर बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांच्यातील एकीचा मृत्यू झाला आहे व दुसरी देखील गंभीर आहे. घटना उघड झाल्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी नराधम गणेश निकम व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. दुर्दैवी पीडित कुटुंब मराठवाड्यातील वंजारी या भटक्या जमातीचे आहे. तर नराधम गणेश निकम हा जळगाव जिल्ह्यातील आहे.

सदर कुटुंब ऊसतोड कामगार आहे. ते अत्यंत असुरक्षित आहे. " माझी एक मुलगी तर गेली मात्र आता दुसऱ्या मुलीचे लग्न होईल की नाही याची मला चिंता वाटते" हे हृदयाचा ठाव घेणारे उद्गार आहेत त्या दुःखी मातेचे जीच्या गरीबी व भटकंतीमुळे तीच्या मुलींवर हा अमानुष प्रसंग ओढावला.

मला अजिबात आश्चर्य वाटत नाही की या प्रकरणाची कुठल्याही मुख्य मिडियाने विशेष दखल का घेतली नाही? अथवा लोकप्रतिनिधी राजकारणी गणेश मंडळात मतदारांना आकर्षित करण्यात एवढे का दंग आहेत की त्यांना त्यांच्या आजुबाजुला काय चाललेय याचीच खबरबात नाही?

मला एतकिंचितही विचारावेसे वाटत नाही की एरवी बातम्या झापुन आणणारे स्त्रीवादी समाजसेवक आता काय झोपा काढत आहेत काय? एवढे सारे भटक्या विमुक्तांचे विविध राजकीय पक्षात लोकप्रतिनिधी व पुढारी आहेत त्यांचे मन एवढे कसे काय मरू शकते??

कारण आपल्याकडे दुर्दैवाने बलात्कारासारखी गंभीर घटना देखील जात, धर्म, भाषा, पक्ष, पैसा, स्थानिक, विस्थापित असे निकष लावून गंभीर अथवा सौम्य ठरवली जाते. हे कटु असले तरी सत्य आहे. त्यामुळे माझ्यासारखाच प्रत्येक बहीणींचा भाऊ व लेकींचा बाप अस्वस्थ आहे.

त्यामुळे मी प्रत्येक बापाला, प्रत्येक भावाला आणि भटक्या विमुक्तांच्या सर्व संघटनांना, कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करतो की या दुःखी पिढीत व असुरक्षित कुटुंबाला धिर देण्यासाठी आणि त्या दुर्दैवी अत्याचारग्रस्त एका मयत व दुसऱ्या मृत्यूशी सामना करत असलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून सदर घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा व गुन्हेगार नराधमांना लवकरात लवकर तथा कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपापल्या पद्धतीने सरकारवर दबाव वाढवावा....🙏

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9673945092.

वैष्णव बापुः


वैष्णव बापू....
बापुजींचे अर्थात म. गांधीजींचे वास्तववादी तत्वज्ञान म्हणजे सत्य, अहिंसा, प्रेम, विश्वास, समता, मानवता, सत्याग्रह, स्वदेशी, साधेपणा, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, स्वदेशनिष्ठा, सविनय आंदोलन, सत्याग्रह, कृषीप्रधानता, ग्रामविकास, मुलोद्योगी शिक्षण प्रणाली, महीला सबलीकरण, जातीवाद व अस्पृश्यता निर्मूलन, सेवाभाव, स्वच्छता, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, शाकाहार, ब्रम्हचर्य! हे तुम्हा-माझ्या सारख्याच्या कल्पनेपलीकडील आहे. तरीही काही बिनडोक व अक्कल शुन्य महाभाग मात्र आपली दिड दमडीची बुद्धी वापरून या महामानवाला मुर्ख समजतात, कमी लेखतात! बापु चांगले नव्हते म्हणतात!!!

ते बापु ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा अहिंसक मार्गाने लढला व जिंकून दाखविला!! एक जादुई माणुस ज्याच्याकडे माणसे आपसूक आकर्षित होत असत. त्यांच्या साधी राहाणी अत्युच्च विचारसरणीमुळे जगभरात त्यांचे करोडो अनुयायी आहेत. मुळ भारतीय सांस्कृतिक मूल्ये ज्यांच्या रोमारोमात विराजमान होते. इतरांच्या धर्माचा आदर करणारे एक सच्चे हिंदू असणारे बापुजी, कट्टरतावाद्यांच्या दृष्टीने नालायक ठरणारच ना..

ज्यांना दक्षिण आफ्रिकेत महात्मा म्हणतात! भारतात ज्यांना राष्ट्रपिता म्हणतात! सर्वसामान्य लोक ज्यांना प्रेमाने बापु म्हणतात! युनो ज्यांना man of the millennium म्हणते!! ज्यांचे असंख्य शिष्ये तत्वज्ञानाच्या अवकाशातील लखलखते तारे राहीले व आहेत त्या विचारसुर्याला राजकारणातले काही कळले नाही असे म्हणणा-या आणि विचारांचे ध्रुवीकरण झालेल्या पुर्वग्रह दुषित नालायकांना बापु लायक कसे काय वाटतील???

पद, पैसा व प्रतिष्ठेचा दुरान्वयेही मोह नसलेल्या महात्म्याला धन व राजकारणाचा बेसुमार हव्यास असणारेच जेव्हा हिन लेखतात तेव्हा त्यांना गांधीवाद म्हणजे काय हे विचारण्यात काय अर्थ आहे? 
गाढवांपुढे गीता वाचण्यात काय अर्थ आहे? जग क्रोधाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते हे ज्यांनी जगाला शिकविले ते प्रसन्नतेचे पुजारी बापु, या अशा बदमाशांमुळे बदनाम होत आहेत.

एखाद्याशी वैचारिक मतभेद समजले जाऊ शकतात. बापुंचे व तत्कालीन काही नेत्यांचे विचारवंतांचे परस्परांशी मतभेद होते मात्र शेवटी ते सर्वचजण बापूंना आदर्श मानतात. मात्र आताचे काही मिश्रविचारी लोक बापुंवर खालच्या स्तराला (अर्थात स्वतःच्याच) जाऊन टिका करतात, चिखलफेक करतात, कमेंट्स करतात, जोक्स करतात तेव्हा मला खुप वाईट वाटते. म्हणजे मला कळत नाही, सव्वाशे वर्षे ज्यांचे विचार मानवजातीला तारत आहेत ते गांधीजी मुल्यहीन कसे काय असु शकतात??

चला मला एवढे समजायला जास्त वेळ लागत नाही की जो राजकीयदृष्ट्या, धार्मिक द्रुष्ट्या, वैचारिक द्रुष्ट्या उदासीन (न्युट्रल) राहतो, तो शेवटी एकटा पडतो. गांधींनी सर्वांसाठी कार्य केले, सर्वांसाठी विचार मांडले पण शेवटी गांधी कुणाचे? असे म्हणायची वेळ आली. एक मात्र नक्की की गांधींना कितीही बदनाम करण्याचा आणि नियोजनपूर्वक संपविण्याचा प्रयत्न केला तरी असा नथुराम गोडसे जन्माला येऊच शकत नाही जो गांधी विचार संपवू शकेल. कारण बापू माणसाच्या मनामनात आसनस्थ आहेत.

मला वाटते ज्यांना बापूंचे केसविरहीत डोके तर दिसते परंतू डोक्यातील अमुल्य विचार समजत नाहीत, साधा चष्मा तर दिसतो पण त्यांची दुरद्रुष्टी व प्रेमदृष्टी दिसत नाही, खादीचा धोती-पंचा तर दिसतो पण त्यातील बेडागपणा साधेपणा स्वावलंबन व स्वदेशप्रेम दिसत नाही, त्यांची आधाराची काठी तर दिसते पण त्यांनी त्याच काठीच्या आधाराने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना कसा आधार दिला ते दिसत नाही, त्यांची किरकोळ देहयष्टी तर दिसते पण त्यातील पोलादी द्रुढनिश्चय दिसत नाही, त्यांना समजावण्यात आणि आपलाच वेळ खर्च करण्यात काय अर्थ आहे????

म्हणून महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक, राष्ट्रपिता, महात्मा गांधी यांना एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व गांधीवादी भावाबहीणींना मनःपूर्वक शुभेच्छा🌷 आणि जे बापूंना नावे ठेवतात त्यांनी दररोज सकाळी महात्मा गांधींजींचे अत्यंत आवडते असे संत नरसिंह मेहता यांचे गुजराती भजन जे त्यांच्या नित्य प्रभात प्रार्थनांमधील अविभाज्य घटक होते ते, "वैष्णव जन तो तेने कहिये..." हे भजन नक्की वाचावे व ऐकावे! विचारात फरक पडेल!.बाकी जास्त बोलण्यात काही अर्थ नाही कारण बापूच म्हटलेत, मौनं सर्वार्थ साधनं!!

‘वैष्णव जन तो तेने रे कहिए जे पीड़ पराई जाणे रे।
(खरा वैष्णव तोच आहे, जो दूस-याचे दुःख समझू शकतो) 

‘पर दु:खे उपकार करे तोये, मन अभिमान ना आणे रे1॥’ 
(दूस-याच्या दु:खावर जर उपकार केले, तर आपल्या मनात कसलाही अभिमान येऊ देत नाही)

‘सकल लोक मां सहुने वन्दे, निंदा न करे केनी रे।’
(जो सर्वांचा सम्मान करील आणि कुणाचीही निंदा करणार नाही)

 ‘वाच काछ मन निश्छल राखे, धन धन जननी तेनी रे॥2॥’
(जो आपली वाणी, कर्म आणि मन निश्छल रखील, त्याची आई धन्य-धन्य आहे)

‘समदृष्टि ने तृष्णा त्यागी परस्त्री जेने मात रे।’
(जो सर्वांना समान दृष्टिने पाहील, सांसारिक तृष्णेपासुन मुक्त होईल,  परस्त्रीला आपली आई समझील)

‘जिह्वा थकी असत्य न बोले, पर धन नव झाले हाथ रे॥3॥’
(ज्याची जिभ असत्य बोलताना थांबेल व जो दूस-याचे धन मिळविण्याची इच्छा बाळगणार नाही)

'मोह माया व्यापे नहिं जेने दृढ़ वैराग्य जेना मन मां रे।’
(जो मोह मायामध्ये गुरफटणार नाही, ज्याच्या मनात दृढ़ वैराग्य असेल)

’राम नाम शु ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे॥4॥’
(जो प्रत्येक क्षणाला मनात राम नामाचा जप करतो, त्याच्या शरीरात सर्व तीर्थ विद्यमान असतात)

‘वणलोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे।’
(ज्याने लोभ, कपट, काम आणि क्रोधावर विजय प्राप्त केला असेल)

‘भणे नरसैयो तेनु दर्शन करतां, कुल एकोतेर तार्या रे॥5॥’
(अशा वैष्णवाचे केवळ दर्शन घेतले तरी, त्याच्या परिवाराच्या एकाहत्तर पिढ्या तरून जातात)

(बाळासाहेब धुमाळ)

परोगामित्व

पुरोगामीत्वः 
कालपासून महीलांच्या रंगीत साड्यांवर फार पोष्ट्स फिरताना दिसत आहेत सोशल मीडियावर. महीलांना सावित्रीबाई फुलेंची आठवण करून दिली जात आहे. आज तर काही महाभागांना कावीळ झाल्यासारखं वाटत होतं म्हणे! कारण काय तर आज सगळं पिवळं पिवळंच दिसत होतं!!

माता सावित्रीबाईची आठवण येणे चांगलेच पण सावित्रीबाई फुलेंची आठवण आजच कशी काय झाली? एरवी क्रांतीज्योतीची जयंती पुण्यतिथी कधी येते आणि कधी जाते तेही समजत नाही! तेव्हा का नाही येत आठवण?

मला कळत नाही, धार्मिक व श्रद्धाळु असणे, पारंपरिक सण उत्सव साजरे करणे हे सुशिक्षित, पुरोगामी व विज्ञानवादी नसल्याचे लक्षण दाखवून काही लोक आपल्या नसलेल्या बुद्धीचा प्रकाश पाडण्याचा का प्रयत्न करतात???

अरे बाबांनो उच्चशिक्षित, विज्ञाननिष्ठ, तत्वज्ञानी, कवी, लेखक, प्रबोधक हे आपापले धर्म चालीरीती रूढी परंपरा पाळत असतील, सण उत्सव साजरे करत असतील तर त्यांना मुर्ख कसे काय ठरवू शकता तुम्ही??

जगातील जवळजवळ प्रत्येकजण धार्मिक व श्रद्धाळु आहे. मग जग काय नालायकच आहे?? जर धार्मिकतेतुन, श्रद्धेतुन वैयक्तिक  असो की सामाजिक असो, शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान होत नसेल तर माणसाने जर श्रद्धाळु का असु नये?? प्रत्येक माणसाला आपल्या जाती धर्माचा, रितीरिवाजांचा, सण उत्सवांचा, प्रतिकांचा, परंपरांचा आणि अस्मितांचा अभिमान असतोच की?? तुम्हाला का वाटते असु नये??

योग्य अयोग्य ठरविण्याचा, प्रमाणित करण्याचा, कुणाच्या भावना दुखविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?? इतरांवर टिका टिप्पणी करताना, फालतु कमेंट्स आणि बाष्कळ विनोद करताना आपापल्या अंतर्मनात डोकावून पहा जरा. आपले वर्तन, विचार कसे आहेत?? किती शुद्ध, शितल, सौम्य, सभ्य, मानवतावादी, पुरोगामी आहेत ते!! 

तुम्हाला जसे वागायचे तसे वागा परंतु इतरांनी कसे वागायचे ते त्यांना ठरवू द्या प्लीज. नाही परिवर्तन, प्रबोधन, उद्बोधन मी समजू शकतो परंतु ज्या मुद्यांत काही दम नाही, काही अर्थ नाही, काही नुकसान नाही असे मुद्दे समोर करून उगाच कोणाच्या भावना दुखावल्या म्हणजे तुम्ही पुरोगामी वा विज्ञानवादी ठरत नाहीत.

महीलांनी विविध रंगांच्या साड्या नेसलेल्या तुम्हांला आवडत नाही. हे तुम्हाला रूचत पचत नाही आणि डीजेच्या तालावर लग्न कार्यात, पार्ट्यात नाचणं चालतं?? तुमचीही एखादी रंगीत ओळख असेलच ना?? फॅशन शो मध्ये स्वतः कमी कपड्यात वॉक करणं, आपल्या लेकरांना फॅशनप्रमाणे सजवणं धजवणं चालतं?? तुमच्या बायका पोरिंनी तुमच्या तुमच्या सणांना जयंत्यांना तंग कपडे घातलेलं चालतं? आम्ही घालत नाहीत म्हणायची आहे हिंमत?? नाही ना? मग जिन्स टि शर्टपेक्षा साडी खराब!! वा रे पुरोगामित्व!!!!!!!!

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9421863725.

देव

देवः
दर्शन रांगेत श्रद्धाळुंच्या
घाम अंगातून गळतो!
खास भक्तांना विनाअडथळा
थेट प्रसाद मिळतो!!

देवबी आता भक्तांच्या
खिश्यानुरुप आशिर्वाद देतोय!
हात वर करण्यासाठी
टेबलाखालुन घेतोय!!

अनवाणी आडाणी गरिब
भक्त बिचारा उपाशी!
घरात दाटला अंधार
देवाला आरती तुपाची!!

रिकाम्या हाती आलेलं
देवाला आवडत नाही!
दक्षणा देणा-याला
कुणीच आडवत नाही!!

भाव भक्तीनं घ्यावं दर्शन
दुःख सांगावं आयुष्याचं!
देवच गुतलाय हिशेबात
नियोजन करीत भविष्याचं!!

त्यानं तरी का दरिद्री रहावं
पानफुलात खुश अखेर?
लक्ष्मीही सदा पार्वती
माणुसच तेवढा कुबेर?

अलंकार वस्त्रे दिल्यानं
पण देव कसा पावल?
दम दावुन धनाचा
देव संकटी धावल?

दान देणं त्यांच काम
कर्म करणं आपलं.
निर्विकार मनात कधी
पाप नाही वापलं.

त्याला लागत असता तर
प्राणही वाहीला असता!
घेत असता सारं तो तर
देवळात पुजारी नसता!!

त्याच्या नावं व्यापार
चालतो असं वाटतं.
दफ्तरी त्याच्या सारं
खाती तुझ्या साठतं.

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9421863725

Tuesday 25 September 2018

धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?

धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?
धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?

अलीकडच्या काळात रस्त्यांवर साजरे होणारे सार्वजनिक धार्मिक उत्सव, मिरवणूकींमध्ये गर्जणारे कर्णकर्कश डीजे,  प्रार्थनास्थळांवरील अनियंत्रित भोंगे, विवाह व घटस्फोट, अपत्य मर्यादा अशा अनेक मुद्द्यांवरून कायद्याने धर्मात हस्तक्षेप करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही धर्माचे धार्मिक आचरण इतरांसाठी म्हणजेच सार्वजनिकरित्या मानव जीवनासाठी त्रासदायक ठरू नये ही कायद्याची भुमिका आहे. मानवी जीवन, पर्यावरण व प्रकर्षाने जीवावरण यांना बाधा पोहोचणार नाही. जन्मजात मानवी हक्क अधिकारांचे संरक्षण व्हावे ही कायद्याची भुमिका आहे. मात्र समाजातील काही लोकांना हे धर्मावरील अतिक्रमण वाटते. धर्मामध्ये कायद्याने हस्तक्षेप करू नये, धर्म हा कायद्यापेक्षा प्राचीन आहे, धर्म हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे, धर्म ही आमची वैयक्तिक बाब आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. काहीजण तर अगदी कायद्यालाही आव्हान देतात. याच मुद्द्यावर मागच्या आठवड्यामध्ये मी एक फेसबुक पोल घेतला होता. "धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?" असा सरळ प्रश्न फेसबुक मित्रांना विचारला होता.

अर्थात मला यात अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळाला नाही कारण मुळात फेसबुक पोल ही संकल्पनाच अद्याप ब-याच जणांना माहीत नाही. तर बऱ्याच जणांना असे वाटते की उगीच आपले मत कळवून कशाला डोळ्यावर यायचे? वास्तविक पाहता हा पोल गोपनीय असतो. यात कोणी काय मत नोंदविले हे इतरांना कळत नाही. अशा प्रकारच्या पोलमधून साधारणपणे समाजमन काय विचार करते हे तपासून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच प्रयत्न मी केला होता. यात 26 टक्के लोकांनी धर्म श्रेष्ठ तर 74 टक्के लोकांनी कायदा श्रेष्ठ असे मत नोंदविले. ज्यांनी कायदा श्रेष्ठ असे मत मांडले त्या सर्वांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.

 मला कळत नाही कायद्यापेक्षा धर्म श्रेष्ठ असूच कसा काय शकतो?? खरे तर न्याय, संधी, समानता, हक्क अधिकारांची जपणूक हाच खरा धर्म असायला हवा. परंतु प्रत्येक धर्माचे नियम वेगळे असतात! कायदा मात्र सर्वांसाठी एकच असतो, समान असतो. धर्म बदलला जाऊ शकतो परंतु व्यक्तिगणिक कायदा बदलला जाऊ शकत नाही. धर्म ही वैयक्तिक बाब आहे तर कायदा ही सार्वजनीक हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. धर्माची निर्मिती कोणी केली? नियम कोणी बनविले? धर्म नियम बनविताना लोकमत व लोकहित लक्षात घेतले होते काय? याचे उत्तर सापडत नाही मात्र कायदे हे लोकांमार्फत निवडलेल्या अथवा लोक मान्यता असलेल्या समित्या, परिषदा व मंडळे यांनी बनविलेले असतात.

धर्मातून अनिष्ठ रूढी, परंपरा निर्माण होतात. त्यांनाच पुढे धर्मनियमांचे स्वरूप प्राप्त होते. पुढे काळाच्या कसोटीवर ही विचारसरणी टिकत नाही, परिणामी हे आचरण अयोग्य व अनिष्ट सिद्ध होते, मात्र तरीही त्यात बदल करता येत नाही! तशी धर्मात तरतूदच नसते! जर कोणी त्यात बदल करण्याचा, शुद्धीकरण, उद्बोधन, अथवा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तशी चळवळ सुरू केली तर त्याला धर्मद्रोही सिद्ध केले जाते. कायद्यात मात्र तसे नसते एखादा कायदा अन्यायकारक अथवा विसंगत आढळून आला तर त्यात बदल केला जाऊ शकतो अथवा तो संपुष्टातही आणला जाऊ शकतो.

आजवर धर्मातील अनेक रूढी, परंपरा, प्रघात यांनी मानवाचे शोषण केले आहे. एका ठराविक वर्गाकडे धर्मनियम बनविण्याची, त्यांची अंमलबजावणी करण्याची तसेच नियंत्रण ठेवण्याची, न्याय देण्याची, दंड करण्याची मक्तेदारी होती व आजही आहे. हे सर्व अधिकार वंशपरंपरेने अर्थात जन्मजात प्राप्त होतात.कायद्यात मात्र तसे नसते. आपली बौद्धिक योग्यता सिद्ध करून कोणीही कायद्याचा निर्माता, अमलदार अथवा न्यायदाता बनू शकतो. कायद्याच्या राज्यात जन्माने काहीच मिळत नाही. तिथे धर्म हा निकषही नसतो. धर्माचा काही फायदाही होत नाही व तोटाही होत नाही.

धर्मामुळे शक्तीचे ध्रुवीकरण होते तर कायद्यामुळे विकेंद्रीकरण होते. अनावश्यक उन्माद वा माज वाढीस लागतो, इतरांना आपल्यापेक्षा कमी लेखण्याची मानसिकता बनते, तशीच सवय जडते, द्वेष बळावत राहतो! तर कायदा संयम शिकवितो! बारकाईने पाहता धर्माने दिनदलित, दुर्बल व दुबळे, स्त्रिया, शारीरिकदृष्ट्या असक्षम लोक या समाजघटकांचा काहीही विचार केलेला नाही. या शोषित व दुर्लक्षित लोकसमूहाच्या विकासासाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली नाही उलट यांचे अधिकाधिक शोषण कसे होईल याचीच काळजी घेतली म्हटले तर वावगे ठरणार नाही. कायद्याने मात्र या सर्व घटकांना प्राधान्य दिले, न्याय दिला. एवढेच काय तर कायद्याने अगदी पशूपक्षी, वनस्पती ते पर्यावरणाचे अगदी निर्जीव घटक यांनाही न्याय दिला!

कायदा हा स्वतःच्या चिकित्सेची, समीक्षेची, टिकात्मक अभिव्यक्तीची जनतेला अनुमती देतो. असहमत वर्ग सनदशीर मार्गाने कायद्याला विरोध करू शकतो, निषेध नोंदवू शकतो आव्हान देऊ शकतो! कारण कायदा तशी अनुमती देतो नव्हे कायद्यात तशी सोयच केलेली असते मात्र धर्माच्या बाबीत हे करता येत नाही. धर्माला हे स्वतःवरील आक्रमक वाटते. याला धर्मद्रोह संबोधले जाते! आजवरच्या अनेक चिकित्सक संतांना, विचारवंतांना व संशोधकांना याची किंमत मोजावी लागली आहे.

जगातील प्रत्येक धर्म आपल्या धर्मियांना धर्मतत्वांचे व नियमांचे पालन करायला सांगतो मात्र परधर्म व परधर्मीयांबाबत एक प्रकारचा दुजाभावच जोपासला जातो. कायद्याने मात्र सर्व धर्म समान ठरविले आहेत. धर्माने समाजाला जाती-जातीत, पंथा-पंथात विभाजित केले आहे. स्तरीकरणाची म्हणजेच विषमतेची सुरुवात धर्मापासूनच झाल्याचे दिसते मात्र हे वर्गीकरण कमी करण्याचे काम कायद्याने केल्याचे दिसते. प्रत्येक धर्म स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो यातून तुलना व स्पर्धा निर्माण होते. आपण इतिहासात अनेक उदाहरणे पाहू शकतो की जिथे केवळ धर्मप्रसारासाठी मोठ-मोठी युद्धे झाली! मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली! प्रचंड हाल झाले! जोरजबरदस्तीने धर्मांतर करून घेण्यात आले! आजही सर्वच धर्मातील अनेक संस्था धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र यातील कोणीही सकल मानव जातीचे जीवनमान सुधारावे, अन्याय-अत्याचार संपावेत, समानतेचे, न्यायाचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी काम करताना दिसत नाही. थोड्याफार प्रमाणात प्रयत्न होताना दिसले तरी पर धर्मियांसाठी कोणीही काहीही करत नाही कारण स्वधर्म हेच कार्यक्षेत्र समजले जाते परंतु सर्व धर्मीयांच्या जीवनमानाची काळजी केवळ कायदाच घेतो. न्यायाचे व समानतेची राज्य प्रस्थापित केवळ कायदाच करतो!

वास्तविक पाहता कायदा हा मुळात धर्माचा अविभाज्य भाग असायला हवा. तसा तो प्रत्येक धर्मियाने समजायलाच हवा. आज प्रत्येक धर्माचे आपले असे स्वतंत्र कायदे आहेत. धर्मांनी अर्थात धर्मग्रंथांनी धर्मोपदेशकांनी मानवी जीवनात सुव्यवस्था व नीतीमुल्ये वाढीस लागावी त्यासाठी काही बंधने लावली हे खरे परंतु यातील वैविध्यामुळे स्थलकाल विसंगतीमुळे याला मर्यादा येतात. देशात जरी धर्म अनेक असले तरी माणुस मात्र एकच आहे. त्याची रचना, त्याच्या भावभावना, त्याच्या अपेक्षा, गरजा व समस्या समान आहेत. त्यामुळे एक समान कायदा असणे व तो श्रेष्ठ मानणे हेच उचीत व कालसुसंगत आहे.

धर्म श्रेष्ठ म्हणणारांनी व इतरांनाही म्हणा म्हणणाऱ्यांनी आपल्या बुद्धीची कवाडे उघडी ठेवून, सद्सद्विवेक जागा ठेवून हा विचार करावा की धर्माचे श्रेष्ठत्व मानावेसे म्हटले तरी प्रश्न असा निर्माण होईल कि कोणत्या धर्माचे श्रेष्ठत्व मान्य करायचे? कारण अनेक बाबींवर दोन धर्मांमध्ये मतभेद आहेत. वेगवेगळी धारणा आहे. काही धर्म हिंसेचे समर्थन करतात तर काही धर्म अहिंसेचे! कायदा मात्र कोणत्याच प्रकारची हिंसा मान्य करीत नाही. तो किमान एका देशात तरी एकच असतो त्यामुळे आज जेव्हा माणसाची ओळख, त्याचे लाभ हक्क अधिकार हे देशावरून निश्चित होतात तेव्हा कोणत्याही देशात, त्या देशाचा कायदा हाच श्रेष्ठ मानला गेला पाहिजे.

धर्माचा पुळका असणारे लोक जेव्हा धर्मातील लोकांना धर्मातीलच लोकांकडून त्रास दिला जातो तेव्हा का बरे मूग गिळून गप्प बसतात? किमान आपल्याच धर्मातील लोकांना तरी त्रास दिला जाऊ नये ना? धर्म हा जर माणसाला विभागत असेल, धर्मामुळे जर माणसे गटागटात विभागली जात असतील, धर्म धर्मांतर्गत अन्याय अत्याचार कलह रोखु शकत नसेल तर धर्माला श्रेष्ठ का म्हणून म्हणायचे? आणि जर असे म्हटले की धर्म श्रेष्ठ! तर मग आजवर धर्मांतरे का झाली? नवीन धर्मांची निर्मिती का झाली? म्हणजेच त्या कुठल्या का असेना, धर्मांमध्ये काहीतरी अयोग्य किंवा अनिष्ट होत होते जे न पटल्याने एक ठराविक वर्ग एखाद्या ठराविक धर्मापासून बाजूला झाला व त्यांना पटत असलेल्या विचारांच्या धर्माशी जोडला गेला अथवा आपला स्वतःचा वेगळा धर्म निर्माण केला.

मला कळत नाही, शेवटी धर्म धर्म म्हणजे तरी काय हो? आज रोजी आपण ज्या विविध क्षेत्रातील संघटना पाहतो अथवा राजकीय पक्ष पाहतो त्यापेक्षा धर्माची रचना वेगळी ती काय? कोणे एके काळी धर्माची स्थापना किंवा धर्माची निर्मिती ही देखील याच पद्धतीने झालेली आहे. कुणाच्यातरी विचारांवर धर्म आधारलेला आहे. कोणीतरी धर्माची संहिता तयार केली व ती संहिता पाळणारे एकत्र आले आणि धर्म तयार झाला. एकप्रकारे धर्म हा समविचारी लोकांचा समुहच आहे. पुढे धर्म संस्थापकाचे विचार व धर्माचे कार्य यांनी प्रेरित व प्रभावित होऊन धर्माचे अनुयायी वाढत गेले. संघटना किंवा राजकीय पक्ष यापेक्षा काही वेगळे असतात का? त्यामुळे कोणीही धर्माचे आगाऊ भूषण बाळगण्याची आवश्यकता नाही. त्याची काही आवश्यकताही नाही व उपयोगही नाही.

 बरं, आपला तो धर्म आणि दुसऱ्यांचा तो?? इतरांनाही धर्म आहे ना? त्यांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. या माझ्यातुझ्यात सर्वसामान्य माणसाचे हाल होतात त्याचे काय? मानवी उत्क्रांतीच्या काळामध्ये सर्वप्रथम माणूस समूहाने राहू लागला व त्यानंतर समविचारी लोकांच्या समूहामध्ये राहू लागला. त्यातून धर्म जन्माला आला अर्थात तेव्हाही त्याने कायद्याला महत्व दिलेच होते. कायद्याचे श्रेष्ठत्व त्या माणसांनी सुद्धा मान्य केले होते व त्याप्रमाणे ते वागत होते मात्र काळाच्या ओघात त्यांनी घालून दिलेले नियम हे बदललेल्या परिस्थितीत विसंगत व अन्यायकारक सिद्ध झाले. म्हणजे जर प्राचीन माणूस कायदा श्रेष्ठ मानत होता तर मग आता एकविसाव्या शतकातील सुशिक्षित व विचारी माणसे कायद्याला आव्हान कसे काय देतायत हे समजत नाही. कायद्यापेक्षा त्यांना धर्म श्रेष्ठ कसा काय वाटू शकतो हे समजत नाही. अर्थात अशा लोकांची संख्या जास्त नाही परंतु एवढी धार्मिक कट्टरता देखील धोक्याचीच!

साधी बाब आपण समजून घेतली पाहिजे की जे चांगले ते श्रेष्ठ असायला हवे ना? जर धर्म श्रेष्ठ आहे असे म्हटले तर आजवर असंख्य धर्म सुधारणा चळवळी करण्याची गरजच पडली नसती. त्यातील अनिष्ट बाबी संपविण्यासाठी व योग्य ते करून घेण्यासाठी कायदे करावे लागले नसते. धर्मामुळे धर्मयुद्धे झाली! कायद्यामुळे युद्धे शमली! भांडणे मिटली! आज कायद्यांमुळे भांडणे अथवा युद्धे करता येत नाहीत यातच कायद्याचे श्रेष्ठत्व आले. अहो कायदा आहे म्हणून आज प्रत्येकजण सुरक्षित आहे अन्यथा धार्मिक दंगलींमध्ये तसेच देशादेशांमधील धार्मिक युद्धांमध्ये मानव जात केव्हाच नष्ट झाली असती. कायदा आहे म्हणून जीवनाला, संपत्तीला व प्राणाला संरक्षण आहे अन्यथा यादवी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. कायद्याला आव्हान देण्याऐवजी आपापला धर्म मनात व घरात मानुन कायद्याचा आदर करण्यातच खरे शहाणपण आहे.

परंतु याचा अर्थ धर्म मानुच नये असा होतो का? धर्माची तत्त्वे जोपासूच नयेत असा होतो का? तर मी म्हणेल अजिबात नाही. धर्म हा मानलाच पाहिजे परंतु धर्म म्हणजे काय? धर्माने काय केले पाहिजे? धर्माची कोणती तत्वे पाळायला पाहिजेत? हे समजून घेतले पाहिजे. शिवाय जसा आपला धर्म आहे तसाच इतरांचाही धर्म आहे याची जाणीव ठेवून परस्पर सामंजस्य जपत जीवन शेवटाला नेहणे, ते नेहत असताना मागच्यांसाठी अनुकूल, सकारात्मक व हितावह सामाजिक वातावरण निर्माण करणे हाच खरा धर्म! कोणीतरी सांगावे व आपण धर्माच्या नावाखाली ते ऐकावे याला धर्मप्रेम म्हणत नाहीत तर याला गुलामी म्हणतात, तीही मानसिक गुलामी! याचाही विचार करायला हवा. धर्म हा प्रत्येकाला असतो. प्रत्येकाची ती एक खाजगी खाजगी बाब आहे. म्हणून प्रत्येकाने ती खाजगीच ठेवायला पाहिजे. धर्म प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे, घरात ठेवला पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये मानवता हाच खरा धर्म मानला गेला पाहिजे. कायद्याचे पालन हेच धर्माचरण असले पाहिजे नव्हे कायदा पाळणे हाच प्रत्येक देशवासीयांचा धर्म बनला पाहिजे.

 परंतु आज आपण पाहतो प्रत्येक धर्मात धर्मप्रेमाच्या नावाखाली धर्माचे प्रदर्शन करून एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. अशा प्रकाराची अजिबात आवश्यकता नाही. उलट आवश्यकता आहे ती धर्माच्या ख-या तत्त्वांचे पालन करून मानवता वाढीस लावण्याची. जेव्हा धर्माचा उपयोग राजकारणासाठी व लोकांना मूर्ख बनवून अर्थार्जनासाठी केला जातो तेव्हा धर्माचा खरा उद्देश नष्ट होतो आणि जेव्हा असे होते तेव्हा कायद्याची आवशक्ता निर्माण होते. आजवर अनेक धर्ममार्तंडांना व धर्मोपदेशकांना आपण माती खाताना पाहीले आहे. चारित्र्यहीन व्यापारी जेव्हा पैसा व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी धर्माचा उपयोग करतात तेव्हा कायद्याची आवश्यकता पटते.

त्यामुळे धर्म श्रेष्ठ वाटणारांनी व आपले हे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणारांनी एक लक्षात घ्यायला हवे की धर्माचा अभिमान केवळ आपल्यालाच आहे असे नाही. फरक एवढाच आहे की काही अंध अनुयायी असतात तर काही डोळस चिकीत्सक असतात जे उठसूट कुणाचेही विचार स्विकारत नाहीत. त्यामुळे केवळ आपणच धर्माभिमानी असल्याचा आव कोणीही आणू नये. आपणच सर्वोच्च धर्माभिमानी असल्याचा अविर्भाव अयोग्य आहे खरेतर जो धर्मातील एखाद्या अनिष्ट प्रथेविषयी रूढी परंपरेविषयी अथवा विद्यमान वर्तनाविषयी टीका करत असेल ती बाब सर्वांच्या समोर आणत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे कारण खऱ्या अर्थाने तोच खरा धर्म प्रेमी समजला गेला पाहिजे ज्याला आपल्या धर्मात कायद्याचे राज्य अपेक्षित असते. त्याला कोणत्याही प्रकारच्या अयोग्य व अनिष्ट बाबींचे अस्तित्व मान्य नसते मात्र काही लोक स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी, स्वतःची वेगळी ओळख टिकविण्यासाठी त्याला धर्मद्रोही सिद्ध करण्याचा ओढून-ताणून प्रयत्न करतात. मात्र हे इतरांच्या लक्षात येत नाही असं समजण्याची चूक करू नका कारण 74 टक्के लोकांना कायदा हाच श्रेष्ठ वाटतो....!

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9673945092.

Wednesday 12 September 2018

पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?

पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?

सुप्रसिद्ध संगीत संशोधक व हार्मोनियम वादक डॉ. विद्याधर ओक यांनी "पुनर्जन्म मिथ्य की तथ्य ?" हे पुस्तक लिहून एकप्रकारे खळबळच माजवली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे मोहंजोदाडो संस्कृतीतील एका राजगुरुचा पुनर्जन्म आहेत! उद्योगपती मुकेश अंबानी हे सम्राट अकबराचा पुनर्जन्म आहेत! उद्योगपती रतन टाटा हे औरंगजेबाचा पुनर्जन्म आहेत! तर जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या कवयित्री बहिणाबाई चौधरींचा पुनर्जन्म आहेत! डॉ. ओकांनी या पुस्तकात इतरही अनेक पुनर्जन्माची उदाहरणे दिली आहेत.

 त्यांनी हे अंदाज चेहरा व गुणात्मकता यांच्या आधारे बांधले आहेत. अंदाज कोणीही बांधु शकतो, कल्पना कोणीही करू शकतो मात्र डॉ. ओक हे कोणीही व्यक्ती नाहीत. ते इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर व संशोधक आहेत. ते एम.बी.बी.एस.डी. आहेत! त्यांनी एक विशिष्ट प्रकारची हार्मोनियम तयार केली आहे जिचे पेटंट त्यांच्याकडे आहेत!

पुनर्जन्म या संकल्पनेचे समर्थन वा पुनरुच्चार आजवर त्यांनीच केला आहे असेही नाही. आजवर जगभरातील अनेक विदवान शास्त्रज्ञांनी आपले आयुष्य या, आत्मा, भुत, पुनर्जन्म यांच्या शोधार्थ खर्च केले आहे. त्यांनी मोठमोठे दर्जेदार प्रबंध सादर केले आहेत. मोठमोठी पुस्तके लिहिली आहेत. केवळ हिंदु धर्मातच नव्हे तर जगातील सर्वच धर्मात व संप्रदायात पुनर्जन्म ही संकल्पना सत्य समजली जाते. डॉ. ओक आपल्या पुस्तकाच्या अर्थात "पुनर्जन्म" या संकल्पनेच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतात. ते म्हणतात की, दोन सख्ख्या भावांतही गुणात्मक दृष्ट्या खूप जास्त अंतर कसे काय असते? कमी वयातील बालकही अत्यंत प्रज्ञावंत असल्याचे अनेकदा कसे काय आढळून येते? कोणी शिकविलेले असते त्याला? हे असे सर्व प्रकार, पूर्वजन्माचे गुण एखाद्या व्यक्तीमध्ये आल्यानेच होतात असे त्यांना वाटते. 

तसे पाहता पुनर्जन्म ही संकल्पना फायदेशीरही खुप आहे. ती मानवी वर्तनावर नियंत्रक म्हणून भूमिका बजावते. माणसाला पुढील जन्मी चांगला जन्म मिळावा यासाठी चालू जन्मात चांगले कार्य करण्यास एक प्रकारे प्रव्रुत्तच करते. माणसातील मृत्यूची भीती नाहीशी करते व प्राप्त परिस्थितीमध्ये, जन्माने प्राप्त झालेले जीवन, त्यातील आव्हाने, संकटे स्वीकारून जगण्यास सक्षम बनवते. आजवर सर्वच धर्मात पाप-पुण्य, स्वर्ग-नर्क, जन्म-पुनर्जन्म या संकल्पना मान्य केलेल्या आहेत. मृत्यूनंतरचे सर्व विधि जसे की, दहन, रक्षाविसर्जन, दशक्रियाविधी, गंगापूजन, वर्षश्राद्ध व दानधर्म यापाठीमागचा उद्देशही हाच असतो की म्रुत आत्म्यास शांती लाभावी व पुढील जन्मी चांगला जन्म मिळावा; म्हणजेच पुनर्जन्म मिळावा. आपण बऱ्याचदा जन्मखूण आहे, पोटी आला आहे, नावकरी आहे अशी वाक्ये ऐकत असतो. ही सर्व उदाहरणे काहीशी पुनर्जन्माशीच मिळती जुळती आहेत.

आजवर अनेक साहित्यिकांनी या विषयावर कथा, कविता, कादंब-या लिहील्या आहेत. अनेक नाटककारांनी नाटके लिहीली आहेत तर अनेक चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी या विषयावर चित्रपट बनविले आहेत. या सर्व मंडळींना आपण चुकीचे ठरवू शकत नाही. या विषयाची उत्सुकता सर्वांनाच आहे, जगभर आहे.

मात्र असे असले तरी एक विज्ञानाचा विद्यार्थी व शिक्षक असल्याने माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. अर्थात असे म्हणत असताना मी डॉ. ओक व आजवरच्या सर्व साधुसंतांच्या, साहित्यिकांच्या व संशोधकांच्या बुद्धीचा आणि कार्याचा विनम्र आदर करतो. मात्र मी स्वतःला कितीही समजावायचा प्रयत्न केला तरी काही प्रश्न मला सतावताच. जसे की, आजवर अनेक देवी-देवतांनी पृथ्वीतलावर जन्म घेतले आहेत म्हणे! त्यांचे ते पुनर्जन्मच होते ना? मग हे पुनर्जन्म आता का होत नाहीत? स्वर्ग नावाची संकल्पना धर्मशास्त्रात सांगितली आहे. स्वर्ग हा आकाशात असतो म्हणे! मग तो आजवरच्या एवढ्या सगळ्या अवकाश संशोधन मोहिमांमध्ये का आढळला नाही? जन्माला आलेल्या सर्वांनाच पुनर्जन्म मिळतो का? हा पुनर्जन्म केवळ माणसाचाच होतो की इतर प्राण्यांचाही होतो? सर्वांनाच माणुस म्हणुनच पुनर्जन्म मिळतो कि इतर प्राणी म्हणुनही मिळतो? सर्वांनाच मिळतो व माणूस म्हणूनच मिळतो असे म्हटले तर मग पृथ्वीवरील लोकसंख्या वाढत का आहे? कायम राहिली पाहिजे ना?

जर आत्मा हा निर्गुण-निराकार आहे असे शास्त्र सांगत असेल तर डॉ. ओक असे कसे काय म्हणतात की आत्मा स्वतः सोबत काही गुण हे पुढच्या जन्मी घेऊन जातो? बरं, जर आत्मा केवळ एक देह सोडून दुसरा देह धारण करतो तर मग त्याची स्मृती कशी काय नष्ट होते? बरं जर स्मृती नष्ट होते तर मग त्यातील गुण कसे काय जीवंत राहतात? डॉ. ओकांनी सांगितलेल्या सर्व भारतीयांचे पुनर्जन्म केवळ भारतातच कसे काय झाले? केवळ भारतातच मानव आहेत असे नाही शिवाय असेही नाही की केवळ भारतातच भारतीय आहे.  शिवाय जैवरासायनिक बदल, जन्मजात बुद्यांक हे घटक कसे काय दुर्लक्षिले जाऊ शकतात? पुनर्जन्म ही संकल्पना जर शास्त्रात सांगितली आहे असे म्हटले तर "शास्त्र" हे निरंतर प्रगती करत असते हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे ना? परंतु "या" शास्त्राची कुठलीही प्रगती झाल्याचे दिसत नाही. एखादी बाब सत्य व टिकाऊ असली पाहिजे तरच ती सत्य समजली जाऊ शकते. शिवाय ती सिद्धही केली जायला हवी. ती वैश्विकही असायला हवी. ती काल व स्थलसापेक्षही असायला हवी. काय या सत्यता पुनर्जन्माच्या बाबतीत सत्यात उतरतात?

डॉ. ओक कल्पना काहीही करू शकतात. त्यावर लेखनही करू शकतात. मात्र किमान आजचे जग तरी विज्ञान मानते आणि विज्ञान हे तत्वावर आधारलेले आहे. तत्व जे सिद्ध होतात. त्यामुळे
जेव्हा एखादी प्रतिष्ठित विद्वान व्यक्ती असे म्हणते तेव्हा त्याला सहाजिकच महत्त्व प्राप्त होत असते. त्यामुळे मला शंका आहे की, या पुस्तकामुळे अंधश्रद्धा वाढीस लागण्यास मदत होणार नाही कशावरून? पूजापाठ, कर्मकांड वाढीस लागणार नाही कशावरून? बुवा, बाबा, साधु, तांत्रिक,  मांत्रिक यांचे फावणार नाही कशावरून? कर्तृत्वास बंधने येणार नाहीत कशावरून? माणूस दैववादी व उदासीन बनणार नाही कशावरून? माणूस परिस्थितीशी संघर्ष करण्यापेक्षा माघार घेऊन ,आहे त्याच्यात समाधान मानणार नाही कशावरून? अयोग्य व अन्यायकारक परिस्थीतीशी समायोजन साधण्याची वृत्ती वाढीस लागणार नाही कशावरून???

मला वाटते ही पुनर्जन्म नावाची संकल्पना काल्पनिक आहे. ती तोवर काल्पनिक मानायला हवी जोवर तीला विज्ञानाने घालुन दिलेले निकष पुर्ण करता येत नाहीत. त्यामुळे किमान तोवर तरी 'पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?' ते तुम्हीच ठरवा.......

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
मो. 9673945092.

Saturday 8 September 2018

वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दुर्लक्षित वारसदार


वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दुर्लक्षित वारसदार
भारतीय संस्कृती सर्वार्थाने समृद्ध व संपन्न संस्कृती आहे. तिचा गौरवशाली भूतकाळ व उज्ज्वल भविष्यकाळ आहे. शौर्य, साहित्य, कला, संगीत, स्थापत्य, अध्यात्म, शिक्षण व एकंदरीतच इतिहास वैभवशाली आहे. भारताची ही वैभवसंपन्न सांस्कृतिक ओळख संपूर्ण जगात आहे. मात्र ही ओळख आजची नाही.

आर्यांच्या आक्रमणापूर्वी अस्तित्वात असलेली सिंधू संस्कृतीच मुळात संपन्न होती. ही सभ्यता तिच्यातील हडप्पा, मोहेंजोदडो ही शहरे, त्यांच्यातील टुमदार गृहरचना, प्रशस्त रस्ते, सांडपाण्याची बंदिस्त व्यवस्था यांसाठी प्रसिद्ध होती. विपुल पशुधन, समृद्ध संगीत व कला हे सर्वच अगदी वाखाणण्याजोगे होते. या संस्कृतीचे निर्माते असलेले, एतद्देशीय द्रविड लोक कलागुण संपन्न व शांतता प्रिय होते तर परकिय आर्य हे, आक्रमक व साम्राज्यवादी होते. अर्थात मानवी प्रवासाच्या त्या काळात हा असा सत्तासंघर्ष व व्यापारसंघर्ष सामान्य होता, नैसर्गिक होता. मात्र सहाजिकच आर्यांच्या अतिक्रमणाचा या लोकांवर अनिष्ट परिणाम झाला. मुळात भटकेच असलेले आर्य व येथील मूळ निवासी द्रविड कारागीर, कलाकार, वाहतूकदार व पशुपालक यांच्यात नेहमी तक्रारी होऊ लागल्या. लढाया होऊ लागल्या ज्यात त्यांचा आर्यांपुढे निभाव लागला नाही. सततच्या युद्धाला कंटाळून, भयभीत होऊन, शांतता हवी म्हणुन अशा नानाविध कारणांनी परंतु मजबुरीने बहुतांश मुळनिवासी स्थलांतरित व विस्थापित झाले. त्यांच्यावर रानोमाळी, वनीजंगली लपून राहण्याची तसेच भटकत जीवन जगण्याची वेळ आली. एका ठिकाणी न राहाता संरक्षण, सोयीसुविधा व रोजगार अनुकूलतेच्या शोधार्थ हे लोक भटकंती करू लागले म्हणून त्यांना भटके असे म्हटले जाऊ लागले. टोळ्या टोळ्यांनी राहणे, प्रत्येक टोळीची व्यवसाय भिन्नता, प्रत्येक टोळीच्या वेगवेगळ्या रितीभाती, परंपरा, भाषा व विवाहपद्धती यांमुळे यांना जमातींचे स्वरूप आले. सतत भटकणाऱ्या जमाती म्हणून भटक्या जमाती अशा प्रकारचा भटक्यांचा अस्थिर व फिरस्ती जीवनाचा पूर्व इतिहास आहे जो अत्यंत प्राचीन आहे.

टोळ्याटोळ्यांनी वास्तव्य करणे, टोळ्यांच्या वैयक्तिक परंपरा जोपासणे, आपल्या टोळीला इतर टोळीपेक्षा श्रेष्ठ व वरचड सिद्ध करणे, कधी आर्यांच्या टोळ्यांशी तर कधी मुळ द्रविडीयन टोळ्यांशी संघर्ष होणे, रानावनातील लपुन छपून राहणे, हल्ले प्रतिहल्ले करणे या कारणांमुळे या टोळ्यांची कायिक, शौर्यात्मक, कलात्मक व कौशल्यात्मक क्षमता वृद्धींगत होत गेली. याचा परिणाम असा झाला की या शक्तीशाली हल्ल्यानंतरही आणि प्रदिर्घ संघर्षानंतरही या भटक्या जमाती हजारो वर्षांनंतरदेखील येथील समाजव्यवस्थेत व अर्थव्यवस्थेत आपले प्रबळ स्थान टिकवून होत्या हे विशेष!

कालपरत्वे परिस्थितीनुरूप समायोजन साधुन, सामाजिक एकोपा निर्माण करून, प्रसंगी माघार घेऊन या जमाती येथील मध्यवर्ती हिंदु संस्कृतीशी संलग्न राहील्या व संस्कृतीच्या अविभाज्य घटक बनल्या. या काळात व्यवसायाधारित जाती व्यवस्था अस्तित्वात होती पुढच्या काळात जाती आधारित व्यवसाय व्यवस्था प्रस्थापित झाली. असे असले तरी रोजगाराच्या दृष्टीने सर्व जाती जमाती स्वायत्त व स्वयंपूर्ण होत्या कारण शहरे संपन्न व खेडे समृद्ध होती. या समृद्धतेत व संपन्नतेत उभय वर्गांचा हिस्सावाटा होता. नव्हे नव्हे या कालखंडापर्यंत दोन्ही संस्कृती एकात्म झाल्या होत्या. मात्र इसवी सन सोळाशे मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची देशात स्थापना झाली आणि प्लासीच्या लढाईने देशात प्रत्यक्ष इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू झाला तेथपासून एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या जमातींंना पराकोटीचा संघर्ष करावा लागला. गुन्हेगारी जमाती कायद्याने तर यांना ब्रिटीश सरकारने अगदी गुन्हेगार जमातींचे लेबलच लावून टाकले! त्यांनी मारलेला गुन्हेगार जमाती हा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही!

पूर्वाश्रमीच्या लढवय्या, शूर, आक्रमक, काटक, रानटी व व्यापारी जमाती ज्यात महाराष्ट्रातील बेरड, बेस्तर, भामटा, कैकाडी, कंजारभाट, कटाबु, वंजारी, बंजारा अथवा लमाण, पारधी, रामोशी, पथारी यांसह भारतातील सर्वच जमाती पुरातन काळापासून आक्रामक व काटक जमाती आहेत. यांचे प्राचीन राजेशाही, स्वराज्य निर्मिती, ब्रिटीश विरोधी उठाव व स्वातंत्र्य लढा यात अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. काटकता, निर्भीडता, चपळाई, स्वामिनिष्ठा रक्तातच असल्याने या जमाती राजसत्तेच्या लाडक्या, विश्वासू तसेच आधारस्तंभ जमाती होत्या. तत्कालीन राजेशाहीने या जमातींची कौशल्ये व क्षमता पाहून त्यांना महत्त्वाची कामे नेमुन दिली होती, जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या. उपजत योग्यता अपेक्षेप्रमाणे आढळल्याने या जमातींना आपल्या घोडदळ, पायदळ, आरमारदल, गुप्तहेर खाते अथवा गुप्तचर यंत्रणा यात महत्वाच्या जागांवर प्रभावीरीत्या वापरण्यात आले होते. ज्यांना या जमातींची क्षमता व योग्यता समजली त्यांचे राज्य सुरक्षित व अबाधित राहिले. दोघांनीही परस्परांना बळकटी प्रदान केली.

शिवकाळात स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या जमातींना छत्रपती शिवराय, शंभूराजे, राजारामराजे यांच्या काळात योग्य तो मानसन्मान मिळाला. शिवछत्रपतींच्या जीवाला जीव देऊन त्यांच्या व जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य उभे करण्यात भटक्या विमुक्तांनी  ते ज्या ज्या क्षेत्रात निष्णात आहेत त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम योगदान दिले. शिवरायांच्या गनिमी कावा युद्धनीतीमध्ये या जमातीमधील अनेकांनी हिरीरीने सहभाग घेतला नव्हे नव्हे महाराजांनी याच जमातींचा कौशल्याने वापर करून घेतला. आपल्या आपल्या पारंपारिक भाषा व सांकेतिक भाषा असल्याने तसेच वेषांतर करण्याची अंगभूत कला असल्याने शत्रू गोटातील, शत्रू राज्यातील माहिती सफाईदारपणे जमा करून ती राजदरबारी पोहोचविण्याचे काम गुप्तपणे या जमातींनी केले. एकुणच काय तर सर्वांनी आपापल्या परीने स्वराज्यास हातभार लावला हे सर्वज्ञात आहे. किमान सर्वश्रुत तरी नक्कीच आहे. महाराष्ट्रात मराठेशाहीच्या अस्तानंतर मात्र या जमातींचा राजाश्रय नाहीसा झाला कारण इंग्रजांनी येथील राजेशाही संपुष्टात आणली होती. संस्थाने खालसा केली होती. अस्तित्वात असलेली इंग्रजी सत्तेच्या अंकित होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही मात्र त्यातही ज्या संस्थानिकांची अस्मिता जिवंत होती त्यांना या जमातींनी ताकद दिलेली आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासह संपुर्ण देशभर सारखीच होती.

आज वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे असलेले तसेच काळाच्या ओघामध्ये नाहीसे झालेले अनेक गडकिल्ले, दुर्ग, लेणी, मनोरे, भुयारे, मंदिरे, राजवाडे, गुहा, दिपमाळा, सभामंडप, तळघरे, कारंजे, धरणे, घाट, खिंडी, मकबरे इत्यादी नयनरम्य आणि डोळ्याचे पारणे फेडणा-या निर्मीती, वडार, बेलदार, पाथरवट या जमातींनी निर्माण केल्या आहेत. स्थापत्यकलेचे हे अनुपम नमुने तत्कालीन सम्रुद्धतेचे पुरावे आहेत. म्हणजे आजच्या या जमाती त्या काळच्या वास्तुशास्त्रातील वास्तुरचनाकार व अभियंते होत्या असे म्हटले तर अजिबात चुकीचे होणार नाही. या वास्तू त्यांनी ना केवळ आपल्या घामाच्या धारा गाळून बनविलेल्या आहेत तर रक्ताच्या धारा वाहवून, अवयव गमावून, कायमचे अपंगत्व पत्कारून व प्रसंगी जीव गमावून निर्माण केल्या आहेत. तेव्हा आज सर्वांना अभिमानास्पद अशा या दीर्घायुषी व विलोभनीय वास्तू उभ्या आहेत. यासाठी यांनी कुठलाही विशेष मोबदला कधी मागीतला नाही.

युद्धकाळात व एरवीही लागणारी शस्त्रास्त्रे, तोफा व तोफखाने गड-किल्ल्यांचे दरवाजे, मुर्त्या व पुतळे, नाणी व शिक्के तयार करणारे व इतरही धातुकाम व मूर्तिकाम करणाऱ्या लोहार, घिसाडी, ओतारी, ठुकारी, शिकलगार या जमातींनी सोसलेल्या झळा, मारलेले हातोडे व सहन केलेले चटके विसरता येणार नाहीत. सागरी सरहद्दीवर गस्त घालण्याचे, लढाऊ जहाजे व होड्या चालविण्याचे, कित्येक महीने समुद्रातच राहणून शत्रुला रोखण्याचे, परतवून लावण्याचे काम करणारे भोई, मल्लाव, कोळी यांचा त्याग व यांचे परिश्रम यामुळे युद्धे जिंकणे, मुलूख सहीसलामत ठेवणे, परमुलूख हस्तगत करणे शक्य झालेले आहे. याचा यांनी कधीही मावेजा मागीतला नाही.

देवी-देवतांची भक्ती, उपासना करणारे तसेच इतिहासातील प्रेरक, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे, घटना इत्यादी कथा व गीते लोककलेद्वारे सादर करून संस्कृतीचे मौखिक तसेच आपापल्या इतर कलाप्रकारांनी वहन करणा-या वासुदेव, बहुरूपी, आईंवाले, गोसाई, भोपी, गोंधळी, गोसावी, भराडी, चित्रकथी, हेळवे, जोशी, पांगुळ इत्यादी जमातींनी धार्मिक, अध्यात्मिक पात्रांची व घटनांची माहीती सांगितिक व कलात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडली. साधुसंतांचा, राजेमहाराजेंचा इतिहास जिवंत ठेवला. इतिहासातील शुरविरांच्या गाथा, चरित्रे, प्रसंग आदींचे गुणात्मक व मुल्यात्मक महत्त्व जनतेसमोर कलेद्वारे सादर केले. एवढेच नव्हे तर युद्धकाळात सैनिकांसमोर प्रेरक व जोशवर्धक कथा व गीते सादर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवीला, ऊर्जा दिली. मनोरंजनाबरोबरच नैतिकता, मुल्ये, शौर्य व आदर्शाचे धडे कलेतुन दिले. समाजातील वातावरण धार्मिक, सांप्रदायिक, प्रसन्न व शांततेचे ठेवले. याची दखल घेवून सर्वच नाही तरी किमान शिवरायांसारख्या पारखी राजांनी काही प्रमाणात का असेना पण यांना जहागि-या, वतने, इनाम, बक्षिसे बहाल केली.

 प्राण्यांच्या सहाय्याने खेळ दाखविणा-या गारुडी, नंदीवाले, मदारी, वाघवाले, दरवेशी, अस्वलवाले, जादूगार रक्षक आहेत येथील जैवविविधतेचे. पर्यावरणीय व पशुपक्षीय जैवविविधता मनोरंजनातून समजावून देण्याच्या पद्धतीच्या त्या जनक आहेत. तसेच रस्त्यावर मर्दानी कौशल्याधारित कसरती करणारे कोल्हाटी, गोपाळ, डोंबारी या जमाती शुद्ध व सात्विक मनोरंजन, बलोपासना यांचे महत्व समजावतात. जंगलांवर आधारित जीवन असणारे व गोल्ला, धनगर, ठेलारी तसेच मसनजोगी, काशिकापडी या सर्व भटक्या विमुक्त जमाती या देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे भूषण आहेत. येथील लोकजीवनाच्या या नाड्या होत्या. यांच्या भाषा, यांचे राहणीमान, यांची कलाकौशल्ये यांनी या देशाची संस्कृती लोकजीवन समृद्ध केलेले आहे. या जमाती ख-या अर्थाने वाहक आहेत धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक भिन्नतेच्या. देशाचा व संस्कृतीचा इतिहास या जमातींनी पद्धतशीरपणे जिवंत ठेवला आहे. त्याचे पिढी दरपिढी संक्रमण व संवहन केले आहे. यासाठी त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

आज रोजी मात्र या जमातींची जाणीवपूर्वक उपेक्षा केली जात आहे. यांच्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे. या उपेक्षेची व दुर्लक्षाची समीक्षा व चिकित्सा होणे अत्यंत आवश्यक आहे. भारतभर विखुरलेला हा भटका समाज, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून जाणीवपूर्वक दूर ठेवला जात आहे. ही उपेक्षा आता असह्य होत आहे. सहनशीलतेचा अंत होत आहे. मुख्यत्वे ब्रिटिशांनी शोषण केल्यामुळे देशोधडीला लागलेल्या या जमातींचे आपल्या तेथील बलुतेदार व आलुतेदार पद्धतीनेही शोषणच केलेले आहे. या पद्धतीने हक्काचा रोजगार जरी उपलब्ध करून दिला होता तरी या पद्धतीत क्षमतांची योग्य किंमत होत नव्हती. केवळ अन्नधान्याच्या मोबदल्यात इतर बलुतेदारांच्या व आलुतेदारांच्या सोबत लोहार, घिसाडी, भोई, गुरव, गवळी, धनगर, गोंधळी, डवरी, गोसावी, जोशी या भटक्या जमातींनी वस्तू व सेवा पुरवून प्राचीन भारतीय कृषीजीवन व दैनंदिन लोकजीवन स्वयंपूर्ण केले. या जमातींनी या देशाला यशोशिखरावर आरूढ केलेले आहे. आज जो भारत विश्वात आपल्या वैभवशाली संस्कृतीसाठी आदराने उच्चारला जात आहे त्यात भटक्या-विमुक्तांचे योगदान लक्षणीय आहे. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी पक्क्या उपजीविकेच्या साधनाची उपलब्धता करण्यात आली नाही. आज रोजी हा समाज विकासाच्या कुठल्याही पातळीवर आढळत नाही. वर्षानुवर्षांचा कोंडमारा, जीवनमानावर नकारात्मक परिणाम करणारे कायदे, यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण यामुळे  बंद पडलेले पारंपरिक रोजगार, संपुष्टात आलेली पारंपारिक बलुतेदारी व आलुतेदारी पद्धती, त्यामुळे निर्माण झालेली बरोजगारी, भुमिहीनता व साधनविहीनता यांचा विपरीत परिणाम भटक्यांच्या जीवनमानावर पडलेला आहे.

पुर्वीच्या काळी जरी या जमाती धनवान नव्हत्या तरी मानवान मात्र नक्कीच होत्या. हे महत्त्वपूर्ण स्थान त्यांनी आपल्या कला कौशल्यातून व कर्तबगारीतुन मिळविले होते. हा समाज वैशिष्ट्यपूर्ण भारतीय संस्कृतीचा मूळाधार होत्या. भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृतीची मुख्य ओळख होत्या! मात्र दुर्दैवाने आज रोजी तेच गौरवपूर्ण इतिहास असलेले भटके विमुक्त अगदी उदरनिर्वाहासाठी लाचार आहेत. पायाला चाक बांधून भटकंती करणारे, भटके लोक मरणासन्न जिवन जगत आहेत. एवढ्या वैभवशाली संस्कृतीचे निर्माते असुनही यांना कुठल्याही प्रकारचा मावेजा अथवा मोबदला मिळत नाही. वास्तविक पाहता हा गौरवास्पद इतिहास निर्माण करण्यासाठी यांनी तेव्हा कुठलीही विशेष अपेक्षा व्यक्त केली नव्हती.केवळ पोटापुरत्या अन्नपाण्यावर ध्यैयाने बेभान होवून आपल्या सर्वशक्तिनीशी यांनी कार्ये केली.

 ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्य प्रस्थापित करण्यातील, त्यात वृद्धी होण्यातील त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठ्या अडसर असणाऱ्या या जमातींना पद्धतशीरपणे बाजूला केले. या जमातींचे उपद्रवमूल्य ओळखून त्यांना गुन्हेगार जमाती घोषित केले. त्यांच्यावर कायद्याने बंधने लादली मात्र स्वतंत्र भारतातील नागरिकांनी या जमातींचा नेमका गुन्हा समजून घेतला पाहिजे. यांनी नेमका कोणत्या प्रकारचा गुन्हा केला होता हेच अद्याप कित्येकांना माहीत नाही मात्र तेच लोक या जमातींना गुन्हेगार जमाती असे संबोधतात! वास्तविक पाहता या जमातींनी गोऱ्या सरकारला सळो की पळो करून सोडले होते मात्र दुर्दैव असे की आज रोजी याच लढवय्या व गुणवान जमातींवर भीक मागण्याची वेळ आलेली आहे! कायद्याने तर भिकही मागता येत नाही. ज्याप्रमाणे 'गुन्हेगार जमाती' हा डाग आहे त्याचप्रमाणे 'भिकारी जमाती' हा देखील एक प्रकारचा डागच आहे जो या जमातींवर पडला आहे.

वैभवशाली भारतीय संस्कृतीचे हे खऱ्या अर्थाने निर्माते असूनही यांना कुठलाही वारसा हक्क प्राप्त झाला नाही. खऱ्या अर्थाने या संस्कृतीचे वारसदार असुनही या जमातींची आज अवहेलना होत आहे. एका गौरवपूर्ण इतिहासाच्या निर्मात्या असूनही या जमातींवर प्रथम आर्यांच्या अतिक्रमणामुळे, पुढे ईस्ट इंडिया कंपनीमुळे, त्यानंतर इंग्रजांच्या जुलमी कायद्यामुळे, तदनंतर स्वतंत्र भारतातील अन्यायकारक कायद्यांमुळे आणि आता आधुनिकीकरण व औद्योगिकरणामुळे आज बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

 समाजाच्या संशयास्पद व घृणास्पद दृष्टिकोनामुळे यांना कोणतेही सन्मानजनक काम मिळत नाही. यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही परिणामी यांना प्रतिबंधित व्यवसाय जसे की, दारू तयार करणे, अवैध वाहतूक करणे, गुन्हेगारी जगताला पूरक व्यवसाय करणे, महिलांवर देहविक्रय करणे, भीक मागणे असे व्यवसाय करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. अर्थात असे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जरी थोडीच आहे तरी शिक्षण, प्रतिष्ठा, संपत्ती, रोजगार नसल्याने तसेच निरक्षरता, व्यसनाधीनता, दैववादीपण व अंधश्रद्धा असल्याने समाजात नकारात्मकता, द्वेषभावना व विद्रोहवृत्ती वाढीस लागत आहे. ही भावना भविष्यात अधिक गतीने वाढूही शकते जर अशाच प्रकारे प्रस्थापितांकडून हिनतेची, अविश्वासाची तसेच संशयाची वागणूक मिळू लागली आणि शासनाकडूनही उदासीनतेची व दुर्लक्षीततेची वागणूक मिळत राहिली तर!

 हे दुर्लक्ष असेच होत राहीले तर हा समाज अधिकच वाममार्गाला लागू शकतो. असेही या देशात डोके भडकवणारांची संख्या कमी नाही. एखाद्या चुकीच्या व्यक्तीकडून अथवा गटाकडून या जमातींचा आपराधिक कामांसाठी वापर करून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे वेळीच या जमातींकडे शासनाने विशेष लक्ष देऊन यांना मुख्य प्रवाहात आणण्याची नितांत निकड आहे. असे नाही झाले तर पुन्हा एकदा उठाव करण्याची वेळ या जमातींवर लादल्यासारखे होईल याची जाणीव प्रस्थापितांना व शासनाला होणे अत्यंत आवश्यक आहे कारण या जमाती या देशाच्या वैभवशाली संस्कृतीच्या सर्वार्थाने वारस आहेत परंतु दुर्लक्षित आहेत!!!!

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
मो. 9673945092.

Wednesday 5 September 2018

शिक्षकदिन

शिक्षकदिन...

प्रतिभावंत मराठी लेखक, विचारवंत आणि आद्य समाजसुधारक महात्मा फुल्यांनी महाराष्ट्रात शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची व अस्पृश्य शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा सुरू केली तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्यातच वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये पहीली शाळा सुरू केली. त्यांचे हे कार्य प्रवाहाच्या विरूद्ध होते. त्यांना प्रतिगामी सनातन्यांकडुन पराकोटीचा विरोध झाला. पण फुले आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात स्वतःच्या घरापासून केली. पत्‍नी सावित्रीबाईंना शिकवून त्यांच्यावर मुलींच्या शाळेची जिम्मेदारी सोपवली. अशाप्रकारे क्रांतिज्योती सावित्रीबाई ह्या देशाच्या आद्य शिक्षिका व मुख्याध्यापिका आहेत!!

अंगावर शेण चिखल झेलून त्यांनी शिक्षणाच्या रोपाचे रोपन केले. त्यांनी सहन केलेला त्रास व केलेला त्याग अकल्पनीय आणि अतुलनीय आहे. परिणामी आज त्याच रोपाचा विशाल असा वटवृक्ष झाला आहे. खासकरून स्त्रीयांना व अस्पृश्य तथा बहुजनांना त्यांनी शाळेची वाट दाखवली. केवळ शिक्षणच नव्हे तर एकुणच पुरोगामित्व, सेवाभाव व मानवतावाद वाढीस लावण्यात या दामपत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः महात्मा फुलेंना गुरू मानत!  महात्मा फुले 1827 ला जन्मले व प्रतिकूल परिस्थितीत, कर्मठ भारतीय व जुलमी इंग्रज यांच्या विरोधात जावून युगप्रवर्तक कार्य करून 1890 मध्ये गेले.

ज्यांचा जन्मदिवस आज आपण #शिक्षकदिन म्हणून साजरा करतोय ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1888 जन्मले 1975 ला गेले. ते भारताचे पहीले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. ते भारतरत्नही आहेत. ते प्राध्यापक होते, ते प्रज्ञावंत होते, उत्कृष्ट वक्ते, साहित्यिक व तत्वज्ञ होते. मी व्यक्तीशः त्यांचा चाहता आहे.

मात्र मला कळत नाही की त्यांचा जन्मदिवस "शिक्षकदिन" म्हणून साजरा करण्यासारखे त्यांनी शिक्षण क्षेत्रात कोणते अतुलनीय समाजकार्य केले आहे??? मला हे ही कळत नाही की, फुले दामपत्य आद्य शिक्षक असुनही, भारतीय महीला शिक्षण व अस्पृश्यांच्या तसेच बहुजनांच्या शिक्षणाचे आद्य जनक असुनही, त्यांचा त्याग व संघर्ष अतुलनीय असुनही त्यांना अद्याप भारतरत्न पुरस्कार का दिला गेला नाही. खरे तर ते सर्व पुरस्कारांपेक्षा वरचे आहेत पण मग तसे जाहीर का केले जात नाही???? शिवाय या दोघांच्याही स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर दोन विशेष दिवस का साजरे केले जात नाहीत???

चालु आहे यात काही बदल करावा असे मला अजिबात वाटत नाही. ते योग्यही ठरणार नाही. मात्र महामानव महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अन्याय होतोय हे नक्की हे दुर्लक्ष, हा अन्याय थांबवून त्यांना राष्ट्रीय स्तरावर यथोचित सन्मान दिला गेलाच पाहिजे.
शिक्षक दिनानिमित्त या दोन्हीही आद्य शिक्षकांना माझा मानाचा मुजरा तसेच भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींनाही विनम्र अभिवादन...
बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

Monday 3 September 2018

संघटित भटक्या विमुक्त जमातींचे असंघटीत आंदोलन

भटक्या विमुक्त संघटीत जमातींचे असंघटीत आंदोलनः
आर्यांच्या आक्रमणापासून ते ब्रिटिशांच्या आक्रमणापर्यंत, ब्रिटिश राजवटीपासुन ते भारतीय स्वातंत्र्यापर्यंत आणि भारतीय स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत भारतातील मूळ भटक्या-विमुक्तांवर घोर अन्यायच होत आलेला आहे. आज रोजी देशात साधारणपणे 315 भटक्या जमाती तर 198 विमुक्त जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात 14 विमुक्त जमाती ( VJA), 37 भटक्या जमाती  ब ( NTB)  शिवाय धनगर म्हणजे भजक (NTC) आणि वंजारी म्हणजे भजड (NTD) या जमाती अस्तित्वात आहेत. पैकी धनगर जमात अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट होण्यासाठी तर वंजारी जमात ओबीसीमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करतेय. अर्थात त्यांनी तसा प्रयत्न करावा? की न करावा? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणा परंतु मला कळत नाही, धनगर बांधवांची भुमिका एकवेळ आपण समजू शकतो. ती रास्तही आहे परंतु वंजारी बांधवांचे गणित काही माझ्या लक्षात येत नाही. म्हणजे जे आरक्षण आदरणीय मुंडे साहेबांच्या प्रयत्नाने व कृपेने मिळाले आहे त्याचा त्याग करून हे बांधव एनटी ते ओबीसी असा उलट प्रवाही प्रवास का करताहेत? हे माझ्यासाठी सध्या तरी अनाकलनीय आहे. आज अनेक ओबीसी जाती स्वतःला भटके सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असताना वंजारी मात्र स्वतःला ओबीसी सिद्ध करू पहात आहेत ते कसले हित जाणुन हे त्यांनाच ठाऊक. मात्र मला खात्री आहे हे त्या जमातीचे सार्वमत नक्कीच नाही. असो सद्ध्यातरी या उभय जमाती भटक्याच आहेत, आपली भावंडेच आहेत. त्यामुळे मला त्यात जास्त खोलवर जायचे नाही. ओघाने आले म्हणुन लिहीले मात्र मला आपले लक्ष इकडे वेधायचे आहे की या वरील सर्वच जमातींचे राज्य स्तरावरील व केंद्र स्तरावरील विविध प्रश्न आहेत व ते व्यापक अर्थाने समान आहेत. ते प्रश्न सामान्यपणे पुढीलप्रमाणे आहेत.

देशभरातील भटक्या-विमुक्तांची जातवार जनगणना करणे, रेणके आयोग व इदाते आयोग यांनी केलेली भटक्या विमुक्तांसाठीच्या स्वंतत्र तिसऱ्या शेड्युलची शिफारस आमलात आणणे, घटनात्मक दर्जा असलेला कायमस्वरूपी राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग निर्माण करणे, महाराष्ट्राच्या धर्तीवर इतर राज्यांमध्येही भटक्या-विमुक्तांना आरक्षण मिळणे, राज्य लोकसेवा आयोगाकडून शासकीय अधिकारी व कर्मचारी भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणात होत असलेला अन्याय दूर करणे, विजाभज इमाव व विमा प्रवर्ग कल्याण मंत्रालयास भरीव अनुदान देवून त्याची स्पष्ट विभागणी करुन खर्च करणे, राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवाल क्रमांक 49 मधील त्रुटी दूर करुन अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या धर्तीवर सरसकट नॉन क्रिमिलियरच्या अटीतून सूट मिळणे, इदाते आयोगाचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर खुला करणे व जसाच्या तसा अमलात आणणे, जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यातील जाचक अटी दूर करुन सर्वांना ही प्रमाणपत्रे सहजपणे मिळणे, अस्ट्रॉसिटी कायदा भटके विमुक्तांनाही लागू करुन सरंक्षण मिळणे, कलाकार नकलाकार कसरतीकार कारागीर भटक्या जमातींना गावोगावी उतरण्यासाठी हक्काची जागा मिळणे, त्यांना पोलीस संरक्षण मिळणे, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती वेळेवर मिळणे, नोकरभरतील अनुशेष भरणे, अनुसूचित जाती जमातींच्या धर्तीवर नोकऱ्यांमध्ये पदोन्नती मिळणे, बंद करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करणे, भटक्या विमुक्त जमातींच्या महिलांवरील अत्याचार बंद होणे, बार्टीसारखीच भटके विमुक्तांसाठीही स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन करणे, लोककला संवर्धनासाठी शासकीय शिक्षण-प्रशिक्षण संस्था असणे, भटके विमुक्तांमधील कौशल्य विकास व उद्योजकता विकासास चालना मिळेल अशा सोयीसुविधा असणे, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करणे, यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजना प्रभावीपणे राबविणे, पशुपालनास भरीव अर्थसहाय्य मिळणे, वनराई पास मिळणे, जमातींमधील उपजमातींना स्वतंत्र जमात म्हणून कागदोपत्री मान्यता मिळणे, वस्त्या व तांडे यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळणे, बेघरांना घरे मिळणे, भूमिहीनांना भूमी मिळणे, मोफत शिक्षण रोजगार व स्वयंरोजगार यांचे प्रशिक्षण मिळणे, संरक्षण मिळणे, अस्तीत्वात असलेल्या योजनांच्या अमलबजावणीत प्राधान्य मिळण्याऐवजी अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून  जाणिवपूर्वक दुर्लक्ष होणे, असे विविध प्रश्न देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणास कारणीभूत आहेत.

देशातील सर्वात मागास असलेला आपला समुदाय जर खर्‍या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये यावा असे वाटत असेल तर हे वरील सर्व प्रश्न सुटणे अत्यावश्यक आहे. हे प्रश्न सर्वसामान्य समाज बांधवांना जरी माहीत नसले तरी त्या-त्या समाजाच्या नेत्यांना मात्र नक्कीच माहित आहेत. मात्र तरीही ते या प्रश्नांकडे का डोळेझाक करत आहेत? का दुर्लक्ष करत आहेत हे मला समजत नाही. हे प्रश्न केवळ मंत्रिमंडळांकडून, सभागृहांकडून, संसदेकडून, राज्यपालांकडून व राष्ट्रपतींकडून तसेच न्यायालयांकडुनच सोडवले जाऊ शकतात. यासाठी समाजाने संघटीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नियोजनबद्ध व सुयोग्य पद्धतीने संघटीतरित्या संघर्ष करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे समाज संघटितही आहे मात्र आपले जमातीय संघटन आहे. म्हणजे आपण जात म्हणून अथवा जमात म्हणून संघटीत आहोत मात्र दुर्दैवाने "भटके विमुक्त" म्हणून तितकेसे संघटीत नाही आहोत. भटक्या विमूक्तांची जवळजवळ प्रत्येक जमात ही स्वतःपुरती बर्‍यापैकी संघटित आहे. प्रत्येक जमातीतील लोक एकत्र येऊन जमातीचे मेळावे आयोजित करणे, वधू-वर सूचक मेळावे घेणे, छोटे-मोठे सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित करणे, गणेशोत्सव नवरात्रोत्सव दहीहंडी उत्सव साजरा करणे असे उपक्रम घेतात. त्यांच्या नेत्यांचा हेतू हा स्थानिक राजकारण्यांवर प्रभाव पाडणे, आपली तसेच जमातीची छोटी-मोठी कामे करून घेणे असा असतो मात्र या संघटनांचा उपयोग वर उल्लेख केल्याप्रमाणे राज्य व देश स्तरावर भटक्या-विमुक्तांच्या प्रगतीमधील मुख्य अडसर असलेले प्रश्न सोडविण्यासाठी होत नाही. जेव्हा भटके-विमुक्त म्हणून संघर्ष करण्याची, एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ येते तेव्हा या वैयक्तिक जमातीय संघटीततेचा फायदा सर्व जमातींच्या संघटीत असण्यासाठी तितकासा होताना दिसत नाही. म्हणजे जमातीच्या मेळाव्यांना हजारोंच्या संख्येने लोक येऊ शकतात तेथेच सर्व जमातींच्या मिळून प्रश्नांवर जेव्हा एखादी संघटना रस्त्यावर उतरते तेव्हा मात्र शे-सव्वाशे लोकही येत नाहीत हा आजवरचा कटू अनुभव आहे.

तसे पाहिले तर आजवर आपल्या कुठल्याही एका जमातीचे प्रश्न शासनकर्त्यांकडून सुटल्याचे दिसत नाही कारण शासन कोण्या एकाच जमातीचे प्रश्न सोडवूच शकत नाही. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्या सोडविणे शक्य होत नाही. स्थानिक पुढारी काही कामे आपण संघटीत असल्यामुळे करतात. त्यात काही विशेष नाही कारण त्यांना मतांची आवश्यकता असते. त्यांच्या दृष्टीने आपण वोट बँक असतो. विशेष म्हणजे आपल्या मागण्याही क्षुल्लक असतात. जसे की विज जोडणी, नळ जोडणी, रस्ते नाल्या निर्मीती ते एखादे समाज मंदिर, पोलीस स्टेशनमधील सहकार्य, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, कार्यक्रमांना संरक्षण हजेरी व वर्गणी इत्यादी. अशा छोट्या छोट्या मागण्या ते पुर्ण करून आपला मतदार निश्चित करतात. दैनंदिन जीवन जगत असताना या छोट्या छोट्या अडचणी दुर होणेही आवश्यक असते हे मी समजू शकतो. अशावेळी आपल्या जमातीय संघटीततेचा व आपल्या जमातींच्या नेत्यांचा उपयोग होतो हे ही मी समजतो.

मात्र मला आपले लक्ष आपल्या मुख्य प्रश्नांकडे वेधायचे आहे. अशाप्रकारे छोटे छोटे प्रश्न सोडविण्यासाठी समाजाची बहुमोल शक्ती खर्चुन आपले वर उल्लेखिलेले मुलभूत प्रश्न सुटणार आहेत का? आपल्या जीवनमानावर तसेच आपल्या पुढील पिढ्यांच्या जीवनमानावर यामुळे काही विशेष प्रभाव पडणार आहे का? मग आपण शक्ती, बुद्धी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ वाया घालवत नाही आहोत का? कोणत्या प्रश्नांना महत्त्व द्यावे हे आपल्याला समजायला नको का? हे जे आपण करतोय ते अनावश्यक आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही मात्र पुरेसे नक्कीच नाही. कारण आपल्या खऱ्या समस्या सोडवायच्या असतील, आपल्या या स्थितीस जिम्मेदार असणाऱ्या प्रश्नांना हात घालायचा असेल व कायमस्वरूपी ईलाज करायचा असेल तर आपल्यातील ही शक्ती भटक्या-विमुक्तांच्या सकल प्रश्नांवर भांडणाऱ्या आणि सर्व भटक्या-विमुक्तांसाठी सर्वांपासून बनलेल्या संघटनांच्या पाठीशी उभी करायला हवी.

मित्रांनो आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले प्रश्न गहन आहेत. आपले प्रश्न राज्यस्तरीय, देशस्तरीय आहेत. जरी त्यांची सोडवणूक जिल्हास्तरावरून होणार असेल तरी आदेश मात्र राज्य मंत्रीमंडळ, केंद्रिय मंत्रीमंडळ यांचेकडून व्हायला लागतील. ते सोडवण्याची क्षमता स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमध्ये नाही एव्हाना ते त्यांच्या अख्त्यारीतील देखील नाहीत. स्थानिक राजकीय नेत्यांचा तसेच काही प्रमाणात जमातींच्या नेत्यांचा हेतू साध्य होतो मात्र आपला म्हणजे समाजाचा हेतू मात्र तसाच दुर्लक्षित व अनुत्तरीत राहतो. त्यासाठी मी सर्व जमातींच्या नेत्यांना नम्र विनंती करतो की आपापले जातीय संघटनांचे अस्तित्व कायम ठेवून अशाच प्रकारे लोकांना संघटित करून, ही संघटित शक्ती भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या झगडणा-या व आपल्यातूनच तयार झालेल्या संघटनांच्या पाठीशी उभी करायला हवी.

त्याचबरोबर भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अनेक संघटनांनी देखील वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे व श्रेयवाद बाजुला सारून, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून शासनाकडे मागण्या मांडण्यापेक्षा आपापसात समन्वय ठेवून एकसंघपणे हे प्रश्न शासनापर्यंत जर पोहोचवले, त्यावर जर आंदोलने केली तर नक्कीच आपले आंदोलन धारदार होईल. त्याकडे शासनकर्त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही व परिणामी आपले प्रश्‍न सुटणे सुकर होईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक समान कार्यक्रम तयार करून त्याच्या पूर्ततेसाठी झगडले पाहिजे. अन्यथा आपण पाहतो आपल्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आपली अक्षरशः उभी हयात आंदोलनासाठी खर्च केली मात्र म्हणावे तितके यश पदरी पडलेले नाही. याचे कारण एकच 'जमातीय संघटित शक्ती भटक्या-विमुक्तांच्या संघर्षाच्या कामी येत नाही'. त्यासाठी जमातीय संघटनांच्या नेत्यांनी, भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांमध्ये सामील होऊन आपली शक्ती बुद्धी चळवळीची ताकद वाढविण्यासाठी कामी आणायला हवी. अशाप्रकारे जर जमातीय संघटनांची संघटित शक्ती भटक्या-विमुक्तांच्या आंदोलनापाठीमागे उभी राहीली तर मला खात्री आहे, आपले प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे कृपया सर्वांनी विषय समजून घेऊन एकत्रितपणे लढा उभारावा असे मला वाटते तशी मी सर्वांना नम्र विनंती करतो.

आपलाः
श्री. बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो.नं. -9673945092.