|
धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ? |
धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?
अलीकडच्या काळात रस्त्यांवर साजरे होणारे सार्वजनिक धार्मिक उत्सव, मिरवणूकींमध्ये गर्जणारे कर्णकर्कश डीजे, प्रार्थनास्थळांवरील अनियंत्रित भोंगे, विवाह व घटस्फोट, अपत्य मर्यादा अशा अनेक मुद्द्यांवरून कायद्याने धर्मात हस्तक्षेप करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही धर्माचे धार्मिक आचरण इतरांसाठी म्हणजेच सार्वजनिकरित्या मानव जीवनासाठी त्रासदायक ठरू नये ही कायद्याची भुमिका आहे. मानवी जीवन, पर्यावरण व प्रकर्षाने जीवावरण यांना बाधा पोहोचणार नाही. जन्मजात मानवी हक्क अधिकारांचे संरक्षण व्हावे ही कायद्याची भुमिका आहे. मात्र समाजातील काही लोकांना हे धर्मावरील अतिक्रमण वाटते. धर्मामध्ये कायद्याने हस्तक्षेप करू नये, धर्म हा कायद्यापेक्षा प्राचीन आहे, धर्म हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे, धर्म ही आमची वैयक्तिक बाब आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. काहीजण तर अगदी कायद्यालाही आव्हान देतात. याच मुद्द्यावर मागच्या आठवड्यामध्ये मी एक फेसबुक पोल घेतला होता. "धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?" असा सरळ प्रश्न फेसबुक मित्रांना विचारला होता.
अर्थात मला यात अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळाला नाही कारण मुळात फेसबुक पोल ही संकल्पनाच अद्याप ब-याच जणांना माहीत नाही. तर बऱ्याच जणांना असे वाटते की उगीच आपले मत कळवून कशाला डोळ्यावर यायचे? वास्तविक पाहता हा पोल गोपनीय असतो. यात कोणी काय मत नोंदविले हे इतरांना कळत नाही. अशा प्रकारच्या पोलमधून साधारणपणे समाजमन काय विचार करते हे तपासून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच प्रयत्न मी केला होता. यात 26 टक्के लोकांनी धर्म श्रेष्ठ तर 74 टक्के लोकांनी कायदा श्रेष्ठ असे मत नोंदविले. ज्यांनी कायदा श्रेष्ठ असे मत मांडले त्या सर्वांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.
मला कळत नाही कायद्यापेक्षा धर्म श्रेष्ठ असूच कसा काय शकतो?? खरे तर न्याय, संधी, समानता, हक्क अधिकारांची जपणूक हाच खरा धर्म असायला हवा. परंतु प्रत्येक धर्माचे नियम वेगळे असतात! कायदा मात्र सर्वांसाठी एकच असतो, समान असतो. धर्म बदलला जाऊ शकतो परंतु व्यक्तिगणिक कायदा बदलला जाऊ शकत नाही. धर्म ही वैयक्तिक बाब आहे तर कायदा ही सार्वजनीक हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. धर्माची निर्मिती कोणी केली? नियम कोणी बनविले? धर्म नियम बनविताना लोकमत व लोकहित लक्षात घेतले होते काय? याचे उत्तर सापडत नाही मात्र कायदे हे लोकांमार्फत निवडलेल्या अथवा लोक मान्यता असलेल्या समित्या, परिषदा व मंडळे यांनी बनविलेले असतात.
धर्मातून अनिष्ठ रूढी, परंपरा निर्माण होतात. त्यांनाच पुढे धर्मनियमांचे स्वरूप प्राप्त होते. पुढे काळाच्या कसोटीवर ही विचारसरणी टिकत नाही, परिणामी हे आचरण अयोग्य व अनिष्ट सिद्ध होते, मात्र तरीही त्यात बदल करता येत नाही! तशी धर्मात तरतूदच नसते! जर कोणी त्यात बदल करण्याचा, शुद्धीकरण, उद्बोधन, अथवा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तशी चळवळ सुरू केली तर त्याला धर्मद्रोही सिद्ध केले जाते. कायद्यात मात्र तसे नसते एखादा कायदा अन्यायकारक अथवा विसंगत आढळून आला तर त्यात बदल केला जाऊ शकतो अथवा तो संपुष्टातही आणला जाऊ शकतो.
आजवर धर्मातील अनेक रूढी, परंपरा, प्रघात यांनी मानवाचे शोषण केले आहे. एका ठराविक वर्गाकडे धर्मनियम बनविण्याची, त्यांची अंमलबजावणी करण्याची तसेच नियंत्रण ठेवण्याची, न्याय देण्याची, दंड करण्याची मक्तेदारी होती व आजही आहे. हे सर्व अधिकार वंशपरंपरेने अर्थात जन्मजात प्राप्त होतात.कायद्यात मात्र तसे नसते. आपली बौद्धिक योग्यता सिद्ध करून कोणीही कायद्याचा निर्माता, अमलदार अथवा न्यायदाता बनू शकतो. कायद्याच्या राज्यात जन्माने काहीच मिळत नाही. तिथे धर्म हा निकषही नसतो. धर्माचा काही फायदाही होत नाही व तोटाही होत नाही.
धर्मामुळे शक्तीचे ध्रुवीकरण होते तर कायद्यामुळे विकेंद्रीकरण होते. अनावश्यक उन्माद वा माज वाढीस लागतो, इतरांना आपल्यापेक्षा कमी लेखण्याची मानसिकता बनते, तशीच सवय जडते, द्वेष बळावत राहतो! तर कायदा संयम शिकवितो! बारकाईने पाहता धर्माने दिनदलित, दुर्बल व दुबळे, स्त्रिया, शारीरिकदृष्ट्या असक्षम लोक या समाजघटकांचा काहीही विचार केलेला नाही. या शोषित व दुर्लक्षित लोकसमूहाच्या विकासासाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली नाही उलट यांचे अधिकाधिक शोषण कसे होईल याचीच काळजी घेतली म्हटले तर वावगे ठरणार नाही. कायद्याने मात्र या सर्व घटकांना प्राधान्य दिले, न्याय दिला. एवढेच काय तर कायद्याने अगदी पशूपक्षी, वनस्पती ते पर्यावरणाचे अगदी निर्जीव घटक यांनाही न्याय दिला!
कायदा हा स्वतःच्या चिकित्सेची, समीक्षेची, टिकात्मक अभिव्यक्तीची जनतेला अनुमती देतो. असहमत वर्ग सनदशीर मार्गाने कायद्याला विरोध करू शकतो, निषेध नोंदवू शकतो आव्हान देऊ शकतो! कारण कायदा तशी अनुमती देतो नव्हे कायद्यात तशी सोयच केलेली असते मात्र धर्माच्या बाबीत हे करता येत नाही. धर्माला हे स्वतःवरील आक्रमक वाटते. याला धर्मद्रोह संबोधले जाते! आजवरच्या अनेक चिकित्सक संतांना, विचारवंतांना व संशोधकांना याची किंमत मोजावी लागली आहे.
जगातील प्रत्येक धर्म आपल्या धर्मियांना धर्मतत्वांचे व नियमांचे पालन करायला सांगतो मात्र परधर्म व परधर्मीयांबाबत एक प्रकारचा दुजाभावच जोपासला जातो. कायद्याने मात्र सर्व धर्म समान ठरविले आहेत. धर्माने समाजाला जाती-जातीत, पंथा-पंथात विभाजित केले आहे. स्तरीकरणाची म्हणजेच विषमतेची सुरुवात धर्मापासूनच झाल्याचे दिसते मात्र हे वर्गीकरण कमी करण्याचे काम कायद्याने केल्याचे दिसते. प्रत्येक धर्म स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो यातून तुलना व स्पर्धा निर्माण होते. आपण इतिहासात अनेक उदाहरणे पाहू शकतो की जिथे केवळ धर्मप्रसारासाठी मोठ-मोठी युद्धे झाली! मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली! प्रचंड हाल झाले! जोरजबरदस्तीने धर्मांतर करून घेण्यात आले! आजही सर्वच धर्मातील अनेक संस्था धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र यातील कोणीही सकल मानव जातीचे जीवनमान सुधारावे, अन्याय-अत्याचार संपावेत, समानतेचे, न्यायाचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी काम करताना दिसत नाही. थोड्याफार प्रमाणात प्रयत्न होताना दिसले तरी पर धर्मियांसाठी कोणीही काहीही करत नाही कारण स्वधर्म हेच कार्यक्षेत्र समजले जाते परंतु सर्व धर्मीयांच्या जीवनमानाची काळजी केवळ कायदाच घेतो. न्यायाचे व समानतेची राज्य प्रस्थापित केवळ कायदाच करतो!
वास्तविक पाहता कायदा हा मुळात धर्माचा अविभाज्य भाग असायला हवा. तसा तो प्रत्येक धर्मियाने समजायलाच हवा. आज प्रत्येक धर्माचे आपले असे स्वतंत्र कायदे आहेत. धर्मांनी अर्थात धर्मग्रंथांनी धर्मोपदेशकांनी मानवी जीवनात सुव्यवस्था व नीतीमुल्ये वाढीस लागावी त्यासाठी काही बंधने लावली हे खरे परंतु यातील वैविध्यामुळे स्थलकाल विसंगतीमुळे याला मर्यादा येतात. देशात जरी धर्म अनेक असले तरी माणुस मात्र एकच आहे. त्याची रचना, त्याच्या भावभावना, त्याच्या अपेक्षा, गरजा व समस्या समान आहेत. त्यामुळे एक समान कायदा असणे व तो श्रेष्ठ मानणे हेच उचीत व कालसुसंगत आहे.
धर्म श्रेष्ठ म्हणणारांनी व इतरांनाही म्हणा म्हणणाऱ्यांनी आपल्या बुद्धीची कवाडे उघडी ठेवून, सद्सद्विवेक जागा ठेवून हा विचार करावा की धर्माचे श्रेष्ठत्व मानावेसे म्हटले तरी प्रश्न असा निर्माण होईल कि कोणत्या धर्माचे श्रेष्ठत्व मान्य करायचे? कारण अनेक बाबींवर दोन धर्मांमध्ये मतभेद आहेत. वेगवेगळी धारणा आहे. काही धर्म हिंसेचे समर्थन करतात तर काही धर्म अहिंसेचे! कायदा मात्र कोणत्याच प्रकारची हिंसा मान्य करीत नाही. तो किमान एका देशात तरी एकच असतो त्यामुळे आज जेव्हा माणसाची ओळख, त्याचे लाभ हक्क अधिकार हे देशावरून निश्चित होतात तेव्हा कोणत्याही देशात, त्या देशाचा कायदा हाच श्रेष्ठ मानला गेला पाहिजे.
धर्माचा पुळका असणारे लोक जेव्हा धर्मातील लोकांना धर्मातीलच लोकांकडून त्रास दिला जातो तेव्हा का बरे मूग गिळून गप्प बसतात? किमान आपल्याच धर्मातील लोकांना तरी त्रास दिला जाऊ नये ना? धर्म हा जर माणसाला विभागत असेल, धर्मामुळे जर माणसे गटागटात विभागली जात असतील, धर्म धर्मांतर्गत अन्याय अत्याचार कलह रोखु शकत नसेल तर धर्माला श्रेष्ठ का म्हणून म्हणायचे? आणि जर असे म्हटले की धर्म श्रेष्ठ! तर मग आजवर धर्मांतरे का झाली? नवीन धर्मांची निर्मिती का झाली? म्हणजेच त्या कुठल्या का असेना, धर्मांमध्ये काहीतरी अयोग्य किंवा अनिष्ट होत होते जे न पटल्याने एक ठराविक वर्ग एखाद्या ठराविक धर्मापासून बाजूला झाला व त्यांना पटत असलेल्या विचारांच्या धर्माशी जोडला गेला अथवा आपला स्वतःचा वेगळा धर्म निर्माण केला.
मला कळत नाही, शेवटी धर्म धर्म म्हणजे तरी काय हो? आज रोजी आपण ज्या विविध क्षेत्रातील संघटना पाहतो अथवा राजकीय पक्ष पाहतो त्यापेक्षा धर्माची रचना वेगळी ती काय? कोणे एके काळी धर्माची स्थापना किंवा धर्माची निर्मिती ही देखील याच पद्धतीने झालेली आहे. कुणाच्यातरी विचारांवर धर्म आधारलेला आहे. कोणीतरी धर्माची संहिता तयार केली व ती संहिता पाळणारे एकत्र आले आणि धर्म तयार झाला. एकप्रकारे धर्म हा समविचारी लोकांचा समुहच आहे. पुढे धर्म संस्थापकाचे विचार व धर्माचे कार्य यांनी प्रेरित व प्रभावित होऊन धर्माचे अनुयायी वाढत गेले. संघटना किंवा राजकीय पक्ष यापेक्षा काही वेगळे असतात का? त्यामुळे कोणीही धर्माचे आगाऊ भूषण बाळगण्याची आवश्यकता नाही. त्याची काही आवश्यकताही नाही व उपयोगही नाही.
बरं, आपला तो धर्म आणि दुसऱ्यांचा तो?? इतरांनाही धर्म आहे ना? त्यांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. या माझ्यातुझ्यात सर्वसामान्य माणसाचे हाल होतात त्याचे काय? मानवी उत्क्रांतीच्या काळामध्ये सर्वप्रथम माणूस समूहाने राहू लागला व त्यानंतर समविचारी लोकांच्या समूहामध्ये राहू लागला. त्यातून धर्म जन्माला आला अर्थात तेव्हाही त्याने कायद्याला महत्व दिलेच होते. कायद्याचे श्रेष्ठत्व त्या माणसांनी सुद्धा मान्य केले होते व त्याप्रमाणे ते वागत होते मात्र काळाच्या ओघात त्यांनी घालून दिलेले नियम हे बदललेल्या परिस्थितीत विसंगत व अन्यायकारक सिद्ध झाले. म्हणजे जर प्राचीन माणूस कायदा श्रेष्ठ मानत होता तर मग आता एकविसाव्या शतकातील सुशिक्षित व विचारी माणसे कायद्याला आव्हान कसे काय देतायत हे समजत नाही. कायद्यापेक्षा त्यांना धर्म श्रेष्ठ कसा काय वाटू शकतो हे समजत नाही. अर्थात अशा लोकांची संख्या जास्त नाही परंतु एवढी धार्मिक कट्टरता देखील धोक्याचीच!
साधी बाब आपण समजून घेतली पाहिजे की जे चांगले ते श्रेष्ठ असायला हवे ना? जर धर्म श्रेष्ठ आहे असे म्हटले तर आजवर असंख्य धर्म सुधारणा चळवळी करण्याची गरजच पडली नसती. त्यातील अनिष्ट बाबी संपविण्यासाठी व योग्य ते करून घेण्यासाठी कायदे करावे लागले नसते. धर्मामुळे धर्मयुद्धे झाली! कायद्यामुळे युद्धे शमली! भांडणे मिटली! आज कायद्यांमुळे भांडणे अथवा युद्धे करता येत नाहीत यातच कायद्याचे श्रेष्ठत्व आले. अहो कायदा आहे म्हणून आज प्रत्येकजण सुरक्षित आहे अन्यथा धार्मिक दंगलींमध्ये तसेच देशादेशांमधील धार्मिक युद्धांमध्ये मानव जात केव्हाच नष्ट झाली असती. कायदा आहे म्हणून जीवनाला, संपत्तीला व प्राणाला संरक्षण आहे अन्यथा यादवी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. कायद्याला आव्हान देण्याऐवजी आपापला धर्म मनात व घरात मानुन कायद्याचा आदर करण्यातच खरे शहाणपण आहे.
परंतु याचा अर्थ धर्म मानुच नये असा होतो का? धर्माची तत्त्वे जोपासूच नयेत असा होतो का? तर मी म्हणेल अजिबात नाही. धर्म हा मानलाच पाहिजे परंतु धर्म म्हणजे काय? धर्माने काय केले पाहिजे? धर्माची कोणती तत्वे पाळायला पाहिजेत? हे समजून घेतले पाहिजे. शिवाय जसा आपला धर्म आहे तसाच इतरांचाही धर्म आहे याची जाणीव ठेवून परस्पर सामंजस्य जपत जीवन शेवटाला नेहणे, ते नेहत असताना मागच्यांसाठी अनुकूल, सकारात्मक व हितावह सामाजिक वातावरण निर्माण करणे हाच खरा धर्म! कोणीतरी सांगावे व आपण धर्माच्या नावाखाली ते ऐकावे याला धर्मप्रेम म्हणत नाहीत तर याला गुलामी म्हणतात, तीही मानसिक गुलामी! याचाही विचार करायला हवा. धर्म हा प्रत्येकाला असतो. प्रत्येकाची ती एक खाजगी खाजगी बाब आहे. म्हणून प्रत्येकाने ती खाजगीच ठेवायला पाहिजे. धर्म प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे, घरात ठेवला पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये मानवता हाच खरा धर्म मानला गेला पाहिजे. कायद्याचे पालन हेच धर्माचरण असले पाहिजे नव्हे कायदा पाळणे हाच प्रत्येक देशवासीयांचा धर्म बनला पाहिजे.
परंतु आज आपण पाहतो प्रत्येक धर्मात धर्मप्रेमाच्या नावाखाली धर्माचे प्रदर्शन करून एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. अशा प्रकाराची अजिबात आवश्यकता नाही. उलट आवश्यकता आहे ती धर्माच्या ख-या तत्त्वांचे पालन करून मानवता वाढीस लावण्याची. जेव्हा धर्माचा उपयोग राजकारणासाठी व लोकांना मूर्ख बनवून अर्थार्जनासाठी केला जातो तेव्हा धर्माचा खरा उद्देश नष्ट होतो आणि जेव्हा असे होते तेव्हा कायद्याची आवशक्ता निर्माण होते. आजवर अनेक धर्ममार्तंडांना व धर्मोपदेशकांना आपण माती खाताना पाहीले आहे. चारित्र्यहीन व्यापारी जेव्हा पैसा व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी धर्माचा उपयोग करतात तेव्हा कायद्याची आवश्यकता पटते.
त्यामुळे धर्म श्रेष्ठ वाटणारांनी व आपले हे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणारांनी एक लक्षात घ्यायला हवे की धर्माचा अभिमान केवळ आपल्यालाच आहे असे नाही. फरक एवढाच आहे की काही अंध अनुयायी असतात तर काही डोळस चिकीत्सक असतात जे उठसूट कुणाचेही विचार स्विकारत नाहीत. त्यामुळे केवळ आपणच धर्माभिमानी असल्याचा आव कोणीही आणू नये. आपणच सर्वोच्च धर्माभिमानी असल्याचा अविर्भाव अयोग्य आहे खरेतर जो धर्मातील एखाद्या अनिष्ट प्रथेविषयी रूढी परंपरेविषयी अथवा विद्यमान वर्तनाविषयी टीका करत असेल ती बाब सर्वांच्या समोर आणत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे कारण खऱ्या अर्थाने तोच खरा धर्म प्रेमी समजला गेला पाहिजे ज्याला आपल्या धर्मात कायद्याचे राज्य अपेक्षित असते. त्याला कोणत्याही प्रकारच्या अयोग्य व अनिष्ट बाबींचे अस्तित्व मान्य नसते मात्र काही लोक स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी, स्वतःची वेगळी ओळख टिकविण्यासाठी त्याला धर्मद्रोही सिद्ध करण्याचा ओढून-ताणून प्रयत्न करतात. मात्र हे इतरांच्या लक्षात येत नाही असं समजण्याची चूक करू नका कारण 74 टक्के लोकांना कायदा हाच श्रेष्ठ वाटतो....!
(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9673945092.