Wednesday 29 August 2018

विमुक्तदिन

विमुक्तदिन...

दिनांक 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री व दिनांक 15 ऑगस्ट 1947 च्या पहाटे दिल्लीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पवित्र भाषण केले व त्यानंतर देशभरातील जनतेने स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हा देशात एक असाही वर्ग होता, जो भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आद्य सैनिक होता! ज्याने आपले सर्वस्व या लढाईत गमावले होते मात्र तो या सर्व चालु घडामोडींपासून खूप दूर होता. एक प्रकारचे नरक जीवन बंदिस्त ठिकाणी जगत होता!!

इसवी सन 1600 मध्ये भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांची भारतातील व्यापारी कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेनंतर भटक्या जमातींच्या पारंपारिक व्यवसाय व्यापार यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊ लागले. स्वदेशी मालाला पडते दिवस येऊ लागले. कारण मुळ भटक्या जमाती या व्यापारी व व्यावसायिक जमाती होत्या. मालाची ने-आण करणे, खरेदी-विक्री करणे, वस्तू तयार करून देणे अथवा स्वतः त्यांची खरेदी विक्री करणे, कला नकला दाखविणे असे या जमातींचे अर्थार्जनाचे पारंपरिक पर्याय होते. हे पारंपरिक पर्याय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मुळे धोक्यात आले होते. या जमाती व ईस्ट इंडिया कंपनी परस्परांचे व्यावसायिक शत्रू बनले होते. त्यामुळे या जमाती ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध हमेशा कुरापती करत असत. ज्यामध्ये इंग्रजी मालावर दरोडे घालणे, वाटमाऱ्या करणे इत्यादी. इंग्रज यांना पिंढारी अथवा ठग संबोधत असत. इथपर्यंत हा संघर्ष केवळ व्यावसायिक होता मात्र जेव्हा इंग्रजांनी येथील सत्ता काबीज करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्या दिशेने षडयंत्रे रचली जाऊ लागली तेव्हा हा सर्व डाव या जमातींच्या लक्षात आला आणि मग त्यांनी गनिमी पद्धतीने हल्ले करून इंग्रजांना जेरीस आणण्याचे कारस्थान सुरू केले. क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांतिकारी उठावाची सुरूवात यांनीच केली. तिर, कामठा, फासे, भाले, बरचे, कुर्‍हाडी अशी पारंपारिक शस्त्रे घेऊन हे देशभक्त क्रांतिकारी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करू पाहत होते. इंग्रजांच्या गुप्तचर पाहणीमध्ये असे आढळले की प्रामुख्याने या भटक्या जमातीच अशा क्रांतिकारी कारवायांमध्ये सहभागी आहेत. तसेच ज्या प्रत्यक्ष सहभागी नाहीत त्या छुप्या पद्धतीने त्यांना माहिती व वस्तूंची रसद पुरवित आहेत.

या भटक्या जमातीमधील लोक लढवय्ये, शूर व काटक तर होतेच त्याचबरोबर त्यांच्या अंगी जन्मजात कौशल्ये देखील होती. करपल्लवी नेत्रपल्लवी अशा सांकेतिक भाषा त्यांच्याकडे होत्या ज्यात विशिष्ट खुणा तथा संकेत वापरून संवाद साधले जात. शिवाय त्यांच्या त्यांच्या पारंपारिक ध्वनी भाषाही होत्या. वेषांतर करण्याची जन्मजात कला होती यामुळे इंग्रजी राजवटीविरुद्धचा असंतोष जो राष्ट्रीय उठावाच्या दिशेने जात होता तो असंतोष संघटीत होण्यास भटक्या जमाती अधिक कारणीभूत ठरत होत्या. इंग्रजी अन्याय अत्याचाराची, इंग्रजांविषयीच्या माहीतीची, इंग्रजी राजवटीविरूद्ध जनमत एकत्र करण्याची तसेच याचा थांगपत्ता इंग्रजांना न लागु देण्याची महत्वपूर्ण कामगिरी या जमाती करत असत. त्यांच्यामुळे इंग्रजी राजवटीविरुद्ध लोक एकत्र येऊन कट करू नयेत, उठावाचे लोण पसरू नये, लोकांमध्ये संदेशांची देवाणघेवाण होऊ नये, लोक पेटून उठू नयेत यासाठी इंग्रजांनी दडपशाहीच्या मार्गाने या भटक्या जमातींवर बंदी आणण्याचे ठरविले.

भारतीय स्वातंत्र्य संग्राम सर्व भारतीयांनी लढला मात्र या स्वातंत्र्यसंग्रामाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली ती आदिवासी व भटक्या जमातींनी कारण ईस्ट इंडिया कंपनीचा सर्वाधिक दुष्परिणाम जंगली व फिरस्ती जमातींवर झालेला होता त्यामुळे या जमाती आपापल्या पद्धतीने या इंग्रजी जुलमी राजवटीविरुद्ध एकत्र येऊन त्यांना विरोध करत होत्या. हा विरोध अधिकाधिक व्यापक व यशस्वी कसा होईल व याचे रूपांतर उठावात व उठावाचे रूपांतर क्रांतीत अथवा स्वातंत्र्याच्या लढाईत कसे होईल यासाठी यांच्या टोळ्या प्रयत्न करायच्या. या जमाती एकत्र येऊन टोळ्या तयार करून इंग्रजी पोलीस छावण्यांवर छुपे हल्ले करायच्या, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची रक्तवाहिनी असलेली रेल्वे अडवायच्या, रेल्वे रूळ उखडायच्या, शस्त्रास्त्रे दारूगोळा यांची कोठारे लुटायच्या, कोठारे उध्वस्त करायच्या, सरकारी खजिना लुटायच्या, इंग्रज अधिकाऱ्यांचे अपहरण करायच्या, त्यांच्या हत्या करायच्या. असे राष्ट्रहिताचे व क्रांतिकारक कार्य या टोळ्या करत असत म्हणजेच या जमाती इंग्रजांच्या सर्वात मोठा शत्रु होत्या. भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या अस्तित्वास या जमातींपासुन धोका होता.

त्यामुळे 1857 चा राष्ट्रीय उठाव कसाबसा शमविल्यानंतर मात्र यापुढेही असे होऊ शकते हा संभाव्य धोका ओळखुन डोईजड होत चाललेल्या व नियंत्रणात येत नसलेल्या या भटक्या जमातींना पायबंद घालण्यासाठी इंग्रज सरकारने 1871 मध्ये एक कायदा आणला. तो कायदा होता "गुन्हेगार जमाती कायदा 1871". या जुलमी कायद्याने भटक्यांचे अक्षरशः जीवन उद्ध्वस्त करून टाकले. त्यांना जन्मतःच गुन्हेगार करून टाकले. या कायद्यान्वये सुमारे दोनशे जमातींना गुन्हेगार जमाती ठरवून त्यांचे स्वातंत्र्य नष्ट केले गेले. त्यांचे वैयक्तिक जीवनही नष्ट केले सर्व स्त्री-पुरुष आबालवृद्ध तसेच किशोरवयीन बालके एवढेच नव्हे तर अक्षरशः नुकतीच जन्माला आलेली नवजात बालके देखील या कायद्याने गुन्हेगार ठरविले.

मात्र तरीही या जमातीच्या गणीमी युद्धनीतीत फारसा फरक पडला नाही. म्हणून इंग्रजांनी 1913 मध्ये या भटक्यांच्या सर्व स्त्री-पुरुष महिला व बालके यांना सात बोटींमध्ये जबरदस्तीने कोंबले व त्या बोटी समुद्रात बुडवून देण्याचे ठरविले. मात्र ब्रिटनच्या राणीने धर्मगुरूंच्या आग्रहावरून हस्तक्षेप केला व त्यांच्यासाठी सरकारच्या नियंत्रणात रोजगार निर्मितीचे पर्याय 52 कैदखान्यांमधून उपलब्ध केले. या कैदखान्यांनाच सेटलमेंट्स असे म्हणत. अशा सेटलमेंट्स बेळगाव, विजापूर, मेरठ, धारवाड, म्हैसूर, मद्रास, दिल्ली, अहमदाबाद, झाबवा, हैदराबाद, गुलबर्गा तर महाराष्ट्रात सोलापूर, मुंडवा, अंबरनाथ यांचेसह देशातील मध्य प्रदेश बंगाल गुजरात अशा राज्यांमध्ये या 52 सेटलमेंट्स निर्माण करण्यात आल्या. या कैदखान्यात या जमातींना अक्षरशः गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात असे. त्यांच्याकडून बारा-बारा तास जनावरांप्रमाणे कष्ट करून घेतले जात असे. ज्याप्रमाणे पूर्वीच्याकाळी साम्राज्यवादी विजयी सम्राट हा पराभूत सैनिकांकडून व गुलाम जनतेकडून जबरदस्तीने किल्ले बांधून घेत, रस्ते करून घेत, खिंडी खोदुन घेत, भुयारे खोदुन घेत, राजमहाल बांधुन घेत अगदी त्याचप्रमाणे या सेटलमेंटमध्येही या जमातींच्या श्रमाचे शोषण केले जात होते. या सेटलमेंट म्हणजे एक प्रकारचे काराग्रहच होते, जिथे गुलामीही होती व कष्टही होते!

स्वातंत्र्यानंतर दिनांक 31 ऑगस्ट 1952 रोजी म्हणजे तब्बल पाच वर्षे सोळा दिवसानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत भाषण केले व त्यात ते म्हणाले की, "आज रोजी आपण सर्व भारतीय मुक्त आहोत मात्र आजपासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी विशेष लढा उभारणारे भटके-विमुक्त विशेष मुक्त म्हणजेच "विमुक्त" आहेत." विशेष म्हणजे या सेटलमेंटच्या तारा पुरोगामी महाराष्ट्रात तुटायला 13 ऑगस्ट 1961 चा दिवस उजाडावा लागला. तब्बल 14 वर्षे!! महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दिनांक 13 ऑगस्ट 1961 रोजी सोलापूर येथील सेटलमेंटच्या तारा तोडून बंदिस्त भटक्या जमातींना मुक्त केले, विमुक्त केले . म्हणजेच देशातील भटक्यांना इसवी सन 1952 मध्ये तर महाराष्ट्रातील भटक्यांना 1961 मध्ये ख-या अर्थाने स्वातंत्र्य लाभले!!

मात्र जरी देशातील भटक्यांची सेटलमेंट मधून 1971 चा गुन्हेगारी जमाती कायदा नष्ट करून सुटका केली असली तरी भटक्या-विमुक्तांचे दुर्दैव संपले असे अजिबात नाही. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. गावगाड्यातील अस्पृश्यांना अनुसूचित जाती म्हणून व गावाबाहेरील जंगलातील आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण दिले गेले. मात्र रस्त्यांवर, माळरानात, गायरानात, नदी-नाल्यांकाठी, पालांमध्ये तंबूंमध्ये राहणाऱ्या या भटक्या-विमुक्तांना कुठलेही घटनात्मक आरक्षण अथवा संरक्षण मिळाले नाही. संविधान अमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने "1871 चा गुन्हेगार जमाती कायदा" रद्द झाला व भटक्या-विमुक्तांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले एवढेच.

आणखी एक दुर्दैव म्हणजे ज्यांच्याकडे ना ओळखीचा पुरावा आहे, ना शिक्षणाचा पुरावा आहे, ना वास्तव्याचा पुरावा आहे, एव्हाना ज्यांच्याकडे आपण भारतीय असल्याचाही म्हणजे भारतीयत्वाचाही पुरावा नाही!! यांना ताकदवाणांमध्ये जीवनसंघर्ष करण्यासाठी केंद्राने ओबीसीमध्ये टाकले आहे! हा भटक्या विमुक्त तमातींवर खुप मोठा अन्याय आहे. कारण "1871 च्या गुन्हेगारी जमाती कायद्याचा व 1952 च्या हॅबिच्युअल ऑफेंडर्स अॅक्टचा" परिणाम असा झाला आहे की आज हा समाज सामाजिक विषमतेने ग्रासला गेला आहे. गुन्हेगाराचा कलंक पुसला गेलेला नाही. समाजमनाची पूर्वग्रहदूषित मानसिकता या जमातींना जगू देत नाही. यांना ना काम दिले जातेय ना यांच्यावर विश्वास ठेवला जातोय. यांचे सर्वच पारंपारिक रोजगार यांत्रिकीकरणाने आधुनिकीकरणाच्या नावाखाली नष्ट करण्यात आले आहेत. कारागीर, कलाकार, नकलाकार, कसरतीकार जमातींचे पारंपरिक रोजगार व्यावसाय स्वतंत्र भारतात कायदे करून संपुष्टात आणले गेले. त्यांना अक्षरशः भिकही मागु दिली जात नाही! संशयाचे भुत यांचा पाठलाग सोडत नाहीये. अनेकदा यांना ठेसुन, जाळून मारले गेले आहे. एका संवैधानिक व लोकशाही गणराज्यात स्वातंत्र्याच्या आद्य स्वातंत्र्य सैनिकांच्या वाट्याला हे असावे हे अशोभनीय आहे. जर खर्‍या अर्थाने या जमातींना न्याय मिळवून द्यायचा असेल तर केंद्रात "डीएनटी" हे स्वतंत्र तिसरे शेड्युल निर्माण करून यांना घटनात्मक आरक्षण व संरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. हॅबिच्युअल ऑफेंडर्स अॅक्ट 1952 रद्द करणे, कायदेशीर संरक्षण व ओळख देणे, त्यांच्यासाठी पक्क्या निवा-याची सोय करणे, शिक्षण व रोजगाराची विशेष व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा जे इसवी सन 1600 पासून सुरू होते तेच थोड्याफार फरकाने आजही सुरू आहे आणि थोड्याफार फरकाने उद्याही सुरू राहील. 

असो लिखाण जास्त लांबवत नाही मात्र "विमुक्तदिनाच्या" निमित्ताने प्रत्येक भटक्या विमुक्ताला आपला इतिहास माहित असावा असे वाटते. आपण भटके-विमुक्त म्हणजे नेमके कोण आहोत? आपल्याला तसे का संबोधले जाते व 31 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणजे "विमुक्तदिन" कसा? हे समजावे एवढ्यासाठीच हा शब्दप्रपंच....सर्व भटक्या विमुक्त भावा-बहीणींना "विमुक्तदिनाच्या" मनःपूर्वक शुभेच्छा..।।

आपला:
बाळासाहेब सिताराम धुमाळ.        
मो.9673945092.

Thursday 23 August 2018

अमर रहे तु अटल

(महाकवी महामानव भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री. अटलबिहारी वाजपेयीजी यांना कवितेतुन श्रद्धांजली अर्पण करण्याचा अल्पसा प्रयत्न)
अमर रहे तु अटल..

अमर रहे तु अटल....

ढुंडे तुझको यादों में
खिन्न अंतकर्ण और नैत्र सजल।
घर संसद हैरा है पागल
कहाँ गए कर आत्मा घायल।।
अमर रहे तु अटल....

कविताएं तेरी महाग्रंथ सी
समझाती जीवन का अर्थ सरल।
शब्द पुष्प सुगंधी ऐसे की
मोह ले हर दिल मोह ले हर मन।।
अमर रहे तु अटल....

अथक परिश्रम कर सिंचा लहू
फुलाया किचड में यशस्वी कमल।
लगभग तप रहे मौन अचल
फिर भी जादू तेरा सफल।।
अमर रहे तु अटल....

सब थे तेरे चाहने वाले
क्या सच्चा और क्या खल।
क्या मानव क्या आकाश
वायु, अग्नी, पृथ्वी तथा जल।।
अमर रहे तु अटल....

प्रखर स्वधर्माभिमानी परधर्म सहिष्णू तु
तु ही ब्रम्ह विष्णू तु ही शिवचरण।
मानवता की रक्षावश करे सुदिशादर्शन
अणवस्त्र संदर्भीत विश्वमत में लाएं बदल।।
अमर रहे तु अटल....

तप्त सूर्य सा तेरा तेवर
चंद्र सा तेरा स्वभाव शितल।
काव्य शब्दों की गहराई ऐसी
मानो जैसे समुद्र का तल।।
अमर रहे तु अटल....

प्रथम अंक हुवा संपन्न
गिर गया मृत्यू नामक पटल।
द्वितीय होगा प्रारंभ पुनःश्च
जब पुनर्जनम होगा तेरा कल।।
अमर रहे तु अटल....

निष्कलंक था जीवन सारा
स्वच्छ सुंदर व्यक्तित्व धवल।
जन्म सिद्ध था सबकुछ तुझमें
स्वयंनिर्मीत था ना थी नकल।।
अमर रहे तु अटल....

दिव्य दृष्टी थी विकास की
परिपक्व किए तुने तीनों दल।
सपनों की उचाँई इतनी की
बने हिन्दोस्ता विश्व में अव्वल।।
अमर रहे तु अटल....

चाहत थी सरिताओं का मिलन
जोंडे चारों दिशाओं के स्थल।
अजात था तू अवतारी पुरुष
बोया स्नेह उगाई प्रेम फसल।।
अमर रहे तु अटल....

विचार ऐसे जैसे मानो किताब
व्यक्तित्व संयमी और निश्चल।
सत्य निर्भीड और परिणामी भाष्य
शांत मुद्रा और हास्य निर्मल।।
अमर रहे तु अटल....

तेजपुंज तू हटाता अंधियारा
भारतरत्न तू सच्चा सबल।
प्रकाशमान करे मन मन को
प्राण प्रदान करे अमृत तरल।।
अमर रहे तु अटल....

सोच नई संदेश नये
तत्वनिष्ठ मूल्यों पर अढल।
उर्जा तेरी युवाओं को करे अचंबित
अविरत कर्म तु करे हरपल।।
अमर रहे तु अटल....

राष्ट्रहित था सबसे अहम
लोकतंत्र को ना किया बगल।
नेतृत्व ऐसा जो सबको समझे
अस्थिर अशांत मार्गस्थ चपल।।
अमर रहे तु अटल....

सत्य, अहिंसा, शांती का अध्याय
पढा़या तुने संपूर्ण जनम।
प्रेरणा ऐसी की अचल भी हो उर्जित
निर्बल को सदा दिया तुने बल।।
अमर रहे तु अटल....

निस्वार्थ कर्म का मिलता अवश्य फल
मत कर षडयंत्र मत कर छल।
सिख तेरी सदियों तक रहेगी याद
करेंगे तेरे अनुयायी अमल।।
अमर रहे तु अटल....
(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
मो. 9673945092.

राजकारणातील अजातशत्रू अटलजी

राजकारणातील अजातशत्रू अटलजीः

"सत्ता का खेल तो चलेगा,
सरकारें आएंगी जाएंगी,
पार्टियां बनेगी बिगड़ेगी,
मगर ये देश रहना चाहिए,
इसका लोकतंत्र अमर रहना चाहिए' !

पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या वैचारिक तालमीत तावूनसुलाखून निघालेले आणि शिक्षक पिता श्री. कृष्णबिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी संस्कारांनी परिपक्व बनलेले तसेच सन्माननीय श्री. लालकृष्ण अडवाणी यांची जिवलग मैत्री लाभलेले भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक ध्रुवतारा निखळला आहे. एक सूर्य मावळला आहे.

खुप काही लिहावे असे वाटतेय मात्र शब्दच सुचत नाहीयेत. मनात घालमेल होतेय. आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींचे मोठेपण यात आहे की ते अजातशत्रू होते. जीवनाकडे राजकारणापलीकडे आणि राजकारणाकडे पक्षापलीकडे जावून ते पाहत होते. ते देशाला सर्वतोपरी समजत होते. देश राहीला पाहीजे, लोकशाही राहिली पाहिजे, ही त्यांची भावना, ही त्यांची शिकवण पुढच्या पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करेल.

त्यांचे मोठेपण यात होते की ते त्यांच्या राजकीय विरोधकांना शत्रु समजत नव्हते. त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये पंडित नेहरूंचा फोटो मागवून घेवून लावायला सांगीतला! राजीनामा द्यायला निघालेल्या मनमोहन सिंग यांना राजीनामा देवू दिला नाही! आणिबाणीनंतर इंदिराजींना अटक होऊ दिली नाही! यावरून त्यांचे महानपण सिद्ध होते.

विरोधकही त्यांना शत्रु समजत नव्हते. बघा, राजीवजींनी अमेरिकेला जाणा-या शिष्टमंडळात अटलजींचा समावेश करून त्यांच्यावर न्युयार्कमधील अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घडवून आणले!  नरसिंहराव यांनीही काश्मीर प्रश्नावर पक्ष मांडण्यासाठी युनोमध्ये पाठविलेल्या भारतीय शिष्टमंडळात त्यावेळी विरोधीपक्ष नेते असणाऱ्या अटलजींचा समावेश केला होता! जेंव्हा पंतप्रधान होण्याची वेळ आली तेव्हा त्यावेळी काहीसे वरचढ असुनही आडवाणींनी स्वतः आपल्या या जीवलग मित्राचे नाव पुढे केले!

अशाप्रकारे जकारणापलीकडे जाऊन लोकांशी, देशांशी संबंध प्रस्थापित करणारे आदरणीय अटलजी गेल्यामुळे भारताचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श सर्वांनी अंगीकारले तर एक सुंदर भारत, अटलजींच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

अटलजींसारखा सारखा माणूस जन्मावा लागतो. असा युगपुरुष भारताने नक्कीच देवाकडे मागुन घेतला असावा. असे वाटते की भारताने शे पाचशे वर्षे प्रार्थना केली असेल परमेश्वराकडे तेव्हा अटलजींसारखा माणूस भारतात जन्माला.

आपण लक्षात घेतले पाहिजे की त्यांना शिक्षक व्हायचे होते, मात्र राजकारणात आले. एकेवेळी तर अटलजींचा श्वास कोंडत होता या राजकारणात. हे स्वार्थी, कपटी, मुल्येहीन राजकारण ते सोडु इच्छित होते मात्र राजकारण त्यांना सोडत नव्हते. सुरुवातीच्या काही काळात समाजवादी विचारांनी झपाटलेले अटलजी नंतर नंतर हिंदुत्वाकडे वळले. मात्र तरीही त्यांचे हिंदुत्व कट्टर नव्हते. इतर धर्मांनाही सोबत घेऊन चालणारे अटलजी राजकारणातले एक महामेरू एक दीपस्तंभ होते.

मागास वंचीत दुर्लक्षित समाज घटकांबाबतीत त्यांच्या मनात सहानुभूती होती. यांच्या स्थितीबदलासाठी ते प्रयत्नशील होते.त्यांच्या भटक्या विमुक्तांसाठी राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग स्थापन करणे, सर्व शिक्षा अभियान राबवणे यारून दिसुन येते.

त्यांना दिव्य विकासदृष्टी लाभली होती.
देशातील प्रमुख नद्या जोडणारा नदीजोड प्रकल्प राबवणारे पंतप्रधान, दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई जोडणारा स्वर्णिम चतुष्कोन निर्माण करणारे पंतप्रधान, कारगील युद्धात खंबीरपणे सैन्याच्या मागे उभे राहाणारे व सैन्याला मुक्त स्वातंत्र्य देणारे पंतप्रधान, अमेरिकेच्या दबावाला धुडकावून एपीजे अब्दुल कलाम व अनिल काकोडकर यांच्या पाठीशी उभे राहुन गुप्तपणे पोखरण अणुचाचण्या घडवून आणणारे पंतप्रधान, पाकिस्तानला सदा-ए-सरहद बस सेवा सुरू करून पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान!!

एक कोमल हृदयाचे संवेदनशील कवी ते खंबीर विचारांचे पंतप्रधान हा त्यांचा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आहे. अटलजींच्या कविता एखाद्या धर्मग्रंथापेक्षाही महान आहेत. जो त्या वाचील तो कधीही वाम मार्गावर तर जाणारच नाही मात्र चमकल्याशिवाय राहाणार नाही.

लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. देश जीवंत राहीला पाहीजे हा एका कवीचा विचार जीवंत राहीला पाहिजे मित्रांनो😓
भारत मातेच्या या थोर सुपुत्राला मानाचा मुजरा. पुन्हा पुनर्जन्म देऊन अटलजींना भारत भूमीवर पाठवावे यासाठी परमेश्वराला विनम्र प्रार्थना🙏

बाळासाहेब धुमाळ😓

भीक मागणे गुन्हा नाही

भीक मागणे गुन्हा नाही.....

1871 मध्ये वसाहतींच्या शासनाने (इंग्रज शासनाने) भटक्या विमुक्तांच्या दृष्टीने अत्यंत अन्यायकारक, शोषक आणि कुविख्यात असा "गुन्हेगारी जमाती कायदा 1871" पास केला. मुळातच हा कायदा इंग्रजांच्या या अमानवीय विश्वासावर आधारित होता की, भारतात काही जमाती आणि त्यांचे गट हे जन्माने, स्वभावाने आणि व्यवसायाने निसर्गतःच गुन्हेगार आहेत! या कायद्यामुळे भटक्या-विमुक्तांवर एक प्रकारचे दहशतीचे राज्य लादले गेले आहे.

कारण या कायद्यामुळे भटक्या-विमुक्तांच्या वाट्याला आलेले पोलीस रिपोर्टिंग, कुटुंबाचे विलगीकरण, प्रतिबंधक शिबिरे आणि जबरदस्तीने मजुरी करायला लावणे असे अन्यायकारक उत्पात! देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सहा दशकांनंतर भारत सरकारने हा कायदा रद्द केला मात्र विमुक्त जमाती (Denotified Tribes)  हा कलंक पद्धतशीरपणे या जमातींची आजही गैरसोय करत आहे.

हा कायदा वसाहतवादाच्या कायद्याचा एक भाग होता ज्याचा या जमातींवर, यांच्या जीवनशैलीवर अमानवीय असा परिणाम झाला. वसाहतीचे प्रशासक (इंग्रज अधिकारी) या भटक्या आणि प्रवासी जमातींच्या बाबतीत विशेषत्वाने काळजीत होते. काळजी होती ती याची की, या जमातींच्या भटकेपणामुळे, यांच्या जीवनशैलीमुळे, यांचा माग काढणे, यांच्यावर पाळत ठेवणे, यांना पकडणे, यांना नियंत्रणात ठेवणे, यांच्यावर कर लादणे त्यांना शक्य होत नव्हते. गुन्हेगारी जमाती कायदा व इतर कायदेशीर अस्त्रे  जसे की भटकेगिरी कायदा (Vagrancy Laws) यामुळे या जमातींना जबरदस्तीने मजूर बनविणे, जबरदस्तीने पकडून नेणे व सेटलमेंटमध्ये डांबणे जमत होते. मात्र या जमातींच्या "जीवन" नावाच्‍या घटकाचा यामुळे नाश झाला.

स्वातंत्र्याने या जमातींना बरेच काही दिले मात्र त्याचबरोबर बरेच काही जुनेच पुढे चालू देखील राहिले. भारतीय संविधान जे प्रत्येक भारतीयाला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि स्वाभिमान देण्याचे आश्वासन देते त्याचा संविधान निर्मिती नंतरही स्वतंत्र भारताच्या सरकारने या समुदायांसाठी नवीन कायदे बनविताना दुर्दैवाने अमल केला नाही. उलट वसाहतवादी तर्कांचीच अमलबजावणी केली. यांना भारताचे नागरिक म्हणून हक्क अधिकार बहाल करण्याऐवजी सरकार यांना नियंत्रित व प्रशाशित करण्याची गोष्ट म्हणूनच पाहू लागले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बॉम्बे प्रिव्हेंशन ऑफ बेगिंग अॅक्ट 1959 हा कायदा! हा कायदा मुंबई राज्यात संमत केला होता व तो आजही महाराष्ट्रासह देशाच्या जवळजवळ वीस राज्यांमध्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये अस्तित्वात आहे. मात्र सर्व भटक्या विमुक्तांच्या दृष्टीने एक अत्यंत आनंदाची, उल्लेखनीय व ऐतिहासिक बाब म्हणजे गेल्या आठवड्यातच म्हणजे दिनांक 8 ऑगस्ट 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका दिर्घ व मुदतपूर्व निवाड्यात हा कायदा संविधानाशी विसंगत असल्याचे म्हटले आहे.

कोर्टाने असेही म्हटले आहे की "भीक मागणे" हा "गुन्हा" ठरू शकत नाही. कारण भिकारी स्वखुशीने भीक मागत नाहीत तर ते आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी भिक मागतात. भिक मागण्याला अपराध ठरविणे म्हणजे समाजातील सर्वात कमजोर वर्गाच्या मौलिक अधिकाराचे उल्लंघन होईल. सोबतच न्यायालयाने असेही म्हटले आहे की, नागरिकांच्या जीवन जगण्याच्या अधिकारानुसार जर नागरिक जीवन जगण्यास समर्थ नसतील व भीक मागत असतील तर हे शासनाचे अपयश आहे. याला शासन जिम्मेदार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने हर्ष मंदार व कर्णिका सहानी यांच्या 2009 मधील याचिकेवरील सुनावणीत आपल्या 23 पानी निकालपत्रात, बॉम्बे प्रिव्हेंशन ऑफ बेगिंग अॅक्ट 1959 मधील तब्बल 23 कलमे घटनाबाह्य ठरविले आहेत. कोर्टाने उलटपक्षी असाही सवाल केला आहे की, ज्या देशात सरकार जनतेला अन्न व रोजगार देऊ शकत नाही त्या देशात भीक मागणे गुन्हा कसा काय ठरविला जाऊ शकतो?

 बेगिंग अॅक्ट काय करतो? तर हा कायदा भीकेला गुन्हा व भिकाऱ्याला गुन्हेगार ठरवितो! हा कायदा व्यक्तींना वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देतो! हा कायदा दंडाधिकार्‍यांना व्यक्तीच्या पहील्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंतची तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा वर्षापर्यंतची कैदेची शिक्षा सुनावण्याचा अधिकार देतो! त्यापूर्वी व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन हा कायदा व्यक्तीच्या गोपनीयतेचा व प्रतिष्ठेचा भंग करतो. शिवाय भिकाऱ्यांवर अवलंबित पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या बालकांना वेगळे करण्याचा अधिकार देतो!

दिल्ली उच्च न्यायालय असेही म्हणते की, या कायद्याच्या अगदी पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत, या कायद्यामध्ये एक विचित्र तर्क दिसून येतो. या कायद्यानुसार "भीक मागणे" ची व्याख्या आहे, सार्वजनिक ठिकाणी गायन, नृत्य आदी कला सादर करून दान मिळविणे, भविष्य सांगणे, पथनाट्य (रोडशो) सादर करणे! न्यायालयाच्या दृष्टीने अशाप्रकारे रस्त्यावर नृत्य गायन वादन करून, कसरती करून, भविष्य सांगून अथवा रस्त्यावर नौटंकी करून "दान मागणे" हे "भीक मागणे" ठरू शकत नाही. ही या जमातींची जीवनपद्धती आहे. हा या जमातींचा रोजगार आहे. त्यामुळे त्याला गुन्हा ठरविले जाऊ शकत नाही. मात्र एकदा का हे लोक कायद्याच्या कचाट्यात सापडले की कायदा त्यांना गुन्हेगार ठरविण्यापासून ते अगदी कैदी बनविणे पर्यंतची अनुमती देतो. अशाने या लोकांवर गुन्हेगार व कैदी असे शिक्कामोर्तब होते. त्यामुळे सार्वजनिक स्थळांपासून यांना जबरदस्तीने पकडून नेणे अथवा हाकलून देणे न्याय सुसंगत नाही. यावरून या लोकांसाठी अनेकवादाच्या व समग्रतेच्या घटनात्मक हमी अस्तित्वात नसल्याचे दिसते. त्यामुळे भिक्षा विरोधी कायद्याची पुनर्स्थापना करून या असुरक्षित व दुर्लक्षित समाजाच्या पुनर्वसनावर सरकारने लक्ष केंद्रित करावे.

मित्रांनो या कायद्याचा भटक्या विमुक्त जमाती मधील कलाकार, नकलाकार, भिक्षेकरी, खेळकरी व कसरतगार जमातींवर दूरगामी परिणाम झाला आहे. यांचा पारंपारिक रोजगार या कायद्याने हिरावून घेतला आहे व यांच्यावर गुन्हेगाराचा शिक्का लावला आहे. हा कलंक असल्याने या जमातींचा पारंपरिक रोजगार तर गेलाच! वरून यांच्या चारित्र्यावरच संशय असल्याने यांना कुणी कामही देत नाही! दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा जमातींवर वर्षानुवर्षांपासून होत आलेला अन्याय दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारने आता तरी यांच्यासाठी ठोस व धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे. या कामी संघटनांच्या संघटीत प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे.

(स्त्रोत: मा. दिल्ली उच्च न्यायालयाचे दिनांक 08 ऑगस्ट 2018 चे निकाल पत्र. विविध राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांमधील बातम्या तसेच द हिंदू या इंग्रजी दैनिकामधील दिल्ली उच्च न्यायालयाचे  सुप्रसिद्ध वकील अॅडव्होकेट श्री. गौतम भाटिया यांचा लेख.)

बाळासाहेब सिताराम धुमाळ
मोबाईल- 9673945092.

आरक्षण नको सन्मान पाहिजे

आरक्षण नको  सन्मान पाहिजे....

एकीकडे आरक्षणासाठी देशभरात विविध जातींची रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू असताना तामिळनाडूतील मदुराई येथे देवेंद्र कुला वेल्लार जातीचे रस्त्यावर उतरूनच जनआंदोलन सुरू आहे मात्र ते आरक्षणासाठी नव्हे तर चक्क आरक्षण सोडण्यासाठी!!! अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेली ही जात राज्यात लोकसंख्येने साठ लाखांच्या आसपास आहे. भारताच्या आरक्षण इतिहासातील अशा प्रकारचे हे पहिलेच आंदोलन असावे बहुदा. आरक्षण नको सन्मान पाहिजे अशी मागणी करणा-या या लोकांना युथ फॉर इक्वालिटीचे व राज्यातील पुठीया तामिलागम नामक राजकिय पार्टीचे ही समर्थन आहे.

लोक नाचत आहेत, गात आहेत, घोषणाबाजी करत आहेत, बायका डोक्यावर दह्यादुधाने पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन दिंड्या काढत आहेत, आरक्षण मुक्त होण्यासाठी!! आम्हाला आरक्षणाची कुबडी नको आहे. समाजासमाजात फूट पाडणारे ही विषमतामूलक भीक नको आहे, असे म्हणत हे लोक सरकारचे व देशाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहेत. आरक्षणाच्या ज्वाला आम्हाला जातीय विषमतेची व हीनतेची वागणूक देत आहेत. त्यात आम्ही होरपळून निघत आहोत. त्यामुळे आम्हाला कोणीही दलित म्हणू नये असे यांचे म्हणणे आहे. यासाठी हे लोक अगदी सडक ते संसद असा संघर्ष करण्यासाठी उतावीळ आहेत. केवळ मुठभर म्हणजे साधारणपणे एक ते दोन टक्के लोकांना आरक्षणाचा लाभ मिळतो मात्र बाकीच्या 98 टक्के लोकांना अस्पृश्यतेची वागणूक मिळते म्हणून आम्ही आरक्षण नाकारत आहोत असे यांचे म्हणणे आहे.

 मित्रांनो, या आंदोलनाने एका कटू पण जाहीर व भेदक वास्तवावर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे की, आरक्षणाने मागास जातींना त्यांचे न्याय्य हक्क अधिकार, सवलती, प्राधान्य मिळाले. विविध क्षेत्रात भरीव कार्य करून आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सहाजिकच या जाती जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीत जरी बदल झाला असला, सुधारणा झाली असली तरी यांच्या सामाजिक स्थितीत मात्र कसलीही सुधारणा झालेली नाही. अजूनही एससी, एसटी, डीएनटी, ओबीसी म्हटले की सवर्णांच्या भुवया उंचावतात. चेहऱ्यावरील भाव बदलतात. शिवाय जातीय द्वेष, मत्सर विकोपाला चालला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे वेदोक्त वर्ण व्यवस्थेशी एकप्रकारे समांतर अशी वर्ग व्यवस्थाच जणुकाही निर्माण झाली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या उतरंडीप्रमाणेच ओपन, ओबीसी, डीएनटी, एसटी, एससी अशी ही सामाजिक उतरंड उभी राहताना दिसत आहे. या उतरंडीतील ही मडकी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ समजतात!!

सदरील समुदायाने घेतलेला निर्णय माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. याला मी शुद्ध आत्महत्या म्हणेल कारण एससी मधून बाहेर पडले म्हणजे समाजात मान सन्मान मिळेल हा भाबडा विश्‍वास स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारुन घेणारा आहे. कारण जेव्हा हे एससी, एसटी, डीएनटी, ओबीसी, ओपन असे वर्गीकरण नव्हते तेव्हाही समाजात जातींवरून हिनतेची वागणूक दिलीच जात होती ना? आरक्षण नाकारून आणि कागदावरून जात नष्ट करून हा प्रश्न मिटणार नाही, फरक पडेल एवढे नक्की मात्र समस्या मुळासकट सुटणार नाही. यासाठी प्रबोधन होणे, दृष्टिकोन बदलणे, कायद्याची मदत घेणे, शैक्षणिक व आर्थिक प्रगती करून राहणीमान बोलीभाषा सुधारणे आवश्यक आहे. समाजातील प्रतिष्ठितांनी व सुशिक्षितांनी आंतरजातीय आंतरजमातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन समानतेची भावना वाढीस लागू शकते. याची सुरुवात प्रवर्गामधील समाविष्ट जाती-जमातींमध्ये परस्परात आंतरजातीय आंतरजमातीय विवाह व्हायला हवेत म्हणजे एससी मधील कोणत्याही जातीचे एससीतीलच कोणत्याही जातीशी लग्नसंबंध व्हायला हवेत. तसेच एसटी, डीएनटी, ओबीसी व ओपन च्या बाबतीत व्हायला हवे. अर्थात हे सर्व कुठलीही जोर जबरदस्ती न करता स्वेच्छेने व्हायला हवे.

अलीकडच्या काळात भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. त्यासाठी जोगोवा सेवा समिती नावाची संघटना काम करत आहे. श्री. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी याकामी स्वतःला वाहून घेत आहेत. जोशी गोंधळी वासुदेव चित्रकथी बागडी पांगुळ बहुरूपी डवरी या जमाती, त्यांच्यातील उपजमातींसह आंतरजमातीय विवाहाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत आहेत. हे सामाजिक समानतेच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. पुढे चलुन हेच पाऊल एका क्रांतीची सुरुवात ठरेल. अशाने जाती जातींमधील अंतर कमी होऊन मानवतेची, एकतेची व समानतेची भावना वाढीस लागेल. याच मार्गावर पुढे जाऊन मग आंतर प्रवर्गीय विवाह देखील होतील आणि एकदा का माणसे नातेसंबंधाने, रक्तसंबंधाने एकजीव व एकरूप झाली की ही जातीवर आधारलेली श्रेष्ठतेची व कनिष्ठतेची कुप्रथा कुपरंपरा समुळ नष्ट होईल याबाबतीत शंका नाही.

बाळासाहेब सिताराम धुमाळ
मोबाईल 9673945092.

दादा माणुस

दादा माणुसः

दादा आपण ग्रामीण पारंपरिक लोकभावना अगदी तन्मयतेने शब्दबध्द, संगीतबद्ध आणि चित्रबद्ध केल्यात. मात्र तत्कालीन अक्कल शुन्यांनी आपल्याला ओळखले नाही. असे असले तरी सर्वसामान्य प्रेक्षकांनी व श्रोत्यांनी मात्र हिरा हेरला!!

जसा जीवात जीव घुटमळं
तसं पिरतीचं वाढतयं बळं
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं
गनहे बघून दुष्मन जळं
वर ढगाला लागली कळं
पाणी थेंब थेंब गळं...

हे गीत आज मुलीही गातात!! यावरून हे सिद्ध होते की आपण निरागस होतात, शुद्ध होतात. आपल्याला विरोध करणारे आज आपले चाहते आहेत यावरून हे सिद्ध होते की आपण बरोबर होतात.

आपण जाऊन २० वर्षे झाली तरी आपली जागा आजपर्यंत कोणीही घेऊ शकला नाही यावरून हे सिद्ध होते की आपण युगपुरुष होतात. एकमेव अद्वितीय होतात.

मानवी नैसर्गिक भाव भावना मांडता येत नव्हत्या तरी यथार्थ द्विअर्थी शब्दांच्या सहाय्याने मांडल्यात!! सेंसाँर बोर्ड आपला केसही वाकडा करू शकला नाही यावरून हे सिद्ध होते दादा की आपल्या अंगी प्रचंड विद्वत्ता होती!

शुद्ध चारित्र्य, निर्भीड स्वभाव, परखड वक्तव्य, शब्दांचे निर्माते, कट्टर हिंदू धर्माभिमानी, आदर्श मराठी प्रेमी आणि जन्माला यावा लागतो असे बहुरंगी बहुढंगी हरहुन्नरी चौरस कलाकार आदरणीय दादा कोंडकेजी आपणास जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. 🙏जोवर मराठी असेल, जोवर विनोद भाव असेल, दादा आपण आठवले जाल. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व मराठी रसिक जनांना खुप खुप शुभेच्छा🌷🌷

बाळासाहेब धुमाळ.

द्वेष में हरी बिसरायो

द्वेष में हरी बिसरायोः

द्वेष में हरी बिसरायो
भूल के निज को जनम गवायो।
आएगा जब रे बुलावा हरी का
छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा।।

काल परवा जयललिता गेल्या आज करूणानिधी गेले! दोघेही दिग्गज राजकारणी. हयात असताना परस्परांचे कट्टर राजकीय हाडवैरी!! मुख्यमंत्री पदाचा वापर दोघांनीही परस्परांना शह देण्यासाठी पुरेपूर केला. मात्र आता दोघेही कायमचे शांत झाले.

तसे पाहता हे शत्रुत्व देखील आता संपायला हवे होते. मात्र करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यास अण्णा द्रमुक सरकारनं परवानगी नाकारली, जिथे आम्मांवर दफन विधी झाला होता. अखेरीस हा वाद मद्रास हायकोर्टात गेला व मग हायकोर्टाने करुणानिधींच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यविधी होईल, असा निर्णय दिला. किती हे शत्रुत्व!! मात्र शेवटी दोघेही एकाच बीचवर तेही शेजारी शेजारीच माती आड गेले!

त्यामुळे आपण सर्वांनी एवढेच लक्षात घेतले पाहीजे की सत्ता, शासन, संपत्ती असो अथवा शक्ती, सौंदर्य, बुद्धिमत्ता, लोकप्रियता असो काहीच कायम स्वरुपी नाही. ज्याला आपण दुपारची सावली म्हणू शकतो, जी टिकवून राहात नाही, असे आहे सर्व. निव्वळ क्षणिक आणि मिथ्या.

त्यामुळे याचा दुरूपयोग करणे, अति गर्व वा अहंकार करणे सोडून मानवतेचा अंगिकार केला पाहिजे. न्याय निती मुल्ये पुण्ये सहकार्य सहानुभूती स्विकारून योगायोगाने लाभलेल्या मनुष्य जन्माचे सार्थक केले पाहिजे.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, छळ, पाखंड, शोषण, अपहरण, दुराचार, व्याभिचार, कुआचार, कुविचार हे राक्षसी वा दानवी गुण आहेत. ते जोपासले तर आपण मनुष्य कसे काय म्हणवले जावू शकतो??

तेव्हा जिवनात मित्रत्व जोपासून प्रेम मिळवायचे की शत्रुत्व जोपासुन तिरस्कार मिळवायचा हे आपण ठरवायला हवे. मित्रत्वाचा सुगंध येतो तर शत्रुत्वाचा दुर्गंध. मित्रत्व शितल असते तर शत्रुत्व प्रखर! असो, दोन्हीही महान नेत्यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.
🌷🌷

बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092

सरकारी पगाराचा पोटशूळ

सरकारी पगाराचा पोटशूळः

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तुलना जेष्ठ नागरिक, जेष्ठ कलावंत, निराधार लोक यांच्या वेतन, पेन्शन वा मानधनाशी केली जाणे कितपत योग्य आहे? ती आमदार खासदारांच्या वेतनाशी व पेन्शनशी का केली जात नाही? परिश्रमाला आणि बुद्धीला काही किंमतच नाही का?

वेतनावर जास्तीचे बजेट खर्च होतेय असेही म्हटले जातेय मात्र महसुल वाढीसाठीचे कर्मचाऱ्यांनी सुचविलेले उपाय स्विकारले जात नाहीत. रिक्त कर्मचाऱ्यांचा बोझा स्वतः वर वाहुन नेहुणही त्याचे कोणालाच काही सोयरसुतक का नसावे? जिल्हा परिषद शिक्षक तर दोन कर्मचाऱ्यांचे काम करतो. गप गुमान कर भरणा-या कर्मचा-याकडे पगाराशीवाय काहीच नसतेय हे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षिले जातेय. पगार तरी किती आहे तर एखाद्या हातगाडी चालवणाऱ्यापेक्षा कमी!! जेवढे पैसे शिक्षणात गेले तेवढ्या भांडवलावर आणि परिश्रम तथा बुद्धीवर एखादा व्यवसाय सुरू केला असता तर आहे या पगारापेक्षा अधिक पगार लाभला असता. सरकारला लुटणारे, कर्ज बुडवून पळणारे, कर चुकविणारे पकडले तर, लोकलुभावण्या मतदारांना खुश करणाऱ्या निर्थक व निरूपयोगी योजना बंद केल्या तर राज्याचे उत्पन्न नक्की वाढेल.

कधीही कुठल्या माफीची अपेक्षा न करणारा सर्वसामान्य वर्ग तीन चारचा सरकारी कर्मचारी मात्र कुणाच्याच माफीचा लाभार्थी होत नाही हे दुर्दैव आहे. काही कर्मचारी वडीलोपार्जीत गडगंज संपत्तीचे मालक आहेतही मात्र याचे सामान्यिकरण होऊच शकत नाही. कामचुकार व लाचखोरही आहेत काही. मात्र अपवाद सर्वत्रच असतात त्यांच्यावर कारवाईही होत असते आणि व्हायलाच हवी. परंतु बहुतांश कर्मचारी हे प्रामाणिक आणि सामाजिक व आर्थिक द्रुष्ट्या मागास आहेत हे समजून घेतले पाहिजे. राहीला प्रश्न गुणवत्तेचा, तर मी छातीठोकपणे सांगतो की, सर्वात मोठे व अत्यावश्यक असणा-या आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमधील मोफत सेवेचा दर्जा हा पैसे घेऊन मिळणाऱ्या खाजगी सेवेपेक्षा नक्कीच सरस आहे.

मी हे ही निदर्शनास आणून देऊ इच्छितो की सरकारी कर्मचारी कधिही कुणाच्या लाभाला विरोध करीत नाही. प्रसंगी त्याग करतो. मदतीला धावून येतो. अलिकडच्या काळात अनेक शासन निर्णय हे कर्मचाऱ्यांच्या गैरहीताचे अन्यायकारक होत आहेत. कायमस्वरूपी नोकरभरती बंद पाडुन तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर माणसे नियुक्त केले जात आहेत. सर्व प्रवास खाजगीकरणाच्या दिशेने होत आहे. कर्मचाऱ्यांचे आर्थिक शारिरीक व मानसिक शोषण वाढले आहे. आज केंद्रीय कर्मचारी व राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन भत्ते व इतर सुविधांचा विचार करता खुप मोठी तफावत निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अनिच्छेने का असेना परंतु संप हे संवैधानिक हत्यार उपसणे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे कृपया मत्सर नव्हे तर प्रेम करा. द्वेष नव्हे तर सहानुभूती दाखववा...

बाळासाहेब धुमाळ.

जग बदल घालून घाव

जग बदल घालून घावः

घाव घालुन जग बदलण्याची हाक देणारे बाबासाहेबांचे अनुयायी, सवर्णांच्या विरोधामुळे केवळ दिड दिसाची शाळा शिकुनही आखिल मराठी साहीत्य जगतावर आपल्या विलक्षण बुद्धीमत्तेची अमिट छाप पाडणारे थोर लोक लेखक आदरणीय आण्णा भाऊ साठे यांची आज ९८ वी जयंती...

ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है। हे लोकांच्या मुखातून घोषणांच्या रूपाने बाहेर पाडणारे आण्णा सुरुवातीच्या काळात कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. त्यांच्यावर कार्ल मार्क्सच्या विचारांचा प्रभाव होता. नंतर ते लोकशाहीवादी झाले.

 मात्र कम्युनिस्ट विचारांचा पगडा असताना त्यांनी हिटलरचा नाझीवाद,  रशियन, चिनी व कोरियन राज्यक्रांती संदर्भात केलेले लेखन तसेच बंगालचा दुष्काळ, तेलंगाना राज्य निर्मिती, पंजाब दिल्ली हिंसाचार यावरील लेखन एखाद्या उच्च विद्याविभूषित लेखकाला देखील लाजवते. अर्थात मी जेवढे वाचले तेवढेच मला हे मान्य करायला भाग पाडते की आण्णा एक बेजोड साहित्यिक होते.

आण्णांनी कित्येक कादंब-या, लघुकथा, पटकथा, पोवाडे, लावण्या लिहील्या. त्यांच्या अनेक कादंब-यावर चित्रपट निर्माण करण्यात आले. आण्णांचे लेखन अत्यंत संवेदनशील व स्फुर्तीदायी आहे. त्यांची शब्द पेरणी अफलातून होती. विषमता, गरिबी आणि शोषण हे आण्णांचे जिव्हाळ्याचे लेखन विषय. मात्र आपण ते प्रसिद्धीसाठी वा व्यावसायिकतेने लिहीत नव्हते तर सामाजिक, आर्थिक व राजकीय ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लिहीत होते हे आपण समजून घेतले पाहिजे.

मित्रांनो मी आण्णांना केवळ लेखक मानत नाही. मला वाटते आण्णा एक क्रांतिकारक होते. एक निर्भीड सेनानी होते ज्यांनी लेखणीला तलवार बनविले. रक्तात ऊर्जा संचाररायला लावणारे, डोळ्यातून आग व अश्रु वाहायला लावणारे आण्णा एक बहुढंगी विविधांगी साहित्यिक म्हणून अजरामर आहेत व राहतील. त्यांची फकीरा ही कादंब-या प्रत्येकाने वाचायलाच हवी. 'माझी मैना गावावर राहीली' हि लावणी आजही रक्तात शक्ती भरते.

मात्र दुर्दैवाने ब-याच अंशी त्यांचे साहीत्य व स्वतः आण्णा जनतेच्या प्रतिसादाला पोरके ठरले. आण्णा देशाचे रत्न होते याचा अभिमान देशाला वाटायला हवा. केवळ मांग वा मातंग समाजाचा आदर्श ठरत चाललेल्या आण्णांचा सर्वांना अभिमान असायलाच हवा. सकळ हिंदु धर्माचे आण्णा निसंकोच भुषण आहेत हे आपल्या लक्षातच येत नाहीये. त्यांचे असे दुर्लक्षित राहणे नव्हे त्यांना असे दुर्लक्षित ठेवणे मला फार व्यथित करतेय. एवढ्या प्रतिभावंत व प्रेरक वारणेच्या वाघाला माझा मानाचा मुजरा आणि जयंती दिनी त्रिवार विनम्र अभिवादन तसेच सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.....

बाळासाहेब धुमाळ.

श्रद्धा व लुट

श्रद्धा व लुटः

मित्रांनो आज आम्ही माझ्या पत्नीसाठी तिच्या घरच्यांनी (माहेरच्यांनी) श्रद्धेने बोललेला नवस फेडण्यासाठी तुळजापूर व नळदुर्ग यांच्यादरम्यान असलेल्या श्री महालक्ष्मी माता देवस्थान चिवरी ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद येथे आलो आहोत. नवसाचे स्वरूप गोड नैवैद्य, साडी चोळी, इतर पुजेचे साहीत्य आणि बोकडाचा बळी असे होते.
सर्वप्रथम गोडवा नैवैद्य, साडी चोळी देवीला मनोभावे अर्पण करण्यासाठी सर्व बायका, मुलेबाळे व पुरूष मंडळी मातेच्या मंदिरात गेले. देवीपाशी बसलेल्या अंदाजे वीस वर्षाच्या देवीच्या जीवलग प्रिय व विश्वासू अशा देवी व भक्तांमधील मध्यस्थाने आमच्याकडे 251 रूपयांची मागणी केली. आम्ही देण्यास नकार दिला व श्रद्धेने 101 रूपये नैवैद्यावर ठेवले. त्याला हवी ती रक्कम 251 रुपये न दिल्याने त्याने आमचे पुजेचे ताट अक्षरशः परत केले!!
मी म्हटले काही हरकत नाही पुजेचे साहीत्य बाहेर ठेऊन दर्शन घ्या. ईश्वर सर्वव्यापी असतो. तो सर्व पाहतो व भक्तांच्या भावना समजुन घेतो. शिवाय जे काही पाप लागेल ते त्याला लागेल. बरीच बाचाबाची करून हतबल होऊन, विनंती करून आमच्यातील बायकांनी वाटाघाटी करून, विनंती करून 201 रूपयांवर प्रकरण मिटवले. अर्थात मी मात्र तत्पूर्वीच मातेला मनोभावे हात जोडून मंदिराबाहेर पडलो.
मित्रांनो तेथील डफ किंवा डपडे वादकाने (51 रूपये), बोकड कापणाराने (251 रुपये), पुजेचे साहीत्य विकणाराने (51 रुपये) जेवढे पैसे मागीतले तेवढे आम्ही विनातक्रार दिले. परंतु पुजेचे ताट देवीपर्यंत पोहचविण्यासाठी त्या दलालाने मागीतलेले 251 रूपये देण्यास मात्र विरोध केला. कारण देवाला पैसे नव्हे तर श्रद्धा लागते. खुप तळ खुप पुजेचे ताट ज्यात हळदी कुंकू श्रीफळ उद धुप अगरबत्ती साडी चोळी तेल फळे फुले मागेल. कारण भाव भक्तीचा तो भुकेला असतो असे ऐकले वाचले होते. अर्थात तो नक्की तसाच असेल मात्र त्याच्या नावाने भक्तांना लुटणारे हे दलाल, भाविक व देवीमध्ये दुरावा निर्माण करणारे जगे भक्तांना अक्षरशः लुटत आहेत. याचा तर सरळ सरळ असा अर्थ होतो की देवी ही आमची वैयक्तिक मालमत्ता (private property) आहे. जर तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर अमुक रूपये देवाची फी द्या तरच दर्शन घ्या! दुसऱ्या शब्दात याला देवाचा बाजार व यांना व्यापारी व दलाल म्हणता येणार नाही का? भाविकांच्या श्रद्धेचे भांडवल करून स्वतःचे खिसे भरणारे, हे लुटारू आहेत असेच मी म्हणेल. स्वतः देव कैदेत असुन त्या कैद्यावर निगराणी करणारे हे शस्त्रधारी सैनिक आहेत असेच मी म्हणेन.
विशेष म्हणजे आमच्यातील काही तरूण व सुशिक्षित भली माणसे देखील, "देऊन टाका, पाप लागेल. मनातून नाही फेडला नवस तर पावन होणार नाही. आहेत ना आपल्याकडे तर देऊन टाका. या गोरगरिबांनी तरी पोट कसे भरायचे?" असे धार्मिक तत्वज्ञान देऊ लागले! मला मात्र त्यांच्या बुद्धीची किव आली आणि तरूण व सुशिक्षित माणसेही किती अंद्धश्रद्धाळु असु शकतात याचा प्रत्यय आला.
मित्रांनो मी दानधर्म समजु शकतो. नव्हे तो करायलाच हवा हे ही समजतो. विश्वास करा मी स्वतःही करतो. मात्र तो कोणाला करायला हवा हे अधिक समजतो. दान स्वेच्छेने जे दिले जाईल ते स्विकारले पाहीजे. विशेष म्हणजे हे देवस्थान नोंदणीकृत नाही. येथे संस्थान नाही. बळजबरीने वसुल केलेल्या पैशाचा काही हिशेब वगैरे नाही. त्या पैशांमधुन भाविकांसाठी कुठली ही मोफत सोय वा सुविधा उपल्ब्ध करून देण्यात आलेली नाही. पत्राची काही शेड्स आहेत परंतु त्यासाठीही 151 रुपये घेतले जातात!
मित्रांनो हे असे देवाचे बाजारीकरण फक्त येथेच झाले आहे असे नाही. तर ही जोर जबरदस्ती सर्वत्रच होताना आढळत आहे. मला कळत नाही, अमुकच दक्षणा द्या, तमुकच पैसे द्या असे बंधनकारक कसे काय केले जाऊ शकते? ही दादागिरी कशी काय सहन केली जाऊ शकते? हा वसुलीचा अधिकार या अक्कल शुन्यांना कोणी दिला? आज जी 201 रूपयांवर तडजोड झाली तीला मी तरी सौदेबाजीच म्हणेल!
मित्रांनो हा नालायकपणा थांबला पाहीजे, नव्हे आपण थांबवला पाहिजे. यात पत्रकार बंधूंनी पुढाकार घ्यायला हवा. भाविकांनी यांच्याविरोधात पोलीसात तक्रारी दिल्या पाहीजेत. कारण आपापल्या धार्मिक श्रद्धा व उपासणा जपण्याचा घटनात्मक अधिकार जनतेला खुद्द डॉ. बाबासाहेबांनी घटनेत दिला आहे. काही शांतताप्रिय समंजस व काहीसे डोळस लोक वैतागून अशा ठिकाणी जाणेच टाळतात. मात्र मी म्हणेल, आपण जाण्याचे टाळण्याऐवजी अशा हरामखोरांना मंदिरातुन हुसकावून लावले पाहीजे. एक प्रकारे देवालाही यांच्या तावडीतून सोडविले पाहिजे. आणि भक्त व देव यांच्यामधील हे दलाल दुर करून ही श्रद्धापुर्ण भेट विना अडथळा घडवून आणली पाहिजे.

बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो.9673945092.

आरक्षण व परकेपण

आरक्षण व परकेपणः
आरक्षणाने काही दलित, आदिवासी, मागासवर्गीयांची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती निश्चितच सुधारली मात्र सामाजिक परिस्थिती जैसे थीच आहे.

तुम्ही कितीही सुस्वभावी, शुद्ध चारित्र्यवान, सभ्य व नम्र, सुंदर व देखणे, बुद्धिमान व कुशल वा मग श्रीमंत असा, जर तुम्ही मागास जातीतील असाल तर समाजाची पाहण्याची दृष्टी, परकेपणाची व हिनतेचीच होती व आहे.

हाताच्या बोटावर मोजता येतील इतके अपवादही आहेत म्हणा पण ते दशांश रुपात!!!

हि जातीव्यवस्था कधी संपेल? पाहण्या वागण्या बोलण्याची पद्धती सर्वांची सर्वांशी सारखीच कधी असेल?

मानवता हाच धर्म, माणुस हिच जात आणि स्त्री आणि पुरुष या दोनच उपजाती अशी सामाजिक स्थिती कधी अस्तीत्वात येईल?

कोणी म्हणेल आरक्षण संपुष्टात आणल्यावर. कोणी म्हणेल टी.सी.वरून जातीचा रकाना हटविल्यावर! तर मला वाटते अजिबात नाही. कारण आरक्षण व टी.सी. आता काल परवा अस्तित्वात आले आहे. मात्र जातीय विषमता हजारो वर्षांपासून आहे. धर्मांतर करावे तर कोणताच धर्म कोणत्याच धर्माकडे मानवतेच्या नजरेने, आपलेपणाने पाहात नाही.

देश सोडु शकत नाही आणि समजा सोडला तरी तेथेही निर्वासित म्हणुन कमी लेखले जाईल, त्रास दिला जाईल. आता राहीला पर्याय प्राणत्यागाचा तर त्याने काही फरक पडला का? हे मेल्यावर कसे कळणार? आणि असेही नाही की आजवर अपमानित होऊन कोणी आत्महत्या केलेली नाही!!

त्यामुळे पर्याय काय असेल मला कळत नाही....😓

बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

गुरू

गुरूः
तसे तर परिस्थिती हिच माझ्या जीवनातील सर्वात मोठा गुरू राहीली. बहुतांश माझे उच्च महाविद्यालयीन शिक्षण बहीस्थ विद्यार्थी म्हणूनच झाले त्यामुळे उच्च शिक्षणातही कोणी गुरू नव्हते.

मात्र स्वयंअध्ययन वाचन चिंतन मनन करण्यास समर्थ नक्कीच मला माझ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच व्यावसाय शिक्षण इ. स्तरावरील गुरूजणांनी बनवले. खरच मला या प्रत्येक स्तरावरील औपचारिक शिक्षण देणारे गुरू खुप छान लाभले. त्यांनी मला जवळ घेऊन ज्ञान, समज व प्रेम प्रचंड दिले. माझ्यावर संस्कार केले. याबाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो.

मात्र मला खरी प्रेरणा व परिस्थितीची जाणीव करून दिली, परिस्थितीवर मात करण्यासाठी माझ्यात जिद्द निर्माण केली, "तुला काहीतरी करायलाच लागेल, हे जग निष्क्रिय व अयशस्वी लोकांना जवळ करत नाही" हा महत्त्वाचा मुलमंत्र मला दिला, तु हे करू शकतोस हा विश्वास माझ्यात निर्माण केला तो माझ्या आई-वडिलांनी! त्यामुळे तेच माझे सर्वात पहीले व विशेष गुरु!

 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असंख्य लोक संपर्कात आले, ओळखीचे ते अगदी अनोळखी, नात्यातील ते अगदी बिगर नात्यातील, वयाने जेष्ठ ते अगदी बालवयीन, सुशिक्षित उच्चशिक्षित ते अगदी आडाणी अज्ञानी असे अनेक हितचिंतक भेटले ज्यांनी मला जीवनशिक्षण व जीवनसंस्कार दिले. नक्कीच अनेक मित्रांनीही उपदेश व मार्गदर्शन केले. जे मला गुरू स्थानिच आहेत.

नक्कीच विवाहानंतर माझी पत्नी सौ. सोनाली व सासरेबुवा श्री. संभाजी जाधव यांचे माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व राहीले. हे दोघेही मला गुरू स्थानिच आहेत!

म्हणून या सर्वांना मी -हदयाच्या तळापासून, मनापासून मनभरून, अंतकरणपुर्वक कृतज्ञतापुर्वक धन्यवाद देतो. यांचे ऋण व्यक्त करतो व यांच्याप्रती सदैव कृतज्ञ व विनम्र राहाण्याचा पुन्हा एकदा संकल्प करतो.  आणि आजच्या पवित्र अशा गुरूपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपणासह सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.💐💐

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

भटके विमुक्त व आर्थिक निकषांवर आरक्षणः

भटके विमुक्त व आर्थिक निकषांवर आरक्षणः

सद्ध्या राज्यात व देशात आर्थिक निकषावर आरक्षण असावे असा सुर उठत आहे. अशा प्रकारच्या आरक्षणाची राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतुद केलेली नाही किंवा हे असे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकुच शकत नाही या मुद्द्यांकडे मला जायचेच नाही.

राहीला प्रश्न आर्थिक निकषावर आरक्षणाला आम्हा भटक्या विमुक्तांचा पाठींबा असेल की विरोध? निसंशय या देशातील सर्वात दरिद्री घटक आम्हीच आहोत. हा प्रथम क्रमांक आमच्यासाठी भुषण नसुन दुर्दैव आहे. त्यामुळे आमच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही. पण.....

पण मला एका मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष वेधायचय मित्रांनो की आम्हाला १०००% विश्वास आहे की आम्ही आमचं अठरा विश्व दारिद्रय सिद्धच करू शकणार नाहीत आणि श्रीमंत व ताकदवानांचं दारिद्र्य लपुन राहुच शकणार नाही😓 त्यामुळे आम्ही आहोतच खड्ड्यात पुन्हा पाताळातच जाणार😓

पण आम्ही काही करू शकत नाहीत. ओरडू शकतोत पण कोणी ऐकणारच नाही. आम्ही रडू शकतो पण आमचे आश्रु कोणाला दिसुच शकत नाहीत😓 त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या नशीबी दारिद्रय, दहशत, हेटाळणी, अन्याय, अत्याचार आणि हतबलता😓

बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

भटके विमुक्त आंदोलनः एक दिशा

भटके विमुक्त आंदोलनः एक दिशा

मित्रांनो मला कळत नाही...
राज्यात व देशात भटक्या विमुक्तांच्या (Nomadic and Denotified Tribes) मोजता येणार नाहीत एवढ्या संघटना आहेत. त्यांचे मेळावे, चर्चासत्रे, परिषदा, चिंतन बैठका, कार्यशाळा व इतर अनेक उपक्रम विविध विषयांच्या अनुषंगाने होत असतात. मात्र भटक्या विमुक्तांच्या दृष्टीने सर्वात म्हत्वाचे असणारे मुद्दे जसे की , घटनात्मक दर्जा देऊन कायमस्वरूपी आयोग स्थापन करणे, एकतर स्वतंत्र्य DNT शेड्युल निर्माण करून अथवा ओबीसीचे विभाजन करून भटक्या विमुक्तांना पक्के म्हणजे घटनात्मक आरक्षण देणे या मुद्यांवर चर्चा जनजागृती, निवेदने देणे, संवैधानिक पद्धतीने आंदोलन करून मागण्या का प्रखरतेने मांडल्या जाणे प्रचंड आवश्यक असुनही विशेष काही होताना दिसत नाही.
उच्च पदस्थांनी वरिष्ठ स्तरावर आयोगाच्या अमलबजावणीतील अडचणी व अडथळे समजून घेवून अधिकारी पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थिती अनुकूल करणे अत्यंत आवश्यक आहे. मला असे अजिबात म्हणायचे नाही की काहीच घडत नाहीये. आदरणीय इदाते दादा, रेणके आण्ण, श्री हरिभाऊ राठोडजी प्रयत्न करताना दिसत आहे. किमान राज्य पातळीवर तरी हक्क परिषद प्रश्नांची व्यवस्थित मांडणी करताना, जनजागृती करताना व मागण्यांचा तसेच आश्वासनांचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. मात्र मी नम्रपणे म्हणू शकतो की चळवळीचे हे प्रयत्न अपुरेसे आहेत.
मला तर कधी कधी वाटते की सरकारला आयोगाला व इतर घटनात्मक तसेच स्वायत्त संस्था ते अगदी सर्वोच्च न्यायालयाला आपल्या प्रश्नांची तिव्रता समजते आहे पण आपल्याला नाही! कारण आपले प्रश्न रास्त न्याय्य व नैतिक आहेत. आपल्या प्रश्नांमध्येच सत्यता करूणता आहे. म्हणून ते गंभीर आहेत पण आपण नाही!!! याला अज्ञान म्हणावे की बेफिकीरी??
इदाते आयोगाचा अहवाल अद्याप जनतेसाठी खुला केलेला नाही तो करावा ही मागणी होत नाही. निवडणुकांपुर्वी इदाते आयोग लागु कराच यासाठी आपापल्या पद्धतीने सामोपचाराने वा दबाव आणुन प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा निवडणुका झाल्या की संपले. तोवर इदाते आयोग जुना होणार व मग जे रेणके आयोगाचे झाले तेच इदाते आयोगाचे होणार ही साधी बाब लक्षात येऊ नये??? अरे बाबांनो सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने मात्र एक सामाईक कार्यक्रम तयार करून त्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करा, लोखंड गरम आहे तोवरच हातोडा मारा नाही तर मग.....? अब पछताए होत क्या जब चिडीया चुग गई खेत..
आणि मग मी व माझ्यासारखे असेही म्हणतील की काय उपयोग एवढ्या सा-या संघटना असुन????

बाळासाहेब धुमाळ🙏
9673945092

भटके विमुक्त कायमस्वरूपी आयोग

भटके विमुक्त कायमस्वरूपी आयोग
एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने शाश्वत विकास ध्येयपूर्तीसाठी स्थापन केलेल्या व सरकारची धोरणात्मक विचारसरणी (थिंक टँक) असलेल्या निती आयोगाला, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मंत्री समितीने एका पत्राद्वारे देशभरातील भटके-विमुक्त समुदायाच्या विकासासाठी एक मंत्र्यांची कार्यकारी समिती गठित करून, तिच्या करवी या समुदायाच्या विकासासाठी धोरणात्मक सूचना तयार करून, या सर्वात पिछाडीवर असलेल्या समुदायासाठी धोरणात्मक मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यास परवानगी मागितली होती. त्यावर निती आयोगाने नुकतीच परवानगी दिली आहे.

निती आयोगाने सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या मागणीवरून भटक्या-विमुक्तांसाठी कायमस्वरूपी व घटनात्मक राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने मंत्रालयास लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावर मंत्रीस्तरीय एक विशेष अधिकार समिती गठित करून समाजातील विभिन्न मुद्द्यांवर धोरणात्मक सूचनांची पूर्तता करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करावा.

यावर्षी मे महिन्यामध्ये मंत्रालयाने नीति आयोगाशी पत्रव्यवहार करून भटक्या-विमुक्तांसाठीच्या दुसऱ्या राष्ट्रीय आयोगाच्या अर्थात इदाते आयोगाच्या अहवालावर आयोगाचे मत मागितले होते. ज्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या धर्तीवर राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाच्या शिफारशीनुसार सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या मागणीवरून भटक्या-विमुक्तांसाठी कायमस्वरूपी व घटनात्मक असा राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग स्थापन करण्यास निती आयोगाने समर्थन दिले आहे. पत्रात अनेक महत्वपूर्ण महत्वपुर्ण मुद्दे समाविष्ट होते. आयोगाने मंत्रालयास लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावर मंत्रीस्तरीय एक विशेष अधिकार समिती गठित करून भटक्या विमुक्त समाजातील विभिन्न मुद्द्यांवर धोरणात्मक सूचनांची पूर्तता करण्यासाठी एक कार्यगटही स्थापन करावा.

यावर्षी मे महिन्यामध्ये मंत्रालयाने नीति आयोगशी पत्रव्यवहार करून भटक्या-विमुक्तांसाठीच्या दुसऱ्या राष्ट्रीय आयोगाच्या अर्थात इदाते आयोगाच्या अहवालावर आयोगाचे मत मागितले होते. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या धरतीवर भटक्या विमुक्तांसाठी एक कायमस्वरूपी आयोग नेमण्याची इदाते आयोगाने सूचना केली होती, ज्यात आयोगाने म्हटले होते की भटक्या विमुक्त समुदायातील एक समाजसेवक या आयोगाचा अध्यक्ष असा असावा, केंद्र शासनाच्या सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ सदस्य असावेत.

मंत्रालयाने आयोगाला लिहिलेल्या पत्रात अशीही विचारणा केली होती की संयुक्त राष्ट्र संघाच्या दिशानिर्देशानुसार या समुदायाचे शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी समुदायाशी संबंधित विविध धोरणात्मक मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी व व्हिजन 2030 पूर्ण करण्यासाठी नीती आयोगाचा एक कार्यगट स्थापन केला जाणे शक्य आहे काय?? मंत्रालयाच्या पत्रात मंत्रालयाने या समुदायासाठी शिक्षणातील शुल्क कमी करणे, सहज व सुलभ शैक्षणिक प्रवेशाची परिस्थिती निर्माण करणे, समाजातील 90 टक्के किंवा किंवा त्याहून अधिक लोक भूमिहीन असल्याने त्यांना जमीन आणि घराचे सुलभ वाटप करणे या मुद्द्यांचे समर्थन केले आहे.

स्वातंत्र्यपासून आजवर भटके विमुक्तांसाठी गठीत केलेल्या सर्व आयोगांनी व समित्यांनी या समुदायाला देशातील सर्वात दुर्लक्षित व वंचित घटक म्हणून ओळखले आहे. सामाजिक न्याय मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, बऱ्याच काळापासून राष्ट्रीय जनगणना अहवालामध्ये या समुदायाचा समावेशच करण्यात आलेला नाही. सन 2008 च्या रेणके आयोगाच्या अहवालात समुदायाची संख्या दहा ते बारा कोटी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने रेणके कमिशनच्या कोणत्याही शिफारशी अमलात आणण्यात आल्या नाहीत. इदाते कमिशनच्या अहवाला आधारे सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी विविध 22 मंत्रालयांना या अहवालाबाबत आपल्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत. ज्यात सर्व क्षेत्रातील 20 प्रस्थावित धोरण बदलांचा समावेश आहे. ज्यापैकी मनुष्यबळ विकास विभाग, सांस्कृतिक विभाग, ग्रामिण विकास विभाग आणि आरोग्य विभाग या मंत्रालयीन विभागांनी या अहवालाबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बाकीच्या विभागांकडून प्रतिक्रिया येणे अद्याप बाकी आहे.

आयोगाने व मंत्रालयाने कायमस्वरूपी आयोग स्थापन करणे या शिफारशी बरोबरच भटक्या-विमुक्तांसाठी अनुसुचित जाति अनुसूचित जमातींच्या धर्तीवर स्वतंत्र तिसरे शेड्युल मंजूर करून या समुदायाला घटनात्मक संरक्षण देणे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी अंतर्गत संरक्षण देणे आवश्यक असल्याचेही शिफारशीत म्हटले आहे. विशेष म्हणजे आयोगाने मंत्रालय समितीच्या भटक्या-विमुक्तांसाठी एका समर्पित राष्ट्रीय वित्त विकास महामंडळची स्थापन करण्याच्या सूचनेचेही समर्थन केले आहे.

मित्रांनो रेणके कमिशन, इदाते कमिशन या दोहोंनीही भटक्या-विमुक्तांची वस्तुस्थिती परखडपणे व प्रामाणिकपणे शासनासमोर मांडली आहे. मात्र शासन स्तरांवरून निर्णय होणे अद्याप बाकी आहे. कायमस्वरूपी आयोग स्थापन करणे, ऍट्रॉसिटी अंतर्गत संरक्षण मिळणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र तिसरे शेड्युल निर्माण करणे या प्रमुख मागण्या उभय आयोगांनीही केलेल्या आहेत. चालु इदाते आयोगाच्या अहवाला आधारे सामाजिक न्याय विभाग सकारात्मक हालचाली करताना दिसत आहे. योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. यासाठी आपण मंत्रालयाला व इदाते आयोगाला धन्यवाद द्यायला हवेत. शेवटी हे अगदी प्रचंड मोठे कार्य आहे जे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे यात अनेकांचे अतुलनीय योगदान आहे.

निति आयोग ज्याने नियोजन आयोगाची जागा घेतली आहे व माननीय पंतप्रधान ज्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सदस्य आहेत त्याचा हेतुही भटक्या-विमुक्तांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे दिसत आहे. मात्र आपण यावरच समाधानी होता कामा नये. घटनात्मक संस्था व स्वायत्त संस्था आपले काम प्रामाणिकपणे करत असल्याचे आजवर दिसत आहे. मात्र धोरण ठरविणारे व निर्णय घेणारे शासन म्हणजे कार्यकारी व्यवस्था मुळात तर वेळकाढूपणा करते व कसलातरी दिखाऊ कागदोपत्री फार्स करते व शेवटी प्रक्रिया बंद करते असा आजवरचा कटु अनुभव आहे. हा अनुभव अनेकदा आला आहे.

यापूर्वीही हा विषय अगदी राष्ट्रीय सल्लागार परिषदेपर्यंत गेला होता. यूपीए सरकारच्या काळात राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी होत्या. या परिषदेला उच्चाधिकार प्राप्त होते. अगदी मंत्रिमंडळाला देखील सल्ला देण्याचा अधिकार  या परिषदेला होता! विशेष म्हणजे राष्ट्रीय सल्लागार परिषद देखील भटक्या-विमुक्तांसाठीच्या पहील्या म्हणजे रेणके आयोगाच्या अहवालावर सकारात्मक होती. मात्र निर्णय काही झाला नाही. तेव्हा सरकारकडे खास करून काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने म्हणा वा कदाचित राजकिय इच्छाशक्ती नसल्याने म्हणा यामुळे तो विषय मागे पडला असेल. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पुर्ण व स्पष्ट संख्याबळ असणारे सरकार केंद्रात सत्तेत आहे. शिवाय सरकारची देखील मानसिकता ही भटक्या विमुक्तांच्या बाबतीमध्ये सकारात्मक व सहानुभूतीपूर्ण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व भटक्या विमुक्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एका नव्या युगाच्या सूर्योदयाची चाहूल सर्वांना लागली आहे. परंतु हा सुर्योदय आपल्याच कोंबड्याच्या आरवण्याने व्हावा ही मानसिकता भटक्या-विमुक्तांच्या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील समाज नेत्यांनी कृपया मनात येऊ देऊ नये.

मित्रांनो ही केवळ सुरुवात आहे अपेक्षित शेवट नाही. अजूनही आपण सामुहिकपणे लोकशाही व संवैधानिक पद्धतीने लढा देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मला वाटते या कामात आदरणीय इदाते दादा, आदरणीय रेणके आण्णा, आदरणीय हरिभाऊ राठोडजी यांनी वरिष्ठ स्तरावर याचा पाठपुरावा घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर समाजातील तज्ञ, अभ्यासू व अनुभवी मंडळींना तसेच प्रत्यक्ष जमीन स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सदरील बाबीचे महत्त्व समजावून देवुन, प्रेरित करून एक व्यापक जन आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे. कारण मित्रांनो स्वतंत्र शेड्युल नसणे हे भटक्या विमुक्तांच्या सर्व दुःखाचे मुळ आहे. तर स्वतंत्र तिसरे शेड्युल असणे हे सर्व दुःखांवरील औषध आहे. जोवर भटक्या विमुक्तांना घटनात्मक आरक्षण मिळत नाही तोवर आपले प्रश्न सुटणे, आपल्याला न्याय केवळ अशक्य आहे. आता घटनात्मक आरक्षण म्हणजे काय व त्याचे महत्त्व काय हे येथे विशल करून या लेखाचा आकार वाढवत नाही. त्यावर यथावकाश प्रकाश टाकील. मात्र सध्यातरी आपापसातील सर्व हेवे-दावे, गट-तट विसरून, सर्व शक्तीनिशी संघर्ष केला तर निश्चितपणे यश आल्याशिवाय राहणार नाही व वर्षानुवर्षांपासून होत असलेला अन्याय थांबवून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
धन्यवाद🙏

आपला:
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

गोंधळी पुनर्विवाह

गोंधळी पुनर्विवाह
मित्रांनो मी सोशल मीडियावर वर्तमानपत्रात छापुन आलेली बातमी वाचली. बातमी ही श्रीमती अनिता विनायक साळुंखे रा. चिकलठाणा, औरंगाबाद व श्री. प्रकाश वसंत गरूडकर रा. चाळीसगांव, जळगांव या विधवा-विधुर जोडप्याने गोंधळी समाजातील जुनाट रूढी परंपरांना फाटा देत पुनर्विवाह केल्याची होती.

मला शंका आली की नाही हे शक्य नाही. एवढेही मागासलेपण आपल्या जमातीत नाही की विधवा अथवा विधुर पुनर्विवाह होत नाहीत. ही बातमी म्हणजे काहीतरी स्टंटबाजी अथवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेली शाळा वा ड्रामेबाजी आहे. मला काहीसा रागही आला की ही स्वप्रसिद्धीसाठी समाजाची बदनामी आहे. म्हणुन मी या पुनर्विवाहाचे बातमीत छापलेले प्रेरक श्री. रामभाऊ गायकवाड यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी सांगीतले की अजुनही इकडे विधवा, घटस्फोटीतांच्या पुनर्विवाहाच्या बाबतीत समाजमन अनुकुल नाही. उलटतपासणी करण्यासाठी मी त्यांच्या बरोबरच इतर दोघा- तिघांना फोनवरून माहीती विचारून शहानिशा केली तर त्यांनीही, नाही! सहसा होत नाहीत असेच सांगीतले!!

मित्रांनो चाळीसगांव, जळगांव व एकंदरीत खानदेशातच गोंधळी जमातीमध्ये विधवा पुनर्विवाह शक्यतो होत नाहीत म्हणे!! होत असतील तर आनंदच आहे मात्र होत नसतील तर हे फारच धक्कादायक व भयानक आहे. फुले शाहु आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात 21 व्या शतकातही ही परिस्थती असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. ही परिस्थीती काही केवळ गोंधळी जमातीचीच नक्कीच नसेल. इतरही भटक्या विमुक्त जमातींची परिस्थिती यापेक्षा निश्चीतच भिन्न नसेल.

मला प्रश्न पडतो की मग शासन काय सांगते की देशातील जमातींची परिस्थिती सुधारली आहे, सुधारत आहे म्हणुन? ही सनसनीत चपराक आहे हरी नरके सारख्या तज्ञाला. जे म्हणतात की गोंधळी ही एक प्रगत व पुढारलेली जात आहे. तसेच हा पुरावा आहे, गोंधळी समाज सर्वत्र अजुनही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. अद्यापही बराच समाज मागास व पारंपारंपरिक विचारसरणीचाच आहे याचा.

महाराष्ट्राच्या व देशाच्या सर्वच भागात हे चित्र पहायला मिळते असे नाही शिवाय खानदेशातही असे असेलच असेही मला म्हणायचे नाही. कारण मी या बातमीच्या व संबंधितांनी फोनवरून दिलेल्या माहीतीच्या आधारे लिहीत आहे. परंतु जर हे सत्य असेल तर हे आजच्या काळात अत्यंत अपमानास्पद आहे. प्रत्येक मनुष्याला जोडीदाराची नैसर्गिक व भावनिक गरज असतेच एवढे साधे शास्त्र जर आपल्याला समजत नसेल तर आपण माणुस कसे काय म्हणवले जाऊ शकतो? या पुनर्विवाहांना विरोध करण्याचा अधिकार विरोधकांना कोणी दिला? सोबतच मला हे एवढ्या सा-या संघटना, समाजसेवक, उच्च व सुशिक्षित तरूण, नोकरदार व अधिकारी यांचेही हे अपयश वाटते. एवढे सगळे मिळून परिस्थिती बदलु शकत नाहीत?

मित्रांनो शासन काही करेल नाही करेल मात्र समाजातील सुशिक्षित लोकांनी पुरोगामी विचारांची पेरणी, आपली समाजाप्रती सामाजिक बांधिलकी समजून केली पाहिजे. स्वतः बावळट रूढी परंपरांचे बंध तोडुन मानवतेच्या मार्गावर चालुन आदर्श निर्माण करून दिले पाहीजेत. परिस्थीती बदलण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. खासकरून पुढारलेल्यांनी सुधारलेल्यांनी. कारण हे मागासलेपण शासकिय सहानुभुती मिळविण्यासाठी जरी मदतगार असले तरी कायद्याच्या व मानवतेच्या दृष्टीने मात्र भुषणावह अजिबात नाही. काळ बदलत आहे, आपणही बदलले पाहिजे. जुनाट व बुरसटलेल्या विचारांसह आपण यशाची शिखरे सर करूच शकत नाहीत.

मी श्री. रामभाऊ गायकवाड (अध्यक्ष, गोंधळी समाज संघटना, चाळीसगांव) यांचे व त्यांच्या श्री. संतोष सोनवणे (उपाध्यक्ष), श्री. जयंत गायकवाड, श्री. विष्णु भिसे, श्री. सतिश पवार, श्री. बाळासाहेब गायकवाड या व इतर सहका-यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व वधुवरांच्या निर्णयाचा व या मंडळींच्या पुढाकाराचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे नम्र आवाहन करतो.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092

जशी दृष्टी तशी सृष्टी.........

जशी दृष्टी तशी सृष्टी.........

मित्रांनो, नुकतेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निर्दयी हत्याकांड आपण अनुभवले. राईनपाडा ग्रामस्थांच्या अमानुष मारहाणीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच नाथपंथी डवरी गोसावी जमातीतील लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. या घटनेने संपुर्ण देश हळहळला. सोबतच भटक्या विमुक्तांची पोटाची खळगी भरण्यासाठीची वणवण भटकंती पाहुन समाजमन गहीवरले. अनेक बुद्धवाद्यांनी विचारवंतांनी, समाजसुधारक साहीत्यीकांनी आपापल्या प्रतिक्रिया मांडल्या. सोशल माध्यमातून व वर्तमान पत्रातुन खुप काही लिहीले गेले. मिडीया प्रतिनिधींनी संपादकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्यक्ष त्या क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींनीही आपले अनुभव व भटक्यांची सद्यस्थिती यावर प्रकाश टाकला. कशाने परिस्थीती पालटु शकते यावरही मंथन झाले.

जेष्ठ शिक्षणतज्ञ मा. श्री. हेरंब कुलकर्णी, मा. प्रा. श्री. हरी नरके, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष मा. श्री. बाळकृष्ण रेणके आदिंचे मी लेख वाचले. मात्र मला प्रा. हरी नरके यांचे लिखाण भटक्या विमुक्तांच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित व व्यक्तीद्वेषपुर्ण वाटले.  यापुर्वीही याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. हकनाक मेले 5 डवरी गोसावी या आपल्या लेखात हरि नरके पाच भटक्यांच्या मरणाची खिल्ली उडवताहेत की काय असे वाटते!!

ते लिहीतात भटके लोक आपापल्या परिसरातील शेतांमध्ये किंवा जवळपासच्या कारखाण्यांमध्ये मजुरी का करीत नाहीत? असे गावोगावी भटकत जगण्यात नेमके काय सुख असते ? भटक्यांचे राष्ट्रीय नेते गेली 50 वर्षे नेमकी कसली चळवळ करताहेत? ते त्यांना व्यवसाय परिवर्तन करायला का शिकवित नाहीत? सन्मानाने जगायला का सांगत नाहीत? लाचारी, व्यसनं सोडायचा संस्कार का करीत नाहीत? त्यांचं कायमचं पुनर्वसन का करीत नाहीत? अशा अनेक प्रश्नांच्या जणूकाही फैरीच ते झाडतात.

मला वाटते हे प्रश्नच सर्वकाही स्पष्ट करतात. मुळात भटके लोक स्वखुशीने व हौसेने दरदर भटकत नाहीत. भटकणे, त्यासाठी कला कसरती दाखविणे, भिक्षा मागणे हा वर्षोंवर्षीचा  व्यवसाय म्हणून या समाजाने स्विकारला आहे. शिवाय त्याला कोणता पर्यायही उपल्ब्ध नाही. हे त्यांचे जीवन जगण्याचे साधन आहे हे नरकेंनी समजुन घेतले पाहीजे. इतर साधनांची अनुपलब्धता देखील उमजून घेतली पाहिजे. यांचा ना कोणी नेता आहे, ना कोणता राजकीय पक्ष आहे. जरी असेल तरी सर्वव्यापक नाही. भटक्यांच्या क्षेत्रात काम करणारे समाज सेवक अनेक आहेत. ते आपापल्या परिने मरमर करताहेत. पण भटक्यांच्या विमुक्तांच्या जिवनमानात खरा बदल घडवून आणायचाय तो सरकारने. तळमळ असणारे कार्यकर्ते, अभ्यासक अथवा यांचे प्रश्न मांडणारे, यांना संघटीत करणा-या लोकांना यांच्या जीवनात सकारात्मक स्थित्यंतर आणणे शक्य नाही. त्यांना ना कुठले अधिकार असतात ना कुठली आर्थिक तरतूद असते. त्यामुळे त्यांनाच हरि नरके साहेब आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे करत आहेत ते कळत नाही.
जिवंत असणाऱ्यांच्या समस्या व मरणारांचे दुःख तर बाजुलाच राहीले. नरकेजी हेच सांगण्यात दंग आहेत की यांचे पुरुष व्यसनी असतात, काम करत नाहीत!!! हे सांगत असताना यांची ही स्थिती का झाली? शिक्षणाबाबतीत हा समाज पिछाडीवर का आहे. याला जबाबदार कोण? पारंपरिक रोजगार बुडाल्याने ते कसे बेकार व बेरोजगार आहेत हे ते सांगत नाहीत. बहुधा हे त्यांना मान्य नसावं म्हणुन ते मान्य करीत नाहीत.
त्यांचं ते मुंबईतील गाय पुराण तर संपता संपत नाही. मात्र ते नाही केले तर ही मंडळी उपाशी मरेल हे त्यांना का समजत नाही? नंदिवाले बांधव, दत्तांच्या गाईवाले अक्षरशः रस्त्यावर आले आहेत हे त्यांना दिसत नाही? यांत्रिकीकरण व आधुनिक कायदे यांना जीवन जगण्यास अनेक अडचणी आणत आहेत. हे ते समजून घेत नाहीत? वकील पितापुत्रांचे उदाहरण तळपायाची आग मस्तकात नेहते. जर हे खरच असेल तर सरळ नाव का घेत नाहीत ते?
उपेक्षित वंचितांच्या समस्या कायम आहेत हे मान्य करतात मात्र ज्या भाषेत ते लिहीतात की, "म्हणून तर हे नेते मजेत जगताहेत. नी वंचित असे कुत्र्याच्या मौतीनं मरताहेत" हे वाचुन वाईट वाटते. वाटते जणुकाही ते जखमेवर मीठ चोळत आहेत.
मित्रांनो राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याला, एका अभ्यासु व बुद्धीमान प्राध्यापकाला, एका कुशल साहीत्यिकाला व वक्त्याला हे शोभत नाही. हाच यांचा अभ्यास आणि हाच यांचा अनुभव का? आयतं खाण्यात, लाचारीनं जगण्यात जी मजा आहे ती कष्टात कशी असणार भाऊ? असे विचारून भटक्यांचे पारंपारिक व्यवसाय हे नरकेंना मेहनत न करता जगण्याचा, शॉर्टकट वाटावेत!! हे काम ही मंडळी हौसेने करत असल्यासारखे प्रतिप्रश्न करणे अनाकलनीय आहे.

उलट हेरंब कुलकर्णी भटक्यांचे जगणे किती विदारक आहे हे प्रामाणिकपणे मान्य करतात. भटक्यांचे पारंपरिक व्यवसाय कसे बुडाले आहेत, उदर्निवाहाची भयानक परिस्थीती कशी निर्माण झाली आहे हे ते मांडतात. भटके लोक सध्या कोणकोणते पर्यायी व्यवसाय करीत आहेत, वस्तुस्थिती किती भयावह आहे, शासन प्रशासन किती उदासीन व शोषक आहे हे विशद करतात. विकास तर सोडाच अजुन किमान माणुस म्हणून जगण्यात किती अडचणी आहेत हे ते मांडतात व अशा परिस्थितीत सरकारने व समाजाने काय करायला हवे असे उपायात्मक मतही मांडतात.
त्याचबरोबर राज्य भरातल्या भटक्यांच्या जीवनातील काही यशोगाथाही ते मांडतात. शासनाने भटक्यांच्या पालावर जावे, त्यांच्याकडे लक्ष द्यावे, निधी वाढवून द्यावा व तो पुर्णपणे खर्च करावा, भटक्या विमुक्तासाठी विशेष धोरण असावे अशी अपेक्षा व्यक्त करतात हे पाहुन असे म्हणावेसे वाटते की, व्यक्ती व्यक्तीत विचार करण्यात किती तफावत असु शकते?
या दोघांच्या अभ्यासातुन व लिखाणातुन याचा प्रत्यय येतो. हरि नरकेंचा पुर्वग्रह दुषीत द्रुष्टीकोन व हेरंब कुलकर्णींचा वास्तववादी व सहानुभूतीपुर्ण पण विशिष्ट अपेक्षा ठेवून लिहीण्याचा, मत मांडण्याचा द्रुष्टीकोन स्पष्ट दिसुन येतो. असो शेवटी काय तर जशी दृष्टी तशी सृष्टी!!

बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

पवित्र

पवित्र....
मित्रांनो राज्यातील सर्व सरकारी, स्थानिक संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या रिक्त पदावर व भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांवर शिक्षणसेवक भरती करण्याठी दि. 20 जुन 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षणसेवक पदासाठी योग्य व उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षणसेवकाची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये  TAIT गुणांच्या आधारावर करण्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला. या निर्णयाला अनुसरूनच शिक्षणसेवकाची भरतीप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होण्याच्या दृष्टीने ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षणसेवक भरतीसाठी ‘पवित्र’ (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पद्धतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला. आज पासून पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टलवर नोंदणीचे वेळापत्रक देखील दिले आहे. तरी TAIT उतीर्ण विद्यार्थी उमेदवारांनी सदर पोर्टलवर आपली माहिती भरावी.

उमेदवाराने नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम www.edustaff.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईटच्या डाव्या बाजूला PRIVATE नावाच्या TAB ला क्लिक करा. मग REGISTRATION या TAB वर क्लिक करा. मग SELECT ROLE TAB वर क्लिक करा व APPLICANT सिलेक्ट करा. USER ID या रकान्या मध्ये आपला शिक्षण भरती व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा TAIT बैठक क्रमांक हा पवित्र प्रणालीसाठी स्वतःचा USER ID म्हणून नमूद करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. (नमुना Example : SED_TAIT_ 073458)
मग पासवर्ड तयार करा. (पासवर्ड तयार करतांना त्यामध्ये मोठ्या लिपीतील किमान एक इंग्रजी मुळाक्षर, लहान लिपीतील किमान एक मुळाक्षर, किमान एक अंक, एक स्पेशल CHARACTER (उदा : @#$% इत्यादी). Example : Pass@123 पासवर्ड असा तयार करा जो सहज लक्षात राहील व पासवर्ड कोणाबरोबर शेयर करू नका. मग स्वतःचा मोबाईल क्रमांक टाका व मोबाइलला नंबर टाकल्यावर जो OTP नंबर मोबाइलमध्ये येइल  तो OPT च्या रकान्यात टाका. मग स्क्रीन वर असलेला Captcha Code खाली नमूद करा व Register या बटनावर क्लिक करा. (अशाप्रकारे आपण LOGIN व्हाल) Login झालाव्यावर Application Details या बटनावर क्लिक करा व Personal Details , Address for Communication, TET Exam Details, Qualification Details ही सर्व माहिती भरा. सर्व माहिती भरल्यावर उमेदवाराने सर्व भरलेली माहिती नीट पडताळून पाहावी कारण अर्ज submit केल्यानंतर उमेदवाराला माहिती मध्ये बदल करता येत नाही.

माहीती कशी भरावी यासाठीचे ब्राऊजर येथुन डाऊनलोड करा👇👇

https://drive.google.com/file/d/163Uf0KRZh82B9oOI8irsPRnNolm1dst0/view?usp=drivesdk

दि. 20.06.2018 चा शासन निर्णय येथुन डाऊनलोड करा👇👇
https://drive.google.com/file/d/1Ugpz44w87Dv4IBDjSit21rhjNkcyFK1t/view?usp=drivesdk

आपलाः बाळासाहेब धुमाळ🙏