Thursday 23 August 2018

आरक्षण नको सन्मान पाहिजे

आरक्षण नको  सन्मान पाहिजे....

एकीकडे आरक्षणासाठी देशभरात विविध जातींची रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू असताना तामिळनाडूतील मदुराई येथे देवेंद्र कुला वेल्लार जातीचे रस्त्यावर उतरूनच जनआंदोलन सुरू आहे मात्र ते आरक्षणासाठी नव्हे तर चक्क आरक्षण सोडण्यासाठी!!! अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेली ही जात राज्यात लोकसंख्येने साठ लाखांच्या आसपास आहे. भारताच्या आरक्षण इतिहासातील अशा प्रकारचे हे पहिलेच आंदोलन असावे बहुदा. आरक्षण नको सन्मान पाहिजे अशी मागणी करणा-या या लोकांना युथ फॉर इक्वालिटीचे व राज्यातील पुठीया तामिलागम नामक राजकिय पार्टीचे ही समर्थन आहे.

लोक नाचत आहेत, गात आहेत, घोषणाबाजी करत आहेत, बायका डोक्यावर दह्यादुधाने पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन दिंड्या काढत आहेत, आरक्षण मुक्त होण्यासाठी!! आम्हाला आरक्षणाची कुबडी नको आहे. समाजासमाजात फूट पाडणारे ही विषमतामूलक भीक नको आहे, असे म्हणत हे लोक सरकारचे व देशाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहेत. आरक्षणाच्या ज्वाला आम्हाला जातीय विषमतेची व हीनतेची वागणूक देत आहेत. त्यात आम्ही होरपळून निघत आहोत. त्यामुळे आम्हाला कोणीही दलित म्हणू नये असे यांचे म्हणणे आहे. यासाठी हे लोक अगदी सडक ते संसद असा संघर्ष करण्यासाठी उतावीळ आहेत. केवळ मुठभर म्हणजे साधारणपणे एक ते दोन टक्के लोकांना आरक्षणाचा लाभ मिळतो मात्र बाकीच्या 98 टक्के लोकांना अस्पृश्यतेची वागणूक मिळते म्हणून आम्ही आरक्षण नाकारत आहोत असे यांचे म्हणणे आहे.

 मित्रांनो, या आंदोलनाने एका कटू पण जाहीर व भेदक वास्तवावर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे की, आरक्षणाने मागास जातींना त्यांचे न्याय्य हक्क अधिकार, सवलती, प्राधान्य मिळाले. विविध क्षेत्रात भरीव कार्य करून आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सहाजिकच या जाती जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीत जरी बदल झाला असला, सुधारणा झाली असली तरी यांच्या सामाजिक स्थितीत मात्र कसलीही सुधारणा झालेली नाही. अजूनही एससी, एसटी, डीएनटी, ओबीसी म्हटले की सवर्णांच्या भुवया उंचावतात. चेहऱ्यावरील भाव बदलतात. शिवाय जातीय द्वेष, मत्सर विकोपाला चालला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे वेदोक्त वर्ण व्यवस्थेशी एकप्रकारे समांतर अशी वर्ग व्यवस्थाच जणुकाही निर्माण झाली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या उतरंडीप्रमाणेच ओपन, ओबीसी, डीएनटी, एसटी, एससी अशी ही सामाजिक उतरंड उभी राहताना दिसत आहे. या उतरंडीतील ही मडकी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ समजतात!!

सदरील समुदायाने घेतलेला निर्णय माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. याला मी शुद्ध आत्महत्या म्हणेल कारण एससी मधून बाहेर पडले म्हणजे समाजात मान सन्मान मिळेल हा भाबडा विश्‍वास स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारुन घेणारा आहे. कारण जेव्हा हे एससी, एसटी, डीएनटी, ओबीसी, ओपन असे वर्गीकरण नव्हते तेव्हाही समाजात जातींवरून हिनतेची वागणूक दिलीच जात होती ना? आरक्षण नाकारून आणि कागदावरून जात नष्ट करून हा प्रश्न मिटणार नाही, फरक पडेल एवढे नक्की मात्र समस्या मुळासकट सुटणार नाही. यासाठी प्रबोधन होणे, दृष्टिकोन बदलणे, कायद्याची मदत घेणे, शैक्षणिक व आर्थिक प्रगती करून राहणीमान बोलीभाषा सुधारणे आवश्यक आहे. समाजातील प्रतिष्ठितांनी व सुशिक्षितांनी आंतरजातीय आंतरजमातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन समानतेची भावना वाढीस लागू शकते. याची सुरुवात प्रवर्गामधील समाविष्ट जाती-जमातींमध्ये परस्परात आंतरजातीय आंतरजमातीय विवाह व्हायला हवेत म्हणजे एससी मधील कोणत्याही जातीचे एससीतीलच कोणत्याही जातीशी लग्नसंबंध व्हायला हवेत. तसेच एसटी, डीएनटी, ओबीसी व ओपन च्या बाबतीत व्हायला हवे. अर्थात हे सर्व कुठलीही जोर जबरदस्ती न करता स्वेच्छेने व्हायला हवे.

अलीकडच्या काळात भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. त्यासाठी जोगोवा सेवा समिती नावाची संघटना काम करत आहे. श्री. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी याकामी स्वतःला वाहून घेत आहेत. जोशी गोंधळी वासुदेव चित्रकथी बागडी पांगुळ बहुरूपी डवरी या जमाती, त्यांच्यातील उपजमातींसह आंतरजमातीय विवाहाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत आहेत. हे सामाजिक समानतेच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. पुढे चलुन हेच पाऊल एका क्रांतीची सुरुवात ठरेल. अशाने जाती जातींमधील अंतर कमी होऊन मानवतेची, एकतेची व समानतेची भावना वाढीस लागेल. याच मार्गावर पुढे जाऊन मग आंतर प्रवर्गीय विवाह देखील होतील आणि एकदा का माणसे नातेसंबंधाने, रक्तसंबंधाने एकजीव व एकरूप झाली की ही जातीवर आधारलेली श्रेष्ठतेची व कनिष्ठतेची कुप्रथा कुपरंपरा समुळ नष्ट होईल याबाबतीत शंका नाही.

बाळासाहेब सिताराम धुमाळ
मोबाईल 9673945092.

No comments: