Thursday 23 August 2018

जग बदल घालून घाव

जग बदल घालून घावः

घाव घालुन जग बदलण्याची हाक देणारे बाबासाहेबांचे अनुयायी, सवर्णांच्या विरोधामुळे केवळ दिड दिसाची शाळा शिकुनही आखिल मराठी साहीत्य जगतावर आपल्या विलक्षण बुद्धीमत्तेची अमिट छाप पाडणारे थोर लोक लेखक आदरणीय आण्णा भाऊ साठे यांची आज ९८ वी जयंती...

ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है। हे लोकांच्या मुखातून घोषणांच्या रूपाने बाहेर पाडणारे आण्णा सुरुवातीच्या काळात कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. त्यांच्यावर कार्ल मार्क्सच्या विचारांचा प्रभाव होता. नंतर ते लोकशाहीवादी झाले.

 मात्र कम्युनिस्ट विचारांचा पगडा असताना त्यांनी हिटलरचा नाझीवाद,  रशियन, चिनी व कोरियन राज्यक्रांती संदर्भात केलेले लेखन तसेच बंगालचा दुष्काळ, तेलंगाना राज्य निर्मिती, पंजाब दिल्ली हिंसाचार यावरील लेखन एखाद्या उच्च विद्याविभूषित लेखकाला देखील लाजवते. अर्थात मी जेवढे वाचले तेवढेच मला हे मान्य करायला भाग पाडते की आण्णा एक बेजोड साहित्यिक होते.

आण्णांनी कित्येक कादंब-या, लघुकथा, पटकथा, पोवाडे, लावण्या लिहील्या. त्यांच्या अनेक कादंब-यावर चित्रपट निर्माण करण्यात आले. आण्णांचे लेखन अत्यंत संवेदनशील व स्फुर्तीदायी आहे. त्यांची शब्द पेरणी अफलातून होती. विषमता, गरिबी आणि शोषण हे आण्णांचे जिव्हाळ्याचे लेखन विषय. मात्र आपण ते प्रसिद्धीसाठी वा व्यावसायिकतेने लिहीत नव्हते तर सामाजिक, आर्थिक व राजकीय ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लिहीत होते हे आपण समजून घेतले पाहिजे.

मित्रांनो मी आण्णांना केवळ लेखक मानत नाही. मला वाटते आण्णा एक क्रांतिकारक होते. एक निर्भीड सेनानी होते ज्यांनी लेखणीला तलवार बनविले. रक्तात ऊर्जा संचाररायला लावणारे, डोळ्यातून आग व अश्रु वाहायला लावणारे आण्णा एक बहुढंगी विविधांगी साहित्यिक म्हणून अजरामर आहेत व राहतील. त्यांची फकीरा ही कादंब-या प्रत्येकाने वाचायलाच हवी. 'माझी मैना गावावर राहीली' हि लावणी आजही रक्तात शक्ती भरते.

मात्र दुर्दैवाने ब-याच अंशी त्यांचे साहीत्य व स्वतः आण्णा जनतेच्या प्रतिसादाला पोरके ठरले. आण्णा देशाचे रत्न होते याचा अभिमान देशाला वाटायला हवा. केवळ मांग वा मातंग समाजाचा आदर्श ठरत चाललेल्या आण्णांचा सर्वांना अभिमान असायलाच हवा. सकळ हिंदु धर्माचे आण्णा निसंकोच भुषण आहेत हे आपल्या लक्षातच येत नाहीये. त्यांचे असे दुर्लक्षित राहणे नव्हे त्यांना असे दुर्लक्षित ठेवणे मला फार व्यथित करतेय. एवढ्या प्रतिभावंत व प्रेरक वारणेच्या वाघाला माझा मानाचा मुजरा आणि जयंती दिनी त्रिवार विनम्र अभिवादन तसेच सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.....

बाळासाहेब धुमाळ.

No comments: