Thursday, 23 August 2018

राजकारणातील अजातशत्रू अटलजी

राजकारणातील अजातशत्रू अटलजीः

"सत्ता का खेल तो चलेगा,
सरकारें आएंगी जाएंगी,
पार्टियां बनेगी बिगड़ेगी,
मगर ये देश रहना चाहिए,
इसका लोकतंत्र अमर रहना चाहिए' !

पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या वैचारिक तालमीत तावूनसुलाखून निघालेले आणि शिक्षक पिता श्री. कृष्णबिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी संस्कारांनी परिपक्व बनलेले तसेच सन्माननीय श्री. लालकृष्ण अडवाणी यांची जिवलग मैत्री लाभलेले भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक ध्रुवतारा निखळला आहे. एक सूर्य मावळला आहे.

खुप काही लिहावे असे वाटतेय मात्र शब्दच सुचत नाहीयेत. मनात घालमेल होतेय. आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींचे मोठेपण यात आहे की ते अजातशत्रू होते. जीवनाकडे राजकारणापलीकडे आणि राजकारणाकडे पक्षापलीकडे जावून ते पाहत होते. ते देशाला सर्वतोपरी समजत होते. देश राहीला पाहीजे, लोकशाही राहिली पाहिजे, ही त्यांची भावना, ही त्यांची शिकवण पुढच्या पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करेल.

त्यांचे मोठेपण यात होते की ते त्यांच्या राजकीय विरोधकांना शत्रु समजत नव्हते. त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये पंडित नेहरूंचा फोटो मागवून घेवून लावायला सांगीतला! राजीनामा द्यायला निघालेल्या मनमोहन सिंग यांना राजीनामा देवू दिला नाही! आणिबाणीनंतर इंदिराजींना अटक होऊ दिली नाही! यावरून त्यांचे महानपण सिद्ध होते.

विरोधकही त्यांना शत्रु समजत नव्हते. बघा, राजीवजींनी अमेरिकेला जाणा-या शिष्टमंडळात अटलजींचा समावेश करून त्यांच्यावर न्युयार्कमधील अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घडवून आणले!  नरसिंहराव यांनीही काश्मीर प्रश्नावर पक्ष मांडण्यासाठी युनोमध्ये पाठविलेल्या भारतीय शिष्टमंडळात त्यावेळी विरोधीपक्ष नेते असणाऱ्या अटलजींचा समावेश केला होता! जेंव्हा पंतप्रधान होण्याची वेळ आली तेव्हा त्यावेळी काहीसे वरचढ असुनही आडवाणींनी स्वतः आपल्या या जीवलग मित्राचे नाव पुढे केले!

अशाप्रकारे जकारणापलीकडे जाऊन लोकांशी, देशांशी संबंध प्रस्थापित करणारे आदरणीय अटलजी गेल्यामुळे भारताचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श सर्वांनी अंगीकारले तर एक सुंदर भारत, अटलजींच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

अटलजींसारखा सारखा माणूस जन्मावा लागतो. असा युगपुरुष भारताने नक्कीच देवाकडे मागुन घेतला असावा. असे वाटते की भारताने शे पाचशे वर्षे प्रार्थना केली असेल परमेश्वराकडे तेव्हा अटलजींसारखा माणूस भारतात जन्माला.

आपण लक्षात घेतले पाहिजे की त्यांना शिक्षक व्हायचे होते, मात्र राजकारणात आले. एकेवेळी तर अटलजींचा श्वास कोंडत होता या राजकारणात. हे स्वार्थी, कपटी, मुल्येहीन राजकारण ते सोडु इच्छित होते मात्र राजकारण त्यांना सोडत नव्हते. सुरुवातीच्या काही काळात समाजवादी विचारांनी झपाटलेले अटलजी नंतर नंतर हिंदुत्वाकडे वळले. मात्र तरीही त्यांचे हिंदुत्व कट्टर नव्हते. इतर धर्मांनाही सोबत घेऊन चालणारे अटलजी राजकारणातले एक महामेरू एक दीपस्तंभ होते.

मागास वंचीत दुर्लक्षित समाज घटकांबाबतीत त्यांच्या मनात सहानुभूती होती. यांच्या स्थितीबदलासाठी ते प्रयत्नशील होते.त्यांच्या भटक्या विमुक्तांसाठी राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग स्थापन करणे, सर्व शिक्षा अभियान राबवणे यारून दिसुन येते.

त्यांना दिव्य विकासदृष्टी लाभली होती.
देशातील प्रमुख नद्या जोडणारा नदीजोड प्रकल्प राबवणारे पंतप्रधान, दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई जोडणारा स्वर्णिम चतुष्कोन निर्माण करणारे पंतप्रधान, कारगील युद्धात खंबीरपणे सैन्याच्या मागे उभे राहाणारे व सैन्याला मुक्त स्वातंत्र्य देणारे पंतप्रधान, अमेरिकेच्या दबावाला धुडकावून एपीजे अब्दुल कलाम व अनिल काकोडकर यांच्या पाठीशी उभे राहुन गुप्तपणे पोखरण अणुचाचण्या घडवून आणणारे पंतप्रधान, पाकिस्तानला सदा-ए-सरहद बस सेवा सुरू करून पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान!!

एक कोमल हृदयाचे संवेदनशील कवी ते खंबीर विचारांचे पंतप्रधान हा त्यांचा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आहे. अटलजींच्या कविता एखाद्या धर्मग्रंथापेक्षाही महान आहेत. जो त्या वाचील तो कधीही वाम मार्गावर तर जाणारच नाही मात्र चमकल्याशिवाय राहाणार नाही.

लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. देश जीवंत राहीला पाहीजे हा एका कवीचा विचार जीवंत राहीला पाहिजे मित्रांनो😓
भारत मातेच्या या थोर सुपुत्राला मानाचा मुजरा. पुन्हा पुनर्जन्म देऊन अटलजींना भारत भूमीवर पाठवावे यासाठी परमेश्वराला विनम्र प्रार्थना🙏

बाळासाहेब धुमाळ😓

No comments: