तेव्हा पैसा खुजा वाटतो….
मित्रांनो नुकतेच माझे चुलत
सासरेबुवा श्रीमान गणपतराव पांडूरंग जाधव वय साधारणपणे 65 वर्षे राहणार पारगांव मोटे ता.वाशी जि.
उस्मानाबाद हे
–हदय विकाराच्या तीव्र झटक्याने अचानक व तडकाफडकी या जगाला सोडून गेले.
वर “ चुलत सासरेबुवा
” असा जो शब्द वापरला आहे तो केवळ सख्या सासरेबुवांना,
त्यांच्या नातेवाईकांना अथवा त्यांच्या मित्र परिवाराला वाईट वाटू नये म्हणून. एरवी मी कोणतेही
नाते चुलत, मावस, आते, मामे किंवा सावत्र वगैरे मानत नाही. माझे चुलत सासरे गणपत मामा
हे अत्यंत गरीब, हातावर पोट असणारे, पाच मुलींचे व एका अयशस्वी मुलाचे वडील, अयशस्वी
म्हणायला मला ही दु:ख होत आहे पण सत्य हे सत्यच असते ना ? आज गणपतमामा या जगात नाहीत याचे श्रेय जर त्यांच्या मुलाला दिले तर अतिशोक्ती ठरणार नाही!! अर्थात एवढया एकाच कारणाने त्यांना –हदय विकाराचा झटका
आला नाही. पाच पैकी दोन मुली अल्प वयात अकस्मात ईश्वराला प्रिय झाल्या, सख्या भावाला
त्याच्या दोन मुलींच्या लग्नाच्या अगोदरच्या दिवशी देवाने बोलावले व प्रामुख्याने गरीबी
या संकटांचा सामना करता करता त्यांच्या कोमल -हदयाचा कुठपर्यंत निभाव लागणार होता? वर उल्लेख केलेप्रमाणे गणपतमामा हे माझे जरी 'चुलत' सासरे होते तरी त्यांनी मला कधी ही चुलत जावाई अशी वागणूक दिली नाही. मी माझ्या
11 वर्षाच्या जावाई कालावधीत कधीही त्यांच्या घरुन टॉवेल टोपी शिवाय, बायको साडी चोळी
शिवाय व माझी दोन अपत्य पाप्यांशिवाय आली नाहीत. जशी असेल तशी धशी व चोळी बांगडी ती
ही मनपुर्वक व प्रेमपूर्वक ते मला करत. हे सांगण्यामागचे प्रयोजन माझा मोठेपणा सांगणे हा आहे असे वाटत असेल कोणाला तर माझे “दुर्दैव” पण त्यांचा
मोठेपणा सांगणे हे माझे कर्तव्य नव्हे तर माझे सौभाग्य समजतो आणि तो सांगितला नाही
तर तो त्यांच्यावर अन्याय व माझी कृतघ्नता होईल. ते केवळ माझ्यासाठीच चांगले निश्चित
नव्हते. कारण चांगली माणसे ही सर्वांसाठीच चांगली असतात. ज्यांना त्यांच्या चांगुलपणाचा
प्रत्यय आला ते त्यांची प्रतिक्रिया निश्चित देताहेत किंवा देतील. पण केवळ दुधाचा चहा
पाहुण्यांना मिळावा म्हणुन भर उन्हात गावभर दुध शोधणारे माझे चुलत सासरेबुवा गणपतमामा
मला दिसतात. पण माझ्या डोळयातील पाणी हे लिहित असताना मी आपणास दाखवू शकत नाही व आपण
ते पाहू शकत नाहीत.
दगडा
मातीच्या घरात राहणा-या गणपतमामांचे माझ्यावरीलच नव्हे तर सर्वांवरीलच असणारे प्रेम
दाखण्यासाठीच हा शब्द प्रपंच नाही तर खटाटोप आहे तो प्रत्यय सांगण्याचा जो मला ते गेल्यानंतर
आला…
ते
गेले, सर्वांनाच जायचे आहे. कुणीही या पृथ्वीवर कायम स्वरुपी वास्तव्याचे परमिट घेवून
जन्मास आलेला नाही. मृत्यु जे एक अटळ व शाश्वत सत्य आहे. जीवणरुपी प्रवासाचे ते एक
शेवटचे स्थानक आहे. ते कोणीही नाकारु शकत नाही. उलटपक्षी मी असे म्हणेण की, गणणतमामांना
खुप चांगला मृत्यु आला. धन्यवाद म्हटले पाहिजे
त्या देवाला ज्याने –हदयविकारासारखा आजार बनविला. झटपट रामराम, ना शरीराची झिज, ना
प्रतिक्षा मृत्युची! मला ही यावा तर असाच मृत्यु
यावा, अगदी तडकाफडकी! पण मी पुराण वाड.यातुन असे वाचुन आहे की, असा तडकाफडकी मृत्यु
केवळ पुण्यात्मांनाच येतो आणि म्हणूनच या पुण्यात्माच्या अंत्यविधीस अगदी मध्यरात्री
देखील शेकडो किलो मीटरचा प्रवास करुन शेकडो मैलांवरून मिळेल ते वाहन मिळवून शेकडो लोक
हजर झाले. ही त्यांची कमाई होती. मरणा दारी की तोरणा दारी, म्हणजे माणसाची आपली माणसे
अथवा त्याची प्रतिष्ठा तपासायची असेल तर सु:खद वा दु:खद क्षणीच तपासावी, पण मी म्हणेल की, ती
केवळ मरणादारीच तपासावी. कारण सुखाचे सोबती तर सगळेच असतात, दु:खात सर्वजण सोडून जातात.
पण गणपतमामाला कोणीही सोडले नाहीत. बुध्दीजीवी, श्रीमंत, उच्च शिक्षित, गोरगरीब असे
सर्व जाती धर्मातील स्त्री- पुरुष अबाल वृध्द मोठया संख्येने जमा झाले. शेवटचा आधार
(खांदा देणे) साठी नंबर लावू लागले. अनेकांना खांदा दयायला प्रतिक्षा करावी लागली.
मी काही बोलू शकलो नाही पण माझे डोळे बोलत होते, त्यांना आठवून साश्रू श्रध्दांजली
अर्पण करत होते. माझ्या सोबत अनेकजणांची स्थिती हीच होती. मृत देहाच्या दहनाचा अंतिम
विधी अटोपून अनेकजण स्वगृही गेले, अनेकजण खेडयातील रस्त्यांवर नाली शेजारी उघडयावर
झोपले. झोप होती डोळयात पण ती आली नाही मला. केवळ हाच विचार येत होता मनात की, मी एक
शासकीय नोकरदार, चारचाकी मध्ये फिरतो, क्विचीतच ए.सी. शिवाय! लोक म्हणतात मी एक श्रीमंत
व्यक्ती आहे अर्थात मी मानत नाही पण मी निश्चितच गरीब नाही पैसाने. पण गणपतमामा, हे
अत्यंत गरीब होते ना ? एवढे लोक का आले अंत्यविधीला ? का हळहळत आहेत सर्वजण ? उत्तर
एकच की ते आर्थिकदृष्टया दरिद्री होते पण मनाने व विचाराने अत्यंत धनाढय होते आणि गरीब
असूनही श्रीमंता पेक्षाही श्रीमंत होते. त्यांच्यावर
प्रेम करणा-यांमध्ये केवळ पाहूणे आणि नातेवाईकच नव्हे तर इतर जाती धर्माचे लोक ही होते.
या सर्वांशी त्यांचे अत्यंत प्रेमपूर्ण संबंध होते. ते एक अजात शत्रू होते (त्यांचे
कोणीही शत्रु नव्हते.) मग प्रश्न हा पडतो की, मनुष्य प्राणी आजन्म आपल्या नावासमोरील
संपत्तीच्या आकडयासमोरील शुन्य वाढविण्यासाठी धडपड करतो त्यासाठी न्याय नितीला पायदळी
तुडवतो तरीही श्रीमंत होत नाही. तो स्वत:ला श्रीमंत समजतो हा भाग निराळा पण मग अशी
गणपतमामांसारखी आर्थिक दृष्टया दरिद्री माणसे कशी काय श्रीमंत बनतात ? बरे, विशेष न
शिकलेल्या लोकांना आपण आडाणी समजतो आणि तेच लोक ज्ञानाचे धडे देवून जातात! मग खरे श्रीमंत
कोण? ते का आपण ? खरे ज्ञानी कोण? ते का आपण ?
तर निश्चित तेच कारण श्रीमंती मनाची असो की, धनाची ती एक भौतिक नव्हे तर भावनिक
व मानसिक स्थिती आहे. गणपतमामांना अखेरचा निरोप देवून जेव्हा त्यांच्या गत वास्तवाच्या
ठिकाणी अर्थात त्यांच्या घरी परत आलो तेव्हा हे कळून चुकलो अशी माणसेच खरी माणसे असतात व माणूस म्हणून जगून आपला ठसा सोडून जातात. आपण मात्र व्यावसायिक म्हणून येतो व शुन्यांची
भर पाडण्याच्या प्रयत्नात दरिद्री म्हणून मरतो.
जेव्हा
हातोहात अंत्यविधीची तयारी होते, जेव्हा शेकडो लोक शेकडो मैलावरुन अर्ध्या रात्री ग्रामीण
भागात येतात, जेव्हा खांदा देण्यासाठी बारी लागते, जेव्हा डोळयांना रडण्याचा आव आणावा
लागत नाही, जेव्हा जवळच्या नातेवायकांना दवाखाण्यात ॲडमिट करावे लागते, जेव्हा लोक पायांना वाहन
बनवतात, जेव्हा लोक रात्र जागून काढतात, जेव्हा रडणारी डोळे व थरथरणारे ओठ रडू नका
त्यांना त्रास होईल म्हणतात, जेव्हा पदसिध्द, पैशावाली व प्रतिष्ठीत माणसे खाली माना
घालतात तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
ज्याच्या
मागे माणूस आयुष्य भर पळतो, ज्याच्यामुळे माणूस माणूस रहात नाही, जेव्हा माणसाला याचा
ही विसर पडतो की, क्या तु लेकर आया था, क्या लेकर जायेगा ? खाली हाथ आया था और खाली
हाथ जायेगा. हे सर्व यथेच सोडून जायचे असून ही व पैश्यामुळे मिळणारा मोठेपणा जो क्षणिक
व भ्रामक आहे. हे माहित असून ही पैश्याला महत्व देतो. तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
माणूस वेळेला आयुष्यभर पैश्याची ताकद दाखवतो व वेळ माणसाला एकदाच पैश्याची मर्यादा
दाखवते. तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
पैसा
निश्चित कमवायला हवा, पद पैसा व प्रतिष्ठा या त्रयींचा जवळचा संबंध आहे. पदाने पैसा
व पैशाने प्रतिष्ठा अर्थात मान-सन्मान मिळतो हा समज जेव्हा गणपतमामांसारखी माणसे
स्वजिवणातून गैरसमज म्हणून सिध्द करतात व हे दाखवून देतात की, पद व पैश्यांशिवाय ही
मान-सन्मान मिळू शकतो तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
सर्वांनाच
एक दिवस मातीत मिसळायचे आहे. हे जग सोडून जायचे आहे. सर्वांच्याच चितेला मुखाग्नी दिला
जाणार आहे, मग लाकडे साधी असतील वा चंदनाची असतील जळायचे सर्वांच आहे. मागे रहणार आहेत
ते आपले विचार, शब्द व नाते वास्तविक पाहता गणपतमामांकडे काळा तर सोडाच पण पांढरी ही कवडीही नव्हती तरी ही ते एवढे श्रीमंत कसे तर त्याचे उत्तर एकच आयुष्यभर सेवाभाव जपून मानवता
हिच खरी श्रीमंती या सुत्राचे त्यांनी कायम पालन केले म्हणून.... माणसाने बुध्दीने, शरीराने व मनाने श्रीमंत असावे
(
Head, Hand and Heart) पण आपल्या नावासमोरील संपत्ती मध्ये शुन्यांची संख्या
वाढविण्यात धन्य मानणा-यांना जिथे वरील प्रकारच्या श्रीमंतीचा अर्थच समजत नाही तिथे
अश्या श्रीमंतीचे ते महत्व काय समजणार ? गणपतमामांकडे होते ते प्रेमाचे दोन शब्द आणि
त्यामुळे जोडली गेलेली प्रेमाची चार माणसे!! कारण त्यांना हे माहित असावे कदाचित की,
पैसा हे जीवण जगण्याचे साधन आहे जीवणाचे साध्य नाही. कदाचित ते हे ही जाणत असतील जे
कबीर सांगून गेले की,
जब हम पैदा हुए, जग हसे हम रोये
एैसी करणी कर चलो, हम हसे जग रोये
II
शब्दांकन : बालासाहेब सिताराम (बी.एस.)
धुमाळ
मो. – 9421863725 / 9673945092